सोमवार, २३ जून, २००८

हेवा वाटावा असा मृत्यू !

दोन वर्षापुर्वी, ४ मे २००६, यूथ हॉस्टेल ने आयोजित केलेल्या हिमालयीन पदभ्रमण मोहीमेत सहभागी झालो होतो. बरोबर ऑफीसचे मित्र होते. सौरकुंडी पास हे १३,००० फूट उंचीवरचे ठीकाण आमचे लक्ष होते. या मार्गावरची ही पहीलीच मोहीम होती. तीन टप्पे पार करून एका विस्तीर्ण पठारावर आम्ही पोचलो. दमल्यामुळे पाठ टेकल्या टेकल्याच गाढ झोप लागली.

साधारण पहाटे चारच्या सुमारास मला माझ्या सहकारी मित्राने उठवले. लगतच्या तंबूबाहेर काहीतरी गोंधळ चालला होता. आम्ही दोघे बाहेर आलो. आधीच्या तुकडीतल्या एकाची तब्येत अगदी खालावली होती. श्वास घेणेही त्याला जड जात होते. त्याच्या घशातुन येणारी घरघर थरकाप उडविणारी होती. आमच्या तुकडीत दोन डॉक्टर होते. प्रथमोपचाराचे सामान पण होते. पण त्याला बहुदा न्यूमोनिया झाला होता. त्या साठी कोणतीच औषधे नव्हती, तसेच प्राणवायू पुरवायची सोय पण नव्हती. मानवी वस्तीपासून आम्ही एवढे लांब होतो की मदत मिळण्याची कोणतीही शक्यता नव्हती. मृत्यू त्या बर्फाच्छादीत दर्या खोर्यात योग्य वेळेची वाट पहात होता. वातावरणात गंभीर झाले होते. निसर्गापुढे आपण किती शूद्र आहोत ही जाणीव अस्वस्थ करणारी होती. मला सारखे वाटत होते की काही चमत्कार होईल आणि लष्कराचे एखादे हेलीकॉप्टर आकाशात उगवेल व एखाद्या पाश्चिमात्य चित्रपटाच्या धर्तीवर त्याला मदत मिळेल पण कल्पना व वास्तव यात किती अंतर असते नाही ?

अचानक त्याच्या चेहर्यावरचा ताण पूर्ण निवळला. त्याचा श्वास पुर्ववत झाला. चेहर्यावर हास्य उमलले. आमचेही चेहरे उजळले. पण पुढच्याच क्षणी त्याची प्राण ज्योत मावळली होती.तुकडीतल्या दोन्ही डॉक्टरांनी तशी अधिकृत घोषणा केली आणि सगळ्या वातावरणातच सन्नाटा पसरला. show must go on --- आम्हाला पुढ्च्या मुक्कामाकडे कूच करावेच लागणार होते. नि:शब्द वातावरणात आम्ही सर्व ते ठीकाण सोडण्यास तयार झालो. जाताना त्याला आदरांजली वाहण्यासाठी आम्ही सर्व उभे राहीलो. कर्नाटकातून आलेल्या श्री. गोखले यांनी गीतेतला "नैनं छीन्दंती शस्त्राणि--" हा श्लोक धीरगंभीर आवाजात म्हटला. त्या नंतर गीतेतला १५ वा अध्याय. मग सर्व १ मिनीट स्तब्ध उभे राहीलो. त्यावेळी हीमालयातल्या दर्या-खोर्यातुन वाहणार्या वार्याचे अजब गुंजन मला ऐकू आले. जणू हिमालयच या वीराला आदरांजली वाहत होता. क्षणभर मलाही वाटून गेले, किती भाग्यवान आहे हा, हिमालयाच्या कुशीत मृत्यू यायला किती भाग्य हवे !

मोहीम फत्ते करून आम्ही बेस कँम्पला परतलो. कँम्पवर घबराट पसरू नये म्हणून ही बातमी गुप्त ठेवण्याच्या सूचना आम्हाला आधीच मिळाल्या होत्या. पण तरीही आमच्या तूकडीने कँम्प फायर मध्ये हा मुद्दा मांडलाच. ताबडतोब मुख्य शिबीर प्रमुखाने ध्वनिवर्धक यंत्रणा बंद करून शेकोटीचा कार्यक्रम बंद पाडला. शेवटी आम्ही आमच्या सर्व सूचना त्यांना लेखी दिल्या. एका तळ-प्रमुखाचा मृत्यू दडपणे योग्य नव्हे. यात आयोजकांचा उघड निष्काळजीपणा आहे. जिथे मुख्य तळ होता त्याच गावात भारतीय लष्कराच्या rescue team चा तळ होता. अशा आपत्-प्रसंगी त्यांची मदत घेतली जावी असेही सूचवले.


तो गिर्यारोहक मुंबईचा होता. Reserve Bank मध्ये तो अधिकारी होता. मराठी होता. तळाची व्यवस्था बघणार्या टीम मध्ये तो होता. जिकडे त्याचा मृत्यू झाला त्या तळावर तो ७ दिवस आधी दाखल झाला होता. गिर्यारोहकांच्या तंबूची उभारणी व इतर व्यवस्था त्याला करून घ्यायची होती. हवामान अचानक बिघडल्यामुळे दोन दिवस त्यांचा मुख्य तळाशी संपर्क तूटला होता. दोन दिवस अत्यंत प्रतिकूल वातावरणात त्याला रहावे लागले. त्या मुळेच त्याला न्युमोनिया झाला असावा. मुंबईत त्याचे वडील शेवटच्या घटका मोजत होते. आपल्या वडीलांचे शेवटचे दर्शन तरी घ्यायला ये असा निरोप त्याला घरून गेला होता. यूथ हॉस्टेलने ही त्याला मोकळे केले होते. पण हा मराठमोळा गडी. हट्टाला पेटला होता, आधी लगीन कोंढाण्याचे ! जबाबदारी आधी पार पाडणार मगच मुंबई गाठणार ! विधीलिखीत काही वेगळेच होते ! मला अजूनही कळले नाही , त्याच्या वडीलांना आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळण्याआधीच मृत्यूने गाठले असेल की--- ?

२ टिप्पण्या:

Charita म्हणाले...

खूपच छान लेखनशैली आहे तुमची एकनाथ काका..
तुमचे या सुंदर लिखाणाबद्द्ल अभिनंदन आणि भविष्यातही असेच सुंदर आणि भवपुर्ण लिखाण आम्हाला
वाचावयास मिळेल ही इश्वरचरणी प्रार्थना..

प्रशांत म्हणाले...

मस्त लेख आहे.
खरोखर हेवा वाटावा असा मृत्यु.