मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०१०

वाचन’रंग’ !अभ्यास मी एका जागी बसून करीत असे,अगदी सलग चार तास सुद्धा ! पण कादंबरी वाचताना मात्र ते शक्य होत नसे ! कादंबरी जशी जशी उत्स्कूता वाढवित जाते तशा तशा बसण्याच्या जागा व स्थितीत सुद्धा नकळत फरक पडतोच ! हीच गंमत टीपली आहे चि. प्रसाद व प्रियांकाच्या मदतीने !

वाचन’रंग’ उलगडण्यासाठी वरील छायाचित्रावर टीचकी मारा !

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०१०

मोबाईलखोरांना कसे आवरायचे ?

सीमेपलीकडचे आतंकवादी, तसेच युपी-बिहारी घुसखोरांमुळे राष्ट्र व महाराष्ट्र बेजार झाला आहे, लाचखोर सरकारी यंत्रणेपुढे सामान्य माणूस हतबल आहे, हरामखोर नेत्यांमुळे सगळेच भरडून निघत आहेत. या सर्व खोरांना आता अजून एक जमात सामील झाली आहे आहे ती म्हणजे मोबाईलखोर ! मोबाईलचे रूपयातले मूल्य जरी कमी झाले आहे तरी त्याचे उपद्रवमुल्य जबर वाढले आहे ! या कंपन्यांच्या गळाकापू स्पर्धेपायी अनेक वैविध्ये असणारी मोबाईल उपकरणे कमी किमतीत बाजारात आणली गेली व “माकडाच्या हाती कोलीत” असा प्रकार त्यात स्पीकरची सुविधा दिल्यावर झाला ! आज सामान्य लोकलकरांना या मोबाईल स्पीकरचा ठणठणाट सहन करीत प्रवासाचे दिव्य करावे लागत आहे. तसे तक्रार केल्यास “सहप्रवाशांना उपद्रव” या कलमाखाली मोबाइलवर गाणी वाजवणार्यावर कारवाई पोलिस करू शकतात पण लोकलमधली गर्दी बघता हे व्यवहारात शक्य नाही. गर्दीत कधी कधी तर कोणाचा मोबाईल कोकलत आहे हेच कळत नाही. (अर्थात अशक्यही नाही !). काही मिनिटे वाट बघून मी स्वत: मात्र अशा खोरांना हीसका दाखवितो, एकाने आवाज दिला की अनेक त्रस्त लोक त्या आवाजात आवाज मिसळून मोबाईलखोराला स्पीकर बंद करण्यास भाग पाडतात पण पुढाकार कोणी घ्यायचा यातच शेवटचा थांबा येतो किंवा दरम्यानच्या काळात तो उपद्रवी उतरून सुद्धा गेलेला असतो. मी नमनालाच शिवी हासडून मोबाइलखोराला गार करतो पण सगळ्यांनाच हे जमेल असे नाही, तसे मला सुद्धा ताकदीचा अंदाज घेवून केव्हा केव्हा कानात नुसता इयरफोन घालून स्वत:चा बचाव करावा लागतो ! तुम्हाला गाणे ऐकायचे नसेल वा दूसर्या कोणाचे खपवून घ्यायचे नसेल तर नुसता इयरफोन कानात घालून बसावे, लोकलच्या तिकिटात विमानप्रवासाचा आनंद मिळतो ! तसे उदारपणे आपला इयरफोन त्या मोबाइलखोराला तुम्ही तात्पुरता ऑफर सुद्धा करू शकता.


अर्थात “सांगताही येत नाही, सहनही होत नाही” अशा संभ्रमात पडू नका. खाली दिलेले काही उपाय गांधीवादी आहेत व आपापल्या वकुबा प्रमाणे करून बघायला हरकत नाही, अर्थात विपरीत परीणाम झाल्यास मी जबाबदार नाही !

तुम्ही जर खिडकीजवळ बसला असाल व तुमच्या बाजुला कोणाचा मोबाईल कोकलत असेल तर “बघु कोणते मॉडेल आहे” असे म्हणत त्याचा मोबाइल हातात घ्या, लगेच तो खिडकीबाहेर ठेवा, माझ्या अंगाला जरी हात लावलास तरी मोबाईल खिडकीबाहेर पडेल हे त्याला नम्रपणे सांगा व कुर्ल्याला(च) उतरून गाडी सुरू होताना बाहेरून मोबाइल ताब्यात घेण्याची नम्र विनंती करा. तुमचा मोबाइल जर हजार बाराशेचा असेल व समोरच्याचा जर भारी असेल तर हा उपाय लय भारी सिद्ध होतो !


“आयला कसली भारी गाणी आहेत हो तुमच्याकडे “ अशी साखरपेरणी करीत त्या मोबाइलखोराला लोकलच्या टफावर चढवा. लगेच नीलदंत तंत्राचा वापर करून ती गाणी मला पण हवीत असा हट्ट धरा. अर्थात गाणी आपसूकच बंद करून तो ती गाणी मोठ्या उत्साहाने तुम्हाला सेंड करू लागतो ! याने एकतर प्रवास तरी शांततेत संपतो वा त्याची बॅटरी तरी संपते ! सुंठीवाचून गेला की नाही खोकला ?!


“अरे ही गाणी डुप्लिकेट आहेत, बहुदा कोणा ऑर्केस्ट्रामधल्या कलाकाराच्या आवाजातली आहेत, तुला कोणीतरी xx बनविले” असे म्हणा किंवा “आवाज एवढा दणदणीत वाटत नाही, स्पीकर बिघडला की काय ? सेकंडचा साला हाच प्रोब्लेम आहे” हे शेरे सुद्धा असरदार शाबित होतात. कधी अंबानीचा बाप काढून “याच्या बापाचं स्वप्न खरेच साकार झाले, कोणीही आजकाल मोबाईल घेतो, अडाणी माणसाला कसे समजणार इयरफोन काय प्रकार असतो ते ?” अशी खंत व्यक्त करावी. न चालणारे पाच, दहा, चार वा आठ आण्याचे नाणे काढून मोबाइलखोराच्या हातावर ठेवल्यास त्या बिचार्याची अवस्था “जोर का झटका धीरे से लगे” अशी होते, अर्थात मधल्या काळात तुमचे स्टेशन मात्र यायला हवे !


समजा जर कोणी जुनी गाणी वाजवित असेल तर “काय लेका सैगलची / बाबा आदमके जमानेकी / रडकी गाणी ऐकतोस, जरा उडती गाणी लाव की” असा टोमणा मारावा किंवा vice-versa ! तसे टोमणे बर्याच प्रकारे मारता येतात पण मोबाईलखोरांचा बुद्ध्यांक बुद्धयाच कमी असतो हे ध्यानी घ्यावे. “आयला तुझा मोबाइल वाजतोय होय, मला वाटले कोणी भिकारीच गाणी गात भीक मागत आहे !” हे किंवा “घेतलास ना सेकंड हॅन्ड / चायनामेड ? थोडी पदरमोड केली असतीस तर branded मिळाला असता, त्याच्या बरोबर इयरफोन फूकट मिळतो” असे हळहळायचे. जर त्याने रफीची गाणी लावली असतील तर किशोरकुमार वाजवायची फर्माईश करायची, हे गाणी आहे का ? ते गाणे आहे का ? तुला माझ्याकडची गाणी देवू का ? अशी विचारणा सतत करून त्याचा गोंधळ उडवून देण्यात सुद्धा मजा येते. कधी तुझ्याकडे अजून कोणती आहेत बघू असे म्हणत त्याच्या मोबाइलचा ताबा आपल्याकडे घ्यायचा. हिन्दी गाणी लावली असतील तर मराठी वाजव असा आवाज दिल्यास मोबाइखोराची मोलती बंद होते असा सॉलिड अनुभव आहे !


अर्थात तुमच्याकडे डबा दणदणवून टाकणारा स्पीकर फोन असल्यास खूपच गमती जमती करता येतात. त्याने जे गाणे लावले असेल त्याच्या नेमक्या उलट मूडचे गाणे त्याच्यापेक्षा मोठ्या आवाजात लावल्यास काही काळ गोंधळ उडतो व पब्लिकच “दोनो भी अपना अपना स्पीकर बंद करो” असा निवाडा देते. मी एकदा असा प्रयोग केल्यावर मात्र भलताच रीझल्ट मिळाला होता. झाले असे की एकजण नवीन गाणे वाजवित होता. त्याला गप्प करण्यासाठी मी माझ्या मोबाइलचा स्पीकर ऑन करून “चढता सूरज धीरे धीरे” ही एवरग्रीन कव्वाली चालू केली. आवाज अगदी टीपेला पोचल्यावर पब्लिकचा माझ्या भोवती गराडाच पडला. तो सुद्धा आपला मोबाइल थंड करून कानात प्राण आणून कव्वाली ऐकू लागला. त्या कव्वालीच्या प्रत्येक कडव्याला मैफलीत मिळते तशी दाद मिळू लागली ! गाणे संपल्यावर “वन्स मोर”चा जल्लोष झाला. मला झक मारीत ते गाणे पुन्हा वाजवावे लागले. माहौल एकदम बदलून गेला, डब्यात एकदम पिन ड्रॉप सायलेन्स ! जो तो त्या गाण्यात अगदी तल्लीन झाला. पनवेल येईपर्यंत त्या गाण्याची आवर्तने चालू होती. पनवेल स्थानकात उतरल्यावर पुढची 10 मिनीटे – अर्थात बॅटरीचे शेवटचे टोक उरे पर्यंत मी लोकांना ते गाणे ब्ल्युटूथने पाठवित होतो !हे लिहीताना उगाच डोक्यात भुंगा शिरला, म्हणजे “लोकांना खरेच ते गाणे आवडले होते की …………….?”

पाच हजाराचे बक्षिस !

सरकारी नोकरीत सब घोडे बारा टक्के हाच न्याय असतो व ज्याला आपण गुणवंत आहोत असे वाटते त्याने सरळ बाहेरची वाट धरावी हा शिरस्ता असतो ! तुम्ही काम करा , करू नका, पाट्या टाका, ठरलेल्या तारखेला तुम्हाला वेतनवाढ मिळणार असतेच. पण तरीही काही महाभाग असतात की ज्यांना काही वेगळे करायची खुमखुमी असते, सरकारी यंत्रणेत खपून सुद्धा त्यांचा वरचा मजला रीकामा नसतो ! आपल्याला सरकार एवढा पगार देते आहे त्यामानाने थोडे काम केले पाहिजे या भावनेने पछाडलेले काही असतात. असाच एक अभियंता आमच्या रूग्णालयाच्या विद्युत उपकरणांची निगराणी करायला होता. रूग्णालयाच्या वापराच्या मानाने येणारे वीजेचे बिल खूपच आहे हे वरीष्ठांना पटवून द्यायचा त्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यावर या पठ्ठ्याने स्वत:च आगावूपणा करून एक प्रणाली विकसित केली व बिनखर्चात राबविली सुद्धा ! आणि काय चमत्कार, रूग्णालयाच्या विजेच्या बिलात दर महीना लाखाची बचत झाली ! वरीष्ठांनी कितीही दडपायचे म्हटले तरीही ही खवर त्या विभागाच्या प्रमुखापर्यंत पोचली व त्याने ती उपाध्यक्षांच्या कानावर घातली. उपाध्यक्षांनी लगेच रूग्णालयाला भेटा देवून सर्व पाहणी केली, मागची बिले बघून बचत झाल्याचे मान्य केले व हा उपक्रम राबविणार्या अभियंत्याचे जाहीर कौतुकही केले. एवढेच नाही, त्याला चक्क पाच हजाराचे इनाम घोषित केले !


विभागप्रमुखानी लगेच तसा प्रस्ताव उपाध्यक्षांच्या कार्यालयाला सादर केला. उपाध्यक्षांनी तो लगोलग वित्त विभागाकडे सत्वर कारवाईसाठी धाडला. वित्त विभागाच्या प्रमुखानी सविनय उपाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले की नियमाप्रमाणे ते फक्त एक हजाराचेच बक्षिस देवू शकतात ! उपाध्यक्ष भडकले ! माझा शब्द म्हणजे शब्द ! ते काही नाही, विश्वस्त मंडळाच्या आगामी मासिक बैठकित त्वरीत ही मर्यादा वाढवायचा प्रस्ताव संमत करून घेण्याचे त्यांनी सचिवांना आदेश दिले ! त्या प्रमाणे प्रस्ताव रीतसर पारीत झाला, अर्थात या काळात निदान चार महीने तरी गेले ! या काळात पोटदुखीने हैराण झालेले अनेक जण कामाला लागले होतेच. त्या अभियंत्याला बक्षिस मिळू नये म्हणून जोरदार आघाडी उघडली गेली. निनावी तक्रारींचा भडीमार सुरू झाला. होत असलेल्या वेळकाढू पणाने तो अभियंता सुद्धा ढेपाळला. त्यातच त्याचा कोणी जाणकाराने बुद्धीभेद केला ! मर्यादा वाढणे कठीण आहे, बरे, जरी वाढली तरी ती पुर्वलक्षी प्रभावाने मिळणार नाही. त्या पेक्षा तू वेतनवाढ माग ! एरवी तू दोन वर्षात निवृत्त होणारच आहेस, यात तुझा जास्त फायदा आहे, पेन्शन जास्त बसेल. त्या अभियंत्याने रोख बक्षिस नको मला वेतनवाढच द्या असा विनंती अर्ज सादर केला. विरोधी कंपूने वित्त विभागात फिल्डींग लावलेलीच होती. वित्त विभागाने बक्षिसावर जोवर निर्णय होत नाही तोवर या अर्जावर कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी भूमिका घेतली.


नंतरच्या काळात काही विघ्नसंतोशी थेट उपाध्यक्षांच्या कानाला लागले. उपाध्यक्षांचे मत प्रतिकूल झाल्यावर बक्षिसाची फाइल अडगळीत पडली ! दोन वर्षे अशीच गेली. बिचारा तो अभियंता निवृत्त सुद्धा झाला. अर्थात जाहीर झालेले बक्षिस मिळणार नसेल तर निदान वेतनवाढ तरी द्या अशी लिखापढी त्याने चालू केली. अर्थात तो नोकरीत असताना त्याला पुरून उरलेले त्याला निवृत्त झाल्यावर थोडेच भीक घालणार होते ? त्याच्या सर्व अर्जाना फाइल केले गेले ( केराची टोपली असे वाचा !).


यथाकाल उपाध्यक्षांची टर्म संपली. नवी नेमणूक निदान तीन तरी महीने होणार नव्हती ! उपाध्यक्षांची सर्व कामे या काळात अध्यक्षच बघणार होते. निवृत्त झालेला कर्मचारी त्याला घोषित झालेली इनामाची रक्कम मिळण्यासाठी पायपीट करीत आहे हे आम्हाला सुद्धा पटत नव्हते. त्याचा हक्क त्याला मिळवून द्यायचा आम्ही चंग बांधला. आमच्या प्रेरणेने तो अभियंता परत नव्या उमेदीने कामाला लागला. आपल्या विभागप्रमुखांना या प्रकरणाची तड लावायची त्याने अर्जी केली व विभागप्रमुखांनीसुद्धा या प्रकरणाचा एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लागावा असे साकडे अध्यक्षांना घातले. अर्थात त्याच्या आधी उपाध्यक्ष कार्यालयात दोन वर्षे अडगळीत पडलेली फाइल आम्हाला शोधायला लागली. विभागप्रमुखानी अथ पासून इति पर्यंत सर्व हकीगत बयान केली होती व अंतिम निर्णय अध्यक्षांनी घ्यावा असे सूचविले होते. अध्यक्ष मानवतावादी दृष्टीकोन ठेवून त्या अभियंत्याला न्याय मिळवून देतील अशी त्यांना सुद्धा खात्री वाटत होती.


सहीला आत गेलेली फाइल बाहेर येताच मी तिच्यावर झडपच घातली. सायबाचा शेरा नजरेखालून घालून निराशपणे मी ती फाइल माझ्या सिनीयर सहकार्यांना दाखविली. “वा वा, याला म्हणतात खरा प्रशासक, कसे एक घाव दोन तूकडे केले की नाही आपल्या साहेबांनी ? उगाच भावनिक-बिवनिक न बनता सरळ शेरा मारला आहे “Reward can’t become right …..File “! तुम्ही उगीच त्या अभियंत्याला खोटी आशा दाखविलीत ! माझ्या सहकार्यांनी माझ्यावरच टोलेबाजी सुरू केली ! मला काही हे अजिबात पटले नाही ! बक्षिस मागितले गेले नव्हते, दिले गेले होते हा मुद्दा इथे लक्षात घेतलाच गेला नव्हता. त्या साठी मर्यादा वाढविणारा प्रस्ताव सुद्धा विश्वस्तांच्या बैठकीत पास झाला होता ! त्यानंतर अनेकांनी पाच हजाराची बक्षिसे घेतली सुद्धा होती ! आणि एकदा उच्चपदस्थ व्यक्तीने जाहीर केलेले बक्षिस देणे हे खरे तर प्रशासनाचे कर्त्वव्य आहे, यात भावनेचा प्रश्न येतोच कोठे ? याचा पाठपुरावा करण्यात त्या अभियंत्याची चूक तरी कशी ? तो आपल्या हक्कासाठीच भांडत होता, मिळालेले बक्षिस मिळावे, बक्षिस मिळावे म्हणून नव्हे ! खरेतर झाली चूक मोठ्या मनाने कबूल करून, उशीर झाल्याबद्दल माफी मागून त्या अभियंत्याला आपल्या दालनात बोलवून सन्मानाने बक्षिस / प्रमाणपत्र दिले गेले असते तर प्रशासनाची शान नक्कीच वाढली असती --- पण लक्षात कोण घेतो ?अर्थात झाले हे बरेच झाले, मला सतत वाटायचे की आपण गोदीच्या संगणक विभागात एवढे चांगले काम केले, प्रशासनाचे लाख काय कोट्यावधी रूपये वाचविले, त्याची कोठेतरी प्रशासकीय पातळीवर कदर व्हायला हवी होती. या प्रकरणानंतर ती खंत मात्र माझ्या मनातुन कायमची गेली !

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

हो, देव आहे !

स्वत:ला नास्तिक, अनीश्वरवादी म्हणवणार्या विज्ञानाच्या प्राध्यापकांचे नवीन विद्यार्थीसाठीचे पहिलेच व्याख्यान असते. प्राध्यापक महाशय देव हा विज्ञानाच्या प्रसाराला कसा मारक ठरत आहे हे ठसवायच्या प्रयत्नात असतात. एका विद्यार्थाला ते उभे रहायची खूण करतात आणि त्या दोघात प्रश्नोत्तरे चालू होतात.

प्राध्यापक – तू देव आहे असे मानतोस का ?
विद्यार्थी – नि:संशय ! देव आहे !
प्राध्यापक – मग देव चांगला असतो का ?
विद्यार्थी – नक्कीच !
प्राध्यापक – देव सर्व शक्तीमान असतो का ?
विद्यार्थी – हो !
प्राध्यापक – माझा भाउ कर्करोगाने मेला, तो बिचारा देवाची प्रार्थना करीत होता. आपण सगळेच आजारी माणूस बरा व्हावा म्हणून काही प्रयत्न करीत असतोच. पण देव मात्र काहीच करीत नाही ! तरी तो चांगला ? काय ?
( यावर विद्यार्थी काहीच बोलत नाही )
प्राध्यापक – अरे तू काहीच का बोलत नाहीस ? परत विचारतो , देव चांगला असतो का ?
विद्यार्थी – होय !
प्राध्यापक – सैतान चांगला असतो का ?
विद्यार्थी – नाही.
प्राध्यापक – मग हा सैतान येतो तरी कोठून ?
विद्यार्थी – देवानेच सैतान सुद्धा जन्माला घातला आहे.
प्राध्यापक – आता कसे अगदी बरोब्बर बोललास ! आता मला सांग की जगात पाप असे काही असते का ?
विद्यार्थी – हो.
प्राध्यापक – पाप सगळीकडे आहे, खरे ना ? आणि या सर्वाचा कर्ता-सवरता देवच आहे नाही का ?
विद्यार्थी – हो.
प्राध्यापक – मग आता सांग की पापाचा बाप कोण ?
( विद्यार्थी निरूत्तर )
प्राध्यापक – जगात आजार असतात का ? व्यभिचार ? द्वेष ? कुरूपता ? या सर्व गोष्टी जगात असतातच ना ? हो की नाही ?
विद्यार्थी – होय सर.
प्राध्यापक – मग हे सगळे कोणी केले ?
( विद्यार्थी निरूत्तर )
प्राध्यापक – विज्ञान सांगते की पंचेद्रीयाद्वारे आपल्याला आजुबाजूच्या गोष्टींची जाणीव होते. आता मला सांग की तू कधी देव बघितला आहेस का ?
विद्यार्थी – नाही सर.
प्राध्यापक – तू देवाचा आवाज तरी ऐकला आहेस का ?
विद्यार्थी – नाही सर.
प्राध्यापक – देव आहे अशी जाणीव तुला कधीतरी झाली आहे का ? त्याची चव म्हणा किंवा गंध किंवा स्पर्श तरी ?
विद्यार्थी – खरे आहे सर, मला अशी काहीही जाणीव झालेली नाही.
प्राध्यापक - तरीही देव आहे असे तुला वाटते ?
विद्यार्थी – हो !
प्राध्यापक – अनुभवजन्य, वस्तुस्थितीजन्य वा प्रत्यक्षप्रमाणाच्या आधारे शास्त्र म्हणते की देव अस्तित्वात नाही. तुला यावर काय म्हणायचे आहे ?
विद्यार्थी – काहीही नाही, पण तरीही देव आहे अशी माझी श्रद्धा आहे.
प्राध्यापक – खरे आहे ! श्रद्धा, विश्वास ! आणि हीच तर शास्त्राच्या मार्गातली धोंड आहे !
विद्यार्थी – सर, उष्णता असे काही असते का ?
प्राध्यापक – हो.
विद्यार्थी – मग थंड असे काही असते का ?
प्राध्यापक – हो.
विद्यार्थी – नाही सर. थंड असे काहीही नसते !
( एवढा वेळ प्राध्यापक प्रश्न विचारीत असतात आणि विद्यार्थी बचावात्मक भूमिकेत असतो ! आता प्रथमच विद्यार्थी प्राध्यापकाच्या प्रतिपादनाला आवाहन देतो ! या नाट्यमय कलाटणीने वर्ग स्तब्ध होतो.)
विद्यार्थी – सर, तुमच्या शास्त्रात भरपूर उष्णता आहे, अती उष्णता सुद्धा आहे, अगदी प्रचंड उष्णता सुद्धा आहे. तशीच कमी उष्णता व उष्णतेचा अभाव सुद्धा आहे.
पण थंड असे काही नाही. आपण उणे 458 एवढी उष्णता मोजू शकतो, या पुढे मोजू शकत नाही. पण थंड असे मात्र काहीही नाही. उष्णतेच्या अभावाला आपण ढोबळपणे थंड असे म्हणतो.थंड असे काही आपण मोजू शकत नाही. उष्णता म्हणजेच उर्जा. थंड म्हणजे उष्णतेच्या विरूद्ध स्थिती नव्हे, तर उष्णतेचा अभाव.
(आता वर्गात टाचणी पडेल तरी आवाज घुमेल एवढी शांतता.)
प्राध्यापक – मान्य. मग याच मताने मग अंधार नसेल तर रात्र तरी कशी असेल ?
विद्यार्थी – सर, तुम्ही परत चूकता आहात. अंधार म्हणजे कशाचा तरी अभावच ! जसे कमी प्रकाश, साधारण प्रकाश , प्रखर प्रकाश, विजेचा प्रकाश – प्रकाश नाही अशी सतत स्थिती असल्यास तुम्ही तिला अंधार आहे असे म्हणता ! हो ना ? तेव्हा प्रत्यक्षात काळोख असे काही नाहीच. तसे काही खरेच असते तर अंधार तुम्हाला अधिक गहीरा करता आला असता. आला असता ना करता ?
प्राध्यापक – तुला नक्की म्हणायचे तरी काय आहे ?
विद्यार्थी – मला म्हणायचे आहे की तुमचे पदार्थ विज्ञानाचे सिद्धांत हेच एक थोतांड आहे !
प्राध्यापक – थोतांड ? ते कसे काय बुवा ?
विद्यार्थी – तुम्ही द्वैतवाद हा सिद्धांत मानता. तुमचे असे म्हणणे आहे की जीवन आहे तसाच मृत्यूही आहे. देव चांगला असेल तर वाईटही असतोच. तुम्ही देव ही कल्पना वस्तूप्रमाणे मोजू पाहता. सर, शास्त्राला अजून विचार म्हणजे काय ते ही सांगता आलेले नाही. तुम्ही शास्त्रात विद्युत आणि चुंबकिय शक्तींचा वापर करता पण ती तरी कोणी कधी बघितली आहे ? त्याचे तरी तुम्हाला कोठे धड आकलन झाले आहे ? तुम्ही जन्म आणि मरण एकमेकांच्या विरूद्ध समजता तेव्हा तुम्ही मरणाचा वेगळा पुरावा देवू शकत नाही या सत्याकडे डोळेझाक करता ! मरण म्हणजे जगण्याच्या विरूद्ध स्थिती नाही तर जिवंतपणाचा अभाव म्हणजे मरण !
सर, आता मला जरा सांगा की तुम्ही विद्यार्थांना डार्विनचा उत्क्रांदीवाद, माकडापासून माणूस झाला, असे शिकविता ना ?
प्राध्यापक – तुला जर नैसर्गिक उत्क्रांतीवाद असे म्हणायचे असेल तर होच मुळी , मी हेच शिकवितो.
विद्यार्थी – मग ही जी काही उत्क्रांतीवादाची प्रक्रीया, माकडाचे माणूस होणे, तुम्ही कधी आपल्या डोळ्याने बघितली आहे का ?
(प्राध्यापक नुसतेच हसून मानेने नकार देतात, त्यांना आता हा वाद कोठे जाणार हे लक्षात येते )
विद्यार्थी – उत्क्रांतीवादाची प्रक्रीया कोणी बघितली नाही, यात सातत्य आहे असेही कोणी सिद्ध करू शकत नाही तर मग सर तुम्ही तुमचे मत मुलांवर लादत आहात असे म्हणायचे का ? मग तुम्ही शास्त्रज्ञ आहात की धर्मगुरू ?
(वर्गात एकच खळबळ माजते )
विद्यार्थी – या वर्गातल्या कोणीतरी प्राध्यापकांचा मेंदू बघितला आहे का ?
( सगळा वर्ग हास्य कल्लोळात बुडून जातो )
विद्यार्थी – असा कोणीतरी आहे का जी ज्याने यांचा मेंदू ऐकला, अनुभवला, त्याला स्पर्श केला, त्याचा गंध घेतला ? कोणीही नाही. मग अनुभवजन्य, वस्तुस्थितीजन्य वा प्रत्यक्षप्रमाणाच्या आधारे शास्त्र म्हणते की तुम्हाला मेंदूच नाही ! सर, तुमच्या विषयी पुर्ण आदर ठेवून विचारतो की मग तुमच्या शिकविण्यावर आम्ही विश्वास का ठेवायचा ?
( वर्ग एकदम शांत. प्राध्यापक त्या विद्यार्थाकडे एकटक पाहत आहे, त्यांचा चेहरा भंजाळलेला. )
प्राध्यापक – मला वाटते की या विश्वासाच्या गोष्टी आहेत.
विद्यार्थी – अगदी बरोबर सर – विश्वास हाच देव व माणूस यातला दुवा आहे. विश्वासावरच जग चालले आहे, हा विश्वासच चराचरांना प्रेरणा देतो, जीवन देतो !

(टीप – हा इंग्रजी संवाद कोणीतरी खूप वर्षापुर्वी मला फॉरवर्ड केला होता, पण काही महीन्यापुर्वी मात्र आलेल्या इमेलमध्ये हाच संवाद प्रत्यक्ष वर्गात घडला असल्याची व तो विद्यार्थी दूसरा तिसरा कोणी नसून एपीजे अब्दूल कलाम आझाद असल्याची पुस्ती जोडली आहे. माझ्या माहीतीप्रमाणे हे खरे नसावे. कोणी यावर अधिक प्रकाश टाकू शकेल का ? )

जेते आणि पराभूत – मनोवृत्तीतला नेमका फरक !

1. विजेते उत्तरावर लक्ष केंदीत करतात तर पराभूत समस्येवर !
2. विजेते दोष स्वीकारतात तर पराभूत झालेले दोषारोप करत सूटतात !
3. विजेत्यांना संकट हीच संधी वाटते तर पराभूत संकटांची रडकथा सांगत बसतात !
4. जेत्यांना भविष्यात जगायला व भूतकाळातून शिकायला आवडते तर हरलेले भूतकाळाच्याच आठवणीत रमलेले असतात !
5. जेते वचनाला जागतात, पक्के असतात तर पराभूत बोल-बचन !
6. जेते असाध्य ते साध्य करायचा प्रयास करीत असतात तर पराभूत कारणे शोधत बसतात !
7. जेते नेहमीच व्यक्तीमत्व विकासाला प्राधान्य देतात तर पराभूतांना त्याला महत्व द्यावे असे वाटतच नाही !
8. जेते संकटाला शिंगावर घेतात व भिरकावून देतात पराभूत मात्र संकटाच्या चाहुलीनेच अर्धमेले होतात !
9. जेत्यांच्या आकांशापुढे गगन ठेंगणे असते, पराभूत मात्र डबक्यातच सुखी असतात !
10. जेते सतत काही सकारात्मक करण्यात मग्न असतात तर पराभूत कृतीशून्य असतात !
11. जेते अपयशसुद्धा पचवतात, त्यातुन शिकतात, पराभूत मात्र अपयशी होण्याचा भयगंड सतत बाळगून असतात !
12. ध्येय साध्य करण्यासाठी जेते अनेक युक्त्या-प्रयुक्त्या योजतात तर पराभूत मात्र घसीटे-पसीटे मार्ग चोखाळून वेगळ्या परीणामाची अजब अपेक्षा बाळगतात !
13. जेते आपले उद्दीष्टे ठरवितात , पराभूतांपुढे कसले उद्दीष्टच नसते !
14. जेते नियोजन करतात तर पराभूत नियोजन शून्य असतात !
15. जेते म्हणतात की शिकणे ही कधीही न संपणारी प्रोसेस आहे तर पराभूत मात्र अर्धवट ज्ञानातच धन्यता मानतात !
16. जेते नम्र असतात तर पराभूतांना अहंगंड असतो !
17. जेते रोजच्या रोज आपले काम अजून कुशलतापुर्वक करायला बघतात तर पराभूत अल्प संतूष्ट असतात !
18. जेते कष्टाळू असतात तर पराभूत कष्ट टाळू !
19. जेते एकदा एखादी जबाबदारी घेतेली की त्यात तन मन धन झोकून देतात तर पराभूत मात्र धरसोड वृत्तीचे असतात !
20. जेते सातत्याने व नैतिकता पाळून आपले ध्येय साध्य करतात तर पराभूत पहिल्या अडथळ्यालाच काढता पाय घेतात !
21. जेत्यांना वेळेचे योग्य नियोजन जमते व आपल्या धेयपुर्तीसाठी ते वेळ देऊ शकतात, पराभूतांना वेळेचे नियोजन जमत नाही व नको त्या गोष्टीत ते वेळ वाया घालवित असतात.

22. जेते जागेपणी स्वप्ने बघतात तर पराभूतांना मात्र स्वप्नातच जगायला आवडते !
23. जेते शक्यतांचा विचार करतात तर पराभूत अशक्य काय ते बघून काम टाळतात !
24. जेते नि:शंक असतात तर पराभूत शंकासूर !
25. जेते आपले भाग्य विधाते असतात तर पराभूत भाग्यवश !
26. जेते आपल्याला जेवढे मिळते त्याहुन जास्त देतात, पराभूत मात्र सतत आशाळभूत असतात !
27. पब्लिक जर योग्य मार्गाने जात नसेल तर जेते आपला वेगळा मार्ग निवडतात, पराभूत समूहाबरोबर फरफटले जातात !
28. जेते विचार करून नेतृत्व स्वीकारतात तर पराभूत त्या पेक्षा गुमामगिरी पत्करतात !
29. जेते उत्तम श्रोते असतात, पराभूत दूसर्याला बोलूच देत नाहीत !
30. एकच काम अनेक प्रकारे करायचे कसे हे जेत्यांना माहीत असते तर पराभूत धोपट मार्गाला सोडत नाहीत !
31. विविध प्रकारे आपले ज्ञान जेते अद्ययावत ठेवत असतात त्या करीता पैसे गुंतवितात, पराभूतांना मात्र हा खर्च उधळपट्टी वाटते व छानछोकीच्या वस्तूंवर पैसा उधळून ते खोटी प्रतिष्ठा मिळवू पाहतात !
32. जेते दूसर्यांना जिंकायला मदतीचा हात पुढे करतात, पराभूताला स्वार्थापुढे दूसरा कोणी दिसतच नाही !
33. जेते समविचारी माणसांना मित्र बनवून समूहाचा विकास साधतात तर पराभूत मात्र आपल्या सारख्याच लोकांचा कंपू बनवून एकमेकांच्या पायात पाय घालत राहतात !

नात्यांचा गुंता – अमेरिकन इश्टायल !

एक भारतीय तरूण संगणक अभियंता एका बारमध्ये मद्याचे पेल्यावर पेले रिचवत असतो. एक अमेरिकन त्याचे पिणे बघून काळजीत पडतो. अर्थात तो सुद्धा लास झालेलाच असतो. भारतीय तरूणाला तो त्याचा गम आपल्याशी बोलून हलका करायला सांगतो. बांध फूटल्यासारखा भारतीय तरूण आपली ष्टोरी त्याला सांगतो. त्याच्या आई-वडीलांनी भारतात त्याचे लग्न एका सो कॉल्ड खानदानी मुलीशी ठरविलेले असते. अर्थात यात त्या तरूणाची संमती घ्यायचा प्रश्न येतोच कोठे ? त्यांनी परस्पर मुहुर्त काढून त्याला थेट लग्नालाच बोलाविलेले असते. त्याने आपल्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करणार असे सांगताच मोठा ड्रामा होतो, आम्ही ठरविलेल्या मुलीशी लग्न न केल्यास खानदानची इज्जत जाइल व मग आमची अर्थीच उचलायला तुला यावे लागेल अशी फिल्मी डायलॉगबाजी सुद्धा होते. ज्या मुलीला कधी बघितले सुद्धा नाही त्या मुलीशी लग्न करायला भारतीय तरूण अजिबात तयार नसतो पण आई-वडीलांच्या विरोधात जायची धमक तरी त्याच्यात कोठे असते ! भारतीय विवाह पद्धती कशी व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करते हे तो त्या अमेरिकेनला अगदी पोट तिडीकीने सांगत असतो. अमेरिकेतले मोकळे ढाकळे वातावरण , प्रेमात कोणाचीही आडकाठी नसणे, डेटींग, झट मंगनी, पट शादी , तितक्याच झटकन घटस्फोट याचे तो अगदी तोंडभरून कौतुक करीत असतो. प्रेम विवाह हीच विवाहाची आदर्श पद्धत आहे हे तो अगदी ठासून सांगतो.


तुला आमची संस्कृती एवढी आवडते ? अमेरिकन त्याला विचारतो. आता अमेरिकन तरूण त्याला आपली ष्टोरी सांगू लागतो. त्याने एका प्रौढ विधवेबरोबर 3 वर्षे संबंध ठेवून, अगदी आपण मेड फॉर इच अदर असल्याची खात्री पटल्यावर लग्न केलेले असते. त्याला घरचा विरोध बिरोध काही होत नाही हे कळल्यावर भारतीय तरूण परत अमेरिकन संस्कृतीचा उदो उदो करतो ! अमेरिकेन त्याचे बोलणे पुढे चालू करतो. काही वर्षानी त्याचे वडील त्याच्या सावत्र मुलीच्या अर्थात त्याच्या बायकोच्या मुलीच्या प्रेमात पडतात ! अर्थात यथासांग कोणताही विरोध न होता त्यांचेही लग्न होते ! या नाते संबंधामधून त्याचे वडील त्याचे जावई होतात तर तो वडीलांचा जावई होतो ! आता कायद्याने त्या अमेरिकनाची मुलगी (सावत्र ) त्याची आई होते आणि बायको तर चक्क त्याची आजी ठरते ! पुढे त्याला मुलगा झाल्यावर अजून धमाल होते ! त्याचा मुलगा होतो त्याच्या वडीलांचा भाउ व अर्थात त्याचा काका ! भारतीय तरूणाच्या डोळ्यासमोर या नात्यांच्या गुंत्यामुळे काजवे चमकू लागलेले असतानाच अमेरिकन कथा पुढे सुरू करतो. खरा गुंता होतो त्याच्या वडीलांना मुलगा होतो तेव्हा ! आता वडीलांना झालेला मुलगा त्याचा भाउ सुद्धा असतो तसेच नातु सुद्धा ! म्हणजे तो आता एकाच वेळी आजोबा सुद्धा असतो आणि नातु सुद्धा ! आता बोला ! काय कप्पाळ बोलणार भारतीय तरूण ? तो लगोलग इंड्यात फोन करून लग्नाला तयार असल्याचे कळ्वून टाकतो !