शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

मन:शांती मिळविण्याची 10 तत्वे.

1) दूसर्याच्या भानगडीत नाक खूपसू नका.
अनेकदा आपण दूसर्यांच्या भानगडीत वरचेवर नाक खुपसून स्वत:च गोत्यात येत असतो. अर्थात याला कारण असते “माझा मार्गच बरोबर आहे , माझ्या विचाराची दिशाच योग्य आहे आणि जे याच्याशी सहमत नाहीत त्यांच्या गळी आपले म्हणणे कसेही करून उतरवले पाहिजे” ही विचारसरणी. ही विचारसरणी दूसर्या व्यक्तीचे अस्तित्वच अमान्य करते, तसेच देवाच्या अस्तित्वालाच आव्हान देते. दैवत:च प्रत्येक व्यक्तीची जडणघडण वेगळी आहे, दोन माणसे एकच विचार किंवा कृती करतील असे होत नाही. देवाने जशी बुद्धी दिली आहे तसा प्रत्येकजण विचार करीत असतो. आपले काम ध्यान देवून केले तरी खूप झाले !
2) क्षमा करा आणि विसरून जा !
मन:शांती मिळविण्याचे हे खूप प्रभावी तत्व आहे. आपला अपमान करणार्या वा आपल्याला दुखविणार्या व्यक्तीचा आपण आतून राग राग करीत राहतो, सूडभावना जोपासतो. यातुनच मग निद्रानाश, पोटाचे विकार, अति-रक्तदाब असे विकार जडतात. आपला अपमान तर एकदाच झालेला असतो पण सूडभावना धगधगत मात्र कायम राहते. सूडभावना सोडा. आयुष्यात करायच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत, सूडाने जळत राहून आपलेच आयुष्य का जाळायचे ? झाले गेले गंगेला मिळाले या उक्तीप्रमाणे वागा.
3) स्तुतीपुंजक बनू नका !
जगात सगळीकडे नुसता स्वार्थ भरलेला आहे. तोंडपुंजेपणा करणारे का कमी आहेत ? आज तुमची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणारे संधी मिळताच तुमच्यावर चिखलफेक करतील. तेव्हा मला मोठा म्हणा हा अट्टाहास का ? तुमच्या भोवती दिवे ओवाळणार्यांना जराही महत्व देवू नका. तुमचे काम नीतीची चाड न सोडता आणि प्रामाणिकपणे करीत रहा.

4) द्वेष करू नका !
द्वेष करणार्यांमुळे मनाची शांती कशी बिघडते याचा अनुभव प्रत्येकाने घेतला असेलच. असेही होते की कामात अधिक मेहनत घेवून सुद्धा बढती मात्र भलत्यालाच मिळते. धंद्यात सुद्धा आपला पुरेसा जम बसत नसताना नव्याने शिरकाव केलेला बस्तान बसवितो. असे अनेकदा होतच असते. यासाठी आपण द्वेषभावना जोपासायची का ? नाही. प्रत्येकाच्या कपाळावर सटवाईने जे लिहिले आहे ते होणारच आहे, ज्याला यश मिळाले ते त्याचे विधीलिखीत होते. विधीलिखीत टळू शकत नाही, कोणी ते बदलू शकत नाही किंवा त्यापासून कोणी पळू शकत नाही. तुमच्या नशिबात एखादी गोष्ट नाही त्याला दूसर्याला दोष देण्यात काय हशील ? द्वेष करून काहीही साध्य होणार नाही उलट त्या आगीत तुमच्या मनाची शांतीच राख होवून जाईल.

5) प्रवाहाबरोबर चाला.
तुम्ही एकटे प्रवाहाची दिशा नक्कीच बदलू शकणार नाही. यात बुडायची शक्यताच जास्त. त्यापेक्षा प्रवाहाबरोबर गेल्यास तुम्हाला अकस्मात प्रवाहाबरोबर जुळवून घेता घेताच आगळ्या एकात्मतेची प्रचीती येइल.

6) संकटांचा धैर्याने मुकाबला करा.
प्रत्येक अपयश ही पुढील यशाची पायरी असते. दर दिवशी आपण अनेक अडथळ्यांचा, व्याधींचा, उद्रेकाचा, अपघातांचा सामना करीतच असतो. यावर जेव्हा काही उपाय सापडत नसतो तेव्हा काही वेळ संकटांशी जुळवुळ घ्यायला शिका. या सगळ्यांना खंबीरपणे तोंड द्या. संकटांसमोर शरणागती पत्करून उमेद जगण्याची हरवून बसू नका. स्वत:वर विश्वास ठेवा. धैर्य, आंतरीक शक्ती आणि दांडगी इच्छाशक्तीच तुम्हाला विजयाप्रत नेइल.

7) अंथरूण पांघरून हातपाय पसरा.
ही म्हण खरेतर कायमच लक्षात ठेवायला हवी. आपण आपली क्षमता न ओळखता खोट्या मोठेपणासाठी नको ती जबाबदारी डोक्यावर घेत असतो. याने आपला अहंकार कुरवाळला जातो. आपल्या मर्यादा ओळखायला शिका. नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था का करून घ्यायची ? भौतिकसुखाच्या मागे लागल्यास मन:शांती कधीही मिळणार नाही.भौतिक सुखाच्या मृगजळामागे न धावता तो वेळ प्रार्थनेला द्या, स्वत:च्या आत डोकावून बघा, ध्यान करा. याने तुमचे चित्त टाळ्यावर येइल. निर्मळ मन तुम्हाला अधिक मानसिक समाधान देइल.

8) नित्यनेमाने ध्यानधारणा करा.
ध्यानाने मन शांत होते व अस्वस्थ करणार्या विचारांपासून तुमची सूटका होते. यातुन तुम्ही परमशांती प्राप्त करू शकता.प्रामाणिकपणे रोज अर्धा तास जरी ध्यान केले तरी बाकी साडेतेवीस तास तुमचे मन प्रसन्न राहील. या ना त्या कारणाने ढळणारा मनाचा तोल सावरेल. ध्यानाचा वेळ थोडा थोडा वाढवित नेल्यास अधिक समाधान मिळेल. तुम्हाला असे वाटणे स्वाभाविक आहे की ध्यानधारण करीत बसल्यास बाकीची कामे रेंगाळतील. पण या उलट तुमची कार्यक्षमता वाढून तुमची सर्व कामे अधिक कुशलतेने तुम्ही कमी वेळात करू शकाल.

9) मनाला कोठेतरी गुंतवून ठेवा.
इंग्रजीत “An Empty Mind is Devil’s Workshop” असे म्हणतात. रिकाम्या मनात जगातले सगळे वाईट विचार येतात. मन चिंती ते वैरी न चिंती. काहीतरी सकारात्मक, विधायक कार्य करण्यात मनाला गुंतवून ठेवा.एखादा छंद जोपासा. तुम्हाला आवडणारे काहीतरी करा. पैसा की समाधान यात तुम्हाला काय जास्त प्रिय ते एकदा ठरवा.तुम्ही जोपासलेला छंद किंवा समाजसेवा, देवाधर्माचे काम यातुन तुम्हाला पैसा मिळेलच असे नाही पण भरून पावल्याचे , काही केल्याचे समाधान मात्र नक्कीच मिळेल.अगदी शरीर थकल्याने विश्रांती घेत असाल तेव्हा सुद्धा काही चांगले वाचा नाहीतर नामस्मरण तरी करा.

10) धरसोड वृत्ती सोडा , खंत करू नका.
“करू की नको” असा विचार करीत राहिल्यास कृती काही होणार नाही मात्र दिवस, आठवडे, महिने, वर्ष वाया जाइल व डोक्याला ताप मात्र होइल. नियतीने तुमच्या पुढ्यात काय वाढलेले आहे याचा थांगपत्ता तुम्हाला कधीही लागणार नाही. तेव्हा उगीच घोळ न घालता ज्या वेळी जे करणे योग्य आहे त्या वेळी ते करा. जरी अपयश आले तरी त्यातुनच तुम्हाला मार्ग सापडेल. डोक्याला हात लावून बसाल तर मात्र कार्यनाश होणार. तसेच भूतकाळातली मढी उरकू नका. जे झाले त्याची खंत बाळगू नका. जो हो गया सो हो गया ! तकदीर मे लिखा था वही हुवा ! कोळसा कितीही उगाळला तरी काळाच ! सकारात्मक दृष्टीकोन बाळगा !


Think ++ve !

रविवार, ८ ऑगस्ट, २०१०

बायकांना नक्की हवे तरी काय असते ?

तरूण , तडफदार सत्वशील राजाच्या राज्यावर परचक्र येते. शेजारी असलेला सम्राट दगा-फटका करून त्याला बंदी बनवतो. जेता सम्राट सत्वशीलाला ठारच मारणार असतो पण त्याच्या आदर्शवादाची छाप त्याच्यावर पडतेच ! तो त्याला एक वर्षाच्या आत, एका जटील प्रश्नाचे उत्तर शोधायला सांगतो व त्या बदल्यात त्याला अभय देवू करतो. अर्थात प्रश्नाचे उत्तर एका वर्षात न देता आल्यास मृत्यूदंड अटळ असतोच ! असतो तरी काय तो जटील प्रश्न ? बायकांना नक्की हवे तरी काय असते ?

भल्याभल्यांना या प्रश्नाचे उत्तर जन्मात सापडले नाही तिकडे तरूण सत्वशील राजा तरी काय करणार असतो ? पण दूसरा काही उपायच नसल्याने तो सम्राटाचा प्रस्ताव मान्य करतो. आपल्या राज्यात परतल्यावर तो भले भले विद्वान आणतो, सगळ्या स्तरातील लोकांना या समस्येचे आकलन करण्याचे आवाहन करतो, पण कोणालाच समाधानकारक उत्तर देता येत नाही. असेच त्याला कोणीतरी सुचवते की त्याच्याच राज्यात एक चेटकीण आहे व ती या प्रश्नाचे उत्तर चूटकीसरशी देइल – पण – पण मोबदला मात्र ती अवाच्या-सव्वा मागते, कधी कधी तिची मागणी अगदी विक्षिप्तपणाची सुद्धा असते ! आधी राजा या भानगडीत न पडण्याचे ठरवितो पण जेव्हा दिवसा मागुन दिवस जात वर्ष संपण्यास एकच दिवस बाकी राहतो तेव्हा मात्र त्याला नाइलाजाने उत्तरासाठी त्या चेटकीणीकडे जावेच लागते.

चेटकीणीकडे या समस्येचे उत्तर तयारच असते पण त्या पुर्वी राजाकडून तिला एक वचन हवे असते. राजाचा जिवलग मित्र धैर्यशीलाबरोबर तिला लग्न करायचे असते ! स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आपल्या मित्राचे आयुष्य बरबाद करण्याचा प्रस्ताव राजा धूडकावून लावतो पण स्वत: धैर्यशील मात्र “लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा जगो” या उक्तीप्रमाणे स्वत: चेटकीणीकडे जावून तिची अट मान्य असल्याचे सांगतो व उत्तर सांगायची विनंती करतो. चेटकीण सांगते , बायकांना हवे तरी काय असते ते - “तिला तिच्या पद्धतीने स्वत:चे जीवन जगायचे असते”. त्रिकालाबाधित सत्यच चेटकिणीने सांगितलेले असते व सर्वानाच ते मान्य होते, हो, अगदी त्या सम्राटाला सुद्धा व सत्वशील मुक्त होतो !

शब्दाला जागून सत्वशील राजा आपल्या मित्राचे, धैर्यशीलाचे लग्न चेटकीणीबरोबर अगदी थाटामाटात लावून देतो. लग्नाच्या पहिल्याच रात्री धैर्यशील धडधडत्या छातीने शयनगृहात शिरतो, चेटकीणीबरोबर लग्न, किती भयंकर प्रसंग ! पण शयनगृहात शिरताच त्याला आश्चर्याच धक्काच बसतो ! आत साक्षात अप्सरा भासावी अशी तरूणी पहुडलेली असते ! रंभा, मेनका, उर्वशी या तिघींचे एकत्रित सौंदर्य सुद्धा तिच्यापुढे फिकेच भासले असते ! हा प्रकार तरी काय आहे असा प्रश्न स्वाभाविकपणेच त्याला पडतो. यावर चेटकीणीचे उत्तर तयारच असते. “मी चेटकीण आहे हे माहित असूनही तू माझ्याशी लग्नाला तयार झालास म्हणून मी तुझ्यावर खुष आहे ! माझ्या मंत्रशक्तीने मी २४ तासात अर्धा वेळ अप्सरेच्या रूपात असेन व अर्धा वेळ चेटकीणीच्या. आता तू ठरव मी दिवसा वा रात्री तुला कोणत्या रूपात हवी ते ! अप्सरेच्या की चेटकेणीच्या ?” क्षणभर का होईना, धैर्यशील दुविधेत पडतो ! दिवसा , लोकात मिरविताना अप्सरा पण मग रात्रीच्या एकांतात मात्र चेटकीण ? का दिवसा सर्वांसमोर चेटकीणीसोबत रहायचे पण रात्री मात्र अप्सरेबरोबर स्वर्ग सुखाचे बेधुंद क्षण अनुभवायचे ?

धैर्यशीलाची उत्तर जाणून घेण्यापुर्वी …..

छोटासा ब्रेक –

तुम्ही जर पुरूष असाल तर काय निर्णय घ्याल ?

बायकांना सवाल , त्यांनी निवडलेल्या पुरूषाने कोणता निर्णय घेतलेला त्यांना आवडेल ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
काय ठरले ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
धैर्यशील खरेच हुषार होता. चेटकीणीने राजाला दिलेले उत्तर त्याच्या डोक्यात होतेच. त्याचे या प्रश्नाचे उत्तर तिच्यावरच सोडले. साहजिक आहे, स्त्रीला तिचे जीवन तिच्या मताने जगायची मोकळीक तर हवी असते ! प्रसन्न होवून चेटकीणीने आपण २४ तास अप्सरेच्या रूपात राहू असे जाहीर केले !

तात्पर्य काय तर ----
१) स्त्री कितीही सुंदर असेना का ? तिच्यात एक चेटकीण दडलेली असते !
२) तुम्ही जर तिला तिच्या मताने वागायची मुभा दिली नाहीत तर सगळा इस्कोट होणार.

तेव्हा एक तर “तिच्या मताने जगा” नाही तर “जगणे हराम” करून घ्या !

(मला आलेल्या इमेलचा अनुवाद )

बायकांची मर्जी कशी राखावी ?

अगदी सोप्पे आहे ! मित्रांनो, तुम्ही फक्त एवढेच करा,
१) तिचा मित्र बना
२) तिचा सहकारी बना
३) प्रेमळ बना.
४) तिचा भाउ बना.
५) तिचे पालक बना.
६) तिचे शिक्षक बना.
७) चांगला स्वयंपाक करायला शिका.
८) वायरींगचे जुजबी काम करायला शिका.
९) थोडेफार सुतारकाम सुद्धा जमले पाहिजे !
१०) थोडेफार प्लंबरचे काम सुद्धा जमले पाहिजे !
११) यंत्रज्ञ असाल तर बरेच आहे.
१२) सजावटकार व्हा.
१३) स्टायलिस्ट बना.
१४) स्रीरोग तज्ञ बना.
१५) मानसशास्त्रज्ञ व्हा
१६) उंदीर, झुरळ, पाली आदींचा नायनाट करता यायला हवा.
१७) मानसोपचार तज्ञ व्हा.
१८) दु:ख निवारक व्हा.
१९) उत्तम श्रोता बना.
२०) कुशल संघटक व्हा.
२१) चांगला बाप बना.
२२) स्वच्छता अंगी बाणवा.
२३) आपुलकीने वागा.
२४) शरीर दणकट हवे.
२५) उबदारपणा हवा.
२६) लक्ष वेधून घेता आले पाहिजे.
२७) शूर बना.
२८) बुद्धीमान बना.
२९) विनोदाचे इंद्रीय हवे.
३०) सर्जनशीलता हवी.
३१) हळूवारपणा हवा.
३२) कणखरपणा आवश्यक.
३३) समजूतदारपणा हवाच.
३४) क्षमाशील असा.
३५) हुशारी हवी.
३६) महत्वाकांक्षा हवी.
३७) काम करण्याची पात्रता हवी.
३८) धैर्यवान बना.
३९) निर्धार हवा.
४०) खरेपणा हवा.
४१) विश्वसनीयता हवी.
४२) भावनाप्रधान

आणि हे सगळे असलात तरी या गोष्टी विसरून चालणार नाही -
४३) तिचे कायम कौतुक करायला हवे.
४४) खरेदीत रस दाखविला पाहिजे.
४५) प्रामाणिकपणा हवा.
४६) खूप खूप पैसा हवा.
४७) तिला टेन्शन देवू नका.
४८) ( ती असताना तरी ) दूसर्या बायकांकडे बघू नका.

त्या बरोबरच हे सुद्धा मस्ट –
४९) तिची काळजी घ्या अर्थात तिच्याकडून अशी कोणतीही अपेक्षा न बाळगता.
५०) तिला भरपूर वेळ द्या – खासकरून तिच्या नटण्या-थटण्यासाठी.
५१) तिला पुर्ण मोकळीक द्या, ती कोठे जाते याची काळजी न करता.
….. आणि हो, हे सुद्धा अजिबात विसरू नका –
५२) वाढदिवस
५३) वार्षिक कार्यक्रम
५४) तिने आखलेले प्लान
फक्त ५४ बाबी लक्षात ठेवायच्या ! किती सोप्पे !!

या उलट पुरूषाला सुखी ठेवण्यासाठी बायकांना काय काय दिव्य करावे लागते ! बघाच –
१) शांतता राखा.
२) त्याच्या जीभेचे चोचले पुरवा.
३) रिमोट कंट्रोल त्याच्या जवळच राहू दे !

म्हणतात ना – कठीण कठीण कठीण किती पुरूष ह्रुदय बाई !
(मला आलेल्या एका इंग्रजी इमेलचा स्वैर अनुवाद )

येडा बनून पेढा खाणे !

एका गावात एक नावाजलेला गणिती रहात असतो. गणिताबरोबरच अर्थशास्त्राचाही त्याचा दांडगा व्यासंग असतो. लवकरच त्याची ख्याती सर्वदूर पसरते. आपल्या राज्याची अर्थव्यवस्था रूळावर यावी म्हणून विविध देशांचे राजे सुद्धा त्याचा सल्ला घेत. या ओसाड गावात निव्वळ त्याला भेटण्यासाठी मोठी मोठी माणसे येतात, आपल्याला कोणी सुद्धा विचारीत नाही याचा राग त्या गावच्या मुखिया व त्याच्या बगलबच्च्यांच्या मनात अगदी खोलवर भिनला होता. बड्या लोकांची त्या विद्वानावर मेहेरनजर असल्याने त्याच्याशी थेट वैर पत्करण्याची त्या कोणाचीच शामत नव्हती. पण त्या भल्या माणसाला खिजवायला त्यांना एक मस्त कारण मिळाले होते. जेव्हा जेव्हा मुखिया व त्याचे चमचे भल्या माणसाच्या समोर येत तेव्हा ते त्याला हिणवत असत. तू एवढा विद्वान पण तुझा मुलगा मात्र अगदीच ढ कसा ? अगदीच येडच्याप ! त्या मुर्खाला जरा विचार, सोने की चांदी यात अधिक मौल्यवान काय ? तुझा दिवटा चांदी असे सांगतो ! हे सतत कानावर पडू लागल्याने, अवहेलना सहन न होऊन एकदा त्या भल्या माणसाने आपल्या मुलाला विचारलेच की सोने व चांदी यात अधिक मौल्यवान काय ? मुलगा क्षणाचाही विलंब न लावता सोने असे म्हणाला ! “अरे मग बाहेर असे विचारल्यावर चांदी असे का सांगतोस ?” बुचकळ्यात पडलेल्या बापाने मुलाला विचारले.

मुलाच्या लक्षात सगळा प्रकार येतो. तो सांगतो की आपण शाळेत जाताना मुखिया व त्याचे बगलबच्चे पाराखाली बसलेलेच असतात. मुखिया रोज खिषातुन सोन्याचे व चांदीचे नाणे काढतो व यातले अधिक मौल्यवन जे असेल ते घ्यायला सांगतो. मी चांदीचे नाणे घेतले की ते हसून हसून अगदी लोटपोट होतात ! खिदळतात काय , टाळ्या काय वाजवितात, उड्या सुद्धा मारतात ! “विद्वान बापाचा दिवटा पोर” अशी माझी निर्भत्सना सुद्धा करतात. मी मान खाली घालून शाळेची वाट धरतो. हे असे अनेक वर्षे चालले आहे.” “…. अरे मग तु हे सगळे सहन तरी कशाला करतोस ? तुला सोने अधिक मौल्यवान आहे हे ठाऊक असताना सुद्धा ?” बाप हैराण ! मुलगा शांतपणे बापाला आतल्या खोलीत घेवून जातो. एक मोठी पेटी त्याला उघडून दाखवतो. ती पेटी शेकडो चांदीच्या नाण्यांनी गच्च भरलेली असते ! डोळे विस्फारून तो खजिना बघत असलेल्या बापाला मुलगा म्हणतो “ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलून घेईन त्या दिवशी हा खेळ संपेल ! त्यांना आसूरी आनंद मिळणार नाही व मला चांदीचे नाणे सुद्धा मिळणार नाही ! एरवी ते आपले काय वाकडे करू शकणार आहेत ? पण त्यांना मिळणारा आनंद थांबला तर मात्र आपल्याला छळायचे दूसरे मार्ग ते शोधतील. तेव्हा जे चालले आहे ते काय वाईट आहे ?
तात्पर्य – आयुष्याच्या खेळात कधी कधी आपण मुर्ख असल्याचे सोंग वठविण्यात खरा शहाणपणा असतो कारण हे नाटक आपल्या वरिष्ठांना, आपल्या जवळच्या गोतावळ्याला आवडते. याचा अर्थ आपण हार पत्करली असा होत नाही. खेळात हारजीत ही असतेच , खेळात दूसर्याला जिंकण्याचे खोटे समाधान मिळून आपण हार पत्करण्यात जर फायदा असेल तर ?
मूळ इंग्रजी गोष्टीचे भाषांतर करत असतानाच मला वपुंची एक लघुकथा आठवली. त्यात सुद्धा महापालिकेतला एक भोळसट कारकून रेखाटला आहे. भोळसटाचे मित्र त्याची नेहमीच टवाळी करून मजा लूटत असतात. त्याला बकरा बनविणे हा त्यांचा अगदी दिनक्रमच बनलेला असतो. एकदा असेच ते त्याला रविवारचे सिनेमा बघायला एका थिएटरात बोलावितात. त्याचे तिकिट काढले आहे असे खोटेच सांगतात. तो तिकडे आल्यावर हे सगळे लपून राहून त्याची मजा बघणार असतात. दूसर्या दिवशी लेखक त्या भोळसटाला काल तिकडे येवून परत स्वत:चे हसे करून घेतलेस ना असे विचारतो. त्यावर तो भोळसट म्हणतो की ते मला फसवत आहेत हे का मला ठावूक नाही ! मी तिकडे फिरकलो सुद्धा नाही पण हे मात्र रविवारची सकाळ माझी फजिती बघण्यासाठी त्या सिनेमागृहाच्या आसपास दडी मारून बसलेले असणार ! मी रविवार माझ्या कुटुंबाबरोबर एंजॉय करत असताना हे मात्र उन्हातान्हात उभे असणार ! मी आपल्या शिपायाला वीस रूपये देवून त्यांची खबरबात काढायला तिकडे पाठविले होते. कोण किती वेळ ताटकळले ते आता आपल्याला कळेलच ! आता तुम्हीच सांगा कोण मामा बनले ?