काही समाज सुहितार्थ कृती घडावी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
काही समाज सुहितार्थ कृती घडावी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १४ मार्च, २०१०

स्वप्न साकार होताना !

काही महिन्यापुर्वी याच सदरात मी आपल्याला रा.स्व.संघ संचालित प्रभाकर पटवर्धन स्मृती रूग्णालयाच्या प्रकल्पाविषयी माहिती दिली होती. या प्रकल्पाला देणग्या देण्याचे सुद्धा आवाहन केले होते. (http://ejmarathe.blogspot.com/2009/09/blog-post_3726.html) जगाच्या कानाकोपर्यातुन याला प्रचंड प्रतिसाद मिळाला व एका चांगल्या कार्यासाठी आर्थिक पाठबळ उभे राहिले. सर्व देणगीदारांना धन्यवाद ! आपल्या सर्वाच्या सहकार्याने प्रकल्पाचे ७५ % सिविल काम पुर्ण झाले आहे. आजच या ठीकाणी स्वयंसेवकांचे एकत्रीकरण होते. उपस्थित सर्वांना प्रकल्पाचे चारही मजले फिरवून कोठे काय होणार आहे याची माहिती दिली गेली.संपूर्ण प्रकल्प २ टप्प्यात पुर्णात्वास जाणार आहे. पहिला टप्पा १० कोटीचा आहे. यात बांधकाम खर्च ४ कोटीचा व साधनसामुग्री ६ कोटींची आहे. दूसर्या टप्प्यात अजून तिन मजले वाढविण्यात येणार आहेत.

पनवेलच नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातले हे सर्वात अत्याधुनिक रूग्णालय असणार आहे. हे रूग्णालय अशा प्रकारच्या भविष्यातील सेवा प्रकल्पांसाठी रोल मॉडेल ठरणार आहे. मुंबई-पुणे या अत्यंत गजबजलेल्या महामार्गावर, पनवेल एसटी डेपो पासून हाकेच्या अंतरावर हा प्रकल्प साकार होत आहे. खाजगी रूग्णालयात उपचार किती महागडे असतात हे आपल्या सर्वाना माहित आहेच तर सरकारी रूग्णालयातली अनास्थासुद्धा अनेकांनी अनुभवली असेल. गरजू रूग्णांना रास्त दरात व ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे त्यांच्यासाठी या रूग्णालयात मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. बाहेर कोणत्याही साधारण शस्त्रक्रियेचा खर्च २०,००० रूपये येतो, इथे तिच शस्त्रक्रिया अवघ्या ५,००० रूपयात होणार आहे. सिझरींगचा खर्च अनेक ठीकाणी ८० हजार ते एक लाख येतो, इकडे या साठी फक्त २३७५ रूपये आकारले जातील, दर्जात कोणतीही तडजोड न करता ! अनेक दात्यांनी कर नियोजनाच्या दृष्टीने आम्ही मार्च महिन्यात देणगी पाठवू असे कळविले होते. या निमित्ताने मी त्यांना लवकरात लवकर आपली मदत पाठवावी अशी नम्र विनंती करतो. परकिय चलनात देणगी स्वीकारण्याची परवानगी सुद्धा या प्रकल्पाला मिळाली आहे तेव्हा त्याचा जरूर लाभ घ्यावा ही विनंती. आपल्या सर्व मित्रांना या प्रकल्पाची निदान माहिती तरी द्यावी ही विनंती. प्रकल्पाविषयी कोणतीही माहिती हवी असल्यास आपण माझ्याशी सुद्धा संपर्क साधू शकता. ( मोबाइल 09987030637, इमेल – ejmarathe@gmail.com )

प्रकल्पाचे काम कसे झपाट्याने पुर्णत्वास जात आहे ते आपल्याला सोबत दिलेल्या फोटोवरून समजेल.

http://picasaweb.google.com/ejmarathe/ndGQnH?feat=directlink

देणगीदारांनी कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधावा,

डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृति रूग्णालय,

१९६/१, डॉ. आंबेडकर रोड, पनवेल,

रायगड – ४१० २०६

फ़ोन नंबर – ०२२-२७४६ २८८२, २७४८०१७९

चेक किंवा ड्राफ़्ट या नावाने काढावा – “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती”

सर्व देणग्यांना आयकराच्या ८०जी कलमाखाली मिळणारी वजावट लागू

त्यासाठीचा एफ़.सी.आर.ए. नंबर – ०८३९३०३२१.

इंटरनेट द्वारे थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी;

1. Bank of India, Panvel Branch

A/c Name : R.S.S.J.K.S.Prabhakar Patwardhan Smruti Rugnalaya

A/c No. : 121210110001931

MICR No. : 400013110

2. Bank of Maharashtra, Panvel Branch

A/c Name : R.S.S.J.K.S.Prabhakar Patwardhan Smruti Rugnalaya

A/c No. : 20121787182

MICR No. : 400014117

वि.सू . २५,००० वा त्याहुन जास्त देणग्या देउ इच्छीणार्यांनी कृपया आधी संपर्क साधावा. त्यांना १०० % करमुक्त देणगीचा लाभ मिळू शकेल. मोठ्या देणगीदारांच्या काही अटी असतील तर त्यावर सुद्धा नक्की विचार केला जाईल.

सोमवार, ११ जानेवारी, २०१०

नेत्रदान – सर्वश्रेष्ठ दान !

आपला देश विकसनशील देश आहे. गरीबी, बेकारी, अनारोग्य, आरोग्यसुविधांचा अभाव, अंधश्रद्धा यामुळे आपल्या देशात अंधत्वाचे प्रमाण खूप आहे. जगातील अंधाच्या संख्येच्या १/४ म्हणजे सुमारे १.२ कोटी अंध लोक भारतात आहेत ! अंधत्वाचे महत्वाचे कारण म्हणजे मोतिबिंदू असून दुसरे महत्वाचे कारण म्हणजे पारदर्शक पटलाचे विकार किंवा corneal blindness. भारतातील अंध व्यक्तींपैकी २५ टक्के लोक पारदर्शक पटलाच्या विकारामुळे अंध आहेत आणि यात ६० टक्के प्रमाण लहान मुलांचे आहे ! या विकारामध्ये डोळ्याचे पारदर्शक पटल (cornea) किंवा बुबुळ अपारदर्शक बनते व ती व्यक्ती अंध होते. हे खराब झालेले पटल बदलून दान केलेल्या डोळ्यातील पटल तिथे बसवणे हाच या प्रकारच्या अंधत्वावर उपचार आहे. या अंध व्यक्तींना दृष्टीदान देण्यासाठी वर्षाकाठी दीड लाख नेत्रपटलांची (cornea) गरज आहे. सध्याच्या अंदाजानुसार फक्त पंधरा हजार ते वीस हजार पटल उपलब्ध होतात. यावरून नेत्रदानाची चळावळ वाढायला हवी हे स्पष्ट होते. श्रीलंकेसारख्या छोट्या देशात नेत्रदानाचे प्रमाण खूप आहे आणि तेथे जरूरीपेक्षा दहापट जास्त नेत्रदान केले जाते ! आपल्या देशात मात्र हे प्रमाण गरजेच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे ! त्यामुळे आज आपल्या देशात नेत्रदानाची तीव्र गरज आहे.

एक वर्षे वयावरील कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते. नेत्रदानाला वय, जात, लिंग, धर्म यांची अट नाही. कोणत्याही धर्मात नेत्रदानाला विरोध नाही. ज्या व्यक्तीच्या डोळ्याचे पाददर्शक पटल निर्दोष असते अशा कोणत्याही व्यक्तीला नेत्रदान करता येते. रक्तदाव, मधुमेह (ब्लडप्रेशर, डायबेटीस) असलेल्या व्यक्तीपण नेत्रदान करू शकतात. नेत्रदानाला अपात्र व्यक्ती म्हणजे ज्यांना एडस सारखा रोग झालेला आहे किंवा ज्यांचा मृत्यू संशयास्पद कारणांनी झाला आहे किंवा मेंदूज्वर, रेबीजने मरण पावलेल्या व्यक्ती.

नेत्रदान करताना पूर्ण डोळा अगर पारदर्शक पटल (cornea) काढला जातो व ज्या व्यक्तीचे पारदर्शक पटल खराव झाले असेल त्याच्यावर रोपणाची शस्त्रक्रीया (corneal grafting) केली जाते. मृत्यूनंतर ६ तासांच्या आत नेत्रदान करावे लागते व ४८ ते ७२ तासांच्या आत रोपण करावे लागते. सरकारी रूग्णालायांमध्ये ही शस्त्रक्रीया विनामूल्य केली जाते.

नेत्रदान करण्यासाठी इच्छूक व्यक्तीने आपल्या नावाची नोंदणी जवळच्या नेत्रपेढीत करावी लागते. जरी नोंदणी झाली नसेल तरी नातेवाईकांच्या इच्छेनेही नेत्रदान होऊ शकते. नेत्रदानाच्या वेळा मृत्यूचा दाखला व जवळच्या नातेवाईकांची संमती आवश्यक आहे. मृत व्यक्तीचे डोळे काढल्यावर त्या जागी कृत्रिम डोळा बसवून पापण्या शिवल्या जातात व चेहरा विद्रूप होत नाही. कोणाचे नेत्र कोणाला रोपण केले जातात याची माहीती मात्र गुप्त ठेवली जाते. अंधव्यक्तीच्या एकाच डोळ्यावर पटल रोपण केले जात असल्याने एका दात्याच्या मरणोत्तर नेत्रदानाने ( अथवा त्याच्या जवळच्या नातलगांनी तशी परवानगी दिल्यास ) दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते !

नेत्रदान हे असे दान आहे की त्यासाठी पैशाची श्रीमंती लागत नाही. या एका दानाने दोन अंध व्यक्तींचे आयुष्य प्रकाशाने उजळून निघते ! म्हणूनच आपण सर्वानी मरणोत्तर नेत्रदानाची इछा आपल्या जवळच्या नातलगांकडे व्यक्त केली पाहिजे तसेच आपल्या जवळची व्यक्त मरण पावल्यास दु:खाला आवर घालून डोळसपणे जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदानाचे सामाजिक कर्तव्य निभावले पाहिजे. गेलेली व्यक्ती परत येणार नसते पण त्या व्यक्तीचे नेत्र दान करून आपण दोन अंध व्यक्तींना दृष्टी देउ शकतो व त्या व्यक्तीच्या स्मृती आगळ्या प्रकारे जपू शकतो , सामाजिक दायित्व पार पाडू शकतो हे नक्की !

साभार - नेत्रतज्ज्ञ डॉ. सौ. संगीता जोशी,

नवीन पनवेल.

मंगळवार, १ डिसेंबर, २००९

साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक.

साने गुरूजी हे माझे स्वत:चे प्रेरणा स्थान आहे. लहानपणीच त्यांची पुस्तके वाचून त्यांच्या लेखनाचा व चरीत्राचा प्रभाव अगदी खोलवर ठसा उमटवून गेला आहे. काही दिवसापुर्वीच या स्मारकाला भेट दिली व संस्थेच्या माहीतीपत्रकातील माहिती आपल्या बरोबर शेयर करत आहे. या कार्याला आपला हातभार लागावा अशी कळकळीची विनंती.

वाटचाल

· पांडुरंग सदाशिव साने उर्फ़ साने गुरूजींच्या जन्मशताब्दी निमित्त १९९८ साली “साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट”ची स्थापना करण्यात आली.

· रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालुक्यातील पालगड येथील साने गुरूजींचे घर शासनाने ताब्यात घेउन ट्रस्टकडे हस्तांतरीत केले. त्या ठीकाणी “साने गुरूजी स्मृती भवन” उभारण्यात आले.

· पालगडपासून ५५ कि.मी. अंतरावरील वडघर, ता. माणगाव, जि. रायगड येथे ट्रस्टने ३६ एकर जमिन खरेदी करून “राष्ट्रीय स्मारक” उभारण्यात आले.

· पहिल्या टप्प्यामध्ये कॅम्पिंग सुविधा, डॉर्मेटरी, गेस्ट-हाउस इ. बांधकाम करण्यात आले.

· दुसर्या टप्प्यामध्ये “साने गुरूजी भवन” व “अनुवाद सुविधा केंद्र” उभारण्यात येत आहे.

· तिसर्या टप्प्यामध्ये “आंतरभारती भवन” व ऍम्फ़ी थिएटर” यांचा समावेश आहे.

· स्मारक उभारणीमध्ये विद्यार्थांचा प्रमुख सहभाग आहे. ७० हजार विद्यार्थ्यांनी ६० लाख रूपयांचा निधी जमवून दिला.

उपक्रम

· शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिरे, “प्रेरणाप्रबोधन शिविर”, एन.एस.एस. ची कॉलेज विद्यार्थ्यांची शिबिरे व विद्यार्थ्यांच्या सहली.

· याशिवाय येथे अनेक संघटनांची व संस्थाची शिबिरे, मेळावे होतात. संस्थेतर्फे प्रतिवर्षी हितचिंतक व कार्यकर्त्यांचा मित्र मेळावा घेण्यात येतो.

· “स्वाधार” च्या सहकार्याने पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले जाते.

· परिवर्तन मुंबई या संस्थेच्या सहकार्याने पंचक्रोशीतील गावकर्यांच्या क्रिडा स्पर्धा घेण्यात येतात.

· दरवर्षी मे महिन्यात “युवा श्रम संस्कार छावणी” शिबिर घेण्यात येते.

आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र

भारतीय भाषांमध्ये आदान-प्रदान घडविण्याचा “आंतरभारती” हा उप्रक्रम राबविणे हे राष्ट्रीय स्मारकाचे दुसरे उद्दीष्ट आहे. त्या साठी “अनुवाद सुविधा केंद्राची” स्थापन करण्यात आली आहे. या ठीकाणी अनुवादासाठी आवश्यक शब्दकोश व अन्य पुस्तके असलेले ग्रंथालय आहे. अनुवादकांच्या निवासाची व भोजनाची सोय आहे. या केंद्राच्या वतीने अनुवाद कार्यशाळा, विंदा करंदीकर यांच्या देणगीतुन बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार, वासंती गंगाधर गाडगीळ अनुवाद अभ्यासवृत्ती, जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या देणगीतुन पुस्तके अनुवादित करण्यात येत आहेत. अनुवादाला वाहिलेल्या “मायमावशी” षणमासिकाचे प्रकाशन हा आणखी एक उपक्रम आहे.

राष्ट्रीय स्मारकातर्फे दर दोन वर्षानी “आंतरभारती साहित्य संवाद” चे आयोजन करण्यात येते. जानेवारी २००९ मध्ये चवथे “साहित्य संवाद” संमेलन “गुरूदेव टागोर तौलनिक साहित्याध्यासन” मुंबई विद्यापीठ, यांच्या सहकार्याने पार पडले.

स्मारक परिसर व सुविधा

Ø स्मारकाची जागा मुंबई-गोवा महामार्ग व कोकण रेल्वेच्या गोरेगाव रोड व माणगाव स्टेशनच्या जवळ आहे.

Ø ३६ एकराचा हा निसर्गरम्य परिसर डोंगरउतार, कालवा, नदी, विहीर, जैविक उद्यान शंभराहून अधिक प्रकारची झाडे, विविध पक्षी यांनी सम्पन्न आहे.

Ø स्मारकामध्ये राहुटी निवास, डॉर्मेटरी, गेस्ट-हाउसेस, कॉमन व्हरांडा, स्वच्छतागृहे, भोजनगृहे, खेळाचे मैदान, खुले सभागृह, नेचर ट्रेल अशी परिपुर्ण व्यवस्था आहे.

आवाहन

विद्यार्थ्यांना संस्कारीत करणारा, तरूणाईला साद घालणारा, आंतरभारती उपक्रमातुन समाजाला जोडू पाहणारा हा प्रकल्प. साने गुरूजींपासून समाजसेवेची प्रेरणा घेतलेल्या तरूणांच्या पुढाकारातून गेल्या दहा वर्षात उभा राहिला. समाज आणि शासनानेही त्याला भरभरून प्रतिसाद दिला. असेही घडू शकते हा अनुभव दिलासा देणारा आहे.

स्मारकाच्या पुढच्या वाटचालीत आपली साथ हवी, आपण हक्काने इथे यावे, रहावे आणि आपलेच काम समजून आर्थिक सहकार्यही करावे.

देणगी धनादेश “साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट” या नावाने काढावा.

(देणग्यांना कलम ८० जी आयकर सवलत मिळेल)

राष्ट्रीय स्मारक – वडघर, पो. गोरेगाव, ता. माणगाव, जिल्हा – रायगड

दूरध्वनी क्रमांक – ०२१४०-२५०७९५, ०२१४०-२५०२०५

स्मृती भवन - पालगड, ता. दापोली, जि. रत्नागिरी

कार्यालय साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट (रजि. नं. ई/१७८८४, मुंबई)

म्युनिसिपल मराठी शाळा क्र.२, पहिला माळा, खोली क्र. ३२,

पोर्तुगीज चर्च जवळ, गोखले रोड(द), दादर(पश्चिम), मुंबई – ४०००२८

फ़ोन नंबर ०२२-२४३०७९१७

वेब साइट – aantarbharati.org

इमेल – antarbharati_ask@yahoo.co.in

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २००९

सोमवार, १९ ऑक्टोबर, २००९

वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र

२६ डिसेंबर १९५२ ला स्व. बाळासाहेव देशपांडे यांनी लावलेल्या या छोट्याश्या रोपट्याचे रूपांतर आज प्रचंड वटवृक्षात झालेय !

५८ वर्षापुर्वी बाळासाहेबांनी एक स्वप्न पाहिले होते …

या स्वप्नाला भरभक्कम आधार होता तो या देशाला पुन्हा वैभवशाली बनविण्यासाठी अखंड कार्यरत राहण्याचा संकल्प उराशी बाळगलेल्या एका तेजस्वी राष्ट्रशक्‍तीचा ..

या कार्याला आशिर्वाद होते … स्व. ठक्करबाप्पा व प.पू. श्री. गुरूंजीसारख्या द्रष्ट्या महापुरूषांचे ..

आणि मुख्य म्हणजे त्या मागे होता एक दुर्दम्य विश्वास ..’नर सेवा हीच नारायण सेवा’ हा संस्कार वर्षानुवर्षे मनावर कोरल्या गेलेल्या समाजातील जनशक्‍तीवरचा !

कुठले स्वप्न होते ते ?

आपल्याच समाजाचे .. इथल्या प्राचीन व गौरवशाली परंपरेचे अभिन्न अंग असलेल्या वनवासी बांधवांची सर्वांगीण उन्नती साधून त्याला एवढे सामर्थशाली बनवणे की राष्ट्रउभारणीच्या कार्यातही हा समाज आपले योगदान देऊ शकेल.

एक विशाल दृष्टीकोन घेउन विविध सेवाकार्याच्या माध्यमातून कार्याची सुरवात झाली. शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास, श्रद्धाजागरण, संस्कार इ. विषय घेउन हजारो सेवाप्रकल्प उभे राहिले. या सार्‍या प्रकल्पाच्या माध्यमातुन देशभरातील वनवासी क्षेत्रात एक प्रचंड शक्‍ती निर्माण झाली आहे.

स्व. बाळासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्‍नातील प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात उतरली आहे.

भूतकाळात सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणारा वनवासी समाज आज नव्या तेजाने तळपताना दिसू लागला आहे !

महाराष्ट्रात वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याचा प्रारंभ १९७८ साली झाला.

या ३० वर्षामध्ये केलेल्या कामाचा प्रभाव म्हणून ..

· हजारो सुशिक्षित, सुसंस्कारित व प्रतिष्ठीत वनवासी युवकांची पीढी तयार झाली आहे.

· ’आपल्या समाजाचा विकास आपणच केला पाहिजे’ अशी भावना बाळगणारे शेकडो युवक पुढे येत आहेत.

· वैद्यकीय सेवा व आरोग्यरक्षक योजनेच्या माध्यमातुन लाखो वनवासी बांधवांच्या वेदना दूर झाल्या आहेत.

· श्रद्धाजागरणाच्या कार्यामुळे अराष्ट्रीय कारवायांना जबरदस्त खीळ बसली आहे.

· आपल्या वनवासी बांधवांची उन्नती करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असा विचार करून समर्पितपणे कार्य करणारे हजारो नगरीय कार्यकर्ते तयार झाले आहेत.

· एकलव्य खेलकुद स्पर्धेमुळे वनवासी क्षेत्रातील हजारो ’एकलव्यांचे’ प्रगटीकरण झाले आहे.

· वनवासी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातुन उद्योग-व्यवसाय प्रारंभ करून आपल्या कुटुंबाचा व गावाचा आर्थिक विकासा साधण्यात यश मिळवले आहे.

गेल्या ३० वर्षामधील महाराष्ट्राची वाटचाल प्रेरणादायक असली तरी वनवासी क्षेत्रात अद्यापही समस्यांचा महाकाय डोंगर उभा आहे. पुर्बीची आव्हाने तर आहेतच, पण त्यात काळानुरूप नव्याने भर पडत आहे. या सार्‍या समस्यांचा सामना करून वनवासी समाजाला अधिक शक्‍तीशाली बनवण्याचे कार्य आपण सर्वाना मिळून पूर्ण करायचे आहे.

आतापर्यंतची वाटचाल हजारो हातांच्या बळावर शक्य झाली पण या क्षेत्रातील समस्या पाहता आता लाखो हातांची आवश्यकता भासणार आहे.

या कार्यात आपण तन-मन-धनाने सहभागी व्हावे असे आमचे विनम्र आवाहन आहे.

महाराष्ट्र राज्य सद्यस्थिती (जून २००९ )

शैक्षणिक प्रकल्प

वसतिगृहे १९

प्राथमिक शाळा २

माध्यमिक शाळा २

बाल संस्कार केंद्रे १२

लाभार्थी १,६००

आर्थिक विकास प्रकल्प

औद्योगिक शिक्षण केंद्र २८

शेतकी प्रकल्प ४

बचत गट ५५८

लाभार्थी १६,०००

आरोग्य प्रकल्प

साप्ताहिक आरोग्य केंद्रे ४

दैनिक केंद्रे १

आरोग्य रक्षक ५८६

लाभार्थी ४,००,०००

खेलकूद केंद्रे १५

श्रद्धा जागरण केंद्रे ६०

एकूण प्रकल्प १,१२३

पूर्णवेळ कार्यकर्ते ८१ ( पुरूष ६५, महिला १६)

ग्राम समिती २१८

महिला समिती ६५

यापैकी आपण नक्कीच काहीतरी करू शकाल

· रू. १५,०००/- ३० विद्यार्थांच्या वसतिगृहाचा एका महिन्याचा खर्च.

· रू, ५०००/- वार्षिक देणगी देउन एका वनवासी विद्यार्थाचे पालकत्व.

· शुभप्रसंगी व प्रियजनांच्या आठवणीप्रीत्यर्थ प्रासंगिक देणगी.

· आश्रमाच्या कार्यासाठी वेळ.

· आश्रमाच्या वैद्यकीय केंद्रासाठी औषध संकलनास मदत.

· वनवासी परिसरात सांस्कृतिक भवन उभारणीस सहाय्य-सहभाग.

· कल्याण आश्रमाच्या केंद्रास नियमित/प्रासंगिक भेटी.

· वनवासी कलेस प्रोत्साहन – दिवाळी भेटकार्डे, दिनदर्शिका व राख्या विकत घ्याव्यात.

· वस्तुरूप देणगी – शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेशाचे कापड व अन्य शालेय साहित्य, धान्य, अन्य मदत.

· एका आरोग्यरक्षकाचा वर्षाचा खर्च रू. ५०००/-

सर्व देणग्या आयकराच्या ८०जी कलमाखाली सवलतीस पात्र आहेत. चेक वा ड्राफ्ट “वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र” या नावाने काढावा.

प्रांत कार्यालय : १५, कृषिनगर, महाविद्यालय मार्ग,

नाशिक ४२२ ००५.

दूरध्वनी ०२५३-२५७७ ४९१, ०२५३-२५८२ ४२९

पनवेल कार्यालय : द्वारा – श्री. उदय टिळक, यशोगंगा सोसायटी,

पहिला मजला,६४५, टिळक रोड, पनवेल – ४१० २०६.

दूरध्वनी – ०२२-२७४५ ६८२४

रविवार, १८ ऑक्टोबर, २००९

महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्था – भाउबीज नवती.

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे हे या संस्थचे संस्थापक ! १८९६ साली महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेची स्थापना झाली. तब्बल ११२ वर्षाच्या या संस्थेच्या पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी, नागपूर येथे शाखा आहेत.

पुर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, इंजिनियरींग कॉलेज, आर्कीटेक्ट, आय.टी., फ़ॅशन डिझायनिंग, नस्रिग कॉलेज इत्यादी अभ्यासक्रम केवळ मुलींसाठी संस्थेत राबवले जातात.

नोकरी करणार्या स्त्रियांसाठी पुण्यात वसतिगृह असून वृद्ध स्त्रियांसाठी वृद्धाश्रम देखिल आहेत. संस्थेच्या बेकरी मध्ये गरजू स्त्रियांना कमवा वस शिका या तत्वावर काम दिले जाते. या आर्थिक मदतीमुळे त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात.

संस्थेची आगळी-वेगळी वैशिष्ट्ये -

· स्त्रियांवरील अन्याय, कालबाह्य रूढी व सामाजिक विषमतेविरूद्ध निर्भीड ठोस उपाययोजना करणारी भारतातीला आद्य संस्था.

· स्त्री-स्वातंत्र्य व तिची अस्मिता जागविण्यासाठी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, प्रचार व प्रत्यक्ष आचरण करणारी दू्रदृष्टीची, पुरोगामी व एकमेव संस्था.

· १९१६ साली स्त्रियांसाठी विद्यापीठ उभारणारी पहिली संस्था.

· विविध शाखांमधून सर्व जाती जमातींच्या सुमारे २५,००० विद्यार्थिने शिकत आहेत.

· ३००० विद्यार्थिनी, त्यातही निम्म्या ग्रामीण भागातुन आलेल्या मुलींसाठी वसतिगृह.

संस्थेच्या या कार्याला आर्थिक मदत मिळावी म्हणून संस्थेचे कल्पक आजन्म सेवक कै. गो.म. चिपळूणकर यांनी ९० वर्षापुर्वी भाउबीज निधी संकलन योजनेची सुरवात केली. आपली भाउबीज संस्थेच्या स्वयंसेवकांकडे चेक अथावा रोखीत आपण देउ शकता. रूपये ५०० वा त्यापेक्षा जास्त देणगेसाठी आयकरात ५० % सूट मिळू शकते. सवडीनुसार एकदा संस्थेत जाउन आपण कामाची प्रत्यक्ष खात्री करू शकता. मी स्वत: या संस्थेला दहा वर्षापुर्वी एकरकमी ५००० रूपये देणगी म्हणून दिले होते व मग दरवर्षी ५०० रूपयाची भाउबीज पाठवत आहे.

उद्याच भाउबीज आहे ते लक्षात आहे ना ?

संस्थेचा पत्ता

सचिव – रविंद्र देशपांडे

कुंदा नेने - कार्याध्यक्षा, भाउबीज भेट मंडळ

कर्वेनगर, पुणे – ४११ ०५२

फोन नंबर ०२०-२५४७ १९६७ , ०२० - २५४७८९७५

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

जुनी सायकल आहे का?

जागोजागी भंगारात पडलेल्या सायकलींचं रिपेअरिंग करून त्या आदिवासी पाड्यांतल्या मुलांना देण्याचा नवा प्रयोग 'त्या' तिघांनी यशस्वी केलाय.
गाडी शिकण्याचं पहिलं पाऊल म्हणजे सायकल. काही वर्षं सायकल तांबडल्यानंतर तिची जागा 'टू व्हिलर' घेते. इथेच सायकलचा 'वनवास' सुरू होतो, तो कायमचाच. म्हणूनच प्रत्येक घरात,सोसायटीत अशी मान मोडून पडलेली एखादी सायकल असतेच. या उलट चित्र आदिवासी पाड्यांमधलं. नशिबी दारिद्य आल्यामुळे शिक्षणासाठी पाच-पाच किलोमीटरचं अंतर पायी तुडवत ही मुलं रोज शाळेत जातात.

त्यांचे हे कष्ट कमी करण्याची प्राथमिक गरज भागवण्यातही आपण कमी पडलेलो. इतका विरोधाभास. दोघांतली हीच गॅप ओळखून 'ते' तिघे एकत्र आले, आणि त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. भंगार सायकलींचं 'सोनं' करून त्या गरजू आदिवासी मुलांना वाटण्याचा प्रयोग.
विक्रमगड, वाडा यांसारख्या आदिवासी भागात लांबलांबच्या पाड्यांतून मुलं शिकण्यासाठी गावच्या शाळेत येतात. ६ ते १६ वयोगटातल्या या कोवळ्या मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी रोजची २ ते ७ किमीची पायपीट करावी लागते. एसटीची सोय आहे, पण रोजचं ६ रुपये भाडं परवडत नाही.

आदिवासी भागातील ही वस्तुस्थिती हेमंत छाबरा आणि त्यांची पत्नी संगीता यांनी पाहिली. या मुलांसाठी काहीतरी करायला हवं, असा विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागला. सिमोना टेरन या आपल्या आणखी एका मैत्रिणीकडे त्यांनी हा विचार मांडला आणि या तिघांना एक नामी कल्पना सुचली.
मुंबईसारख्या शहरात जुन्या, मोडक्या सायकली भंगारात पडून असतात. या सायकलींची डागडुजी करून गावातल्या मुलांसाठी द्यायच्या, अशी ही कल्पना. त्यांनी आपल्या ओळखीपाळखीच्या मित्रांना फोन केले, ई-मेल धाडले आणि जवळपास ६८ मोडक्या सायकली गोळा केल्या. स्वत:च्या खर्चाने त्या रिपेअर केल्या आणि प्रजासत्ताक दिनी अलोणे गावातील श्री बिनोई घरडे विद्यालयातल्या गरजू ६८ आदिवासी मुलांना या सायकलींचं वाटप करण्यात आलं. खरं तर या शाळेतल्या १३७ मुलांना सायकलची गरज आहे, असं शाळेने कळवलं होतं. आता उरलेल्या सायकली गोळा करण्यासाठी 'दि बायसिकल प्रोजेक्ट' ही चळवळच या ग्रुपने सुरू केलीय.
एका सायकलीचं रिपेअरिंग करण्यासाठी साधारण ४०० रुपये खर्च येतो. 'सध्या आम्ही काही मित्रमंडळी आमच्याच खिशातून तो खर्च करतोय', असं हॉटेल व्यावसायिक असलेले हेमंत छाबरा सांगतात. लोकांना भंगारातल्या सायकलची किंमत नसते. पण, आदिवासी मुलांसाठी अशी सायकल म्हणजे मर्सिडीजच. सायकल मिळाल्यानंतर मुलांच्या चेह-यावर जे भाव उमटले त्याला तोड नाही, असंही छाबरा यांनी सांगितलं.
केवळ अलोणेच नव्हे, तर आदिवासी खेड्यांमधे किमान १ लाख सायकल्स वाटण्याचं या ग्रुपचं उद्दिष्ट आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी आम्ही सध्या दि बायसिकल प्रोजेक्ट नावाची चळवळच सुरु केली असून, या नावाने आम्ही लवकरच एनजीओ रजिस्टर करणार आहोत, असं सिमोना टेरन यांनी स्पष्ट केलं.
तुम्हीही उचला खारीचा वाटा भंगार सायकलींचं सोनं करण्याच्या या प्रोजेक्टमधे आपणही खारीचा वाटा उचलू शकतो. त्यासाठी हेमंत छाबरा यांना ९८२०१४९०२२ यावर फोन करायचा किंवा thebicycleproject@gmail.com या पत्त्यावर इ-मेल पाठवायचा. स्वयंसेवक तुमच्या घरी येऊन जुनी सायकल घेऊन जातील. या रिपेअरिंगचा खर्च देण्याची तुमची तयारी असेल तरीही तुमचं स्वागतच होईल.

बुधवार, २३ सप्टेंबर, २००९

डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृति रूग्णालय, पनवेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची, जनकल्याण समिती (महाराष्ट्र ) हा प्रकल्प राबवित आहे.

स्व. डॉ. प्रभाकर पटवर्धन हे नामवंत शल्य-विशारद होतेच पण रायगडमधील एक हाडाचे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा होते. त्यांच्याच मृत्युपत्रानुसार त्यांच्या पत्नी नीलाताईंनी या रूग्णालयाची जबाबदारी, संघ परिवारातील, जनकल्याण समिती कडे सोपवली. समितीने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडल्याचे बघून दानशूर नीलाताईंनी सात वर्षानी हे रूग्णालय जमिनीसकट संस्थेला दान दिले आहे ! गेली ३५ वर्षे हे रूग्णालय गरींब व गरजू रूग्णांना वैद्यकिय मदर करत आहे. २२ डॉक्टर तिकडे अहोरात्र सेवा देत आहेत. आजतागायत ५०,००० रूग्णांना सेवा देणारे हे रूग्णालय आता कात टाकणार आहे. आहे त्याच जागी अत्याधुनिक सुविधांनी युक्त सुसज्ज चार मजली रूग्णालयाचे काम सुरू झाले आहे. यात ३५ खाटांचे रूग्णालय, सीटी स्कॅनची सुविधा, आयसीयु युनिट आणि वैद्यकिय संशोधन केंद्र सुद्धा असेल. साधारण ४.५ कोटी रूपयाचा हा प्रकल्प येत्या २ वर्षात लोकार्पित करायचा आहे. या प्रकल्प तुम्ही प्रत्यक्ष काम करू शकता. तसे शक्य नसल्यास इमारत निधी साठी देणगी देउ शकता, काही विशिष्ट उपचारांवर, जसे डायलिसीस, निधीला मदत करून हातभार लावू शकता. रूग्णालयाला उपयोगी पडेल अशी वस्तुरूप मदत सुद्धा करू शकता.

संस्थेचा पत्ता:

डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृति रूग्णालय,

१९६/१, डॉ. आंबेडकर रोड, पनवेल,

रायगड – ४१० २०६

फ़ोन नंबर – ०२२-२७४६ २८८२, २७४८०१७९

चेक किंवा ड्राफ़्ट या नावाने काढावा – “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती”

सर्व देणग्यांना आयकराच्या ८०जी कलमाखाली मिळणारी वजावट लागू

त्यासाठीचा एफ़.सी.आर.ए. नंबर – ०८३९३०३२१.

इंटरनेट द्वारे थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी;

1. Bank of India, Panvel Branch

A/c Name : R.S.S.J.K.S.Prabhakar Patwardhan Smruti Rugnalaya

A/c No. : 121210110001931

MICR No. : 400013110

2. Bank of Maharashtra, Panvel Branch

A/c Name : R.S.S.J.K.S.Prabhakar Patwardhan Smruti Rugnalaya

A/c No. : 20121787182

MICR No. : 400014117

वि.सू . २५,००० वा त्याहुन जास्त देणग्या देउ इच्छीणार्यांनी कृपया आधी संपर्क साधावा. त्यांना १०० % करमुक्त देणगीचा लाभ मिळू शकेल. मोठ्या देणगीदारांच्या काही अटी असतील तर त्यावर सुद्धा नक्की विचार केला जाईल.

धन्यवाद !

काही समाज सुहितार्थ कृती घडावी !

आपण सगळेच आपापल्या व्यवसायात अगदी आकंठ बुडालेले असतो. एवढे की कधी कधी प्रपंचाकडे सुद्धा आपल्याला पुरेसे लक्ष देता येत नाही. अशा स्थितीत समाजाकरता आपण काही तरी करावे ही रूखरूख अस्वस्थ करत असतेच ! समाजाचे आपण काही देणे निश्चित लागतो. ते फ़ेडायचे अनेक मार्ग आहेत. अनेक सामाजिक संस्था आपल्या कार्यकर्त्यामार्फ़त या कामात स्वत:ला झोकून देउन काम सुद्धा करत असतात. कधी तरी आपला या संस्थांशी संबंध येतो. त्यांच्या कामाचा आवाका बघून आपण नतमस्तक होतो. आपण या कामाला वेळ देउ शकत नाही याची खंत मग अधिकच बोचते !

सध्या खरी चणचण आहे ती झोकून देउन काम करणार्या कार्यकर्त्यांची. संघ परिवारातील अनेक संस्था या बाबतीत मात्र नशिबवान आहेत ! तळमळीच्या कार्यकर्त्यांची या संस्थाना कधी उणीव भासत नाही. या संस्थांनी अनेक दशके चांगले काम करून आपणा सर्वांचा विश्वास कमावला आहे. आपल्या कामाचा डंका पिटण्याची या संस्थांना सवय नाही व ते त्यांच्या तत्वात पण बसत नाही ! स्वत:हुन ते कधी तुमच्याकडे हात पसरणार नाहीत. पहिले आमचे काम बघा, आमच्या अमक्या प्रकल्पाला भेट द्या, मग तुमच तुम्हीच ठरवा काय ते ! असा त्यांचा खाक्या ! या संस्थाना पैसा कधी कमी पडत नाही तो या विश्वासापोटीच ! मागच्या वर्षी मी स्वत: उरणला वनवासी आश्रम संचालित एका आश्रम शाळेत गेलो होतो. निमित्त होते एका आदिवासी शाळेच्या नव्या वर्गाच्या उद्‌घाटनाचे ! जैन समाजाचे लोक बस भाड्याने करूनच तिकडे आले होते. प्रकल्प बघुन ते थक्कच झाले. काही नवीन प्रकल्प काही आहे का ? अशी विचारणा त्यांनी केली. संचालकांनी २० ते ३० लाख खर्च असलेल्या काही योजनांचा आढावा त्यांच्यापुढे मांडताच त्यांनी हा खर्च आम्ही करणार हे लगेच जाहिर करून टाकले ! त्यांनी बोलून दाखवले की तुमच्या बरोबर फ़ावडी-कुदळी घेउन काम करण्यात जास्त आनंद आहे पण ते आम्हाला व्यवसायामुळे शक्य नाही , पण चांगल्या कामाला पैसा कमी पडणार नाही याची आमच्याकडून हमी घ्या !

काही चांगले भावले की मी लगेच मित्रांपर्यंत तो विषय पोचवतो. काही अनिवासी मित्र मला अधूनमधून विचारत असतात, अमक्या तमक्याच्या स्मरणार्थ देणगी द्यायची आहे, कोठेही वाच्यता न करता , एखादी संस्था सूचव ! दान करण्यासाठी पैशाची श्रीमंती एक वेळ नसेल तरी चालेल , मनाची मात्र हवी ! मग अनेक फ़ालतु खर्च वाचवुन मदत करता येते. आपल्या वा आपल्या मुलांच्या वाढदिवसांचे आपण केवढे स्तोम वाजवतो, केवढा खर्च करतो ! हेच पैसे योग्य हाती पडले तर अनेकांच्या आयुष्यात सोनेरी पहाट उगवेल. हा विचार मी एकदा कामावर ऐकवला, झाली त्याला ५ वर्षे, माझी एक मैत्रीण तिच्या मुलीच्या वाढदिवसाला स्व. बाबा आमटे यांच्या “आनंदवन” या संस्थेला, देणगी देत आहे. मला सुद्धा हे माहित नव्हते ! कट्ट्यावरच्या एका मित्राने चॅट मार्फ़तच विचारले, अमक्या संस्थेला देणगी द्यायची आहे, पत्ता सांग ! मी लगेच “महार्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे” यांचा नंबर शोधून दिला. लगेच त्याने फ़ोनवरच संस्थेचा खाते नंबर घेउन इ-बँकिंगने पैसे जमा सुद्धा केले !

आपण केलेले दान , या हाताचे त्या हाताला सुद्धा कळता नये असे आपल्याकडे मानतात. त्या मागे काही कारणे असतीलही, पण आता त्याचा फ़ेरविचार करण्याची गरज आहे. चांगले काम लोकांपर्यंत पोचविण्यात गैर काय ? मी स्वत: मध्यमवर्गीय नोकरदार आहे. १९९३ साली साने गुरूजी स्मारकाचा एक कार्यकर्ता माझ्या घरी देणगीसाठी आला. माझ्या जडण घडणीत साने गुरूजींच्या लेखनाचा फ़ार मोठा वाटा आहे. ते ऋण अंशत: फेडण्याची ही संधी मी कशी बरे दवडली असती ? मदत केल्यावर मला काही तरी अजब , आगळे समाधान मिळाले. अनेक अनावश्यक खर्चाला फ़ाटा देउन मी दरवर्षी १०,००० रूपये दान करायचे हा संकल्पच सोडला. या निमित्ताने अनेक संस्थाची, त्यांच्या कामाची माहिती अनायसेच मिळत गेली. दहा वर्षात मी १,००,००० रूपयाहुन जास्तच , वेगवेगळ्या संस्थांना दान केले आहेत. मला कधीही काहीही कमी पडले नाही उलट कधी कधी तर “देता किती घेशील दो करांनी” असा अनुभव आला ! आज मलाच मी हे कसे करू शकलो याचे नवल वाटते. एकरकमी १ लाख तर मी स्वप्नातही देउ शकलो नसतो ! अर्थात याचे श्रेय माझ्या बायकोला सुद्धा आहेच, पण मुलांनी सुद्धा आम्हाला फ़टाके नको, वाढदिवस नको असे म्हणत माझ्या संकल्प सिद्धीस हातभार लावला ! गुजरात भूकंप, कारगिल निधी, आनंदवन, लांजा गावातील चाकरमान्यांची एक संस्था, विवेकानंद स्मारक , कन्याकुमारी, साने गुरूजी स्मारक, वनवासी कल्याण आश्रम, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, हिंगणे . ही त्यातल्या काही मान्यवर संस्थाची नावे !

याच सदराखाली मी तुम्हाला चांगले काम करणार्या सामाजिक संस्थांची माहिती देत जाईन, त्यांचे पत्ते देत जाईन. तुम्हाला योग्य वाटल्यास तुम्ही थेट अशा संस्थांना मदत करू शकता. अधिक माहिती घेउ शकता. यातल्या बहुतेक देणग्यांवर तुम्हाला करसवलत सुद्धा मिळेल. काही संस्थांचे प्रकल्प तर १०० % कर वजावट देणार्या योजनेतले आहेत. मदत चेक द्वारे, संबंधित संस्थेच्या नावाने चेक काढूनच करावी.

देणार्याने देत जावे

घेणार्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणार्याचे हात घ्यावे !

अहो , म्हणजे त्या हातांचा देण्याचा गुण घ्यावा !! बघा मग तुमची अवस्था सुद्धा;

देणार्याचे हात हजारो,

दुबळी माझी झोळी !

किंवा -

तुम एक पैसा दोगे,

वो दस लाख देगा !

… अशी होईल ! काय, मग ? अनुभवणार ना देण्यातला आनंद ?