एका शेतकर्याला जातिवंत घोडे पदरी ठेवायचा शौक असतो. त्याच्या पागेत एक सोडून सगळ्या जातीचे घोडे असतात. त्याला कोणीतरी सांगते की तू ज्या जातीचा घोडा शोधतो आहेस तसा तुझ्या शेजार्याचा पागेत आहे. झाले ! हा शेतकरी आपल्या शेजार्याच्या पाठी सतत "तो घोडा मला दे असे "तुमणे लावतो ! त्याच्या रोजच्या भुणभुणीला वैतागून शेजारी तो घोडा त्याला एकदाचा विकून टाकतो. एका महिन्यानंतर तो घोडा आजारी पडतो. पशूवैद्याला पाचारण केले जाते. पशूवैद्य निदान करतो की घोड्याला विषाणू संसर्ग झालेला आहे. तीने दिवसाचे औषध मी देतो त्याने गुण आला तर ठीक नाहीतर सरकारी नियमाप्रमाणे या घोड्याला ठार मारावे लागेल. हे संभाषण एक डूक्कर ऐकत असतो.
दूसर्या दिवशी घोड्याला औषधाचा पहिला डोस देवून सगळॆ निघून गेल्यावर डूक्कर त्याच्या जवळ जावून म्हणतो – मित्रा जरा धीराने घे, उठून उभा रहा नाहीतर तुला हे लोक कायमचे झोपवतील !
दूसर्या दिवसाचा डोस देवून झाल्यावर सुद्धा घोडयाची तबियत नरमच असते. परत डूक्कर त्याच्या जवळ जावून त्याला चियर अप करते ! लेका झटकून टाक सगळी मरगळ, मन खंबीर कर, माझ्या मदतीने निदान उठून तरी बस, राजा प्रयत्न कर, नाहीतर तुझा खेळ संपलाच म्हणून समज --- शाब्बास, आता कसे जमले ? आशा सोडू नकोस मित्रा, माझी तर खात्रीच पटली आहे, तू खडखडीत बरा होणार !
तिसर्या दिवशी शेवटचा डोस देवून पशूवैद्य घोड्याला तपासतो व सांगतो अपेक्षित सुधारणा दिसत नाही, हा विषाणू संसर्गजन्य आहे, तेव्हा इतर घोड्यांना याची बाधा होण्याआधी या घोड्याला ठार मारावेच लागेल. मी संध्याकाळी पुन्हा येतो. तेव्हा काय तो अंतिम निर्णय करू.
आता मात्र डूक्कराला रडूच कोसळते. ते त्या घोड्याला म्हणते की बाबा रे, वेळ थोडा उरला आहे, उरले सुरले सगळे बळ एकत्र कर, तुला आता ही शेवटेची संधी आहे, ती तुला साधलीच पाहिजे, यू कॅन मॅन, यू कॅन ! मी तुला हात देवून उभे करतो, मी एक, दोन, तीन असे म्हटले की तू थेट पळायला लागायचे, काय ? चियर अप ! ये तुम्हारे इम्तिहान की घडी है ! नाउ और नेवर ! चल , एक, दोन ---- तीन !
आता एवढे टॉनिक मिळाल्यावर घोडा का नाही धावणार ! घोडा प्रयत्नपुर्वक आपल्या पायावर आधी उभा राहतो व डूक्कराच्या सततच्या प्रोत्साहनाने आत्मविश्वास परत मिळाल्यावर तर कानात वारे शिरल्यासारखा चौफेर उधळतो ! घोड्याला धावताना त्याचा मालक बघतो व त्याच्या क्षणभर आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही ! खात्री पटल्यावर मात्र तो आनंदाने वेडा होतो पार ! "वाह, बहोत खूब, और तेज, और तेज, फास्ट --------, या वेळची डर्बी तूच मला जिंकून देणार !" असे ओरडत तो सगळ्या मित्रांना जमवून घोडा खडखडीत बरा होवून धावू लागल्याची बातमी देतो व लगेच एका जंगी पार्टीचे ऐलान करतो ! सगळ्यांना माझ्याकडून डूक्कराचे जेवण ! कापा त्या डूक्कराची मान !
काय आकलन झाले का ? अहो, आपल्या कामावर तरी काय वेगळे घडत असते ? कोणाच्या प्रयत्नामुळे यश मिळाले किंवा एखादी योजना यशस्वी होण्यासाठी नेमके कोणाचे योगदान कारणीभूत होते, यशाचा धनी नक्की कोण हे नक्की कोणालाच माहीत नसते ! फळाची अपेक्षा न धरता कर्म करत राहणे हे गीतेत सांगितले आहे, तेच शिकायची गरज आहे. तुमच्या कामात व्यावसायिक सफाई नाही असे खुषाल कोणाला म्हणू दे, लक्षात ठेवा अडाणी माणसांनी नोवाची बोट बांधली होती व नामचीन अभियंत्यांनी टायटॅनिक !
यशस्वी होण्यापेक्षा गुणावान होणे केव्हाही चांगले !
आणि हो, जर संधी मिळाली तर त्या बिचार्या डूक्कराच्या बाजूने सुद्धा भांडा ! निदान चार अश्रू तरी ढाळा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा