गोदीच्या संगणक विभागात शिरकाव !
२ एप्रिल १९८६, कामाचा पहीला दिवस ! कार्यालयाची वेळ सकाळी ८ ची होती. उगीच पहील्याच दिवशी उशीर नको म्हणून ६:३० लाच घर सोडले. गर्दीच्या वेळेत लोकल पलडायचा तो पहीलाच प्रसंग होता. प्रचंड गर्दी आणि रेटारेटी, मला ट्रेन पकडणेच जमत नव्हते. चार ट्रेन नुसत्या समोरून गेल्या, ७:१५ वाजले, गर्दी वाढतच चालली होती. शेवटी 'आर या पार' या आवेशात डब्यात शिरलो पण आत गेल्यावर तोल सावरताच येईना. लोंढ्याच्या रेट्या बरोबर डब्यात खालीच पडणार असे वाटून अंदाजाने एक बार पकडण्यासाठी हात पुढे केला तो नेमका एकाच्या गळ्याभोवती ! तो जो कोणी होता त्याची पाचावर धारणच बसली ! त्याच्या तोंडून शब्दच फूटत नव्हते, नुसती घरघर ! मला काय ते समजले, मी हळूच हात पाठी घेतला ! जरा वेळाने त्याचा चेहरा बघता आला. पार भेदरला होता तो ! कामावर वेळेवर पोचलो. एक आठवडा आम्हाला कामाचे ट्रेनिंग मिळणार होते. आमच्या दिमतीला एक वरीष्ठ क्लार्क देण्यात आला. पहीला दिवस नुसती गोदी फिरायची होती. अगदी बँलार्ड पियर ते भाउचा धक्का ! १२ पर्यंत ही सहल पार पडली. मग त्याने आम्हाला एका गेटवर सोडले आणि बोलला सूटा आता ! बरोबर एक कॉलनीतला मित्र होता. त्याच्या बरोबर थेट गेट-वे-ऑफ इंडीया गाठले. मग रीगल ला सिनेमा ! आठ दिवसाचे ट्रेनिंग बघता बघता संपले आणि सूरू झाले प्रत्यक्ष काम. माल आयात आणि निर्यात होतो तेव्हा त्याची त्याच्यावर असलेल्या मार्कप्रमाणे नोंद, मोजणी व त्याची स्थिती (landing condition) नोंदवून ठेवणे म्हणजेच टँली, तेच आमचे काम होते. मग गरज असेल तर आयातदार जेव्हा माल सोडवायला येईल तेव्हा कस्टम्स च्या परवानगीने, गोदीचे सर्व शूल्क भरल्यानंतर डीलीव्हरी देण्याके काम ही करायला लागायचे. आठवड्याच्या एका पाळीमध्ये दोन दिवस काम, बाकी चार दिवस आराम असे. चक्क ९ वाजता मी घरी पोचायचो किंवा मग क्लब, पिक्चर, फोर्ट विभागात फेरफटका असा कार्यक्रम असे ! रात्रपाळी असायची ५ ते ११:३० ! दिवसभर घरी हुंदडायचे, कॉलेजात जाउन मित्रांना भेटायचे, कामावर जाउन बुकींग घ्यायचे मग पोस्टर बघून इंग्रजी सिनेमा, कँनन मधे पावभाजी, बाजूला कालाखट्टा ! तिसरी पाळी ११:३० ते सकाळी ६ ! झोपेचे खोबरे व्हायचे पण कामाचा ताण मात्र कधीच वाटला नाही, अगदी आजतागायत ! अशी ही सुखावह स्थिती लग्न झाल्यावर सुद्धा कायम होती. बायकोला वाटायचे मुंबईचा आणि सरकारी नोकरी असलेला नवरा केलाय पण हा कामावर जातो कधी, येतो कधी ? आपली नक्की फसवणुक झाली आहे ! हा बहुदा बेकारच असणार ! लग्न झाल्यावर विरारला रहायला गेलो आणि मग शिफ्टचा त्रास होउ लागला. वाटू लागले की नको ते पाळ्या, वेळी-अवेळी जाणे येणे ! गोदीत तेव्हा प्रायोगिक तत्वावर संगणकाचा पाळणा हलू लागला होता. तिकडे काम करायला कोणी तयार नव्ह्ते. एकच पाळी, दिवसपाळी मिळेल या आशेने मी तिकडे जाउ लागलो. गोदीत तेव्हा मालाची हाताळणी कंटेनरमधून हो लागली होती. या कंटेनरचा उतरल्यापासून परत जहाजावर चढेपर्यंत माग घेण्याकरीता in house software तयार झाले होते. त्याची चाचपणी आम्ही घेत होतो. महीनाभर हे नाटक चालले व बंदाच पडले. पुढ्चे दोन महीने नुसते बसून काढले. संगणकावर गेम खेळणे, dbase, word star, lotus यांची या काळात माहीती झाली. एके दिवशी फतवा आला, आम्ही परत आमच्या विभागात जावे म्हणून ! विभागात वर्दी दिल्यावर बुकींग क्लार्कने विचारले की अजून एका software ची चाचणी चालू आहे त्यात जाल का ? मी ताबडतोब होकार कळवला ! हे software होते CARMINS ( Cargo Management & Information System ) आणि CCAS (Computerised Cargo Accounting System) यात जहाजाने आलेला सूटा माल उतरल्यापासून ते आयातदाराने ताब्यात घेईपर्यंत मागोवा घ्यायचा होता. प्रचंड काम होते हे ! कोबोल मधे प्रोग्रँम होते व operating system होती unix ! जहाजाने आणलेल्या मालाची संगणकात data entry करणे हे मूळ काम आमच्या गटाकडे होते. चाचपणी सुरू असल्यामुळे आवाका कमी ठेवला होता. फारतर तासाभराचे काम होते मग सरळ घर गाठणे. असे वर्ष पार पडले ! सर्व चाचण्या अगदी रमतगमत पार पडत होत्या ! अचानक ठरले की आता थेट अंमलबजावणी. OS अपग्रेड करण्यात आली आणि अगदी अनपेक्षितपणे माझे नावे unix ट्रेनिंग साठी घुसवले गेले. एक आठवडा unix च्या असंख्य कमांड शिकण्यात गेला आणि या project मधली माझी involvement नकळत वाढू लागली. प्रसादचा जन्म झाला व मी कायम दिवसपाळी, रविवार सुट्टी असे ठरवून या cell चा भार स्वीकारला !
मराठी ब्लॉग - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीतले अनुभव, स्वत:चे विचार, संस्कृत सुभाषिते, मुंबईच्या लोकलने रोज कराव्या लागणार्या प्रवासाचे अनुभव, इंग्रजीतले जे भावले त्याचा माय मराठीत अनुवाद आणि बरेच काही, जुन्या व गाजलेल्या हिंदी,मराठी गीतांच्या एम.पी.३ खजिन्याची किल्ली! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे.
शुक्रवार, २७ जून, २००८
गोदीच्या संगणक विभागात शिरकाव !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा