शनिवार, ३१ ऑक्टोबर, २००९

सोमवार, १९ ऑक्टोबर, २००९

वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र

२६ डिसेंबर १९५२ ला स्व. बाळासाहेव देशपांडे यांनी लावलेल्या या छोट्याश्या रोपट्याचे रूपांतर आज प्रचंड वटवृक्षात झालेय !

५८ वर्षापुर्वी बाळासाहेबांनी एक स्वप्न पाहिले होते …

या स्वप्नाला भरभक्कम आधार होता तो या देशाला पुन्हा वैभवशाली बनविण्यासाठी अखंड कार्यरत राहण्याचा संकल्प उराशी बाळगलेल्या एका तेजस्वी राष्ट्रशक्‍तीचा ..

या कार्याला आशिर्वाद होते … स्व. ठक्करबाप्पा व प.पू. श्री. गुरूंजीसारख्या द्रष्ट्या महापुरूषांचे ..

आणि मुख्य म्हणजे त्या मागे होता एक दुर्दम्य विश्वास ..’नर सेवा हीच नारायण सेवा’ हा संस्कार वर्षानुवर्षे मनावर कोरल्या गेलेल्या समाजातील जनशक्‍तीवरचा !

कुठले स्वप्न होते ते ?

आपल्याच समाजाचे .. इथल्या प्राचीन व गौरवशाली परंपरेचे अभिन्न अंग असलेल्या वनवासी बांधवांची सर्वांगीण उन्नती साधून त्याला एवढे सामर्थशाली बनवणे की राष्ट्रउभारणीच्या कार्यातही हा समाज आपले योगदान देऊ शकेल.

एक विशाल दृष्टीकोन घेउन विविध सेवाकार्याच्या माध्यमातून कार्याची सुरवात झाली. शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास, श्रद्धाजागरण, संस्कार इ. विषय घेउन हजारो सेवाप्रकल्प उभे राहिले. या सार्‍या प्रकल्पाच्या माध्यमातुन देशभरातील वनवासी क्षेत्रात एक प्रचंड शक्‍ती निर्माण झाली आहे.

स्व. बाळासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्‍नातील प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात उतरली आहे.

भूतकाळात सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणारा वनवासी समाज आज नव्या तेजाने तळपताना दिसू लागला आहे !

महाराष्ट्रात वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याचा प्रारंभ १९७८ साली झाला.

या ३० वर्षामध्ये केलेल्या कामाचा प्रभाव म्हणून ..

· हजारो सुशिक्षित, सुसंस्कारित व प्रतिष्ठीत वनवासी युवकांची पीढी तयार झाली आहे.

· ’आपल्या समाजाचा विकास आपणच केला पाहिजे’ अशी भावना बाळगणारे शेकडो युवक पुढे येत आहेत.

· वैद्यकीय सेवा व आरोग्यरक्षक योजनेच्या माध्यमातुन लाखो वनवासी बांधवांच्या वेदना दूर झाल्या आहेत.

· श्रद्धाजागरणाच्या कार्यामुळे अराष्ट्रीय कारवायांना जबरदस्त खीळ बसली आहे.

· आपल्या वनवासी बांधवांची उन्नती करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असा विचार करून समर्पितपणे कार्य करणारे हजारो नगरीय कार्यकर्ते तयार झाले आहेत.

· एकलव्य खेलकुद स्पर्धेमुळे वनवासी क्षेत्रातील हजारो ’एकलव्यांचे’ प्रगटीकरण झाले आहे.

· वनवासी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातुन उद्योग-व्यवसाय प्रारंभ करून आपल्या कुटुंबाचा व गावाचा आर्थिक विकासा साधण्यात यश मिळवले आहे.

गेल्या ३० वर्षामधील महाराष्ट्राची वाटचाल प्रेरणादायक असली तरी वनवासी क्षेत्रात अद्यापही समस्यांचा महाकाय डोंगर उभा आहे. पुर्बीची आव्हाने तर आहेतच, पण त्यात काळानुरूप नव्याने भर पडत आहे. या सार्‍या समस्यांचा सामना करून वनवासी समाजाला अधिक शक्‍तीशाली बनवण्याचे कार्य आपण सर्वाना मिळून पूर्ण करायचे आहे.

आतापर्यंतची वाटचाल हजारो हातांच्या बळावर शक्य झाली पण या क्षेत्रातील समस्या पाहता आता लाखो हातांची आवश्यकता भासणार आहे.

या कार्यात आपण तन-मन-धनाने सहभागी व्हावे असे आमचे विनम्र आवाहन आहे.

महाराष्ट्र राज्य सद्यस्थिती (जून २००९ )

शैक्षणिक प्रकल्प

वसतिगृहे १९

प्राथमिक शाळा २

माध्यमिक शाळा २

बाल संस्कार केंद्रे १२

लाभार्थी १,६००

आर्थिक विकास प्रकल्प

औद्योगिक शिक्षण केंद्र २८

शेतकी प्रकल्प ४

बचत गट ५५८

लाभार्थी १६,०००

आरोग्य प्रकल्प

साप्ताहिक आरोग्य केंद्रे ४

दैनिक केंद्रे १

आरोग्य रक्षक ५८६

लाभार्थी ४,००,०००

खेलकूद केंद्रे १५

श्रद्धा जागरण केंद्रे ६०

एकूण प्रकल्प १,१२३

पूर्णवेळ कार्यकर्ते ८१ ( पुरूष ६५, महिला १६)

ग्राम समिती २१८

महिला समिती ६५

यापैकी आपण नक्कीच काहीतरी करू शकाल

· रू. १५,०००/- ३० विद्यार्थांच्या वसतिगृहाचा एका महिन्याचा खर्च.

· रू, ५०००/- वार्षिक देणगी देउन एका वनवासी विद्यार्थाचे पालकत्व.

· शुभप्रसंगी व प्रियजनांच्या आठवणीप्रीत्यर्थ प्रासंगिक देणगी.

· आश्रमाच्या कार्यासाठी वेळ.

· आश्रमाच्या वैद्यकीय केंद्रासाठी औषध संकलनास मदत.

· वनवासी परिसरात सांस्कृतिक भवन उभारणीस सहाय्य-सहभाग.

· कल्याण आश्रमाच्या केंद्रास नियमित/प्रासंगिक भेटी.

· वनवासी कलेस प्रोत्साहन – दिवाळी भेटकार्डे, दिनदर्शिका व राख्या विकत घ्याव्यात.

· वस्तुरूप देणगी – शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेशाचे कापड व अन्य शालेय साहित्य, धान्य, अन्य मदत.

· एका आरोग्यरक्षकाचा वर्षाचा खर्च रू. ५०००/-

सर्व देणग्या आयकराच्या ८०जी कलमाखाली सवलतीस पात्र आहेत. चेक वा ड्राफ्ट “वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र” या नावाने काढावा.

प्रांत कार्यालय : १५, कृषिनगर, महाविद्यालय मार्ग,

नाशिक ४२२ ००५.

दूरध्वनी ०२५३-२५७७ ४९१, ०२५३-२५८२ ४२९

पनवेल कार्यालय : द्वारा – श्री. उदय टिळक, यशोगंगा सोसायटी,

पहिला मजला,६४५, टिळक रोड, पनवेल – ४१० २०६.

दूरध्वनी – ०२२-२७४५ ६८२४

रविवार, १८ ऑक्टोबर, २००९

महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्था – भाउबीज नवती.

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे हे या संस्थचे संस्थापक ! १८९६ साली महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेची स्थापना झाली. तब्बल ११२ वर्षाच्या या संस्थेच्या पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी, नागपूर येथे शाखा आहेत.

पुर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, इंजिनियरींग कॉलेज, आर्कीटेक्ट, आय.टी., फ़ॅशन डिझायनिंग, नस्रिग कॉलेज इत्यादी अभ्यासक्रम केवळ मुलींसाठी संस्थेत राबवले जातात.

नोकरी करणार्या स्त्रियांसाठी पुण्यात वसतिगृह असून वृद्ध स्त्रियांसाठी वृद्धाश्रम देखिल आहेत. संस्थेच्या बेकरी मध्ये गरजू स्त्रियांना कमवा वस शिका या तत्वावर काम दिले जाते. या आर्थिक मदतीमुळे त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात.

संस्थेची आगळी-वेगळी वैशिष्ट्ये -

· स्त्रियांवरील अन्याय, कालबाह्य रूढी व सामाजिक विषमतेविरूद्ध निर्भीड ठोस उपाययोजना करणारी भारतातीला आद्य संस्था.

· स्त्री-स्वातंत्र्य व तिची अस्मिता जागविण्यासाठी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, प्रचार व प्रत्यक्ष आचरण करणारी दू्रदृष्टीची, पुरोगामी व एकमेव संस्था.

· १९१६ साली स्त्रियांसाठी विद्यापीठ उभारणारी पहिली संस्था.

· विविध शाखांमधून सर्व जाती जमातींच्या सुमारे २५,००० विद्यार्थिने शिकत आहेत.

· ३००० विद्यार्थिनी, त्यातही निम्म्या ग्रामीण भागातुन आलेल्या मुलींसाठी वसतिगृह.

संस्थेच्या या कार्याला आर्थिक मदत मिळावी म्हणून संस्थेचे कल्पक आजन्म सेवक कै. गो.म. चिपळूणकर यांनी ९० वर्षापुर्वी भाउबीज निधी संकलन योजनेची सुरवात केली. आपली भाउबीज संस्थेच्या स्वयंसेवकांकडे चेक अथावा रोखीत आपण देउ शकता. रूपये ५०० वा त्यापेक्षा जास्त देणगेसाठी आयकरात ५० % सूट मिळू शकते. सवडीनुसार एकदा संस्थेत जाउन आपण कामाची प्रत्यक्ष खात्री करू शकता. मी स्वत: या संस्थेला दहा वर्षापुर्वी एकरकमी ५००० रूपये देणगी म्हणून दिले होते व मग दरवर्षी ५०० रूपयाची भाउबीज पाठवत आहे.

उद्याच भाउबीज आहे ते लक्षात आहे ना ?

संस्थेचा पत्ता

सचिव – रविंद्र देशपांडे

कुंदा नेने - कार्याध्यक्षा, भाउबीज भेट मंडळ

कर्वेनगर, पुणे – ४११ ०५२

फोन नंबर ०२०-२५४७ १९६७ , ०२० - २५४७८९७५

शनिवार, १७ ऑक्टोबर, २००९

दिवाळी

नगरातील सदनातुन लखलखती लाख दिवे

क्षणभर की स्थिर झाले उल्कांचे दिव्य थवे

बघ वरती बघ धरती तेज:कण थरथरती

पुरूषार्थी मनुजाने निर्मियले गगन नवे

व्यर्थ तुझा यत्न नरा, जग ऐसे उजळाया

मिणमिणत्या शतपणत्या जातील पण त्या वाया

भवतीच्या तिमिरास्तव उपचार न हा वास्तव

अंतरिची ज्योत जरा उजळ जगा जगवाया

कोणाच्या ह्रदयातुन प्रेमाची ज्योत जळे

द्वेषाच्या वणव्यातुन मानवता होरपळे

हे येशु हे बुद्धा पाहुनिया या युद्धा

शांतीच्या वेदांचे वैफ़ल्य न काय कळे

देखाव्या दाही दिशा, दु:खाचा नाद उठे

जळती जरी दीप शते, तेजाचे नाव कोठे ?

अशुभा ही शुभ रजनी, जागृति ना अजुनी जनी

युद्धाच्या अंतातुन युद्धाचे बीज फ़ुटे

आक्रंदति आक्रोशती शोकाने भुवी भुवने

आनंदाने सौख्याची गाउ कशी नव कवने ?

प्रेमाविण विश्व झुरे शांतिचे नाव नुरे

तोवरी हे मंगलदिन जातिल जावोत सुने

कविवर्य वसंत बापटांची ही एक गाजलेली कविता. कालावधी माहीत नाही पण माझ्या वडीलांनी १९५४ साली ती कॉलेजच्या स्नेहसंमेलनात सादर केली होती ! कदाचित दुसर्या महायुद्धाच्या वेळची असावी. आज एवढी वर्षे उलटली तरी तिच्यातला अर्थ कोठेतरी आत अस्वस्थ करतो. त्यात जी शब्दरचना आहे ती सुद्धा अगदी सहज स्फ़ुरल्यासारखी आहे. अनुप्रासाचा अट्टाहास कोठेही नाही. ऐन दिवाळीत बापटांनी ही कविता जेव्हा सादर केली असेल तेव्हा किती गडबड उडाली असेल नाही ?

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

जुनी सायकल आहे का?

जागोजागी भंगारात पडलेल्या सायकलींचं रिपेअरिंग करून त्या आदिवासी पाड्यांतल्या मुलांना देण्याचा नवा प्रयोग 'त्या' तिघांनी यशस्वी केलाय.
गाडी शिकण्याचं पहिलं पाऊल म्हणजे सायकल. काही वर्षं सायकल तांबडल्यानंतर तिची जागा 'टू व्हिलर' घेते. इथेच सायकलचा 'वनवास' सुरू होतो, तो कायमचाच. म्हणूनच प्रत्येक घरात,सोसायटीत अशी मान मोडून पडलेली एखादी सायकल असतेच. या उलट चित्र आदिवासी पाड्यांमधलं. नशिबी दारिद्य आल्यामुळे शिक्षणासाठी पाच-पाच किलोमीटरचं अंतर पायी तुडवत ही मुलं रोज शाळेत जातात.

त्यांचे हे कष्ट कमी करण्याची प्राथमिक गरज भागवण्यातही आपण कमी पडलेलो. इतका विरोधाभास. दोघांतली हीच गॅप ओळखून 'ते' तिघे एकत्र आले, आणि त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. भंगार सायकलींचं 'सोनं' करून त्या गरजू आदिवासी मुलांना वाटण्याचा प्रयोग.
विक्रमगड, वाडा यांसारख्या आदिवासी भागात लांबलांबच्या पाड्यांतून मुलं शिकण्यासाठी गावच्या शाळेत येतात. ६ ते १६ वयोगटातल्या या कोवळ्या मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी रोजची २ ते ७ किमीची पायपीट करावी लागते. एसटीची सोय आहे, पण रोजचं ६ रुपये भाडं परवडत नाही.

आदिवासी भागातील ही वस्तुस्थिती हेमंत छाबरा आणि त्यांची पत्नी संगीता यांनी पाहिली. या मुलांसाठी काहीतरी करायला हवं, असा विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागला. सिमोना टेरन या आपल्या आणखी एका मैत्रिणीकडे त्यांनी हा विचार मांडला आणि या तिघांना एक नामी कल्पना सुचली.
मुंबईसारख्या शहरात जुन्या, मोडक्या सायकली भंगारात पडून असतात. या सायकलींची डागडुजी करून गावातल्या मुलांसाठी द्यायच्या, अशी ही कल्पना. त्यांनी आपल्या ओळखीपाळखीच्या मित्रांना फोन केले, ई-मेल धाडले आणि जवळपास ६८ मोडक्या सायकली गोळा केल्या. स्वत:च्या खर्चाने त्या रिपेअर केल्या आणि प्रजासत्ताक दिनी अलोणे गावातील श्री बिनोई घरडे विद्यालयातल्या गरजू ६८ आदिवासी मुलांना या सायकलींचं वाटप करण्यात आलं. खरं तर या शाळेतल्या १३७ मुलांना सायकलची गरज आहे, असं शाळेने कळवलं होतं. आता उरलेल्या सायकली गोळा करण्यासाठी 'दि बायसिकल प्रोजेक्ट' ही चळवळच या ग्रुपने सुरू केलीय.
एका सायकलीचं रिपेअरिंग करण्यासाठी साधारण ४०० रुपये खर्च येतो. 'सध्या आम्ही काही मित्रमंडळी आमच्याच खिशातून तो खर्च करतोय', असं हॉटेल व्यावसायिक असलेले हेमंत छाबरा सांगतात. लोकांना भंगारातल्या सायकलची किंमत नसते. पण, आदिवासी मुलांसाठी अशी सायकल म्हणजे मर्सिडीजच. सायकल मिळाल्यानंतर मुलांच्या चेह-यावर जे भाव उमटले त्याला तोड नाही, असंही छाबरा यांनी सांगितलं.
केवळ अलोणेच नव्हे, तर आदिवासी खेड्यांमधे किमान १ लाख सायकल्स वाटण्याचं या ग्रुपचं उद्दिष्ट आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी आम्ही सध्या दि बायसिकल प्रोजेक्ट नावाची चळवळच सुरु केली असून, या नावाने आम्ही लवकरच एनजीओ रजिस्टर करणार आहोत, असं सिमोना टेरन यांनी स्पष्ट केलं.
तुम्हीही उचला खारीचा वाटा भंगार सायकलींचं सोनं करण्याच्या या प्रोजेक्टमधे आपणही खारीचा वाटा उचलू शकतो. त्यासाठी हेमंत छाबरा यांना ९८२०१४९०२२ यावर फोन करायचा किंवा thebicycleproject@gmail.com या पत्त्यावर इ-मेल पाठवायचा. स्वयंसेवक तुमच्या घरी येऊन जुनी सायकल घेऊन जातील. या रिपेअरिंगचा खर्च देण्याची तुमची तयारी असेल तरीही तुमचं स्वागतच होईल.

रविवार, ४ ऑक्टोबर, २००९

व्हेज पाणपोई !

साधारण ८ वर्षापुर्वी आम्ही जेव्हा नवीन पनवेलला रहायला आलो तेव्हा इथे अगदी सिमेंटचे जंगलच होते. अनेक भागात बांधकामे जोरात चालू होती, रस्ते, फ़ूटपाथ यांचा पत्ताच नव्हता. झाडे तर जवळपास नव्हतीच. उन्हाचा तडाखा पण जबरदस्त असायचा. दूपारच्या वेळी तर घरच्या गच्चीवर पाय ठेवता येत नसे. एरवी सगळीकडे आढळणारे चिमणी, कावळा, सांळूकी हे पक्षी सुद्धा अभावानेच दर्शन देत. आम्ही गच्चीवर काही रोपे लावली होती. डोळ्याना तेवढीच हिरवळ दृष्टीस पडे. असेच एकदा पेपरात वाचले की पक्षांना जर पाणी मिळाले / दिसले तरी त्या भागात त्यांचा वावर वाढतो व ज्यांच्या घराला गच्ची आहे त्यांनी निदान उन्हाळयात तरी भांड्यात पाणी भरून ठेवावे, तेवढेच भूतदयेचे पुण्य लाभेल. लगेच एका पसरट भांड्यात पाणी भरून ते छताला टांगून ठेवू लागलो. पण पक्षांना जणू त्या पाणपोयीवर बहीष्कार टाकला. बाष्पीभवनाने जेवढे पाणी वाफ़ हो़उन जात असे तेवढेच संपे ! काही काळाने पाणी नाही पण सगळ्यांचा उत्साह मात्र ’आटला’.

मग पुन्हा वाचण्यात आले की पाणी टांगून ठेउ नये, ते खाली ठेवावे. उन्हाळ्यात एक मातीचे मडके आणले होते व ते ठेवायला तिवई पण करून घेतली होती. मग त्याचीच पाणपोई चालू केली. पण एखाद दूसरी चिमणी सोडता तिकडेही कोणी पक्षी फ़ारसे फ़िरकत नसत. एकदा त्या माठात पाणी भरत असताना तो मधोमध फ़ूटला व त्याचे दोन तूकडे झाले. खालच्या पसरट भागात पाणी भरून ठेवण्यात आले आणि काय आश्चर्य, पाणपोई कडे अनेक पक्षी आकर्षित हो़उ लागले ! मडक्याच्या काठावर बसून सावधपणे इकडे तिकडे नजर टाकत आपली इवलिशी चोच पाण्यात बुडवुन , शुधा-शांति झाल्यावर आनंदाने चित्कार करून ते आकाशात भरारी घेउ लागले ! विविध पक्षांचे निरीक्षण करणे हा मुलांचा एक छंदच झाला. सकाळी माठ पाण्याने भरत असतानाच पक्षी आसपास हुंदडू लागत व पाण्याने भरून तो जागेवर ठेवताच त्या माठावर हल्ला-बोल करत. अर्थात यात बळी तो कान पिळी असेच चालायचे. चिमणीला साळूंकी हाकलायची तर साळूंकीला कावळा पिटाळायचा, कावळ्याला कबुतरे हुसकावून लावायची. एकदा तर एक भली मोठी घार पंख पसरवुन तिकडे उतरली व संचारबंदी असल्यासारखे बाकी सगळे पक्षी पार पसार झाले. एरवी कधीही न बघितलेले पक्षी सुद्धा वर्दी देउ लागले, ते बहुदा स्थलांतरीत असावेत. मध्येच केव्हातरी पोपटांचा थवाच उतरला होता. काही पक्षी तर रात्री येउन तहान शमवून जायचे. बाजुला असलेल्या कुंड्यावर पण त्यांची नजर जायचीच. कधी कोवळी पाने, जास्वंदीच्या कळ्या, पानावरच्या अळ्या पण त्यांना मटकावायला मिळू लागल्या ! काही महीने छान गेले आणि मग मात्र उपद्रव चालू झाला.

सगळ्यात घाणेरडा पक्षी म्हणजे कबुतर ! गच्चीचे सगळे कठडे ती घाण करून ठेवीत. रोज ते साफ़ करून बायको एकदा वैतागली व बंद कर ही भूतदया नाहीतर ही सफ़ाई तू कर अशी निर्वाणीची भाषा तिने केली. मग एक एक करत कठडे साफ़ करणे, गच्चीतला कचरा काढणे, मडके साफ़ करून भरून ठेवणे, झाडांना पाणी घालणे ही सर्वच कामे माझ्या गळ्यात मारली गेली. पण हे एवढ्यावर थांबणार नव्हते. एके दिवशी मुलांनी तक्रारीचा पाढा वाचला. कबुतरे त्याच पाण्यात आंघोळ करतात, त्यामुळे बाकी पक्ष्यांना ते घाणेरडे पाणी प्यावे लागते. लहान पक्षांना पाणी पिउ देत नाहीत, पाण्याची नासाडी करतात. मग करायचे काय ? असे मी त्यांना विचारले तेव्हा सगळ्या पक्षांना वेळा ठरवून द्यायच्या असे त्यांनी सूचवले. अरे पण त्यांना हे कसे कळणार यावर बालसुलभ उत्तर आले तिकडे एक बोर्ड लावून ठेवायचा ! बरे, काय लिहायचे बोर्डावर ? लगेच मसुदा ठरला – मराठे पक्षी पाण-पोईचे नियम - १) पाणी शिस्तीत प्यायचे, नासाडी न करता २) दादागिरी करायची नाही ३) आपापल्या वेळेतच पाणी प्यायला यायचे, घुसखोरी करायची नाही ४) कुंड्यातल्या झाडांचे नुकसान करायचे नाही ५) कठड्यावर घाण करू नये – बरे – मी हसत हसत त्याला होकार दिला तेव्हा छोटया प्रियांकाने अजून एक मुद्दा सांगितला की पक्षांनी एकमेकांच्या अंगावर बसायचे नाही हे पण लिही रे बाबा ! भरपूर जागा असताना मध्येच एक-दूसर्याच्या अंगावर बसून त्याला त्रास देतात ! या वर अधिक चर्चा नको म्हणून आम्ही दोघे लगेच घरात पळालो !

काही दिवस शांततेत गेले आणि एका कावळ्याने उपद्रव चालु केला. काही दिवस पोळीचा तूकडा तो त्यात टाकून ठेवायचा. मग पावाच्या तूकड्यावर प्रयोग चालू झाला, आणि मग -- . मी घरी आल्यावर वातावरण एकदम तंग वाटले. मुले कानात कुजबुजली, आईने पाण-पोई बंद केली. माठ फ़ोडून टाकला, खूप चिडली आहे ! गच्चीत जाउन बघतो तर काय, पाणपोईच्या तिकडे कोणत्याच खुणा नव्हत्या ! ही तणतणत बाहेर आली होतीच. मी विचारले एवढे काय झाले चिडायला ? अरे, तो घाणेरडा कावळा, भलताच सोकावला होता, आधी त्याने पोळी पाण्यात टाकून बघितली, मग पाव आणि काल त्याने मच्छीचा एक तूकडात त्या माठात बुडवुन ठेवला होता. माठ साफ़ करताना तो बघूनच मला उलटी झाली ! बस झाले त्यांचे लाड ! आजपासून हे थेर बंद ! आमची ही म्हणजे भलतेच कर्मठ प्रस्थ ! हीच्या व्हेज हॉटेल मध्येच जेवायच्या हट्टाने एकदा आम्हाला साउथ मध्ये उपाशी रहावे लागले होते ! मांसाहारी वस्तूचे दर्शन झाले तरी हीला मळमळते ! पाण्यात मच्छीचा अख्खा तूकडा बघून हीची दूसरी कोणती प्रतिक्रीया अपेक्षितच नव्हती ! खरे तर मला पुढे काय घडणार याचा अंदाज आला होताच ! सवयीने पक्षी अजूनही गच्चीत घुटमळतात, झाडांना घातलेले पाणी फ़रशीवर पडते त्यात नाईलाजाने आपली चोच बुडवतात. गेले ते दिन गेले असा भाव त्यांच्या डोळ्यात असतो ! त्यांना कसे कळावे बरे की ही चांगली चाललेली व्हेज पाणपोई त्या नादान नॉन-व्हेज खाणार्या कावळ्यामुळे बंद पडली ते ?

शनिवार, ३ ऑक्टोबर, २००९

मुंबई डाईंग !

१९९५ मध्ये युती सरकार सत्तेवर आले आणि काही महीन्यातच केंद्र सरकारने बॉम्बेचे मुंबई करण्याला मान्यता दिली, पण त्याच्याही खूप आधी, आमच्या बंदाराचे नाव मुंबई बंदर विश्वस्त असे बदलण्याचा ठराव झालेला होता. त्याचे संक्षिप्त रूप मात्र Mb.P.T. असे करावे लागले कारण मद्रास पोर्ट चे नाव तेव्हा चेन्नई असे झालेले नव्हते ! मी तेव्हा संगणक विभागात होतो. आमच्या कडे जहाजे जो माल आणतात त्याची नोंद संगणकात अपलोड करायाला लागायची. आयात माल असेल तर ज्या बंदरात माल उतरणार त्याचे नाव व निर्यात असेल तर जिकडून माल जहाजात चढणार त्या बंदराचे नाव त्यात असायचेच. जगातल्या सगळ्या बंदराना कोड देण्यात आले आहेत. पण आम्हाला जो डाटा मिळायचा त्यात बंदराचे नाव असायचे. मी त्याची मॅपिंग फ़ाइल बनविली होती व पहिली ६ अक्षरे जुळत असतील तर त्यावरून पोर्टचा कोड उचलला जायचा. मालावरील मार्किंगवर तसेच पत्त्यात बाँम्बे शब्द असायचाच. नाव बदलल्यावर ते आता सगळीकडे मुंबई असेच आले पाहिजे असा माझा आग्रह होता. बॉम्बेला आमच्याकडे B079 असा कोड होता. कोड तोच ठेउन तिकडे मी MUMBAI असे बदलून घेतले पण जहाजाच्या मालकाकडून आम्हाला जी माहीती मिळायची त्यात सर्व ठीकाणी BOMBAY असेच असायचे. आमचा अमराठी प्रोग्रामर अधिकृत आदेश आल्याशिवाय कोणताही बदल करायला तयार नव्हता. पण तो पर्यंत थांबायची माझी तयारी नव्हती.

डाटा एन्ट्री टाळण्यासाठी आम्ही SDF format मध्ये जहाजातल्या मालाची माहीती मागावायचो. मला एकदम स्ट्राइक झाले की Bombay आणि Mumbai दोघांच्या स्पेलिंगमध्ये सहाच अक्षरे आहेत. त्या मुळे मुळ फ़ाइल मध्येच ते मुंबई करून घेतले तर ? थोडी खटपट केल्यावर मला तसे करता आले. जिकडे जिकडे Bomaby असेल तिकडे Mumbai झाले ! सगळ्यांना आश्चर्य वाटले, अजून नाव बदलून आठवडा पण नाही झाला आणि सगळ्या परदेशी जहाज कंपन्यानी कशी बरे याची लगेच अंलबजावणे केली ? मी त्यांना मूळ फ़ाइलमध्ये मुंबई असेच आहे बघा हवे तर असे दाखवून गप्प केले.

बराच काळ गेल्यानंतर बॉम्वे डाइंग कंपनीचे एक पत्र अनेक खात्यात फ़िरत फ़िरत माझ्याकडे आले. त्यांना आम्ही जी पावती देतो तिच्यावर हल्ली “मुंबई डाईंग “ असा उल्लेख असतो. आम्ही आमचे नाव बदललेले नाही त्यामुळे कंपनीचे लेखा परीक्षक त्याला नेहमी हरकत घेतात, असे का होत आहे ? असा त्याचा मतितार्थ होता ! सरसकट बॉम्बेचे मुंबई करण्याच्या ध्यासापायी मी ही गोष्ट लक्षात घेतलीच नव्हती. मग बरीच डोकेफ़ोड केल्यावर फाइलच्या ज्या भागात बंदराचे नाव व मालावरचा मार्क असतो तेवढाच भाग तपासून, तिकडे मुंबई करून बाकी भाग आहे तसाच सोडू लागलो ! आधीचे सर्व रेकॉर्ड तपासून जिकडे कंपनीचे नावच बदलले गेले होते ते सुद्धा जैसे थे करून ठेवले. मग “computer mistake” असे ठोकळेबाज कारण देउन पुढे मात्र असे होणार नाही याची खात्री दिली व प्रकरण मिटवले !

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

दत्तक’विधी’ !

१८५७ चे स्वातंत्र्य समर भडकले याला एक कारण होते ते संस्थानिकांचे दत्तकविधी इंग्रजांनी फ़ेटाळल्याचे. ती संस्थाने खालसा करून आपल्या साम्राज्यात सामिल करून घेण्याचा सपाटा इंग्रजांनी लावल्याने संस्थानिक बिथरले व ब्रिटीश सत्तेविरूद्ध बंड करून उठले ! झाशीची राणी तर आपला दत्तक पुत्र दामोदर यालाच पाठीला बांधून ब्रिटीशांवर तुटून पडली व इतिहासात अमर झाली ! आधुनिक काळातही असाच संघर्ष आमच्या तिन महीला कर्मचार्यांना करावा लागला त्याची मी स्वत: साक्षीदार असलेली कहाणी !

सरकारी नोकरीत असलेल्या महीला कर्मचार्यांना १३५ दिवसाची भरपगारी बाळंतपणाची विशेष रजा मिळते. अनेक कारणासाठी हल्ली मुल दत्तक घेण्याचे प्रमाण सुद्धा वाढते आहे. मुल कुटुंबात लवकर रूळावे, त्याचा लळा लागावा म्हणून अगदी तान्हे बाळ दत्तक घेतले जाते. केंद्र सरकारने अशा महीलांना प्रोत्साहन मिळावे या हेतुने ३१ मार्च २००६ पासून आपल्या महीला कर्मचार्यांसाठी दत्तक घेतलेल्या मुलासाठी सुद्धा १३५ दिवसाची रजा देण्याचा कल्याणकारी निर्णय घेतला. मुंबई बंदरात कर्मचार्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत असतात. केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना ज्या ज्या सवलती मिळतात त्या सर्व आम्हाला मिळाव्यात हे तत्वत: मान्य करण्यात आले आहे. हा नियम लागु झाल्यावर एका महीला कर्मचार्याने जून महीन्यात एक मुल दत्तक घेतले व अशा प्रकारच्या विशेष रजेसाठी अर्ज केला. तेव्हा त्यावर कोणताही निर्णय न घेता अशी रजा मिळावी म्हणून केंद्राच्या धर्तीवर आमच्या नियमात बदल करून, तसा ठराव विश्वस्त सभेत २९ जुलै २००८ रोजी मजूर होउन, अंतिम मंजूरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. पण हे सर्व सोपस्कार होण्या आधीच अजून एका महीला कर्मचार्याने मे २००८ मध्ये मुल दत्तक घेउन विशेष रजेसाठी अर्ज केला !

मी या कार्यालयात जुलै २००८ मध्ये आलो, तेव्हा हा आधीचा घोळ मला माहीतच नव्हता. त्यानंतर ऑक्टोबर २००८ मध्ये माझ्या ओळखीच्या एका महीला कर्मचार्याने मुल दत्तक घेउन रजेसाठी अर्ज केला. तेव्हा मला हा सगळा इतिहास माहीत झाला. केंद्र सरकारच्या पोत विभागात मग आम्ही पाठवलेल्या ठरावाचे काय केले याची विचारणा केली. चार-पाच वेळा तगादा लावल्यावर ’विहीत नमुन्यात ठराव नसल्याने कारवाई केली नाही’ असे साचेबंद सरकारी उत्तर आले व सोबत ’विहीत नमुना’ जोडलेला होता. मी लगेच कर्मिक विभागाच्या मागे लागून तो ठराव पोत विभागाला जसा हवा होता तसा पाठवुन द्यायला लावला. १८ जून २००९ ला सरकारने दुरूस्तीला मंजूरी दिली व तशी नोंद असलेल्या राजपत्राच्या ६ प्रती धाडल्या. खरेतर मंजूरी पुर्वलक्षी प्रभावाने मिळेल असे अभिप्रेत असताना “राजपत्र प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून लागू” या एका ओळीने आमचा चांगलाच विरस झाला. ज्यांनी याचा पाठपुरावा केला त्यांना या सुधारणेचा फ़ायदा मिळणार नाही हे स्पष्ट झाले ! त्या तिघींनी सुद्धा “ठीक आहे, आम्हाला नाही तर नाही, या पुढे कोणी दत्तक घेइल त्याला तर फ़ायदा होईल” असा मनाचा मोठेपणा दाखवून स्वत:ची समजूत करून घेतली. पण मी हार मानायला तयार नव्हतो. मी त्यांना कामगार नेते व मुंबई बंदराच्या विश्वस्त पदी कामगार प्रतिनिधी म्हणून सलग ४० वर्ष असलेले श्री. कुळकर्णी यांच्याकडे तुमची कैफ़ियत मांडा असे सूचवले. श्री. कुळकर्णी यांनी सुद्धा याची तातडीने दखल घेउन, अध्यक्षांना पत्र लिहीले व स्वत:च्या विशेष अधिकाराचा वापर करून तिन्ही महीला कर्मचार्यांची विशेष रजा माणुसकीच्या नात्याने मंजूर करावी अशी गळ घातली. अध्यक्षांनी यावर कर्मिक विभागाचे मत मागितले. त्यावर, अध्यक्षांना अशा प्रकरणात पुर्वलक्षी प्रभावाने नियम लागू करता येत नाही पण विश्वस्त मंडळाच्या बैठेकीत असा ठराव पास करून घेता येइल अशी टीपणी दिली. अध्यक्षांनी त्वरीत स्वत:च असा ठराव मांडण्याला संमती दिली व २२ सप्टेंबरच्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर झाला , अपवादात्मक बाब म्हणून या तिन्ही महीला कर्मचार्यांना या सुधारीत नियमाचा लाभ द्यावा असे ठरले ! वर्षभर चाललेल्या कागदोपत्री लढाईचा अखेर विजय झाला. चांगल्या कामाचे चीज झाले ! आधुनिक झाशीच्या राणींना विलंबाने का होईना न्याय मिळाला, त्यांचे दत्तक विधान , ’विधी’वत मंजूर झाले !

’ती’ राणी हरली – खुब लढी मर्दानी झांसीवाली …. पण तिच्यापासून स्फुर्ती घेतलेल्या या तिघी मात्र जिंकल्या ! इतिहास बदलला !!