सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

ओवैसी फॅक्टर !

या निवडणुकीत उघड चिथावणीखोर भाषणे करणार्या ओवैसी संघटनेचे 3 उमेदवार निवडून आल्याने अनेक जण अस्वस्थ आहेत. लोकशाही मार्गाने 3 उमेदवार निवडून आले हे खरे तर स्वागतार्हच आहे ! ही संघटना वाढली तर देशाच्या एकात्मतेला धोका आहेच. पण काळजी करायचे काहीही कारण नाही. देशात मुस्लिम 15 % असले तरी ते एकगट्ठा मतदान करतात हा सिद्धांत खोटा असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. मुस्लिम समाजात सुधारणेचा वेग कमी असला तरी प्रक्रीया चालूच आहे. शिक्षण घेतलेला, सरकारी / खाजगी नोकरी करणारा सर्वसाधारण मुसलमान ना चार लग्ने करत ना खाटवळभर मुले जन्माला घालत.

भीती वाटते आहे ती अशा धर्मांध संघटनेच्या झेंड्याखाली मुस्लिम एकत्र होण्याची. तसे झाले तरी वांदा नाही. या वेळीही मुस्लिम बहुल भाग भिवंडी व मुंब्रा, या संघटनेचे कोणीही निवडून आलेले नाही. आता जे आले आहेत ते मतविभाजनाचा फायदा मिळून, निव्वळ मुस्लिम मते घेवून नाही. जी मुस्लिम मते सपा, कॉंग्रेसला एकगठ्ठा मिळत होती ती ओवैसी यांच्या पक्षाला मिळाली तर नुकसान सपा व कॉंग्रेसचे आहे ! अगदी टोकाची शक्यता म्हणून मुस्लिम मतांचे ध्रूवीकरण झाले तर काय ? देशात 20 % लोकसभा मतदारसंघ असे आहेत की जिकडे मुस्लिम मते निर्णायक ठरतात. पण जेव्हा 20-30 % मतांचे ध्रूवीकरण होइल तेव्हा हिंदूत त्याची प्रतिक्रीया उमटणारच व 80 % हिंदू मतांचे ध्रूवीकरण होण्याची प्रक्रीया सुद्धा सुरू होइलच ! तेव्हा देश लोकशाही मार्गाने धर्मांधाच्या हातात जाणार नाही हे नक्की !

आता याच ओवैसींनी कायदा हातात घेतला तर काय ? देशात आता प्रखर राष्ट्रीय विचारसरणीचे सरकार आहे. आधीच्या राजवटीत मतांच्या बेगमीसाठी जे लांगुलचालन चालायचे तसे अजिबात होणार नाही. काही आगळीक केल्यास सरकार ती कठोर पणे मोडून काढेल याची खात्री बाळगा ! मुस्लिमांना सुद्धा शांतता व विकास हवा आहे हे गुजरातेतील मुसलमानांनी दाखवून दिलेच आहे. तेव्हा ते अशा चिथावणीला बळी पडतील असेही वाटत नाही. मोदी सगळ्यांनाच सोबत घेवून चालले आहेत तेव्हा मुस्लिमही त्यांनाच साथ देतील यात काही शंका नाही.

25 वर्षानी मिळाला उ:शाप !

रामायणात एक गोष्ट आहे. सीतेच्या शोधासाठी हनुमान व इतर जणांचे पथक दक्षिण भारताच्या किनार्यावर पोचते. सीतेला इथूनच समुद्रपार लंकेत पळवून नेले आहे असे त्यांना जटायूचा भाऊ सांगतो व शापमुक्त होतो. पण एवढा मैलोनमैल पसरलेला समुद्र पार कोण करणार ? हनुमानाकडे ती क्षमता असते पण त्याला त्याची जाणीव नसते ! लहानपणी त्याने एका साधुची दाढी ओढलेली असते व तो त्याला सामर्थहिन होशील असा शाप देतो. पुढे देवांनी मिनतवारी केल्यावर त्याला उ:शाप मिळतो की दूसरा कोणी त्याला आपल्या सामर्थाची जाणीव करून देइल तेव्हा ते त्याला परत मिळेल. जांबुवंत नेमकी हीच आठवण हनुमानाला करून देतो व महाबली हनुमान समुद्र लीलया उल्लंघून लंकेत पोचतो !

महाजन-मुंढे यांनी 25 वर्षापुर्वी सेनेचे लोढणे गळ्यात बांधून घेतले व महाराष्ट्रातल्या भाजपाला आपल्या सामर्थाचा विसर पडला. सेने कडून अपमान-उपेक्षा-अवहेलनाच भाजपाच्या पदरात पडली. सेना दरवेळी भाजपाचे हात पिळत राहिली व भाजपा ते सहन करीत राहिला. लोकसभेच्या जागा सेनेने वाढवून घेतल्या, केंद्रात भाजपाचे सरकार असताना सतत विरोधी भूमिका घेतली. राव सरकार वरच्या अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी सेनेचे खासदार रावते यांचे पोट बिघडले , पुढे प्रतिभा पवारांना सेनेने मराठी म्हणून समर्थन दिले व पुढे प्रणब मुखर्जी यांना सुद्धा पाठींबा दिला ! दोन्ही वेळी त्यांनी भाजपाला तोंडघशी पाडले.

शिवसनेच्या घराला घरघर लागली होती. युती असताना अखंड कॉंंग्रसला हरविणारी युती पुढे कॉंग्रेसची दोन शकले झाल्यावरही 2 निवडणुका हरली होती त्याला कारण निव्वळ सेना होती. शिवसनेच्याच जागा दरवेळी कमी होत होत्या व उभी फूट सुद्धा पडत होती. भाजपा मात्र अभंग होता व इतर राज्यात एकट्याच्या बळावर सत्ता मिळवत होता, टीकवत होता. सेना मात्र गृहकलहाने क्षीण होत चालली होती. महाजन-मुंढे सेनेचे जन्माचे ऋणाइत असल्याप्रमाणे अपमान सोसून पक्षाला सेनेच्या दावणीला बांधत होते, त्यांचे रूसवे फुगवे काढण्यासाठी मातोश्रीचे उंबरे झिंजवत होते. तरीही सेनेचा हेकेखोरपणा कमी होत नव्हता.

मोदी-शहा या जोडगोळीच्या रूपाने भाजपाला  डोकेबाज नेतृत्व मिळाले व संघाचे नेटवर्क हुशारीने वापरून लोकसभेची सत्ता भाजपाने निर्विवादपणे काबीज केली. या बदललेल्या परिस्थीतीत महाराष्ट्रातली दुय्यम वागणून आता सहन करायची नाही  हे ठरले. ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र कायम ठेवून 10-15 जागा, त्या सुद्धा जिथे सेना सातत्याने  अनामत रक्कम गमावत होती, त्या, भाजपा मागत होती. सेना मात्र आम्हाला 151, बाकी तुम्ही काय ते बघा म्हणून अडून बसली होती. बरे, या वेळी युती नव्हती तर महायुती होती. नव्याने सामील झालेल्या पक्षांना सेना आपल्या कोट्यातील एकही जागा सोडत नव्हती. रिपाईच्या आठवलेंना राज्यसभेवर पाठविले भाजपाने, सेनेने नाही ! नव्या सवंगड्यांना 20 जागा द्यायच्या म्ह्टल्या तर भाजपाला एकही जागा जास्तीची मिळत नव्हती ! महायुतीतल्या इतर घटकांना सेनेने भाजपाच्या दारात बांधले होते. या स्थितीत युती टीकवणे भाजपाच्या हिताचे नव्हते. मधल्या काळात युतीचे शिल्पकार महाजन-मुंढे व स्वत: सेनाप्रमुख बाळासाहेब काळाच्या पडद्याआड गेले. सगळी सूत्रे मोदी-शहा व गडकरी या नेत्यांकडे होती. आता मातोश्रीवर जावून नाक घासणारा भाजपात कोणी उरला नव्हता. शहा यांनी तर पहिल्या भेटीत मातोश्रीचा उंबरासुद्धा ओलांडला नाही व सेनेला वातावरण बदलले असल्याची जाणीव करून दिली. मोदींची लाट लोकसभेत अनुभवलेले उद्धव आता स्वत:ची कुवत नसताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने बघत होते. 25 वर्षाची गुलामगिरी भाजपा एवढ्या सहजी झुगारणार नाही, येइल शरण अशाच भ्रमात ते होते. भाजपाने सुद्धा हा भ्रम अखेरपर्यंत तसाच ठेवला व स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली. महायुतीतले घटक पक्ष भाजपाने आपल्या गळाला लावले. मोदी त्यांचा हुकमाचा एक्का होता. त्यांच्या सभा 15 वरून 25 एवढ्या वाढविल्या गेल्या. विदर्भावर भिस्त ठेवायची, मुंबई-ठाण्यात मराठी मतांचे विभाजन होणार हे गृहीत धरून, अमराठी मतांची रसद आणायची योजना बनली.  अमित शहा प्रचारात फिरले असते तर शिवसनेने त्याचे भांडवल केले असते म्हणून त्यांच्या सभा मर्यादित केल्या गेल्या. सेनेवर थेट टीका करायचे मोदींनी टाळले व सेनेच्या प्रचाराचे मुख्य हत्यारच बोथट केले. एकूणच भाजपाने calculated risk  घेत आपला डाव यशस्वी केला. पवार मात्र जुगार खेळले. युती तुटते हे नक्की झाल्यावरच त्यांनी आघाडी तोडली. लोकसभेतल्या कॉंग्रेसच्या दोन जागा व आपल्या चार जागा बघून हा जुगार खेळायला ते उद्युक्त झाले. शिवाय दोन दगडांवर पाय ठेवायलाही ते मोकळे होतेच ! तेव्हा भाजपाने पवारांशी संगनमत करून युती तोडली या आरोपात काहीही तथ्य नाही. मोदींनी बारामतीतच सभा घेवून पवारांची लक्तरे काढल्यावरही जर कोणी असे म्हणत असतील तर "अंदाज अपना अपना" ! आता पवारांनी बिनशर्त पाठींबा देवू केला आहे तो त्यांचा "आखरी दाव" आहे ! कारण हरण्यासारखे त्यांच्या कडे काही उरलेलेच नाही. बनी तो बनी नही तो परभणी ! भाजपा एवढा भोळा नक्कीच नाही उलट तो पवारांचाच टीश्यु पेपर करेल हे नक्की ! निकाल बघितलेत तर लक्षात येइल की आघाडी झाली असती तरी भाजपाला फारसा फटका बसला नसता कारण भाजपाच्या मतांची टक्केवारी दोन्ही  कॉंग्रेसच्या एकत्रित मतांएवढीच आहे. युती झाली असती तर मात्र त्याचा जास्त फायदा सेनेलाच मिळाला असता व भाजपा मागत असल्या 10-15 जास्त जागा देवूनही सेनेचे आमदार जास्तच आले असते व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते !  परत तोंड वर मी मोठा भाऊ, तू भांडी घास सांगायला मोकळे ! भाजपाच्या मागे संघाची फौज असते. युती असल्यामुळे हे "अर्धी चड्डीवाले"  सेनेसाठी राबत होते याचा सेनेला विसर पडला व तोच निर्णायक ठरला.

आता तरी उद्धव ठाकरे यांनी स्वप्नातून सत्यात यावे. भाजपा मोठा भाऊ असल्याचे मान्य करावे. त्यात त्यांचा तिहेरी फायदा आहे. केंद्रात, राज्यात व मनपात सत्ता ! एरवी भीकेचे कटोरे !  युती हवी असल्यास ज्या जागा जिंकल्या आहेत त्या त्या पक्षाकडे व हरलेल्या जागा तिकडे दुसरा किंवा तिसरा असलेल्या त्या पक्षाला असे नवे सूत्र मान्य करायला हरकत नाही. लोकांना नेमके हेच हवे आहे. स्थिती अशी आहे की युतीच निर्धोक राज्य करू शकते व सेना व दोन्ही कॉंग्रेस एकत्र आल्या तरी सरकार धड बनणार नाही. सेनेने अजून उशीर केला तर सेनेचे आमदार टीकणार नाहीत व मोठी फूट पडणार हे नक्की ! केंद्रातील सत्तेवर ज्याची मांड आहे त्याला उदंड मित्र मिळतील हे नक्की ! सत्तेला हपापलेले आपल्या पक्षाला सोठचिट्ठी देवून भाजपात प्रवेश करतील अशीही शक्यता आहेच ! युती तोडायची पहिली चूक सेनेने केली आता भाजपा बरोबर मान राखून सरकार सेना करणार नसेल तर ती दूसरी चूक ठरेल व तिसरी चूक करायलाही सेना शिल्लक राहणार नाही !


सेनेला आपल्या नसलेल्या सामर्थावर प्रचंड विश्वास होता तर भाजपाला आपल्या ताकदीचा तब्बल 25 वर्षे विसर पडला होता ! मोदी-शहा यांनी राज्यातील भाजपाला या शक्तीची आठवण करून दिली व गुलामगिरीचे जोखड झुगारू कमळ महाराष्ट्र भर फुलले ! राष्ट्रीय पक्ष म्हणून पुढे यायचे असेल तर स्थानिक पक्षांचा वापर करून , त्यांची शिडी करून आपली ताकद वाढविण्यात, गैर मला तरी काही वाटत नाही. शेवटी फैसला लोकच करणार आहेत !  

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

लोकशाहीचा गाडा का अडला ? मतदार न फिरकल्यामुळे !

घोडा का अडला ? भाकरी का करपली ? पाणी का अडले ? या सगळ्यांचे उत्तर एकच आहे “न फिरवल्यामुळे” ! तसेच लोकशाहीचेही आहे ! लोकशाहीचा गाडा का अडला ? मतदार न फिरकल्यामुळे ! जिकडे लोकशाही रूळली आहे अशा देशात मतदानाचे प्रमाण 94 ते 98 % आहे व आपल्याकडे ते अजूनही 60 % च्या वर जात नाही ! आपल्या एका मताची किंमत मतदाराला अजूनही कळलेली नाही व ती कळावी या साठी प्रयत्नही करायची गरज सत्ताधार्यांना वाटत नाही ! जेव्हा जेव्हा विक्रमी मतदान होते तेव्हा तेव्हा सत्तांतर होते हा इतिहास असताना मतदानाचा टक्का वाढावा म्हणून कोणता पक्ष प्रयत्न करेल ? ही जबाबदारी निवडणुक आयोगानेच घ्यायला हवी. नुसते मतदार यादीत नावे आले म्हणून समाधान मानण्यात काय अर्थ आहे, मतदानही दणदणीत व्हायला हवे.

आपल्याकडे मतदान सक्तीचे नाही. जेमेतेम 60 % मतदान होते. काही राज्यात, मुंबईसारख्या शहरात तर ते 40 % एवढे कमी होते. या उदासीनतेतुन निवडून येणारा काय लायकीचा असतो व त्यातुन बनणारे सरकार कसे काम करते हे आपण बघतोच आहोत.  देशात जर खर्या अर्थाने लोकांचे प्रातिनिधिक सरकार असेल तर सरकारच्या प्रत्येक निर्णयला जनता विरोध कसा करते / होतो ? याचा सरळ अर्थ आहे की उमेदवार + सरकार तांत्रिक दृष्ट्या बहुमत मिळवून झालेले असते. लोकांचा मनसे पाठींबा त्याला नसतोच. सध्याच्या निवडणुक पद्धतीतला हा दोष दूर करायलाच हवा.

सरासरी 50-60 % मतदान होते तेव्हा काय होते ? ज्याच्याकडे अगदी 10-15 % ( जात, धर्म, झोपडपट्टी, दादागिरी ) मतांची वोट-बँक आहे तो निवडून यायची शक्यता खूपच वाढते. 10-15% त्याची स्वत:ची मते, 10 % प्रचार करून, आश्वासने देवून व 2- 5% गैरमार्गाने ( विकत !) – अशी मतांची बेगमी केली की झाला विजय निश्चित ! निवडून यायची पात्रता हा एकमेव निकष तिकिट देताना पक्ष बघतात तेव्हा तिकिटे अभ्यासू उमेदवाराला मिळण्याची शक्यता उरतच  नाही व तो निवडून यायचा प्रश्नच येत नाही ! राजकारणातुन सज्जन माणसे हद्दपार होतात ती अशी ! मग गल्लोगल्लीचे गुंड, काळा पैसा असलेले धंदेवाइक, जाती-पातींचे पुढारी हेच निवडणुक रिंगणात उतरतात. मतदारसंघात किमान 10 उमेदवार असतात, त्यातले मात्तबर असे चार ते पाच असतात, बाकी सगळे मते खायला उभे असतात / केलेले असतात. म्हणजे 30 % मतांची बेगमी झाली की विजय निश्चित ! जाती-पातीचे राजकारण मग बंद कसे होणार ?  मतदारसंघात कोणत्या जातीचे किती प्राबल्य आहे हे बघूनच उमेदवार निवडला जातो. सर्वसाधारणपणे एखाद्या मतदारसंघात  30 ते 40 % मते एखाद्या जातीचीच असतात. आपल्या जात-भाईसाठी मतदार हिरीरीन मतदान करतातच ! बाकीचे उदासीन असतात. असा उमेदवार जेव्हा निवडून येतो व सरकार जेव्हा बनते तेव्हा तो / ते  आपली वोट-बॅंकच मजबूत करणार. 25-30 % मतदारांचे भले करणारे निर्णय बाकी 70 % लोकांवर लादले जाणार व त्याला विरोध होणार, विकास खुंटणार, जाती-पातीच्या दलदलीत लोकशाहीचा गाडा रूतत जाणार ! का ? तर  मतदार न फिरकल्याने !

हेच जर 80 % पेक्षा जास्त मतदान सातत्याने होत राहिले तर ? सगळ्यात मुख्य म्हणजे बोगस मतदान बंद पडेल वा त्याचा प्रभाव निकालावर पडणार नाही ! जाती-पातीची गणिते चालणार नाहीत, भावनिक आवाहनांचा परिणाम होणार नाही, मते विकत घेवूनही फायदा होणार नाही वा परवडणार नाही ! या सगळ्यांची गोळा-बेरीज म्हणजे चांगला उमेदवार, सर्व थरातुन पाठींबा असलेला, जातीच्या बाहेर विचार करणारा उमेदवार विजय होइल, असे उमेदवार देणारा  पक्ष सत्तेत येइल व मग व्यापक हिताचे निर्णय घेतले जातील. लोकशाही मजबूत होइल.

सध्या मतदानाच्या दिवशी रजा दिली जाते. याचा टक्का वाढण्यासाठी काहीही उपयोग होत नाही ती आधी बंद करायला हवी.  त्यातही गंमत म्हणजे एकाच दिवशी सगळ्या राज्यात मतदान नसेल तेव्हा येते. माझे कार्यालय आहे मुंबईत तर मुंबईत मतदान आहे तेव्हा मला सुट्टी मिळते व मी मतदान करणार पनवेलला तेव्हा तिकडे मतदान वेगळ्या दिवशी असेल तर परत मला 2 तासाचे कन्सेशन मिळते !  ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी दोन तासाची सवलत द्या , तेवढी पुरे आहे.  काम बंद ठेवल्याने करोडो रूपयांचे  नुकसान देशाचेच होते.

मतदानाची वेळ साधारण 7 ते 5 अशी असते. ती अशी मर्यादित ठेवण्यापेक्षा मतदारसंघात बुथ/केंद्र निहाय  80 % मतदान होइपर्यंत चालू ठेवायला हवीत ! भले दोन दिवस सुरू ठेवा की मतदान, काय प्रोब्लेम आहे ? एरवीही बंद मतपेट्या 5 दिवस कडी-कुलपात ठेवल्या जातातच ना ? मतदान केंद्राबाहेर फलक लावून मतदानाची टक्केवारी प्रदशित करावी, स्थानिक केबल नेटवर्क वापरून ती सर्वाना कळेल अशी सुद्धा व्यवस्था करता येइल. 7 ते 5 या वेळेत 80 % मतदान झाले तर ते केंद्र बंद करा नाहीतर सुरू ठेवा. काही दिवस थांबूनही टक्केवारी गाठली जात नसेल तर तिकडची प्रक्रीयाच स्थगित करा. याचा अर्थ त्या भागातल्या लोकांना लोकशाहीत रस नाही, तिकडचा कारभार प्रशासकावर सोडा ! त्या भागात कोणतीही विकासकामे करू नका ! आपले जात-भाईच नाही तर मतदारसंघातले  जास्तीत-जास्त मतदार मतदान करतील ही जबाबदारी आपसूकच उमेदवारावर व पक्षावर पडेल ! कोणतीही सक्ती न करता मतदानाचा टक्का वाढेल !

फिरवल्यामुळे भाकरी करपणार नाही, घोडा बुजणार नाही, पाणी अडणार नाही तसेच मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी फिरकला तर लोकशाहीचा गाडा सुद्धा अडणार नाही !

सर्व मतदारांना नम्र विनंती – स्वत: मतदानाचा हक्क बजावा व महाराष्ट्रात यंदा 80% + मतदान होइल या साठी प्रयत्न करा ! धन्यवाद !

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

या व्यंगचित्रात वावगे काय ?

गेले दोन दिवस टीके्ची झोड उठत असलेले व वंशवादी, भारतीयांची टींगल करणारे असा शिक्का बसलेले व्यंगचित्र मी अनेक कोनातुन पाहत आहे. यात आक्षेपार्ह काय आहे हे खरेच मला कळलेले नाही. उलट स्वत:ला "लय शहाणे" समजणार्या लोकांना शहाणपणाचे मार्मिक डोस यातून पाजले गेल आहेत. भारतीय पेहरावात भारतीय दाखविला तर तो अपमान कसा ? इंग्रजांच्या गुलामगिरीने आपण डोक्याचे सोडून कमरेला गुंडाळले व सायबासारखी शर्ट-पॅन्ट टाय घालू लागले हे जरी खरे असले तरी व्यंगचित्रात असे दाखवून भलताच गोंधळ उडला असता. भारतेयाचे कपडे टाप-टीप दाखविले आहेत, त्याला ठीगळे जोडलेली नाहीत. सोबत कृषिप्रधान देशाचे प्रतीक म्हणून गाय दाखविलेली आहे. भारतीय दारावर ठोठवतोय व बड्या धेंडाची झोप उडवतोय. अजीजी करीत नाही आहे, दखल घ्यायला भाग पाडतो आहे. यात भारताचा अपमान करण्याचा कोणताही हेतु मला तरी दिसत नाही ! भारतीयांची व्यंग समजायची कुवत नाही , तरल विनोद समजत नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते. बाळासाहेब ठाकरे व आर.के. लक्ष्मण सारखे थोर व्यंगचित्रकार याच भुमीतले ना ?
तरी ही न्यूयॉर्क टाइम्सने माफी मागावी याचा अर्थ भारताच्या खर्या-खोट्या रागाची सुद्धा दखल जगाला घ्यायला लागत आहे. हे मात्र स्वागतार्ह आहे !

कमळेच्या काडीमोडाची करूण कहाणी !

कमळा ही एका मोठ्या घरातली एकुलती एक लेक होती. दिसायला चांगली, अभ्यासात हुषार, टाप-टीपीची आवड असलेली व गृहकर्तव्यदक्ष ! लग्नाच्या बाजारात ती सहज खपली असती पण तिच्या घरच्यांची भरमसाठ हुंडा द्यायची इच्छा नव्हती व ज्या घराण्यात मुलगी द्यायची ते घराणे श्रीमंत नसले तरी चालेल चारीत्र्यवान मात्र हवे, आपल्या विचारधारेचे नसले तर निदान तिला समांतर विचारधारेचे हवे असा आग्रह असणारे होते. कमळेच्या माहेरच्यांना आपली विचारधारा सगळ्या देशात रूजवायची होती व देशाचे घर चालवायची महत्वाकांशा होती पण ती काही नजरेच्या टप्प्यात नव्हती. मोठ्या घरचा कारभार हाती यावा म्हणून कमळेच्या माहेरचे जंग जंग पछाडत होते पण यश मात्र कायम हुलकावण्या देत होते. मोठे घर सांभाळण्यासाठी आधी छोटी घरे सांभाळायला मिळावित व मग त्या घरांचा कारभार दाखवून मोठे घर चालवायला घ्यावे अशी व्यूहरचना ठरली.

महाराष्ट्रात घर बांधायची खटपट प्रमोद व गोपीनाथ काका करीत होते. पण इकडचे वातावरण जरा वेगळेच होते. हवामानाचा अंदाज दोन्ही काकांना येत नव्हता व दरवेळी बांधलेले घर कोलमडत होते. आपले घर मजबूत ठेवून इतरांची घरे कशी मोडायची याचे त्यांचे ज्ञान बारामतीच्या काकांच्या तुलनेत अल्पच होते ! प्रमोद व गोपीनाथ काकांप्रमाणेच महाराष्ट्राचे घर चालवायला इतरही बरेच इच्छूक  होते पण त्यातल्या त्यात तालेवार होते बाळासाहेब ठाकरे ! त्यांची जीभ म्हणजे दांडपट्टा होता व ती तरवारी सारखी फिरवून त्यांनी अनेकदा शरदरावांना सुद्धा गार केले होते ! पण आतून म्हणे या दोघांची अगदी घनिष्ट मैत्री होती. प्रमोद काकांकडे घराचा कारभार जायच्या आधी कमळेला पवारांच्या घरात द्यायचे ठरविले होते पण देण्या-घेण्यावरून ही सोयरिक मोडली होती !

कमळेला जर बाळासाहेबांच्या घरात दिली तर या सोयरिकेने पवारांचे घर मोडून महाराष्ट्रात स्वत:चे घर निदान भागीदारीत तरी बांधता येइल असा विचार प्रमोद रावांनी केला व या सोयरिकेचा प्रस्ताव बाळासाहेबांसमोर ठेवला. बाळासाहेबांचा हुंड्याला विरोध असला तरी घरबांधणीत कमळेच्या घरच्यांनीसुद्धा राबले पाहिजे व जो काही भाकर-तुकडा देवू तो खावून गुमान जगले पाहिजे ही अट मात्र होती. ही अट कमळेच्या इतर काकांना व भावांना मान्य नव्हती पण प्रमोदरावांनी “कमळेचा संसार सांभाळायची जबाबदारी माझी, तिचे सासरे भले आहेत” असा शब्द दिला व सर्वांना राजी केले !

कमळेला सासुवास नव्हता पण सासरेबुवा मात्र  फार छळत. सारखा पाण-उतारा करीत, तिच्या घरच्यांना नावे ठेवित, तिच्या चारीत्र्यावर संशय घेत. अगदीच झाले म्हणजे प्रमोद व गोपीनाथ काका येवून तिची समजूत घालत व हे ही दिवस जातील, जरा धीर धर म्हणून सांगून निघून जात. थोडे दिवस चांगले जात व परत ये रे माझ्या मागल्या सुरू होई. कमळेचा नवरा सुशेगात होता. घर सांभाळण्यात त्याला काही रस नव्हता. सासर्यांच्या  मेहनतीवर जगत होता. सासरेबुवांचे नोकर प्रामाणिक होते, त्यातल्या काहींनी गद्दारी केली असली तरी सासरेबुवा त्यांना पुरून उरले होते. आणि शेवटी तो सोनियाचा दिन आला ! कमळेच्या सासर्यांनी तिच्या भावांच्या मदतीने पवारांच्या घरावर कब्जा केला. कमळेला आता चार धडकी मिळू लागली, अंगावर चार दागिने दिसू लागले. अर्थात सासर्यांची करडी नजर तिच्यावर होतीच. ती आपल्या भावंडाना भरीला घालून या घरावर दावा सांगेल असा डाउट त्यांना सतत यायचा. याच भीतीतुन मग कमळेचा व तिच्या भावांचा, काकांचा जाहिर उपमर्द सासरे करू लागले. तुम्हाला कुत्रे विचारीत नव्हते. आज जे काही आहात ते माझ्या मुळेच असे जाहिर सभेत सुनवित. मधल्या काळात कमळेचे इतर राज्यातले भाऊबंद कर्ते-सवरते झाले व अनेक मित्र मिळवून त्यांना मोठ्या घराचा सुद्धा ताबा मिळाला.
दिवस आले तसे गेले ही ! सासर्यांचा जीभेचा पट्टा, वाढलेले वय, बोलघेवडी मुले व पुतण्या, त्यांच्या बड्या सरदारांची गद्दारी, घरातली भाउबंदकी या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणून पवार साहेबांनी आपले घरत परत ताब्यात घेतले. तिकडे माहेरच्यांचे दिल्लीतले मोठे घर सुद्धा अकस्मात कोसळले. कमळेच्या अंगावर परत चिंध्या आल्या. हे कमी म्हणून की काय कायम धीर देणारे प्रमोद काका निवर्तले ! एक मोठा आधार गेला. तिच्या नशीबी परत रांधा-वाढा उष्टी काढा आले ! पण कोठेतरी दूर आशेचे किरण दिसू लागले होते. तिचे भाऊ कर्तबगार निघाले. वेगवेगळ्या राज्यात त्यांनी परत आपले बस्तान बसविले व दिल्लीत स्वत:चे घर बांधता येइल एवढा विश्वास कमावला. त्या सर्व भावात गुजरातेतला दाढीवाला नरेंद्र भलताच बेरकी निघाला. आपले टोलेजंगी घर तर त्याने बांधलेच वर दिल्लीचे घर बांधायचे काम सुद्धा मलाच द्या असे तो सांगत सूटला. दोनदा त्याचे कोणी ऐकले नाही पण शेवटी त्याला एक संधी द्यायला काय हरकत आहे असे वाटून त्याला घर बांधायची मुभा दिली गेली. पुढे  गुजरातच्या चिरेबंदी घराचे मॉडेल देशभर फिरवून त्याने सगळ्यांची मने जिंकली व लोकांनी त्यालाच दिल्लीचे घर चालवायला दिले !

या दादाचा आपल्या कमळेवर भारी जीव होता. तिची परवड त्याच्या कानावर येत होती पण तो योग्य संधीची वाट पहात होता. मधल्या काळात कमळेच्या सासरच्या घराचा डोलारा पार कोसळला होता. साससेबुवा थकले होते म्हणून त्यांनी घराचा कारभार मुलाच्या व पुतण्याच्या हाती दिला होता. पुत्रप्रेमा पोटी मग त्यांनी पुतण्याला बेदखल केले व सर्व मालमत्ता कमळेच्या घरधन्याला देवून टाकली. पुतण्या चिडला व इरेला पेटला. कमळेच्या माहेरच्यांना पुतण्याला असे वार्यावर सोडणे योग्य नव्हे असे वाटत होते. वडीलकीच्या नात्याने गोपीनाथ काका चार चांगल्या गोष्टी कमळेच्या घरच्यांना सांगायला गेले तर त्यांचाच “खामोश” म्हणून उपमर्द केला गेला. सर्व कारभार आयताच कारभार्याच्या हाती आला.  भांडून घर सोडलेल्या भावाची ताकद कारभार्याला जोखता आली नाही, कोणी समजावण्याचे पलिकडे कारभारी गेलेले होते. शेवटी व्हायचे तेच झाले. सत्तेचे दोर हातात आले असे वाटत असतानाच  निसटले. चुलत भावाने आपला हिसका दाखविलाच ! या नंतर थकलेले सासरे काळाला शरण गेले.  परत कमळाच पांढर्या पायाची ठरली.

दिल्लीचा एकछत्री कारभार हाती आल्याने गुजरातच्या दादाची माणसे कमळेला तिचा हक्क मिळायलाच हवा असे ठणकावून तिच्या कारभार्याला सांगू लागली. कारभारी त्यांनाच कमळेच्या कागाळ्या सांगू लागला. कमळी म्हणे शरदरावांच्या घरच्या कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे. हे वागणे बरे नव्हे. मी खपवून घेणार नाही. नेसत्या वस्त्रानिशी लाथ मारून घराबाहेर काढीन असे धमकावू लागला ! खरे तर तोच अनेक घरांचे उंबरे झिजवित होता, पण तो पडला पुरूष, त्याला हे सगळे करायचा हक्कच आहे ना ! मधल्या काळात कमळेचा संसार सांभाळून धरणारा गोपीनाथ काका सुद्धा काळाच्या पडद्याआड गेला व कमळेच्या कारभार्याला रान मोकळे मिळाल्यासारखेच झाले. कमळेच्या भावांना तुमची मला गरज नाही मी एकटाच घर बांधायला समर्थ आहे. मी जे देतोय ते घ्या नाहीतर फुटाची गोळी घ्या असे सांगू लागला.

अचानक कमळीच्या कारभार्याला गुजरातच्या दादाच्या पुर्वजांशी असलेले जुने वैर आठविले, अगदी खानदानी वैर ! खूप वर्षापुर्वी कारभार्याचे वंशज व दादाचे वंशज मुंबईच्या मालकीवरून एकमेकांच्या उरावर बसले होते. त्याही खूप खूप शतके  आधी कोणा शिवरायाने दादाची सुरत लुटली होती. कारभार्यांच्या आजोबाची मुंबईवरच्या मारामारीत सरशी झाली होती. पुढे सासरेबुवांना मुंबई मिळाली पण दादाच्या माणसांची भांडी घासावी लागतात म्हणून त्यांनी  वादळ उठविले होते. या नंतर बरेच पाणी वाहून गेले होते व दोन्ही पक्षात सुलुख झाला होता. कमळीला सुन म्हणून घरात घेताना याची कोणी वाच्यताही केली नव्हती. दादा आता कमळीच्या मागे भक्कमपणे उभा आहे असे बघून कारभार्याची सटकली !  त्याने दादाचीच औकात काढली. जुने मुडदे उकरू लागला. झाले, कमळीचाही आता निर्धार पक्का झाला.  आता अधिक अपमान नाही सहन करायचा, कारभार्याला त्याची खरी जागा दाखवायचीच या निर्धाराने ती पेटून उठली. आपले सुद्धा स्वत:चे घर हवे म्हणून मैदानात उतरली! गंमत म्हणजे पवार साहेबांनीही सोयरीक मोडून आवंदा स्वत:चे घर बांधायचे मनावर घेतले आहे व कंबर कसली आहे. कमळेच्या भावाची भीती वाटते म्हणून ते तिच्या कारभार्याला जवळ घेवू पाहत आहेत. तशी त्यांच्या मनात सुद्धा कमळेला वश करून घेता आले तर हवेच आहे हो , आपल्या मुलीची व पुतण्याची काळजी त्यांना ही आहेच की ! पण सध्या तरी हाताची घडी तोंडावर बोट !

या लढाईत मी कमळेच्या बाजूने ठामपणे उभा राहणार आहे ! तुम्ही ???????मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

रमेश किणीचे काय झाले ?

सामना सिनेमात मास्तर एकच प्रश्न विचारत असतात "मारूती कांबळेचे काय झाले ?" मला पण राजना एकच प्रश्न विचारायला आहे "रमेश किणीचे काय झाले" ? 

शिवशाहीत एक सामान्य मराठी माणूस, सामना कार्यालयात शेवटचे बघितलेला , खिषात विष खायलाही पैसा नसलेला माणूस मुंबईतुन वादळी पावसात पुण्याला पोचला कसा, अलका सिनेमात, ब्रोकन अ‍ॅरो च्या शेवटच्या शोला गेला कसा, सोडीयम सायनाइड पिवून मेला कसा व हे रहस्य अनेक वर्षे सी.आय.डी तपास होवूनही कसे उलगडल गेले नाही ? सामनाच्या पुणे आवृत्तीत रमेश किणी मृत अवस्थेत सापडल्याची बातमी नव्हती पण मुंबई आवृत्तीत होती - Exclusive !

या प्रकरणाचे कंगोरे जबरदस्त आहेत, मेलेला माणूस मराठी, त्याला जागा खाली करायला लावणारा निरंजन शहा हा गुजराती व या शहाला वडीलांसमान मानणार कोण तर मराठीचा एकमेव कैवारी राज ठाकरे ! हे प्रकरण उघडकीला आणणारे होते छगन भुजबळ ! राजची चौकशी तेव्हा पोलिसांनी तेव्हाच्या गृहराज्यमंत्री सेनेच्या किर्तीकरांच्या उपस्थितीत केली होती ! 

रमेश किणींच्या विधवा शीला किणी न्याय मिळावा म्हणून झगडत होत्या . स्वत: बाळ ठाकरे अतिषय अश्लाघ्य भाषेत त्यांच्यावर सामनात टीका करीत होते ! रमेश किणी यांचे दुसर्यांदा शव विच्छेदन केले तेव्हा त्यात मेंदू सापडला नव्हता. रमेश किणी यांना मेंदूच नव्हता असे सामनात बाळ ठाकरे यांनी लिहिले होते ! 

शिवसेने बद्दल जबरदस्त भ्रमनिरास माझा या एकाच प्रकरणातुन झाला !

नौटंकी साला !

सेनेला मुंढे प्रेमाचे भरते आलेले पाहून एकच डायलॉग आठवतो - नौटंकी साला !

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची आपली महत्वाकांशा मुंढेनी कधीच लपवून ठेवली नव्हती. तेवढी त्यांची पात्रता होतीच व आज जर युती असती तर भाजपाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले असते हे सुद्धा नक्की ! मागच्या सलग 3 निवडणुका कमी जागा लढवूनही सेनेच्या जवळपास जागा त्यांच्याच दमदार नेतृत्वाखाली भाजपाला मिळाल्या होत्या. 

छगन भुजबळांनी सेनेचे दोन तुकडे केल्यावर विधानसभेत सेनेचे आमदार कमी झाले व विरोधी पक्षनेतेपद आपसुकच भाजपाकडे गेले व मुंढेंनी क्षणाचाही विलंब न लावता ते ग्रहण केले. या नंतर बाळासाहेबांनी मुंढेवर "ठाकरी" शैलीत टीका केली होती.

पुढच्या निवडणुकित युतीची सत्ता आली  व महत्वाचे असे गृहमंत्रीपद मुंढेनी आपल्याकडे ठेवले होते व त्यावरूनही ते सेनेच्या टीकेचे धनी झाले होते.

पवारांच्या नेतृत्वाखाली तेव्हा अखंड कॉंग्रेसला युतीने हरविले होते तेव्हा पवार बाहेर पडल्यावर मतांच्या विभाजनात युती सत्ता टिकवेल असे दिसत होते.लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका एकत्रच झाल्या व एक अजब ट्रेंड बघायला मिळाला. लोकसभेत युतीने आघाडी घेतली तर विधानसभेत दोन्ही कॉंग्रेस मत विभाजनानंतरही , मागाहून एकत्र येवून सत्ता काबीज करू शकल्या. 

युतीच्या अनपेक्षित पराभवाचे कारण  होते "युतीत ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री" हे सूत्र ! सेना व भाजपाने आपले आमदार जास्त आणायचा एक आत्मघातकी मार्ग निवडला तो म्हणजे मित्रपक्षाचेच उमेदवार छुप्या कारवाया करून पाडायचे ! याचा परिणाम सत्ता गमावण्यात झाला ! बाळासाहेबांनी या वेळेही मुंढे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांशा मुळावर आल्याचे म्ह्टले होते. पुढे विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही म्हणून राण्यांनी सेना सोडली व सोबत 6 आमदार सुद्धा नेले. सेनेला विरोधी पक्षनेतेपदावर परत एकदा पाणी सोडायला लागले ! 

त्या नंतर राजनीच सेना सोडली व मनसे स्थापली. राज्यभर प्रचार करून राजने मनसेची हवा निर्माण केली. त्यांची ताकद (उपद्रव मुल्य म्हणा हवे तर !) सगळ्यात आधी मुंढेंनी हेरले व मनसेशी युती हवी असे स्पष्ट बोलून दाखविले. झाले, परत सामनामधून गोपीनाथरावांवर आगपाखड झाली व तो विचार त्यांनी सोडावा लागला ! अर्थात पुढे मुंढेच द्रष्टे ठरले व सत्तेचा घास युतीला मनसेने गिळू दिला नाहीच ! या वेळी तर भाजपाला सेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या व साहजिकच विरोधी पक्षनेतेपद सुद्धा !

लोकसभा जिंकल्यावर  मोदीसरकारने मानाने मुंढेना दिल्लीत बोलवून घेतले व महत्वाचे खातेही दिले. अर्थात हा रांगडा गडी दिल्लीच्या दरबारी राजकारणात फिट बसणारा नव्हता तेव्हा विधानसभेच्या वेळी त्यांची महाराष्ट्रात पाठवण करायचे भाजपाने ठरविले होतेच. केंद्रात मंत्री म्हणून काम केलेले मुंढे आता महाराष्ट्रात येणार ते मुख्यमंत्री व्हाययाच हे समजण्याइतके सेना नेते दु्धखुळे नक्कीच नव्हते. सेनेच्या तंबूत थरकाप उडालेला होताच, युती तुटणार वा भाजपा जास्त जागा भांडून घेणार हे स्पष्ट दिसतच होते. 

दरम्यान नियती अजब डाव खेळली. मुंढेच अपघातात निवर्तले, मुख्यमंत्री पदाचा प्रबळ दावेदारच रणांगणातुन बाहेर पडला. पुढे या अपघाताची चौकशी करावी अशी मागणी सेनेने केली. ( रमेश किणी यांच्या मत्यूची चौकशीच काय वाच्यता सुद्धा तेव्हा सत्तेत असलेल्या सेनेला नको होती. न्यायालयाच्या ब भुजबळांच्या दणक्याने ती करावे लागली याची आठवण सुद्धा आज कोणाला होत नसेल !)  सेनेसाठी मात्र हे चांगलेच झाले व भाजपा महाराष्ट्रात नेतृत्व पोकळी झाल्याने भाजपा जागा-वाटपात तुटे पर्यंत ताणणार नाही हे  सेना गृहीत धरून चालली. अनेक अपमान पचवून युती टीकविणार्या भाजपाला मात्र मोदींच्या लाटेने युती अधिक जागा मिळणार नसतील तर युती तोडणेच योग्य वाटू लागले. सेनेला अखेरपर्यंत बोलण्यात गुंतवून, बाकी मित्रांना आपल्याकडे वळवून शेवटच्या क्षणी भाजपाने युती तोडली ! गोपीनाथरावांनी अगदी हेच केले असते ! पण ते आता हयात नाहीत म्ह्टल्यावर मात्र सेनेला त्यांचा पुळका आला आहे ! 

नौटंकी साला !

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०१४

ब्लॉग पीडीएफ कींवा इ-बुक मध्ये कसा रूपांतरीत करायचा ?


ब्लॉग नवीन लिहायला घेतला तेव्हा नुसता मोकाट सूटलो होतो. बरहा वापरून थेट ब्लॉगवरच पोस्ट करायचो. पोस्टस्‌नी पन्नाशी गाठल्यावर आपल्या ब्लॉगचे बॅक-अपच नाही हे लक्षात आले. ऑर्कुटवरील मित्रांनी मग एक सोप्पा उपाय तेव्हा सांगितला होता. ब्लॉगर सेटींग आवश्यकतेप्रमाणे बदलून आपल्या सगळ्या पोस्ट एकाच वेळी डिस्प्ले करायच्या व मग ब्राउजरमधला “सेव्ह अज” पर्याय वापरून ब्लॉगची आधी एच.टी.एम.एल. फाइल बनवायची मग त्याच्या मदतीने कॉपी – पेस्ट करून वर्ड फाइल करायची व मग पीडीएफ. ज्यांना फुरसतीत ब्लॉग वाचायचा आहे त्यांना मग माझ्या ब्लॉगची पी.डी.एफ लिंक देवू केली. पुढे पोस्टचा पसारा वाढतच गेला व मूळ वर्ड फाइल अपडेट करायचे राहूनच गेले. म्हणता म्हणता पोस्ट 200 च्या पुढे गेल्या. मग लिखाणातला उत्साह संपला. एवढे केले आहे त्याचे बॅक-अप असावे याची गरज परत जाणवू लागली. मधल्या काळात ब्लॉगरने काय सेटींग बदलली माहीत नाही पण सगळ्या पोस्ट एकावेळी पडद्यावर येवूच शकत नाहीत असे झाले व आधी वापरलेला पर्याय बाद झाला. प्रत्येक पोस्ट कॉपी पेस्ट करायचा सुद्धा जाम कंटाळा आला होता. पण बॅक-अप नाही ही कल्पना अस्वस्थ करीतच होती.

शेवटी गुगल बाबाला शरण जावून काही तंत्र आहे का हे शोधायला घेतले. अनेक प्रकारे गुगल केले पण वाट सापडण्या ऐवजी वाटेलाच लावणारे पर्याय समोर येत. पण चिकाटी सोडली नाही व ब्लॉगबुकर नावाची साइट सापडली. त्यात दिल्याप्रमाणे सगळे करून बघितले पण पी.डी.एफ. फाइल काही बनत नव्हती. म्हणजे फाइल बनायची पण कोरी पाटी !

कदाचित  ब्लॉगरच्या xml  मध्ये काही दोष असेल म्हणून सगळा ब्लॉग वर्डप्रेस वर अपलोड केला पण हा प्रयत्न सुद्धा निष्फळ ठरला.  FAQ चे पारायण केले तेव्हा कळले की ब्लॉगर / वर्डप्रेस मधून बनणार्या  xml  फाइल मध्ये काही दोष असावा. मग प्रोग्रामर मित्रांना साकडे घातले पण ब्लॉगबुकरला हवी असलेली xml  कशी बनवायची ते कोणाला समजत नव्हते. शेवटचा उपाय म्हणून साइटच्या निर्मात्यालाच इमेल धाडले. अर्थात त्याने त्याला उत्तर दिले नाही व पुढे असे काही इमेल धाडल्याचे मी सुद्धा विसरून गेलो.

अनेक महिन्याने सहजच त्या साइटला जावून पीडीएफ बनवायचा प्रयत्न केला व काय आश्वर्य, नुसती पीडीएफच नाही तर वर्ड व इ-बुक अशा अजून दोन फाइल जनरेट झाल्या ! म्हणजे माझ्या इमेलचा काहीतरी परिणाम झाला होता ! पीडीएफ फाइलचा काही उपयोग झाला नाही कारण नुसते चौकोनच दिसत होते, कदाचित मराठी फॉन्टचा प्रोब्लेम असावा पण वर्ड फाइल मात्र परफेक्ट बनली व माझा हेतू साध्य झाला. “जे जे आपणासी ठावे ते ते सकळांसि सांगावे” या समर्थ वचना प्रमाणे ही सर्व पद्धत शेयर करीत आहे. लाभ घ्यावा ही विनंती ! धन्यवाद !

Directly convert your blog in pdf or word or e-book !

Bloggers can convert their entire blog in one go in pdf or word or e-book, without spending a single paisa ! pdf or word or e-book  files can be saved on hard drive. This is very useful to share the files for those who want to read your blog offline/ e-book reader  or back up purpose ! This can l be done in just 3 simple steps.


1) create xml file of your blog. - for blogspot users, open settings menu of your blog > other > export blog > download blog. This will sane xml file of your blog on pc.

2)open site http://www.blogbooker.com/
click on pdf + docs(Beta), select your blog system , using choose file option, browse for xml file of your blog you saved in last step, enter url of your blog and click on "create your blogbook" button.


3) your book will be ready in 5 to 10 minutes. you will get pdf link and doc file links, odf file links (yearwise). just saved files to hard disk with "save as" option ! 

Done !

रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४

बाळासाहेबांच्या नावाने भावनिक साद घातली तर मराठी मतदार विरघळतो का ?


छगन भुजबळ हे सेनेतुन बाहेर पडलेले पहिलेच बडे नेते. बाळासाहेबांनी तेव्हा खरोखरच भुजबळांना संपविले होते. माझगाव या त्यांच्या बालेकिल्ल्यात बाळा नांदगावकर या कार्यकर्त्याला उमेदवारी देवून भुजबळांना चीतपट केले होते सेनेने (आज नांदगावकर सुद्धा मनसेवासी झालेले आहेत !), मग भुजबळ नाशिकात गेले व लोकसभेला उभे राहिले व तिकडे सुद्धा त्यांचा पाडाव झाला !). मग मात्र भुजबळांनी आपले बळ वाढविले व बाळासाहेबांशीही सुलुख केला !

गणेश नाइक - सेनेची सत्ता असतानाच नाइक मंत्री होते व त्यांचा मुलगा नवी मुंबई मनपाचा महापौर. अचानक साहेबांची मर्जी फिरली व नाईकांना सेनेतुन हद्दपार केले गेले. मग नाईक गेले आधी कॉंग्रे्समध्ये व नंतर पवारांचा हात धरून राष्ट्रवादीत. त्यांच्या घराण्याची सत्ता अजूनही नवी मुंबईत शाबूत आहे.

नारायण राणे - राणे यांनी बाळासाहेबांना खरे हादरविले ! आपल्या सोबत बाहेर पडलेल्या सर्वच आमदारांना त्यांनी पोटनिवडणुकित निवडून आणले ! राण्यांचा पराभव करायचे बाळासाहेबांनी कोकणी माणसाला भावनिक आव्हान तेव्हा केले होते पण कोकणी माणसाने त्याचा मान राखला नाही. कोकणताला सेनेचा गड राण्यांनी साफ उध्वस्त केला !

विखे-पाटील - साखर सम्राटांना उसाच्या चिपाडासारखे पिळण्याची बाळासाहेबांची इच्छा तर होती पण तसे काही झाले नाही. सेना सत्तेत असताना जे अपक्ष त्यांच्या सोबत होते त्यांनी साखर सम्राटांचे हित अबाधित कसे राहिल याची पुरेपुर काळजी घेतली. अर्थात सेनेची सत्ता जाताच यातले बहुतेक स्वगृही परतले व आपल्या एरीयात इज्जत राखून वावरले. पुढे राधाकृष्ण पाटलांनी मात्र गद्दारी केल्यावर लोकसभेच्या निवडणुकित पाडून बाळासाहेबांनी आपली हुकमत दाखविली होती.

राज ठाकरे - दुसर्यांच्या घराणेशाहीवर हल्लाबोल करणारे बाळासाहेब शेवटी आपल्याच घरातील कौटुंबिक कलहाला थोपवू शकले नाहीत. मुलगा किे पुतण्या यात शेवटी त्यांनी मुलाचीच निवड केली व पुढे तर राजला आपले नावही घ्यायची बंदी केली. डिवचलेल्या राजनी आपला हिसका त्यांना त्यांच्या हयातीतच दाखविला व मागच्या विधानसभेत सेनेच्या तोंडचा सत्तेचा घास हिरावून घेतला.

सेना अगदी नवी असताना कोणा बंडू शिंगरेने बंड करून प्रती-शिवसेना काढल्याचे आठविते व त्यान्र अमेरिकन वकिलातीवर हल्ला सुद्धा केलेला होता. पण त्यावेळी सेना दखल घेण्याएवढी मोठी नव्हती. काही वर्षापुर्वी हा बंडू शिगरे वारला. 

आपल्या सभांना गर्दी करणारे लोक मतदानाच्या दिवशी कोठे गायब होतात हे प्रश्न बाळासाहेबांना नेहमीच पडायचा, कालपासून  राज यांना सुद्धा तोच प्रश्न सतावतो आहे !

एखादा सिनेमा जसा चालेल की पडेल याचे भाकित वर्तविता येत नाही तसेच निवडणुकितील जय / पराजयाचे आहे व  नेत्यांच्या भावनिक आव्हानाचे आहे ! शेवटी लोक म्हणजे ओक हेच खरे !