मराठे हे तसे भटके आणि विमुक्तच ! माझे वडील, आजोबा आणि आजी ८-१० वर्षाचे असतानाच वारल्यामुळे त्यांच्या काकांकडेच वाढले. 'भिक्षुकी आणि शिक्षकी सोडून काय हवे ते कर' हा चुलत्यांचा आदेश शिरोधार्थ मानून वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी मुंबईची वाट धरली. ज्योतिष या विषयात चांगलेच पारंगत झाले व आपल्या नशीबात स्वत:चे घ्रर नाही तेव्हा त्या फंदात पडायचे नाही असे त्यांनी ठरवले ! मुंबई पोर्ट ट्रस्ट मधे कामाला लागले, लग्न झाले व संसार सुरू झाला ठाण्याला, चेंदणी कोळीवाडयात, १० बाय १० च्या जागेत. आसपास मासळी व हातभट्टीच्या दारूचा वास ! तिथे वर्षभर काढून डोंबिवलीला शिफ्ट झाले, मग गोरेगाव आणि मग आगाशी (विरार जवळ)!
जागा बदलल्या पण स्टेटस 'भाडेकरू' हेच राहीले. आगाशीला सात वर्षे काढून मग आम्ही सगळे मुंबईला, वडाळ्याला office quarter मधे आलो. मित्र विचारायचे स्वत:ची जागा शोध, निवृत झाल्यावर काय कराल ? बाबा सांगायचे, त्याला अजून १२ वर्ष अवकाश आहे, बघू काय ते !या जागेत मात्र स्थैर्य मिळाले. आम्हा चारी भावंडाची शिक्षणे, नोकर्या व लग्न यथाकाल पार पडले. पण या सगळ्यात निवृत्ति दोन वर्षावर आली आणि स्वत:च्या जागेचा पत्ता नव्हताच ! शेवटी पुन्हा एकदा विरार जवळील कोफराड गावात परांजपे नगरात 1BHK चे घर मोठ्या मुष्कीलीने घेता आले. तसे कल्याण, ठाणे येथे मी व बाबांनी जागेचा शोध घेतला होता पण जागेच्या किमती आणि आमच्याजवळचा पैसा याचे प्रमाण फारच व्यस्त होते !
बायको नोकरी न करणारी केल्यावर एकटयाच्या पगारात घर घेण्याचे स्वप्न पडणेही दूरापास्त होते तेव्हा वर्षभर वडीलांकडे राहून प्रसादचा पहीला वाढदिवस विरारला साजरा करून मी वेगळे बि-हाड थाटले ते ही भाड्याच्याच जागेत, कॉटन-ग्रीनला office quarter मधेच !तिथे वर्षभर काढल्यावर वडाळ्याला मोठी जागा मिळाली म्हणून मग बि-हाड तिथे हलवले ! प्रियांकाचा जन्म तिथलाच ! 'बेटी धनाची पेटी' या म्हणीचा प्रत्यय मला लगेच आला व अनेक मार्गानी पैसा मिळू लागला. थोडी आर्थिक सुबत्ता आल्यावर हीला बरे वाटावे म्हणून मी अधून मधून कोठे कोठे जागा बघायला जात असे पण असलेला पैसा लांब कोठेतरी मोठ्ठा ब्लॉक घेउन ब्लॉक होणे, किंवा त्याच पैशात जवळच पण १० x १० च्या खोलीत सडत राहणे मला पटत नव्हते. 'मूर्ख लोक घरे बांधतात व शहाणी माणसे त्यात भाडेकरू म्हणून राहतात' हे मला भारी पटले होते. कॉलनीत राहण्याचे अनेक फायदे होते. कार्यालय जवळ, देखभाल खर्च शून्य, वीज जवळ जवळ मोफतच, सर्व नावाजलेल्या शाळा, कॉलेजेस जवळ, मोफत वैद्यकीय सेवा या बद्ल्यात पगारातुन कापले जाणारे ७५ रूपये भाडे आणि न मिळणारा २१०० रूपयाचा घरभाडे भत्ता काही फार नव्हता ! तितके उत्पन्न मला माझ्या गुंतवणूकीतून मिळत होतेच ! तरी मी रविवारी वाशी, नेरूळ पर्यंत जागेच्या शोधात फिरत होतो पण फारसा गंभीर नव्हतो.
२००० सालात मला जे नवे साहेब मिळाले ते नुकतेच नवीन पनवेलला स्वत:च्या बंगल्यात रहायला गेले होते. मला रोज ते वेगवेगळ्या प्रकारे स्वत:च्या जागेत रहाणे कसे चांगले ते पटवून देउ लागले. २१०० रूपयाचा घरभाडे भत्ता वाया घालवण्यापेक्षा तोच कर्जाचा हप्ता म्हणून द्यावा, निदान आपल्या मालकीचे घर तरी होईल हे त्यांचे म्हणणे मला एकदाचे पटले ! आणि परत नव्या मुंबईत जागा शोधू लागलो. हावरे बिल्डरचा नेरूळला एक टॉवर होता व त्यात एक १ BHK शिल्लक होता. मी ती जागा बघण्याआधी शेजारी गोखले व पटवर्धन या नावाच्या पाट्या बघितल्या व उतावीळपणे ती जागा घेण्याचे जवळपास नक्की केले. बिल्डरच्या कार्यालयात गेल्यावर तो भाव १४०० रूपये चौरस फूट सांगू लागला. वास्तविक त्या भागात १००० ते १२०० रूपये हाच दर चालू होता पण तो एक पैही कमी करायला तयार नव्हता ! बरोबरचा मित्र मला बाहेर घेउन बोलला की घाई करू नकोस, टोकन देऊ नकोस . आधी बायकोला जागा दाखव मगच पुढे काय ते ठरव. दूसर्याच दिवशी आम्ही उभयता जागा बघायला आलो आणि बायकोला जागा अजिबात आवडली नाही ! ती अगदी निक्षून बोलली, मी येथे रहायला येणार नाही, हा तर कोंडवाडा आहे ! मग जागा बघणे हा विषय परत बंद केला !
मधल्या काळात अजून एक मित्र पनवेलला रहायला गेला व त्याने मला तिकडे जागा बघण्याचे आवतण दिले ! महाशिवरात्रीच्या दिवशी मी पनवेलला धडकलो ! अनेक जागा बघून झाल्यावर तो मला त्याच्या बिल्डर कडे घेउन गेला. त्या बिल्डरने मला दोन जागा दाखवल्या, एक सहा महीन्यात ताबा मिळेल अशी तर एक जवळपास तयार स्थितीतील ! दोन्ही जागा मला आवडल्या पण पहीली जागा जरी उशीरा मिळणार असली तरी चांगल्या लोकेशन मधे होती तर तयार जागेच्या आसपास बरेच रीकामे प्लॉटस होते. पहील्या अनुभवावरून हीला जागा दाखवायला आणले व आश्चर्य म्हणजे दोन्ही जागा हीला आवडल्या ! बिल्डरला पहीलीच जागा हवी म्हणून सांगितले आणि अचानक हीला आठवले की मुलांच्या शाळेचे काय ? ते सुद्धा मराठी !बिल्डर पक्का धंदेवाईक, त्याने लगेच गाडी काढली व आम्हाला भाटीया शाळेत घेउन गेला ! शाळा कसली ती, उध्वस्त धर्मशाळा होती !दूसरे सी.के.टी. हायस्कूल पण ते आगर्यांचे ! बायकोने एकदम about turn केले ! जागाच नको ! बिल्डर थक्कच झाला !आम्ही बाहेर पडत असतानाच त्याला आठवले की पुण्याच्या एका संस्थेने (महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी )सेक्टर ६ मधे मराठी शाळा सुरू केली आहे. परत त्याची गाडी घेउन ती शाळा आम्ही बघितली, मुख्याध्यापिका सौ.वैशंपायन यांच्याशी बोललो, ब्राह्मण कार्ड वापरून दोन्ही मुलांना प्रवेश मिळण्याचे ठाम आश्वासन घेतले आणि बिल्डरचे कार्यालय गाठले. थोडा वेळ द्या असे सांगून समोरच्या हॉटेलात बसलो. बघितलेली दूसरी जागा या शाळेकडून जवळ होती, तयार होती तेव्हा सहा महीन्याच्या हवाल्यावर का विसंबा ! ती जागा परत बघितली. २BHK + 400 चौ.फूटची गच्ची ! भरपूर हवा, भरपूर सूर्यप्रकाश ! तसा मित्र बोलला की 'वास्तुशास्त्रा' प्रमाणे नाही आहे पण मी ठरवले ज्या जागेत सूर्य उगवल्यापासून ते मावळेपर्यंत नैसर्गिक प्रकाश असतो तीला बाकी नियम लावायची गरज नाही ! बिल्डरला होकार कळवला, टोकन दिले व दूसर्याच दिवशी करार नोंदविला, संयुक्त नावाने ! सगळे मिळून ८,५०,००० उभे करायचे होते पुढच्या आठ दिवसात, सगळी भीस्त शेयर्स वर होती आणि बाजार कोसळू लागला ! सगळे शेयर पडत्या भावात विकून (फूकून?), सगळ्या FD मोडून कसेबसे ८,५०,००० जमले एकदाचे ! मधेच बिल्डरने फोन करून बोलवून घेतले, सांगू लागला की कर्ज हवे असल्यास सोय करता येईल, तुम्हाला पाच लाखापर्यंत कर्ज मिळत असताना स्वत:चे सगळे पैसे कशाला गुंतविता ? मी विचार केला तसेही काही अधिकची fittings , ग्रील लावणे, गच्चीत कोटा मार्बल लावणे यासाठी निदान लाखभर तरी खर्च होणार होतेच तेव्हा किमान कर्ज घ्यावे हे उत्तम. बिल्डरने बोलावलेल्या एजंटला लाखाचे कर्ज हवे असे सांगितले, त्यावर तो साफ निराश झाला ! पाच लाख मिळतायत तर का सोडता असे सांगू लागला ! जसे काही ते फेडायचे नव्हतेच ! मग दोन लाख आणि सरतेशेवटी मी २,५०,००० ची रक्क्म मागितली , तरत्या व्याजदराने. (floating rate)दूसर्याच दिवशी सगळ्या कागदपत्रांवर त्याने घरी येउन सह्या घेतल्या व लवकरच तुम्हाला कळवतो म्हणून गेला. गुढी-पाडवा, संध्याकाळी त्याचा फोन आला, चेक तयार आहे, वाशीला आत्ता आलात तरी मिळेल ! मग कसला धीर निघतोय, लगेच वाशी गाठले, चेक घेतला आणि पनवेलला बिल्डरकडे गेलो. कर्जाचा चेक आणि बाकी रकमेचे चेक त्याच्या स्वाधीन केले. मुलांना जागा बघायची उत्सूकता होतीच , त्यांनाही जागा खूप आवडली. पुढे काही दिवसातच सिडकोचे इमारतीसाठी ना हरकत प्रमाण पत्र (NOC) मिळाले. बिल्डर ताबा द्यायला तयार झाला. मी स्वत: पनवेलला गेलो, सगळ्या खोल्या नीट तपासल्या आणि निघताना कळले की मालक म्हणून बोर्डावर माझे एकट्याचेच नाव लिहीले होते. भडकलोच, बिल्डरला ठामपणे सांगितले, बोर्डावर बायकोचे पण नाव लागलेच पाहीजे , ती पण जागेची मालकीण आहे, करार पण संयूक्त नावानेच केला आहे, त्या शिवाय मी ताबा घेणार नाही ! शेवटी त्याने दूसर्या दिवशी बोलावले. दूसर्या दिवशी आधी फलकावर हीचे नाव स्वत:च्या डोळ्याने बघितले, मगच बिल्डरकडे गेलो. आयुष्याची ३५ वर्षे भाडेकरू म्हणून काढल्यावर आम्ही एका प्रशस्त जागेचे मालक होणार होतो. एका पाकीटात ताबा प्रमाणपत्र आणि जागेच्या किल्ल्या बिल्डरने माझ्या हातात सोपवल्या. मला अगदी भरून आले, नकळत डोळे पाणावले. क्षणभर तिथे शांतता पसरली. माझा हात हातात घेउन बिल्डर म्हणाला की या ईमारतीत तुम्ही सगळ्यात शेवटी जागा बूक केलीत पण ताबा मात्र सगळ्यात आधी घेतलात! एवढी सुंदर जागा निव्वळ वास्तूशास्त्राप्रमाणे नाही म्हणून विकली जात नव्हती पण आता वाटते की तुमच्या सारख्या सज्जनाला ती मिळून तीचे भाग्य उजळले ! Hearty Congrats ! देवाच्याच कृपेने अवघ्या २१ दिवसात सर्व व्यवहार पार पडला होता !
आता नशीबाचे खेळ बघा ! वडीलांप्रमाणेच माझ्याही पत्रिकेत गृहयोग नव्हताच ! आधी आवडलेली जी जागा सहा महीन्यात मिळणार होती , तीला तब्बल सहा महीने उशीर झाला ! नेरूळला जी जागा मला आवडली होती तीला आज ६ वर्षे झाली तरी ना-हरकत-प्रमाणपत्र मिळायचे आहे ! आधी एक पैही कमी न करणारा हावरे बिल्डर पुढ्चा महीनाभर मला वेगवेगळी अमिषे दाखवित होता. मी जर त्याला टोकन देउन बसलो असतो तर ते पैसे परत मिळवताना माझ्या नाकी नउ आले असते, काय सांगावे, मिळालेही नसते ! १२ % दराचा कर्जाचा व्याजदर खाली येत चक्क ९.५० % झाला होता (आता १४.५० % आहे ते जाउ दे !), १५ वर्षे मुदतीचे कर्ज मी थोडे थोडे अधिकचे परत केल्यामुळे खूप फायदा झाला. वाढीव व्याजदराचा फटका फारसा बसला नाही आणि याच जून मधे मी कर्जमुक्त होत आहे ! पनवेलला म्हणजे गावात रहायला गेलो म्हणून माझी थट्टा करणारे मित्र (पोचल्यावर पत्र टाक !)मी मोजलेला ८०० रूपयाचा भाव अवघ्या ६ वर्षात ३५०० झाला आहे म्हणून थक्क होतात. अनेक जण माझी जागा बघून पनवेलकर झाले आहेत !
'वेगळे बि-हाड' (कॉट्न-ग्रीनला) करताना, नेसत्या कपड्यानीशी बाहेर पडलो होतो, तिथून वडाळ्याला सामान हलविताना टेम्पो पुरला होता, वडाळा ते पनवेल ट्रक लागला होता आणि इथून पुढे ? no way , मी आता एकनाथ मराठे नवीन पनवेलकर झालो आहे ! जीना यहा, मरना यहा, इसके सिवा जाना कहा ? तेवढे स्मशान मात्र अंमळ लांबच आहे !
कोण मरतोय म्हणा एवढ्यात !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा