मागच्या एका पोस्टमध्ये माझे विसा क्रेडीट कार्ड कोणीतरी अनधिकृतपणे इंटरनेटवर कसे वापरले ते मी नमूद केले आहे. यात माझा दोष काहीही नव्हता. 3 डी सिक्युअर प्रणाली ने सुरक्षित केलेले क्रेडीट कार्ड विसाने परदेशी वेबसाइटसवरून ,ती प्रणाली बायपास करूनही, व्यवहार स्वीकृत केला होता. मला जर मेसेज वेळीच मिळाला नसता तर माझी अवस्था "लूट गये" अशीच झाली असती. मी आय.सी.आय.सी.आय बँक , जिने हे विसा कार्ड जारी केले होते, तिला माझी नाराजी स्पष्ट शब्दात कळविली. या व्यवहाराला मी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही कारण माझ्या सुरक्षेशी तडजोड तुम्ही केलेली आहे. या पुढे मी विसाचे क्रेडीट कार्ड वापरणार नाही असे सांगून सर्व कार्डस रद्द केली.
मित्रांच्या सल्ल्याने मी डेबिट कार्ड वापरायचे ठरविले. माझ्याकडे आधीपासूनच याच बँकेने दिलेले विसाचे ए.टी.एम कम डेबिट कार्ड होतेच. डेबिट कार्ड ही क्रेडीट कार्डापेक्षा अधिक सुरक्षित समजली जातात. यात व्यवहार होतानाच तुमचे बचत खाते डेबिट केले जाते. दुकानात काही खरेदी केल्यास, कार्ड स्वाइप केल्यावर तुम्हाला तुमचा पिन नंबर सुद्धा टाकावा लागतो. पिन बरोबर असेल तरच तुमचा व्यवहार स्वीकृत होतो.
मागच्या आठवड्यात मी रेडीमेड कपड्यांची खरेदी केली व माझे विसा डेबिट कार्ड दिले. आश्चर्य म्हणजे पिन नंबर न टाकताच व्यवहार स्वीकृत झाला. दूकानदार म्हणाला की कधी पिन विचारला जातो कधी नाही ! हे लॉजिक मला काही केल्या कळेना. शेवटी मी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला फोन लावला. ग्राहक सेवा अधिकार्याने विसा कार्ड असेल तर पिन नंबर टाकायची गरजच लागत नाही असे सांगताच मी उडालोच. मी लगेच माझे विसा डेबिट कार्ड रद्द करायला सांगितले. तो ग्राहक अधिकारी मला काय प्रोब्लेम आहे असे विचारू लागला. मी त्याला विसा क्रेडीट कार्ड वापराचा अनुभव ऐकविला व त्या नंतर सुरक्षित म्हणून विसा डेबिट कार्डचा वापर केला तर ते ही धोकादायकच वाटले ! तेव्हा मला विकतचा मनस्ताप नको.कार्ड चोरीला गेल्यावर त्याचा सहज दुरूपयोग होइल, तो मी केलेला नाही हे तुम्हाला पटवायला माझ्या नाकी नऊ येतील, तेव्हा हे विकतचे दुखणे मला नकोच !
चौकशी केल्यावर कळले की काही कंपन्यांची ( स्टेट बँक समूहाचे Maestro , आय.डी.बी.आय. बँकेचे मास्टर कार्ड ) डेबिट कार्ड दूकानात वापरताना , स्वाइप करून झाल्यावर तुम्हाला तुमचा पिन टाकावा लागतो. मला हा प्रकार सुरक्षित वाटतो कारण डेबिट कार्ड व्यवहारात थेट तुमच्या खात्यातुन पैसे वजा होणार असतात.
केंद्रीय बँकेने खरेतर सर्व कार्ड वितरीत करणार्या कंपन्यांना किमान सुरक्षा प्रणाली लागू करायला हवी. डेबिट कार्डच्या वापरासाठी अतिरिक्त सुरक्षा हवीच हवी. ग्राहकाला आपले कार्ड एका मेसेजने ब्लॉक / अनब्लॉक वा रद्द करता यायला हवे. तसे केल्याचा मेसेज सुद्धा त्याला मिळायला हवा. सध्या तरी ही सोय कोणीही देत नाही ! माझ्या पुरते तरी मी या किमान सुविधांची खात्री मिळेपर्यंत कोणतेही कार्ड वापरणार नाही !