बंध नसलेले निंबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बंध नसलेले निंबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ४ जून, २००९

इतिहास का शिकायचा ?

इतिहास – साधा सोपा अर्थ “जे घडले ते असे घडले” ! व्यासांच्याच वाक्यात सांगायचे तर महाभारत हा “जय” नावाचा इतिहास आहे ! माझ्या मते तो जगातला पहीला आणि शेवटचा इतिहास आहे बाकी सगळा विपर्यास आहे ! महाभारतात व्यास आपण अनैतिक संबंधातुन जन्मलो हे लपवून ठेवत नाहीत, युधीष्ठीराचे अवगुण सांगताना दुर्योधनाचे सदगुण सुद्धा नमूद करतात ! भीष्म ’अर्थस्य पुरूषो दासा” म्हणत द्रौपदी वस्त्रहरण प्रकरणात हात झटकतात, गीता सांगताना कृष्ण अर्जुनाला गांडू (क्लैब्य) असे म्हणतो ! कोठेही लपवाछपवी नाही, कोणाचे भलते उदात्तीकरण नाही ! याला म्हणतात इतिहास. आता हाच इतिहास झाला आहे !

इतिहासाला विंग्रजीत History म्हणतात, बरोबर आहे his or her story ! जेत्यांचा इतिहास. तर असा हा इतिहास आपल्या माथी अगदी शालेय जीवनापासून मारला जातो. सनसनावल्या लक्षात ठेवताना अनेकांची साले निघतात. इतिहास का शिकायचा तर म्हणे चुकांची पुनरूक्ती हो़उ नये म्हणून ! हेच मुळात साफ़ चूक आहे ! पहील्या महायुद्धा नंतर दूसरे झालेच ना ? युद्धात जिंकणारे मराठे तहात हरतात हा सुद्धा इतिहासच आहे ना ? तसे या वाक्यात मराठे या शब्दा ऐवजी हिंदू, भारत हे शब्द वापरलेत तरी इतिहास बदलणार नाही ! शिवरायांना मोघलांनी जेवढे छळले नाही तेवढे स्वकीयांनी छळले हा सुद्धा इतिहासच ना ? गद्दारी / फ़ितुरी कोणी, कोणाशी आणि केव्हा केली हे इतिहासात शिकून वर्तमानात (वर्तनात सुद्धा !) काही फ़रक पडला का ? सापाला दूध पाजले तरी तो विषारी फ़ुत्कारच सोडणार, हे सुद्धा इतिहासच सांगतो ना ?

बरे जो काही इतिहास म्हणून आहे त्यात तरी एकवाक्यता आहे का ? शिवाजी सेक्युलर होते की हिंदुत्ववादी ? समर्थ रामदास शिवरायांचे गुरू होते की औरंगजेवाचे हेर ? महाराजांनी खानाचा कोथळा काढला की कुरवाळले, पैगंबर पळाला की त्याने यशस्वी माघार घेतली ? संभाजी बदफ़ैली होता की धर्मवीर ? आर्य मुळचे कोणते ? १८५७ चे बंड हे भटा-बामणांचे, गादी टीकवण्यासाठीचे प्रयत्न होते का स्वातंत्र्य-समर ? इतिहास कोणात्याच प्रश्नावर निर्विवाद मत मांडत नाही, मत बनवायचा प्रयत्न मात्र जरूर करतो. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या ! मग परत समाजात दुफ़ळी निर्माण होते, आपलाच इतिहास खरा, जाज्वल्य, त्यांचा विपर्यास, रचलेला , रंजक हे सिद्ध करण्यासाठी नवा रक्तरंजित इतिहास रचला जातो ! इतिहासाबरोबरच भूगोल सुद्धा बदलला जातो. सरकार बदलले की इतिहास सुद्धा बदलतो !

तरीही आपल्याला इतिहास शिकायलाच लागतो, तो तरी कोणाचा ? शिवरायांचा इतिहास वा भारतीय मातीत घडलेला इतिहास चवथीपर्यंतच गुंडाळला जातो व मग जगाचा इतिहास ’पढवला’ जातो ! अमेरीकन यादवी, दोन महायुद्धे – त्यांची कारणे – परीणाम (युद्धाच्या अंतातच युद्धाचे बीज असे ) इंग्रज, फ़ेंच, रशियन राज्यक्रांत्या तर अगदी वांत्या आणतात. कित्येक हजारो वर्षे सहीष्णुता या मातीत रुजलेली आहे, इतिहास शिकवतो की ती फ़्रेंच राज्यक्रांतीची देन आहे ! भारताबाहेरच्या मुलांना असा दूसर्यांचा इतिहास खचितच पढवला जात असेल ! अडकलेली फ़ीत जशी पुन्हा पुन्हा वाजत राहते तसा तोच इतिहास पुन्हा पुन्हा नव्याने जन्म घेतो ! अगदी पहीले पाढे पंचावन्न ! अमेरीका लादेन नावाचा भस्मासुर पोसते आणि इकडे भारतातले राज्यकर्ते मतांच्या राजकारणासाठी जात्यंध हीरवी किड कुरवाळतील, अगदी दूसरी फ़ाळणी इतिहासाजमा होईपर्यंत, मग परत तिसरीचे खोदकाम !

इतिहासापासून कोणीच, कोणताच धडा केव्हाच कसा घेतला नाही हे शिकण्यासाठी मात्र इतिहास जरूर शिका ! इतिहासच साक्षी आहे !

इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेउन ना नाचा,
करा उल्लंघन त्याचे आणिक रचा इतिहास नवा !

’इति’श्री !

शुक्रवार, ४ जुलै, २००८

हा छंद जिवाला लावी पिसे !

हा छंद जिवाला लावी पिसे !
मी नुकताच नोकरीला लागलो होतो. वय १९ ! ती दहावीत ! माझ्या घरासमोरच पादचारी पुल होता आणि त्याच्याच खाली कुंपण तोडून केलेला short-cut. पुलाचा वापर कोणीही करत नसत ! ही मुलगी मात्र ह्ट्कून पुलावरूनच जायची, कदाचित म्हणूनच नजरेत भरली ! दिसायला ही अगदी "graceful" होती. तिने काँलेजात प्रवेश करेपर्यंत नुसते बघणेच चालले होते. जीवश्च-कंठश्च असे आम्ही चार मित्र, समान धागा एकच, कोणालाही मैत्रीण नव्ह्ती ! दिसायली ही बावळेच ! मित्रांकडून 'तिचे' नाव गाव समजले. ती जातवाली नव्ह्तीच तर चक्क मागासवर्गीय होती ! आता मात्र बंडखोर स्वभाव उफाळून आला. या मुली बरोबर निदान ओळख तरी करून घ्यायचीच असा निश्चय केला ! मित्रांची फूस होतीच ! शेवटी एकदा आंबेडकर काँलेज समोरच्या बसस्टाँप वर तिला मैत्री प्रस्ताव सादर करायचा असे ठरले. मित्र समोरच्या बसस्टाँप वर उभे राहून माझे मनोधैर्य वाढवणार होते.


स्टाँप वर तिच्या जवळ उभा राहिलो. बरोबर तिची एक मैत्रिण पण होती. समोर मित्र होतेच ! एक भीती होती, तीची बस पटकन आली असती तर ? बस आली पण गर्दी असल्यामुळे तिने ती सोडून दिली. प्रचंड गर्दी आणि कोलाहलात मी "excuse me" म्हणून पहीला बाँल टाकला. मला तुझ्याशी मैत्री करायचीय असे बोलून एक मोठा श्वास घेतला !तिला आधी आश्चर्य वाटले. मला आपादमस्तक न्हाहाळून तीने माझ्यावर अक्षरश्: प्रश्नांची सरबत्ती सूरू केली ! नाव काय, करतोस काय, राहतोस कुठे -- ? मला अक्षरश्: घाम फूटला ! माझी उत्तरे देताना तत-पप होत होती. ती मात्र आता enjoy करत होती. शेवटी एकदाचे ती गोड हसली व मला आपले नाव सांगितले ! लगेच तिची बस आली, मला ह्ळूच bye करून ती बसमधे चढली ! समोरून मित्र धावतच माझ्याजवळ आले. "साल्या काय फाफलला होतास, तुझ्या कपाळावरचा घाम आम्हाला पण दिसत होता" म्हणाले. मार पडायचीच लक्षणे होती. पण एक मोठा टप्पा पार पडला होता !
माझ्या कामाच्या वेळा आठवड्याला बदलायच्या, दिवस पाळी सकाळी ८ त्ते ५, दूसरी पाळी ५ ते ११:३० तर ५ आठवड्यातुन एकदा रात्र पाळी (रात्री ११:३० ते सकाळी ६ ). पहीली भेट झाली तेव्हा दूसरी पाळी होती. आणि मग परत दिवस पाळी सूरू झाली. संपूर्ण आठवडा तिचे नख ही दिसले नाही ! त्या दिवसातली तगमग, व्याकूळता, घालमेल, कासावीस शब्दात व्यक्त करता येणारच नाही. माझ्या वागण्यातपण सकारात्मक बदल झाला होता. चिड्णे कमी झाले होते, समजूतदारपणा आला होता,चेहर्यावर एक निराळेच तेज आले होते. सगळे जगच सुंदर आहे असे वाटू लागले होते ! "हा छंद ---" हे गाणे त्या काळात हजारदा तरी ऐकले असेल ! सोमवारी दूपारी वाण्याकडून नारळ घेउन घरी निघालो होतो, आणि पाठून आवाज आला, 'आहेस तरी कोठे, काँलनी सोडलीस की काय '. ती 'तिच' होती ! सगळं अंग मोहरून निघाले ! तू गीताचा भाउ ना ? मी उडालोच, माझ्या बहीणीला ही कशी ओळखते ? तिची best friend आणि माझी बहीण एकमेकींच्या best friend होत्या. 'नारळ घेउनच स्टाँपवर येणार का ?' हो- नाही अशी उत्तरे मी आलटून पालटून देत होतो आणि ती खळखळून हसत होती. शेवटी हातात नारळ घेउनच मी तिच्या बरोबर स्टाँप वर गेलो ! मग हे रोजचेच झाले. घर ते स्टाँप या साधारण २० मिनिटांत आम्ही काय बोलायचो rather मी काही बोलायचो तरी का हे सुद्धा आता आठवत नाही !


शुक्रवारी मला off होता. मित्रांबरोबर briefing झाले. 'आगे बढो' असा सल्ला मिळाला ! हाँटेलात तिला चहाची आँफर द्यायचे ठरले. शनिवारची ती दूपार, एका वळणावर ती आणि मी. एक वाट स्टाँपची तर एक उडप्याच्या हाँटेलची. आपण चहा घ्यायचा ? धीर एकवटून मी विचारले. 'ही काय चहा प्यायची वेळ आहे, आणि मी पोट फूटे पर्यंत आज जेवले आहे' तीचे उत्तर ! पण मी अशा उत्तराची अजिबात अपेक्षा केली नव्ह्ती. त्यामुळे पुढे काय बोलायचे मला सूचेचना ! मी पार हडबडून गेलो ! loop मधे गेल्यासारखा 'चल ना, चल ना' करीत राहीलो ! आणि ती एकदम बोलून गेली,'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्ह्ती' ! झटकन पुढे निघुन गेली. माझ्या कानात गरम शीसे ओतल्यासारखे झाले. स्वत:चीच लाज वाट्ली. एवढे कसे आपण अधीर झालो, बस झाले हे प्रेमाचे खूळ, आता पुन्हा या भानगडीत पडायचे नाही असे स्वत:ला बजावुन घरी आलो. मग पुढचे काही दिवस प्रेमाच्या hangover मधुन बाहेर पड्ण्यात गेले. मित्रांना सगळा सीन सांगितला,तीला पुन्हा कधीही भेटणार नाही असे सांगितले. मित्र समजावू लागले ती 'दूपारी' चहाला नाही बोलली याचा अर्थ संध्याकाळी चहा घेउ असा होतो. पण माझ निर्णय ठाम होता. माझ्या मित्रांकडे ती अनेकदा माझी चौकशी करायची पण माझ्यात कमालीचा न्युनगंड निर्माण झाला होता. मी परत कधीही तिला भेटलो नाही.


त्या नंतर अनेक trek केले, बहुतेक भारत फिरलो, अनेक मुली भेटल्या. आवडल्याही, पण स्वत:हुन कधी कोणाशी ओळख करून घेतली नाही. एका मर्यादेपलीकडे कोणात अडकलो नाही. २५ व्या वर्षी लग्न झाले, arranged, यथावकाश सूरही जूळले, पण, पण पहील्या प्रेमातली ती अधीरता, कातरता, तरलता, संवेदनाशीलता, ते खयालों मे हरवुन जाणे, ती ओढ... पुन्हा कधी कधीच अनुभवली नाही ! एकदा अकस्मात बायकोबरोबर भाजी घेत असताना 'ती' दिसली ! तीने मला पाहीले की नाही, don't know ! पण अपराधीपणाची जाणीव मात्र प्रकर्षाने घर करून राहीली ! मागाहुन घरी आल्यावर बायकोला सगळी story सांगितली ! हसली, म्हणाली, 'प्रेम आंधळे असते' असे म्हणतात ते आज कळले !


आता तुम्ही म्हणू शकता "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं !"

शुक्रवार, २७ जून, २००८

माझा १ नम्बरचा शत्रू !

माझा १ नम्बरचा शत्रू !
शत्रू तर बरेच आहेत, मित्र म्हणून वावरणारे शत्रू ही आहेतच ! पण या सगळ्यात numbero uno कोणाला द्यायचा ? उद्यापासून एक list बनवायला घेउया आणि मग ranking ठरवूया !सकाळी बरोबर सहा वाजता वाजणारा गजर हा ही तसा शत्रूच ! घर सोडताना हे करा, ते करा, हे विसराल हे बायकोचे बाण चुकवत घर सोडले. थोडा उशीर झालेला होताच. सोसायटीचे फाटक बंद ठेउन गायब झालेला वाँचमन शत्रूच नाही का ? स्कूटर रस्त्यावर आणल्यावर कट मारून जाणारे biker, माझ्याच हातून मोक्ष हवा असणारे पादचारी, रस्त्यावर खड्डे ठेवणारे पालिकेचे ठेकेदार, स्टेशन जवळ वाहने वेडीवाकडी park करणारे चालक या शत्रूंची यादीत भर पडली. लोकल पकडण्यासाठी जीवाच्या आकांताने धावलो पण त्या नालायक मोटरमनने ती अगदी डाँट टाईम वर सोडली. एरवी सिग्नल असूनही हे पठ्ठे गाडी लेट करतात ! पुढची लोकल अपेक्षेप्रमाणेच late झाली ! बसायला मिळाले पण गर्दीमुळे दोन सीटच्या मधे public घुसले, पाय अगदी आखडून गेले. मग भजने म्हणणारे, मोबाइल वर गाणी ऐकवणारे, दंगा करणारे यांची यादीत भर पडली ! कामावर पोचल्यावर गेट मधून आत शिरताना नेमके मलाचा ओळखपत्र विचारणारा सुरक्षा कर्मचारी यादीत add झालाच ! कामावर आपली कामे माझ्या गळ्यात मारणारे, माझ्याकडून फूकट सल्ला हवा असणारे, माझ्या डब्यावर डोळा असणारे, माझी orkutgiri न बघविणारे यांची दखल नको घ्यायला ! घरी परतताना रस्ता बळकावणारे परप्रांतीय हे पण black list मधे आलेच ! आता यादी बरीच फुगल्यामुळे मी ती update करणे बंद करून घर गाठले.
संध्याकाळच्या शांत धीरगंभीर वातावरणात मुले प्रार्थना म्हणत होती, "विश्वकल्याण मेरा मंत्र है--- बाहर मेरा कोई शत्रू नही,अंदर कुछ शत्रू जरूर सही" डोक्यात जणू वीज चमकली ! सकाळ पासून जी यादी बनवतोय ती तर सगळी बाह्य शत्रूंची, पण आपल्या आत लपलेल्या या शत्रूंचे काय ? काम, क्रोध, लोभ्, मोह , मद , मत्सर हे षड् रीपू आपल्यातच तर दडून बसले आहेत. यांच्याच तर प्रभावाने आपल्याला आपले परके वाटतात तर परके आपले. बायकोचे परखड बोलणे आपल्यातल्या पुरूषी अहंकारामुळे आपल्याला अप्रिय वाटते. मनावर साचलेला हा सहा शत्रूंचा लेप ज्ञानाने लख्ख पूसून काढायलाच हवा ! गीतेतील उपदेशामुळे अर्जूनाचाही "मोह्" नष्ट झाला, त्याला त्याचे सत्व कळले व मग त्याने या शत्रू विरूद्ध लढण्याचा कृत-निश्चय केला !--तो एक दिन सब जग मेरा ही बनेगा !" प्रार्थना संपली, माझा शत्रूचा शोध ही संपला !

लहानपण दे गा देवा !

लहानपण दे गा देवा !
मला अजून काही दिवस नागूच रहायचे आहे !
चिउ काउ बघत गुरगुट्या भात खायचा आहे !
दूध पिताना ते फुरर् करून उडवायचे आहे !
टूच करायच्या आधीच भोकांड पसरायचे आहे !
कडू औषध नाक दाबल्यावरच प्यायचे आहे !
मला अजून काही दिवस अंथरूणात लोळत पडायचे आहे !
दात घासण्यापेक्षा पेस्ट खायची आहे !तासंतास पाण्याशी खेळायचे आहे !
आईबरोबर कांदे बटाटे खेळायचे आहे !
बाबांबरोबर ढूशूम ढूशूम करायचे आहे !
आंघोळीनंतर टॉवेल नेसून घरभर पळायचे आहे !
मला अजून काही दिवस टॉम ऍण्ड जेरी बघायचे आहे !
क्रीकेटचा थरार पहील्या बॉल पासून शेवटच्या बॉल पर्यंत अनुभवायचा आहे !
भारत जिंकल्यावर गोंगाट करून घर डोक्यावर घ्यायचाय !
हरल्यावर खेळाडूंच्या नावाने शिमगा करायचा आहे !
मला अजून काही दिवस पावसात चिंब भिजायचे आहे !
सर्दी न होता ही शाळेला बुट्टी मारायची आहे !
कॉम्प्युटर वर तासं तास खेळायचे आहे !
चिखलात फूटबॉल खेळायचे आहे !
शेजार्यांची काच फोडल्यावर धूम ठोकायची आहे !
पाण्याच्या उंच टाकीवर चढून बसायचे आहे !
सायकलवरून मनसोक्त भटकायचे आहे !
ढोपर आणि कोपर एकदमच फोडून घ्यायचे आहे !
नको क्लास, नको ट्यूशन, नको संस्कार नको छंद वर्ग !
गुणांच्या शर्यतीत मला नाही पळायचय !
नाचू दे खेळू दे बागडू दे मला !
'हाय' म्हणजे काय ते कळू दे माझे मला !
माझ्यातला 'मी' उलगडू दे ना माझा मलाच !
लहानपणी जे जे करायचे ते करू दे ना लहानपणीच !
लहानपणीच लहानपण कळू दे ना मला !
मोठा झाल्यावर मला पण आठवू दे ना लहानपण !
देवा एवढे जरा ऐक माझे, या मोठ्यांनी आमचे लहानपणच लपविले आहे,
स्वत:चे लहानपण पूरेपूर enjoy करूनआम्हाला मात्र तंगविले आहे !
या मोठ्यांनी पकडून ठेवलेले, आमचे हक्काचे,
लहान पण दे गा देवा !

मुलगी झाली हो !

मुलगी झाली हो !

कॉलेजात असताना "मुलगी झाली हो" हे पथनाट्य पाहीले होते. खूपच प्रभावी मांडणी होती. पण मला तरी तो विषय फारसा गंभीर वाटत नव्हता. आम्ही सर्व भावंड लोकशाही वातावरणात वाढलो , मुलगा-मुलगी असा भेद कधी जाणवला नाही, पटत पण नाही. मुलाने मुलासारखे असावे, मुलीने मुलीसारखे, it's all !लग्न झाल्यावर ज्या काही फार कमी मुद्द्यांवर एकमत झाले ते म्हणजे १) दोन मुलं हवीत २) मुल मराठी माध्यमात शिकतील ३) लोकशाही व्यवस्था. मला एकतरी मुलगा हवाच होता, हीला एकतरी मुलगी हवीच होती ! मला मुलगा हवा होता त्याच्याशी मस्ती करायला, मनसोक्त क्रीकेट खेळायला, मोठा झाल्यावर त्याच्या बरोबर ट्रेक करायला ! हीला मुलगी हवी होती तिला नटवायला, थटवायला, छान छान ड्रेस घ्यायला, स्वयंपाक करताना लुडबुड करण्यासाठी, माझ्यावर वचक , नजर ठेवण्यासाठी !पहील्या वेळी अनेक जाणकार सांगत होते की मुलगीच होणार पण झाला मुलगा ! दूसर्या वेळी सर्व लक्षणे मुलाची होती आणि मला टेंशन आले कारण मुलीसाठी अजून एक चान्स घ्यायला बाईसाहेब तयार होत्या ! बर्याच प्रतीक्षेनंतर , दिलेल्या तारखेनंतर ४ दिवस वाट बघून, शेवटी सिझरिंग करून प्रियाका जन्माला आली ! मुलगी झाली हो ! मी प्रथम तीला काचेच्या पेटीत ठेवलेले बघितले तेव्हाही ती माझ्याकडे मुठी वळवून बघत असल्याचा मला भास झाला !पहीली मुलगी धनाची पेटी असे म्हणतात पण दूसरी लेक माझ्यासाठी घबाड योगच घेउन आली ! तिच्या जन्माच्याच वेळेला, चक्क हॉस्पिटलच्या लॉबीत महीना १०,००० रू. चे काम done झाले ते पुढची १० वर्ष चालू होते !तिची skin खूप छान होती, अजूनही आहे ! आईने भरपूर शहाळ्याचे पाणी प्यायलाचा तो म्हणे परीणाम होता. तिच्या अंगावर लव अजिबात नव्हती. पण रंग मात्र सावळा होता. नर्स गमतिने म्हणायच्या "आउस बी गोरी नी बापूस बी गोरा ही काळी पोरगी कोणाची ?"३ महीन्यात तीने चांगलेच बाळसे घरले. माझ्याकडे मात्र ती बिलकूल येत नसे. मी हात लावला, जवळ गेलो की जी टाहो फोडायची की बस रे बस ! हीला सगळी कामे टाकून धावत यायला लागायचे. भटकायला , मस्ती करायला तीला मी हवा असे पण मांडीवर बसणे, जेवण भरवणे, झोपणे या साठी मात्र आईच ! सकाळी सकाळी माझे तोंड बघावे लागले तर टाहो फोडायची ! तू का आधी समोर आलास असा त्रागा करायची ! एकदा मात्र प्रियांकाला सडकून ताप आला, रविवार होता, दवाखाना बंद म्हणून तिला घेउन थेट हॉस्पिटल मधे गेलो. डॉक्टर बोलले अँडमिट करावे लागेल. महीलांचा वार्ड फूल होता म्हणून लहान मुलांच्या विभागात ठेवले , रात्रपाळीची जबाबदारी माझ्यावर आली. तापात सतत चढ-उतार चालू होता, माझा जागता पहारा होता, जरा ताप वाढताच पाण्याने पूसून काढत होतो, तीच्याशी गप्पा मारत होतो, हसवत होतो, अगदी नाईलाजाने ती हे सगळे करून घेत होती ! जागवलेल्या तीन रात्री अगदीच वाया नाही गेल्या, एकदाचे तिने मला accept केले !मग काय , घरी पण ती माझ्याबरोबरच आली. मग सूरू झाली आमची फूलटू धमाल ! माझ्या बायकोने मला जेवढे जोखले आहे त्याहून जास्तच मुलगी मला ओळखून आहे ! तीच्यावर मला हात उचलताच येत नाही, तिच्यापुढे आवाज चढवता नाही कारण त्याआ आधीच ती भोकाड पसरते, अगदी मीच तीला परत उचलून घेईपर्यंत ! बायको हे सगळे मस्त enjoy करते , लेक तुझ्या डोक्यावर मिर्या वाटणार आहे मिर्या असे बजावत असते ! प्रसाद ,मुलगा तटस्थ असतो आणि लेक आणि बायको बहुमत सिद्ध करून माझी अनेक वेळा गोची करतात ! मी कोणते कपडे घालायचे, मीशी काढायची का ठेवायची हे सर्व लेक ठरवते. तिच्या शाळेत कधी जायचा प्रसंग आलाच तर आधीच ठणकावून सांगते, बावळटासारखा यायच नाही, शर्ट ईन करायचा, पट्टा लावायचा, भांग पाडायचा ! एकदा तर मला तुला "काडीचीही अक्क्ल नाही" हे सत्य सांगून मोकळी झाली. आधी मला वाटले हीच बोलली ! दोन्ही मायलेकींचा आवाज फोनवर कमालीचा सारखा येतो ! मी प्रियांका असे म्हटले की फोनवर नेमकी ही असते ! देवा वाचव रे बाबा ! मुलगा स्वभावाने खूपच शांत आहे तर मुलगी भयंकर आक्रमक ! प्रचंड उत्साही, बडबडी ! भरतनाट्यम शिकली आहे आणि t.v. वर नाचाचा कोणताही कार्यक्रम चालू असला की घरी पण समांतर नाच चालू असतो ! मँच t.v. वर बघणे बहुदा आता इतिहासजमाच होणार आहे. प्रसाद थोडासा आईसारखा दिसतो तर प्रियांका माझ्यासारखी. पण तीला नुसते म्हणून बघा, काय चवताळते ! मी माझ्या आईसारखीच दिसते हे ठासून सांगेल! माझ्यावर घारीसारखी नजर असते. बहुतेक बरोबर येतेच. स्कूटरचा स्पीड जरा ४० च्या वर गेला की तंबी मिळते. वाटेत मल कोण भेटले, मी कोणाकडे बघितले, माझ्याकडे कोण बघत होते--- अगदी साद्यंत अहवाल गेल्या गेल्या गृहमंतत्र्यांना सादर होतो. कधी कधी खुलासा पण द्यायची पाळी येते ! पेपी घेते पण रीपोर्ट लिक करत नाही. जे घडले ते सांगतेच ! तर अशी ही माझी लेक, तिला मी लाडोवा, जयसूर्या (डावरी बँटींग करते म्हणून), धडाकेबाज, दांडगोबा याच नावाने हाक मारतो. एकदा बायको बोलली की या लाडोबाचे लग्न तरी करून देणार ना ? तर मी ठरवलय, मुलाला घरजावई म्हणून पाठवायचा आणि लाडोबाला घरजावईच आणायचा ! तेव्हा मित्रांनो, 'मुलगी झाली हो' असा टाहो फोडायची काही गरज नाही ! तशी बायको आपल्यावर अधिकार गाजवत असतेच, त्यात लेकीची भर ! म्हणतात ना 'एकसे भले दोन' !

मंगळवार, २४ जून, २००८

पाऊस आठवणीतला !

पावसाशी गट्टी कधी जमली हे पण आता आठवत नाही एवढे जुने झाले आहे ! जुलै मधल्या जन्मामुळे असेल, पण जेव्हा जेव्हा शक्य झाले तेव्हा तेव्हा प्रत्येक पावसात अगदी चिंब भिजलो आहे. 'चिंब' आणि 'अंग झिम्माड झालं' या शब्दात एक अनोखा ओलावा आहे जो मला नेहमीच मोहरून टाकतो. पोटापाण्यासाठी ईतर उद्योग करणे भाग आहे, नाहीतर मी विरघळून जाईपर्यंत पावसात भीजत राहीन! कामावर जाताना भीजता येत नाही पण घरी परतताना पाउस असेल तर भिजणार्या गोष्टी स्कूटरच्या डीकीत टाकून 'चिंब' भिजूनच घरी जातो. बायको टॉवेल घेउनच दार उघडते ! ट्रेक आणि पाउस हा योग तर मी साधतोच, आणि पाउस पण दगा देत नाही कधी !


पण याच मित्राचे रौद्र रूप अनुभवायला मिळाले दोन वर्षापुर्वी, २६ जुलैला ! दिवसभर पावसाने अगदी उभा दावा मांडला होता. लोकलने घरी निघालो पण वडाळ्याच्या पुढे जाउ शकलो नाही. शेवटी वडाळ्याला कॉलनीत मित्राच्या घरी आश्रय घ्यावा लागला. त्या आधी बायकोला फोन करून सूखरूप आहे, दोन दिवस घरी नाही आलो तरी काळजी करू नको असे सांगून टाकले होते. दूसर्या दिवशी सकाळी दादरला आलो तर पनवेल साठी बस सेवा अजून बंदच होती, लोकल बंद होत्याच तरी दादर स्टेशनात गेल्यावर v.t. ला जाणारी लोकल मिळाली. कोणाच्या घरी आश्रय घेण्यापेक्षा कार्यालय बरे म्हणून परत कार्यालयात गेलो. अनेक सहकारी अडकून पडले होते. त्यांच्या चेहर्यावर ताण स्पष्ट दिसत होता. मुंबईच्या उपनगरात पावसाने तांडवच मांडले होते. अनेक अफवा उठत होत्या आणि मोबाईल पण काम करत नव्हते. मी सूखरूप असलो तरी आता घरच्यांची काळजी वाटू लागली. त्या दिवशी भावाचा वाढदिवस होता. मोठ्या प्रयासाने त्याला फोन लागला तेव्हा कळले की लोकलमधेच त्याने रात्र काढली होती. लोकल च्या फूटबोर्डला पाणी लागले होते !


नंतर एकाने खबर दिली की गाढी धरणाचे पाणी सोडावे लागल्याने पनवेल पुराच्या पाण्यात बूडून गेले आहे ! दूसर्या दिवशी घर गाठायचेच अशा निर्धाराने पहाटेच बाहेर पडलो. v.t - ठाणे - वाशी असा रडत खरडॅत प्रवास करीत साधारण १२ वाजता पनवेलला पोचलो. लख्ख उन पडले होते. स्टेशन परीसरात तर कालच्या प्रकोपाचा काहीही प्रत्यय येत नव्हता. स्कूटर वाहून गेली असेल असे वाटत असताना ती पण 'जैसे थे' होती. मुख्य रस्त्यावरचे दृष्य मात्र मन विदीर्ण करणारे होते. सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले होते. गुढग्याएवढ्या चिखलात लोक असहायपणे बसले होते. मुख्य रस्त्यावरचे दृष्य मात्र मन विदीर्ण करणारे होते. सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले होते. गुढग्याएवढ्या चिखलात लोक असहायपणे बसले होते. परत आश्चर्याचा धक्का बसला , आमच्या भागात प्रकोपाच्या कोणत्याही खुणा नव्हत्या ! जरा हायसे वाटले, पावसाने निदान आपल्या दोस्तीचा मान राखला तर !


पण घरी गेलो आणि-- दार उघडेच होते- वाटले मुले भोSSक करणार असतील- पण घरात शिरताच जाणवली भयाण शांतता, आधी कधीही न अनुभवलेली-- दोन्ही बेडरूमच्या दाराला कड्या-- काय बरे आक्रीत घडले असेल ?-- मन घट्ट करून दार उघडले-- आत काणीच नव्हते-- मग दूसरी बेडरूम उघडली -- कोणी नाही -- ही कसली थट्टा ?-- बाथरूम मधून कोणीतरी दारावर थापा मारत होते-- पाठोपाठ हुंदक्यांचा आवाज-- आता मात्र माझा धीर खचला -- थरथरत्या हाताने कडी उघडली -- आत प्रसाद,प्रियाका-- भीतीने थिजून गेलेले -- रडतच मला बिलगले-- आई कोठे आहे ? ती आपल्याला सोडून गेली -- परत नाही येणार-- आता मात्र मी --- काही भांडण नाही -- अशी अचानक -- मी पार कावराबावरा झालो-- मुलांना धीर दिला-- काळजी करू नका, मी तिला आणतो परत-- दाराकडे आलो तर समोर ही !


काय पोरकटपणा चाललाय --?????सकाळपासून मुलांनी नुसता उच्छाद मांडला होता. दोन दिवस माझा पत्ता नव्हता, ही चा संयम संपला, मुलांना बसा भांडत, मीच जाते घर सोडून असे म्हणून दोघाना बाथरूममधे कोंडून ही घराबाहेर पडली होती. नेमका त्याच वेळी मी घरात प्रवेश केला होता अणि थरार अनुभवला होता ! त्या प्रलयी पावसाने मला वेगळ्याच भावविश्वाची सफर घडवून आणली होती !

सोमवार, २३ जून, २००८

हेवा वाटावा असा मृत्यू !

दोन वर्षापुर्वी, ४ मे २००६, यूथ हॉस्टेल ने आयोजित केलेल्या हिमालयीन पदभ्रमण मोहीमेत सहभागी झालो होतो. बरोबर ऑफीसचे मित्र होते. सौरकुंडी पास हे १३,००० फूट उंचीवरचे ठीकाण आमचे लक्ष होते. या मार्गावरची ही पहीलीच मोहीम होती. तीन टप्पे पार करून एका विस्तीर्ण पठारावर आम्ही पोचलो. दमल्यामुळे पाठ टेकल्या टेकल्याच गाढ झोप लागली.

साधारण पहाटे चारच्या सुमारास मला माझ्या सहकारी मित्राने उठवले. लगतच्या तंबूबाहेर काहीतरी गोंधळ चालला होता. आम्ही दोघे बाहेर आलो. आधीच्या तुकडीतल्या एकाची तब्येत अगदी खालावली होती. श्वास घेणेही त्याला जड जात होते. त्याच्या घशातुन येणारी घरघर थरकाप उडविणारी होती. आमच्या तुकडीत दोन डॉक्टर होते. प्रथमोपचाराचे सामान पण होते. पण त्याला बहुदा न्यूमोनिया झाला होता. त्या साठी कोणतीच औषधे नव्हती, तसेच प्राणवायू पुरवायची सोय पण नव्हती. मानवी वस्तीपासून आम्ही एवढे लांब होतो की मदत मिळण्याची कोणतीही शक्यता नव्हती. मृत्यू त्या बर्फाच्छादीत दर्या खोर्यात योग्य वेळेची वाट पहात होता. वातावरणात गंभीर झाले होते. निसर्गापुढे आपण किती शूद्र आहोत ही जाणीव अस्वस्थ करणारी होती. मला सारखे वाटत होते की काही चमत्कार होईल आणि लष्कराचे एखादे हेलीकॉप्टर आकाशात उगवेल व एखाद्या पाश्चिमात्य चित्रपटाच्या धर्तीवर त्याला मदत मिळेल पण कल्पना व वास्तव यात किती अंतर असते नाही ?

अचानक त्याच्या चेहर्यावरचा ताण पूर्ण निवळला. त्याचा श्वास पुर्ववत झाला. चेहर्यावर हास्य उमलले. आमचेही चेहरे उजळले. पण पुढच्याच क्षणी त्याची प्राण ज्योत मावळली होती.तुकडीतल्या दोन्ही डॉक्टरांनी तशी अधिकृत घोषणा केली आणि सगळ्या वातावरणातच सन्नाटा पसरला. show must go on --- आम्हाला पुढ्च्या मुक्कामाकडे कूच करावेच लागणार होते. नि:शब्द वातावरणात आम्ही सर्व ते ठीकाण सोडण्यास तयार झालो. जाताना त्याला आदरांजली वाहण्यासाठी आम्ही सर्व उभे राहीलो. कर्नाटकातून आलेल्या श्री. गोखले यांनी गीतेतला "नैनं छीन्दंती शस्त्राणि--" हा श्लोक धीरगंभीर आवाजात म्हटला. त्या नंतर गीतेतला १५ वा अध्याय. मग सर्व १ मिनीट स्तब्ध उभे राहीलो. त्यावेळी हीमालयातल्या दर्या-खोर्यातुन वाहणार्या वार्याचे अजब गुंजन मला ऐकू आले. जणू हिमालयच या वीराला आदरांजली वाहत होता. क्षणभर मलाही वाटून गेले, किती भाग्यवान आहे हा, हिमालयाच्या कुशीत मृत्यू यायला किती भाग्य हवे !

मोहीम फत्ते करून आम्ही बेस कँम्पला परतलो. कँम्पवर घबराट पसरू नये म्हणून ही बातमी गुप्त ठेवण्याच्या सूचना आम्हाला आधीच मिळाल्या होत्या. पण तरीही आमच्या तूकडीने कँम्प फायर मध्ये हा मुद्दा मांडलाच. ताबडतोब मुख्य शिबीर प्रमुखाने ध्वनिवर्धक यंत्रणा बंद करून शेकोटीचा कार्यक्रम बंद पाडला. शेवटी आम्ही आमच्या सर्व सूचना त्यांना लेखी दिल्या. एका तळ-प्रमुखाचा मृत्यू दडपणे योग्य नव्हे. यात आयोजकांचा उघड निष्काळजीपणा आहे. जिथे मुख्य तळ होता त्याच गावात भारतीय लष्कराच्या rescue team चा तळ होता. अशा आपत्-प्रसंगी त्यांची मदत घेतली जावी असेही सूचवले.


तो गिर्यारोहक मुंबईचा होता. Reserve Bank मध्ये तो अधिकारी होता. मराठी होता. तळाची व्यवस्था बघणार्या टीम मध्ये तो होता. जिकडे त्याचा मृत्यू झाला त्या तळावर तो ७ दिवस आधी दाखल झाला होता. गिर्यारोहकांच्या तंबूची उभारणी व इतर व्यवस्था त्याला करून घ्यायची होती. हवामान अचानक बिघडल्यामुळे दोन दिवस त्यांचा मुख्य तळाशी संपर्क तूटला होता. दोन दिवस अत्यंत प्रतिकूल वातावरणात त्याला रहावे लागले. त्या मुळेच त्याला न्युमोनिया झाला असावा. मुंबईत त्याचे वडील शेवटच्या घटका मोजत होते. आपल्या वडीलांचे शेवटचे दर्शन तरी घ्यायला ये असा निरोप त्याला घरून गेला होता. यूथ हॉस्टेलने ही त्याला मोकळे केले होते. पण हा मराठमोळा गडी. हट्टाला पेटला होता, आधी लगीन कोंढाण्याचे ! जबाबदारी आधी पार पाडणार मगच मुंबई गाठणार ! विधीलिखीत काही वेगळेच होते ! मला अजूनही कळले नाही , त्याच्या वडीलांना आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळण्याआधीच मृत्यूने गाठले असेल की--- ?

मंगळवार, १७ जून, २००८

घर पहावे घेउन !

मराठे हे तसे भटके आणि विमुक्तच ! माझे वडील, आजोबा आणि आजी ८-१० वर्षाचे असतानाच वारल्यामुळे त्यांच्या काकांकडेच वाढले. 'भिक्षुकी आणि शिक्षकी सोडून काय हवे ते कर' हा चुलत्यांचा आदेश शिरोधार्थ मानून वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी मुंबईची वाट धरली. ज्योतिष या विषयात चांगलेच पारंगत झाले व आपल्या नशीबात स्वत:चे घ्रर नाही तेव्हा त्या फंदात पडायचे नाही असे त्यांनी ठरवले ! मुंबई पोर्ट ट्रस्ट मधे कामाला लागले, लग्न झाले व संसार सुरू झाला ठाण्याला, चेंदणी कोळीवाडयात, १० बाय १० च्या जागेत. आसपास मासळी व हातभट्टीच्या दारूचा वास ! तिथे वर्षभर काढून डोंबिवलीला शिफ्ट झाले, मग गोरेगाव आणि मग आगाशी (विरार जवळ)!

जागा बदलल्या पण स्टेटस 'भाडेकरू' हेच राहीले. आगाशीला सात वर्षे काढून मग आम्ही सगळे मुंबईला, वडाळ्याला office quarter मधे आलो. मित्र विचारायचे स्वत:ची जागा शोध, निवृत झाल्यावर काय कराल ? बाबा सांगायचे, त्याला अजून १२ वर्ष अवकाश आहे, बघू काय ते !या जागेत मात्र स्थैर्य मिळाले. आम्हा चारी भावंडाची शिक्षणे, नोकर्या व लग्न यथाकाल पार पडले. पण या सगळ्यात निवृत्ति दोन वर्षावर आली आणि स्वत:च्या जागेचा पत्ता नव्हताच ! शेवटी पुन्हा एकदा विरार जवळील कोफराड गावात परांजपे नगरात 1BHK चे घर मोठ्या मुष्कीलीने घेता आले. तसे कल्याण, ठाणे येथे मी व बाबांनी जागेचा शोध घेतला होता पण जागेच्या किमती आणि आमच्याजवळचा पैसा याचे प्रमाण फारच व्यस्त होते !

बायको नोकरी न करणारी केल्यावर एकटयाच्या पगारात घर घेण्याचे स्वप्न पडणेही दूरापास्त होते तेव्हा वर्षभर वडीलांकडे राहून प्रसादचा पहीला वाढदिवस विरारला साजरा करून मी वेगळे बि-हाड थाटले ते ही भाड्याच्याच जागेत, कॉटन-ग्रीनला office quarter मधेच !तिथे वर्षभर काढल्यावर वडाळ्याला मोठी जागा मिळाली म्हणून मग बि-हाड तिथे हलवले ! प्रियांकाचा जन्म तिथलाच ! 'बेटी धनाची पेटी' या म्हणीचा प्रत्यय मला लगेच आला व अनेक मार्गानी पैसा मिळू लागला. थोडी आर्थिक सुबत्ता आल्यावर हीला बरे वाटावे म्हणून मी अधून मधून कोठे कोठे जागा बघायला जात असे पण असलेला पैसा लांब कोठेतरी मोठ्ठा ब्लॉक घेउन ब्लॉक होणे, किंवा त्याच पैशात जवळच पण १० x १० च्या खोलीत सडत राहणे मला पटत नव्हते. 'मूर्ख लोक घरे बांधतात व शहाणी माणसे त्यात भाडेकरू म्हणून राहतात' हे मला भारी पटले होते. कॉलनीत राहण्याचे अनेक फायदे होते. कार्यालय जवळ, देखभाल खर्च शून्य, वीज जवळ जवळ मोफतच, सर्व नावाजलेल्या शाळा, कॉलेजेस जवळ, मोफत वैद्यकीय सेवा या बद्ल्यात पगारातुन कापले जाणारे ७५ रूपये भाडे आणि न मिळणारा २१०० रूपयाचा घरभाडे भत्ता काही फार नव्हता ! तितके उत्पन्न मला माझ्या गुंतवणूकीतून मिळत होतेच ! तरी मी रविवारी वाशी, नेरूळ पर्यंत जागेच्या शोधात फिरत होतो पण फारसा गंभीर नव्हतो.

२००० सालात मला जे नवे साहेब मिळाले ते नुकतेच नवीन पनवेलला स्वत:च्या बंगल्यात रहायला गेले होते. मला रोज ते वेगवेगळ्या प्रकारे स्वत:च्या जागेत रहाणे कसे चांगले ते पटवून देउ लागले. २१०० रूपयाचा घरभाडे भत्ता वाया घालवण्यापेक्षा तोच कर्जाचा हप्ता म्हणून द्यावा, निदान आपल्या मालकीचे घर तरी होईल हे त्यांचे म्हणणे मला एकदाचे पटले ! आणि परत नव्या मुंबईत जागा शोधू लागलो. हावरे बिल्डरचा नेरूळला एक टॉवर होता व त्यात एक १ BHK शिल्लक होता. मी ती जागा बघण्याआधी शेजारी गोखले व पटवर्धन या नावाच्या पाट्या बघितल्या व उतावीळपणे ती जागा घेण्याचे जवळपास नक्की केले. बिल्डरच्या कार्यालयात गेल्यावर तो भाव १४०० रूपये चौरस फूट सांगू लागला. वास्तविक त्या भागात १००० ते १२०० रूपये हाच दर चालू होता पण तो एक पैही कमी करायला तयार नव्हता ! बरोबरचा मित्र मला बाहेर घेउन बोलला की घाई करू नकोस, टोकन देऊ नकोस . आधी बायकोला जागा दाखव मगच पुढे काय ते ठरव. दूसर्याच दिवशी आम्ही उभयता जागा बघायला आलो आणि बायकोला जागा अजिबात आवडली नाही ! ती अगदी निक्षून बोलली, मी येथे रहायला येणार नाही, हा तर कोंडवाडा आहे ! मग जागा बघणे हा विषय परत बंद केला !

मधल्या काळात अजून एक मित्र पनवेलला रहायला गेला व त्याने मला तिकडे जागा बघण्याचे आवतण दिले ! महाशिवरात्रीच्या दिवशी मी पनवेलला धडकलो ! अनेक जागा बघून झाल्यावर तो मला त्याच्या बिल्डर कडे घेउन गेला. त्या बिल्डरने मला दोन जागा दाखवल्या, एक सहा महीन्यात ताबा मिळेल अशी तर एक जवळपास तयार स्थितीतील ! दोन्ही जागा मला आवडल्या पण पहीली जागा जरी उशीरा मिळणार असली तरी चांगल्या लोकेशन मधे होती तर तयार जागेच्या आसपास बरेच रीकामे प्लॉटस होते. पहील्या अनुभवावरून हीला जागा दाखवायला आणले व आश्चर्य म्हणजे दोन्ही जागा हीला आवडल्या ! बिल्डरला पहीलीच जागा हवी म्हणून सांगितले आणि अचानक हीला आठवले की मुलांच्या शाळेचे काय ? ते सुद्धा मराठी !बिल्डर पक्का धंदेवाईक, त्याने लगेच गाडी काढली व आम्हाला भाटीया शाळेत घेउन गेला ! शाळा कसली ती, उध्वस्त धर्मशाळा होती !दूसरे सी.के.टी. हायस्कूल पण ते आगर्यांचे ! बायकोने एकदम about turn केले ! जागाच नको ! बिल्डर थक्कच झाला !आम्ही बाहेर पडत असतानाच त्याला आठवले की पुण्याच्या एका संस्थेने (महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी )सेक्टर ६ मधे मराठी शाळा सुरू केली आहे. परत त्याची गाडी घेउन ती शाळा आम्ही बघितली, मुख्याध्यापिका सौ.वैशंपायन यांच्याशी बोललो, ब्राह्मण कार्ड वापरून दोन्ही मुलांना प्रवेश मिळण्याचे ठाम आश्वासन घेतले आणि बिल्डरचे कार्यालय गाठले. थोडा वेळ द्या असे सांगून समोरच्या हॉटेलात बसलो. बघितलेली दूसरी जागा या शाळेकडून जवळ होती, तयार होती तेव्हा सहा महीन्याच्या हवाल्यावर का विसंबा ! ती जागा परत बघितली. २BHK + 400 चौ.फूटची गच्ची ! भरपूर हवा, भरपूर सूर्यप्रकाश ! तसा मित्र बोलला की 'वास्तुशास्त्रा' प्रमाणे नाही आहे पण मी ठरवले ज्या जागेत सूर्य उगवल्यापासून ते मावळेपर्यंत नैसर्गिक प्रकाश असतो तीला बाकी नियम लावायची गरज नाही ! बिल्डरला होकार कळवला, टोकन दिले व दूसर्याच दिवशी करार नोंदविला, संयुक्त नावाने ! सगळे मिळून ८,५०,००० उभे करायचे होते पुढच्या आठ दिवसात, सगळी भीस्त शेयर्स वर होती आणि बाजार कोसळू लागला ! सगळे शेयर पडत्या भावात विकून (फूकून?), सगळ्या FD मोडून कसेबसे ८,५०,००० जमले एकदाचे ! मधेच बिल्डरने फोन करून बोलवून घेतले, सांगू लागला की कर्ज हवे असल्यास सोय करता येईल, तुम्हाला पाच लाखापर्यंत कर्ज मिळत असताना स्वत:चे सगळे पैसे कशाला गुंतविता ? मी विचार केला तसेही काही अधिकची fittings , ग्रील लावणे, गच्चीत कोटा मार्बल लावणे यासाठी निदान लाखभर तरी खर्च होणार होतेच तेव्हा किमान कर्ज घ्यावे हे उत्तम. बिल्डरने बोलावलेल्या एजंटला लाखाचे कर्ज हवे असे सांगितले, त्यावर तो साफ निराश झाला ! पाच लाख मिळतायत तर का सोडता असे सांगू लागला ! जसे काही ते फेडायचे नव्हतेच ! मग दोन लाख आणि सरतेशेवटी मी २,५०,००० ची रक्क्म मागितली , तरत्या व्याजदराने. (floating rate)दूसर्याच दिवशी सगळ्या कागदपत्रांवर त्याने घरी येउन सह्या घेतल्या व लवकरच तुम्हाला कळवतो म्हणून गेला. गुढी-पाडवा, संध्याकाळी त्याचा फोन आला, चेक तयार आहे, वाशीला आत्ता आलात तरी मिळेल ! मग कसला धीर निघतोय, लगेच वाशी गाठले, चेक घेतला आणि पनवेलला बिल्डरकडे गेलो. कर्जाचा चेक आणि बाकी रकमेचे चेक त्याच्या स्वाधीन केले. मुलांना जागा बघायची उत्सूकता होतीच , त्यांनाही जागा खूप आवडली. पुढे काही दिवसातच सिडकोचे इमारतीसाठी ना हरकत प्रमाण पत्र (NOC) मिळाले. बिल्डर ताबा द्यायला तयार झाला. मी स्वत: पनवेलला गेलो, सगळ्या खोल्या नीट तपासल्या आणि निघताना कळले की मालक म्हणून बोर्डावर माझे एकट्याचेच नाव लिहीले होते. भडकलोच, बिल्डरला ठामपणे सांगितले, बोर्डावर बायकोचे पण नाव लागलेच पाहीजे , ती पण जागेची मालकीण आहे, करार पण संयूक्त नावानेच केला आहे, त्या शिवाय मी ताबा घेणार नाही ! शेवटी त्याने दूसर्या दिवशी बोलावले. दूसर्या दिवशी आधी फलकावर हीचे नाव स्वत:च्या डोळ्याने बघितले, मगच बिल्डरकडे गेलो. आयुष्याची ३५ वर्षे भाडेकरू म्हणून काढल्यावर आम्ही एका प्रशस्त जागेचे मालक होणार होतो. एका पाकीटात ताबा प्रमाणपत्र आणि जागेच्या किल्ल्या बिल्डरने माझ्या हातात सोपवल्या. मला अगदी भरून आले, नकळत डोळे पाणावले. क्षणभर तिथे शांतता पसरली. माझा हात हातात घेउन बिल्डर म्हणाला की या ईमारतीत तुम्ही सगळ्यात शेवटी जागा बूक केलीत पण ताबा मात्र सगळ्यात आधी घेतलात! एवढी सुंदर जागा निव्वळ वास्तूशास्त्राप्रमाणे नाही म्हणून विकली जात नव्हती पण आता वाटते की तुमच्या सारख्या सज्जनाला ती मिळून तीचे भाग्य उजळले ! Hearty Congrats ! देवाच्याच कृपेने अवघ्या २१ दिवसात सर्व व्यवहार पार पडला होता !

आता नशीबाचे खेळ बघा ! वडीलांप्रमाणेच माझ्याही पत्रिकेत गृहयोग नव्हताच ! आधी आवडलेली जी जागा सहा महीन्यात मिळणार होती , तीला तब्बल सहा महीने उशीर झाला ! नेरूळला जी जागा मला आवडली होती तीला आज ६ वर्षे झाली तरी ना-हरकत-प्रमाणपत्र मिळायचे आहे ! आधी एक पैही कमी न करणारा हावरे बिल्डर पुढ्चा महीनाभर मला वेगवेगळी अमिषे दाखवित होता. मी जर त्याला टोकन देउन बसलो असतो तर ते पैसे परत मिळवताना माझ्या नाकी नउ आले असते, काय सांगावे, मिळालेही नसते ! १२ % दराचा कर्जाचा व्याजदर खाली येत चक्क ९.५० % झाला होता (आता १४.५० % आहे ते जाउ दे !), १५ वर्षे मुदतीचे कर्ज मी थोडे थोडे अधिकचे परत केल्यामुळे खूप फायदा झाला. वाढीव व्याजदराचा फटका फारसा बसला नाही आणि याच जून मधे मी कर्जमुक्त होत आहे ! पनवेलला म्हणजे गावात रहायला गेलो म्हणून माझी थट्टा करणारे मित्र (पोचल्यावर पत्र टाक !)मी मोजलेला ८०० रूपयाचा भाव अवघ्या ६ वर्षात ३५०० झाला आहे म्हणून थक्क होतात. अनेक जण माझी जागा बघून पनवेलकर झाले आहेत !

'वेगळे बि-हाड' (कॉट्न-ग्रीनला) करताना, नेसत्या कपड्यानीशी बाहेर पडलो होतो, तिथून वडाळ्याला सामान हलविताना टेम्पो पुरला होता, वडाळा ते पनवेल ट्रक लागला होता आणि इथून पुढे ? no way , मी आता एकनाथ मराठे नवीन पनवेलकर झालो आहे ! जीना यहा, मरना यहा, इसके सिवा जाना कहा ? तेवढे स्मशान मात्र अंमळ लांबच आहे !

कोण मरतोय म्हणा एवढ्यात !