रविवार, १५ जून, २००८

पत्रनामा !

पत्रनामा !
संपादकांना पत्रे / लेख
विविध दैनिकांच्या संपादकांना पत्र लिहीणे हा माझा आवडता छंद, ती पत्र कचर्याच्या पेटीत फेकून देणे हा त्यांचा (संपादकांचा) आवडता छंद ! तरीही माझी काही पत्रे / लेख नजरचूकीने पेपरात छापली गेली, तेव्हाही ती कोणी वाचली नसणारच, बघु आता तरी कोणी वाचते का !

लोकसत्ता / २९ मे १९८८ / त्यांना फाशीच द्यावे.

सुवर्णमंदीर अतिरेक्यांच्या जोखडातुन मुक्त केल्याबद्दल सुरक्षा दलाचे अभिनंदन ! या वेळी फारसा रक्तपात झाला नाही ही समाधानाची बाब आहे. आता पुन्हा या प्रश्नावर तोडगा निघाल्यास पुन्हा सर्व अतिरेक्यांना मुक्त करण्याचा वेडेपणा पुन्हा करू नये. कठोर उपायांचा सतत पाठपुरावा केल्यास पंजाबातील दहशतवाद आटोक्यात येईल.

अतिरेक्यांचा कणा मोडावा म्हणून मी खालील उपाय सुचवत आहे. तुरूंगातील अतिरेक्यांची कट्टरता हा निकष मानून यादी बनवावी. जो पर्यंत निरपराध लोकांच्या हत्या थांबत नाहीत व अतिरेकी आपल्या शस्त्रांसकट शरण येत नाहीत तोपर्यंत २४ तासाला एक या प्रमाणे एकेकाला फासावर लटकवावे. कोणा मानवतावाद्याने याविरूद्ध गळा काढलाच तर त्यालीही फाशी द्यावे. या योजनेची 'हँग लिस्ट फॉर हिट लिस्ट' या नावाखाली जाहिरात करावी.

अमृत / मार्च १९९० / बुध्दीबळाचे किती डाव खेळता येतील ?

बुध्दीबळाला बैठ्या खेळाचा राजा म्हणतात. भारतात व सार्या जगात कित्येक शतकांपासून हा खेळ खेळला जात आहे.

अवघी ६४ घरे व ३२ मोहरा असून सुद्धा एवढ्या वर्षात बुध्दीबळाचे सर्व डाव संपले अशी वेळ कधी आली नाही ! बुध्दीबळाचे सर्व डाव कधी संपतील याचा हा अत्यंत ढोबळ अंदाज तुम्हाला आ वासायला लावील !

बेल्जीयम गणिती श्री.क्रैचिक यांची याबाबतची आकडेमोड पहा;

अगदी पहीली खेळी पांढर्याची २० प्रकारे होउ शकते, उदा. प्याद्यांपैकी कोणतेही प्यादे १ किंवा २ घरे व दोन घोड्यांच्या प्रत्येकी दोन दोन खेळ्या. उत्तरादाखल प्रतिस्पर्धी (काळ्या मोहरा) २० खेळ्या करू शकेल, म्हणजेच खेळाची सुरवातच २० x २० = ४०० प्रकारे करता येईल ! त्या नंतर संभाव्य खेळांची संख्या उत्तरोत्तर वाढतच जाईल. उदा. पांढर्याच्या प्यादे राजा ४ या खेळीनंतर पुढच्या खेळीला तो २९ संभाव्य चाली करू शकेल. राजा ५ या स्थानावरील वजीरच २९ चाली करू शकतो.

सुलभ आकडेमोडीकरीता आपण असे गृहीत घरू की १) पहील्या ५ चाली दोन्ही बाजूंना २० प्रकारे करता येतील २) यापुढे प्रत्येक स्पर्धक ३० प्रकारे चाली करू शकेल ३) प्रत्येक डाव सरासरी ४० चालींचा समजू.

आता आपले उत्तर असे-
= ( २० x २० ) चा पाचवा घात x ( ३० x ३० ) चा ३५ वा घात
= २ x १० चा ११६ व घात

जगातले सर्व लोक २४ तास सेकंदाला १ चाल या वेगाने खेळत बसले तरी हे सर्व डाव संपून जायला १० चा १०० घार एवढी शतके लागतील !

(Mathematics can be fun या रशियन पुस्तकावरून)

महाराष्ट्र टाईम्स / २४ नोव्हेंबर १९९० / नकळत की न कळल्यामुळे

दूरदर्शनने 'कळत-नकळत' चित्रपट दूपारी दाखवून गोड धक्का दिला. धन्यवाद !

थोडफार ईंग्रजी कळत असल्यामुळे नकळत मराठी संभाषण व पाठोपाठ येणारी ईंग्रजी टायटल्स पडताळत होतो. खुप वेळा त्यांचा क्रम चुकत होता व भाषांतर अगदीच सुमार वाटले. अनेक वेळा संभाषणातीला मूळ अर्थ अजिबात भाषांतरीत होत नव्हता. अमराठी लोकांची अशाप्रकारे फसवणुकच होत असणार. या चूका नकळत होतात की न कळल्यामुळे ?

महाराष्ट्र टाईम्स / १९ ऑक्टोबर १९८९ / 'उचलेगिरी': प्रथा कायम

२२ जुलैच्या मनोरंजन पुरवणीत 'काला सिंदूर' या चित्रफीतीचा परीचय वाचला. अशाच कथानकाचा 'ब्लँक विडो' हा चित्रपट मागील वर्षी स्टर्लींग मध्ये खूप चालला होता.

प्रख्यात विदेशी चित्रपटांची उचलेगिरी करण्याची प्रथा व्हिडीओ निर्माते सुद्धा पाळत आहेत हे बघून धन्य वाटले !

महाराष्ट्र टाईम्स / २४ डिसेंबर १९९१ / भुजबळंच्या मळ्यातली द्राक्षे आताच आंबट झाली ?

भुजबळांनी शिवसेनेत बंड केले व आपला वेगळा गट स्थापला. या घटनेने सेना नेत्यांचा तोल सूटला आहे. त्यांचे बेबंद बोलणे, लिहीणे त्यांच्याच आंगलट येत आहे हे त्यांच्या गावी नसावे. भुजबळ चहाशिवाय काही पितात, तसेच ते भ्रष्टाचारी आहेत इथपासून ते द्राक्षाचा घडा घेण्याची ज्याची ऐपत नव्हती , तो आता मळयाचा मालक आहे, इथपत्यंत टीका झाली आहे. साहजिक आहे, भुजबळ सेनेत असेपर्यंत या मळ्यातला मलीदा सर्वच सैनिकांना अवीट गोडीचा वाटला असणार, मग त्या पाठच्या पैशाचा उगम का शोधा ? पण आता मळेवाला काँग्रेसवासी झाला, तेव्हा त्या मळ्यातेली द्राक्षे आंबटच लागणार !

महाराष्ट्र टाईम्स / २७ जुलै १९९२ / संस्थापकच संघटना कशी सोडणार ?

सेनाप्रमुखांनी पुन्हा एकदा सेना सोडण्याची स्टंटबाजी केली. इतर पक्षांपेक्षा शिवसेनेतली घराणेशाही खटकणारी आहे कारण राजीव गांधी, अजित पवार इत्यादी निवडणुकीच्या प्रक्रीयेतून नेते झाले, पण सेनेत निवडणुकाच नाहीत ! तसेच नेतृत्वाची दुय्यम फळीच नाही. एक सेनापती व बाकी सर्व म्हणे सैनिक, अशाने संघटनेचा वाढता व्याप कसा सांभाळणार ?

तसेच मनोहर जोशींनी शिवसेन सोडतो म्हटले तर पटेल पण संस्थापकच संघटना कशी सोडणार ? फारतर त्यांना ती संघटना बरखास्त करता येईल.

महाराष्ट्र टाईम्स / २८ मे १९९३ / गुंतवणूकदारांसाठी हा सापळा

केंद्रीय भाग भांडवल नियंत्रकांचे (C.C.I.) नियंत्रण उठल्यावर काही काळ कंपन्यंनी मनमनी अधिमूल्य आकारून गुंतवणूकदारांना पिळून काढले. आताच्या पडत्या बाजारात किमान आवश्यक भरणा होत नाही, हे लक्षात आल्यावर मात्र याच कंपन्या 'सेफ्टी-नेट' च्या नावाखाली गुंतवणुकदाराला सापळ्यात पकडत आहेत.

ही योजना निव्वळ धूळफेक आहे कारझ्ा कंपनी व विती कंपनी यांच्यातला तोंडी करार आहे. याचे कायदेशिर दायित्व कोणावरही नाही !

आपल्या कंपन्या वाटप ते नोंदणी या प्रक्रीयेसाठी किमान ४ महीने लावतात व ही योजना वाटपा पासून फक्त सहा महीने लागू असते. फक्त २० % समभागांची फेर-खरेदी होणार आहे. पण खरोखरच २० % समभाग (प्रथम येईल त्याला प्रथम) खरेदी केले हे गुंतवणूकदारांना कसे कळणार ? यात फसवणूकीला खूप वाव आहे. तेव्हा या सापळ्यात न अडकता या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी गुंतवणूकदारांची संघटना होणे आवश्यक आहे.

सकाळ / २२ नोव्हेंबर २००४ / पंचतंत्रामधील गोष्टीवर सरकार पुरस्कृत डल्ला !
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने प्रसिद्ध केलेल्या इयत्ता ३ री च्या पुस्तकात 'अशी असावी मैत्री ' हा धडा आहे. उंदीर, कासव, कावळा व हरीण या चार मित्रांची गोष्ट सरळसरळ पंचतंत्रामधील हिरण्यक नावाचा उंदीर, मंथरक नावाचे कासव, ल्घुपतनक नावाचा कावळा व चित्रांग नावाच्या हरीणाच्या गोष्टीवरून चोरलेली आहे. श्री. श्रीकांत गोवंडे यांनी ती आपल्याच नावावर खपवली आहे. पंचतंत्रासारख्या जगप्रसिद्ध ग्रंथातील गोष्ट आपल्या नावावर खपविणारा धन्य व त्याहुनी धन्य ते पाठ्यपुस्तक मंडळ जे अशा कथा कसलाही संदर्भ न तपासता त्यांच्या नावाने क्रमिक पुस्तकात छापते. मंडळाचे विद्वान सभासद भले मराठीमध्ये काही वाचत नसतील, पण इंग्रजीसकट सर्वच जागतिक भाषात उपलब्ध असलेला पंचतंत्राचा अनुवाद त्यांच्या वाचनात कसा बरे नाही आला, याचे नवल वाटते. गेली तीन वर्षे हे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात आहे. ही गोष्ट मुलांना सिकविणार्या शिक्षकांच्याही लक्षात आली नसेल तर मात्र परिस्थिती गंभीर अहे !
महाराष्ट्र टाईम्स / २२ फेब्रूवारी २००६ / सुधारणांचे वारे हार्बरवर केव्हा वाहणार ?
मागील आठवड्यापासून मध्य रेल्वेच्या लोकल ताशी १०० कि.मी. वेगाने धावत आहेत व त्यामुळे १० मिनीटांचा वेळ वाचला आहे.सहा नवीन सेवा सुरू झाल्या आहेत. हार्बर मार्गावर मात्र पनवेल ते मुंबई प्रवास ७५ मिनीटावरून ७८ ते ८० मिनीटे झाला आहे. मागील तीन वेळापत्रकात एकही नवी सेवा दिलेली नाही. मध्य व पश्चिम रेल्वेवर नवे कोरे डबे धावू लागले, हार्बर वर मात्र भंगारात निघालेले, धुळीने माखलेले 'डबे' धावत आहेत !
हार्बर वर सुद्धा मानखुर्द ते पनवेल अंतर १०० च्या वेगाने कापता येईल, पनवेल ते मुंबई प्रवास ७५ मिनीटावरून ६५ ते ७० मिनीटात करता येईल, १० मिनीटाच्या अंतराने गाडी, एखाद दूसरी जलद लोकल सोडता येईल. जलद गाडी हेच अंतर एका तासात पार करेल. हार्बरचे प्रवासीही पैसे मोजूनच प्रवास करतात. तेव्हा नवी कोरी गाडी या मार्गावरही पळू द्या की ! सुधारणांचे वारे हार्बर मार्गावरही वाहू द्या की !

महाराष्ट्र टाईम्स / १ एपिल १९९८ / अभिनंदन आणि अपेक्षा
रेल्वे प्रवाशांविषयी खरीखुरी आस्था असलेले व अभ्यासू खासदार श्री. राम नाईक आता त्याच खात्याचे राज्यमंत्रा झाले आहेत. अभिनंदन !
पश्चिम रेल्वेवर कूपन पद्धत सुरू होउन चार वर्षे झाली व प्रवाशांचा रांगा लावायचा त्रास कमी झाला. पण ही कूपने फक्त पश्चिम रेल्वेवरच चालतात. मध्य रेल्वे अजून आपल्या प्रवाशांना ही सोय उपलब्ध करून देत नाही. यामुळे रविवारच्या दिवशी कोठे जायचे असल्यास वडाळ्यासारख्या ठीकाणी २० ते ४० मिनीटे रांग लावावी लागते. श्री. नाईक यांनीच आता पुढाकार घेउन दोन्ही रेल्वेवर चालणारी कूपन पद्धत सरू करावी व लाखो प्रवाशांचा वेळ वाचवावा, दुवा घ्यावा !
महाराष्ट्र टाईम्स / २९ ऑगस्ट १९९६ / इंग्रजांच्या काळातील कायद्यांमुळे हे प्रश्न !
महाराष्ट्रात सत्तांतर झाले, पण लोकांच्या दुर्दैवाने कायदे मात्र अजून इंग्रज काळातलेच आहेत ! यामूळे खंडणी गोळा करणे. धिंड काढणे, वाटमारी करणे या गोष्टी बेकायदेशीर ठरवून पत्रकार उगाच गळा काढतात तेव्हा सरकारने खालील सुधारणा अमलात आणाव्यात.
विरोधी पत्रकारांना हत्तीच्या पायी द्यावे. राजकीय विरोधकांच्या घरावरून गाढवाचा नांगर फिरवावा (आजचा रणगाडा !), स्वकिय विरोधकांची (मराठी माणसे) तोंडाला काळे फासून धिंड काढावी. पोलीस दल बरखास्त करून त्यांचे सर्व अधिकार शिवसैनिकांना द्यावेत. शासन जे कर गोळा करते, त्यालाच खंडणी म्हणावे, म्हणजे या शब्दाला प्रतिष्ठा प्राप्त होईल. या सर्व सुधारणा निदान राज्यघटनेत तरी करून घ्याव्यात, म्हणजे घटनाभंग होतो असेही कोणी म्हणणार नाही.
लोकसत्ता / १७ ऑगस्ट / 'सेबी' ला न जुमानणारी कल्याणी स्टील
मी कल्याणी स्टीलचा एक भागधारक आहे. ऑक्टोंबर १९९२ च्या हक्कभागविक्रीचे वाटप-पत्र मी पूर्ण भरणा करून व त्या पावतीसह कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाला पाठवून दिले. कंपनी त्याऐवजी मला 'भरणा पूर्ण' केला अशी नोंद करून प्रमाणपत्रे एका महीन्यात देणार होती.
मी पाठवलेले वाटप-पत्र कंपनीला २९ जानेवारीला मिळाल्याची पोच पावती मला मिळली. दोन महीने वाट पाहून महीन्याच्या अंतराने कंपनीला स्मरणपत्रे पाठवत आहे. दरम्यान माझे गार्हाणे सेबीकडे नेले. सेबीने मला ACK REF NO.93/1/138495 DATE 21-6-93 देउन कंपनीच तुम्हाला परस्पर उत्तर देईल असे कळविले ! पुन्हा महीनाभर वाट बघून सेबीला कळवले आहे.
सेबीला कायदेशीर दर्जा मिळून सुद्धा ती अशी कागदी घोडीच जर नाचवणार असेल तर गुंतवणूकदारांनी कोणाच्या तोंडाकडे बघावे ?

म.टा / २६ मार्च २००६ / नवाच्या फेर्यात 'नव'महाराष्ट् !सकाळ / १३ मार्च २००६ / नवाच्या फेर्यातला 'नव'नेता !
शिवसेनेतून बाहेर पदून राज ठाकरे यांनी परत नवाचा आकडा पाहून नवीन पक्षाचे नामकरण केले ! गेल्या काही वर्षात महाराष्ट्र बाबा, बुवा व महाराजांनी पार बिघडवून टाकला आहे. यांच्या भोंदूगिरीच्या नादाला लागून मराठी माणूस अंधश्रद्धेच्या गाळात रूतत चालला आहे. मुंबई सोडाच , सर्वच शहरांचा लचका परप्रांतिय तोडत आहेत. ज्या प्रबोधनकारांनी बुवाबाजी, कर्मकांड व अंधश्रद्धेच्या विरोधात रान उठवले त्यांचाच नातू पक्ष सोडण्यापासून ते नवा स्थापन करणेपर्यंत तारखेत नउ शोघतो हा केवढा दैवदुर्विलास ! शिवसेनेत असताना राज ठाकरे विद्यार्थी सेनेचे प्रमुख होते. याच काळात शिक्षणक्षेत्रात अनागोंदी माजली. भरमसाट फी आकारणी, पेपरफूटी, परीक्षांचे कोलमडलेले वेळापत्रक, निकालात सुद्धा गोंधळ , असे होउ लागले. तेव्हा राज फक्त व्हँलेंटाईन डेला विरोध करीत होते ! काकांच्या इस्टेटीतून बेदखल केले गेल्यावरच आता ते पोटापाण्यासाठी नवा पक्ष काढत आहेत. महाराष्ट्राला आज गरज आहे ती गाडगे महाराजांसारख्या संतांची व स्वा. सावरकारांसारख्या बुध्दीप्रामाण्यवादी नेत्याची. तरच महाराष्ट्राच गाड रूळावर येईल. नवाच्या फेर्यात अडकलेले 'नवयुवा' नेते 'नव' महाराष्ट्र कसा निर्मिणार ? असेच धरसोड वृतीने वागल्यास नव्या पक्षाची नवलाई नौ महीनेसुद्धा टिकणार नाही !

महाराष्ट्र टाईम्स / १९ ऑक्टोबर २००४ / पोस्टपेड ग्राहकांना झुकते माप का ?
भारतात मोबाईल युग अवतरल्यापासून सेल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांची विभागणी पोस्टपेड किंवा बिलींग आणि प्रीपेड अशी करून टाकली आहे. पण दर आकारताना पोस्टपेड साठी कमी व प्रीपेड ग्राहकांना जास्त दर आकारला जातो. या मागचे कारण कोणी सांगितले नाही !
मोबाईल कंपन्यांच्या दृष्टीने सुद्धा पोस्टपेड ग्राहकांना झुकते माप देण्यात काहीच 'अर्थ' नाही. ३० दिवसाच्या प्रीपेड रिफीलची किंमत साधारणपणे ३२५ रूपये असते. पण प्रत्यक्षात ग्राहकाला १२५ ते २४० रूपये एवढाच टॉक टाईम मिळतो. हे पैसे कंपनीला आगाउ मिळतात. ३६५ दिवस मुदतीची रिफील कूपन्स सुद्धा उपलब्ध आहेत. यावरून किती मोठ्या प्रमाणात आणि काळासाठी कंपन्यांना आगाउ पैसे मिळतात याची कल्पना यावी. याउलट पोस्टपेड ग्राहकाचे बिल ३० दिवसाच्या वापराचे असते व ग्राहकाला पैसे भरण्यासाठी २१ दिवसाची मुदत मिळते. बिल तयार करणे, कागदावर छापणे, ग्राहकाच्या घरी पोचवणे, बिले गोळा करणार्या संस्थाची दलाली, मुदत संपल्यावर देयकांची गोळा-बेरीज करणे यावरचा खर्च बराच असतो. पैसे बुडविणारे ग्राहक ही मोठी समस्याच आहे. प्रीपेड ग्राहकाच्या बाबतीत यातले काही संभवत नाही. गुप्त क्रमांक ATM मशीन देते किंवा संदेश पाठवून पण मिळतो. पैसे वसूलीसाठी पोस्टपेड ग्राहकाच्या नाकदूर्या ओढणार्या, प्रसंगी काही रकमेवर पाणी सोडणार्या कंपन्या, मुदत संपताच खात्यात पैसे शिल्लक असले तरी प्रीपेड ग्राह्काच्या सर्व सवलती बंद करतात, अगदी फूकट येणारा इनकमिंग कॉल सुद्धा ! जखमेवर मीठ चोळणे म्हणतात ते हेच !
तेव्हा दराच्या बाबतीत झुकते माप द्यायचेच असेल तर ते प्रीपेड ग्राहकांना दिले पाहीजे. न पेक्षा समान दर तरी आकारावा एवढीच रास्त मागणी. एअरटेल चे श्री. सुनील मित्तल मान्य करतात की त्यांना जास्त उत्पन्न प्रीपेड ग्राहकांकडून मिळते, मग समान दर आकारणी करून व्यावहारीक शहाणपण केव्हा दाखविणार ?

सकाळ / १६ जानेवारी २००६ / अस्सा खड्डा सुरेख बाई !

अगदी मागील वर्षापर्यंत पनवेलमध्ये रस्तेच नव्हते. अचानक सिडको प्रशासनाने रस्ते बांधायचा सपाटा लावला आणि सगळीकडे रस्तेच रस्ते झाले ! सेक्टर ५, तुलसी हाईट जवळील रस्ता बांधताना मध्येच तोफेच्या तोंडासारखा उभा पाईप आडवा आला. चारी बाजूंनी चर खणून, पाईप तसाच ठेउन रस्ता पूर्ण(?) करण्यात आला. या रस्त्याचा वापर शाळकरी मुले व त्यांना नेणारे-आणणारे पालक मोठ्या प्रमाणावर करतात. लहान वयातच मुलांना अखंड सावधानतेचे बाळकडू मिळावे या उदात्त हेतूने हा कड्डा असाच ठेवला गेला. या काळात अनेक 'डोळे असून आंधळ्यांना' या खड्ड्याचा कृपाप्रसाद मिळाला. लोकांनी संयम आणि शांति पाळून हा अभिनव प्रयोग चालू ठेवला. यथावकाश ही कल्पना लोकात चांगलीच रूजली. बाकीच्या सेक्टर मधील लोक पण 'अस्सा खड्डा सुरेख बाई ' च्या चालीवर अशा खड्ड्याची मागणी करू लागले. प्रशासनानेही रस्ते व फूटपाथ बांधताना लोकभावनेची दखल घेतली. यासाठी रस्त्यात जिथे मँनहोल असेल तिथे गोलाकार खड्डे करण्यात आले. फूटपाथवर काही ठीकाणी झाकणेच बसवली नाहीत व जिथे फूटपाथ संपतो तिथे खड्डा खणून ठेवला ! पण प्रयत्न करूनही उभा पाईप काही बसवता आला नाही. त्यामुळे 'या सम हा' असा या खड्ड्याचा बहुमान कायम राहीला !
या प्रयोगाला म्हणता म्हणता (पडत धडपडत ?) एक वर्ष होत आहे. हेच औचित्य साधून या खड्ड्याचा वाढदिवस साजरा करायचे घाटत आहे. समारंभाचे साधारण स्वरूप असे असेल, सुरवातीला या खड्ड्यामुळे मोक्ष मिळालेल्यांना आदरांजली, ही सुपीक कल्पना ज्यांना सूचली त्यांचे स्वागत व मनोगत, ज्यांच्या आयुष्यात या खड्ड्यामुळे बदल झाले, उदा. तिसरा पाय, व्हीलचेयर योग, त्यांचे मनोगत व हाडवैद्यांनी प्रायोजित केलेल्या चहापानाने समारोप ! (उत्सव समितीत सामिल होण्यासाठी ९८६९१३९३३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.)

सकाळ / १७ फेब्रूवारी २००६ / ते 'फेकी' गोलंदाजच !
आय.सी.सी. काहीही म्हणो, शोएब, मुरली, ब्रेट ली 'फेकी' गोलंदाजच आहेत ! जन्मजात व्यंग आहे हा बचाव होउच शकत नाही. या उपरही त्यांना क्रीकेट खेळायचे असेल तर आजकाल अपंगाचे सुद्धा क्रीकेट सामने होतात. अशा संघातून त्यांनी खुशाल खेळावे !

सकाळ / १६ जुलै २००७ / कधी येशील परतून ?
दाउद इब्राहिमला अनावृत्त पत्र
प्यारे दाउद,सलाम आलेकूमतुझ्या भावाला कोर्टाने बाईज्जत रिहा केले हे तुले कळले असेलच. मुबारक हो मियाँ. मागच्याच आठवड्यात तुझ्या बहीणालाही भारतातील नि:स्पृह न्यायालयात न्याय मिळाला. हिंदी चित्रपटात जसा खलनायक नायकाच्या आईला अथवा प्रेयसीला ओलीस ठेवतो तसेच आबांच्या पोलीसांनी तुझ्या बहीणीला अडकवायचा विडा उचलला होता. तू तिला वाचवायला आलास कि पोलीस तुझाच 'गेम' करणार होते ! पण हसीनाच्या करीष्म्याने आबांचा हिरमोड झाला ! शेवटी बहीण कोणाची ? मान गये भाई ! या पारायणात मुद्द्याचे राहून जायचे. या दोन प्रकरणातून 'दुखके दिन बीते रे भैया' हेच दिसून येते. तेव्हा स्वत:चा प्यारा हिंदोस्ता सोडून तू तरी का बाबा असा दर दर के ठोकरे खात हिंडतो आहेस ? परवा दुबई तर आज कराची ?
देशातीला आर्थिक विषमता दूर व्हावी म्हणून प्रस्थापित सरकारविरूद्ध तू बंड पूकारलेस. सरकारी ससेमिरा पाठी लागल्यामुळे तुझ्यावर परागंदा व्हायची पाळी आली. तरी तुझी लोकप्रियता वाढतच होती. मग सरकारने ९३ च्या बॉम्बस्फोटात तुला गोवले व मुस्लीम अतिरेकी घोषित करून तुझे परतीचे दोरच कापून टाकले. तुझ्या निष्ठावंत सहकार्यात (सरकारी शब्द गँग) सर्वच धर्माचे लोक होते. (सरकारी शब्द सेक्यूलर) या आरोपानंतर तुझे हिंदू सहकारी बिथरले, तुझी साथ सोडली. (पण पोलीसांना हे कोठे पटायला ? त्यांनी त्यांचा एन्काउंटरच केला !)तुला गंमत सांगतो. शिवाजी महाराजही आम्हाला लहानपणी कट्टर हिंदूत्वनिष्ठ वाटायचे. त्यांनी मुस्लीम आक्रमकांपासून मुस्लीम धर्म वाचवला ,वाढवला असा गैरसमज झाला होता. मग सरकारी क्रमिक पुस्तकातिन कळले की महाराजही सर्वधर्मसहभावी होते. त्यांनी खानाचा कोथळा बाहेर काढला हे ही खोट्टं.
मग हाच न्याय तुला का नाही ? तू बापडा पवार साहेबांना फोन लावून बाकी कसलेही आरोप करा पण देशद्रोहाचा कलंक लावू नका असे विनवलेस. पण साहेब पडले पक्के राजकारणी. त्यांनी तू मूळात न फोडलेल्या बॉम्बमध्ये आणखी एक अधिकचा फोडला व इनोसंट संजूबाबाला पण गोवला. तू कलेवर नि:स्सिम प्रेम करणारा, कलाकारांवर खैरात करणारा, म्हणून ते ही तुझ्यासाठी कूर्बान होण्यास तयार. विजनवासात तू असताना तुला रीझवायला कलावंत दुबईला यायचे. सरकारने त्यांनाही धमकावले.
सच्चा भारतीयाप्रमाणे क्रिकेटवर तुझे जीवापाड प्रेम. वाळवंटात तू क्रिकेट फूलवलेस. आपल्या खेळांडूवर दौलतजादा करून त्यांना आपलस करून टाकलस. छळ तरी किती सोसावा ? बेटीची सगाई झाली, तीही जावेदमियाँच्या पोर्याबरोबर, पण लाडक्या लेकीची बिदाईही तुला करता आली नाही. कसा तीळ तीळ तूटला असशील ते एक बापाचे मनच जाणो. हीच शादी जर कोकणात झाली असती तर कोकणी माणसाच्या डोळ्याचे पारणे फिटले असते व घाटावरल्या लोकांचे डोळे उघडले असते. भारतात कोठे खुट्ट झाल तरी तुझ्यावर खापर फोडून पोलीस आपले तंबाखू मळायला मोकळे ! आपल्याने काही होत नाही म्हटल्यावर त्या अमेरिकेलाही तुझ्याविरूद्ध भडकवले. तुला बढती मिळून तू आंतरराष्ट्रीय दहशतवादी झालास ! जॉर्ज अंकलचा रोष नको म्हणून दुबईने तुझी पाठवणी केली भारत-पाक मैत्रीचे खंदे पुरस्कर्ते मुशर्रफ मियाँकडे. तिकडे तुझी चांगली बडदास्त आहे हे वाचून बरे वाटले. पण म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती ! तू भारतात शेर असलास तरी आंतरराष्ट्रीय राजकारणात प्यादेच ! मुशर्रफ मियाँ पक्का लबाड आहे. आपली सत्ता वाचविण्यासाठी तो तुला भारताच्या ताब्यात न देता 'जिंदा या मुर्दा' सँम अंकला ला नजर करेल आणि तुझा सद्दाम होईल ! तेव्हा भारतात न्यायसंस्था स्वायत्त आहेत तोपर्यंत परत ये रे बाबा, तुझीही अवस्था कराचीचा समुद्र बघून 'सागरा प्राण तळमळला' अशी झाली असताना मातृभूमीला परतून का येत नाहीस ?
तुझा आणि तुझ्याच वाटेकडे डोळे लावून बसलेला कोकणी माणूस.

महाराष्ट्र टाईम्स / २६ जुलै २००७ / साध्या राहणीचा राष्ट्रपती
पाच वर्षे राष्ट्रपती पद भुषविलेले डॉ. कलाम आता निवृत्त झाले आहेत. त्यांच्या रूपाने देशाला प्रथमच कुठघी 'इझम' न मानणारा, सुसंस्कृत, शालीन, मृदू प्रकृतीचा, साध्या राहणीचा राष्ट्रपती मिळाला. त्यांच्यात समाजाच्या सर्व स्तरांत मिसळण्याची विलक्ष हातोटी होती. राष्ट्रपतीपदाला त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवले. ते स्थान टिकवणे हेच पुढील राष्ट्रपतीसमोर आव्हान असेल. असे असले तरी अफरोझ प्रकरणात निर्णयच ने घेउन त्यांनी स्वत:ची प्रतिमा डागाळून घेतली. त्यांच्यासारख्या 'मिसाईल मँन'ला हे शोभत नाही.
सकाळ / ६ एप्रिल २००६ / पे अँण्ड पार्क की खंडणीवसूली केंद्र ?
पनवेल रेल्वे स्थानकाजवळ, नवीन पनवेलच्या बाजूने 'पे अँण्ड पार्क' च्या नावाखाली वाहनचालकांकडून सरळसरळ खंडणी वसूल केली जात आहे. कोठलेही कागदपत्र न दाकविता, रीतसर पावती न देता उडवाउडवीची उत्तरे देउन पार्कींग चार्जेस च्या नावाखाली अव्वाच्या सव्वा दराने वसूली चालू आहे. वाहनचालकांना कोणतीही सुविधा न देता संपूर्ण नवीन पनवेलच्या रेल्वेस्थानकालगतचा परीसर ताब्यात घेउन ही लूट चालू आहे. त्यामुळे रीक्षाने स्थानकावर येणार्या प्रवाशांची पायपीट वाढली आहे. पार्किग (?) चे दर तर दुचाकी वाहनासाठी दिवसाला १६ रूपये, मासिक पास १५० रू. एवढे चढे आहेत ! एवढे पार्किंग चार्जेस मुंबईतही नाहीत ! रेल्वे व सिडको कर्मचारी आपणास काहीही माहीत नाही असे म्हणून कानावर हात ठेवत आहेत. आता वाहनचालकांनीच एकत्र येउन ही वसूली बंद पाडली पाहीजे.
सकाळ / २४ फेब्रूवारी २००७ / श्वान जगला पाहीजे !
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत २० श्वानांवर विषप्रयोगाचे वृत्त वाचून हादरलो ! प्राणिमित्रांची चौकशीची मागणी रास्तच आहे. मी तर म्हणतो C.B.I. चौकशी हवी. श्वानांसाठी कायदा हाती घेता काय ? मारताना त्या श्वानांची नसबंदी झाली होती हे ही विसरलात ? तुमच्या या आततायी कृत्यामूळे सार्या जगात भारताची छी थू होईल. ज्यांना न्यायालयाचेही अभय आहे, त्यांनाच ठार मारलेत ? श्वान चावला तर लस बाजारात आहे ना ? श्वान भूंकतो तर कानात बोळे घाला. निषेधच व्यक्त करायचाय तर मूक मोर्चा काढा. न्यायालयात अर्जी द्या. संयम बाळगा. तुमचा कित्ता गिरवून उद्या श्वानत्रस्त लोकांनी श्वानसत्र आरंभले तर महाराष्ट्रातून श्वानजमात नष्ट नाही का होणार ? माणूस नष्ट झाला तरी चालेल, श्वान जगला पाहीजे ! या पापाली क्षमा नाही. या पाप्यांना देहान्त प्रायश्चितच हवे !
महाराष्ट्र टाईम्स / ५ जून २००७ / फौजदारी कायदा गुंडाना जरब बसवण्यास पुरेसा
सध्या एन्काउंटर फेम पोलीस अधिकारी मीडीयाचा वापर करून आपल्या पापाचे समर्थन करीत आहेत. पोलीसांना हप्ते देउन गुंड जमीन बळकावणे, धमकी देउन खंडणी वसूली असे धंदे करीत असतात. त्यांच्या प्रत्येक कारवाईची पोलीसांना आगाउ कल्पना असते. जेव्हा गुंड त्याच्या टोळीप्रमुखाला फसवतो, पोलीसांच्या मागण्या पुरवू शकत नाही, तेव्हा प्रतिस्पर्धी टोळीकडून सूपारी घेउन एन्काउंटर घडवले जाते. सामान्य जनता निर्भय व्हावी व तिला उपद्रव होउ नये असा उद्देश त्यामागे अजिबात नसतो. आपला फौजदारी कायदा गुंडाना जरब बसविण्यास पुरेसा आहे. जोशी-अभ्यंकर खटल्यातले आरोपी, बिल्ला-रंगा फासावर चढवले गेले होतेच ना ? तेव्हा कोठे एन्काउंटर करावा लागला ?

सकाळ / ९ एप्रिल २००७ / टीम इंडिया भारताची नाही !
विश्वकरंडक स्पर्धेत पहील्या आठातही स्थान न मिळाल्यामूळे देशभर जनशोभ उसळला. पहा हा शोभ वृथा आहे. ज्यांची पात्रता नाही त्यांना अतिआदर दाखविल्याचा हा परिणाम आहे. मुळात ज्याला आपण टीम इंडिया म्हणतो ती भारताची अधिकृत टीमच नाही, असा खुलासा क्रिकेट नियामक मंडळाने भर न्यायालयातच केलेला आहे ! कचखाउपणा भारतीयांच्या रक्तातच भिनलेला आहे आणि तो स्वाभाविकपणेच संघात उतरला आहे. सांघिक कामगिरीपेक्षा व्यक्तीगत कामगिरीचेच आपण स्तोम माजवतो. आपल्या लोकांकडे आधी खर्च करायला वेळ भरपूर होता, आता त्यात पैशाची भर पडली आहे. हा पैसा आपल्या खिशात यावा यासाठी उत्पादक कंपन्या जाहिरातीवर कोट्यावधी रूपये खर्च करतात. लोक या जाहिराती पाहून त्यांच्या उत्पादनांवर उड्या मारतात, शीतपेये ही किटकनाशके आहेत हे सिद्ध होउनही खेळाडू त्यांची जाहिरात करतात, नव्हे तरफदारी करतात, म्हणून खपतात. मग प्रत्येक मोठ्या स्पर्धे आधी जाहिरात विशेष जाहीरात मोहीमा राबवतात. आपला संघ जिंकणार हे लोकांवर हँमर केले जाते. संघनिवडीतही प्रायोजक कंपन्या आपले प्यादे पुढे दामटवतात. सेहवागसाठी द्रविड नडून बसतो तेव्हा त्याचा बोलविता धनी कोणी वेगळाच असतो. ना सलामीचा प्रश्न सूटलेला, ना चांगल्या गोलंदाजांचा. क्षेत्ररक्षणात तर आनंदी आनंदच. असा हा संघ विश्वविजय करायला निघतो. जाहीरातदार तर या संघात हवा भरतच असतात !
काही दिवसांनी नव्या दौर्याची घोषणा होईल. संघात थातूर मातूर बदल केले जातील, प्रशिक्षक , कर्णधार बदलला जाईल. जाहीरात कंपन्या नवा टीम इंडीयाचे ऐलान करतील व बेडकी बैलाएवढी फुगवायचा खेळ पुढच्या विश्वचषकापर्यंत चालूच राहील !
महाराष्ट्र टाईम्स / ४ एप्रिल २००७ / प्रवाशांचा द्राविडी प्राणायाम वाचवा
मध्य रेल्वेने एप्रिल मध्ये वडाळा-वाशी, वडाळा-पनवेल, वाशी-ठाणे अशा प्रत्येकी दोन-दोन नव्या फेर्या सुरू केल्या. वडाळा-वाशी ही नवी गाडी तशीच पुढे ठाण्यापर्यंत जाते. ही गाडी थेट वडाळा-ठाणे अशी केल्यास प्रवाशांचा द्राविडी प्राणायाम वाचेल.
नवाकाळ / २०/९/१९८५ / प्रँक्टीकल सोशँलीजम फ्रंटचे अभिनंदन
'जेठमलानींचे भाषण बंद पाडले' हे वाचून आनंद झाला. अशा नाठाळांचे खरे तर तोंड फोडायची आवश्यकता आहे.
मध्यंतरी हे जेठमलानी पंजाब मधील खेड्यात 'शांती प्रसारकाचे' काम करीत होते म्हणे ! शांती प्रसाराच्या नावाखाली ते खलीस्तान प्रसाराचे काम तर करीत नव्हते ना अशी शंका घ्यायला खूप वाव आहे.
राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या स्व. लोंगोवाल यांचे वकीलपत्र त्यांनी स्वत:हून इछा प्रगट केली होती यावरून काय तो बोध व्हावा. अशा लोकांवर राजद्रोहाखाली खटले का चालवू नयेत?
एक चांगली कृती केल्याबद्दल 'प्रँक्टीकल सोशँलीजम फ्रंट'चे अभिनंदन !

महाराष्ट्र टाईम्स / ५ जून २००७ / सिडको अधिभार रद्द झालाच पाहीजे
(प्रसिद्ध झालेल्या पत्राचे कात्रण सापडत नाही, पण त्याचा गोषवारा असा आहे.)पनवेल ते मुंबई या मार्गावर रेल्वे धावते त्यासाठी सिडकोने जो खर्च केला आहे त्याच्या वसूलीसाठी सिडको प्रवाशांकडून अशिभार वसूल करते. या अधिभाराची वसूली मागील २० होत आहे,तसेच मार्गावरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता हा खर्च केव्हाच वसूल झाला असला पाहीजे. सिडको या बाबत कोणतीच माहीती उघड करत नाही वर सिडकोचे जनसंपर्क अधिकारी अजून देखभाल खर्चही वसूल झाला नाही असे सांगत आहेत !
माहीतीच्या अधिकाराचा वापर करून रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष श्री. मधु कोटीयन यांनी मिळवलेली माहीती सिडकोचा खोटारडेपणा उघड पाडणारी आहे. रेल्वे कडून मिळालेल्या माहीतीप्रमाणे गेल्या १५ वर्षात पुलाच्या बांधणी खर्चाच्या तिप्पट रक्कम अधिभारातुन वसूल झाली आहे( बांधणी खर्च ४५ कोटी, अधिभार वसूली १४५ कोटी), आधीच्या ५ वर्षाची आकडेवारी उपलब्ध नाही !
तेव्हा प्रवाशांचा अधिक अंत न पाहता सिडकोने अधिभार रद्द करावा.


हे पत्र प्रसिद्ध झाल्यावर सिडकोने खुलासा केला की अधिभार नुसत्या पुलांसाठी नाही तर एकंदरीत नवी मुंबईत रेल्वे जे जाळे विणणार आहे त्याच्या वसूलीसाठी आहे.आजपावेतो सिडकोने खर्च केलेली रक्कम आहे ९१२ कोटी रूपये. तेव्हा दूसर्याच दिवशी मी प्रसिद्धीला दिलेले पत्र असे आहे;
महाराष्ट्र टाईम्स / ६ जून २००७ / तरीही अधिभार रद्द झालाचा पाहीजे.
वाशी पुलाच्या अधिभाराबाबत सिडकोचा खुलासा वाचला. रेल्वे प्रकल्पामुळे सिडकोचा पुरेसा फायदा झालेला आहे. मूळ मालकांकडून सिडकोने कवडीमोल किंमतीत घेतलेल्या जमिनींचे भाव आता गगनाला भिडले आहेत. त्यातली अर्धा टक्का रक्कम जरी बाजूला टाकली तरी प्रचंड निधी जमा होईल. सिडको मालमत्ता हस्तांतर शूल्क आकारते, त्यातलीही काही रक्कम बाजूला काढता येणे शक्य आहे.

वीस वर्षानंतरही अधिभार वसूल करणे ही नागरीकांची पिळवणूकच आहे.

1 टिप्पणी:

Suyash म्हणाले...

काका
उत्तम ब्लॉग!
वाचून मजा आली. नवीन नवीन लेखांची वाट बघतोय

सुयश