रविवार, ३० ऑगस्ट, २००९

सैन्यात ’शिरा’ द्या पण दारू का ?

एका गावात सैन्य भरती चालू असते व तिकडे ’सैन्यात शिरा’ म्हणजे भरती व्हा असे फ़लक असतात. एक तरूण ’शिरा’ खाण्यासाठी सैन्यात भरती होतो. तसा सैन्यात शिरा खायला मिळत असेलही पण त्याहुन अधिक नियमित पणे सैन्यात मिळणारी एक वस्तू म्हणजे दारू ! अगदी निवृत्त झालात तरी सैनिकाला ती मिळण्याची तजवीज मायबाप सरकारने केलेली असते. सैन्य दलांना आधुनिक शस्त्रास्त्रांची, तंत्रज्ञानाची, वातावरणाला पोषक पोशाखाची, अगदी शवपेट्यांचीही कमतरता असल्याच्या बातम्या कानावर येत असतात पण दारू मिळाली नाही असे मी तरी कधी वाचलेले नाही !

देशावर आजही ज्यांच्या विचारांचा पगडा आहे असे थोर व्यक्तीमत्व म्हणजे महात्मा गांधी. त्यांना एकदा विचारले गेले होते की तुमच्या हाती सत्ता आल्यास तुम्ही सर्वात आधी काय कराल ? महात्म्याचे उत्तर होते “सर्वंकश दारूबंदी” ! भारतात अजुनतरी मद्यपान शिष्टसंमत नाही. केंद्र सरकार व राज्य सरकार स्वतंत्र खात्यामार्फ़त दारूबंदीची अंमलबजावणी करीत असते. त्या वर कोट्यावधी रूपये खर्च करते. दारूचे दुष्पपरिणाम कोणाला वेगळे सांगायची सुद्धा गरज नाही. दारू पिण्यासाठी परमिट लागते , जे साधारण चाळीशी पुढे फ़क्त एका पेगापुरते ते सुद्धा डॉक्टरी सल्ल्याने मिळते. मद्य उत्पादक कंपन्यांना आपल्या मद्याची जाहिरात सुद्धा करता येत नाही, विक्रीवर सुद्धा कठोर निर्बंध आहेत, दूकान कोठे टाकावे याची सुद्धा कठोर नियमावली आहे, मद्यावर सरकार भरमसाट कर आकारते व त्या विरूद्ध कोणी ब्र सुद्धा काढत नाही. मद्य दूकानांना ड्राय डे सुद्धा पाळावे लागतात. अर्थात कायदे व नियम काहीही असले तर प्रत्यक्षात चित्र भलतेच दिसते हे मान्य पण सरकारचे अधिकृत धोरण मद्यप्राशनाच्या विरोधी आहे हे नक्की !

मग हेच सरकार सैन्याला मात्र अव्याहतपणे दारू का पुरवित असते ? ( तसे आपल्याच नाही , जगातल्या सर्वच सैन्यदलांना मद्य सवलतीच्या दरात पुरविले जाते.) शीख पंथात मद्यपान निषिद्ध आहे, तसेच केस कापणे सुद्धा ! पण लष्करात लक्षणीय संख्येने असल्याने फ़क्त शीखांना दाढी वाढवण्याची मुभा आहे पण मद्याचे काय ? याच न्यायाने शीख सैनिक मद्य दिले जात नाही का ? संघटीत सैन्यदले ही कल्पना आपण इंग्रजांकडूनच घेतलेली आहेत. सैन्यात इंग्रजांनी निर्माण केलेल्या जातिनिहाय फ़लटणी आपण तशाच ठेवल्या आहेत पण इतर अनेक बाबतीत सैन्याचे हिंदवीकरण झाले आहे. मग दारूच्या प्रथेबाबत काहीच विचार झाला नाही का ?

एरवी सरकार उठसूठ समित्या, आयोग नेमत असते पण या बाबतीत तसे काही झाल्याचे वाचनात नाही. सामान्य माणसाला जी दारू विषा समान आहे ती सैनिकाला वरदान आहे का ? सैनिकाच्या खडतर जीवनात दु:ख विसरण्यासाठी दारू उतारा आहे का ? खडतर भौगोलिक परीस्थितीत सीमेवर सज्ज असलेल्या सैनिकाला दारू हवीच का ? दारू नाही दिली तर सैन्य बंडाळी करेल का ? दारू पिउन सैनिकांची व पर्यायाने सैन्यदलाची युद्ध क्षमता वाढते का , त्यांना लढण्यासाठी अधिक चेव येतो का ? या सगळ्यांचा विचार कधी कोणी केलेलाच नाही ! पण तरीही सर्वसामान्यपणे असे म्हणता येइल की वरील सर्व प्रश्नांची उत्तरे नाही अशीच येतील ! यातल्या एका जरी प्रश्नाचे उत्तर हो असेल तर मायबाप सरकारने त्याहुन खडतर जगणे जगणार्या देशातल्या ७० % जनतेला रेशनिंगवरच दारू उपलब्ध करून दिली पाहीजे ! सब दु:खो की एकही दवा ! बिचारे खोपडी पिउन तरी मरणार नाहीत !

दारू पिणारे सगळेच दारूडे असे मला म्हणायचे नाही. सैन्यात दारू पिण्यावर कठोर निर्बंध सुद्धा असतील, पण जिकडे सगळेच मद्यापानात दंग आहेत तिकडे मर्यादा कोणी ओलांडली हे तरी कोण ठरवत असेल ? मूळ मुद्दा सरकार सैन्याला दारू का पुरवते हा आहे. तुम्ही म्हणाल सैन्याला सरकार दारूच नाही इतरही अनेक सुविधा स्वस्त दरात पुरवते. मी म्हणतो त्या अजून स्वस्तात द्या पण दारू देउ नका, ज्यांना हवी ते खुशाल बाजारभावाने घेउन पितील, हवे तर त्यांना ’नॉन ड्रिंकींग ’ भत्ता द्या ! हिमालयातल्या दर्या खोर्यात पहार्यावर असणार्या सैनिकाला जेवढी दारू मिळते तेवढीच महाराष्ट्रातल्या एखाद्या छावणीत असलेल्या सैनिकांना मिळते. ( कमालीची थंडी असलेल्या प्रदेशात खरेतर मद्यपान आरोग्याला घातक आहे !) प्रत्येकाची दारू पचवायची क्षमता सारखी असू शकते का ? नाही ! मग दारू मात्र सगळ्यांना सढळ हस्ते का दिली जाते ? त्यातही गंमत म्हणजे सैन्यात जेवढा मोठा अधिकारी तेवढी त्याला जास्त दारू दिली जाते ! सरसकट दारू देण्याच्या धोरणाने सैन्य व्यसनाधीन होते का ? या वरही कोणता अहवाल नाही. मग सेवा निवृत्त झाल्यावरही सैनिकाला स्वस्तात दारू का बरे उपलब्ध करून द्यावी लागते ?

हे सर्व प्रश्न मी ऑर्कुटवरील कोब्रा कट्ट्यावर उपस्थित केले होते. त्या वेळी सैनिकांची दारू काढून मी सैन्याचा अपमान केल्याचा ठपका आधी माझ्यावर ठेवला गेला ! जी दारू सामान्य नागरिकाला घातक आहे ती सैन्याला आवश्यक कशी याचे उत्तर मात्र कोणालाच देता आले नाही. प्रचंड गदारोळ उडाला व आरोप-प्रत्यारोपांच्या फ़ैरी झडत राहील्या . त्याच गोंधळात सैन्यात पराक्रम गाजविलेले अनेक मराठी, त्यातही ब्राह्मण अधिकारी दारूला शिवत सुद्धा नसत एवढे कळले, तसेच कोणा बहीणीने आपले दोन्ही भाउ सैन्यात अधिकारी असूनही दारूच्या थेंबालासुद्धा शिवत नाहीत हे अभिमानाने नमूद केले होते ! म्हणजे दारू मिळण्या न मिळण्यावर सैन्यातला पराक्रम अवलंबून नसतो हे सुद्धा सिद्ध झाले होते.

जगात खड्या सैन्यदलात आपला तिसरा नंबर आहे, एकूण बजेटच्या १६ % रक्क्म आपण सैन्यावर खर्च करतो, हा झाला दाखवलेला खर्च, छुपा खर्च अजून बराच असेल ! एवढे करून आपल्या सीमा सुरक्षित आहेत का ? नाही, शत्रू अनेक मार्गाने देशात शिरतो आहे व आतंक पसरवून निर्धोक परत जात आहे ! ताजमध्ये घुसलेल्या दोन अतिरेक्यांनी विशेष प्रशिक्षित जवानांना तब्बल ४८ तास झुंजविले होते ही तर अगदी अलिकडचीच बाब झाली. तुम्ही म्हणाल की यात सैन्यदलांची काहीही चूक नाही ! भ्रष्ट राजकारण्यांमुळे, सरकारच्या अल्पसंख्यांक समुदायाचे तुष्टीकरण करण्याच्या धोरणामुळे सैन्याचे हात बांधलेले आहेत, त्यांना कठोर कारवाई करण्याची मुभा द्या , २४ तासात ते दहशतवाद संपवतील ! मान्य, सैन्याला फ़ारशी मोकळीक नाही, ते सरकारचे आदेश पाळते. खलिस्तान चळवळ मोडण्यासाठी सुवर्ण-मंदिरात सैन्य शिरले होते तेव्हा काही शीख सैनिकांनी ब्रिगेडीयर दर्जाच्या अधिकार्याला गोळ्या घालून छावणी सोडली होती पण ती बंडाळी वेगळ्याच कारणासाठी होती व पसरली नाही. राजकारणी भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत, स्वत:ची खुर्ची सांभाळण्यासाठी हिरवे साप गोंजारले जात आहेत. देशद्रोह्यांची मने राखण्यासाठी जवानांचे रक्त सांडले तरी हरकत नाही. जवानांनी संयम पाळावा अशीच राजकारण्यांची इच्छा आहे. तुम्हाला फ़ारतर मरणोत्तर शौर्यचक्रे , पुरस्कार, पेट्रोल पंप एजन्सी देतो ! याची चीड सैन्याला कधीच येत नाही ? सैन्यात एकही मायेचा पुत नाही की जो सरकारला याचा जाब विचारेल ? का ? जवानांचे हात कशाने बांधले गेले आहेत ? मने कशाने बधीर झाली आहेत ? स्वस्तात ढोसायला मिळणार्या दारूने ? अर्थात दारू देउनही सैन्याची कामगिरी, १९७१ चा सणसणीत अपवाद वगळता, अभिमानास्पद नाहीच ! काश्मीरमध्ये अजूनही अतिरेकी सैन्याच्याच छावणीवर थेट हल्ला चढवत असतात. सीमाभागातुन घुसखोरी अव्याहतपणे चालूच आहे. कारगिलमध्ये तर सैन्याच्याच गाफ़िलपणामुळे शत्रूने बळकावलेली हिमशिखरे ताब्यात घेण्यासाठी अनेक सैनिकांचे रक्त सांडावे लागले होते.

आता जरा मद्य पुरवठ्यातले अर्थकारण बघू ! देशाचे खडे सैन्य ३० लाख (अंदाजे) , सर्वसाधारण जवान ३५ व्या वर्षीच निवृत्त होतो, त्यामुळे निवृत्त सैनिक धरले तर ही संख्या १ कोटी किमान भरेलच ! सैनिकाला नक्की किती दारू, हुद्द्याप्रमाणे मिळते हे काही मला नक्की माहीत नाही पण धरून चालू की एका सैनिकाला सरासरी महिन्याला चार लिटर दारू मिळत असावी. एका लिटरची किंमत १०० रूपये असावी. एरवी ती बाजारात विकताना कर धरून २०० रूपये असावी पण मायबाप सरकार ती सैनिकाला करमुक्त दराने विकते. मद्य उत्पादक कंपन्या ज्या अवघ्या चार सुद्धा नाहीत, सैनिकाला दारू द्यायची आहे म्हणून एक पै सुद्धा कमी करीत नाहीत ! म्हणजे त्यांच्या नफ़्यातला एक पैसासुद्धा कमी होत नाही ! म्हणजेच महिन्याकाठी अब्जावधी रूपयांचा नफ़ा मद्य सम्राटांना होतो, तो सुद्धा एका पैची जाहिरात न करीता. अर्थात मद्य उत्पादक आपल्या मद्याला सैनिकी हुद्द्याची नावे देउन त्याचे पांग फ़ेडतातच म्हणा !

आपल्या सैन्य दलांना सामान्य भारतीय पवित्र गाय मानतो. सर्वच संस्थांचे अवमुल्यन झाले असताना , सैन्याचा सामान्य माणसाशी संबंध येत नसल्याने (की सरकारच तसे करते ?) आपल्याला अभिमान वाटतो. पण खरे चित्र काय आहे ? सैन्यदलातल्या बेदिलीच्या अनेक घटना कानावर येत असतात. महिला अधिकार्यांनी केलेल्या आत्महत्या सुद्धा गाजत असतात. बोफ़ोर्स सारखा भ्रष्टाचार व कारगीलमध्ये हुतात्मा झालेल्यांसाठी भरमसाठ दराने घेतलेल्या शवपेट्या असोत, यात फ़क्त राजकारणीच सामील असतात असे मानणे फ़ारच भाबडे पणाचे ठरेल. सैन्यदले सुद्धा भ्रष्टाचाराने बरबटलेली आहेत हे एक नागडे सत्य आहे ! आपल्याला जे दिसते ते हिमनगाचे फ़क्त एक टोक आहे ! जिकडे शवपेटीच्या खरेदीत सुद्धा भ्रष्टाचार होतो तिकडे या अब्जावधी रूपये सहज मिळवून देणार्या मद्य पुरवठा कंत्राटात सगळे व्यवहार पारदर्शीपणे होत असतील असे मानणे दुधखुळेपणाचेच ठरेल. कंत्राट मिळवण्यासाठी झालेल्या व्यवहारात सैन्यातले संबंधित अधिकारी ’कोरडे’ राहत असतील असे मानणे सुद्धा भाबडेपणाचे ठरेल. थोडक्यात जोवर सैन्याला दारू पाजून मद्य सम्राटांचे चांग भले होत आहे तो वर “सैन्याला दारू देता का ?” या विषयावर चर्चा सुद्धा होणे अशक्य आहे, तशी ती गेल्या ६० वर्षात झालीच नाही !

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २००९

निरुत्तर करणारी दुरुत्तर !

सकाळी ६:४५ चा गजर लावलेला असतो पण जाग तशी त्याच्या आधीच आलेली असते. गजर झाल्यावरच उठायचे असा उसूल असल्याने करवटे बदलत गजराची वाट बघणे चालु असते. “तुझा विसर न व्हावा” चा एकदा ’गजर’ झाला की दिवस कसा मस्त जातो ! अचानक हिचा मंजुळ आवाज ऐकू येतो “लोळणे पुरे, कामावर जायचे आहे ना आज ?”. मी कुस बदलुन अजुन गजर कोठे झाला आहे असे विचारतो तेव्हा आतुन सात वाजले आहेत असे उत्तर येते. मी खडबडून उठतो, मोबाइल कडे झेप घेतो. त्याने केव्हाच मान टाकलेली असते. रात्रभर चार्जिंगलाच तर लावुन ठेवला होता, बिघडला बहुतेक ! मग समजते की कोणीतरी(?) स्वीचच ऑफ़ केलेला आहे, मग तो चार्ज होणार तरी कसा ? लगेच मी कडाडतो, कोणी स्वीच ऑफ़ केला ? आतुन लगेच प्रत्युत्तर येते “कशाला कोण बंद करतय ? मी इथुनच सांगते, तुम्ही भलताच स्वीच ऑन केल्यावर … तुमचा मोबाइल कसा चार्ज होईल ? दिवसाची सुरवात अशी झाल्यावर पुढे काय वाढून ठेवले आहे या विचारात मी गडबडीत बेसिन कडे धावतो. दाढीचे क्रीम टूथब्रशवर घेतलय हे मला त्याची चव घेतल्यावरच कळते ! मी तुला हजारदा सांगितलय , ज्या रंगाचे शेविंग क्रीम आहे त्याच रंगाची टूथपेस्ट का आणतेस ? माझा अगतिक सवाल ! यावर “स्वत:चा वेंधळेपणा सोड आधी, आणि इंग्रजी माध्यमातुन बी.कॉम. झाल्याची टिमकी वाजवतोस ना , मग जरा वाचता येत नाही का ?” एकदा कधी मी हिचे मराठवाडा विद्यापीठ आणि मराठीतुन घेतलेली वाणिज्य पदवी काढली होती त्याची शिक्षा पुढचे सात जन्म तरी भोगावी लागणार आहे ! आणि आता दाढी करताना टूथपेस्ट घेउ नकोस ! च्यायला, हिला कसे कळले ?

दाढी संपत असतानाच मुलांना उठवायची अवघड कामगिरी ही माझ्यावर सोपवते. मी मुलांच्या खोलीत शिरतो. “प्रसाद उठ” असे मंद्र, मध्यम आणि तार सप्तकात आळवत , शेवटी आता xx वर लाथ घालतो म्हणत सम गाठल्यावर चिरंजीव डोळे किलकिले करत, तुझे आता सगळे आवरून झाले का ? नाहितर दारावर टकटक केलेली तुला आवडत नाही , असे ऐकवतो. प्रियांकाला उठवण्याआधी माझे लक्ष तिच्या पसार्यावर जाते. मी कडाडतो, “प्रियांका, तावडतोब उठ आणि पसारा आवर आधी.” त्यावर ती म्हणते की हा पसारा नाहीच आहे, ही माझी वस्तु ठेवायची पद्धत आहे. माझी काही वस्तु मी तुला शोधायला सांगते का कधी ? उलट तुझाच मोबाइल दादा आईच्या मोबाइलवरून मिसकॉल देउन शोधुन देतो ! मी लगेच आउट ऑफ़ कवरेज एरीयात जातो ! मग डबा भरे पर्यंत थोडी साखरपेरणी झाल्यावर मी घर सोडतो.
सोसायटीच्या आवारात माझी स्कूटर अगदी पद्धीतशीर पणे ब्लॉक केलेली असते. मी “जटावसाब, आपकी गाडी निकालो, मुझे स्कूटर निकालनी है” असा खालुनच आवाज देतो. त्यावर जटावसाब “मेरी गाडी नेगीसाब के गाडी ने ब्लॉक की है, उन्हे भी जरा आवाज दो” असे सुनावतात. माझ्या वेळेशी त्यांना काहीच देणे घेणे नसल्याने मी नेगीसाबना पण आवाज देतो. पण तेवढ्या वेळात मला गाडी बाहेर काढायची एक पळवाट सापडते. एकच चौकट हलवुन १ ते १५ अंक क्रमाने लावायचा खेळ खेळून मी स्कूटर बाहेर काढतो. तोवर नेगी व जटाव बाल्कनीत येउन “सोसायटीवालोंकी जलन होती है हमारी गाडी देखके” असा डायलॉग मारतात. गाडी हॉर्न वाजवत मी मुख्य रस्त्यावर येत असतानाच तुफ़ान वेगात दोन रीक्षा, दोन्ही कडून येतात, आमचा त्रिवेणी संगम थोडक्यात हुकतो. दोघेही चालक एका सुरात “डोळ फ़ुटल काय” अशी आस्थेवाईक पणे चौकशी करतात. पे अँण्ड पार्क मध्ये मी नेहमीसारखीच शिस्तीत गाडी उभी करतो. इतका वेळ तमाकू मळत असलेला तिकडचा नोकर मी स्टेशनकडे निघालो की लगेच पिंक मारून “साहेब, तकडे नाय, अकडे घ्या” म्हणून फ़र्मावतो. त्याच्याकडे एक शूद्र कटाक्ष टाकून मी जात असतानाच “इंडीयात डीशीप्लीन अजबात रायली नाय बघा” म्हणून तो परत पिंक टाकतो ! डावीकडून चालावे हा नियम बहुदा मी एकटाच पाळत असावा. त्या मुळे पुलावरून मोबाईलवर बोलत येणारा कॉलेज कन्यकांचा थवा व मी एकाच बाजुला असतो पण दिशा विरूद्ध ! टक्कर टळते पण “स्कूल का कभी मुंह देखा है की नही” असा कुजकट टोमणा ऐकावाच लागतो.
गाडीत नेमकी दूसरी सीट मिळते. गाडी पनवेललाच पॅक होते. एखाद-दुसरा प्रवासी पायात येउन उभा राहतो. थोडी काळजी घेतली तर त्याला नीट उभे रहाता ये़ईल व मला सुखाने बसता ये़ईल असे मी त्याला सुचवताच तो “साला, अभीसे नाटक चालु किया ? बैठनेको मिला है तो शांति से वीटी तक बैठो ना, काय को खीट खीट करता है” असे सुनावतो. पुढच्याच स्थानकात धडाधड रॅकच्या रोखाने सामानाची फ़ेकाफ़ेक चालु होते. त्यातली एकाची बॅग माझा कपाळ मोक्ष करेल अशी रास्त शंका वाटल्याने मी तीच्या मालकाला ती नीट ठेवायची सूचना करतो. त्यावर तो “गिरा है क्या ? गिरेगा तो बोलनेका क्या !” अशी दमबाजी करतो. म्हणजे डोक्यावर पडल्यावर मी तक्रार करायला जिवंत राहणार नाही याची त्याला खात्रीच असते ! डोक्यावर लटकती तलवार घेउनच प्रवास पुर्ण होतो ! सूटलो एकदाचा !
कामावर येताच एकदमच सगळे फ़ोन सलामी दिल्यासारखे वाजू लागतात. ते कमी म्हणून मोबाईल सुद्धा खणखणू लागतो. एक फ़ोन उचलुन मी यांत्रिक स्वरात “नमस्कार, ये मुंबई बंदरगाह के अध्यक्षजी का कार्यालय है” असे म्हणताच, खाडकन फ़ोन कट होतो. दूसर्या फ़ोनवर कोणीतरी गोड आवाजात “न्हावा-शेवा बंदराचे नाव आता जवाहर बंदर झाले आहे का ? “हो”, त्याला बरीच वर्षे झाली असे सांगेतल्यावर “जवाहर बंदराचा नंबर काय ?” असे विचारते ! मी शक्य तेवढ्या नम्र पणे “मला माहीत नाही” असे सांगताच “तुम्हा लोकांना माहितीचा अधिकार वापरूनच सरळ केले पाहिजे” असे धमकावुन फ़ोन कट करते. तिसर्या फ़ोनवर कोणीतरी इंग्रजी पत्रकार साहेबाशी बोलु इच्छीत असतो. मी त्याला नाव , गाव, काय काम आहे असे विचारताच “साला, तुम पीए लोग बोलेगा तो ना, तुम्हारा साब भी उतना नही अखडता है, मेरा पास उनका मोबाइल नंबर है, उसपर करता है” असे ऐकवतो. चवथा फ़ोन असतो “बोनसचा फ़ॅक्स आला का ?” असे विचारणारा, मी नाही असे सांगताच, “साल्यांना माज आलाय खुर्चीचा” असे करवादतो ! थोडे स्थिरस्थावर झाल्यावर गार झालेल्या चहाचा घोट तोंडाला लावा तोच बटवड्याचा ढीग समोर ओतला जातो. एका दिवसात एवढी पत्रे ? असे मी चमकुन विचारताच, मागचे चार दिवस एकही पत्र आले नाही तेव्हा तंगड्या पसरून बसला होतातच ना ? अरे मग रोजच्या रोग का नाही आणत ? अहो हे सरकारी कार्यालय आहे, आम्हाला काही टाटा – बिर्लाचा पगार नाही मिळत ! असा बाणेदार जबाब मिळतो ! मध्येच आमच्या फ़ाइलचे काय झाले असे विचारणारा फ़ोन येतो. मी रेफ़रन्स नंबर सांगा, निदान विषय काय होता, केव्हा पाठवली होती, आमच्या कडे डायरेक्ट पाठवली की कोणा दूसर्या विभागातुन येणार होती असे प्रश्न विचारताच “तुमको शेपरेट कंप्युटर क्या सिर्फ़ गेम खेलने के लिये और नेट लगाने के लिये दिया है क्या ? जरा देखके बता. असा डोस दिला जातो. परत कामाचा डोंगर उडवत असतानाच मोबाइल वाजतो. नंबर अनोळखी असल्याने मी तो कट करतो. पण असे चारदा झाल्यावर तो घेणे भागच पडते. लगेच “अग प्रिया, आज कोणता ड्रेस घालणार ? अशी विचारणा होते. मी “प्रियांका नाही, तीचा बाप आहे” अशी दुरूस्ती करताच , “तुम्ही कशाला घेतला फ़ोन ? द्या तिला फ़ोन. असे उत्तर येते. मी कामावर आहे असे सांगितल्यावर “आजच बरे न विसरता फ़ोन घेउन कामावर गेलात , प्रिया सांगते माझा बाबा एक नंबरचा वेंधळा , विसरभोळा, --- ” . आत्मस्तुती ऐकुन न घेता मी फ़ोन कट करतो !
दमून भागुन घरी आल्यावर जिन्यात बायकांचे टोळके बसलेले असते. त्यांची मुले सुद्धा तिकडेच पसरून बसलेली असतात. शुक-शुक करून , खाकरून सुद्धा कोणी ढीम्म हालत नाही. तेव्हा मीच अंग संकोचून वाट करून घेत पुढे जाउ लागतो. तेव्हा कानावर , रोज इतनी देर कैसी होती है, मुझे तो ये इतना सीधा नही लगता जितना दिखता है, आणि शेवटी “बिचारी अनुजा” असे म्हणून माझ्या बायकोच्या फ़ुटक्या नशिबाला बोल लावला जातो !

साला, कोणाला काय बोलायची सोय नाय रायली बगा !

बुधवार, १९ ऑगस्ट, २००९

डेस्कटॉप !

या शब्दाचा वीस-एक वर्षापुर्वी जो अर्थ होता तो आता कोणाच्या गावीही नसेल. बिल गेटस नावाच्या तरूणाने, दोन खोल्यात मावणारा संगणक प्रत्येकाच्या टेबलावर विराजमान झाला पाहिजे असे स्वप्न बघितले आणि ते वास्तवातही आणले.

माणूस स्वत:ला अनेक प्रकारे व्यक्त करीत असते. त्याचे वागणे, बोलणे, दिसणे, वावरणे या सर्वांवर त्याची स्वत:ची छाप पडलेली असतेच. आधुनिक तंत्रज्ञानाने त्याच्या हातात अनेक साधने आली. त्याचा वापर सुद्धा जो तो आपल्या व्यक्तीमत्वानुसार करत असतो. साधे मोबाइलचेच बघा ना ! कोण तो शर्टाच्या खिषात ठेवेल, कोण विजारीच्या, कोणी तो कंबरेला लटकवेल, कोणी गळ्यात घालेल. त्याच्या रिंगटोन्स मध्ये तरी किती स्वभाव छटा दिसतात !

तुम्ही ऑपरेंटींग सिस्टीम लोड करता तेव्हाच एक डीफ़ॉल्ट डेस्कटॉप प्रस्थापित होतो. तुमच्या आवडी-निवडी प्रमाणे तुम्हाला तो बदलता सुद्धा येतो. फ़ार थोडे महाभाग तो जसा आहे तसा ठेवत असतील ! बाकी सर्व त्यात काहितरी फ़ेरफ़ार करतातच. डेस्कटॉप म्हणजे त्यावरचे आयकॉन्स, वॉलपेपर, टुल बार, टास्कबार, क्विक लॉन्च बार , रंगसंगती या बाबी बघु. यात प्रचंड वैविध्य दिसते तितकाच साचेबंदपणा / झापडबंदपणा सुद्धा दिसतो. जो जो प्रोग्राम आपण टाकतो त्याचा जनक त्याचे अस्तित्व डेस्कटॉपवर टाकायचा प्रयत्न करतोच. यातही एथिक पाळणार्या कंपन्या तुमचे मत विचारतात, तरीही झापडबंदपणे सगळे होयबा करतात.

डेस्कटॉप म्हणजे संगणकाचा सदैव उघडा असणारा कप्पा. उठ की सुठ जे मिळॆल ते या संगणकाच्या दर्शनी कप्प्यात कोंबले जाते. नेट वरून वा कोणी पेनावर, चकतीवर (सीडी) आणलेली माहीती उतरवायची असेल, एखादी फ़ाइल सेव करायची असेल तर डेस्कटॉप हाच पर्याय दिला जातो ! मग असे होती की कप्प्यात आणखी काही ठेवायला जागा उरत नाही, काहीकाळ आयकॉन्सचा आकार लहान करून तर कधी पडदा आकुंचित करून वेळ मारून नेली जाते, पण मूळ समस्येला मात्र कोणी हात घालत नाही !

अनेकांचे डेस्कटॉप निरखणे हा माझा अभ्यासाचा जणु विषयच झाला आहे. डेस्कटॉपवर साधारणपणे या गोष्टी असतातच १) Recycle Bin 2) My Computer 3) My Documents 4) Internet Explorer 5) Dial-up Connection 6) My Network places . आता या नंतर आपण सोयीनुसार जे जे प्रोग्राम प्रस्थापित करतो त्यांचे चटपटे (Shortcuts !) डेस्कटॉपची शोभा वाढवत राहतात. जसे विनझिप, मेडीया प्लेयर, ऍक्रोबॅट रीडर, MS Office मधुन वर्ड किंवा एक्सेल मधली फ़ाइल उघडायचे चटपटे ! मग मात्र रोज खेळतो ते खेळ, सतत हाताशी हव्या असणार्या फ़ाइल, काही साइटसचे चटपटे अशी भरताड चालु होते. विंडोज प्रणाली शहाण्यासारखी मधेच आपल्याला न वापरलेले चटपटे उडवायची आठवण करते पण आपण तिच्याकडे कानाडोळा करतो, तसे ही त्याचा वापर केल्यास अनयुजड डेस्कटॉप अशी अजून एका चटपट्याची भर पडते ! होते असे की चटकन सापडाव्या म्हणून डेस्कटॉपवर ठेवलेल्या वस्तुंची एवढी गर्दी होते की सर्च करून केव्हा केव्हा शोधायची वेळ येते. डेस्कटॉपवर चटपटा आणि हार्डडिस्कला वळसा ! माझे अनेक मित्र आपला संगणक गोगलगायी सारखे चालु होतात म्हणून तक्रार करतात. मी त्यांना डेस्कटॉपवरचे अनावश्यक चटपटे उडवायला सांगतो. या एकाच उपायाने प्रणाली पुर्वी पेक्षा अधिक जलद चालु होते !

आता वळतो वॉलपेपर कडे ! धार्मिक व्यक्ती देवादिकांच्या तस्वीरी डेस्कटॉप वर ठेवतात, चमको व्यक्ती नट-नट्यांच्या, रसिक अल्प वस्त्रांकित मदनिकांचे, निसर्गप्रेमी धबधबे,जलाशय, डोंगर दर्यांचे, वेगाचे वेड असलेले युवक मोटार-बाइकचे, रेसच्या मोटारींचे, धाडसी तरूण फ़ायटर विमानाचे, आधुनिक शस्त्रास्त्रांचे, सामाजिक जाण असलेले पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे, वन्य जिवांबद्दल कळवळा असलेले वन्य जीवनाचे, इतिहासाची आवड असलेले ऐतिहासिक हस्ती, स्थळे, भग्नावशेष यांचे फ़ोटो ठेवतात, कुटुंब वत्सल आपल्या मुला-बाळांचे , बायको-मुलांचे, सग्या-सोयर्यांचे फ़ोटो मांडतात, स्वत:च्याच प्रेमात असलेली माणसे आपलीच छबी दाखवितात …! जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ति व तेवढेच वैविध्यपुर्ण त्यांचे वॉलपेपर ! त्यात सुद्धा दर- मिनीटाला बदलणारे असतात तसेच कधीही न बदलणारेही असतात. आळशी विंडोज प्रणालीचा मुलत: असणारा वॉलपेपर बदलायचे सुद्धा कष्ट घेत नाहीत. विंडोज प्रणालीची मुलत: येणारी रंग-संगती मात्र बदलण्याच्या सहसा कोणी फ़ंदात पडत नाही. फ़ार थोडे , सर्जनशील मने असलेलेच अतिशय आकर्षक रंग संगती निवडून डोळ्यांना आनंद देतात.

तेव्हा तुम्हाला जर योग्य प्रकारे सादर व्ह्यायचे असेल तर जरा आपल्या डेस्कटॉप कडे लक्ष द्या ! मी संगणकातला जाणता नाही. मी जे काही शिकलो ते try and error मेथडनेच, पण तरिही थोड्या टीप द्यायचा आगाउपणा दाखवत आहे …
१) डेस्कटॉप वर भाराभार चटपटे अनेकदा अजाणतेपणीच ठेवले जातात. My Computer, My Documents हे दोनच चटपटे खूप झाले, फ़ारतर तुमचे डायल-अप कनेक्शन.
२) वाटाड्या (Browser) तुम्ही झटपटे (Quick Launch Bar ) मध्ये ठेवा हवा तर !
३) विन-झिप, मेडीया प्लेयर, पीडीएफ़ रीडर यांची डेस्क्टॉपवर गरजच काय ? त्या त्या फ़ाइल त्या त्या प्रोग्रामने उघडत असतातच !
४) खेळाचे चटपटे – या पेक्षा खेळ नावाचा कप्पा बनवा, त्यात सर्व खेळांचे चटपटे कोंबा व तोच ठेवा की डेस्कटॉपवर ! कसे ?
५) तुम्ही नेहमी भेट देणार्या संकेत स्थळांचे चटपटे डेस्कटॉप वर ठेवण्यापेक्षा, वाटाड्यात पसंतीचे (फ़ेवरीटस ) म्हणून जी सोय आहे तिचा लाभ घ्या की जरा !
६) रोजच्या कामाची फ़ाइल सेव करताना ती माय डॉक्युमेंटस मध्येच करा, दूसरे काही उतरवुन घेतल्यास – तुम्ही डाउनलोड मॅनेजर वापरत असल्यास तो तुम्हाला सुचवेल ते ऐका, तसाही ती सेटींग्स तुम्ही आपल्या सोयीने बदलु शकताच ! फ़क्त एकदाच त्रास घ्यावा लागेल. डेस्कटॉप वर सेव करणारे असे म्हणतात कि उतरवल्यावर लगेच बघायला आम्हाला ते सोयीचे पडते ! पण थोडी सेटींग्स चेक केलीत तर हे सुद्धा कारण उरणार नाही. संगणक जेव्हा कोणतीही फ़ाइल उतरवुन पुर्ण करतो तेव्हा तो तुम्हाला तीचे काय करायचे ते विचारतोच, ( अर्थात तशी विचारणा करणारे सेटींग्ज तुम्ही एकदाच निवडायला हवे.) त्या प्रमाणे तुम्ही लगेचच ती फ़ाइल उघडू शकता, प्रोग्राम असेल तर रन करू शकता , काहीच करायचे नसेच तर त्यातुन बाहेरही पडू शकता !
७) प्रोग्राम प्रस्थापित करतानाच ज्या सूचना येतात त्या डोळसपणे पहा. त्या प्रोग्रामचे चटपटे, झपपटे बनवण्याचे पर्याय अनचेक करा !
८) वीज टंचाइच्या काळात खरे तर काही काम नसेल तेव्हा डेस्कटॉप बंद करून ठेवणेच जास्त शहाणपणाचे ! घाबरू नका, त्या स्थितीतही तुम्ही गाणी ऐकु शकता !

चला, तुम्ही बसा आता डेस्कटॉपची झाडा-झडती घेत, मी आता वीज वाचवणार आहे, स्वीच ऑफ़ ! बाय बाय !

(टीप :- या तपशीलात काही तांत्रिक चुका झाल्या असतील तर मला जरूर कळवा, मी काही मराठी प्रतिशब्द सूचवले आहेत त्यांचा वापर जरूर करा, तुम्हाला काही सुचवायचे असतील तरीही चालेल ! )

मंगळवार, १८ ऑगस्ट, २००९

विक्रम आणि वेताळ कथा – अध्यात्मिक गुरूंकडून जडवाद्यांचा मुखभंग !

विक्रमादित्य कोणालाही न जुमानता स्मशानात गेला. झाडावर लटकत असलेले प्रेत खांद्यावर घेउन तो झपाट्याने परत निघाला तेव्हा, प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला , “विक्रमा, तु स्वत:ला विज्ञानवादी समजतोस पण तु सुद्धा भौतिक सुखाला चटावलेल्या इ-काका सारखाच जडवादी आहेस, शेवटी त्याला सुद्धा अध्यात्मिक गुरूच्या हातुनच मुक्ती मिळाली ! जडवादी विक्रमाचे कुतुहुल चाळवले, त्याने वेताळाला इ-काकांची गोष्ट सांगायचा आग्रह केला. वेताळाने अट घातली की मध्ये बोललास तर मी परत झाडाला लटकायला मोकळा , बोल कबूल ? विक्रमाने अट कबूल करताच वेताळ सांगु लागला.

देशातल्या ११ प्रमुख बंदरात, सर्वात मागासलेले बंदर म्हणजे मुंबई बंदर ! तर त्या तसल्या बंदराच्या प्रमुखाचा सहायक होते इ-काका. हे इ-काका ’जात्याच’ अत्यंत उर्मट, नास्तिक , पाखंडी, असे होते. त्यांची वाणी तर नुसती गटार होती गटार, अतिशय शिवराळ, उपमर्द करणारी. कोणाचाही ते मुलाहिजा राखत नसत. तंगड्या गळ्यात घालणे, थोबाड फ़ोडणे, उताणा पाडणे, मातम करणे, शेपूट घालणे असली विशेषणे वापरून ते आपली भाषा सजवत. त्यांना कामावर काहीच काम करायचे नसल्याने कार्यालयाने दिलेल्या संगणकावर, हाय स्पीड इंटरनेट जोडणीच्या सहाय्याने, फ़ूकट मिळणारा चहा ढोसत, फ़ायलींच्या ढीगावर बसून त्यांची सदानकदा ऑर्कुटगिरी चाललेली असे. कोब्रा कट्ट्यावर आपल्या शाब्दिक प्रहाराने ते अनेकांना घायाळ करत. कट्ट्याचे मालक व निरीक्षक तर त्यांचे रोजचेच बकरे असत. त्यांच्या सारख्याच जडवादी लोकांच्या मदतीने देवा धर्माला मानणार्या सर्वाना त्यांनी अगदी त्राही भगवान करून सोडले होते. त्याच्या पुढे तो गझनीसुद्धा फ़िकाच पडला असता असा तो मुर्तीभंजक होता ! प.पु. उपरकराचार्य, ज्यांची किर्ती अगदी उपरतक (वर तक ) पोचली होती पुण्यनगरीत फ़ारच प्रसिद्ध होते. त्यांच्या अनुग्रहांकित चेल्याने आपले उपरतकाचार्य कसे सूक्ष्म देहाने मंगळावर गेले होते, त्याची सुरस कथा ऐकवली, हे तर काहीच नाही भौतिकवाद्यांची पंढरी असलेल्या अमेरिकेने केलेला यान जोडणीचा खर्चिक प्रयोग फ़सलेला त्यांनी कसा बिनपैशाच्या अध्यात्मिक शक्तीने पाहिला व मग त्या महासत्तेची जगात कशी छी-थू झाली याची कथा ऐकवली. एवढे सांगितल्यावर भाविकांच्या डोळ्यातुन घळाघळा अश्रू वाहु लागले. जो तो उपरतकाचार्यांचा जयघोष करू लागला ! अनुग्रह करा असे विनवू लागला ! मूढमती इ-काका नेहमीसारखेच कट्ट्यावर पडीक होतेच. त्यांनी ये सब बकवास है , अस म्हणत महान योगी उपरकराचार्यांना थेट थोतांडाचार्य असे हिणवले. पुरावा काय , रोकडे काय ते बोला, बिनपैशाचे अध्यात्म नाय चालणार असे सुनावले. त्यांच्या सुरात सुर मिसळून दूसर्या पाखंडयाने, नामे ए-दादाने, सूक्ष्म देहाने लास वेगासला जाउन, उंची मद्याचे घोट घेत, रमणींच्या सहवासात कॅसिनो खेळण्यासाठी अनुग्रह होईल काय असे पुसिले !

कलियुग म्हणतात ते हेच ! शिशुपालाचे शंभर अपराध भरल्यावर कृष्णाने सुद्धा त्याचे डोके उडवले होतेच. इ-काकांचे तर शंभर सहस्त्र अपराध भरले होते. अनुग्रहांकित चेले त्यांच्यावर मिळेल ते शस्त्र घेउन तुटून पडले, माफ़ी मागा असा एकच नाद उसळला. मस्तवाल इ-काकांनी ती मागणी पार धुडकावली. संतप्त चेल्यांनी पुराव्याचे भेंडोळे इ-काकांच्या तोंडावर मारले. बिलंदर काकांनी त्याची सुरनळी केली व …. उरलेला चकणा त्यात टाकुन उलट प्रश्नांची सरबत्ती चालु केली.
१) हे संशोधन कोठेतरी प्रसिद्ध झाले होते का ? केव्हा ? म्हणजे महासत्तेने आपले संशोधन जाहिर करण्या आधी की मग ? प्रसिद्ध झाले नसल्यास का नाही झाले ?
२) अनेक जडवादी भारतीयांना नासा पोसते, शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा सन्मान करते, मग प्रकांड पंडीत उपरतकाचार्यांना त्यांच्या संशोधनासकट तिने का विकत घेतले नाही ?
३) दिव्य दृष्टीने मंगळाचे निरीक्षण केल्याचा दावा करणार्या उपरतकाचार्यांना लाल माती, दर्या, खाच खळगे दिसले हे जरी मान्य केले तरी मंद वार्याची झुळूक त्यांनी कशी अनुभवली ?
४) बरे मंगळावर गेले मग एवढ्या ४० वर्षात घरीच का बसले ? या ब्रह्मांडात मंगळच काय तो बाकि राहीला होता का ? एवढी सिद्धी प्राप्त असताना ते विमान, गाडी, बस, रेल्वे या भौतिक साधनानी प्रवास का बरे करतात ?
५) मंगळ दूर राहीला हो, महासत्तेला हवा असलेला व दडून बसलेला लादेन व भारताला हवा असलेला दाउद, याचा ठाव-ठीकाणा आचार्य देतील तर अमेरिका त्यांची सुवर्ण-तुलाच करेल व मायबाप भारत सरकार त्यांना निदान भारतरत्न तरी देइलच ! करतील का ते असे ?
६) महासत्तेने मंगळावर यान उतरवण्यापुर्वीच निखळ वैज्ञानिक संशोधन करून ही सर्व माहिती संकलित केली होतीच, यान उतरल्याने त्याची पुष्टी झाली. महासत्ता एवढ्यावरच थांबणार नाही, ती लवकरच मंगळावर माणूस उतरवेल अशी दर्पोक्ती केली. थोतांडाचार्यांची पुढची गुपचुप मोहीम कोणती असे कुत्सितपणे विचारले !

पाखंडी इ-काकांनी अजूनही स्वत:ला आवरावे , करूणा सागर उपरतकाचार्य त्यांचे अपराध पोटात घालुन त्यांना सुद्धा अनुग्रह करतील. मग पनवेल ते सीएसटी प्रवास लोकलने धक्के खात त्यांना करावा लागणार नाही ! माफ़ी मागा अन्यथा गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागेल असे बजावले. पण इ-काकांच्या जडवादाने बधीर झालेल्या मेंदुला ते कसे मानवणार ? त्यांनी आपला हेका सोडला नाही. जडवाद्यांच्या मजबुत पाठींबा असल्याने आपले कोणी काही वाकडे करणार नाही या भ्रमात ते होते. शेवटी मात्र अजडवाद्यांनी आपल्या एकत्रित ताकदीने (कॅप्टन प्लॅनेट आठवा !) इ-काकांना त्यांच्या टॉपिक सकट नष्ट केले !

बोल विक्रमा, बोल. इ-काका एवढे कोणाच्या जिवावर उड्या मारत होते ? त्यांचे गर्वहरण नक्की कशामुळे झाले ? या प्रश्नाचे उत्तर तुला माहीत असूनही तु दिले नाहीस तर तुझ्याच डोक्याची १०० शकले हो़उन ती तुझ्याच पायावर लोळू लागतील.

सर्वज्ञ विक्रम बोलू लागला, इ-काकांच्या गमजा ए-दादाच्या पाठींब्यावर चालु होत्या. त्या ए-दादालाच उपरकराचार्यांच्या अनुग्रहांकित चेल्यांनी “महामायेने” सूक्ष्म करून लास-वेगासच्या कॅसिनोत अडकवुन ठेवले व मग लगोलग बंगलोर स्थित “आदी”मायेच्या अंगात शिरून बढाईखोर , पाखंडी इ-काकांचा गेम वाजवला.

विक्रमादित्याचे बोलणे संपताच वेताळ खांद्यावरून उडाला व थेट वडाच्या पारंबीला लटकू लागला. सात मजली हास्य करत म्हणाला “विक्रमा, तू बोलसास आणि फ़सलास ! मी परत मोकळा झालो !