सोमवार, ८ जून, २००९

३५ टक्क्याला पास ?

ब्रिटीशांनी भारतातल्या सध्याच्या शिक्षण पद्धतीचा पाया घातला त्याला शतक तरी उलटले असेल. गोर्या साहेबाला मदत म्हणून कारकुन्डे पैदा व्हावेत हाच त्या शिक्षणाचा हेतू होता. कारकुनाला जुजबी बेरीज, वजाबाकी, गुणाकार व कागद-पत्रांची नक्कल करता येणे एवढे जमले तरी साहेब खुष होता. ब्रिटीश सत्ता गेल्यानंतर शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल अपेक्षित होता, नवा इतिहास लिहायला हवा होता, पण दुर्दैवाने ते झाले नाही व अजूनही शिवरायांचा इतिहास थोडक्यात आटपून आपल्याला ब्रिटीश, फ़्रेंच, रशियन क्रांतीचा अभ्यास करावा लागतो व अमेरीकन यादवी अभ्यासावी लागते. पहील्या आणि दूसर्या महायुद्धाच्या दुष्परीणामातुन युद्ध खेळलेले सगळे देश बाहेर पडले , आपण मात्र अजून त्याचा अभ्यास करतो आहोत !
तसे बदल झालेच नाही असे नाही, अनेक वेळा अभ्यासक्रम बदलला गेला, वेगवेगळे शैक्षणिक आकृतिबंध अभ्यासले गेले, अनेक पॅटर्न आले आणि गेले, शिकवावे कसे यावर पण बरेच चर्वित-चर्वण झाले, परीक्षा कशा घ्यायच्या ( का घ्यायच्याच नाही ?) व त्याचे निकाल (!) कसे लावायचे यातही भरपूर प्रयोग झाले. पण गंमत म्हणजे पुढच्या यत्तेत ढकलायचा निकष, ३५ % ला पास, यात टक्कामात्रही बदल झाला नाही ! अगदी काश्मीर ते कन्याकुमारी, कोठेही जा, ३५ % ला पास यात मात्र कमालीचे एकमत ! कधी काळी पहीला येणारा ७५ % मार्क मिळवायचा, सध्या पहील्या येणार्याची टक्केवारी १०० % च्या घरात पोचली आहे, उत्तीर्णांचे प्रमाण ३०-३५ % वरून थेट ६०-७० % झाले आहे, ( मुंबई विभागात तर ८० % ! ), अधिकाधीक मुले पास कशी होतील ही एकच चिंता सर्व धुरीणांना पडली आहे पण तरीही ३५ ची वेस मात्र कोणी बदलत नाही.(कमी करत नाही हेच नवल !)
शिकवले त्याचे मुलाला किती आकलन झाले हे कळण्याची फ़ूटपट्टी म्हणजे टक्केवारी. वर्षभरात जे काही शिकवले त्यावर आधारीत तोंडी व लेखी परीक्षा घेतली जाते व त्यात त्याचे १/३ हून किंचित थोडे गुण मिळाले की तो विद्यार्थी ( की गुणार्थी ? ) पास, नाहीतर नापास ! सध्या २०% गुण शाळाच मुलांना देणार आहेत आणि त्यात शाळा सहसा कंजुशी करत नाहीत, अगदी ’दे दान सूटे गिर्हाण’ च्या धर्तीवर २०% गुणांची बेगमी आधीच झालेली असते. लेखी परीक्षेत रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा. चूक की बरोबर, एका वाक्यात उत्तरे द्या, असे प्रश्न सोडवून सर्वसाधारण विद्यार्थी पास-नापासाच्या फ़ेर्यातुन सहज सूटू (निसटू!) शकतो. या एक मार्काच्या निदान पाच प्रश्नांची उत्तरे इतर प्रश्नात सापडतात ! टापटीपीला पण म्हणे पाच गुण दान केले जातात ! एकूण तीस मार्काची शीडी लावून पास करायचा प्रघात आहेच ! प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना पर्याय ही भरपूर दिलेले असतात. प्रत्येक गटात विचारलेल्या एकूण प्रश्नांपैकी / पर्यायांपैकी फ़क्त अर्धेच सोडवायचे असतात. कोणत्या धड्यावर किती मार्काचे प्रश्न येणार याची सुद्धा कल्पना दिलेली असते त्यामुळे अनेक धडेच्या धडे ऑप्शनला टाकता येतात. थोडक्यात वर्षभरातल्या एकूण धड्यापैकी अर्धे धडे जरी धड केले तरी चालसे ! शिकण्याचा आनंद मिळावा, विषयाची गोडी लागावी या धोरणालाच या मुळे हरताळ फ़ासला जातो व विद्यार्थी फ़क्त गुणार्थी होतो ! परीक्षेमध्ये विद्यार्थाच्या ज्ञानाचा कस लागावा असे काही विचारलेच जात नाही. निबंध, पत्र-लेखन, सारांश लेखन यांचे विषय सुद्धा गाइड बघूनच दिले जातात ! मग पदवी धारण केलेल्या तरूणाला साधा अर्ज भरता येत नाही, एखाद्या विषयावर आपली मते मांडता येत नाहीत, स्वत:चे मत बनवता येत नाही तेव्हा मला तरी आश्चर्य वाटत नाही. काही वर्षापुर्वी सरकारनेच ग्रामीण भागातल्या आठवीतल्या मुलांची गुणवत्ता जोखली होती तेव्हा त्या मुलांना साधी अक्षर-ओळख सुद्धा झालेली नाही हे नागडे सत्य बाहेर आले होते. शहाण्याचे तिशीकडे या उक्तीप्रमाणे सरकारने उपाय मात्र भलतेच केले ते अलाहीदा !
अभ्यासक्रमाची मार्कात विभागणी, प्रश्नांचे स्वरूप बघितले तर ३५ टक्क्याला पास हे खरे तर २०% एवढेच भरते. म्हणजे शिकवलेल्यापैकी १/५ जरी डोक्यात शिरले तर पुढच्या यत्तेचा मार्ग मोकळा होतो. पुढे पाठ , पाठी सपाट हे सुद्धा आपल्या शिक्षण पद्धतीचे अव्यवच्छेदक लक्षण आहे. तेव्हा पदवीधर तरूणाची खरी यत्ता कोणती हे तुम्हीच ठरवा आता. याचे दुष्परीणाम समजतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. सनदी सेवच्या नोकर्या, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यांचे निकाल जेमेतेम २ ते ३ % असतात यातच सगळे आले. बहुजनांपर्यंत शिक्षण पोचावे या नुसत्या बाता झाल्या, खरे तर राजकारण्यांच्या विना-अनुदानीत शाळा-कॉलेजांना ( शिक्षणखाने !) मुबलक कच्चा माल मिळावा म्हणून मायबाप सरकार चवथी पर्यंतच्या परीक्षाच रद्द करणार आहे, गणोबा व इंग्रजी हे विषय सुद्धा ऑप्शनला टाकायचे सरकार दरबारी घाटत आहे. शिक्षणाचे शिक्शाण कसे करता येइल याच विचारात अगळॆ असताना मी जर माझे मत मांडले तर माझीच यत्ता विचारली जाइल यात शंकाच नाही पण तरीही मला ठामपणे वाटते की किमान दर्जा राखायचा असेल तर पहीली पासून ३५ टक्क्याची वेस दहावीपर्यंत निदान ५० टक्क्यापर्यंत व पदवीसाठी ६० टक्क्यापर्यंत वाढवावी लागेल. गुणावान विद्यार्थी हवे असतील तर गुणदान बंद करून ३५ टक्क्याची सीमारेषा लांबवावीच लागेल.

गुरुवार, ४ जून, २००९

इतिहास का शिकायचा ?

इतिहास – साधा सोपा अर्थ “जे घडले ते असे घडले” ! व्यासांच्याच वाक्यात सांगायचे तर महाभारत हा “जय” नावाचा इतिहास आहे ! माझ्या मते तो जगातला पहीला आणि शेवटचा इतिहास आहे बाकी सगळा विपर्यास आहे ! महाभारतात व्यास आपण अनैतिक संबंधातुन जन्मलो हे लपवून ठेवत नाहीत, युधीष्ठीराचे अवगुण सांगताना दुर्योधनाचे सदगुण सुद्धा नमूद करतात ! भीष्म ’अर्थस्य पुरूषो दासा” म्हणत द्रौपदी वस्त्रहरण प्रकरणात हात झटकतात, गीता सांगताना कृष्ण अर्जुनाला गांडू (क्लैब्य) असे म्हणतो ! कोठेही लपवाछपवी नाही, कोणाचे भलते उदात्तीकरण नाही ! याला म्हणतात इतिहास. आता हाच इतिहास झाला आहे !

इतिहासाला विंग्रजीत History म्हणतात, बरोबर आहे his or her story ! जेत्यांचा इतिहास. तर असा हा इतिहास आपल्या माथी अगदी शालेय जीवनापासून मारला जातो. सनसनावल्या लक्षात ठेवताना अनेकांची साले निघतात. इतिहास का शिकायचा तर म्हणे चुकांची पुनरूक्ती हो़उ नये म्हणून ! हेच मुळात साफ़ चूक आहे ! पहील्या महायुद्धा नंतर दूसरे झालेच ना ? युद्धात जिंकणारे मराठे तहात हरतात हा सुद्धा इतिहासच आहे ना ? तसे या वाक्यात मराठे या शब्दा ऐवजी हिंदू, भारत हे शब्द वापरलेत तरी इतिहास बदलणार नाही ! शिवरायांना मोघलांनी जेवढे छळले नाही तेवढे स्वकीयांनी छळले हा सुद्धा इतिहासच ना ? गद्दारी / फ़ितुरी कोणी, कोणाशी आणि केव्हा केली हे इतिहासात शिकून वर्तमानात (वर्तनात सुद्धा !) काही फ़रक पडला का ? सापाला दूध पाजले तरी तो विषारी फ़ुत्कारच सोडणार, हे सुद्धा इतिहासच सांगतो ना ?

बरे जो काही इतिहास म्हणून आहे त्यात तरी एकवाक्यता आहे का ? शिवाजी सेक्युलर होते की हिंदुत्ववादी ? समर्थ रामदास शिवरायांचे गुरू होते की औरंगजेवाचे हेर ? महाराजांनी खानाचा कोथळा काढला की कुरवाळले, पैगंबर पळाला की त्याने यशस्वी माघार घेतली ? संभाजी बदफ़ैली होता की धर्मवीर ? आर्य मुळचे कोणते ? १८५७ चे बंड हे भटा-बामणांचे, गादी टीकवण्यासाठीचे प्रयत्न होते का स्वातंत्र्य-समर ? इतिहास कोणात्याच प्रश्नावर निर्विवाद मत मांडत नाही, मत बनवायचा प्रयत्न मात्र जरूर करतो. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या ! मग परत समाजात दुफ़ळी निर्माण होते, आपलाच इतिहास खरा, जाज्वल्य, त्यांचा विपर्यास, रचलेला , रंजक हे सिद्ध करण्यासाठी नवा रक्तरंजित इतिहास रचला जातो ! इतिहासाबरोबरच भूगोल सुद्धा बदलला जातो. सरकार बदलले की इतिहास सुद्धा बदलतो !

तरीही आपल्याला इतिहास शिकायलाच लागतो, तो तरी कोणाचा ? शिवरायांचा इतिहास वा भारतीय मातीत घडलेला इतिहास चवथीपर्यंतच गुंडाळला जातो व मग जगाचा इतिहास ’पढवला’ जातो ! अमेरीकन यादवी, दोन महायुद्धे – त्यांची कारणे – परीणाम (युद्धाच्या अंतातच युद्धाचे बीज असे ) इंग्रज, फ़ेंच, रशियन राज्यक्रांत्या तर अगदी वांत्या आणतात. कित्येक हजारो वर्षे सहीष्णुता या मातीत रुजलेली आहे, इतिहास शिकवतो की ती फ़्रेंच राज्यक्रांतीची देन आहे ! भारताबाहेरच्या मुलांना असा दूसर्यांचा इतिहास खचितच पढवला जात असेल ! अडकलेली फ़ीत जशी पुन्हा पुन्हा वाजत राहते तसा तोच इतिहास पुन्हा पुन्हा नव्याने जन्म घेतो ! अगदी पहीले पाढे पंचावन्न ! अमेरीका लादेन नावाचा भस्मासुर पोसते आणि इकडे भारतातले राज्यकर्ते मतांच्या राजकारणासाठी जात्यंध हीरवी किड कुरवाळतील, अगदी दूसरी फ़ाळणी इतिहासाजमा होईपर्यंत, मग परत तिसरीचे खोदकाम !

इतिहासापासून कोणीच, कोणताच धडा केव्हाच कसा घेतला नाही हे शिकण्यासाठी मात्र इतिहास जरूर शिका ! इतिहासच साक्षी आहे !

इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेउन ना नाचा,
करा उल्लंघन त्याचे आणिक रचा इतिहास नवा !

’इति’श्री !

बुधवार, ३ जून, २००९

खेळीया !

संध्याकाळी पाच वाजता कॅन्टीन मध्ये बसुन चहाचे घोट घेत असताना मला आता पुढे काय याची काळजी पडली होती. मित्राला मी हेच सांगत होतो की काय साली आडवेळेची गाडी आहे, पहाटे ३.३० वाजता ही काय एक्सप्रेस सोडायची वेळ झाली का ? इतका वेळ मुंबई सेंट्रलच्या परीसरात सामान सांभाळत काढावा लागणार होता. एवढ्यात एक प्रसन्न व्यक्तीमत्वाचा माणूस आम्हाला सामोरा आला. अत्यंत अदबीने तो बोलला “माफ़ करना, आपकी बाते मुझे सुनाई दे रही थी. इस नाचीज को विवेक शर्मा कहते है, आप मेरे घर तशरीफ़ लिजीये, मेरा घर स्टेशन के पास ही है. आप मेरे घर पधारे, भोजन के बाद, कुछ गपशप करेंगे , मै आपको सही समय स्टेशन छोड दूँगा”. मी पण तेवढ्याच नम्रतेने “माफ़ किजीये, न्योते का शुक्रीया, लेकिन मै आपको पहचानता भी नही …” माझे वाक्य त्याने अर्धवट तोडले व म्हणाला की मी तुमच्या बोराडे साहेबांचा मित्र आहे व तुमच्या बद्दल सुद्धा बरेच ऐकून आहे, संकोच बाळगायचे कारणच नाही. तेव्हा माझ्या वतीने बोराडेने परस्परच होकार देउन टाकला व विचार कसला करतोस, जाच, याची बायको साक्षात अन्नपूर्णा आहे ! माझा होकार ग्राह्य धरून त्याने केव्हा निघायचे असे विचारले व काही काम नसल्यामुळे मी कधीही, आता निघालो तरी हरकत नाही असे सांगितले . तो ही तयार झाला. रस्त्यावर त्याने टॅक्सी थांबवली व आम्ही आत बसलो. मी अहो कशाला उगाच, ट्रेनने गेलो असतो की, असे म्हणताच परत तो अदबीने म्हणाला की आप तो अब हमारे मेहमान है, आपको कतई भी तकलीफ़ नही होनी चाहीये ! प्रवासात त्याचा चांगला परीचय झाला. त्याला दोन मुले होती. त्याची बायको संगणकातली पदवीधर असून सुद्धा गृहीणी होती, त्यानेच तीला घरासाठी नोकरी सोडायला लावली होती, अर्थात त्याच्या शब्दा बाहेर ती नव्हती ! हे सर्व ऐकल्यावर मला त्याच्या बद्दल नेमके मत बनवणे जड जात होते. मला राहुन राहुन आश्चर्य सुद्धा वाटत होते की पुर्णपणे अपरीचीत माणसाकडे जायला मी तयार तरी कसा झालो ?

घराचा दरवाजा उघडला जाताच मला जाणीव झाली वातावरणात भरून राहीलेल्या दडपणाची ! त्याच्या बायकोने हसून स्वागत केले. मी जवळच्या सोफ़्यावर बसलो, चप्पल बाजूला काढली, माझी बॅग तिने आत नेउन ठेवली. मग मात्र भन्नाट प्रकार घडू लागले. तिने नवर्याच्या पायातले बूट काढले, ते रॅकमध्ये ठेवले, आम्हा दोघांना ट्रे मधून पाणी आणले, आमच्या हातात काय दिले, रिकामे ग्लास परत स्वत: घेउन ट्रे मध्ये ठवले. चहा देताना पण तेच, आमचा चहा पिउन होईपर्यंत ती तिकडे उभीच होती. मग नवरोजी हात पाय धुवायला गेले तेव्हा ती चक्क बाहेर नॅपकीन घेउन उभी होती. मग त्याच्या हातावर तिने परीटघडीचे कपडे ठेवले. मला तर वाटले तो एरवी तिच्या कडून ते घालुन पण घेत असावा ! मी सुद्धा हातपाय धुउन फ़्रेश झालो पण तिने द्यायच्या आत शिताफ़ीने नॅपकीन घेउन तसाच परत ठेवला. यावर यजमान जरा नाराज झाला, आप क्यो तकलीफ़ लेते हो, घर अपनाही है समझो, हम तो मेहमान को भगवान समझते है ! आत मुलांचा कल्ला चालु होता, मी तिकडे गेलो. नुसता पसारा पडला होता. तो बघुन त्याने बायकोला हाक मारली व मुलांची खोली आवरायला सांगितले. मुले काही अगदीच लहान नव्हती. तिने आतुनच आवाज दिला, आ रही हूँ ! म्हणजे ही सगळी मेहमान नवाझी तिच्या जीवावर चालली होती. घरातला बाकी कोणी इकडची काडी सुद्धा तिकडे करत नव्हता. मी काही निश्चय केला. सुरवात मुलांपासून करणेच योग्य होते. मी मुलांना विचारले, कहानी किसे सुननी है, दोघे अगदी एका सुरात मुझे असे ओरडले. तो फ़ीर ये सब अपनी जगह पे रखो पहीले. लगेच सर्व पसारा दूर झाला. मी गोष्ट चालु केली कृष्णाची. त्याचे बालपणीचे पराक्रम , खोड्या, मित्रांबरोबर मस्ती असे सांगत सांगत मी ट्रॅक वळवला त्याच्या सर्वात मोठ्या गुणाकडे – स्वावलंबन. तो कसा पहाटे लवकर उठायचा, गुरे स्वत: चरायला घेउन जायचा, त्यांची निगा राखायचा, राजाचा मुलगा असूनही सगळी कामे करायचा, शिकत असताना लाकडाच्या मोळ्या सुद्धा आणायचा, मोठेपणी आपल्या घोड्यांना स्वत: खरारा करायचा, राजसूय यज्ञाच्या पंक्तीत तर त्याने चक्क उष्टे-खरकटे काढले होते. का कोण जाणे, काहीतरी जबरदस्त इम्पॅक्ट निर्माण करण्यात मी यशस्वी झालो होतो. मुले अगदी तल्लीन झाली होतीच पण यजमान सुद्धा त्याचा आनंद लूटत होता.

इतक्यात वर्दी आली, खाना तयार है ! बाहेर येउन बघतो तो काय तीने एकटीनेच सगळी मांडामांड केली होती. आम्ही पानावर बसलो, ती वाढायला थांबली. मी, तुम्ही पण आमच्या बरोबर बसा असे आग्रहाने सांगताच ती एकदम कावरी-बावरी झाली, नवर्याकडे तिने बघितले, त्याने नजरेनेच होकार देताच तिला धक्काच बसला. आता मला वातावरणातला मोकळेपणा जाणवू लागला होता. एकदम फ़्री वातावरणात आमच्या गप्पा रंगल्या. आणि खरेच ती अन्नपूर्णा होती ! तिच्या सुगरणपणाचे गोडवे गाताना मला शब्द अपुरे पडत होते. जेवण संपत येतानाच मी मुलांना विचारले, कृष्ण कसा होता ? एकासुरात उत्तर आले, स्वावलंबी ! मग आजपासून सगळ्यांनी आईला सगळे आवरायला मदत करायची ! चक्क यजमानसाहेब सुद्धा मग आवरायला लागले. आवरे पर्यंत अकरा वाजले, मुले अजून काही गोष्टी ऐकून झोपी गेली. मग आमचा गप्पांचा फ़ड जमला. त्याची बायको विलक्षणच होती. तिचे वाचन व पाठांतर अफ़ाट असेच होते. ती बोलत असताना तिचा नवरा तिच्याकडे कौतुक मिश्रीत नजरेने बघत होता. तिची एक नवीच ओळख त्याला होत होती जणु ! २.३० वाजले. निरोपाची वेळ आली ! वातावरण एकदम भावुक बनले. असह्य शांतता पसरली. मग त्याने माझा हात हातात घेउन बोलायला सुरवात केली, गदगदलेल्या स्वरात तो म्हणू लागला की तुम्ही तर मेहमान नाही भगवानच आहात. माझ्या अहंकाराचा तुम्ही पार चकनाचूर करून टाकला. तुमच्या गोष्टी ऐकताना काही वेगळाच फ़ील येत होता. आजसे मै बीबीका हर काम मे हाथ बटाउंगा, मेरे काम खुद करूंगा, ये मेरा आपसे वादा है. भगवान की लिला भी अजब है, बिना पहचान मै आपको बुलाता क्या और आप भी बिना हिचकीच आ जाते हो , सब अजिब है ! और सबसे बडी बात, आपने मेरे बीबी को मानो नया जनम दिया, उसे इतना खुश, एवढे भरभरून बोलताना, मोकळेपणे हसताना मैने आजतक कभी नही देखा था. त्याच्या बायकोच्या डोळ्यातुन तर अश्रूंची नुसती संततधार लागली होती. जणु “सजल नयन जलधार बरसती”

चलो भाभी, चलता हूँ, आप सब अब पनवेल आना , असा न्योता देउन बाहेर पडलो. एक करो, ये नेम-प्लेट बदली करो, नया बनाओ, जिसपर भाभी का भी नाम हो ! यावर तो “जरूर” असे प्रसन्न पणे बोलला. भाभीला काहीतरी बोलायचे होते, पण तिच्या तोंडून आवाजच फ़ूटत नव्हता, बर्याच मुष्कीलीने तिच्या तोंडून “भय्या …” एवढेच आर्त पणे बाहेर पडले. आता मात्र मला स्वत:ला भावनावश होण्यापासून सावरण्यासाठी तडक निघणे भागच पडले.

शनिवारीच त्याने फ़ोन केला होता, आवाजात प्रचंड उत्साह, आम्ही सगळे तुमच्या कडे रविवारी येत आहोत, अगदी तुझ्या भाषेत, सहकुटूंब सहपरीवार ! और बच्चोंका मेसेज है की जितनी स्टोरी आती है, सब तय्यार रखना !

घरी बायकोला हे रात्री सांगणार एवढ्यात त्याचा परत फ़ोन आला, माफ़ करना, मेरी नानी गुजर गई है, हम सब पुना जा रहे है, फ़िर कभी. रात्री अकरा वाजत परत फ़ोन, बच्चोंको आपके घर छोडता हूँ, वो माहौल में बच्चे …और कल दोपहर हम दोनो आते है. मी म्हणालो, ठीक है, लेके आओ, मै पनवेल डेपो के पास आता हूँ. मी त्यांच्या सुमोची वाट बघत पनवेल डेपो जवळ उभा होतो. ११:३० वाजता पुन्हा फ़ोन, अरे भाई, माफ़ करना, मै रास्ता भूल गया, कळंबोली सर्कल से मुझे पुराने हाय-वे - पनवेल डेपो की ओर मुडना था, मै स्पीड मे आदतसे सीधा एक्सप्रेस हायवे पर आ गया. बादमे ध्यान मे आया, अब लेट हो जायेगा, वैसे बच्चे भी सो गये है ! मी एकटाच घरी परतलो.

सकाळी पेपर चाळत होतो. सकाळाच्या टुडे पुरवणीत सुमोला झालेल्या अपघाताची बातमी फ़ोटोसह दिली होती. अजस्त्र डंपरच्या धडकेने तिचा पार चेंदा-मेंदा झाला होता. सुमोतले अख्खे कुटुंब, नवरा, बायको व दोन लहान मुले, ऑन दी स्पॉट ठार झाली होते. मृतांची ओळख पटली असून, मुंबई बंदरात कामाला असलेले …….

मंगळवार, २ जून, २००९

आठवले ? आठवले !

आठवले का आठवले ?
कोण आठवले ? काय आठवले ?
नाही बुवा आठवले ! ॥धृ॥

अहो ते हो, कोणे एके काळचे
सिद्धार्थ वसतिगृहात राहणारे
आंबेडकरी जनतेचे कैवारी, लढवय्ये पॅन्थर ? -- १
अहो ते हो, शरदाच्या कृपाप्रसादाने
एका रात्रीत न्हाउन निघालेले
समाजकल्याण खात्याची झुल चढलेले ? -- २
अहो ते हो, वाघाच्या गुहेत शिरलेले,
नामांतर प्रश्नी त्याचे मन वळवणारे,
मग नामविस्तारावर तोड करणारे ? -- ३
अहो ते हो, रमाबाई नगरामध्ये
आपल्याच माणसांकडून थोबाड फ़ूटलेले,
तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाल्लेले ? -- ४
अहो ते हो, विधानसभा निवडणुकीत
राणा भीमदेवी थाटात,
दोनशे जागा लढणार म्हणणारे ? -- ५
अहो ते हो, दूसर्याच दिवशी कलटी मारणारे,
दोनशे नुसते म्हणायचे असते,
२५ पण लय झाल्या म्हणणारे ? -- ६
अहो ते हो, मराठा सरदारांच्या
जागा वाटपाच्या पंक्‍ती चालू असताना
आशाळभूत पणे बाहेर उभे असलेले ? -- ७
अहो ते हो, सरदारांनी झिडकारताच
कोपलेले, बंडाची भाषा करणारे
शेवटी कलानीला निळा टीळा लावणारे ? -- ८
अहो ते हो, गुढघ्याला बाशिंग बांधलेले
केंद्रात कॅबीनेटच पायजेल म्हणून रूसलेले
निदान राज्यमंत्री करा म्हणून विनवणारे ? -- ९
ना सोनियाचा प्रकाश, शरदाचे चांदणेही नाही
सहनही होत नाही सांगताही येत नाही
ज्यांना गल्लीतही कोणी विचारत नाही ? -- १०
अहो ते हो, मायावतीला घाबरलेले
आधी धम्म स्वीकारा म्हणून सांगणारे
डोळ्यावर पट्टी बांधुन हत्ती चाचपणारे ? -- ११
अहो ते हो, लोकांनी झिडकारलेले
पराभव न पचल्याने राडा करणारे
गद्दारी झाली म्हणून पेटलेले ? -- १२
अहो ते हो, दिल्लीश्वरांनी लाथाडलेले,
मंत्री नाहीतर राज्यसभेवर पाठवा म्हणणारे
नाही तर दूसरा विचार करू म्हणणारे ? -- १३
ते का ? अहो आता आठवले !
शरदाच्या चांदण्यात कोमेजलेले
भरकटलेले ,खचलेले ,संपलेले आठवले ! -- १४