मंगळवार, ५ जुलै, २०११

मरणाच्या ’शब्द’कळा !

एखाद्या भाषेत एखाद्या शब्दाला समानार्थी किती शब्द आहेत यावरून सुद्धा त्या भाषेची श्रीमंती समजते. मराठी भाषा या बाबतीत सुद्धा खूप श्रीमंत आहे. एखाद्या शब्दाला निदान दोन तरी समानार्थी शब्द नक्कीच असतील. मरण ही प्रत्येकाच्या आयुष्यातली न टळणारी घटना. तिचा थेट उच्चार करायचा नाही असा एक संकेत. म्हणूनच बहुदा मरणासाठी मराठीत खंडीभर शब्द सापडतील. एरवी एखाद्या शब्दाला प्रतिशब्द मिळाला की त्यात कालौघात नवीन भर पडत नाही, पण मरण या बाबतीत फारच सुदैवी म्हणायला हवे. मरण माणसाला अनेक प्रकारे येते व प्रत्येकवेळी त्यासाठी वेगवेगळे शब्द योजले गेले आहेत.

मरण नैसर्गिक, अनैसर्गिक, अकाली, घातपाती जसे जसे असेल तसे तसे त्याचे अचून वर्णन करणारे शब्द आहेत. उदंड आयुष्य जगून एखादा मेल्यास निधन झाले, पिकल्या पाना प्रमाणे गळून पडला, निवर्तला, त्याचे सोने झाले, समाधानाने डोळे मिटले, निजधामाला गेला, कालवश झाला असे म्हटले जाते. मृत व्यक्ती ज्या ज्या धर्माची असेल त्या प्रमाणे देवाघरी, कैसासवासी, वैकुंठवासी पैगंबरवासी , ख्रिस्तवासी, बुद्धवासी, इश्वर-आज्ञा, देवाज्ञा झाली असे म्हटले जाते. मृत देहावर ज्याप्रमाणे अंतिम संस्कार करतात त्याप्रमाणेही मरणाचे वर्णन केले जाते जसे अग्नि दिला, मूठमाती दिली, गंगार्पण केले, सरणावर गेला, दफन झाले.

अकाली किंवा अपघाती मरण आले असेल तर काळाने झडप घातली, घाला घातला, घोट घेतला, आयुष्याची दोरी कापली, डाव अर्ध्यावर सोडून गेला, यमपाश आवळले गेले , यमाचे दूत बोलवायला आले असे म्हटले जाते.

युद्धात मरण आल्यास वीरगति मिळाली, बलिदान केले, धारातीर्थी पडला, धाराशयी होणे, शहिद होणे, असे म्हटले जाते. दुष्ट व्यक्ती मारली गेल्यास कंठस्नान घातले गेले, नरडीचा घोट घेतला, वध केला, खात्मा केला असे म्हटले जाते एरवी तो खून ठरतो.

गुन्हेगार आपापसात लढून मरतात तेव्हा गेम केला, टपकविला, ढगात पाठविला, सुपारी फोडली असे म्हटले जाते. पोलिस गुंडाला मारतात तेव्हा एनकाउंटर केले असे म्हटले जाते.

एखादा स्वत:च मरणाला जवळ करतो तेव्हा आत्महत्या, आत्मघात, समाधि घेणे, प्रायोपवेशन, गळ्यात फास घालून घेणे, मृत्यूला कवटाळणे, खेळ अर्ध्यावर सोडणे असे शब्द योजले जातात.

मेलेला माणूस त्याच्या कर्माप्रमाणे स्वर्गात जातो किंवा नरकात खिचपत पडतो किंवा त्याला मोक्ष-प्राप्ती तरी होते. निजधामाला जाणे, कुडी सोडणे, आत्मा मुक्त होणे, आत्मा पंचतत्वाच विलीन होणे असेही शब्द प्रयोग वापरले जातात.

मरणारा कलाकार असेल तर शेवटची घंटा वाजली, एक्झिट घेतली, मेक‍अप उतरविला , भैरवी सुरू झाली, वीणेची तार तूटली, मैफल अर्ध्यावर सोडून निघून गेला असे म्हटले जाते. खेडाळू असेल तर आयुष्याची इनिंग संपली, धावबाद झाला असे म्हटले जाते, स्वयंचीत झाला, विकेट पडली असा उल्लेख केला जातो.

काही भाग्यवान मरून सुद्धा अमरत्वाला पावतात , त्यांचे देहावसन होते, ते देह ठेवतात किंवा नश्वर शरीराचा त्याग करतात. त्यांच्या अंत्ययात्रेत सुद्धा 'अमर रहे' असा नारा दिला जातो.

काळाबरोबर तसेच आधुनिक जीवनशैलीमुळे बॅटरी संपणे, दिवा विझणे, शेवटच्या प्रवासाला निघणे, तिरडी बांधणे, फोटोला हार पडणे, टॉक-टाइम संपला अशा नव नवीन शब्दांची भर पडतेच आहे.

मरणाचा हा डोस अनेकांना आवडणार नाही तेव्हा आता मीच "लॉग ऑफ" होतो ! 'त्या' अर्थाने नाही हो ! या पोस्टपुरता !!


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: