शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४

194 वरती डाव सोडला --- !

194 वरती डाव सोडला --- !
सचिनचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झालेले आहे. पाकिस्तानातील मुलतान कसोटीत सचिन 194 धावांवर असताना, तेव्हा कप्तान असलेल्या द्रविडने डाव सोडला होता . याची संतप्त प्रतिक्रीया भारतात उमटली होती तर काहींनी संघाच्या हितासाठी घेतलेला धाडसी निर्णय असे त्याचे स्वागत केले होते. सचिनने आपली नाराजी तेव्हाही लपविली नव्हती पण नक्की काय घडले हे मात्र गुलदस्त्यातच होते. सचिनच्या या डावा दरम्यान प्रवीण आमर दोनदा निरोप घेवून आलेला सगळ्यानीच बघितले होते. डाव घोषित करताना गांगुली सुद्धा हजर होता व त्या वरून अनेक तर्क लढविले जात होते. सचिनने आपल्या आत्मचरित्रात या सर्व प्रकरणाचा विस्तृत उहापोह केलेला आहे. राहुल द्रविड हा किती कोत्या मनाचा खेळाडू आहे हेच यातून दिसून येते. झाले ते असे --


सामन्याच्या दूसर्या दिवशी सेहवागने 300 धावा केल्या होत्या. सचिनने शतक केले होते व नाबाद होता. चहापानाच्या बैठकीत 15 षटकांचा खेळ बाकी असताना डाव सोडायचे ठरले होते. चहापानानंतर थोड्याच वेळात प्रवीण आमरने निरोप आणला की धावांचा वेग वाढवा, डाव सोडायचा आहे. सचिनने यावर आमरेला सांगितले की क्षेत्ररक्षण पांगलेले असल्याने एकेरी धावाच मिळत आहेत पण डाव केव्हा सोडायचा हे बैठकीत ठरलेले आहे, आम्ही तसेच खेळतो आहोत. थोड्या वेळाने परत निरोप आला की पुढच्याच षटकात डाव सोडण्यात येणार आहे. सचिनला त्या षटकातला एकही चेंडू खेळायला मिळाला नाही. पाचव्या चेंडूवर युवराज बाद झाल्यावर द्रविडने डाव घोषित केला व सचिनला व्दिशतकापासून वंचित ठेवले. अर्थातच सचिन तेव्हा भडकला होता पण त्याने याची जाहिर वाच्यता केली नाही. दोन दिवसांनी द्रविड सचिनची नाराजी दूर करायला आला व संघाच्या हितासाठीच हा निर्णय घेतल्याचे सांगू लागला. तेव्हा सचिनने त्याला सांगितले की बैठकित ठरल्याप्रमाणे अजून एक षटक बाकी होते तेव्हा डाव सोडायचे काहीही कारण नव्हते. तसेही अजून एक षटक डाव लांबला असता तरी काही बिघडणार नव्हते ( भारताने हा सामना 1 डाव व 52 धावांनी जिंकला होता !). काही महिन्यापुर्वी सिडनीत द्रविड 91 वर असताना गांगुलीने डाव घोषित केला होता व त्याचा डूख मनात ठेवून द्रविडने हे कृत्य केले होते ! पण तेव्हा सामन्याचा चवथा दिवस होता, आघाडी 400+ होती व तेव्हा जिंकल्यास भारताला सामना व मालिका जिंकायची सुवर्णसंधी होती. तेव्हा गांगुलीने तिनदा निरोप धाडूनही द्रविड शतकासाठीच खेळत होता व त्याचा जोडीदार तेव्हा सचिनच होता ! गोलंदाजाना पुरेसा वेळ मिळावा म्हणून डाव सोडणे गरजेचे होते पण द्रविडला फक्त आपले शतक दिसत होते ! अर्थात हा सामना ऑस्ट्रेलियाने अनिर्णीत राखला ! सचिनने ही सगळी स्थिती समजावून दिल्यावरही राहुल आपल्या निर्णयाचे समर्थनच करत होता ! सचिनला तो असेही म्हणाला की तू अजूनही व्दिशतक करू शकतोस. या वर सचिनचे उत्तर होते की हो पण सुरवात 1 पासून करायला लागेल, 194 पासून नाही ! याच दरम्यान समालोचक असलेला संजय मांजरेकर द्रविडची कड घेत होता तेव्हा सचिनने त्यालाही झापले होते, पुढे संजय मांजरेकर सचिनच्या विरोधात बोलू लागला त्याचे हेच कारण असावे !

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

शरद पवार आणि त्यांचे दळभद्री राजकारण !

गेली अनेक दशके शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्र स्थानी आहेत. निवडणुक हरले म्हणून त्यांचे अस्तित्व पुसायची चूक कोणीही करणार नाही. पण पवार जे जे काही करतात त्याला राजकारण म्हणणे मला अजिबात पसंत नाही. पवारांनी आजतागायत राजकारणाच्या नावाखाली जे जे केले ते निव्वळ स्वार्थकारण होते. दगाफटक्याचे राजकारण करणारा औरंगजेब व पवार यात मला काहीही फरक वाटत नाही. सत्तेसाठी काहीही करण्याच्या त्यांच्या स्वभावाला राजकारण म्हणणे हे सुद्धा योग्य नाही. शरद पवार यांच्यात निश्चितच देशाचा नेता म्हणून मिरवण्याचे गुण आहेत पण संयम मात्र त्यांच्याकडे अजिबात नाही. सत्ता संपादनासाठी थांबायला लागते, योग्य वेळ साधायला लागते पण पवारांना हा लॉगकट कधीही मानवला नाही. “सत्तातुराणां न भयम न लज्जा” या उक्तीप्रमाणे पवारांनी सत्तेत शिरायला शॉर्टकटच कायम स्वीकारला. त्या साठी सर्कशीत सुद्धा बघायला मिळणार नाहीत अशा कोलांटयाउड्या मारल्या, जे बोलले त्याच्या नेमके उलट केले, ज्यांच्या खांद्यावर हात ठेवला त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला, ज्यांना दूषणे दिली त्यांनाच सत्तेची चाहुल लागताच मीठ्या मारल्या, स्वत:ला सेक्युलर म्हणवायचे व मग निवडणुकीत प्रचार करताना मात्र जोशी-महाजन असा जहरी प्रचार करायचा. मुस्लिमांचे तुष्टीकरण करायचे म्हणून १९९२ च्या मुंबई स्फोटात पवारांनी तेरावा काल्पनिक बॉम्ब मंदीरात फोडला होता. सोनियांच्या विदेशीपणाचा मुद्दा घेवून पवार कॉंग्रेसमधून बाहेर पडले पुढे सत्ता मिळते म्हणताच सरकारात सामील पण झाले ! २००९ च्या निवडणुकित तिसर्या आघाडीचे तुणतुणे वाजू लागताच पवार दोन्ही दगडावर पाय ठेवून होते पण कॉंग्रेस अधिक मजबूत झाल्यावर परत सोनियांच्या गोटात दाखल झाले. महाराष्ट्रात लोकसभेत व आता विधानसभेत अर्धी चड्डी त्यांना सलत होती पण निकालात लोकांनी त्यांचीच चड्डी उतरवल्यावर कोणी विचारायच्या आधीच त्यांनी भाजपाला बिनशर्त पाठींबा देवू केला.या सगळ्यांची गोळा-बेरीज म्हणजे लोकांचा विश्वास गमावणे ! आता या सगळ्यात राजकारण कोठे दिसते ? दगाबाजी, लांगुलचालन व वाटेल तश्या कोलांट्या उड्या म्हणजे राजकारण का ? कोठूनही सत्तेला चिकटून राहणे म्हणजे राजकारण का ?

१९८० च्या महाराष्ट्रातील निवडणुकात पवारांच्या नेतृत्वाखाली पुलोदला चांगल्या जागा मिळाल्या होत्या. सेना तर तेव्हा राज्यात कोठेच नव्हती व भाजपा पुलोदच्या प्रयोगाला अनुकुल होता. पाच वर्षे विरोधी बाकावर जर पवार बसले असते तर पुढच्या वेळी त्यांची बारी नक्कीच आली असती. पण आधी सत्ता भोगून झालेल्या पवारांना सत्तेशिवाय अजिबात करमत नव्हते. काही वर्षातच ते सरळ कॉंग्रेसवासी झाले. मुख्यंमंत्री, केंद्रीय मंत्री व परत मुख्यमंत्री असा प्रवास चालू होता. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर कॉग्रेसमध्ये सत्तासंपादनाची लढाई झाली त्यात नरसिंह राव सर्वाना पुरून उरले. पवार, माधवराव सिंदीया, अर्जुन सिंग, पायलट हे गुढघ्याला बाशिंग बांधून रावांना डच्चू देवू पहात होते पण रावांच्या राजकारणाने या सगळ्यांना पार निष्प्रभ करून टाकले. अल्ममतातले सरकार रावांनी बहुमतात आणले, मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री करून देशाचे आर्थिक गाडे रूळावर आणले, पंजाबमध्ये अतिरेक्यांचा बीमोड करून तिथे निवडणुका घेतल्या, काश्मीरात पण निवडणुका घेवून दाखवल्या. बाबरी पडल्यावरचा धुरळा खाली बसायच्या आत त्यांनी संघावर बंदी घातली भाजपाची गुजरात, मध्य प्रदेश व दिल्लीतील सरकारे बरखास्त करून केंद्रात सत्ता स्थापण्याचा भाजपाचा मनसुबा पुढची १० वर्षे यशस्वी होवू दिला नाही. पाच वर्षात गांधी-नेहरू परिवाराचे अस्तित्वच त्यांनी पुसून टाकले होते ! याला राजकारण म्हणतात ! संस्थाने भारतात विलीन करताना सरदार पटेलांनी केले ते राजकारण, बांगला मुक्त करून पाकिस्तानला सिमला करारावर सह्या करण्यास इंदीरा गांधीनी भाग पाडले ते राजकारण, अनेक वर्षे विसा नाकारणार्या अमेरिकेला एका शब्दानेही न विचारता पंतप्रधान झाल्यावर पायघड्या घालून स्वागत करायला भाग पाडणार्या मोदींनी केले ते राजकारण !

स्वत:चा स्वार्थ नसलेले राजकारण पवारांनी केल्याचे एकतरी उदाहरण आहे का ? पवार महाराष्ट्रात गुन्हेगारांचे गॉडफादर झाले. ठाकूर व कलानीला आमदारकी देवून राजकारणाचा दरवाजा त्यांनी गुन्हेगारांसाठी सताड उघडला व आज “कोठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा ?” असे विचारायची वेळ आली आहे. मिंध्या पत्रकारांनी निदान आता तरी पवारांच्या राजकारणाचे गुणगान थांबवावे व त्यातली सत्तेची अगतिकता उघड करावी !

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०१४

ब्लॉगची पी.डी.एफ आवृत्ति.

अनेक वाचकांनी ब्लॉगची पी.डी.एफ आवृत्ति मिळेल का असे विचारले होते.

काही वर्षापुर्वी अशी आवृत्ति उतरवून घ्यायचा दुवा दिलेला होता पण मग पुढे तो सतत अद्ययावत ठेवणे शक्य होत नव्हते.

आता मात्र  पी.डी.एफ़. आवृत्ति अद्ययावत केलेली आहे. अगदी सुरवातीपासूनच्या सर्व पोस्टसचे संकलन इकडे आहे व फाइल सुद्धा फक्त ४ एम.बी. ची आहे.

तेव्हा ज्यांना निवांतपणे ब्लॉग वाचायचा आहे त्यांनी ती जरूर उतरवून घ्यावी व आपले अभिप्राय मला जरूर कळवावेत.

या दुव्यावर टीचकी मारा व संपूर्ण ब्लॉग पी.डी.एफ. स्वरूपात उतरवून घ्या !

https://www.mediafire.com/?vj4xg41zhk2vzdx


धन्यवाद !