शनिवार, ११ जानेवारी, २०१४

ती आणि तिचा बाप !

अमेरिकेतीतल भारतीय दूतावासातील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांची अमेरिकेने हकालपट्टी केलेली आहे. त्याला उत्तर म्हणून भारतानेही त्याच दर्जाच्या एका भारतीय दूतावासातील अमेरिकी अधिकार्याला 48 तासात देश सोडण्यास सांगितले आहे. गेला महिनाभर सुरू असलेले दोन देशातील राजनैतिक युद्ध आता थांबेल की यात नव्या युद्धाची बीजे असतील हे येणारा काळच सांगेल ! खोब्रागडेंच्या नजरेतुन जे झाले ते “उत्तम” असले तरी भारतासाठी ते “आदर्श” नक्कीच नाही !

देवयानी खोब्रागडे यांच्यावर विसा मिळविताना खोटी माहिती पुरविणे / दडविणे व मोकलरणीचे शोषण करणे हे आरोप ठेवून अमेरिकेत भर रस्त्यात बेड्या ठोकून अटक केले गेले. राजनैतिक अधिकार्याला अपमानास्पद प्रकारे अटक करणे हे अनुचित होते व त्याची तीव्र प्रतिक्रीया भारतात उमटणे स्वाभाविकच होते व तशी ती उमटलीही. पण निवृत्त सनदी अधिकारी व देवयानीचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी मात्र याचा लाभ भलत्याच प्रकारे उठवायचा प्रयत्न केला व त्यात ते यशस्वीही झाले !  चुकीच्या प्रकारे अटक झाली व त्या साठी माफीची मागणी राजनैतिक पातळीवरून भारताने करणे योग्य होते पण भारताने माफी + बिनशर्त सुटका अशी मागणी करून अमेरिकेला जशास-तसे उत्तर द्यायची तयारी केली. अमेरिका वा युरोपिय देश कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चोखंदळ आहेत. उच्चपदस्थ अधिकारी / नेते  वा त्यांचे नातलग सुद्धा कायद्याच्या कचाट्यातुन सुटू शकत नाहीत असे अनेक दाखले तिकडे आहेत. तेव्हा आरोप मागे घेवून बिनशर्त सुटकेला अमेरिकेने नकार देणे अगदी स्वाभाविकच होते. हे झाल्यावर उत्तम खोब्रागडे यांचा तोल सुटला व अमेरिकेवर वर्णद्वेशाचा आरोप त्यांनी केला. याची संतप्त प्रतिक्रीया अमेरिकेत उमटल्यावर तिकडच्या सरकारला आपल्या भूमिकेवर ठाम रहावेच लागले. मधल्या काळात भारताने एक धुर्त चाल करून देवयानी यांना संपूर्ण राजनैतिक अधिकार बहाल केले. यामुळे अमेरिकी सरकारला त्यांच्यावर कोणताही खटलाच चालविणे अशक्य झाले.  इतर अनेक पातळ्यांवर भारताने अमेरिकेवर हल्ला बोल केला व देवयानी अटक प्रकरण म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान आहे अशी हवा तयार झाली. दोन मोठ्या व लोकशाही देशांमधले संबंध किती ताणायचे यालाही काही मर्यादा होत्या तेव्हा पडद्यामागे बोलणी होवून अमेरिकेने देवयानी यांना पळून जायला मदत केली व अपमानास्पद प्रकारे केलेल्या अटकेवर मलमपट्टी केली व हे राजनैतिक वादळ आपल्या परीने थोपविण्याचा प्रयत्न केला.

भारतात परतल्यावर देवयानी यांना कंठ फुटला आहे व आपण निर्दोष असल्याचे व तसे पुरावेही असल्याचे त्या ओरडून सांगत आहेत व त्यांचे वडील मराठी पत्रकारांवर जातीय म्हणून तोंडसुख घेत आहेत. देवयानी जर स्वत:ला निरपराध समजत असतील व तसे त्यांच्याकडे पुरावेही असतील तर राजनैतिक ढाल वापरून भारतात पळून यायची त्यांना काहीही गरज नव्हती. भारतात जसे खटले वर्षानुवर्षे रेंगाळत राहतात तसे तिकडे होत नाही व महिनाभराच्या आतच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला असता. असे झाले असते तर भारताला दमदारपणे अमेरिकेला खडसावता आले असते व माफी मागायला भाग पाडता आले असते. जगभरात अमेरिकेची नाचक्की व छी-थू झाली असती आपल्या देशाचा सन्मान हजारपट वाढला असता. या आधी भारताच्या राष्ट्रपतींना व संरक्षण मंत्र्यांना अमेरिकन विमानतळावर नागडे केले गेले  होते तेव्हा भारताचा स्वाभिमान कोठे गहाण पडला होता ? खोब्रागडे कंपनी तेव्हा का गुमान बसली होती. या प्रकरणात घेतली त्या पेक्षा अधिक कडक व कठोर पावले देशाने तेव्हा घ्यायला हवी होती, पण यातले काहीही झाले नाही. या प्रकरणात मात्र खोटी माहिती देणार्या व महिला कामगाराचे शोषण करणार्या भारतीय राजनैतिक अधिकार्याला पाठीशी घालण्यासाठी भारताने आपली शक्ती खर्च केली व इभ्रत पणाला लावली. भारताने देवयानी यांना तिकडच्या न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी मदत केली असती तर ते समजण्यासारखे होते पण भारताने तसे ने करता खटला मागे घेवून त्यांना बाइज्जत रिहा करावे अशी अत्यंत चुकीची मागणी लावून धरली. अमेरिकेन सरकारने भारतात येवू घातलेल्या निवडणुका व निकालानंतर होणारे दुरगामी परिणाम लक्षात घेवून सुजाणपणा दाखविला व देवयानी यांच्या पलायनाचा मार्ग सुकर केला पण खटला मागे घेतलेला नाही. देवयानी आता देशाबाहेर कोठेही सुरक्षित नसतील कारण मित्र देशात राजनैतिक अधिकार नसताना देवयानी गेल्या तर त्यांची रवानगी अमेरिका त्या  देशाच्या मदतीने थेट अमेरिकी तुरूंगात करायचा धोका आहेच !

एखाद्या ब्राह्मणाने हयात समाजसेवेसाठी घातली तरी त्याच्या जानव्याची गाठ अनेकांच्या डोळ्यात खुपते. एखादा दलित “सनदी अधिकारी” म्हणून हयात घालवून निवृत्त झाला तरी तो स्वत:ला दलितच समजतो व त्याची वृत्ती व कृती मात्र आपल्यापेक्षा दुबळ्या व्यक्तीला पायदळी तुडविण्याचीच असते हे नागडे सत्य तरी या निमित्ताने बाहेर आले !

“मी आणि माझा बाप” हे पुस्तक ज्यांनी वाचले असेल त्यांना “ती आणि तिचा बाप”  प्रकरणातला विरोधाभास नक्कीच अंतर्मुख करायला लावेल !