अनुवादनामा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अनुवादनामा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०११

अरे माणसा माणसा !

पैसे नसतात तेव्हा झाडपाला खाऊनही दिवस काढायची माणसाची तयारी असते. पैसा आल्यावर हाच झाडपाला तो महागड्या हॉटेलात ऑर्डर करतो.

पैसे नसतात तेव्हा माणूस सायकलने रपेट करतो, पैसा आल्यावर मात्र हीच सायकल तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.

पैसे नसतात तेव्हा रोजीरोटीसाठी त्याची पायपीट चालू असते. पैसे आल्यावर मात्र हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो.

माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.

पत नसली तरी लग्न करायला एका पायावर तयार असतो, ऐपत असली की मात्र त्याला घटस्फोट हवा असतो.

पैसे वाचवायला तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो, पुढे पैसा आला की सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो.

पैसे नसेल तेव्हा तो असल्याचे सोंग आणतो, पैसा असतो तेव्हा मात्र कंगाल असल्याचे नाटक करतो.

माणसा रे माणसा. तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस ?

शेयर बाजाराला सट्टाबाजार म्हणातोस पण सट्टा लावतोस,

पैसा वाईट असे म्हणतोस पण त्याचा मोह काही सोडत नाहीस,

मोठ्या पोस्टचा हव्यास नाही असे म्हणातोस पण डोळा मात्र ती पोस्ट कधी मिळते इकडे असतो,

जुगार आणि दारू वाइट म्हणतोस पण तिचा नाद काही तुला सोडवत नाही.

माणसाचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे असतात.

माणूस जे बोलतो ते कधी करत नाही, करतो ते कधी बोलत नाही.

माणसाची कथनी वेगळी, करणी वेगळी !

सोमवार, २२ ऑगस्ट, २०११

चॅटरूममध्ये गप्पा मारायला आला बाप्पा !

बाप्पा – हाय ! मला का बोलावतो आहेस ?

मी – मी तुला बोलाविले ? नाही. तू आहेस तरी कोण ?

बाप्पा – मी बाप्पा आहे. तुझी प्रार्थना ऐकली. तेव्हा तुझ्याशी गप्पा मारायला आलो.

मी – मी प्रार्थना करतो. तेवढेच जरा बरे वाटते. पण आता मात्र मी खूप कामात आहे. कशात तरी मी अगदी गुरफटून गेलो आहे.

बाप्पा – कोणत्या कामात एवढा गर्क आहेस ? मुंग्या सुद्धा सतत उद्योगी असतात.

मी – नाही सांगता येणार. निवांतपणाच हरविला आहे. आयुष्य अगदी धकाधकीचे झाले आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग !

बाप्पा – खरे आहे. सतत कार्यमग्न असता. पण निर्मितीक्षम असाल तर तुम्हाला परिणाम मिळेल. कामात तुमचा वेळ जातो. निर्मिती कराल तर तुमचा वेळ मिळेल.

मी – थोडे थोडे समजते आहे. पण तू असा चॅटरूम मध्ये मला पिंग करशील असे कधी वाटलेही नव्हते !

बाप्पा – तू वेळेबरोबर झगडतो आहेस, त्यात तुझी थोडी मदत करावीशी वाटली. आजच्या काळात तुम्ही याच माध्यमातुन संवाद साधता तेव्हा मी सुद्धा त्याच मार्गाने तुझ्यापर्यंत आलो.

मी – जगणे एवढे गुंतागुंतीचे कसे बनले ते सांगशील का ?

बाप्पा – कसे जगायचे याचा विचारच सोडून द्या ! आयुष्याला सामोरे जा ! कसे जगायचे याची विवंचना करीत बसल्याने गुंता होतो.

मी – कशामुळे आम्ही सतत दु:खात बुडालेले असतो ?

बाप्पा – वर्तमानात तुम्ही भूतकाळाची काथ्याकूट करीत बसता व भविष्याची चिंता करता. कारणे शोधत बसता म्हणून काळजी वाढते. काळजी करत बसायची तुम्हाला खोडच लागली आहे. म्हणून तुम्ही कष्टी होता.

मी – पण आज अनिश्चितता एवढी वाढली आहे की काळजी वाटणे अगदी स्वाभाविकच आहे ना ?

बाप्पा – अनिश्चितता अपरिहार्य आहे पण काळजी करणे आपण टाळू शकतो.

मी – पण मग अनिश्चितततेमुळे होणार्या यातनांचे काय ?

बाप्पा – यातना अपरिहार्य आहे पण त्रासणे टाळता येण्या सारखे आहे.

मी – मग चांगल्या माणसांच्याच वाटेला सगळे भोग का लागतात ?

बाप्पा – हिर्याला पैलू पाडावे लागतात, सोने कसाला लावावे लागते. चांगल्या माणसांना कठोर परीक्षा द्यावी लागते पण त्याला ते त्रास समजत नाहीत. त्यांचे जीवन अनुभवाने समृद्ध बनते, कडवट नाही.

मी – म्हणजे अशी अग्नीपरीक्षा गरजेची आहे ?

बाप्पा – हो. सर्वाथाने. अनुभव हा एक कठोर गुरू आहे. इथे परीक्षा आधी मग धडे असा प्रकार असतो.

मी – पण तरीही अशी परीक्षा द्यायची वेळच का यावी ? आपण PROBLEMS पासून मुक्त का होवू शकत नाही ?

बाप्पा – PROBLEMS म्हणजे;

Purposeful Roadblocks Offering Beneficial Lessons to Enhance Mental Strength.

आंतरिक शक्ती समस्यामुक्त असताना येत नाही तर ती संघर्षातुन व दृढ निग्रहातुन येते.

मी – खरे सांगायचे तर समस्यांच्या या झंझाळात मी वाटच हरवून बसलो आहे.

बाप्पा – बाहेर बघितलत तर तुम्हाला आपण कोठे चाललो आहोत ते कळणारच नाही. आत डोकावा. बाहेर तुम्हाला स्वप्ने दिसतील. आत बघाल तर जागे व्हाल. डोळे तुम्हाला बाहेरचे जग दाखवितात. ह्रुदय तुम्हाला अंतरंग दाखविते.

मी – यशाच्या मार्गावर चालताना कधी कधी यश चटकन वश होत नाही तेव्हा ते जास्त बोचते. अशावेळी काय करू ?

बाप्पा – यशाचे मापदंड प्रत्येकाचे वेगळे असतात. समाधान मिळाले का हे मात्र तुमचे तुम्हीच ठरवायचे असते. वेगावर हावी होण्यापेक्षा योग्य मार्गावर आहोत हे माहित असणे जास्त महत्वाचे. तुम्ही होकायंत्राप्रमाणे जा. भले इतर घड्याळाशी स्पर्धी करू देत !

मी – कठीण प्रसंगात निर्धार कसा टीकवायचा ?

बाप्पा – अजून किती अंतर पार पडायचे आहे हे बघू नका. आपण किती अंतर पार केले ते बघा. तुमच्या मागे असलेल्या आशीर्वादांवर जास्त भरोसा ठेवा , काय कमी आहे त्याचा विचार करू नका.

मी – तुला लोकांच्या कोणत्या गोष्टीचे नवल वाटते ?

बाप्पा – दु:ख वाट्याला आले की लोक "मीच का ?" असे विचारतात पण सुखात लोळताना मात्र हा प्रश्न त्यांना कधी पडत नाही ! प्रत्येकाला आपली बाजू सत्याची वाटत असते. सत्याच्या बाजूला मात्र कोणी उभाही रहात नाही.

मी – माझे भले कशात आहे ?

बाप्पा – भूतकाळाची खंत करू नका. वर्तमानाला आत्मविश्वासाने तोंड द्या. भविष्याला निर्भयतेने सामोरे जा.

मी – एक शेवटचा प्रश्न . कधी कधी मला वाटते की माझी प्रार्थना ऐकलीच जात नाही.

बाप्पा – प्रार्थना ऐकली नाही असे कधीही होत नाही. तुम्हाला असे वाटते तेव्हा "ती वेळ" अजून आलेली नसते.

मी – मजा आली देवा ! आता माझ्यात एक नवी प्रेरणा जागी झाली आहे.

बाप्पा - चांगले आहे. भरवसा ठेव , भय सोड. शंकेला थारा देवू नकोस , श्रद्धा सोडू नकोस. एखादी समस्या नाही तर आयुष्याचे कोडे सोडवायचे आहे. माझ्यावर विश्वास ठेव. कसे जगायचे हे कळले तर हे जीवन सुंदर आहे !


 

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

शेयर बाजाराचा फंडा !

आटपाट नगर सधन म्हणावे असेच होते. प्रत्येकाची कसदार जमीन होती. सोने पिकत होते. अगदी शिणुमात दाखवितात तसे राव आणि रंक दोघेही सुखी होते. धान्याच्या कोठ्या कायम भरलेल्या असायच्या. पण याच समृद्धीने गावावर माकडांचे संकट ओढवले. माकडांच्या झुंडीच्या झुंडी धान्य फस्त करायला गावात धडकू लागल्या. आटपाट नगरातले लोक माकडांच्या त्रासामूळे अगदी हैराण झाले होते. गावात माणसे कमी व माकडे जास्त अशी स्थिती ओढवली होती. जिकडे बघावे तिकडे माकडेच माकडे. माकडांचे काय करायचे या पेचात नगरवासी पडले असतानाच त्या गावात एक मसिहा आपल्या नोकराबरोबर येतो. सोबत त्याने प्रचंड मोठे पिंजरे आणलेले असतात. गावकर्यांना तो जबरदस्त ऑफर देतो " माकडं आम्हाला, पैसे तुम्हाला !" एका माकडाला पकडून मसिहाच्या ताब्यात दिले की तो त्यांना रोख 25 रूपये देणार असतो.


 

माकडांच्या त्रासाने हैराण झालेले लोक आता माकडे पकडायच्या मागे लागतात . पकड माकड व कमव 25 रूपये ! बघता बघता गावातली बहुतेक माकडे पकडली जातात व मसिहाच्या पिंजर्यात बंद होतात. माकडांचा उपद्रव थांबतो वर रोख पैसेही मिळतात. गाववाले जरा उसंत घेत आहेत तो मसिहा नवे ऐलान करतो. एका माकडासाठी तो आता 50 रूपये मोजायला तयार होतो ! गावातली उरली-सुरली माकडे पकडून झाल्यावर गाववाले आता पंचक्रोशीतली गावे पालथी घालतात व मायंदळ पैका कमवितात. शेवटी अशी वेळ येते की त्या संपूर्ण टापूत औषधालाही मोकळे माकड दिसत नाही ! अनेक दिवस वाट बघून सुद्धा नव्याने माकडे मिळत नाहीत म्हटल्यावर मसिहा बोली एकदम 100 रूपयावर नेवून ठेवतो. गावकरी सुद्धा परत एकदा नव्याने कामाला लागतात. शेतीवाडीची कामे सोडून सारा गाव आपला माकडांच्या मागे लागतो. पण अनेक आठवडे तपास करून सुद्धा एकही माकड गवसत नाही ! 200 रूपयांची बोली लावून सुद्धा माकड मिळत नाही म्हटल्यावर मसिहा शेवटी वैतागून गाव सोडायचा निर्णय घेतो व दूसर्या प्रांतात माकडे मिळतात का याची पाहणी करण्यासाठी रवाना होतो. ताब्यात असलेल्या माकडांची निगराणी करायला तो आपल्या नोकराला गावातच ठेवतो.


 

मसिहाचा नोकर मालकाची पाठ फिरताच गाववाल्यांना सांगू लागतो की मालक पक्का लब्बाड आहे, माकडांच्या धंद्यात तो बख्खळ पैसा कमावितो व तुमच्या तोंडाला पाने पुसत आहे ! एका माकडामागे त्याला खरेतर 1000 रूपये मिळतात पण तुम्हाला मात्र तो शंभरच देत आहे. मला पण तो कमी पैशात राबवून घेतो , एवढेच नाही तर मला हाकलून देवून कमी पैशात कोणी दूसरा नोकर मिळतो का हे सुद्धा तो शोधतो आहे. माझा महिन्याचा पगार सुद्धा त्याने थकविला आहे. सगळ्या गावकर्यांची सहानूभूति नोकराला मिळते. जो तो मसिहाच्या नावाने बोटे मोडू लागल्यावर नोकर आपण आता मालकाला चांगलाच धडा शिकविणार असल्याचे जाहिर करतो. त्याच्या ताब्यात असलेली पिंजर्यात डांबलेली माकडे तो गावकर्यांना फक्त 100 रूपयात देवू करतो व गावकर्यांचे भले करूनच गाव सोडायचे ठरवतो. पुढे तो असेही सांगतो की मालकाने निरोप पाठविला आहे की काही दिवसातच तो परत येत आहे. ही माकडे तुम्ही 500 रूपयाखाली त्याला विकू नका असेही तो बजावून सांगतो. गावाला वेड लागते वेड ! असेल नसेल ते विकून जो तो माकडे घेण्यासाठी झुंबड करतो. बहुतेक सगळ्या जमिनी सावकारांच्या घशात जातात, दागिने , पाटल्या, बांगड्या विकून / गहाण ठेवल्यावर शेवटी बायकांच्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा रहात नाही. अवघ्या काही दिवसातच प्रत्येक गाववाल्याच्या घरात माकडेच माकडे दिसू लागतात. सर्व माकडे विकली गेल्यावर नोकर जड अंत:करणाने गाव सोडतो. सगळा गाव त्याच्या सेंड ऑफ ला लोटतो. त्याचे लाख लाख आभार मानत साश्रू नयनांनी सगळे त्याला निरोप देतात.


 

दोन वर्षे झाली, आटपाट नगरातले गावकरी अजूनही त्या मसिहाच्या प्रतीक्षेत आहेत. स्वत: अर्धपोटी राहून ताब्यात असलेल्या माकडांची निगरानी ठेवत आहेत. शेती-वाडी केव्हाच सावकारांच्या घशाखाली गेली आहे. आपल्याच शेतात मजूरीवर सगळा गाव राबतो आहे. काही जण आता आसपासच्या गावात माकडांचे खेळ दाखवून पोटाची खळगी भरीत आहेत.

शुक्रवार, २९ जुलै, २०११

“काम न करण्यासाठी” करायची कामे !

"काम न करण्यासाठी" करायची कामे !

  • कोठेही जाताना हातात कागदपत्रांचे भेंडोळे ठेवा. हातात कागदपत्रे असलेले लोक कामसू दिसतात तर रिकाम्या हाताने फिरणारे कॅन्टीनला चालले आहेत असे वाटते. हातात पेपर असेल तर तो माणूस प्रसाधनगृहात चालला आहे असा समज होतो. घरी जाताना सुद्धा फायलींचे ढीग सोबत न्या. असे केल्याने तुम्ही कामावरच नाही तर घरी सुद्धा कंपनीचे भले बघत असता असा वरीष्ठांचा समज अधिक दृढ होतो.
  • संगणक वापरून तुम्ही कामात मग्न असल्याचे दाखवा – तुम्ही जेव्हा संगणकावर असता तेव्हा आम आदमीला तुम्ही कामात व्यस्त आहात असेच वाटते. तुम्ही व्यक्तीगत इ-मेल पाठवा किंवा तुम्हाला आलेली वाचा, गेम खेळा, मित्रांशी गप्पा ठोका, थोडक्यात काम सोडून काहीही काम करा. ज्यांनी संगणकाचा शोध लावला त्यांना त्याचा असा वापर अभिप्रेत नसेलही पण असे करण्यात वावगे काय आहे ? आणि समजा तुम्हाला बॉसने हे धंदे करताना पकडलेच तर खुषाल ठोकून द्या की मी माझे संगणक ज्ञान अद्ययावत करत आहे व त्याचा फायदा कंपनीलाच होणार आहे तो ही एक पै सुद्धा खर्च न करता !
  • टेबलावर पसारा करून ठेवा – टापटीप टेबल बड्या सायबाला शोभून दिसते ! आपल्यासारख्या पामरांच्या बाबतीत मात्र हेच काम करीत नसल्याचे लक्षण ठरते. तुमच्या टेबलावर , आसपास कसा नुसता फायलींचा ढीग साचलेला हवा ! काही फायली नसतील तर मागच्या वर्षीच्या फाइल ठेवा हो, बघणार्याला फाइल नवी काय जुनी काय, काय फरक पडतो ? फायलींचा ढीग दिसल्याशी कारण ! ढीग कसा चांगला उंच व ऐसपैस पसरलेला हवा ! आणि समजा जर कोणी आलाच तुमच्या टेबलाकडे तर महत्वाची फाइल त्या ढीगार्यात दडवून ठेवा व तो आल्यावर ती शोधण्याच्या बहाण्याने सगळे ढीगारे उलथे-पालथे करीत रहा !
  • तुमच्याकडे वॉइसमेलची सोय असेल तर कधीही फोनवर उत्तर देवू नका ! उगाच कोणी कोणाला फोन करीत नाही. अहो तुमच्याकडून काही काम करून घ्यायचे असते म्हणून तर लोक तुम्हाला फोन करतात ! वॉइसमेल बघितल्यावर जे कॉल तुम्हाला कामाला लावणारे असतील तर ते करणार्यांना त्यांच्या जेवणाच्या किंवा अशावेळी की ते फोन घेण्याची सुतराम शक्यता नाही , तेव्हाच फोन लावा. या मूळे तुमची तत्पर आणि कामसू अशी प्रतिमा तयार होइल, भले प्रत्यक्षात तुम्ही कामचोर असलात तरी !
  • चेहरा सतत त्रासलेला ठेवा, बघणार्याला तुम्ही अस्वस्थ असल्याचे वाटले पाहिजे – अशाने तुमच्या वरिष्ठांना तुम्ही कामाच्या बोजाने दबले गेले आहात असे वाटेल. "ये बेचारा काम के बोज का मारा" असे दिसले पाहिजे.
  • कार्यालयातून उशीरा घरी निघा – कामावर उशीरापर्यंत थांबा, खास करून तुमचा बॉस थांबला असेल तेव्हा. अर्थात या वेळात तुम्ही तुमच्या आवडीचे एखादे मासिक, गोष्टीचे पुस्तक वाचू शकता जे वाचायला एरवी तुम्हाला सवड मिळत नाही. बाहेर पडताना बॉसच्या केबिनवरूनच जा, त्याला तुम्ही उशीरा पर्यंत थांबला होता ते कसे कळणार नाहीतर ? महत्वाचे इमेल अवेळी धाडत जा, जसे रात्री 9 वाजून 05 मिनिटे किंवा सकाळी 7 वाजून 05 मिनिटे., त्यातही तो दिवस रविवार वा सार्वजनिक सुट्टी असेल तर उत्तमच !
  • सतत उसासे सोडत रहा – मोठ्याने व सतत उसासे सोडत राहिलात की लोकांना तुम्ही जबरदस्त तणावाखाली काम करीत आहात असे वाटते.
  • ढीगार्याची क्लुप्ती – कागदपत्रांचा टेबलावर नुसता ढीग करून ठेवाच पण त्या बरोबरच काही पुस्तके जमिनीवर पडलेली दिसली पाहिजेत. या साठी संगणकाची जाडजूड माहिती पुस्तके एकदम बेस्ट !
  • शब्दसंग्रह वाढवा – संगणकाची मासिके चाळा व त्यातील अत्यंत क्लिष्ट शब्द निवडून काढा, नव्या नव्या उत्पादनांची माहिती करून घ्या व साहेबाशी बोलताना त्याचा मस्त वापर करून त्याला अगदी भंजाळून टाका. न कळणारी तांत्रिक परिभाषा वापरून त्याला अगदी शब्दबंबाळ करा. त्याला तुमचे म्हणणे कळेलच असे काही नाही, कळले पाहिजे असेही नाही , छाप मात्र नक्की पडेल !
  • दोन जॅकेट असू द्या – तुमचे टेबल जर सगळ्यांना दिसेल असे असेल तर एक जॅकेट तुमच्या खुर्चीच्या पाठीवर पसरवून ठेवा. लोकांना ते जॅकेट बघून तुम्ही जवळपासच कोठेतरी आहात असे वाटेल व मग दूसरे जॅकेट घालून तुम्ही कामाच्या वेळात कोठेही उंडारायला मोकळे.
  • आणि शेवटी अत्यंत महत्वाची गोष्ट – ही पोस्ट तुमच्या साहेबापर्यंत पोचणार नाही याची काळजी घ्या !

सोमवार, १८ जुलै, २०११

अपवाद नसलेले नियम !

नियम म्हटला की त्याला अपवाद हा असतोच ! किंबूहना अपवादानेच नियम सिद्ध होतो असे म्हणतात. खालील नियमांना मात्र अपवाद नाही, अर्थात याने "अपवादाच्या नियमाला" बाधा येत नाही, पुष्टीच मिळते !


 

  1. यांत्रिकी नियम – तुमचे हात जेव्हा वंगणाने बरबटलेले असतील तेव्हाच नेमकी तुमच्या नाकाला खाज तरी सुटेल किंवा लघुशंकेची अतीव प्रबळ इच्छा होईल !


 

  1. गुरूत्वाकर्षणाचा नियम – तुमच्या हातून जेव्हा एखादे उपकरण, नट, ब्लोट, स्क्रू खाली पडतो तेव्हा तो घरंगळत जिकडे सहजी हात पोहचू शकणार नाही अशा जागी जावून थांबतो !


 

  1. संभाव्यतेचा नियम – तुमची कृती जेवढी येडपटपणाची तेवढी ती करताना तुम्हाला इतरांनी बघायची शक्यता जास्त !


 

  1. रामभरोसे शास्त्र – जेव्हा तुमच्याकडून चूकीचा नंबर फिरवला जातो तेव्हा तो कधीही व्यस्त असत नाही व कोणीतरी हमखास त्याला उत्तर देतोच !


 

  1. बनावाचा नियम – टायर पंक्चर झाल्यामूळे कामावर यायला उशीर झाला अशी थाप तुम्ही साहेबाला मारता तेव्हा दूसरेच दिवशी तुमचा टायर खरेच पंक्चर होतो.


 

  1. बदलाचा नियम – तुम्ही जेव्हा रांग बदलता ( किंवा वाहतुकीची लेन ) , तेव्हा तुम्ही ज्या रांगेत आधी होता ती रांग किंवा लेन तुम्ही नव्याने धरलेल्या रांगेपेक्षा /लेनपेक्षा अधिक वेगाने सरकू / धावू लागते !


 

  1. आंघोळीचा नियम – घरी एकटे असताना तुम्ही आंघोळीसाठी अंगावर पहिला तांब्या घेतलात रे घेतलात की लगेच दाराची वेल बाजते !


 

  1. अनपेक्षित भेटीचा योग – तुम्हाला ओळखणारी व्यक्ती अचानकपणे तुम्हाला भेटण्याची शक्यता सर्वांधिक असते जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीबरोबर असता की तुम्ही तिच्या बरोबर असलेले दूसरे कोणी बघणे तुम्हाला अजिबात नको असते !


 

  1. बिघाडाचा नियम – आपले बिघडलेले उपकरण तुम्ही दूसर्या कोणाला दाखविता तेव्हा त्याने हात लावताच ते चालू होते !


     

  2. शरीर विज्ञानाचा नियम – खाजेची तीव्रता व तुमचा हात तिकडे पोहचण्याची शक्यता याचे प्रमाण नेहमीच व्यस्त असते !


 

  1. सिनेमागृह किंवा मैदानाचा नियम – कोठेही जा, बैठकव्यवस्थेत ज्यांची आसने जास्त लांब असतात ते सगळ्यात शेवटी येतात, हीच माणसे हजारवेळा आत-बाहेर करीत असतात, तसेच सामना किंवा खेळ संपण्याआधीच चालू पडतात. या उलट म्हणजे रांगेत अगदी सुरवातीला बसलेली माणसे सगळ्यात आधी येतात, आपली खुर्ची कधीही सोडत नाहीत, त्यांचे पाय चांगलेच लांब असतात नाहीतर पोट तरी सुटलेले असते आणि पडाद्यावर अगदी "दी एन्ड" दिसेपर्यंत वा सामन्याचा बक्षिस सभारंभ होईपर्यंत आपली जागा सोडत नाहीत. आणि हो, ही माणसे भांडकूदळ, उर्मट, उद्धट सुद्धा असतात !


 

  1. गरम चहाचा नियम –तुम्ही वाफाळत्या चहाचा कप तोंडाला लावताच साहेब तुम्हाला बोलावितो व चहाचे शीतपेय झाल्यावरच तुमची सूटका करतो.


 

  1. लॉकरचा नियम – लॉकर रूममध्ये जेव्हा दोनच माणसे असतात तेव्हा त्यांचे लॉकर एकमेकांच्या लगतच असतात.


 

  1. पृष्ठभागाचा नियम – कारपेट जेवढे महाग तेवढी तुमच्या हातून लोणच्याची बाटली त्याच्यावर पडायची शक्यता जास्त !


 

  1. तर्कशास्त्राचा नियम – तुम्ही जेवढे अतार्किक बोलाल तेवढे ते तर्कसंगत ठरते !


 

  1. तयार कपड्यांचा नियम – तुमच्या मापाचे तयार कपडे तुम्हाला केव्हाच शोभून दिसणार नाहीत !


 

  1. भाषणाचा नियम – न बोलून शहाणा !


 

  1. बाजारपेठेचा नियम – तुम्हाला आवडणार्या वस्तूचे उत्पादन हमखास बंद झालेले असते ( उदा. बजाजची एम-८० स्कूटर ! )


 

आजारपणाचा नियम – आजारी पडलात तर डॉक्टरकडे रांग लावा, नंबर लागेपर्यंत तुम्हाला खूपच आराम पडलेला असेल, पण जर तुम्ही घरीच राहीलात तर मात्र तुमचा आजार बळावेल !

शनिवार, ९ जुलै, २०११

काय हवे ? संपत्ति, यश की प्रेम ?

एका गृहिणीला आपल्या घराबाहेर भरपूर पांढरीशुभ्र दाढी वाढलेले तिन म्हातारे दिसतात. ती काही त्यांना ओळखत नव्हती तरीही कदाचित ते भुकेलेले असतील असे वाटून तिने त्यांना चार घास खायला घरात बोलाविले.


 

घरातील कर्ता पुरूष घरी आहे ? असा प्रश्न त्या तिघांनी एकदमच विचारला. "नाही, तो कामासाठी बाहेर गेला आहे" असे तिने सांगताच "तो असल्याशिवाय आम्ही घरात पाऊलही टाकणार नाही" असे उत्तर देवून ते म्हातारे बाहेरच बसून राहिले.


 

संध्याकाळी नवरा घरी आल्यावर तिने त्याला त्या म्हातार्यांबद्दल सांगितले. नवर्याने लगेच त्यांना आता घेवून यायला सांगितले. त्या गृहीणीने त्या तिघांना सांगितले की घरातला कर्ता पुरूष, तिचा नवरा घरी आलेला आहे व आता तुम्हाला आत यायला हरकत नाही.


 

यावर म्हातारे म्हणाले "आम्ही तिघेही कोणाच्या घरात केव्हाच एकत्र जात नाही !" त्या गृहीणीने त्याचे कारण विचारताच त्यातल्या एकाने इतर दोन म्हातार्यांकडे बोट दाखवून सांगितले की हा म्हणजे संपत्ति व तो दूसरा म्हणजे यश व आपण स्वत: प्रेम आहोत. तेव्हा आत जा व नवर्याबरोबर चर्चा करून कोणाला आत घेणार ते ठरवा.


 

नवर्याचे म्हणणे पडले की संपत्तिला आत घेवूया म्हणजे आपल्याला पैशाची कधी ददात पडणार नाही, बायकोचे म्हणणे पडते की त्यापेक्षा यशालाच आपण आत घेवूया. त्यांची सुन मात्र सांगते की आपण प्रेमालाच घरात बोलवूया म्हणजे आपले घर प्रेमाने भरून जाईल ! सुनेचे म्हणणे ऐकण्याचे शेवटी नवरा-बायको ठरवितात.


 

गृहीणी घराबाहेर येवून प्रेमाला आदरपुर्वक आत बोलावते. आश्चर्य म्हणजे प्रेम घरात शिरू लागतात त्याच्या मागोमाग संपत्ति व यश सुद्धा आत येवू लागतात. गृहीणी विचारते की मी फक्त प्रेमाला आत बोलाविले आहे, तुम्ही का मागोमाग येत आहात ?


 

यावर तिन्ही म्हातारे एकमुखाने सांगतात की तुम्ही जर संपत्ति किंवा यशाला आत बोलाविले असते तर इतर दोघे बाहेरच थांबले असते. पण जिकडे प्रेम असते तिकडे बाकी दोघे आपसूकच जातात. प्रेम असेल तिकडे संपत्ति व यश असतेच असते !

शुक्रवार, ८ जुलै, २०११

मी मागितले, देवाने दिले !


 

मी देवाकडे बळ मागितले,

त्याने माझ्यापुढे एवढ्या अडचणी ठेवल्या की मी आपसुकच बलवान झालो !


 

मी देवाकडे समृद्धी मागितली,

त्याने मला कणखर शरीर आणि तल्लख मेंदू दिला !


 

मी त्याच्याकडे धैर्य मागितले,

त्याने सामना करण्यासाठी मला अनेकवार संकटात टाकले !


 

मी त्याच्याकडे संयम मागितला,

त्याने मला अनेकदा अशा प्रसंगात टाकले की मला वाट बघावीच लागली !


 

मी देवाकडे प्रेम मागितले,

त्याने माझ्या सोबतीला परिस्थितीने दुबळे झालेले मित्र दिले.


 

मला हवे असलेले काहीच मिळाले नाही,

मला ज्याची गरज होती ते मात्र सगळे मिळाले.


 

मी देवाची कृपा माझ्यावर सदैव राहू दे असे मागितले,

त्याने मला अनेक संधी उपलब्ध करून दिल्या !


 

मी देवाकडे चातुर्य मागितले,

त्याने मला सोडवायला अनेक समस्या निर्माण केल्या !


 

देवाने माझ्या सगळ्या प्रार्थना ऐकल्या तर !


 

 

बुधवार, ६ जुलै, २०११

वॉरेन बफेटची साधी-सरळ जीवन-शैली !

  1. वयाच्या अकराव्या वर्षी त्याने पहिली समभाग खरेदी केली, त्याला वाटते की याला अंमळ उशीरच झाला !
  2. वृत्तपत्रे घरोघरी पोहचवून मिळालेल्या पैशातून वयाच्या १४ व्या वर्षी त्याने लहान शेत विकत घेतले.
  3. अजूनही तो ३ शयनगृहे असलेल्या घरात राहतो जे त्याने ५० वर्षापुर्वी लग्न झाले तेव्हा घेतले होते. त्याच्या मते आवश्यक त्या सगळ्या गोष्टी या घरात आहेत. त्याच्या घराला संरक्षक भिंत वा कुंपण सुद्धा नाही.
  4. सगळीकडे तो स्वत:च गाडी चालवित जातो, त्याने चालक ठेवलेला नाही ना सुरक्षा रक्षकांचा फौजफाटा.
  5. स्वत: जगातल्या सर्वात मोठ्या खाजगी विमानसेवेचा मालक असलेला हा इसम स्वत: मात्र खाजगी विमानसेवा वापरीत नाही.
  6. त्याची बर्कशायर हॅथवे ही कंपनी, ६३ कंपन्यांचे नियंत्रण करते. आपल्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना तो वर्षात एकच पत्र धाडतो व त्यात त्यांना उद्दीष्ट ठरवून देतो. तो त्यांची कधी बैठकही घेत ना्ही किंवा त्यांना साधा फोनही करीत नाही.
  7. आपल्या सर्व प्रमुखांना त्याने दोनच नियम घालून दिले आहेत १) आपल्या भागधारकांचे नुकसान होईल असे काहीही करू नका २) पहिला नियम कधीही विसरू नका !
  8. उच्चभ्रू समाजात तो कधी मिसळत नाही. घरी आल्यावर स्वत: बनवलेले पॉप कॉर्न दूरदर्शन बघत फस्त करणे हाच त्याचा वेळ घालवायचा उद्योग !
  9. हा असामी सेलफोन बाळगत नाही. एवढेच काय त्याच्या टेबलावर संगणक सुद्धा नाही.
  10. जगातल्या सर्वात धनाढ्य अशा बिल गेटसने अवघ्या पाच वर्षापुर्वी त्याची प्रथमच भेट घेतली. या माणसाशी आपले सुर अजिबात जुळणार नाहीत म्हणून या भेटीसाठी बिल गेटसने फक्त ३० मिनिटे मोकळी ठेवली होती. प्रत्यक्ष भेट मात्र तब्बल १० तास चालली व भेटीनंतर बिल गेटस वॉरेन बफेटचा परम भक्त बनला !


 

बफेट उवाच –

क्रेडीट कार्डस पासून लांबच रहा, स्वत:तच गुंतवणुक करा आणि या गोष्टी कायम ध्यानात ठेवा,

  • पैशासाठी माणूस नाही तर माणसासाठी पैसा आहे.
  • जेवढे जमेल तेवढी साधी राहणी अंगिकारा.
  • ऐकावे जनाचे , करावे मनाचे.
  • नावावर जावू नका, अशा वस्तूच घ्या ज्या तुम्ही सहजपणे वापरू शकाल.
  • अनावश्यक खर्च टाळा, अगदी गरजेच्या वस्तूच विकत घ्या.
  • आयुष्य तुमचे आहे आणि इतरांना त्यात लुडबुड करू द्यायचे कारणच काय ?


 

चला तर, साधे आणि सरळ आयुष्य जगूया !


 

शुक्रवार, १ जुलै, २०११

कोण मेले ? कोणासाठी, कशासाठी ?

एका शेतकर्याला जातिवंत घोडे पदरी ठेवायचा शौक असतो. त्याच्या पागेत एक सोडून सगळ्या जातीचे घोडे असतात. त्याला कोणीतरी सांगते की तू ज्या जातीचा घोडा शोधतो आहेस तसा तुझ्या शेजार्याचा पागेत आहे. झाले ! हा शेतकरी आपल्या शेजार्याच्या पाठी सतत "तो घोडा मला दे असे "तुमणे लावतो ! त्याच्या रोजच्या भुणभुणीला वैतागून शेजारी तो घोडा त्याला एकदाचा विकून टाकतो. एका महिन्यानंतर तो घोडा आजारी पडतो. पशूवैद्याला पाचारण केले जाते. पशूवैद्य निदान करतो की घोड्याला विषाणू संसर्ग झालेला आहे. तीने दिवसाचे औषध मी देतो त्याने गुण आला तर ठीक नाहीतर सरकारी नियमाप्रमाणे या घोड्याला ठार मारावे लागेल. हे संभाषण एक डूक्कर ऐकत असतो.


 

दूसर्या दिवशी घोड्याला औषधाचा पहिला डोस देवून सगळॆ निघून गेल्यावर डूक्कर त्याच्या जवळ जावून म्हणतो – मित्रा जरा धीराने घे, उठून उभा रहा नाहीतर तुला हे लोक कायमचे झोपवतील !


 

दूसर्या दिवसाचा डोस देवून झाल्यावर सुद्धा घोडयाची तबियत नरमच असते. परत डूक्कर त्याच्या जवळ जावून त्याला चियर अप करते ! लेका झटकून टाक सगळी मरगळ, मन खंबीर कर, माझ्या मदतीने निदान उठून तरी बस, राजा प्रयत्न कर, नाहीतर तुझा खेळ संपलाच म्हणून समज --- शाब्बास, आता कसे जमले ? आशा सोडू नकोस मित्रा, माझी तर खात्रीच पटली आहे, तू खडखडीत बरा होणार !

तिसर्या दिवशी शेवटचा डोस देवून पशूवैद्य घोड्याला तपासतो व सांगतो अपेक्षित सुधारणा दिसत नाही, हा विषाणू संसर्गजन्य आहे, तेव्हा इतर घोड्यांना याची बाधा होण्याआधी या घोड्याला ठार मारावेच लागेल. मी संध्याकाळी पुन्हा येतो. तेव्हा काय तो अंतिम निर्णय करू.


 

आता मात्र डूक्कराला रडूच कोसळते. ते त्या घोड्याला म्हणते की बाबा रे, वेळ थोडा उरला आहे, उरले सुरले सगळे बळ एकत्र कर, तुला आता ही शेवटेची संधी आहे, ती तुला साधलीच पाहिजे, यू कॅन मॅन, यू कॅन ! मी तुला हात देवून उभे करतो, मी एक, दोन, तीन असे म्हटले की तू थेट पळायला लागायचे, काय ? चियर अप ! ये तुम्हारे इम्तिहान की घडी है ! नाउ और नेवर ! चल , एक, दोन ---- तीन !


 

आता एवढे टॉनिक मिळाल्यावर घोडा का नाही धावणार ! घोडा प्रयत्नपुर्वक आपल्या पायावर आधी उभा राहतो व डूक्कराच्या सततच्या प्रोत्साहनाने आत्मविश्वास परत मिळाल्यावर तर कानात वारे शिरल्यासारखा चौफेर उधळतो ! घोड्याला धावताना त्याचा मालक बघतो व त्याच्या क्षणभर आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही ! खात्री पटल्यावर मात्र तो आनंदाने वेडा होतो पार ! "वाह, बहोत खूब, और तेज, और तेज, फास्ट --------, या वेळची डर्बी तूच मला जिंकून देणार !" असे ओरडत तो सगळ्या मित्रांना जमवून घोडा खडखडीत बरा होवून धावू लागल्याची बातमी देतो व लगेच एका जंगी पार्टीचे ऐलान करतो ! सगळ्यांना माझ्याकडून डूक्कराचे जेवण ! कापा त्या डूक्कराची मान !


 

काय आकलन झाले का ? अहो, आपल्या कामावर तरी काय वेगळे घडत असते ? कोणाच्या प्रयत्नामुळे यश मिळाले किंवा एखादी योजना यशस्वी होण्यासाठी नेमके कोणाचे योगदान कारणीभूत होते, यशाचा धनी नक्की कोण हे नक्की कोणालाच माहीत नसते ! फळाची अपेक्षा न धरता कर्म करत राहणे हे गीतेत सांगितले आहे, तेच शिकायची गरज आहे. तुमच्या कामात व्यावसायिक सफाई नाही असे खुषाल कोणाला म्हणू दे, लक्षात ठेवा अडाणी माणसांनी नोवाची बोट बांधली होती व नामचीन अभियंत्यांनी टायटॅनिक !

यशस्वी होण्यापेक्षा गुणावान होणे केव्हाही चांगले !

आणि हो, जर संधी मिळाली तर त्या बिचार्या डूक्कराच्या बाजूने सुद्धा भांडा ! निदान चार अश्रू तरी ढाळा !


 


 


 

एच.आर. वाल्यांच्या वाटेला जावू नका --- !


 

दोन वर्षे निस्वार्थीपणे सेवा बजावलेल्या एका कामगाराला वाटले की आपल्या सेवेची काही कदर झाली नाही. ना बढती मिळाली, ना पगारवाढ, का कोठे चांगल्या कमाईच्या ठीकाणी बदली. गेला बाजार एखादे प्रशस्तीपत्रक सुद्धा नाही ! तो काही विचार करून त्याच्या एच.आर. मॅनेजरकडे (मराठीत मावव विकास संसाधन प्रबंधक !) गेला. आपल्या मनातली खंत त्याने त्याच्या समोर मांडली. यावर त्याच्या मॅनेजरने त्याला शांतपणे सांगितले की लेका तुझी पण कमाल आहे, एकही दिवस काम न करता असली अपेक्षा तू ठेवतोस हेच नवल आहे ! आपण एकही दिवस काम केले नाही हे काही केल्या त्या कामगाराला पटेना तेव्हा त्याच्या मॅनेजरने त्याची शाळा केली ती अशी ---

वर्षात दिवस किती असतात?

365 – लिप वर्षे असेल तर 366 !

किती तासाचा दिवस असतो ?

24 तासांचा.

कामावर किती वेळ असता ?

सकाळी 10 ते संध्याकाळी 6 म्हणजे 8 तास झाले.

म्हणजे मग दिवसातले किती वेळ तुम्ही काम करता म्हणायचे ?

सोपे आहे, 24 तासातले आठ तास म्हणजे 1/3 झाले.

हुषार आहात ! मग 366 दिवसाचे 1/3 किती होतात ?

122.

विकेंडला कामावर येता का तुम्ही ?

नाही साहेब.

मग असे वर्षाचे शनिवार-रविवार किती होतात ?

48 + 48 – नाही, नाही -- हां ----- 52 रविवार + 52 शनिवार 104 दिवस.

बरोबर , आता 122 दिवसातून 104 दिवस वजा केले तर किती दिवस राहतात ते सांग बरे ?

18 दिवस.

आता या 18 दिवसातुन तुम्हाला दर वर्षी 2 आठवड्याची, म्हणजे 14 दिवसाची आजारपणाची रजा मिळते, ती वजा केली तर किती दिवस राहतात ?

4 दिवस.

स्वातंत्र्य दिनी, म्हणजे 15 ऑगस्टला , कामावर येता का ?

नाही साहेब.

प्रजासत्ताक दिनाला, म्हणजे 26 जानेवारीला कामावर येता का ?

नाही साहेब.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कामावर येता का ?

नाही साहेब.

मग आता किती दिवस राहिले ?

1 दिवस साहेब !

नाताळला कामावर येता का ?

नाही साहेब.

मग आता किती दिवस उरले कामाचे ?

काही नाही साहेब.

मग एकही दिवस काम न करता तुम्हाला बढती, हवी त्या ठीकाणी बदली, पगारवाढ द्यायची का ??????????

बिचारा कामगार झीट येवून पडतो !

तात्पर्य काय तर एच.आर. वाल्यांच्या वाटेला जावू नका, ते तुमची वाट लावतील !


 


 


 


 

समस्यांचा मुकाबला कसा करायचा ?

आधुनिक व्यवस्थापन तंत्रावर कार्यशाळा भरलेली होती. विषय होता समस्यांचा मुकाबला कसा करायचा आणि तो सुद्धा ताण न येता. कार्यशाळा घेणार्या अध्यापकाने हातात पाण्याने भरलेला एक पेला घेतला व वर्गाला उपस्थित सगळ्यांना प्रश्न विचारला की "या पेल्याचे वजन किती असेल " त्यातुन सुरू झालेली प्रश्नोत्तरे ----

50 ग्रॅम !

100 नाहीतर 125 ग्रॅम !

जो तो आपापल्या अंदाजाप्रमाणे उत्तर देवू लागला.

खरे तर मला सुद्धा मोजल्याशिवाय याचे वजन किती ते सांगता येणार नाही, पण ते एवढे महत्वाचे नाही, खरा प्रश्न हा आहे की जर हा पाण्याने भरलेला पेला मी काही मिनिटे असाच हातात धरून ठेवला तर काय होईल ?

काहीही होणार नाही !

ठीक आहे, जर मी हा पेला तासभर असाच धरून ठेवला तर काय होईल ?

हात दुखायला लागेल !

बरोबर आहे ! आता सांगा , जर हाच पेला जर मी दिवसभर हातात धरून ठेवला तर काय होईल ?

तुमच्या हाताला मुंग्या येतील, बधीर होईल तो आणि कदाचित तो लुळा पडून दवाखान्यात सुद्धा भरती व्हावे लागेल !

या उत्तराने वर्गात हास्याची एक लहर उसळली !

छान ! पण मला सांगा, हे सगळे होताना पेल्याच्या वजनात काही फरक पडला का ?

नाही !

मग हात दुखायचे, मुंग्या यायचे व लुळा पडायचे कारण तरी काय ?

वर्गात आता चांगलाच गोंधळ उडाला ! जो तो विचारात पडला.

आता या समस्येतुन मला कसा मार्ग काढावा लागेल ?

अहो तो पेला खाली ठेवायचा !


 

अगदी बरोबर ! आपल्याला जीवनात भेडसावणार्या समस्या या अशाच असतात. या समस्यांवर डोके काही मिनिटे विचार करू शकते, तासभर जर तुम्ही त्यावर विचार करीत बसाल तर तुमचे डोके दुखू लागेल आणि दिवसभर डोक्यात तेच भरून ठेवल्यास तुमच्या डोक्याचा पार भुगा होवून जाईल !

यातुन साध्य काहीही होणार नाही. समस्यांना तोंड तर दिलेच पाहिजे पण त्याहून महत्वाचे आहे ते दिवस संपल्यावर झोपी जाण्यापुर्वी त्या डोक्यातुन काढून बाजूला ठेवणे ! अशाने तुम्ही ताणमुक्त व्हाल, झोप छान लागेल, सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटेल, उत्साहाने आणि नव्या उमेदीने तुम्ही समस्यांचा सामना करू शकाल !


 

काय ? काही डोस्क्यात प्रकाश पडला का ? मग तो पेला कशाला अजून हातात धरून ठेवलाय ?!!!!!!!


 

ठेवा तो पेला खाली !!!!


 


 

बुधवार, २३ मार्च, २०११

जरा हटके !

नव्या भरतीतला ’अ’ नावाचा कर्मचारी व्यवस्थापकाकडे “आजचे काम काय ?” ते विचारायला गेला. व्यवस्थापकाने त्याला नदी पार करून जायचे काम दिले. ’अ’ ने ते काम मोठ्या उत्साहाने केले. काम झाल्यावर व्यवस्थापकाने त्याला “ठीक” असा शेरा दिला.

व्यवस्थापकाने ’ब’ ला पण तेच काम दिले पण नदी पार करतानाच त्याने नदीत गटांगळ्या खाणार्या आपल्या एका सहकार्याला सुद्धा वाचविले. त्याला “बरा” असा शेरा मिळाला.

काही दिवसाने “क” हा नवीन कर्मचारी कामावर रुजू झाला, त्याने सुद्धा व्यवस्थापकाला काम काय आहे ते विचारले. त्याला पण नदी पार करायची कामगिरी मिळाली. “क” ने आधीच्या दोघांनी ते काम कसे केले ते अभ्यासले. त्या दोघांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अनुभवाचे बोल त्याने ऐकले. कामातले धोके त्याला कळले. सर्व माहिती घेवून त्याने एक कृती योजना बनविली व स्वत: त्याप्रमाणे नदी पार करून निर्धोक, कमी वेळेत नदी पार करून देणारी योजना त्याने कंपनीला सादर केली. व्यवस्थापकाने त्याला “चांगला” असा शेरा दिला.

मग आला “ड” कर्मचारी. त्याने आधी काय घडले त्याचा आढावा घेतला. “क” ने केलेले गाइड सुद्धा त्याने अभ्यासले. त्याला कळले की नदी पार करण्यासाठी पोहत जायची गरजच काय ? त्यात जोखीम आहे शिवाय वेळ सुद्धा वाया जातो. त्या पेक्षा या नदीवर एक पुल बांधला तर ? नुसती कल्पना करून तो थांबला नाही, स्वत: आराखडा बनवून त्याने अल्प काळात इतरांच्या मदतीने त्या पुलाची उभारणी सुद्धा केली. व्यवस्थापकाला तो एवढेच म्हणाला की हे काम आता परत कोणाला तुम्हाला द्यावेच लागणार नाही ! अर्थात त्याला व्यवस्थापकाने शेरा दिला “उत्तम” !

अ,ब , क व ड यांच्या कामाचे मूल्यमापन कसे करता येईल ? आपण बहुतेकदा दिलेले काम करताना चाकोरी बाहेरचे काही करून बघतच नाही. पाट्या टाकायचे काम वर्षानुवर्षे करून आपल्याला समाधान मिळते का ? आपण मोठी जबाबदारी निभावल्याचा आव आणतो पण माझ्या कामाची हवी तेवढी कदर झाली नाही असे सुद्धा म्हणतो.

ब ने दूसर्या बुडणार्याला वाचविले याने त्याचे कौशल्य अर्थात पणाला लागले. त्याचे काम अ पेक्षा नक्कीच उजवे होते.

क ने त्याच्याही पुढे जावून डाटा बँक बनविली. अनेकदा पुर्वतिहास न तपासताच आपण एखादे काम करतो. दूसर्याच्या चूका लक्षात घेवून आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे काम करता येते. हे सर्व करून पुढच्यांसाठी त्याची मार्गदर्शिका बनविणे हे काम नक्कीच बहुमूल्य आहे. आधीची माहिती संकलित करून ती चांगल्या प्रकारे वापरणे हे खरेच मोठे काम होते ! त्याने नदी पार करण्यातली जोखीम कमी झाली होती वर शिवाय वेळही वाचला होता. नव्याने येणार्या कामगारांसाठी छान वस्तूपाठच घालून दिला गेला. Learn to teach and teach to learn !

ड ने मात्र चाकोरीबाहेरचा विचार केला. त्याने नदी पोहून पार करणेच कालबाह्य करून टाकले ! म्हणूनच तो उत्तम ठरला.

ब, क, ड यांनी आपल्या कामाने संघभावनेचे महत्व दाखविलेच पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या कामात “पुढाकार” घेतला !

रविवार, १६ जानेवारी, २०११

दूसर्याच्या डोळ्यातले कूसळ दिसते पण --- !

एका प्रख्यात चित्रकाराच्या शिष्याची ही गोष्ट आहे. चित्रकलेच्या प्रांतात काहीतरी वेगळे करून दाखवायचे अशी आस या शिष्याने बाळगली होती. आपल्या कुंचल्याची करामत लोकांसमोर ठेवून स्वत:चे कौशल्य त्याला अजमावयाचे होते. 3 दिवस अहोरात्र मेहनत करून त्याने एक अतिभव्य कलाकृती साकार केली. निहायत सुंदर असे ते निसर्गचित्र होते. या चित्रकृतीवर त्याला थेट लोकांच्या प्रतिक्रीया हव्या होत्या. त्यासाठी त्याने ते चित्र एका चौकात मांडले. सोबत त्याने एका फलकावर लोकांना आवाहन केले की “मी दिवसरात्र खपून जी चित्रकृती साकार केली आहे त्यावर मला तुमचे प्रामाणिक मत हवे आहे. माझा हा पहिलाच प्रयत्न असल्याने यात काही चूका झाल्या असण्याची शक्यता आहेच. जिकडे तुम्हाला काही चूकले असे वाटत असेल तिकडे तुम्ही एक फुली मारून ठेवा.”

संध्याकाळी लोकांचा प्रतिसाद बघायला तो चौकात आला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. लोकांनी सगळ्या चित्रावर फुल्या मारून ठेवल्या होत्याच शिवाय अनेक कुचकट शेरेही लिहीले होते.

दु:खातिरेकाने कोलमडून तो आपल्या गुरूकडे आला व धाय मोकलून रडू लागला.रडत रडतच त्याने आपल्या चित्रावर कशा सर्वत्र फुल्या मारल्या गेल्या आहेत व शेरे लिहीले आहेत ते सगळे गुरूला सांगितले.पुढे तर, आपले सगळे शिक्षण वाया गेलेले आहे व कलाकार म्हणून आपली लायकी शून्य आहे. लोकांनी त्याची कलाकृती पार झिडकारली आहे. त्यामुळे त्याला मेल्याहून मेल्यासारखे वाटत आहे असेही तो म्हणू लागला.

त्याच्या गुरूने त्याला हसत हसत सूचवले की मला तर तुझी कलाकृती महान व निर्दोष वाटते, लोक काय म्हणतात याकडे तू लक्ष देवू नकोस. पण शिष्याला काही ते पटले नाही. उगीच तुम्ही मला खोटी आशा दाखवू नका, माझा स्वत:वरचा विश्वास उडाला आहे. कलाकार म्हणून मी नापास झालो आहे असे तो म्हणाला. यावर गुरू म्हणाला की मी सांगतो तसे अधिक प्रश्न न विचारता कर. नाराजीनेच त्याने गुरूने सांगितल्याप्रमाणे दोन रात्र खपून पहिल्या चित्राचीच नक्कल साकारली. गुरूने ते चित्र घेतले व त्याला घेवून त्याच चौकात आला. यावेळी फलकावर गुरूनेच लिहून ठेवले की “लोक हो, माझी उत्कृष्ट अशी चित्रकृती मी सादर करीत आहे. या क्षेत्रात मी नवखा असल्याने मला तुमच्या बहुमूल्य मार्गदर्शनाची गरज आहे. इथेच मी एक रंगेपेटी व कुंचला ठेवला आहे, चित्रात काही चुकले असेल तर या कुंचल्याने तिकडे दुरूस्ती करावी. धन्यवाद !”

संध्याकाळी गुरू-शिष्य जेव्हा त्या चौकात आले तेव्हा शिष्याला नवा धक्का बसला. चित्रावरती कोणी काहीही केलेले नव्हते. पुढचा एक महिना ते चित्र तिकडे ठेवून सुद्धा अगदी कोणीही त्याच्यावर कुंचल्याचा एवढाही फराटा ओढलेला नव्हता !

तात्पर्य काय तर – दूसर्याच्या कामात दोष शोधणे सोपे आहे पण ते दुरूस्त करणे महाकठीण ! तुम्हाला जर खरेच दूसर्याने सुधारावे असे वाटत असेल तर आधी लोकांचे वर्तन, दृष्टीकोन व कौशल्ये कशी सुधारता येतील हे स्वत: समजून घ्या व मगच मदतीचा हात पुढे करा. तसेच दूसर्याच्या टीकेने नाराज होवू नका व त्या आधारे स्वत:चे मूल्यामापन करून खचून जावू नका. “निंदकाचे घर असावे शेजारी” या उक्तीप्रमाणे सकारात्मक , योग्य टीकेचा मात्र स्वत:ला सुधारण्यासाठी उपयोग जरूर करून घ्या.

सोमवार, २० डिसेंबर, २०१०

मूल्य !

तुम्हाला तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठावूक आहे का ?

व्यक्तीमत्व विकासाच्या एका वर्गाची सुरवातच नाट्यमय झाली. भाषण देणार्या त्या प्रसिद्ध वक्त्याने खिषातुन 500 रूपयाची नोट काढून उपस्थित सर्वापुढे फडफडवली व ही नोट कोणाला हवी आहे असे विचारले. अर्थात सगळ्यानीच हात वर केले. मग त्या वक्त्याने ती नोट हातात घेवून पार चुरगळून टाकली व परत तोच प्रश्न विचारला. आताही सगळ्यांचे हात वरच झाले. चेहर्यावर आश्चर्य दाखवित आता त्या वक्त्याने ती नोट बूटाने चूरडली, तिच्यावर उड्या मारल्या. आता त्या नोटेची अवस्था बघवत नव्हती ! “आता तरी ही नोट घेणारे कोणी असेल का ?” या त्याच्या प्रश्नाला सगळ्यांनीच हात उंचावून तयारी दाखविली !

वक्ता हसत हसत सगळ्यांना म्हणाला की तुम्ही आताच एक अतिशय मौल्यवान धडा शिकलात ! 500 ची नोट मी हाताने चुरगळली, बूटाने लाथाडली तरी ती पाचेशेची नोटच राहते, तिचे मूल्य जराही कमी होत नाही. प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा आपल्यावर अनेक संकटे येतात, आपण कोलमडतो, अपयशाचे फटकारे खातो, आपणच घेतलेले अनेक निर्णय आपल्यालाच गोत्यात आणतात, मग आपण स्वत:लाच दोष देतो, आपण बिनकामाचे आहोत, आपली काही किंमतच नाही, लायकी नाही असे आपल्याला वाटते. पण काहीही झाले तरी तुमचे मूल्य केव्हाही कमी झालेले नसते, होणारही नाही हे पक्के लक्षात ठेवा !

तुम्ही खास असामी आहात हे कधीही विसरू नका ! भूतकाळातल्या अपयशाची सावली तुमच्या उज्वल भविष्यावर कधीही पडू देवू नका !

“VALUE HAS A VALUE ONLY IF ITS VALUE IS VALUED”

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

हो, देव आहे !

स्वत:ला नास्तिक, अनीश्वरवादी म्हणवणार्या विज्ञानाच्या प्राध्यापकांचे नवीन विद्यार्थीसाठीचे पहिलेच व्याख्यान असते. प्राध्यापक महाशय देव हा विज्ञानाच्या प्रसाराला कसा मारक ठरत आहे हे ठसवायच्या प्रयत्नात असतात. एका विद्यार्थाला ते उभे रहायची खूण करतात आणि त्या दोघात प्रश्नोत्तरे चालू होतात.

प्राध्यापक – तू देव आहे असे मानतोस का ?
विद्यार्थी – नि:संशय ! देव आहे !
प्राध्यापक – मग देव चांगला असतो का ?
विद्यार्थी – नक्कीच !
प्राध्यापक – देव सर्व शक्तीमान असतो का ?
विद्यार्थी – हो !
प्राध्यापक – माझा भाउ कर्करोगाने मेला, तो बिचारा देवाची प्रार्थना करीत होता. आपण सगळेच आजारी माणूस बरा व्हावा म्हणून काही प्रयत्न करीत असतोच. पण देव मात्र काहीच करीत नाही ! तरी तो चांगला ? काय ?
( यावर विद्यार्थी काहीच बोलत नाही )
प्राध्यापक – अरे तू काहीच का बोलत नाहीस ? परत विचारतो , देव चांगला असतो का ?
विद्यार्थी – होय !
प्राध्यापक – सैतान चांगला असतो का ?
विद्यार्थी – नाही.
प्राध्यापक – मग हा सैतान येतो तरी कोठून ?
विद्यार्थी – देवानेच सैतान सुद्धा जन्माला घातला आहे.
प्राध्यापक – आता कसे अगदी बरोब्बर बोललास ! आता मला सांग की जगात पाप असे काही असते का ?
विद्यार्थी – हो.
प्राध्यापक – पाप सगळीकडे आहे, खरे ना ? आणि या सर्वाचा कर्ता-सवरता देवच आहे नाही का ?
विद्यार्थी – हो.
प्राध्यापक – मग आता सांग की पापाचा बाप कोण ?
( विद्यार्थी निरूत्तर )
प्राध्यापक – जगात आजार असतात का ? व्यभिचार ? द्वेष ? कुरूपता ? या सर्व गोष्टी जगात असतातच ना ? हो की नाही ?
विद्यार्थी – होय सर.
प्राध्यापक – मग हे सगळे कोणी केले ?
( विद्यार्थी निरूत्तर )
प्राध्यापक – विज्ञान सांगते की पंचेद्रीयाद्वारे आपल्याला आजुबाजूच्या गोष्टींची जाणीव होते. आता मला सांग की तू कधी देव बघितला आहेस का ?
विद्यार्थी – नाही सर.
प्राध्यापक – तू देवाचा आवाज तरी ऐकला आहेस का ?
विद्यार्थी – नाही सर.
प्राध्यापक – देव आहे अशी जाणीव तुला कधीतरी झाली आहे का ? त्याची चव म्हणा किंवा गंध किंवा स्पर्श तरी ?
विद्यार्थी – खरे आहे सर, मला अशी काहीही जाणीव झालेली नाही.
प्राध्यापक - तरीही देव आहे असे तुला वाटते ?
विद्यार्थी – हो !
प्राध्यापक – अनुभवजन्य, वस्तुस्थितीजन्य वा प्रत्यक्षप्रमाणाच्या आधारे शास्त्र म्हणते की देव अस्तित्वात नाही. तुला यावर काय म्हणायचे आहे ?
विद्यार्थी – काहीही नाही, पण तरीही देव आहे अशी माझी श्रद्धा आहे.
प्राध्यापक – खरे आहे ! श्रद्धा, विश्वास ! आणि हीच तर शास्त्राच्या मार्गातली धोंड आहे !
विद्यार्थी – सर, उष्णता असे काही असते का ?
प्राध्यापक – हो.
विद्यार्थी – मग थंड असे काही असते का ?
प्राध्यापक – हो.
विद्यार्थी – नाही सर. थंड असे काहीही नसते !
( एवढा वेळ प्राध्यापक प्रश्न विचारीत असतात आणि विद्यार्थी बचावात्मक भूमिकेत असतो ! आता प्रथमच विद्यार्थी प्राध्यापकाच्या प्रतिपादनाला आवाहन देतो ! या नाट्यमय कलाटणीने वर्ग स्तब्ध होतो.)
विद्यार्थी – सर, तुमच्या शास्त्रात भरपूर उष्णता आहे, अती उष्णता सुद्धा आहे, अगदी प्रचंड उष्णता सुद्धा आहे. तशीच कमी उष्णता व उष्णतेचा अभाव सुद्धा आहे.
पण थंड असे काही नाही. आपण उणे 458 एवढी उष्णता मोजू शकतो, या पुढे मोजू शकत नाही. पण थंड असे मात्र काहीही नाही. उष्णतेच्या अभावाला आपण ढोबळपणे थंड असे म्हणतो.थंड असे काही आपण मोजू शकत नाही. उष्णता म्हणजेच उर्जा. थंड म्हणजे उष्णतेच्या विरूद्ध स्थिती नव्हे, तर उष्णतेचा अभाव.
(आता वर्गात टाचणी पडेल तरी आवाज घुमेल एवढी शांतता.)
प्राध्यापक – मान्य. मग याच मताने मग अंधार नसेल तर रात्र तरी कशी असेल ?
विद्यार्थी – सर, तुम्ही परत चूकता आहात. अंधार म्हणजे कशाचा तरी अभावच ! जसे कमी प्रकाश, साधारण प्रकाश , प्रखर प्रकाश, विजेचा प्रकाश – प्रकाश नाही अशी सतत स्थिती असल्यास तुम्ही तिला अंधार आहे असे म्हणता ! हो ना ? तेव्हा प्रत्यक्षात काळोख असे काही नाहीच. तसे काही खरेच असते तर अंधार तुम्हाला अधिक गहीरा करता आला असता. आला असता ना करता ?
प्राध्यापक – तुला नक्की म्हणायचे तरी काय आहे ?
विद्यार्थी – मला म्हणायचे आहे की तुमचे पदार्थ विज्ञानाचे सिद्धांत हेच एक थोतांड आहे !
प्राध्यापक – थोतांड ? ते कसे काय बुवा ?
विद्यार्थी – तुम्ही द्वैतवाद हा सिद्धांत मानता. तुमचे असे म्हणणे आहे की जीवन आहे तसाच मृत्यूही आहे. देव चांगला असेल तर वाईटही असतोच. तुम्ही देव ही कल्पना वस्तूप्रमाणे मोजू पाहता. सर, शास्त्राला अजून विचार म्हणजे काय ते ही सांगता आलेले नाही. तुम्ही शास्त्रात विद्युत आणि चुंबकिय शक्तींचा वापर करता पण ती तरी कोणी कधी बघितली आहे ? त्याचे तरी तुम्हाला कोठे धड आकलन झाले आहे ? तुम्ही जन्म आणि मरण एकमेकांच्या विरूद्ध समजता तेव्हा तुम्ही मरणाचा वेगळा पुरावा देवू शकत नाही या सत्याकडे डोळेझाक करता ! मरण म्हणजे जगण्याच्या विरूद्ध स्थिती नाही तर जिवंतपणाचा अभाव म्हणजे मरण !
सर, आता मला जरा सांगा की तुम्ही विद्यार्थांना डार्विनचा उत्क्रांदीवाद, माकडापासून माणूस झाला, असे शिकविता ना ?
प्राध्यापक – तुला जर नैसर्गिक उत्क्रांतीवाद असे म्हणायचे असेल तर होच मुळी , मी हेच शिकवितो.
विद्यार्थी – मग ही जी काही उत्क्रांतीवादाची प्रक्रीया, माकडाचे माणूस होणे, तुम्ही कधी आपल्या डोळ्याने बघितली आहे का ?
(प्राध्यापक नुसतेच हसून मानेने नकार देतात, त्यांना आता हा वाद कोठे जाणार हे लक्षात येते )
विद्यार्थी – उत्क्रांतीवादाची प्रक्रीया कोणी बघितली नाही, यात सातत्य आहे असेही कोणी सिद्ध करू शकत नाही तर मग सर तुम्ही तुमचे मत मुलांवर लादत आहात असे म्हणायचे का ? मग तुम्ही शास्त्रज्ञ आहात की धर्मगुरू ?
(वर्गात एकच खळबळ माजते )
विद्यार्थी – या वर्गातल्या कोणीतरी प्राध्यापकांचा मेंदू बघितला आहे का ?
( सगळा वर्ग हास्य कल्लोळात बुडून जातो )
विद्यार्थी – असा कोणीतरी आहे का जी ज्याने यांचा मेंदू ऐकला, अनुभवला, त्याला स्पर्श केला, त्याचा गंध घेतला ? कोणीही नाही. मग अनुभवजन्य, वस्तुस्थितीजन्य वा प्रत्यक्षप्रमाणाच्या आधारे शास्त्र म्हणते की तुम्हाला मेंदूच नाही ! सर, तुमच्या विषयी पुर्ण आदर ठेवून विचारतो की मग तुमच्या शिकविण्यावर आम्ही विश्वास का ठेवायचा ?
( वर्ग एकदम शांत. प्राध्यापक त्या विद्यार्थाकडे एकटक पाहत आहे, त्यांचा चेहरा भंजाळलेला. )
प्राध्यापक – मला वाटते की या विश्वासाच्या गोष्टी आहेत.
विद्यार्थी – अगदी बरोबर सर – विश्वास हाच देव व माणूस यातला दुवा आहे. विश्वासावरच जग चालले आहे, हा विश्वासच चराचरांना प्रेरणा देतो, जीवन देतो !

(टीप – हा इंग्रजी संवाद कोणीतरी खूप वर्षापुर्वी मला फॉरवर्ड केला होता, पण काही महीन्यापुर्वी मात्र आलेल्या इमेलमध्ये हाच संवाद प्रत्यक्ष वर्गात घडला असल्याची व तो विद्यार्थी दूसरा तिसरा कोणी नसून एपीजे अब्दूल कलाम आझाद असल्याची पुस्ती जोडली आहे. माझ्या माहीतीप्रमाणे हे खरे नसावे. कोणी यावर अधिक प्रकाश टाकू शकेल का ? )

जेते आणि पराभूत – मनोवृत्तीतला नेमका फरक !

1. विजेते उत्तरावर लक्ष केंदीत करतात तर पराभूत समस्येवर !
2. विजेते दोष स्वीकारतात तर पराभूत झालेले दोषारोप करत सूटतात !
3. विजेत्यांना संकट हीच संधी वाटते तर पराभूत संकटांची रडकथा सांगत बसतात !
4. जेत्यांना भविष्यात जगायला व भूतकाळातून शिकायला आवडते तर हरलेले भूतकाळाच्याच आठवणीत रमलेले असतात !
5. जेते वचनाला जागतात, पक्के असतात तर पराभूत बोल-बचन !
6. जेते असाध्य ते साध्य करायचा प्रयास करीत असतात तर पराभूत कारणे शोधत बसतात !
7. जेते नेहमीच व्यक्तीमत्व विकासाला प्राधान्य देतात तर पराभूतांना त्याला महत्व द्यावे असे वाटतच नाही !
8. जेते संकटाला शिंगावर घेतात व भिरकावून देतात पराभूत मात्र संकटाच्या चाहुलीनेच अर्धमेले होतात !
9. जेत्यांच्या आकांशापुढे गगन ठेंगणे असते, पराभूत मात्र डबक्यातच सुखी असतात !
10. जेते सतत काही सकारात्मक करण्यात मग्न असतात तर पराभूत कृतीशून्य असतात !
11. जेते अपयशसुद्धा पचवतात, त्यातुन शिकतात, पराभूत मात्र अपयशी होण्याचा भयगंड सतत बाळगून असतात !
12. ध्येय साध्य करण्यासाठी जेते अनेक युक्त्या-प्रयुक्त्या योजतात तर पराभूत मात्र घसीटे-पसीटे मार्ग चोखाळून वेगळ्या परीणामाची अजब अपेक्षा बाळगतात !
13. जेते आपले उद्दीष्टे ठरवितात , पराभूतांपुढे कसले उद्दीष्टच नसते !
14. जेते नियोजन करतात तर पराभूत नियोजन शून्य असतात !
15. जेते म्हणतात की शिकणे ही कधीही न संपणारी प्रोसेस आहे तर पराभूत मात्र अर्धवट ज्ञानातच धन्यता मानतात !
16. जेते नम्र असतात तर पराभूतांना अहंगंड असतो !
17. जेते रोजच्या रोज आपले काम अजून कुशलतापुर्वक करायला बघतात तर पराभूत अल्प संतूष्ट असतात !
18. जेते कष्टाळू असतात तर पराभूत कष्ट टाळू !
19. जेते एकदा एखादी जबाबदारी घेतेली की त्यात तन मन धन झोकून देतात तर पराभूत मात्र धरसोड वृत्तीचे असतात !
20. जेते सातत्याने व नैतिकता पाळून आपले ध्येय साध्य करतात तर पराभूत पहिल्या अडथळ्यालाच काढता पाय घेतात !
21. जेत्यांना वेळेचे योग्य नियोजन जमते व आपल्या धेयपुर्तीसाठी ते वेळ देऊ शकतात, पराभूतांना वेळेचे नियोजन जमत नाही व नको त्या गोष्टीत ते वेळ वाया घालवित असतात.

22. जेते जागेपणी स्वप्ने बघतात तर पराभूतांना मात्र स्वप्नातच जगायला आवडते !
23. जेते शक्यतांचा विचार करतात तर पराभूत अशक्य काय ते बघून काम टाळतात !
24. जेते नि:शंक असतात तर पराभूत शंकासूर !
25. जेते आपले भाग्य विधाते असतात तर पराभूत भाग्यवश !
26. जेते आपल्याला जेवढे मिळते त्याहुन जास्त देतात, पराभूत मात्र सतत आशाळभूत असतात !
27. पब्लिक जर योग्य मार्गाने जात नसेल तर जेते आपला वेगळा मार्ग निवडतात, पराभूत समूहाबरोबर फरफटले जातात !
28. जेते विचार करून नेतृत्व स्वीकारतात तर पराभूत त्या पेक्षा गुमामगिरी पत्करतात !
29. जेते उत्तम श्रोते असतात, पराभूत दूसर्याला बोलूच देत नाहीत !
30. एकच काम अनेक प्रकारे करायचे कसे हे जेत्यांना माहीत असते तर पराभूत धोपट मार्गाला सोडत नाहीत !
31. विविध प्रकारे आपले ज्ञान जेते अद्ययावत ठेवत असतात त्या करीता पैसे गुंतवितात, पराभूतांना मात्र हा खर्च उधळपट्टी वाटते व छानछोकीच्या वस्तूंवर पैसा उधळून ते खोटी प्रतिष्ठा मिळवू पाहतात !
32. जेते दूसर्यांना जिंकायला मदतीचा हात पुढे करतात, पराभूताला स्वार्थापुढे दूसरा कोणी दिसतच नाही !
33. जेते समविचारी माणसांना मित्र बनवून समूहाचा विकास साधतात तर पराभूत मात्र आपल्या सारख्याच लोकांचा कंपू बनवून एकमेकांच्या पायात पाय घालत राहतात !

नात्यांचा गुंता – अमेरिकन इश्टायल !

एक भारतीय तरूण संगणक अभियंता एका बारमध्ये मद्याचे पेल्यावर पेले रिचवत असतो. एक अमेरिकन त्याचे पिणे बघून काळजीत पडतो. अर्थात तो सुद्धा लास झालेलाच असतो. भारतीय तरूणाला तो त्याचा गम आपल्याशी बोलून हलका करायला सांगतो. बांध फूटल्यासारखा भारतीय तरूण आपली ष्टोरी त्याला सांगतो. त्याच्या आई-वडीलांनी भारतात त्याचे लग्न एका सो कॉल्ड खानदानी मुलीशी ठरविलेले असते. अर्थात यात त्या तरूणाची संमती घ्यायचा प्रश्न येतोच कोठे ? त्यांनी परस्पर मुहुर्त काढून त्याला थेट लग्नालाच बोलाविलेले असते. त्याने आपल्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करणार असे सांगताच मोठा ड्रामा होतो, आम्ही ठरविलेल्या मुलीशी लग्न न केल्यास खानदानची इज्जत जाइल व मग आमची अर्थीच उचलायला तुला यावे लागेल अशी फिल्मी डायलॉगबाजी सुद्धा होते. ज्या मुलीला कधी बघितले सुद्धा नाही त्या मुलीशी लग्न करायला भारतीय तरूण अजिबात तयार नसतो पण आई-वडीलांच्या विरोधात जायची धमक तरी त्याच्यात कोठे असते ! भारतीय विवाह पद्धती कशी व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करते हे तो त्या अमेरिकेनला अगदी पोट तिडीकीने सांगत असतो. अमेरिकेतले मोकळे ढाकळे वातावरण , प्रेमात कोणाचीही आडकाठी नसणे, डेटींग, झट मंगनी, पट शादी , तितक्याच झटकन घटस्फोट याचे तो अगदी तोंडभरून कौतुक करीत असतो. प्रेम विवाह हीच विवाहाची आदर्श पद्धत आहे हे तो अगदी ठासून सांगतो.


तुला आमची संस्कृती एवढी आवडते ? अमेरिकन त्याला विचारतो. आता अमेरिकन तरूण त्याला आपली ष्टोरी सांगू लागतो. त्याने एका प्रौढ विधवेबरोबर 3 वर्षे संबंध ठेवून, अगदी आपण मेड फॉर इच अदर असल्याची खात्री पटल्यावर लग्न केलेले असते. त्याला घरचा विरोध बिरोध काही होत नाही हे कळल्यावर भारतीय तरूण परत अमेरिकन संस्कृतीचा उदो उदो करतो ! अमेरिकेन त्याचे बोलणे पुढे चालू करतो. काही वर्षानी त्याचे वडील त्याच्या सावत्र मुलीच्या अर्थात त्याच्या बायकोच्या मुलीच्या प्रेमात पडतात ! अर्थात यथासांग कोणताही विरोध न होता त्यांचेही लग्न होते ! या नाते संबंधामधून त्याचे वडील त्याचे जावई होतात तर तो वडीलांचा जावई होतो ! आता कायद्याने त्या अमेरिकनाची मुलगी (सावत्र ) त्याची आई होते आणि बायको तर चक्क त्याची आजी ठरते ! पुढे त्याला मुलगा झाल्यावर अजून धमाल होते ! त्याचा मुलगा होतो त्याच्या वडीलांचा भाउ व अर्थात त्याचा काका ! भारतीय तरूणाच्या डोळ्यासमोर या नात्यांच्या गुंत्यामुळे काजवे चमकू लागलेले असतानाच अमेरिकन कथा पुढे सुरू करतो. खरा गुंता होतो त्याच्या वडीलांना मुलगा होतो तेव्हा ! आता वडीलांना झालेला मुलगा त्याचा भाउ सुद्धा असतो तसेच नातु सुद्धा ! म्हणजे तो आता एकाच वेळी आजोबा सुद्धा असतो आणि नातु सुद्धा ! आता बोला ! काय कप्पाळ बोलणार भारतीय तरूण ? तो लगोलग इंड्यात फोन करून लग्नाला तयार असल्याचे कळ्वून टाकतो !

शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

मन:शांती मिळविण्याची 10 तत्वे.

1) दूसर्याच्या भानगडीत नाक खूपसू नका.
अनेकदा आपण दूसर्यांच्या भानगडीत वरचेवर नाक खुपसून स्वत:च गोत्यात येत असतो. अर्थात याला कारण असते “माझा मार्गच बरोबर आहे , माझ्या विचाराची दिशाच योग्य आहे आणि जे याच्याशी सहमत नाहीत त्यांच्या गळी आपले म्हणणे कसेही करून उतरवले पाहिजे” ही विचारसरणी. ही विचारसरणी दूसर्या व्यक्तीचे अस्तित्वच अमान्य करते, तसेच देवाच्या अस्तित्वालाच आव्हान देते. दैवत:च प्रत्येक व्यक्तीची जडणघडण वेगळी आहे, दोन माणसे एकच विचार किंवा कृती करतील असे होत नाही. देवाने जशी बुद्धी दिली आहे तसा प्रत्येकजण विचार करीत असतो. आपले काम ध्यान देवून केले तरी खूप झाले !
2) क्षमा करा आणि विसरून जा !
मन:शांती मिळविण्याचे हे खूप प्रभावी तत्व आहे. आपला अपमान करणार्या वा आपल्याला दुखविणार्या व्यक्तीचा आपण आतून राग राग करीत राहतो, सूडभावना जोपासतो. यातुनच मग निद्रानाश, पोटाचे विकार, अति-रक्तदाब असे विकार जडतात. आपला अपमान तर एकदाच झालेला असतो पण सूडभावना धगधगत मात्र कायम राहते. सूडभावना सोडा. आयुष्यात करायच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत, सूडाने जळत राहून आपलेच आयुष्य का जाळायचे ? झाले गेले गंगेला मिळाले या उक्तीप्रमाणे वागा.
3) स्तुतीपुंजक बनू नका !
जगात सगळीकडे नुसता स्वार्थ भरलेला आहे. तोंडपुंजेपणा करणारे का कमी आहेत ? आज तुमची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणारे संधी मिळताच तुमच्यावर चिखलफेक करतील. तेव्हा मला मोठा म्हणा हा अट्टाहास का ? तुमच्या भोवती दिवे ओवाळणार्यांना जराही महत्व देवू नका. तुमचे काम नीतीची चाड न सोडता आणि प्रामाणिकपणे करीत रहा.

4) द्वेष करू नका !
द्वेष करणार्यांमुळे मनाची शांती कशी बिघडते याचा अनुभव प्रत्येकाने घेतला असेलच. असेही होते की कामात अधिक मेहनत घेवून सुद्धा बढती मात्र भलत्यालाच मिळते. धंद्यात सुद्धा आपला पुरेसा जम बसत नसताना नव्याने शिरकाव केलेला बस्तान बसवितो. असे अनेकदा होतच असते. यासाठी आपण द्वेषभावना जोपासायची का ? नाही. प्रत्येकाच्या कपाळावर सटवाईने जे लिहिले आहे ते होणारच आहे, ज्याला यश मिळाले ते त्याचे विधीलिखीत होते. विधीलिखीत टळू शकत नाही, कोणी ते बदलू शकत नाही किंवा त्यापासून कोणी पळू शकत नाही. तुमच्या नशिबात एखादी गोष्ट नाही त्याला दूसर्याला दोष देण्यात काय हशील ? द्वेष करून काहीही साध्य होणार नाही उलट त्या आगीत तुमच्या मनाची शांतीच राख होवून जाईल.

5) प्रवाहाबरोबर चाला.
तुम्ही एकटे प्रवाहाची दिशा नक्कीच बदलू शकणार नाही. यात बुडायची शक्यताच जास्त. त्यापेक्षा प्रवाहाबरोबर गेल्यास तुम्हाला अकस्मात प्रवाहाबरोबर जुळवून घेता घेताच आगळ्या एकात्मतेची प्रचीती येइल.

6) संकटांचा धैर्याने मुकाबला करा.
प्रत्येक अपयश ही पुढील यशाची पायरी असते. दर दिवशी आपण अनेक अडथळ्यांचा, व्याधींचा, उद्रेकाचा, अपघातांचा सामना करीतच असतो. यावर जेव्हा काही उपाय सापडत नसतो तेव्हा काही वेळ संकटांशी जुळवुळ घ्यायला शिका. या सगळ्यांना खंबीरपणे तोंड द्या. संकटांसमोर शरणागती पत्करून उमेद जगण्याची हरवून बसू नका. स्वत:वर विश्वास ठेवा. धैर्य, आंतरीक शक्ती आणि दांडगी इच्छाशक्तीच तुम्हाला विजयाप्रत नेइल.

7) अंथरूण पांघरून हातपाय पसरा.
ही म्हण खरेतर कायमच लक्षात ठेवायला हवी. आपण आपली क्षमता न ओळखता खोट्या मोठेपणासाठी नको ती जबाबदारी डोक्यावर घेत असतो. याने आपला अहंकार कुरवाळला जातो. आपल्या मर्यादा ओळखायला शिका. नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था का करून घ्यायची ? भौतिकसुखाच्या मागे लागल्यास मन:शांती कधीही मिळणार नाही.भौतिक सुखाच्या मृगजळामागे न धावता तो वेळ प्रार्थनेला द्या, स्वत:च्या आत डोकावून बघा, ध्यान करा. याने तुमचे चित्त टाळ्यावर येइल. निर्मळ मन तुम्हाला अधिक मानसिक समाधान देइल.

8) नित्यनेमाने ध्यानधारणा करा.
ध्यानाने मन शांत होते व अस्वस्थ करणार्या विचारांपासून तुमची सूटका होते. यातुन तुम्ही परमशांती प्राप्त करू शकता.प्रामाणिकपणे रोज अर्धा तास जरी ध्यान केले तरी बाकी साडेतेवीस तास तुमचे मन प्रसन्न राहील. या ना त्या कारणाने ढळणारा मनाचा तोल सावरेल. ध्यानाचा वेळ थोडा थोडा वाढवित नेल्यास अधिक समाधान मिळेल. तुम्हाला असे वाटणे स्वाभाविक आहे की ध्यानधारण करीत बसल्यास बाकीची कामे रेंगाळतील. पण या उलट तुमची कार्यक्षमता वाढून तुमची सर्व कामे अधिक कुशलतेने तुम्ही कमी वेळात करू शकाल.

9) मनाला कोठेतरी गुंतवून ठेवा.
इंग्रजीत “An Empty Mind is Devil’s Workshop” असे म्हणतात. रिकाम्या मनात जगातले सगळे वाईट विचार येतात. मन चिंती ते वैरी न चिंती. काहीतरी सकारात्मक, विधायक कार्य करण्यात मनाला गुंतवून ठेवा.एखादा छंद जोपासा. तुम्हाला आवडणारे काहीतरी करा. पैसा की समाधान यात तुम्हाला काय जास्त प्रिय ते एकदा ठरवा.तुम्ही जोपासलेला छंद किंवा समाजसेवा, देवाधर्माचे काम यातुन तुम्हाला पैसा मिळेलच असे नाही पण भरून पावल्याचे , काही केल्याचे समाधान मात्र नक्कीच मिळेल.अगदी शरीर थकल्याने विश्रांती घेत असाल तेव्हा सुद्धा काही चांगले वाचा नाहीतर नामस्मरण तरी करा.

10) धरसोड वृत्ती सोडा , खंत करू नका.
“करू की नको” असा विचार करीत राहिल्यास कृती काही होणार नाही मात्र दिवस, आठवडे, महिने, वर्ष वाया जाइल व डोक्याला ताप मात्र होइल. नियतीने तुमच्या पुढ्यात काय वाढलेले आहे याचा थांगपत्ता तुम्हाला कधीही लागणार नाही. तेव्हा उगीच घोळ न घालता ज्या वेळी जे करणे योग्य आहे त्या वेळी ते करा. जरी अपयश आले तरी त्यातुनच तुम्हाला मार्ग सापडेल. डोक्याला हात लावून बसाल तर मात्र कार्यनाश होणार. तसेच भूतकाळातली मढी उरकू नका. जे झाले त्याची खंत बाळगू नका. जो हो गया सो हो गया ! तकदीर मे लिखा था वही हुवा ! कोळसा कितीही उगाळला तरी काळाच ! सकारात्मक दृष्टीकोन बाळगा !


Think ++ve !

रविवार, ८ ऑगस्ट, २०१०

बायकांना नक्की हवे तरी काय असते ?

तरूण , तडफदार सत्वशील राजाच्या राज्यावर परचक्र येते. शेजारी असलेला सम्राट दगा-फटका करून त्याला बंदी बनवतो. जेता सम्राट सत्वशीलाला ठारच मारणार असतो पण त्याच्या आदर्शवादाची छाप त्याच्यावर पडतेच ! तो त्याला एक वर्षाच्या आत, एका जटील प्रश्नाचे उत्तर शोधायला सांगतो व त्या बदल्यात त्याला अभय देवू करतो. अर्थात प्रश्नाचे उत्तर एका वर्षात न देता आल्यास मृत्यूदंड अटळ असतोच ! असतो तरी काय तो जटील प्रश्न ? बायकांना नक्की हवे तरी काय असते ?

भल्याभल्यांना या प्रश्नाचे उत्तर जन्मात सापडले नाही तिकडे तरूण सत्वशील राजा तरी काय करणार असतो ? पण दूसरा काही उपायच नसल्याने तो सम्राटाचा प्रस्ताव मान्य करतो. आपल्या राज्यात परतल्यावर तो भले भले विद्वान आणतो, सगळ्या स्तरातील लोकांना या समस्येचे आकलन करण्याचे आवाहन करतो, पण कोणालाच समाधानकारक उत्तर देता येत नाही. असेच त्याला कोणीतरी सुचवते की त्याच्याच राज्यात एक चेटकीण आहे व ती या प्रश्नाचे उत्तर चूटकीसरशी देइल – पण – पण मोबदला मात्र ती अवाच्या-सव्वा मागते, कधी कधी तिची मागणी अगदी विक्षिप्तपणाची सुद्धा असते ! आधी राजा या भानगडीत न पडण्याचे ठरवितो पण जेव्हा दिवसा मागुन दिवस जात वर्ष संपण्यास एकच दिवस बाकी राहतो तेव्हा मात्र त्याला नाइलाजाने उत्तरासाठी त्या चेटकीणीकडे जावेच लागते.

चेटकीणीकडे या समस्येचे उत्तर तयारच असते पण त्या पुर्वी राजाकडून तिला एक वचन हवे असते. राजाचा जिवलग मित्र धैर्यशीलाबरोबर तिला लग्न करायचे असते ! स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आपल्या मित्राचे आयुष्य बरबाद करण्याचा प्रस्ताव राजा धूडकावून लावतो पण स्वत: धैर्यशील मात्र “लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा जगो” या उक्तीप्रमाणे स्वत: चेटकीणीकडे जावून तिची अट मान्य असल्याचे सांगतो व उत्तर सांगायची विनंती करतो. चेटकीण सांगते , बायकांना हवे तरी काय असते ते - “तिला तिच्या पद्धतीने स्वत:चे जीवन जगायचे असते”. त्रिकालाबाधित सत्यच चेटकिणीने सांगितलेले असते व सर्वानाच ते मान्य होते, हो, अगदी त्या सम्राटाला सुद्धा व सत्वशील मुक्त होतो !

शब्दाला जागून सत्वशील राजा आपल्या मित्राचे, धैर्यशीलाचे लग्न चेटकीणीबरोबर अगदी थाटामाटात लावून देतो. लग्नाच्या पहिल्याच रात्री धैर्यशील धडधडत्या छातीने शयनगृहात शिरतो, चेटकीणीबरोबर लग्न, किती भयंकर प्रसंग ! पण शयनगृहात शिरताच त्याला आश्चर्याच धक्काच बसतो ! आत साक्षात अप्सरा भासावी अशी तरूणी पहुडलेली असते ! रंभा, मेनका, उर्वशी या तिघींचे एकत्रित सौंदर्य सुद्धा तिच्यापुढे फिकेच भासले असते ! हा प्रकार तरी काय आहे असा प्रश्न स्वाभाविकपणेच त्याला पडतो. यावर चेटकीणीचे उत्तर तयारच असते. “मी चेटकीण आहे हे माहित असूनही तू माझ्याशी लग्नाला तयार झालास म्हणून मी तुझ्यावर खुष आहे ! माझ्या मंत्रशक्तीने मी २४ तासात अर्धा वेळ अप्सरेच्या रूपात असेन व अर्धा वेळ चेटकीणीच्या. आता तू ठरव मी दिवसा वा रात्री तुला कोणत्या रूपात हवी ते ! अप्सरेच्या की चेटकेणीच्या ?” क्षणभर का होईना, धैर्यशील दुविधेत पडतो ! दिवसा , लोकात मिरविताना अप्सरा पण मग रात्रीच्या एकांतात मात्र चेटकीण ? का दिवसा सर्वांसमोर चेटकीणीसोबत रहायचे पण रात्री मात्र अप्सरेबरोबर स्वर्ग सुखाचे बेधुंद क्षण अनुभवायचे ?

धैर्यशीलाची उत्तर जाणून घेण्यापुर्वी …..

छोटासा ब्रेक –

तुम्ही जर पुरूष असाल तर काय निर्णय घ्याल ?

बायकांना सवाल , त्यांनी निवडलेल्या पुरूषाने कोणता निर्णय घेतलेला त्यांना आवडेल ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
काय ठरले ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
धैर्यशील खरेच हुषार होता. चेटकीणीने राजाला दिलेले उत्तर त्याच्या डोक्यात होतेच. त्याचे या प्रश्नाचे उत्तर तिच्यावरच सोडले. साहजिक आहे, स्त्रीला तिचे जीवन तिच्या मताने जगायची मोकळीक तर हवी असते ! प्रसन्न होवून चेटकीणीने आपण २४ तास अप्सरेच्या रूपात राहू असे जाहीर केले !

तात्पर्य काय तर ----
१) स्त्री कितीही सुंदर असेना का ? तिच्यात एक चेटकीण दडलेली असते !
२) तुम्ही जर तिला तिच्या मताने वागायची मुभा दिली नाहीत तर सगळा इस्कोट होणार.

तेव्हा एक तर “तिच्या मताने जगा” नाही तर “जगणे हराम” करून घ्या !

(मला आलेल्या इमेलचा अनुवाद )

बायकांची मर्जी कशी राखावी ?

अगदी सोप्पे आहे ! मित्रांनो, तुम्ही फक्त एवढेच करा,
१) तिचा मित्र बना
२) तिचा सहकारी बना
३) प्रेमळ बना.
४) तिचा भाउ बना.
५) तिचे पालक बना.
६) तिचे शिक्षक बना.
७) चांगला स्वयंपाक करायला शिका.
८) वायरींगचे जुजबी काम करायला शिका.
९) थोडेफार सुतारकाम सुद्धा जमले पाहिजे !
१०) थोडेफार प्लंबरचे काम सुद्धा जमले पाहिजे !
११) यंत्रज्ञ असाल तर बरेच आहे.
१२) सजावटकार व्हा.
१३) स्टायलिस्ट बना.
१४) स्रीरोग तज्ञ बना.
१५) मानसशास्त्रज्ञ व्हा
१६) उंदीर, झुरळ, पाली आदींचा नायनाट करता यायला हवा.
१७) मानसोपचार तज्ञ व्हा.
१८) दु:ख निवारक व्हा.
१९) उत्तम श्रोता बना.
२०) कुशल संघटक व्हा.
२१) चांगला बाप बना.
२२) स्वच्छता अंगी बाणवा.
२३) आपुलकीने वागा.
२४) शरीर दणकट हवे.
२५) उबदारपणा हवा.
२६) लक्ष वेधून घेता आले पाहिजे.
२७) शूर बना.
२८) बुद्धीमान बना.
२९) विनोदाचे इंद्रीय हवे.
३०) सर्जनशीलता हवी.
३१) हळूवारपणा हवा.
३२) कणखरपणा आवश्यक.
३३) समजूतदारपणा हवाच.
३४) क्षमाशील असा.
३५) हुशारी हवी.
३६) महत्वाकांक्षा हवी.
३७) काम करण्याची पात्रता हवी.
३८) धैर्यवान बना.
३९) निर्धार हवा.
४०) खरेपणा हवा.
४१) विश्वसनीयता हवी.
४२) भावनाप्रधान

आणि हे सगळे असलात तरी या गोष्टी विसरून चालणार नाही -
४३) तिचे कायम कौतुक करायला हवे.
४४) खरेदीत रस दाखविला पाहिजे.
४५) प्रामाणिकपणा हवा.
४६) खूप खूप पैसा हवा.
४७) तिला टेन्शन देवू नका.
४८) ( ती असताना तरी ) दूसर्या बायकांकडे बघू नका.

त्या बरोबरच हे सुद्धा मस्ट –
४९) तिची काळजी घ्या अर्थात तिच्याकडून अशी कोणतीही अपेक्षा न बाळगता.
५०) तिला भरपूर वेळ द्या – खासकरून तिच्या नटण्या-थटण्यासाठी.
५१) तिला पुर्ण मोकळीक द्या, ती कोठे जाते याची काळजी न करता.
….. आणि हो, हे सुद्धा अजिबात विसरू नका –
५२) वाढदिवस
५३) वार्षिक कार्यक्रम
५४) तिने आखलेले प्लान
फक्त ५४ बाबी लक्षात ठेवायच्या ! किती सोप्पे !!

या उलट पुरूषाला सुखी ठेवण्यासाठी बायकांना काय काय दिव्य करावे लागते ! बघाच –
१) शांतता राखा.
२) त्याच्या जीभेचे चोचले पुरवा.
३) रिमोट कंट्रोल त्याच्या जवळच राहू दे !

म्हणतात ना – कठीण कठीण कठीण किती पुरूष ह्रुदय बाई !
(मला आलेल्या एका इंग्रजी इमेलचा स्वैर अनुवाद )