शनिवार, २६ सप्टेंबर, २०१५

वाचू “ई”त्यानंदे !

 वाचनाचे मला वेड आहे पण इतर अनेक वेडांपायी त्याला पुरेसा वेळ देता येत नव्हता. काही काळ लोकलच्या प्रवासात पुस्तक वाचन करायचो पण सोबतचे गप्पिष्ट मित्र हातातून पुस्तक खेचून घेत. लोकलमध्ये पुस्तक वाचून आधी चष्मा लागला व पुढे त्याचा नंबरही वाढला. वाचन रोजच्या वर्तमानपत्रापुरतेच मर्यादित झाले. इंग्रजी वाचनाचा मला जरा सुद्धा गंध नव्हता. एकतर ते आपल्याला कळायचे नाही ही भीती व दूसरे म्हणजे अडलेल्या शब्दाचा अर्थ समजल्याशिवाय पुढे जायचे नाही ही सवय. म्हणजे पुस्तकासोबत जाडजूड शब्दकोष सोबत कायम ठेवणे आले. तसेही मराठीतले एवढे विपुल लेखन आपण वाचू शकत नाही तर इंग्रजीचा सोस तरी का बाळगा ? असाही विचार होताच. मात्र आत कोठेतरी थोडेतरी इंग्रजी साहित्याच्या प्रांतात डोकावायला हवे ही इच्छा प्रबळ होत होती.
काही महिन्यापुर्वी सचिनचे “प्लेयींग इट माय वे” हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. सचिन व माझी कायमच लव एन हेट रिलेशनशीप, तेव्हा याने काय लिहिले आहे व कितपत प्रामाणिक लिहिले आहे ही जिज्ञासा स्वस्थ बसू देत नव्हती. पण पुस्तक इंग्रजीत होते व त्याचा मराठी अनुवाद कधी येइल हे सांगता येत नव्हते. पुस्तकाची किंमत सुद्धा तगडी होती. गुगल करत असताना अचानक या पुस्तकाची इपब फाइल मला सापडली. ५०० रूपयापेक्षा जास्त किमतीचे पुस्तक फूकट हाती लागले पण ती फाइल उघडता येत नव्हती. परत गुगलबाबाला शरण गेल्यावर अशी पुस्तके उघडायला ई-बुक रीडर लागतो याचे ज्ञान झाले. प्ले वर असंख्य रीडर उपलब्ध आहेत व ते मोफत व प्रो अशा दोन्ही प्रकारात मिळतात.  गुगल प्ले वरून मुन रीडर उतरवून घेतले व सचिनचे आत्मचरीत्र एकदाचे उघडले ! ई-बुक हा खरेच एक भन्नाट शोध आहे ! याचे अनेक फायदे आहेत. एक तर मायाजालावर लाखो पुस्तके या प्रकारात उपलब्ध आहेत व नैतिकतेचा जास्त बाऊ न करता तुम्ही ती उतरवून घेवू शकता. तुमची पुस्तके तुम्हाला जगाच्या पाठीवर कोठेही घेवून जाता येतात. पुस्तकाची अनुक्रमणिका उघडून तुम्ही कोणत्याही प्रकरणात चुटकीसरशी डोकावू शकता. तुमच्या सोयीप्रमाणे प्रकाशाची तीव्रता कमी-जास्त करू शकता. लोकल मध्ये शेजार्याला त्रास न देता तुम्ही वाचन करू शकता. एकावेळी अनेक पुस्तके थोडी थोडी वाचता येतात व पुढच्या वेळी आधी आपण जिकडे थांबलो होतो ते पान आपसुकच उघडते. बुकमार्कची सोय आहे. तुम्ही एखादे पुस्तक किती वेळ वाचता आहात, तुमच्या वाचनाचा वेग किती आहे, पुस्तक किती वाचून झाले (टक्क्यात ) , हे सर्व तुम्हाला समजते. या फाइल आकाराने खूपच छोट्या असतात, अगदी २०० ते १२०० केबी ! त्यामुळे एक जीबी एवढ्या जागेत हजारो पुस्तके मावतात. मित्रांबरोबर पुस्तके तुम्ही अगदी सहज शेयर करू शकता. प्रकाशक, लेखक, विषय, नुकतीच वाचलेली पुस्तके अशा अनेक प्रकारे तुम्ही पुस्तकांचे वर्गीकरण करू शकता. 
ज्यांना पुस्तक पीसीवर वा लॅपटॉपवर वाचायचे असेल त्यांच्यासाठी कॅलिबर (Calibre) हे भन्नाट सॉफ़्टवेयर अगदी मोफत उपलब्ध आहे. यात तुम्ही पुस्तक वाचू शकताच वर एका प्रकाराचे पुस्तक दूसर्या प्रकारात बदलू सुद्धा शकता. ई-बुक्स मध्ये epub, mobi, pdf, azw हे मुख्य प्रकार आहेत. तुमचा इ-बुक रीडर एखादा प्रकार उघडू शकत नसेल तर कॅलिबर वापरून तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या प्रकारात तो बदलून घेवू शकता. सगळ्यात लोकप्रिय प्रकार अर्थात epub  आहे व मायाजालावर बहुसंख्य पुस्तके याच प्रकारात मिळतात.
ई-बुक रीडर मधले सगळ्यात भन्नाट फिचर म्हणजे इंग्रजी शब्दकोषाची जोड ! तुम्हाला जो शब्द अडला असेल तो फक्त दाबून धरा (लॉंग प्रेस ), त्या शब्दाचा अर्थ, उच्चारण, वाक्यात अर्थ अशी बरीच माहिती पॉप अप होते ! अर्थात या साठी तुम्हाला “डिक्ट “ गुगल प्ले वरून उतरवून घ्यायला हवे. (डिक्ट हे एक वेगळेच प्रकरण आहे, वेळ मिळेल तसा त्यावर प्रकाश पाडेन !) यात तुम्हाला डिक्ट पुरक असलेले अनेक शब्दकोष जोडता येतात. मी शब्दांजली हा इंग्रजी – हिन्दी शब्दकोष त्याला जोडला असल्याने मला अडलेल्या शब्दाचा हिंदी अर्थ सुद्धा मिळतो ! सर्च फिचर सुद्धा असल्याने पुस्तकात तुम्हाला एखादा संदर्भ, नाव कितीवेळा आले आहे ते लगेच शोधता येते. यात अजून एक भन्नाट फिचर आहे ते म्हणजे “टी.टी.एस”( Text to Speech ). पुस्तक उघडा, कानात इयरफोन अडकवा व हे फिचर ऑन करा ! रिडर तुम्हाला चक्क पुस्तक वाचून दाखवेल ! मला स्वत:ला हा प्रकार पसंत पडला नाही कारण हे रीडर फारच यांत्रिकपणे वाचतात व त्यातुन वाचनाची गंमत निघून जाते.  किंडल या प्रकाराची मला थोडी कल्पना आहे पण याची किंमत ६००० ते २२००० रूपये आहे व याची मासिक वर्गणी सुद्धा असते. पण याच किंमतीत ७ इंची टॅब तुम्ही घेवू शकता व गेम खेळण्याबरोबरच पुस्तक वाचनाचा आनंद लुटू शकता. (अर्थात किंडलचे वजन खूपच कमी असते तर टॅब पाव किलोपेक्षा थोडा जास्तच वजनाचा असतो.)
हे सगळे तंत्र आत्मसात झाल्यावर माझी वाचनाची गाडी सुसाट सूटली आहे ! झपाटल्यासारखे सचिनचे आत्मचरित्र वाचून झाल्यावर मी अनेक गाजलेल्या इंग्रजी पुस्तकांचा फन्ना उडविला आहे. “अ सुटेबल बॉय” ही विक्रम सेठ यांची गाजलेली कादंबरी तब्बल १००० पानांची आहे व ५.५ इंची मोबाइल स्क्रीनवर ती पाने होतात ६००० ! ही कादंबरी मी झपाटल्यासारखी मुंबई-औरंगाबाद-मुंबई या प्रवासात सलग ६-६ तास वाचून काढली ! तुमच्या डोळ्यांना आराम हवा म्हणून हा रिडर चक्क एका तासाने तुम्हाला एका मिनिटाची सक्तीची विश्रांती घ्यायला लावतो ! अर्थात ही वेळ तुम्ही तुमच्या सोयीने सेट करू शकता. गेल्या सहा महिन्यात मी या प्रकारे चेतन भगतची सगळी पुस्तके, राहुल द्रविड वर लिहिलेले दी वॉल, आर.के.नारायणन यांची सगळी पुस्तके, द रेड सारी हे सोनिया गांधींवर बेतलेले पुस्तक, अरेबियन नाइटस, पंचतंत्र, नटवर सिंग यांचे आत्मचरित्र, लज्जा हे तसलिमा नसरीनचे गाजलेले पुस्तक, इंग्रजी ययाति, राजेश खन्नाची दोन आत्मचरित्रे, जेम्स हेडले चेस यांची एक रहस्य कथा, ट्रेन टु पाकिस्तान हे खुशवंत सिंग यांचे पुस्तक, बांगला देश युद्धावर बेतलेले प्रणब मुखर्जी यांचे पुस्तक आणि एकदम कालच वाचून संपविलेले काश्मिरवरचे बशरत पीर यांचे Curfuwed Nights !
या सोबतच मी जिकडे मिळतील तिकडून इ-पुस्तके उतरवून घेत आहे. सध्या माझ्याकडे १० हजारांपेक्षा जास्त पुस्तके जमलेली आहेत (अर्थात इंग्रजी)  व ज्या कोणाला एखादे पुस्तक हवे असल्यास ते कोठे व कसे मिळेल ते मी सांगू शकेन ! तुमच्यासाठी काहीही !
मराठी पुस्तके या प्रकारात मिळतात का ? अथक शोध घेवून सापडलेले उत्तरनाही” ! मेहता पब्लिशिंगच्या साइटवर इ-पुस्तके म्हणून दालन तर आहे पण ते उघडत नाही ! पानिपत ही कादंबरी पी.डी.एफ प्रकारात उपलब्ध आहे पण त्यात पुस्तकाची पाने स्कॅन करून दिलेली आहेत. -बुक्सचे एकही फिचर तिच्यात नाही. स्वामित्व हक्क मुक्त असे मराठी साहित्य नेटवर मिळते पण त्यासाठी वेगळा प्रोग्राम उतरवून घ्यावा लागतो. एकाची पुस्तके दूसर्याच्या प्रोग्रामने उघडत नाहीत. खर्या अर्थाने मराठीत ई-बुक्स उपलब्ध नाहीत ही बाब धक्कादायक आहेमहाराष्ट्र शासनानेच आता पुढाकार घेवून स्वामित्व हक्क मुक्त साहित्य इ-बुक्स प्रकारात मराठी वाचकांना उपलब्ध करून द्यायला हवे म्हणजे तरूण पीढी मराठी वाचनाचा आनंद घेवू शकेल. प्रकाशकांनी सुद्धा मराठी ई-बुक्स वाचकांना उपलब्ध करून द्यायला हवीत. -बुक्सचे प्रकाशन केल्यास वितरकाला हद्दपार करता येइल, छपाईचा खर्च वाचेल. छपाई खर्च व वितरकाचे निदान ३०% कमिशन वाचून पुस्तकांच्या किंमती पचंड कमी करता येतील व अधिक जास्त लोकांपर्यंत कमी वेळात पोचता येइल. एखाद्या लेखकाला आपले पुस्तक थेट ई-बुक प्रकारात लॉंच करता येइल व प्रकाशकाची गरजच पडणार नाही ! मराठी विश्वात ही क्रांती कधी घडेल ? सुरवातीला गाजलेल्या लेखकांचे समग्र साहित्य, ज्याच्या आधी अनेक प्रती खपल्या आहेत , अशी पुस्तके ई-बुक्स स्वरूपात विकल्यास लेखक, प्रकाशक व वाचक या सगळ्यांचाच फायदा होइल. नव्या पीढीपर्यंत ही पुस्तके पोचतील.
 मराठीत ई-बुके येतील तेव्हा येतील, सध्या मात्र मी इंग्रजी साहित्याच्या महासागरात डुंबतो आहे. वाचू आनंदे, वाचूत्यानंदे ! कोणालाही अधिक माहिती हवी असल्यासबंदा हाजिर है” !
ब्लॉगवर हा लेख प्रकाशित करतानाच लक्षात आले की टॅलिनामाची वाचकसंख्या ५०,०००झाली आहे ! ज्यांनी ज्यांनी हा ब्लॉग वाचला त्या सगळ्यांचे मनसे आभार ! असाच लोभ असावा ही नम्र विनंती !