सोमवार, २४ डिसेंबर, २०१२

दिल्लीतील आगीत सचिनची आहुति की हौतात्म्य ?जवळचा कोणी अंथरूणाला खिळलेला असतो. प्रेमापोटी तो आज ना उद्या नक्की ठणठणीत बरा होइल या आशेवर चाहते  डोळे लावून बसलेले असतात. तसा आधीही तो कोमात जावून आलेला असतोच ! त्याची विल पॉवर जबराट आहे, त्याला स्वत:लाच आपण बरे होण्याची आशा आहे तोवर आशा आहे ! कोणी मात्र त्याला अंथरूणाला खिळलेल्या अवस्थेत बघण्यापेक्षा तो गेला तर बरे, एकदा काय ते दु:ख होईल पण त्याला असा बघणे जास्त वेदनादायक आहे असे हळू आवाजात बोलून दाखवित असतात ! त्याच्या आजारपणावर उतारा म्हणून औषध बदलून बघायचे ठरते. तो बरा होणार अशा आशेवर जगणार्यांची   आशा अजून एकदा पालवते, बाकीच्यांना मात्र “कशाला हा अट्टाहास, थोडे का उपाय झाले ? बरे आता वय तरी कोठे साथ देते आहे ? त्याचे हाल बघवत नाहीत हो “ असा सूर असतो !

अचानक तो गेल्याची खबर येते ! तो जगणार अशा आशेवर असणार्यांना हा धक्काच असतो पण “आता मरण हीच त्याची सूटका” असे वाटणार्यांना पण हळहळ वाटतेच ! तसा काही तो अकाली गेलेला नसतो, वय झाल्यावर कोणी गेला तर तेवढे दु:खही होत नसते पण अनेक वर्षे मर्दुमकी गाजवणार्याने असे अंथरूणाला खिळून मरावे याचा विषाद नक्कीच होतो. रणागणांतच त्याची अखेर झाली असती तर ?

पाकिस्तानच्या भारतातील दौर्याची निवड अवघ्या काही तासावर आलेली असताना सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ति जाहिर केलेली आहे. आज ना उद्या जे घडणार होतेच पण ते झाल्यावर मात्र मनात अनेक वादळॆ उठली आहेत !  50 षटकांच्या खेळात त्याच्या आसपास फिरकेल असाही कोणी नाही. त्याने खेळलेल्या शेवटच्या डावात पाकच्या 329 धावांचा पाठलाग करतान ढाक्यात 48 चेंडूत 52 धाव तडकावून विराट विजयाचा पाया रचला होता. पाकविरूद्ध तो वेगळ्याच इर्षेने खेळतो व विश्वचषकात पाक विरूद्धच्या जवळपास प्रत्येक विजयात त्याची बॅट तळपली आहे. त्याच पाकड्यांविरूद्ध घरच्या मैदानात त्याला दोन हात करायची संधी मिळणार होती. तो ही संधी दवडेल अशा सुतराम शक्यता नव्हती.

असे असताना हा निर्णय त्याने का घेतला ? उघडपणे निवड समितीने त्याच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणलेला दिसत नाही. पण पडद्यामागे बरेच काही झाले असावे. भारतात क्रिकेटचे राजकारणच  जास्त जोरात चालते. राजकारणी मंडळी क्रिकेटला मगरमिठी मारून बसली आहेत. सचिनने स्वीकारलेले राज्यसभेचे सदस्यत्व, त्याला “भारत रत्न” मिळावे अशी चर्चा व दिल्लीत माजलेली अनागोंदी या सर्वांची एक लिंक मला तरी स्पष्ट दिसते आहे !
राजधानीत दोन दिवस अनागोंदी माजली आहे. लोक कोणालाही न जुमानता रस्त्यावर उतरले आहेत. लाठी हल्ला, गोळीबार झाला म्हणून सर्व मिडीया सरकारवर तुटून पडलेला आहे. सत्तारूढ सरकार याने हादरले आहे. परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून निदान मिडीयाला दूसरीकडे  कोठेतरी गुंतविणे  भागच आहे ! मग यात सचिनची निवृत्ति जाहिर झाली तर ? मिडीयासाठी ही ब्रेकिंग न्युज ठरेल व त्यांचा अर्धा वेळ तरी सचिन संबंधित बाइटस टीपण्यात जाइल ! तितकाच सरकारला मोकळा श्वास घेता येइल ! पण हे व्हावे कसे ? सचिन निदान एकदिवसीय प्रकारातुन या वेळी निवृत्ति जाहिर करणे शक्यच नाही ! अर्थात जे काम सरळ होत नाही ते कोणत्याही मार्गाने करण्यास राजकारणी तरबेजच असतात ! सीधी उंगलीसे थोडेही घी निकलता है ? सचिनला आधी विनंती, मग प्रेमळ विनंती मग तुझी निवडच करीत नाही अशी धमकी व मग भारत रत्नचा मार्ग मोकळा करायचे वचन देवून त्याला निदान एकदिवसीय सामन्यातून निवृत्ति घ्यायला भाग पाडले हे स्पष्ट आहे ! त्याने जर हा निर्णय मनापासून घेतला असता तर कसोटी क्रिकेटला पण त्याने राम-राम ठोकला असता !

दिल्लीतील आग आटोक्यात आणण्यासाठी सचिनवर अर्धवट निवृत्ति एकतर लादली तरी गेली आहे किंवा एखादी ऑफर त्याला देवून त्याला हौतात्म्यासाठी तयार  केले गेले आहे ! दिल्ली संकटात असते तेव्हा सह्याद्रीने मदतीला धावायचे असते ही तर परंपराच आहे, यात मराठ्यांचे पानिपतच होणार !

बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

पालघर पोलिसांचे निलंबन – एक अतिरेकी कारवाई !शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पालघरमधील एका मुस्लिम तरूणीने फेसबुकवर बाळासाहेबांचा अवमान करणारी एक टिपणी केली होती. पालघरमधील शिवसैनिकांनी त्याची पोलिसात रीतसर तक्रार नोंदविली व कारवाईची मागणी केली होती. पोलिसांनी सदर मुस्लिम तरूणीला अटक केलीच पण ती टिपणी  आवडली असे नमूद करणार्या तिच्या हिंदू मैत्रीणीलासुद्धा अटक केली. त्यांना रितसर न्याय दंडाधिकार्यापुढे हजर केले गेले व 24 तासात जामिनावर मुक्त सुद्धा केले गेले होते.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच झाला म्हणून मिडीयाने बरीच बोंब ठोकल्याने स्वत: मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले व या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेची चौकशी केली. अहवाल प्राप्त होताच दोन पोलिस अधिकार्यांना थेट निलंबित करण्यात आले आहे व त्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेने पालघर बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मी स्वत: अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता असलो तरी थेट निलंबनाची कारवाई हाच मला अतिरेक वाटतो आहे. अशाने पोलिस दलाचे मनोधैर्य खच्ची होईल यात शंकाच नाही. एकाने गाय मारली म्हणून दूसर्याने वासरू मारले असा प्रकार झाला आहे.
मिडीया आता अशी बोंब ठोकतो आहे की बंदला विरोध केला म्हणून अटक का केली ? त्या तरूणीने बंदला नुसता विरोध केला नव्हता तर बाळासाहेबांचा अवमान सुद्धा केला होता हे सोयीस्करपणे दडपले जात आहे ! तिची पोस्ट अशी होती “ बाळासाहेबांसारखी माणसे रोज जन्माला येतात व रोज मरतात, त्यांच्यासाठी बंद कशाला ?” ज्याच्या अंत्ययात्रेला 25 लाख लोक जमतात अशी किती माणसे या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात जन्माला आलेली आहेत ? हल्ली तर कोणाच्या मयताला 4 खांदेकरी सुद्धा मिळत नाहीत ! तेव्हा या टिपणीने बाळासाहेंबांचा अवमान करण्याचा हेतू होता हे स्पष्टच आहे. शिवसेनेने बंदची हाक दिली नव्हती, तो उत्स्फूर्त होता, तेव्हा बंदची सक्ती नव्हती हे सुद्धा स्पष्ट आहे.
बाळासाहेबांच्या निधनाने शोकाकुल वातावरणात अशी टिपणे करणे अयोग्यच होते, त्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरूपयोग केला गेला हे नक्की. टिपणी आवडली असे नोंदविणार्या हिंदू तरूणीवर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली हे सुद्धा नमूद करण्यासारखे आहे. आपल्या देशात पोलिस दल तपासाचे काम करते व न्यायालय सजा देण्याचे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या तरूणींना न्यायालयात उभे केले व तिकडे त्यांना जामिन मिळाला. त्यावेळची तणावपूर्ण  परिस्थिती बघता, अवमानास्पद टिपणीने दंगलीचा भडका उडू नये म्हणून पोलिसांनी केलेली अटक योग्यच होती असे मला वाटते. अटक केली नसती तर त्या तरूणींना जमावाच्या हिंसक हल्ल्याला सामोरे जावे लागले असते व त्यातून अधिकच भडका उडाला असता हे नक्की. अटकेने त्या तरूणींची सुरक्षितताच जपली गेली. बाळासाहेबांच्या निधना नंतरची अत्यंत तणावपुर्ण परिस्थिती पोलिसांनी अत्यंत कौशल्याने हाताळली म्हणून त्यांचे कौतुक होत असताना हे निलंबन आततायीपणाचे व पोलिसांच्या चांगल्या कामगिरीवर बोळा फिरवण्यासारखे आहे. निलंबन रद्द करावे त्या अधिकार्यांना सन्मानाने रूजू करून घ्यावे हेच योग्य !

      जय महाराष्ट्र !

रविवार, ९ सप्टेंबर, २०१२

ना”पास” !

माझ्या विसरभोळेपणाबद्द्ल आधीच बरेच लिहून झाले आहे. आधुनिक तंत्र वापरून, जसे मोबाइल मध्ये रिमाइंडर लावून बायकोचा व तिच्या नातलगांचा वाढदिवस लक्षात ठेवणे, सर्व बिलांच्या बाबतीत “ऑटो पेमेंटचा” पर्याय सक्रीय करणे असे उपाय करून मी माझे जगणे बरेच सुसह्य केले आहे. रेल्वेचा पासाचे नूतनीकरण करणे मात्र रिमाइंडर लावूनही जमत नव्हते. कारण रिमाइंडर जरी वाजले तरी मी नेमका तेव्हाच रेल्वे स्टेशनच्या आसपास हवा ना ? असलो तर पासाच्या खिडकीवर गर्दी कमी असावी, असल्यास तेवढे पैसे माझ्या खिषात असायला हवेत, त्यातही 711 रूपयामधला रूपया तरी सुटा हवाच , नाहीतर खिडकीवरचा क्लार्क सुट्यासाठी तंगविणार ! शेवटी व्हायचे काय की पास संपलेला आहे हे तिकिट तपासनीस अडवायचा तेव्हाच लक्षात यायचे. रेल्वेच बहुदा माझ्याकडून दंड वसूल करून कंटाळली व ऑनलाइन पास काढायची सोय काही वर्षापुर्वी उपलब्ध करून दिली गेली. यात 10 दिवस आधी पास काढता येतो व पास अगदी घरपोच मिळतो. एकदा आपण असा ऑनलाइन पास काढला की रेल्वे तो संपायच्या आधी नूतनीकरणासाठी 10 दिवस आधी इमेल पाठवून आठवण सुद्धा करते ! या सोयीमुळे मधली काही वर्षे तरी पासाचा घोळ झाला नाही. अचानक रेल्वे प्रशासनाचे काय डोके फिरले कोणास ठावूक, पास घरपोच करण्याच्या भागातुन आमचा पनवेल/नवीन पनवेल विभागच काढून टाकण्यात आला. काही काळ मी कार्यालयीन पत्त्यावर पास मागवू लागलो पण व्हायचे असे की मी जागेवर नसतानाच तो कुरीयरवाला पास आणायचा किंवा कधी सलग सुट्ट्या आल्याने माझे कार्यालय नेमके पास नूतनीकरण करायच्या दिवसातच बंद असायचे. यावर मी तोडगा काढला तो म्हणजे रेल्वेचे स्मार्ट कार्ड वापरून पासाचे नूतनीकरण करण्याचा. हा सुद्धा तोडगा तकलादू ठरला कारण हव्या त्या वेळी स्मार्ट कार्ड मध्ये रकमेचा आधी भरणा करणे, तो झाला तर चालू स्थितीतील मशीन मिळणे व तसे मिळालेच तर नूतनीकरणासाठी आपण टाकलेला पहिल्या पासाचा नंबर मशीनने स्वीकारणे या सगळ्या गोष्टींचा मेळ जुळेना. पासाच्या बाबतीत सगळे मुसळ केरात जावून ये रे माझ्या मागल्या असेच चालू झाले.

विसरभोळेपणासोबतच मला अजून एक उपशाप मिळालेला आहे तो म्हणजे नको त्या वेळी नको ती गोष्ट आठवणे ! दोन आठवड्यापुर्वी कामावरून घरी परतत होतो. वाशीच्या खाडीवर लोकल असतानाच आपला पास केव्हा संपतो आहे ते बघायची मला अवदसा आठवली. पासावर तारीख होती 15/8/2012, म्हणजे मी दोन आठवड्यापुर्वीच पास काढला आहे ! नो वरी ! पण मग आठवले की आपण दोन आठवड्यापुर्वी पास नक्कीच काढलेला नाही. ती तारीख परत परत बघितल्यावर लक्षात आले की खरे तर आपला पास दोन आठवड्यापुर्वीच संपलेला आहे ! आधी हे झालेच कसे ? म्हणजे रेल्वेसुद्धा स्मरण-मेल पाठवायला विसरली की काय ? मग आठवले की संपलेला पास आपण काउंटरवरून काढलेला आहे, रेल्वे कशाला स्मरण करेल ? म्हणजे आता डब्यात टी.सी आला तर आपली काही खैर नाही. आला तर आला, फाडू गुमान दंडाची पावती असा विचार आला आणि खिसे चाचपडले तर काय, माझ्याजवळ पुरते 100 रूपये सुद्धा नव्हते. चार बँकाची एटीएम होती पण या प्रसंगात त्यांचा उपयोग शून्य होता. आता मात्र गंभीर स्थिती ओढवली होती. सोबत कोणी मित्र सुद्धा नव्हता. आणि याच संपलेल्या पासावर मी दोनदा यात्रा-विस्तार तिकिट काढले होते, सीएसटीला उभ्या असलेल्या टीसींच्या पथकाच्या डोळ्याला डोळा भिडविला होता, गाडीत येवून “तिकिट प्लिज” असे विचारणार्या टीसीला रूबाबात खिषाला हात लावून “पास आहे” असे उत्तर दिले होते व तो “इटस्‌ ओके” म्हणून गुमान चालू पडला होता. पण हे सगळे केव्हा, तर मला माझा पास संपला आहे याची जाणीवच नव्हती तेव्हा ! आता मात्र माझा चेहरा पार दीनवाणा , बापुडवाणा झाला होता. टीसीला माझ्याकडे नुसते बघितले तरी हा विदाउट तिकिट असल्याची खात्रीच पटणार होती. एव्हाना पास बघताना माझा चेहरा बघून तो संपलेला आहे याची खात्री आजूबाजूच्या सगळ्यांना झालेली होतीच. नेत्रपल्लवीने सगळ्या डब्यात हा मेसेज गेला. मला घाबरवायला मग टीसी आला अशा पुड्या सुटू लागल्या. कोणी आज स्पेशल धाड आहे व जे सापडतील त्यांना अडाणी कोर्टातच उभे करणार असल्याचे सांगू लागला. कोणी “दंड पाचशे रूपये वर 3 महिने तुरूंगवास सुद्धा “ असा कडक नियम झाला आहे म्हणून सांगू लागला. कोण दंड वाढल्यापासून टीसींचा कोटा भरत नाही म्हणून ते तोड-पाणी करीत नाहीत व दंडाचे पैसे नसतील तर सरळ रेल्वे पोलिसांच्या हवाली करतात, अडाणी कोर्ट सकाळी अकरा वाजता उघडते व तोपर्यंत लॉक-अप मध्ये कसे सडावे लागते याचे भयंकर वर्णन करीत होता. एकजण तर हे जंटलमन सारखे दिसणारे लोक केव्हाच तिकिट काढीत नाहीत व टीसी त्यांचे कपडे बघून कधी तिकिटच विचारत नाहीत अशीही खंत व्यक्त करीत होता.

ही सर्व चर्चा ऐकून मी चांगलाच हादरलो. सिग्नलला गाडी कोठे थांबली तर खाली उतरून पळ काढायचा असाही एक विचार केला पण गाडी आज अगदीच सुसाट होती. मानसरोवर तसे नवे स्थानक आहे तिकडे कदाचित टीसी नसतील , तिकडे उतरूया असा एक विचार मनात आला पण मध्ये कोठे खाली उतरायची रिस्क घेण्यापेक्षा पनवेललाच काय होईल ते होवू दे असा पक्का विचार केला. पनवेलला मागे उतरलो तर टीसी असायची शक्यता कमी होती पण मग तिकडे काळोख असतो व अलिकडे प्रवाशांना लूटायच्या घटना घडल्याचे वाचलेले आठवले. चेन-बिन वा रोकड काही नसली तरी माझ्याकडे महागडा मोबाइल होताच की ! त्यातुन वाचलो तर रेल्वे लाइन ओलांडली म्हणून रेल्वे-पोलिसांकडून धरपकड होत असतेच. “इकडे आड तिकडे विहीर” नाहीतर “आगीतुन फोफाट्यात ! “ . “दगडापेक्षा वीट बरी” या न्यायाने चोर व रेल्वे पोलिस यापेक्षा टी.सी. परवडला. टीसीने अडविले तर बिनधास्त पास आहे म्हणून सांगायचे व अगदीच पास दाखवा म्हणाला तर पास त्याच्या पुढे धरायचा. त्याला जर कळले की तो संपला आहे तर साळसूदपणाचा आव आणून “अरे खरेच की ! माझ्या लक्षातच नाही आले” असे म्हणायचे. नाहीतर सरळ सांगायचे की मी रेल्वेतले वरिष्ठ अधिकारी राजीव गुप्तांचा पीए आहे म्हणून, त्याला नाही पटले तर मोबाइलमधला त्यांचा नंबर त्याला दाखवायचा !

या व अशा अनेक उलट-सूलट विचारांच्या कल्लोळात असतानाच गाडी पनवेल स्थानकात लागली. पनवेलला उतरणारी माणसे कमीच होती व बाहेरगावची गाडी सुद्धा आलेली नसल्याने एवढे भव्य स्थानक अगदीत सुने वाटत होते. थोडा वेळ कानोसा घेतला व खात्री पटली की टीसीचे अगदी नामोनिषाण सुद्धा नाही. तरीही धाकधुक कमी होत नव्हती. हळूच मी तिकिट खिडकी गाठली ! हुश्श ! आता मात्र मी अगदी सेफ झालो होतो. चला आधी पास काढायला हवा ! मी जवळच असलेल्या एटीएम मधून पैसे काढले व तिकिट खिडकीवर गेलो. गर्दी फारशी नव्हतीच. माझा नंबर लगेचच आला. आजचा दिवस तर पार पडलेला होताच तेव्हा उद्यापासूनचा पनवेल ते सीएसटी तिमाही पास दे असे मी काउंटरवरच्या क्लार्कला सांगितले. यावर त्याने पहिला पास मागितला. मी पहिला पास कशाला हवा, 10 दिवस आधी पास काढता येतो असे त्याला सांगितले. तो पण खमक्या होता. 10 दिवस आधी पासाचे नूतनीकरण करता येते, नवीन काढता येत नाही असा नेमका नियम त्याने मला सांगितला. मला माझीच मग लाज वाटली, आधीच मी दोन आठवडे विदाउट तिकिट फिरत होतो व आता एका दिवसासाठी रडत होतो ! त्याने मला आजचीच तारीख टाकून पास दिला व संगणकावर पास देताना आजचीच तारीख येते, नूतनीकरण करत असाल तर आपोआपच पास संपल्यापासूनची पुढ्ची तारीख पडते असे सुद्धा समजावून सांगितले. मी गुमान तो पास घेवून स्टेशनच्या आतल्या जिन्याने वर जायला निघालो. आता मला कोणतेच टेंशन नव्हते !

पुलावर येताच साध्या वेशातील टीसीने मला हटकले. त्याला पास बघायचाच होता ! मी दाखविताच त्याने तारीख अगदी नीट तपासली व आजच काढलेला दिसतो असेही बोलून दाखविले. मी सूटलो असे मनातल्या मनात म्हणत व त्या क्लार्कचे आभार मानत पुल उतरायला लागलो ! पण नक्की नियम काय आहे ? फक्त नूतनीकरणच दहा दिवस आधी करता येते की नवीन पास सुद्धा तसा काढता येतो ? घरी गेल्यावर रेल्वेची वेबसाइट उघडली व पासा संबंधी नियम तपासले. त्यात स्पष्टपणे renewal असाच शब्दप्रयोग आहे. रेल्वेचे सगळेच नियम जाचक नसतात तर !

शनिवार, ८ सप्टेंबर, २०१२

स्वामीत्व हक्कासंबंधी !


सोशल नेटवर्किंग साइटसवर अनेक प्रकारची माहिती कॉपी पेस्ट करून शेयर केली जाते. या वरून अनेकदा वादंग निर्माण होतात. मी मला आलेले इमेल जसेच्या तसे  फॉरवर्ड केले असे सांगून जबाबदारी झटकून मोकळे होण्याचा प्रयत्न केला जातो. पण अप्रत्यक्षपणे का होइना आपण चोरीला प्रोत्साहनच देत असतो. चोरी करणारा जसा दोषी असतो तसा मदत करणारा सुद्धा असतोच असतो.

कायद्याच्या बडग्यापेक्षा मला नैतिकता जास्त महत्वाची वाटते. "उचलली जीभ लावली टाळ्याला" या धर्तीवर आलेले इमेल कोणतीही शहानिशा न करता मित्रांना फॉरवर्ड केले जाते. अनेकदा लेखकाचे नाव सोडून बाकी सगळी पोस्ट कॉपी पेस्ट केली जाते. नकळत का होइना असे केल्याने संभ्रम निर्माण होतोच. अशा प्रसंगी, तळ टीप म्हणून "इदं न मम ( हे मी लिहिलेले नाही )" असे लिहिणे अधिक नैतिक आहे. (टीप - असे लिहायची  कल्पना माझी नाही !)

KCBC Cafe Reunion -  या फेसबुकच्या फोरमवर स्वामीत्व हक्कासंबंधी चर्चा चालू असतानाच माझे मित्र व नेहरू तारांगणचे संचालक श्री. अरविंद परांजपे यांनी एक वेगळाच विचार मांडला. त्यांनी त्यांचे सगळे लेखन स्वामीत्व हक्क मुक्त ठेवले आहे. कोणीही ते कॉपी-पेस्ट करावे, त्यांच्या नावाचा उल्लेख केला तर आनंदच आहे, आग्रह वा सक्ती नाही !मला स्वत:ला हा विचार खूपच भावला. लेखन हे काही माझ्या पोटा-पाण्याचे साधन नाही. स्वान्त-सुखाय मी लिहित असतो, एखाद्याला ते आवडले व आपल्या नावावर खपवावे असे वाटले तर काय हरकत आहे ! माझा विचार अनेकांपर्यंत पोहचत तर आहे ? विचारांचा प्रसार होणे जास्त महत्वाचे आहे. सुर्य कोणाच्याही आरवण्याने का होइना उगवला हे जास्त महत्वाचे !

या क्षणापासून मी माझे ( तसे माझे म्हणून तरी काय आहे ? हे सर्व तुमचेच आधी केव्हातरी घेतलेले आहे ते या माध्यमातुन तुम्हाला परत करतो आहे ! ) म्हणून या ब्लॉगवर टाकलेले सर्व लेखन स्वामीत्व हक्काच्या बेडीतुन मुक्त करीत आहे. ज्या कोणाला हे आवडेल त्याने त्याला जसे वाटेल तसे ते शेयर करावे, त्याला कोणतीही आडकाठी नाही. 

धन्यवाद !

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

गावस्करच्या “त्या” 36 धावा !

सुनील गावस्कर हे क्रिकेटमधील एक बडे नाव ! सलामीचा तंत्रशुद्ध फलंदाज ज्याने त्याच्या काळातील जगातील सर्वात भेदक, सर्वात वेगवान गोलंदाजांचा बेडरपणे सामना केला व तो सुद्धा शिरस्त्राण न घालता ! सुनील भारताचा एक यशस्वी कर्णधार सुद्धा होता , ज्याने आपल्या नेतृत्वगुणाने ऑस्ट्रेलियातला मिनी वर्डकपवर भारताचे नाव कोरले होते. हा विजय आपल्या आधीच्या व हल्ली जिंकलेल्या स्पर्धा विजेतापदांपेक्षा सरस होता. या स्पर्धेत भारत एकही सामना हरला नव्हता. भारताचे सर्व खेळाडू एकदाही बाद झाले नव्हते व आपण प्रतिपक्षाला कामय गुंडाळले होते. याच स्पर्धेत आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला आपण दोनदा शब्दश: लोळविले होते. एकदा साखळीत व एकदा अंतिम फेरीत ! कसोटीतले यच्चयावत विक्रम त्याच्या नावावर जमा होते. सचिनने त्याचे बहुतेक विक्रम मोडले असले तरी सामन्याच्या दोन्ही डावात सुनीलने तब्बल तीनदा शतक (त्यात एकदा तर शतक व द्विशतक !) झळकावले आहे तर सचिनला तसे एकदाही करता आलेले नाही. आज सचिन जेवढा लोकप्रिय आहे (की होता ?) तेवढाच सुनीलही होता व अजूनही आहे. आपले क्रिकेटमधले यश त्याने चांगले एनकॅश करून घेतले व मोप पैका सुद्धा कमावला. जाहिराती, स्तंभलेखन, कार्यक्रमात सहभाग, सिनेमात काम, गायन या सर्वच क्षेत्रात त्याने मिरवून घेतले. क्रिकेटमधून पैसा कसा कमवायचा याचा वस्तूपाठच त्याने सगळ्या खेळाडूंना घालून दिला. 

 सुनीलला सुद्धा बोचरी टीका झेलावी लागली पण टीकाकारांना त्याने नुसत्या बॅटनेच नाही तर लेखणीने व जीभेने सुद्धा थोबाडफोड उत्तर दिले ! सर्वाधिक शतके, सर्वाधिक धावा त्याच्या नावावर झाल्या. यशाच्या शिखरावर असताना अंतिम कसोटीत दूसर्या डावात चिवट खेळून त्याने 96 धावा केल्या पण दुर्दैवाने पाकिस्तानविरूद्ध संघाला विजय मिळवून देवू शकला नाही. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना त्याने क्रिकेटमधून निवृत्ति जाहीर केली. इथे त्याचा पहिला डाव संपला, समालोचक म्हणून त्याने दूसरी इनिंग चालू केली व इथेही तो अल्पावधीत यशाच्या शिखरावर पोहचला आहे. आता क्रिकेटचे समालोचन करताना एखाद्या खेळाडूच्या तंत्राची, पक्क्या व कच्च्या दुव्याची चर्चा ओघाने आलीच. गावस्करसारख्या अनुभवी खेळाडूने आपले कान उपटले तर त्या खेळाडूने स्वत:ला भाग्यवान समजायला हवे, पण होते उलटेच. अर्ध्या हळकूंडाने पिवळे झालेले खेळाडू त्याचेच माप काढायला लागतात ! गावस्करला झोडपायला मग विश्वकरंडकातल्या त्याच्या पुरी 60 षटके खेळून केलेल्या 36 धावांचा उल्लेख केला जातो. एकाने केला, म्हणून मग कोणीही सोम्या-गोम्या त्या खेळीचा खोचक उल्लेख करतो. एरवी आपल्या हजरजबाबीपणाने सर्वाना गार करणार गावस्कर या खेळीविषयी काही बोलत नाही. त्याच्या बरोबर खेळलेले सुद्धा काही बोलत नाही. बरे ही टीका गावस्कर खेळत असताना व तो निवृत्त झाल्यावर सुद्धा बराच काळ कोणी केली नव्हती हे सुद्धा खासच. परवा गावस्करने सचिनची उणीदुणी काढल्यावर पलटवार करताना सचिनभक्तांनी त्याच्या “त्या” खेळीचा खोचक उल्लेख केलाच.

 यावेळी मात्र मीच या टीकेच्या मुळाशी जायचा प्रयत्न केला. नेटची मदत घेवून मला बरीच माहिती मिळाली. गावस्कर तडाखेबंद , घणाघाती, मास्टर ब्लास्टर ही बिरूदे मिरवणारा फलंदाज म्हणून ख्यातनाम कधीच नव्हता तरी कारकिर्दीच्या उत्तरार्धात तो बराच आक्रमक झाला होता. वनडेत पहिल्या पंधरा षटकात गोलंदाजाला टप्प्यावर उचलून मैदानाबाहेर फेकण्यात तो चांगलाच माहीर झाला होता. त्याचे प्लेसमेंट उत्तम असल्याने एकेरी धावा चोरून तो धावफलक हलता ठेवत असे. श्रीकांतच्या साथीने भारतातल्या विश्वचषकाच्या उपांत्य-पुर्व सामन्यात किविजविरूद्ध त्याने काढलेले तूफानी शतक कोण विसरेल ? किविज गोलंदाजांची त्याने पिसे काढताना 3 षटकार व 10 चौकारांनी, 88 चेंडूतच 103 धावा चोपल्या होत्या व भारताला उपांत्य फेरीत पोहचवले होते. याच दरम्यान विश्वचषकातले सर्वात वेगवान शतक त्याने आपल्या नावावर कोरले होते. या विवेचनावरून गावस्कर वनडेत सुद्धा फटकेबाजी करायचा हे नक्की. आता त्याच्या “त्या” कुर्मगती खेळीकडे वळू. आधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की 1975 सालीच काय, अगदी 1983 सालीसुद्धा, आपण जेव्हा वनडेचा विश्वकप जिंकला तेव्हा सुद्धा आपण या प्रकारातले कच्चे लिंबूच होतो. तेव्हा 60 षटकांचे सामने व्हायचे पण 220-240 चे लक्ष सुद्धा आव्हानात्मक व निर्णायक ठरत असे. अगदी अलिकडे पर्यंत 50 षटकांच्या सामन्यात सुद्धा 270-280 हे लक्ष अशक्यप्रायच असायचे. टी20 नंतर मात्र धावगती कमालीची वाढली आहे व 300 धावांचा पाठलाग अगदी आरामात केला जावू लागला आहे.

 या प्रस्तावने नंतर “त्या” सामन्याकडे वळू. “तो” सामना 1975 साली इंग्लंडला झालेल्या पहिल्या विश्वचषकातला पहिलाच सामना होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती व भारतीय गोलंदाजांचे धिंडवडे काढीत 60 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 334 धावांचा हिमालय उभारला होता. तो काळ व तेव्हाची आपली ताकद बघता आपल्या पराभवाचा नुसता उपचार बाकी होता ! 60 षटके पुरती खेळपट्टीवर उभे राहिले तरी तो सुद्धा आपला विजयच ठरावा अशी एकूण परिस्थिती होती. गावस्करने अगदी तेच केले ! 174 चेंडू खेळून त्याने फक्त 36 धावा जमविल्या ! सलामीला गावस्कर बरोबर मैदानात उतरलेल्या एकनाथ सोलकरने बाद होण्यापुर्वी 34 चेंडूत फक्त 8 च धावा केल्या होत्या. अंशुमन गायकवाड ( 46 चेंडूत 22 ) व गुंडाप्पा विश्वनाथ (59 चेंडूत 37) यांनी त्यातल्या त्यात थोडाफार प्रतिकार केला पण मग आलेल्या पटेलने सुद्धा 57 चेंडूत 16 धावा जमवून गावस्करला तोडीस तोड साथ देताना खेळपट्टीवर नांगर टाकणेच पसंद केले. या दोघांनी चिवट खेळी करून , भारताला लवकर गुंडाळून सामना जिंकण्याचे इंग्लंडचे मनसुबे पार धुळीला मिळविले व त्यांना अगदी पुरी 60 षटके पिदवले तसेच इंग्लंडला निर्विवाद विजय मिळू दिला नाही ! अगदी आजही पराभव अटळ असेल तर नेट रनरेटचा विचार करून हरणारा संघ निदान सगळी षटके खेळून काढायचा प्रयत्न करतोच. गावस्करची ही पहिली वनडे नव्हती. आपल्या वनडे पदार्पणात, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड विरूद्धच 35 चेंडूत 28 धावा फटकावल्या होत्या व त्यात 3 चौकार व एक षटकार सुद्धा हाणला होता. ही धावगती भरते 80 ! म्हणजे वनडेत कसे खेळावे हे त्याला शिकवायची तेव्हाही काही गरज नव्हती. 34 धावांची कासवछाप खेळी त्याने इंग्लंडला पिदवायला व संघहित ध्यानी धरूनच केली यात काही शंकाच नाही. चारच दिवसांनी याच स्पर्धेत भारताची गाठ पुर्व आफ्रिकेशी पडली. 60 षटकात 120 धावा करून जिंकायचे आव्हान आपल्याला मिळाले. इथे मात्र गावस्करने इंजिनियरच्या साथीने सलामीला येताना 85 चेंडूत 65 धावा काढल्या, इंजिनियरने सुद्धा तेवढेच चेंडू खेळून 54 धावा केल्या व आपण 10 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. वनडेतला आपला बहुदा पहिलाच व पहिल्या दोन विश्वकरंडकातला एकमेव विजय होता. या विजयात गावस्करचे योगदान भरीव होते व धावगती सुद्धा त्या काळाप्रमाणे चांगलीच होती. हा सामना आपण 30 षटके व एक चेंडू राखून जिंकला होता. त्या सामन्याच्या आधीच्या व नंतरच्या सामन्यात जलद धावा करणारा गावस्कर त्याच एका सामन्यात हळू समजून-उमजून खेळला पण पुढे भविष्यात टीकाकार हे समजून न घेता त्याला झोडपणार हे मात्र त्याला तेव्हा समजले नाही ! 

 अर्थात हे सगळे वाचूनही कोणी गावस्करला “त्या” खेळीसाठी बोल लावणार असेल तर गावस्करच्याच शब्दात म्हणावे लागेल “बोडके !”

 गावस्करची वनडे कारकिर्द थोडक्यात अशी, 
 Mat  Inns   NO  Runs   HS         Ave        BF       SR   100   50    0 
 108    102   14   3092    103*     35.13     4966    62.26   1    27    8
 (आकडेवारी साठी आधार ESPNcricinfo )

रविवार, ५ ऑगस्ट, २०१२

कही दाग ना लग जाये !

आयुष्यात कोणताच दाग, डाग, कलंक, किटाळ लागू नये म्हणून जपायची आपली संस्कृति व संस्कार ! निष्कलंक चारीत्र्य ही अभिमानास्पद गोष्ट व सार्वजनिक जीवनात तर याला फारच महत्व. आपले वर्तनच असे असावे की कोणताही दोष, कलंक, आरोप आपल्याला लागणारच नाही, तसे खोटे आरोप सुद्धा करायची कोणी हिम्मत दाखविणार नाही, आपल्या चारित्र्यावर कोणी शिंतोडे उडविलेले सुद्धा आपण खपवून घेणार नाही. आणि असा काही कलंक लागलाच तर तोंड दाखवायला सुद्धा जागा रहाणार नाही याची जाणीव नक्कीच असते. 


 अर्थात हा सगळा आता बहुदा इतिहास झाला असावा. जमाना बदल गया है ! कलंक हाच अलंकार म्हणून मिरवायचे बाळकडू पाजले जात आहे. बदनाम हुए तो क्या ? नाम तो हुआ ! ही जन-रीत बनत आहे. कपडे धुवायची पावडर विकणार्या एका बहुराष्ट्रीय कंपनीने हा बदल नेमका हेरलेला आहे व “डाग अच्छे है” या नावाची जाहिरात मोहिम राबविली आहे. सदर कंपनी डबघाईला नक्कीच आलेली नव्हती. तसेही लोक दिवसभराच्या वापराने मळलेले कपडे या कंपनीचा साबण वापरून धूतच होते. पण कंपनीच्या विक्री विभागाला बाजारातला आपला हिस्सा वाढवायचा होता व त्यासाठी जरा हटके व आक्रमक अशा जाहिरात मोहिमेचा वापर करायचे ठरले. यातूनच मग ही मोहिम जन्माला आली. सुरवातीला या प्रकारच्या जाहिरातबाजीला विरोध झाला. ग्राहक पंचायत थेट जाहिरात नियामक प्राधिकरणाकडे गेली. डाग हे डागच असतात व ते वाईटच असतात अशी बाजू पंचायतीने मांडली व ही आक्रमक मोहिम कंपनीने काही काळ का होईना , थांबविली होती. आता मात्र, वाक्यरचनेत किरकोळ बदल करून ही मोहिम अधिक आक्रमकपणे राबविली जात आहे.

 “दाग अच्छे है” ही कंपनीची कॅच-लाइन आहे. अहो मग एवढे अच्छे आहेत तर ते धुवायचे तरी कशाला ? ठेवा की तसेच ! एखादी सैनिक जसा युद्धात छातीवर झेललेल्या शत्रूच्या गोळीची जखम अभिमानाने दाखवितो तसे ही डाग सुद्धा दाखवा की ! अर्थात कंपनीला फक्त आपला माल आक्रमकतेने खपवायचा आहे व नकळत का होईना आपण समाजात व त्यातही लहान मुलांसमोर कसले आदर्श ठेवतो आहोत याच्याशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही ! आतापर्यंत प्रसारित जाहिरातीत कधी शेतातले धान्य फस्त करणार्या पक्षांना पळविण्यासाठी मुलगा कपडे घाण करून बागुलबुवा बनतो, कधी शेजारच्या आजीचा कुत्रा हरवतो म्हणून मुलगा कपडे (कपडेच काय सगळे घरच ! ) घाण करून तो कुत्रा सुद्धा करत नसेल एवढे वेडे-वाकडे चाळे करतो. सध्या प्रसारित होत असलेल्या जाहिरातीत चिखलात ढकललेला मुलगा चिखलात लोळून सगळ्या अंगालाच चिखल लावून घेतो ! एवढ्या फडतूस कल्पना कोणत्या बरे सडक्या डोक्यात शिजत असतील ? असे काही जर आपल्या मुलाने केले तर आपण सरळ त्याच्या मुस्कटात भडकावू ! मग जाहिरातीतले हे वेडे-बिद्रे चाळे आपण का सहन करायचे ? मूळात कपड्यांना डाग लागू नये म्हणून काळजी घ्यायची असते, चुकून जर डाग लागलाच तर तो पसरू नये याची काळजी घेतली जाते व तो लवकरात लवकर कसे मिटेल याचे प्रयत्न केले जातात. इथे मात्र चिखलात पडल्यावर सगळे अंगच चिखलाने बरबटून घ्यायचा प्रकार दाखविला जातो, इतर मुले सुद्धा मग त्याचे अनुकरण करतात व चिखलात उड्या टाकतात ! हा प्रकार बघून डुकरेसुद्धा लाजत असतील ! खाजवून खरूज काढायचाच हा प्रकार झाला ! तुमची धुलाईची पावडर खपावी म्हणून काहीतरी भुक्कड प्रसंग घुसडून तुम्ही सांगणार की “दाग अच्छे है” तर हे बिलकूल खपवून घेतले जाणार नाही. याच कंपनीचे कर्मचारी उद्या असले डाग लागलेले कपडे घालून कामावर आले तर त्यांना गेटवर तरी घेतले जाइल का ?

 ही तद्दन भूक्कड , अर्थशून्य, चुकीचा संदेश देणारी जाहिरात जोपर्यंत कंपनी मागे घेत नाही तो पर्यंत संबंधित कंपनीच्या सर्वच उत्पादनांवर ग्राहकांनी कडकडीत बहिष्कार टाकावा असे माझे सर्व वाचकांना नम्र आवाहन आहे. “दाग अच्छे है” असे म्हणणार्या कंपनीला ताळे-बंदात लाल डाग उमटले तर चालेल का ? मग म्हणाल का “दाग अच्छे है ” ?

सोमवार, २३ जुलै, २०१२

पाऊस, पापड व पाडगावकर !

फार फार वर्षापुर्वी लिज्जत कंपनीच्या लक्षात आले की पावसाळ्यात पापडांची विक्री जवळ-जवळ होतच नाही. कंपनीचा आर्थिक डोलारा कोलमडू नये म्हणून एक तज्ज्ञ समिती नेमण्यात आली. या कमिटीने बरेच पापड फस्त केल्यावर उपाय सूचविला तो म्हणजे कविता पाडायचा ! लोक कविता वाचता-वाचता पापड खातील , त्यांना आपण अशी सवयच लावायची ! लिज्जतने तो अहवाल स्वीकारला व कविता पाडण्याचे कंत्राट कोणाला द्यायचे यासाठी एक उच्च स्तरीय समिती नेमली. अनेक पावसाळॆ कोरडे गेल्यावर एकदाचे या समितीने एक नाव नक्की केले ते म्हणजे पाडगावकर !

 लिज्जतने मग पाडगावकरांबरोबर करारच करून टाकला की पाडगावकरांनी पाउस पडताच एक कविता पाडायची, पावसाचे आगमन झाले रे झाले की लिज्जतने आपल्या पापडाच्या जाहिरातीत ती कविता वापरायची, अगदी दरवर्षी ! पहिल्याच वर्षी ही कल्पना चांगलीच चालली ! जाहिरात प्रसिद्ध झाल्या झाल्याच कंपनीचे सगळॆ पापड हातोहात खपले ! पाऊस, पापड व पाडगावकर हे समीकरण अगदी फिट्ट बसले. पुढच्या वर्षी तर पावसाने अटच घातली की आधी पाडगावरांना कविता पाडू दे मगच मी पडतो ! मग पुढची काही वर्षे आधी पाडगावकर पावसाला कवितेतून “ये रे ये पावसा “ म्हणायचे व पाऊस लगेचच धावून यायचा ! लोकसुद्धा याला सरावले. म्हणजे आधी जून महिना लागला की छत्री, रेनकोट यांची खरेदी सुरू व्हायची, आता लोक पाडगावकरांनी पावसाला साद घातली की मगच या खरेदीसाठी घराबाहेर पडू लागले. खरे-खोटे पाडगावकर जाणोत पण या वस्तू विकणारे उत्पादक सुद्धा पाडगावकरांवर वॉच ठेवून स्टॉक बाजारात आणू लागत असे म्हटले जात असे. पाडगावकरांच्या पाऊस कवितेची लोकांना एवढी सवय झाली की लोक “आधी पडते पाडगावकरांची कविता, मग पडतो पाऊस” असे म्हणू लागले. ज्या भागात दुष्काळ पडतो त्या भागात सरकारच आपल्या खर्चाने पाडगावकरांच्या पाऊस कविता छापू लागली व मग तिकडे धो धो पाऊस कोसळू लागला. पुढे मग भारतातील 13 प्रमुख भाषांत पाडगावकरांच्या पाऊस कवितांचे अनुवाद केले गेले व भारत “सुजलाम सुफलाम झाला” !

 पुढे मात्र पाडगावरांचे मन या सगळ्या प्रकाराला वीटले. अति झाले आणि हसू आले म्हणतात तसे झाले. पाडगावकर कविता खरेच पाडू लागले, एका पापडाच्या लाटीतुन जसे 10 पापड बनतात तसे पाडगावकर एकाच कवितेच्या दहा कविता बनवून देवू लागले. कधी तर आधी कधी छापलेल्याच कविता नव्या म्हणून खपवू लागले. लोकांना त्या कविता रटाळ वाटू लागल्या. आधी पाऊस सुद्धा पाडगावकरांच्या स्वत:वरच्या कविता वाचायला अगदी उत्सूक असायचा पण त्याच त्याच पापडासारख्या एक सारख्या कविता वाचून तो सुद्धा बिथरला. लिज्जतची जाहिरात छापून आली की पाऊस रडायचा म्हणजे अगदी बदाबदा कोसळायचा. पण त्याने योग्य संदेश जात नाही असे कळल्यावर तो तोंड असे काळे करायचा की लोकांच्या तोंडचे पाणीच पळायचे व डोळ्यात पाणी यायचे ! मग सरकारी आदेशाने लिज्जतवाले पाऊस पुरेसा पडून झाला की मगच ती जाहिरात काढायचे ! सरकार सुद्धा लगोलग “मान्सून” संपल्याचे जाहिर करायचे ! ज्या भागात अतिवृष्टी होत असेल त्या भागात सरकार आपल्या खर्चाने पाडगावकरांची पाऊस कविता छापायचे व पाऊस धूम ठोकायचा. 

पाडगावकरांची कविता असलेली जाहिरात आधी वर्तमानपत्रे पहिल्या पानावर छापत पण कवितांचा दर्जा घसरल्याने जाहिरात छापून येते त्या दिवशीच पहिले पान बघून वितरक गठ्ठ्याला हातच लावत नाहीत म्ह्टल्यावर ती आतल्या पानात छापली जावू लागली. खरी गोची झाली लिज्जतची. पाडगावकर पडले पक्के व्यवहारी. त्यांनी प्रदीर्घ कराराचे सगळेच पैसे आगावू घेतलेले होते म्हणून पावूस पडला काय नाय पडला काय, पापड खपले काय नाय खपले काय , जाहिरात पहिल्या पानावर छापली काय की आतल्या पानावर, त्यांना कसलेच सोयर-सुतक नव्हते ! लिज्जतने परत एक समिती नेमली व यातून “वे आऊट” शोधायचे ठरले. पावसाळ्यात पापड खपत नाहीत याचे सोपे कारण होते ते ओले राहतात म्हणून, सुर्यप्रकाश नसल्याने पापड पुर्ण सुकत नाहीत, ते तसेच पॅक केले जातात म्हणून ते खराब होतात व लोक ते घेत नाहीत ! पण या पश्चात बुद्धीचा काय उपयोग ? मग समितीला एक नामी उपाय सूचला. सरकारकडेच “बेल आउट” पॅकेज मागायचे ! कंपनी तोट्यात चालली आहे तेव्हा अनुदान द्या नाहीतर पापड कविता छापून पावसावर पडदा पाडतो ! सरकारने पण समिती नेमली व त्या समितीने दुष्काळ नको असेल तर लिज्जतला बेल-आउट करणे भागच आहे अशी शिफारस केली व सर्व करातुन सूट, कोणतेही बिल पुढची दहा वर्षे भरायचे नाही असे व अजून बरेच काही डील झाले. 

 आधी ताकाने तोंड पोळलेला पाऊस आता अनुभवातुन शहाणा झालेला आहे. जुन महिन्यात जाहिरात नाही आली याची खात्री करून मगच तो पडतो, तो सुद्धा तूरळक, मग आठवडाभर थांबतो, जाहिरात नाही ना आली परत याची खात्री करतो व असाच बेता-बेताने पडून आपला मुक्काम लांबवतो कारण तो गेला असे वाटून परत जाहिरात छापून आली तर काय घ्या ?

रविवार, २२ जुलै, २०१२

पुन्हा एकदा “भज गोविंदम” !

साधारण वर्षभरापुर्वी मी आद्यशंकराचार्यांच्या “भज गोविंदम” या स्तोत्राचा मराठी अनुवाद पोस्ट केला होता. सोबत एका प्रसिद्ध दाक्षिणात्य (नाव आता आठवत नाही) गायिकेच्या आवाजातील एम.पी.3 चा दुवा सुद्धा दिला होता. ही पोस्ट प्रसिद्ध झाल्यावर साधक या नावाने एक प्रतिक्रीया आली होती व त्यात एम.पी.3 तला आवाज “Childish” आहे असे म्हटले होते ! हे स्तोत्र पंडीत जसराज यांच्या आवाजात ऐका असे सूचवले होते व त्या गाण्याची लिंक सुद्धा दिली होती. पंडीत जसराजांच्या आवाजातले ते स्तोत्र ऐकता येत होते पण उतरवता येत नव्हते. मी अनेक खटपटी-लटपटी करून ते उतरवण्यात एकदाचा यशस्वी झालो व ते माझ्या मोबाइलवर सुद्धा उतरवून घेतले. पहिल्यांदा लोकल प्रवासात ते गाणे ऐकायला घेतले तेव्हा त्याची सुरवात अगदी संथ वाटली व ते बंदच करून दूसरे गाणे ऐकायला घेतले. मग पुन्हा कधी ते गाणे ऐकण्याच्या फंदात पडलो नाही.

 काहि दिवसापुर्वी लोकल प्रवासात शफल करून गाणी ऐकत असताना गाणे वाजू लागले व काय ब्याद आहे असे म्हणत ते गाणे स्किप करायच्या ऐवजी फॉरवर्ड झाले व एक दणदणीत आवाजातली तान ऐकू आली. मी त्या आवाजाने थरारलोच ! हे काही तरी वेगळे आहे असे समजले व जसराजांच्या आवाजातले “भज गोविंदम” पहिल्यापासून ऐकायला घेतले.
हे ध्वनी-मुद्रण निश्चितपणे एका भव्य मैफिलीतले असणार. आधी संथ लयीत व हळूवार आवाजात “भज गोविंदम” ची सुरवात होते. सुरवातीचा श्लोक असाच म्हटलेला आहे. पंडीतजी व त्यांच्या साथीदारांनी ( चेल्यांनी ?) या दरम्यान आपला आवाज व वाद्ये लावून घेतली असावीत ! मग मात्र आवाजाची पट्टी वाढू लागते, साथीला एकेका वाद्यांची सुद्धा भर पडते. दमदार ताना, आरोह-अवरोह, पलटे, आवाजातले चढ-उतार यातून गायन रंगत जाते, खुमासदार होते, अगदी कान तृप्त होतात ! नादब्रह्म म्हणजे काय याचा साक्षात्कार होतो ! भज गोविंदम हे स्तोत्र आहे पण ते एका आगळ्याच ढंगात म्हटले आहे व शेवट तर चक्क भजनात केला आहे ! तब्बल 24 मिनिटे देहभान विसरून आपण ऐकत राहतो ! पंडीत जसराजांची गायकी ऐकताना आपण स्वरांच्या अभिषेकात डुंबतो, भक्तीरसात चिंब भिजतो, अगदी धन्य पावतो, भरून पावतो ! हे ऐकल्यावर अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते. या तंद्रीतुन आपण बराच काळ बाहेर येवूच शकत नाही. अजून काही ऐकूच नये असे वाटावे असे कान तृप्त झालेले असतात ! अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव आहे ! अर्थात हे सगळे वाचायचे नाही तर अनुभवायचे असे आहे. हा घ्या दुवा व दुवा द्या सुद्धा ! http://ge.tt/5WJHOrK/v/1
अगदी असाच अनुभव पंडीत जसराज यांनी गायलेले “भज नंदन” ऐकताना सुद्धा येतो. त्याचा दुवा खाली दिलेला आहे. हे ध्वनिमुद्रणसुद्धा त्याच मैफिलितले असावे. कालावधी 26 मिनिटांचे आहे. हे सगळे ज्यांनी लाइव कन्सर्ट मध्ये ऐकले असेल ते किती नशीबवान असतील नाही ? http://www.ge.tt/5WJHOrK/v/0?c

बुधवार, ११ जुलै, २०१२

प्रतिभाताईंमुळे मराठी माणसाची मान शरमेने खाली गेली आहे !

अब्दूल कलामांनी राष्ट्रपति पदाची शान पाच वर्षात एवढी उंचावर नेवून ठेवली होती की पुढच्या 50 राष्ट्रपतींनी नुसते बसून दिवस काढले तरी चालेल असे मला बापड्याला वाटायचे. महाराष्ट्राची सुकन्या असलेल्या प्रतिभाताईंनी मात्र पाच वर्षे पुरी व्हायच्या आत त्या पदाचे पोतेरे केले आहे ! गांधीघराण्याप्रति अखंड निष्ठा या एकमेव निकषाने त्यांना एवढा मोठा बहुमान मिळवून दिला होता. त्यात गुजरातमध्ये राज्यपाल म्हणून असताना मोदी सरकारचे धर्मातरबंदी विधेयक व टाडा सारखा कठोर कायदा आणू पहाणारे विधेयक त्यांनी परत पाठविले . या असामान्य कर्तबगारीची दखल दिल्लीश्वर घेतल्याशिवाय कसे राहतील ? पवारांनी आपले राजकारण साधले व शेखावत वि शेखावत अशी झुंज लावून दिली. प्रतिभा पाटलांच्या प्रतिभा शेखावत झाल्या आहेत हे मात्र मराठी माणसाला या निमित्ताने तरी समजले हे ही नसे थोडके ! या संधीचे सोने करण्याचा वकुब नव्हता तर निदान त्याची माती तरी करायची नव्हती, पण महाराष्ट्राचेच दुर्दैव , दूसरे काय ! जन्माने मराठी असलेल्या महिला राष्ट्रपतिने मराठी माणसाला कायमचा कमीपणा आणला आहे ! गोडसेने महात्म्याचा खून केला तर ताईंनी आपल्या विशेष अधिकारात बलात्कार करून खुन करणार्यांची फाशी रद्द केली ! एक दोन नव्हे, त्यांच्या पुढे प्रलंबित असलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे तब्बल 35 प्रकरणात ताईंनी अट्टल गुन्हेगारांना “दे दान सूटे गिर्हान” या धर्तीवर फाशीतुन सूट दिली आहे. वर ताईंचे म्हणणे आहे की मी एकाही दहशतवाद्याची फाशी कमी केलेली नाही ! अहो पण मग अफझलच्या व राजीव गांधीच्या मारेकर्यांच्या फाइल का नाही क्लियर केल्या ? त्यांच्या जरी गळ्याभोवती फास आवळायची हिंमत दाखविली असतीत तर निदान महाराष्ट्राला थोडी तरी मान उंचावता आली असती ! अजून एक क्रूर विनोद म्हणजे तुमच्या कार्यालयाने 5 वर्षीपुर्वी जेलमध्येच मरण पावलेल्या एका कैद्याची फाइल तुमच्यासमोर ठेवली व तुम्ही दयाळूपणे त्याची फाशी सुद्धा माफ केली आहे. तुमच्या या राजहट्टापायी सरकारला आता नरकात याचना अर्ज करून त्या कैद्याला परत जिवंत करून आणायला लागणार आहे !

भारतात फाशी अगदी विरळात-विरळा अशा प्रकरणातच दिली जाते. बलात्कार्याला फाशी हवी असे जमनत असताना , असे केल्यास बलात्कार करून पुरावा नष्ट करण्यासाठी पीडीतांचे खून सुद्धा होतील असे सांगून सरकार बलात्कारी नराधमाला फाशी द्यावी अशी सुधारणा करीत नाही. भारतातली कमालीची सडलेली पोलिस यंत्रणा, गुन्हा उभे करण्यासाठी लागणारे काटेकोर पुरावे, ते गोळा करण्यातली सर्वच संबंधितांची उदासीनता, कारणे कोणतेही असोत – भारतात गुन्ह्याचे प्रमाण प्रचंड आहे व त्या तुलनेत तक्रार दाखल होणे / करून घेणे, आरोपी सापडणे, पुरावे मिळणे, कोर्टात केस उभी राहणे व आरोपीला शिक्षा होणे याचे प्रमाण नगण्य आहे. बरे खालच्या न्यायालयात शिक्षा झाली तरी हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात अपील केल्यास शिक्षा कमी वा रद्द होण्याचीच शक्यता जास्त. असे असताना, “विरळात विरळा” असा निकष लागून अगदी सुप्रीम कोर्ट जेव्हा एखाद्याची फाशी कायम करते तेव्हा त्याची विना-विलंब अंमलबजावणी झालीच पाहिजे, यात पुन्हा राष्ट्रपतीला दया याचना करायचा प्रश्न येतोच कोठे ? बरे असा खास अधिकार लोकशाहीतली सर्वोच व्यक्ती म्हणून दिला तर त्या व्यक्तीने तो अधिकार अगदी काटेकोरपणे वापरला पाहिजे. ताई म्हणतात की सरकारचे सर्व विभाग दया अर्जावर टीपणी देतात व मला त्या बाहेर जाता येत नाही ! म्हणजे हे पद रबर स्टॅम्प आहे असेच तुम्हाला ताई म्हणायचे आहे का ? शेंबडे पोर सुद्धा सांगेल की हा बचाव तकलादू आहे ते ! फाइलवर ऊलट-सूलट मते असली तरी अंतिम अधिकार उच्चाधिकार्याचाच असतो व त्याची जबाबदारी पण त्या व्यक्तीनेच स्वीकारायची असते. हाताखालच्या लोकांवर त्याचे खापर फोडणे म्हणजे पळपुटेपणा तरी आहे नाहीतर आपल्यात निर्णय क्षमता नाही याची कबुली देणे आहे ! कलामांनी दोन अर्ज निकाली काढले , त्यात एकाला माफी दिली तो बलात्कारी नक्कीच नव्हता व त्याचे वय झाले होते 80. एकाचा, कोलकात्याचा धनंजय (?) बॅनर्जी, याचा अर्ज मात्र त्यांनी फेटाळला होता. त्याने कोवळ्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. या बॅनर्जीच्या नातलगांनी मग फारच थयथयाट केला होता, फाशी दिल्यास भर चौकात स्वत:ला म्हणे जाळून घेणार होते. पण बंगालमधले तेव्हाचे कम्युनिस्ट सरकार खंबीर राहले व कडक बंदोबस्तात नराधम बॅनर्जीच्या गळ्याभोवती फास आवळला गेलाच !

स्वत: एक महिला असलेली राष्ट्रपति, तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करणार्या नराधमाला दया दाखवितेच कशी ? अशी कोणती स्थिती होती की या नराधमाला जिवंत ठेवावे असे ताईंना वाटले ? हा निर्णय घेण्यापुर्वी ज्यांची हत्या झाली त्यांच्या नातलगांचे मत विचारात घेतले गेले का ? 35 दया अर्जापैकी 2 नवे होते तर बाकी 33 आधीच्या राष्ट्रपतींच्या काळापासून पेंडींग होते. साडेचार वर्षात ज्या फाइल पडून होत्या त्यावर निवृत्तिला काही महिनेच राहिले असताना होससेल पद्धतीने निर्णय घेण्याएवढी कोणती परीस्थिती निर्माण झाली होती ? सगळेच अनाकलनीय ! अफझल गुरू व मुरूगनच्या डेथ वॉरंटवर सही करायची धमक नाही की अजून एखादा देश फिरायला वेळ कमी पडतो आहे ? शिवसेनेने याच साठी या ताईंना पाठींबा दिला होता का ? सेना याचा जाब ताईंना का बरे विचारीत नाही ? उठसूठ सचिनला शिव्या घालणारे सेनाप्रमुख आता ताईंच्या या सार्वत्रिक माफीवर गप्प का ? तशी मराठी वृत्तपत्र सृष्टीने ही सार्वत्रिक माफीची बातमी साइडलानलाच टाकली, आता कोठे जनतेच्या तीव्र प्रतिक्रीया “वाचकांची मते” मध्ये अगदी सौम्य करून छापल्या जात आहेत. कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही हे आता या पेपरवाल्यांनाच सांगायची वेळ आली आहे. ताई , मराठी माणसे तुमच्या मुलाची आमदारकी विसरतील, नवर्याने मिरवलेला पदचा बडेजाव विसरतील, तुमच्यावर तुमच्या आप्त-स्वकियांवर सहकार क्षेत्रात झालेले गैरव्यवहाराचे आरोप विसरतील, (अर्थात या आधीच्या एकाही राष्ट्रपतीकडे बोटही दाखवायची कोणाची हिंमत झाली नव्हती, असो ! ) जगातल्या प्रत्येक देशाला भेट देवून जनतेच्या पैशाची केलेली उधळपट्टी विसरतील पण बलात्कारी खुन्याला दिलेली माफी कसे विसरतील ? कोणत्या तोंडाने सांगतिल की बलात्कारी खुन्याला माफी देणारी व देशद्रोह्यांबाबत निर्णय घेण्याची धमक न दाखविणारी व्यक्ती मराठी राष्ट्रपति होती ? पहिली मराठी राष्ट्रपति म्हणून मराठी माणसाने तुम्हाला मान दिला त्याच मराठी माणसाची मान तुमच्यामुळे शरमेने खाली गेली हे नक्की !

रविवार, ८ जुलै, २०१२

ना पैसा मिला ना कार्ड, भरो 200 रुपया चार्ज !

“एटीएम नव्हे चक्रव्यूह “ हा किस्सा तब्बल आठ वर्षापुर्वीचा तर हा प्रसंग अगदी फडफडता, 4 जुलै, माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच घडलेला.

 पैसे खाणारी माणसे असतात तशी काही मशीन सुद्धा पैसे खातात. माणसाचा गुण नाही पण वाण लागणारच ना ! रेल्वे स्थानकावर वजन छापून देणारी मशीन रूपया दोन रूपये गिळंकृत करतात, कार्ड वापरून पैसे काढताना पैसे प्रत्यक्षात हातात पडतच नाहीत पण बॅलन्स मात्र कमी होतो व हे सगळे निस्तरायला आपले रक्त आटवावे लागते याचा अनुभव सुद्धा अनेकांनी घेतलेला असेल. त्या दिवशी माझे कार्ड मात्र कोटक बँकेच्या मशीनने चक्क गिळून टाकले ! वाढदिवसाची मित्रांना पार्टी द्यायची म्हणून कार्यालयाकडून अगदी जवळ, कोपर्यावरच असलेल्या कोटकच्या एटीएम केंद्रात शिरलो. एटीएम खाचेत योग्य दिशेने आता ढकलताच ते पुर्ण आत गेले व लगेच बाहेर सुद्धा आले. हा प्रकार मला नवा होता. जुन्या मशीनमध्ये कार्ड खाचेत पुर्ण आत जाते व व्यवहार संपला की ते आपसूकच बाहेर येते. नव्या यंत्रात ते हातात ठेवूनच स्वाइप करायचे असते. इकडे मात्र पिन नंबर न विचारताच कार्ड बाहेर कसे आले म्हणून मी चक्रावलो. स्क्रीनवर काही सूचना पण नव्हती. नेटवर्क खराब असेल म्हणून मी ते कार्ड परत आत ढकलले तर परत ते बाहेर आले ! सकाळची वेळ असल्याने विचारायला कोणी रांगेत उभे नव्हते , सुरक्षा रक्षक आपली टोपी ठेवून गुल झाला होता व आत मदतीसाठी फोन सुद्धा दिसत नव्हता. मी कार्ड योग्य बाजूने ढकलत आहोत याची खात्री करून कार्ड परत आत ढकलले. आता मात्र ते कार्ड परत बाहेर आले नाही ! मी आता स्क्रीनवर पिन टाकण्याचा संदेश येण्याची वाट बघू लागलो पण तसे काहीच झाले नाही. आधीसारखे कार्डही बाहेर आले नाही ! मी मशीनवरच्या सगळ्या की दाबून बघितल्या पण काहीही उपयोग झाला नाही. मशीन निगरगट्टासारखे वागत होते. मग मी जरा डोळसपणे मशीनवरच्या सूचना वाचल्या व मग कळले की कार्ड बाहेर आले की आपल्या ताब्यात घ्यायचे आहे व पुढेचे सोपस्कार ! मी दूसर्या बँकेचे कार्ड वापरून व्यवहार पुरा केला. पण आत अडकून पडलेल्या कार्डाचे काय ?

  एटीएम केंद्राला लागूनच कोटक बँकेची शाखासुद्धा होती. आत जावून सगळा प्रकार सांगितला व कार्ड परत मिळण्यासाठी काय करावे लागेल याची विचारणा केली. आधी त्या कर्मचार्याने माझ्याकडे एक बापुडवाणा कटाक्ष टाकला व आता विसरा ते कार्ड असे पुटपुटला. माझा कानावर विश्वासच बसला नाही. अहो , असे कसे म्हणता ? एरवी अशी कार्ड ज्या बँकेची असतात त्या बँकेला परत करायची असतात व ज्याने त्याने आपल्या बँकेतुन ती घ्यायची असतात. मी त्याला परत परत उलट-सूलट प्रश्न विचारून हैराण केल्यावर त्याने सांगितले की या मशीनमध्ये तशी सोयच नाही. दोन संधी दिल्यावर मशीन तुमचे कार्ड सरळ पोटात घेवून नष्ट करते ! त्याचे अगदी तुकडे करते ! आम्ही काहीही करू शकत नाही. तुमच्या बँकेला कळवून तुम्हाला आता नवे कार्ड घ्यावे लागेल !

  एवढा कसा मी हा असे वाटून मला स्वत:ची लाज वाटत होतीच पण ते कार्ड मी गेली 15 वर्षे वापरत होतो म्हणून थोडा सेन्टी सुद्धा झालो, वाढदिवसाच्या दिवशीच असे घडावे याची खंत बोचत होतीच ! ते शुद्ध एटीएम कार्ड होते. आता बँकांनी एटीएम-कम-डेबिट कार्ड आणली आहेत व निखळ एटीएम कार्ड देणे बंदच केले आहे ! फक्त एटीएम कार्ड असल्याने त्यासाठी कोणतेही शूल्क नव्हते, डेबिट कार्ड गळ्यात मारून बँका खातेदाराकडून वर्षाला निदान 100 रूपये उकळतात. माझी आयसीआयसीआय बँक गेली अनेक वर्षे तुम्ही डेबिट कार्ड घ्या असे आधी विनवीत होती व मग धमकावित होती पण मी भीक घातली नव्हती. आरबीआय कडे तक्रार करीन व खाते सुद्धा बंद करीन असा दम देवून मी बँकेला दाद देत नव्हतो. आता मात्र माझ्याच चुकीने मी ते कार्ड घालवून बसलो होतो.

  कामावर पोचल्यावर सगळी कामे हातावेगळी करून मी नवीन कार्डसाठी ऑनलाइन विनंती करायला खाते उघडून बसलो. “डुप्लिकेट कार्ड” या सरदाखाली कार्ड हरविणे वा फाटणे असे दोनच पर्याय होते. माझे कार्ड तर गिळले गेले होते ! जखमेवर मीठ चोळण्यासाठीच त्यात म्हटले होते की डुप्लिकेट कार्डासाठी 200 रूपये प्रक्रीया शूल्क आकारले जाइल ! शेवटी मी हेल्पलाइनला फोन केला. पण मदत मिळण्यासाठी मला एटीएम नंबर द्यावा लागणार होता व तो माझ्याकडे वेगळा लिहिलेला नव्हता, पाठ तर नव्हताच नव्हता, अगदी त्यातला एक आकडा सुद्धा मला आठवत नव्हता ! शेवटी घरी फोन करून तो नंबर मिळविला. मग ग्राहक सेवा अधिकार्याशी बोलून सगळा प्रकार सांगितला व दूसरे कार्ड देण्याची विनंती केली.

  काही क्षण शांततेत गेल्यावर त्याने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्या प्रीत्यर्थ एरवी पडणारे 200 रूपये प्रक्रीया शूल्क माफ केले. अर्थात याचे मला अप्रूप वाटले नाही, त्या साल्याला नक्कीच आसूरी आनंद झाला असणार ! गेली पाच वर्षे बँकेला दाद न देणारा नाठाळ ग्राहक आपल्याच कर्माने गोत्यात आला होता. सुंठीवाचून खोकला गेला होता. आता डेबिट कार्ड त्याच्या माथी मारून वर्षाला 100 रूपयाचा मीटर चालू झाला होता. प्युअर एटीएम गमावून बसलेला बँकेचा मी शेवटचा ग्राहक तर नसेन ?

  “ ना खाया ना पिया ग्लास फोडा बारा आना” तसे “ना पैसा मिला ना कार्ड, भरो 200 रुपया चार्ज !

एटीएम नव्हे चक्रव्यूह !

आठ वर्षापुर्वी आम्ही तीन कुटुंबे केरळला गेलो होतो. हा धम्माल प्रसंग तेव्हाचा आहे. सहल सगळी व्यवस्थित पार पडली होती व दूसर्याच दिवशी आम्हाला तिरूअनंरपुरमवरून मुंबई गाठायची होती. माझ्या एका मित्राला थोडे पैसे कमी पडतील अशी भीती वाटली व तिकडेच एटीएम मधून पैसे काढायचे त्याने ठरविले. 8 वर्षापुर्वी आजच्यासारखी गल्लोगल्ली एटीएम नव्हतीच, त्यात ते तिरूअनंतपुरम ! रात्री 11 वाजता आम्ही दोघे एटीएम शोधायला बाहेर पडलो. थोडे चालल्यावरच आयसीआयसीआयचे एटीएम दिसले. माझ्याकडे त्या बॅंकेचे एटीएम होते. मी त्याला म्हणालो की स्टेट बँकेचे एटीएम उगाच शोधत बसण्यापेक्षा मी पैसे काढतो , गरज पडली तर वापर तू ते. त्याला तो तयार झाला व मी पैसे काढून घेतले.

  परतताना आम्ही उगाच इकडे-तिकडे भटकत असताना आम्हाला स्टेट बँकेचे एटीएम सुद्धा दिसले ! थोडे आतल्या वाटेवर होते पण तिकडे रांगच नव्हती. मित्राला अनायसे मशीन सापडले आहेच तर आपण सुद्धा कॅश काढून ठेवावी असे साहजिकपणे वाटले. पण एटीएमच्या आत शिरायचे कसे ? स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रात कोणी सुरक्षा रक्षक दिसला नाही. एकदम मला आठवले की दाराला असलेल्या खाचेत कार्ड सारल्यास दरवाजा उघडतो ! तसे करून दोघेही त्या केंद्रात शिरलो, मित्राने रोख काढून घेतली. परत बाहेर पडताना मात्र दार उघडत नव्हते ! आम्ही दोघांनी ताकद लावून सुद्धा दार जराही हलले नाही. आत येताना जसे खाचेत कार्ड सरकवावे लागले तसे बाहेर जाताना असावे म्हणून तसाही तपास करून बघितला पण अशी खाच कोठेही आतून दिसली नाही. चक्रव्यूहात अडकल्यासारखे झाले ! आपण काही तांत्रिक बिघाडाने केंद्रातच अडकून पडलो असेच आधी आम्हाला वाटले. त्या एसी केंद्रात सुद्धा आम्हाला दरदरून घाम फुटला. कोणाची मदत मागावी तर आसपास कोणी दिसतच नव्हते. आत हेल्पलाइन होती पण ती कशी वापरायची याच्या सूचना स्थानिक भाषेत दिलेल्या होत्या. आम्हा दोघांचे मोबाइल सुद्धा सिग्नल दाखवत नव्हते. केंद्र सगळे बंदिस्त असल्याने आमचा आवाज बाहेर जात असेल का ही शंकाच होती. केंद्रात दोघांना बघून आम्ही कोणी चोर असू असे वाटण्याची भीती होती. बर्याच वेळाने तिकडे कोणीतरी पैसे काढायला आला. आमची बाहेर पडायची खटपट बघून त्याने तिकडून पोबारा केला व काही वेळाने अजून काही स्थानिक लोक त्याने जमविले. बाहेरचा जो तो आमच्याकडे वेगवेगळ्या अर्थाने बघत होता. कोणाला आमची दया येत होती, कोणाला आम्ही चोरटे वाटत होतो, कोणाला अडाणी ! बाहेरचे पब्लिक आधी त्यांच्या भाषेत व मग खाणा-खुणा करून आमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करीत होते पण आम्हाला त्यात सूटकेचा काही मार्ग दिसत नव्हता उलट कोणीतरी आता पोलिसांनाच पाचारण करेल अशी भीती वाटत होती.

  अचानक आशेचा किरण दिसावा तसा एक तरूण बाहेरच्या बाजूला आला. त्याने कागदी चिटोर्यावर “What went wrong” असे खरडून आम्हाला दाखविले. मी लगेच मशीनजवळ पडलेल्या अनेक स्लिपपैकी एक स्लिप उचलली व त्या स्लिपवर पेनाने खरडले “How to come out ?” व त्याला दाखविले. त्याने आधी कपाळावर हात मारला व मोठ्याने हसत त्याने खरडले “Press the bell and push the door”. म्हणजे आम्ही आधीही ती बेल दाबत होतोच पण ती आपतकालिन मदतीसाठी असेल अशा समजुतीने. ती दाबून ठेवून दार ढकलायचे काही आमच्याकडून झाले नव्हते ! हुश्श ! एकदाची झाली सूटका ! आता तो तरूण स्थानिक भाषेत काय घोळ झाला ते बाहेर जमलेल्या सगळ्यांना घोळवून घोळवून सांगत होता व बाहेरचे आमच्या मुर्खपणाला लोट-पोट होईपर्यंत हसत होते ! धरतीमाता पोटात घेइल तर बरे असेच तेव्हा आम्हाला वाटत होते !

  अजूनही स्टेट बँकेचे एटीएम दिसले की मला “ती” फजिती आठवून हसू येते व एवढे साधे कसे आपल्याला सूचले नाही याचे आश्चर्य वाटते !

शनिवार, २३ जून, २०१२

पळपुट्या दादा !

नेत्यांना नुसते नावाने ओळखले जाणे कमीपणाचे वाटत असावे. अंगात कर्तबगारी काही नसतेच तेव्हा निदान नावाला तरी काही उपाधी जोडणे त्यांना गरजेचे असते. कोणी साहेब, कोणी पंत, कोणी राव तर कोण दादा ! दादाचा मुळ अर्थ थोरला भाऊ पण त्याही पुढे जावून जबाबदारी घेणारा, सगळ्यांना सांभाळणारा, आधार वाटणारा. पण आजच्या काळात दादा हा शब्द गुंड या शब्दाला समानार्थी म्हणून वापरला जातो. राजकारण करणे म्हणजे गुंड असणे आता स्वाभाविक झाले आहे. त्यात सत्ता हाती असले तर काय बघायलाच नको !

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा दादा व्यक्तिमत्व आहे. त्यांचा दरारा सर्वदूर पसरलेला आहे. मंत्रलयाला आग लागली तेव्हा हे दादा तिकडेच होते. या दादाने सगळ्यात आधी मैदान गाठले ! त्यांना भेटायला आलेले त्यांचे दोन मित्र त्यांची वाट बघत तिकडेच थांबलेले आहेत याचे भान सुद्धा त्यांना राहिले नाही. दादा वाचले पण त्या दोघांचा मात्र कोळसा झाला ! त्या दोघांची दादांवरची निष्ठा तरी किती अढळ बघा, आपल्या शेवटच्या कॉलमध्ये सुद्धा त्यांना दादांच्या जीवाची काळजी होती ! पण दादा मात्र मैदान सोडून केव्हाच मैदानात आले आहेत हे त्यांना कळले असते तर ?

जहाज बुडते तेव्हा कप्नान सगळ्यात शेवटी जहाज सोडतो. तसे झाले नाही तर तो जहाजाबरोबरच जलसमाधि पत्करतो. पण इथे मात्र दादा असल्याचा दावा करणार्‍याने सगळ्यात आधी मंत्रालय सोडले ! आता तुम्हीच ठरवा याला दादा म्हणायचे का फद्या ते !

मंगळवार, १ मे, २०१२

दुष्काळ - पाण्याचा व अकलेचा !

पावसाळा काही आता नेमेचि येत नाही तसेच निरोपही वेळेवर घेत नाही पण दुष्काळ मात्र महाराष्ट्राच्या जणू पाचवीलाच पूजलेला आहे. मार्च महिना सुरू होताच दुष्काळाच्या बातम्या व फोटो पेपरात यायला लागतात. भेगा पडलेली जमीन, तळ गाठलेल्या विहीरी, कोरडे पडलेले तलाव, पाण्यासाठी कळशी घेवून मैलोन-मैल अंतर तुडविणार्या बायका ! गेली साठ वर्षे अगदी हेच चित्र आहे ! ज्या देशात बारमाही वाहणार्या नद्या आहेत, वर्षातले चार महिने जिकडे मेघ पाण्याचा वर्षाव करतात त्या देशात लोकांना धड पाणीही सरकार देवू शकत नाही. सुजलाम सुफलाम या ओळी राष्ट्रगीतातच उरल्या आहेत. नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे हा देशच वाळवंट होत चालला आहे.

 जनावर मेले की गिधाडे आपसूकच जमतात तशी द्ष्काळ पडला की नेते लगेच तिकडे धाव घेतात. दुष्काळी कामांच्या नावाखाली पैसा कसा जिरवता येइल हाच या दौर्यांचा खरा हेतू असतो. जाहिरातीवर डोळा ठेवून आपला आत्मा गहाण ठेवलेली वर्तमानपत्रे राहुल गांधींना युवराज म्हणतात. असे हे युवराज आपल्या लवाजम्याला घेवून दुष्काळाची पाहणी करायला महाराष्ट्राच्या दौर्यावर आले होते. मटामध्ये त्या दौर्याचा एक फोटो आला आहे. एक गरीब बाई छातीचा भाता फुटेस्तोवर हापसा उपसते आहे पण त्यातुन जेवढे थेंब पाणी येत आहे त्यापेक्षा जास्त पाणी तिच्या डोळ्यातुन येत आहे. हा फोटो बघितला आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली पण त्याच फोटोत युवराज व त्याचे हुजरे मख्खपणे उभे आहेत. ज्यांच्या अंगात पाणीच नाही ते महाराष्ट्राच्या जनतेची तहान कशी भागविणार ? पाण्याचा दुष्काळ बघायला अकलेचा दुष्काळ असलेल्या राहुलने यावे हाच एक मोठा विनोद आहे ! अर्थात या दौर्याने युवराजांच्या अब्रूची लक्तरे पुरती फेडली गेली ! एका तरूणाने युवराजाला सुनावले की ही नौटंकी बंद कर ! इथला दुष्काळ बघायला तुझी आई सुद्धा आली होती ! तरूणाच्या बापाला व आजाला नक्की आठवेल की बाप-लेकच काय गांधी घराण्याचे पणजोबा नेहरू, आजी इंदीरा व बाप राजीवसुद्धा इथे येवून गेले असतील ! कैक नेते आले व गेले दुष्काळ मात्र आहे तसाच आहे !

  लोकशाहीत सर्व लोकांना सर्व काळ फसविता येत नाही असे म्हणतात पण महाराष्ट्रात तरी त्याचा काही प्रत्यय येत नाही ! गांधी घराणे मराठी जनतेला गेली साठ वर्षे फसवित आहे व महाराष्ट्राची जनता दिल्लीश्वरांची रखेल म्हणून जगते आहे. मराठा नेतृत्व दिल्लीश्वरांनी फेकलेली शिळी भाकर चघळत व स्वाभिमान इटालियन मडमेच्या पदरात टाकून फक्त आपली सरदारकी सांभाळते आहे. गेली दहा वर्षे महाराष्ट्रात नुसता काळोख पसरला आहे. ना वीज, ना पाणी, ना चांगली आरोग्य सेवा, ना धड शिक्षण ना जगण्याची शाश्वती ! पण आघाडी सरकार मात्र सुखाने राज्य करते आहे ! विकासकामे करून सत्ता टीकवण्यापेक्षा “फोडा व राज्य करा” ही नीती वापरून राज्य करणे जास्त सोपे नाही का ? लोकांना पाणी मिळाले, वीज मिळाली तर ते सुखी होतील पण मग नेत्यांचे काय ? त्यांच्या उसाला बारमाही पाणी कसे मिळेल ? त्यांनी काढलेल्या वीज प्रकल्पाला स्वस्तात जमीन व भरमसाठ भाव कसा मिळेल ? त्यांच्या विना-अनुदान चाललेल्या शिक्षणाच्या दुकानदारीला कच्चा माला कसा मिळेल ? त्या पेक्षा यांना काळोखात ठेवलेले बरे , आपले धंदे त्यांना कळणारच नाहीत. काळोख असल्यावर गरीब माणून हात धरतोच व त्या हातावर घड्याळ असतेच ! बाजूच्या गुजरातकडे बघा ! मोदींनी विरोधकांना फाट्यावर मारून नर्मदा प्रकल्प पुरा केला व गुजरातची तहान भागविली आहे. आता तर नर्मदेच्या कालव्यावरच त्यांनी सौर प्रकल्प चालू केले आहेत. स्वच्छ वीज मिळेल पण त्याहून महत्वाचे म्हणजे पाण्याचे बाष्पीभवन होवून वाया जाणारे लक्षावधी लीटर पाणे वाचणार आहे ! आपल्याकडे मात्र पाणी अडवा व पाणी जिरवा ही घोषणा कागदावरच उरली आहे. दुष्काळ पडूदे , मग आधी टॅंकरने पाणी विकून पैका कमवू मग दुष्काळी कामे काढून पैसा आणू व जिरवू असा कारभार चालला आहे. दुष्काळ ही जणू सत्ताधार्यांसाठी सिंहस्थ पर्वणी झाली आहे व उन्हाने पोळलेल्या व तहानेने व्याकूळलेल्या महाराष्ट्राला नागवे करण्यातच नेते दंग आहेत. मोघलाईत ही स्थिती असतानाच शिवाजी जन्माला आला होता व त्याने “पाणी उदंड जाहले” अशी कामगिरी केली होती. आज याच शिवबाचे नाव घेणारे दिल्लीची हुजरेगिरी करून सत्ता ओरपत आहेत ! असेना का दुष्काळ मलबार हिल वर मात्र “पाणी उदंड झाले स्विमिंग पुल बांधायाला” अशी स्थिती आहे ! मुंबईत उडप्याकडे तुम्ही तोंडाला पाणी लावून ग्लास बाजुला ठेवताच तो उचलून नवीन भरलेले ग्लास ठेवले जात आहेत, मोटारी, रेल्वेचे डबे धुण्यासाठी हजारो लिटर पाणी रोज वाया चालले आहे. शहरी माणूस महापालिकेचे घरी नळाला येणारे शुद्ध पाणी महाग म्हणून बोंब मारतो. त्याचा भाव आहे हजार लिटरला दोन रूपये पण हाच माणूस एक लिटर बिसलेरीला 15 रूपये मोजतो आहे ! मुंबईसाठी जिकडून पाणी आणले जाते त्या गावातल्या लोकांना मात्र पाणी नाही ! मुंबईत मात्र पाइपलाइन फोडून पाणी विकणारे पाणी-माफिया फोफावले आहेत ! मुंबईला पुरविल्या गेलेल्या फक्त 30 % पाण्याचा हिशोब लागतो. बाकी 70 % पाणी झोपडपट्टीवाले हडप तरी करतात किंवा वाया तरी जाते ! अनेक घरातले नळ गळके असतात ते दुरूस्त करायची तसदी मालक घेत नाही, वाहत्या नळाखाली भांडी धुतली जातात, यंत्र वापरून कपडे धुणे सोपे जाते पण त्यासाठी तिप्पट पाणी वापरले जाते ! मोठ्या मोठ्या पिंपात साठवलेले पाणी सकाळी ताजे (?) पाणी आल्यावर चक्क ओतून दिल जाते ! हे सर्व राजरोस करणारे आपण सर्व “तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होणार” या वर मात्र सहमत असतो ! शाळेत आपली मुले पाण्याचा पुनर्वापर कसा करावा याचे प्रोजेक्ट सादर करीत असतातपण ते फक्त गुणासाठी असते ! घरी मात्र नळ पुर्ण सोडून तोंड धुत असतात, जरा पाणी तोंडाला लावून बाकी पाणी बेसिनमध्ये फेकून देतात ! शहरातल्या या पाण्याच्या उधळपट्टीला आळा घालायलाच हवा तरच महाराष्ट्राच्या काना-कोपर्यात पाणी मिळेल.

  रयतेचे कल्याण करण्याची इछाशक्ती असती तर दुष्काळ हा शब्दच इतिहासजमा झाला असता. पावसाचे फक्त 1 % पाणी जरी अडवले व जिरवले तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होइल असे तज्ज्ञ म्हणतात. मग 60 वर्षात ही साधी गोष्ट का नाही झाली ? प्रत्येक गावात छोटे सिंचन प्रकल्प, लहान बंधारे का नाही बांधले जात ? राळेगणसिद्धीत अण्णांनी जलस्वराज्य आणले मग हाच प्रयोग अण्णा इतर गावात का करीत नाहीत ? उन्हातान्हात पावलाना चटके बसत असताना व डोके तडकत असताना पाण्यासाठी वणवण भटकणार्या आया-बहिणींना बघून नेत्यांना जरा सुद्धा शरम कशी वाटत नाही ? तहानलेल्या महाराष्ट्राचा घडा कधी भरणार नाही तसेच यांच्या पापांचा घडाही कधी भरणार नाही !

सोमवार, ९ जानेवारी, २०१२

जेव्हा गाढवच गीता वाचते !

गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता ! अशी एक मराठी म्हण आहे. कालचा गोंधळ बराच बरा होता असे म्हणायची वेळ मेघनाद देसाई नामक गाढवाने आणली आहे ! या गाढवापुढे कोणी गीता वाचली नाही तर त्याने स्वत:च ती वाचली आहे ! नुसती वाचली नाही तर तिचे सार पण त्यांना समजले आहे ! गीतेचे सार काय तर “प्रत्येकाने मैदानात यावे व एकमेकांना मारून टाकावे” ! गीतेने कर्मयोग सांगितला की ज्ञानयोग हे अनेक विद्वांना हयात घालवूनही समजले नाही ! त्यासाठी अनेक ग्रंथाची रचना झाली. जवळ जवळ प्रत्येक भाषेत गीतेचे भाषांतर झाले आहे. हिंदूच नव्हे तर अनेक धर्माच्या लोकांनी गीतेचा अभ्यास केला आहे व गीतेमुळे आपल्या आयुष्याला दिशा मिळाली असे नमूद केले आहे. मेघनाद देसाई यांनी मात्र या सगळ्यांवर कडी केली आहे. गीता हिंसाचाराला महत्व देते, युद्धाचा प्रचार करते असा जावईशोध त्यांनी लावला आहे. बरे या संशोधनाचा वापर त्यांनी केला आहे तो महात्मा गांधीच्या अहिंसकपणाला आव्हान देण्यासाठी ! गांधीजी भगवत्गीतेला मानत, गीता हिंसेचा प्रसार करते , मग गांधीजी अहिंसक कसे ? असा प्रश्न मेघनाद देसाईंना पडला आहे.

मेघनाद देसाईंनी कोणा गाढवाकडून गीता शिकली याचा काही सकाळच्या (८/१/२०१२) बातमीत उल्लेख नाही तेव्हा या गाढवानेच गीता वाचली व थेट ती युद्धखोरांचे बायबल असल्याचा शिक्का मारून मोकळे झाले ! कदाचित हे त्यांचे संशोधन वाचूनच सैबेरीयात गीतेवर बंदी घालायची मागणी पुढे आली असावी.

मुळात गीतेतील विचार कोणाचा ? महाभारतीतल कृष्णाचा ? नाही. ती जरी लिहिली गणपतीने तरी त्याला ती डीक्टेट करीत होते महर्षि व्यास ! अनेक विद्वानांना गीता घुसडलेली वाटते. अनेकांना कृष्ण व अर्जुन नुसते निमित्तमात्र आहेत, जगद्गुरू व्यासांनी गीता , जी वेदांचे सार आहे, सामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांची योजना केली आहे. ऐन युद्धात असा काही प्रसंग घडला असेल असे संभवत नाही. आचार्य विनोबा भावे यांनासुद्धा तेच वाटते. गीतेच्या निमित्ताने व्यासांनी वैदीक तत्वज्ञानाचे सार सादर केले आहे. आत्म्याची अमरता, स्वधर्माप्रमाणे कर्माचरण, कर्म करताना फळाची अपेक्षा न ठेवता उत्तम कर्म करणे, व हे सर्व अभ्यासाने व संयमाने साध्य होते. देव मुर्तीतच नाही तर निसर्गात जे जे भव्य-दिव्य, उद्दात्त आहे अशा सर्व ठीकाणी आहे हे ही सांगितले आहे. एक तर माझ्यावर सर्व सोपवून निर्धास्त रहा किंवा जी जबाबदारी तुमच्यावर आहे ती उत्तम प्रकारे पार पाडा, बाकी काय ते मी बघून घेतो अशी हमी दिलेली आहे ! अशी गीतेची सरळ साधी शिकवण आहे. गीतेत हिंदू हा शब्द कोठेही नाही ! ही शिकवण समस्त मानवजातीसाठी आहे.

महाभारतात गीता घुसडण्यासाठी सुह्रदांना बघून अर्जुन शोकाकुल होतो, त्याचे धनुष्य गळून पडते, मेलो तरी चालेल पण स्वकीयांना मारून मिळणारे राज्य नको असे तो बोलू लागतो, असा प्रसंग केला गेला आहे. युद्धाला तो घाबरत असावा असे समजून कृष्ण त्याला गांडू अशी शिवी हासडतो पण अर्जून त्याला भीक घालत नाही व कृष्णालाच पट्टी पढवू लागतो तेव्हा त्याचा मोह नष्ट करण्यासाठी कृष्ण गीता सांगायला सुरवात करतो असा तो सगळा सीन आहे ! गीतेत जे काही करायचे ते समजून उमजून, पुर्ण ज्ञान प्राप्त करून करा असेही सांगितले आहे. “सम्यक विचार करून काय तो निर्णय घे “ असे कृष्णाने अर्जुनाला समजाविले आहे. युद्ध कर असे थेट सुरवातीला सांगितले असले तरी सगळा उपदेश करून झाल्यावर मात्र “तुला पटेल तसे कर” अशी मुभा त्याला दिलेली आहे. अर्जुनाने त्याचा सोयिस्कर अर्थ काढून युद्ध केले, ते जिंकले व त्यानंतर राज्यपद सुद्धा अगदी म्हातारा होइपर्यंत भोगले ! आता अर्जुनाला सुद्धा गीता समजली नाही असा याचा अर्थ काढायचा का ? खरेच जर त्याला संन्यासी व्हायचे होते तर युद्ध जिंकायचे कार्य सिद्ध झाल्यावर त्याला संन्यास घ्यायला कोणी अडविले होते ? या सर्वांवर कळस म्हणजे कृष्णाच्या परीवाराला द्वारकेवरून परत आणायच्या वेळचा आहे ! कृष्णाने देह सोडल्यावर अर्जुनाला निरोप देताना आपली अंतिम इच्छा कळविली होती. ती म्हणजे द्वारका आता नाश पावणार आहे, यादव कुलच नष्ट होणार आहे तेव्हा माझ्या परिवाराला इंद्रप्रस्थाला घेवून ये ! आपल्या जिवलग मित्राची ही अंतिम इच्छासुद्धा अर्जुनाला पुर्ण करता आली नाही. द्वारकेवरून इंद्रप्रस्थाकडे वाटेवर चोरा-टोरांनी त्यांच्यावर हल्ले केले. मित्र शोकाने व्याकूळ झालेल्या अर्जुनाला राज-परिवाराचे रक्षणही करता आले नाही ! साक्षात कृष्णाकडून गीता ऐकलेल्या अर्जुनाची अशी संभ्रमावस्था झाली असती का ? तेव्हा अर्जुन व कृष्ण हे निमित्तमात्र होते ! तेव्हा हिंसा कर म्हणून गीता सांगितली गेली या दाव्यात काही अर्थच राहत नाही.

मेघनाद देसाई या गाढवाला नक्की काय सिद्ध करायचे आहे ? गांधीची अहिंसेवरील निष्ठा संशयास्पद होती हे की गीता हिंसेचा संदेश देते हे ? या दोन्ही गोष्टींची अजब गुंफण करून या गाढवाने भलतेच तर्कट लढविले आहे !