शुक्रवार, २७ जून, २००८

गोष्टी - भाग १

द्वेष !

एकमेकांचा पराकोटीचा द्वेश करणारे दोन शेजारी असतात. दूसर्यापेक्षा आपणच श्रेष्ठ या गंडाने दोघांना पुरते पछाडले होते.परस्पर द्वेशाची परिसीमा गाठल्यावर शेवटी देवाला दावणीला बांधले जाते ! दोघेही दूसर्यापेक्षा जास्त सुखी व्हावे म्हणून देवाचा धावा सुरू करतात. देव एकाच वेळी दोघांना दर्शन देउन काय हवे ते मागा म्हणून सांगतो पण हे पण बजावतो की तुला जे मिळेल त्याच्या दुप्पट तुझ्या शेजार्याला मिळेल ! आता आली का पंचाईत, ज्या साठी एवढा अट्टाहास केला त्याचे असेच का फळ मिळणार ? दोघेही देवाला सांगतात , 'असेच' होणार असेल तर माझा १ डोळा, एक कान, एक हात, एक पाय तोडून टाक देवा ! देव तथास्तू म्हणून अंतर्धान पावतो व दोघेही शेजारी विकलांग होउन जातात !

पाटी

एक कोकणी माणूस मासे विकायचे दूकान टाकतो. दूकानावर पाटी लावतो, "येथे ताजे मासे विकत मिळतील."बसतो आपला गि-हाईकांची वाट बघत. एक मालवणी येतो म्हणतो मेल्या "येथे" असे लिहायची काय गरज आहे का ? पाटीतुन 'येथे' शब्द खोडला जातो तोवर दूसरा शहाणा येतो, सांगू लागतो की 'ताजे' असे लिहील्यामुळे लोकांना अकारण ते शिळे असल्याचा संशय येईल ! झाले, 'ताजे' या शब्दावर काळे फासले जाते. तिसर्या एका शहाण्याचे मत पडते की धंदा उधारीवर जर करायचाच नसेल तर 'विकत' असे तरी वेगळे का लिहायचे ? 'विकत' वर पण काट पडते. 'मासे' तुझ्या पाटीत फडफ़डत असताना त्यांचा पाटीवर उल्लेख तरी कशाला करायचा म्हणतो मी ? खेकडे तर तू विकत नाही आहेस ! अजून एका शहाण्याचा सल्ला पण त्याला मान्य करणे भागच पडते ! शेवटी 'मिळतील' या शब्दाला तरी काय अर्थ उरला ? शेवटी पाटीच खाली उततते ! धंदा मात्र एका पैचाही होत नाही !

क्या भगवान है ?

एकदा गावातल्या काही लोकांना जंगलात एक साधू दिसतो. साधूच्या चेहर्यावर एक आगळे तेज असते. याला गावात नेउन त्याचे एखादे किर्तन ठेवावे असे ठरते. साधूने सर्वसंग परित्याग केलेला असतो. या मुळेच तो खरे तर जंगलात रहात असतो. पण लोकांचा आग्रह त्याला मोडवत नाही. साधू सांगतो की तुम्हीच मला विषय द्या, मी त्यावरच आपले चार शब्द बोलतो ! साधूने देव या विषयावर बोलायचे ठरते. ठरल्या वेळेला साधू गावात येतो. आसपासच्या गावातील लोकांनी तोबा गर्दी केलेली असते. साधू खड्या आवाजात जनसमुदायाला प्रश्न विचारतो."देव आहे ?" एकमुखी उत्तर येते, "होय". साधू म्हणतो हे जर तुम्हाला एवढ्या ठामपणे माहीत आहे मग मी काय वेगळे सांगणार ! मै तो चला !एकच गोंधळ उडतो. आयोजक बाबापुता करून साधूला पुन्हा स्टेज वर आणतात. परत तोच प्रश्न, पण उत्तर "नाही" असे येते ! आता साधू म्हणतो जे अस्तित्वातच नाही आहे, त्यावर मी काय बोलणार, मै तो चला ! आयोजक निकराचा प्रयत्न करून साधूला पुन्हा उभा करतात ! लोकांनाही यात रंगत वाटू लागते. या वेळी उत्तरात होय आणि नाही सारख्याच प्रमाणात मिसळतात ! तर साधू म्हणतो हा मुद्दा हो वाल्यांनी नाही वाल्यांना समजावा हेच चांगले ! मै तो चला ! आता सभेत शांतता पसरते. हा साधू कोणी 'पहुंचा हुवा' आहे हे सर्वाना समजून चुकते. सर्वाची पाटी "कोरी" झाल्यावर साधू या विषयावर रसाळ निरूपण सुरू करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकतो !

परिक्षा !

अकबर बादशहा भल्या पहाटे आपल्या प्रासादाच्या गच्चीवर बेगम बरोबर गप्पा मारत होता. वेळ साधून बेगमने जुनेच तुणतुणे पुन्हा वाजविले. त्या काफीर बिरबलाला हाकलून द्या व माझ्या भावाला वजीर करा ! पहाटे दूरुन कुठून तरी घंटाचा किणकिणाट ऐकू येत होता. अकबराने आपल्या मेव्हण्याला बोलावुन हा आवाज कसला याचा तपास लावायचा आदेश दिला. धावत गेला आणि पळत आला. बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घूंगरांचा तो आवाज होता तो. लगेच बादशहाने पुढचे फर्मान सोडले, कोठे चालल्या आहेत या गाडया ? मेव्हण्याची परत धावपळ ! गाड्या शेजारच्या राज्यात बाजाराला चालल्या आहेत ! पुढचा प्रश्न, काय विकायला चालल्या आहेत ? परत पळापळ आणि समजते तांदूळ आहे गाडयांत ! मग बासमती आहे का कोलम,दर्जा कसा आहे, भाव काय, आपल्याकडचा भाव काय ? मेव्हणा पार मेटाकूटीला यतो. शेवटी धाप लागून मट्कन खालीच बसतो ! आता बादशहा बिरबलाला पाचारण करतो. बेगम समोरच खड्या आवाजात "कसला आवाज येत आहे" याचा छडा लावायचा आदेश देतो ! मोजून दहाव्या मिनिटला बिरबल परततो. सविस्तर वृतांत देतो की आवाज बैलांच्या गळ्यात बांधलेल्य घूंगराचा आहे. अतिशय उत्तम प्रतीचा बासमेती तांदूळ बाजूच्या राज्यात विकायला जात होता. भाव आपल्या पेक्षा स्वस्त असल्यामुळे मी तो सर्व तांदूळ खरेदी करून मुदपाकखान्याच्या प्रमुखाकडे सोपवला आहे ! बादशहा बेगमला काही सांगण्याअगोदरच तिने आणि तिच्या भावाने तोंड काळे केलेले असते !

मातीचा गुण !

पित्याच्या आज्ञेवरून वनवासात निघालेल्या रामाची वाटचाल आता परशूरामाच्या वास्तव्याने पावन झालेल्या कोकणातून सुरू झाली. कोकणचे निसर्गसौंदर्य राम आणि सीतi डोळ्यात साठवुन घेत मार्गस्थ होत होती. पण लक्शमण कोठे होता ? खर तर तो सतत त्यांच्या पुढे रहायचा, त्यांना काहीही कष्ट पडू नयेत म्हणून खपायचा. त्याच्या या वागण्यातला फरक राम-सीता दोघांनाही जाणवला. दूपारी विश्रांतीसाठी सर्व बसले असताना लक्शमणान आपल्या भावनांना वाट मोक़ळी करून दिली ! "माय झया रामा, तुझा बरा असा, तू आपल्या बायली संग वनवासात पण मजेत असाक आणि मी मात्र तुमच्या सुखापायी खपतोया ! म्या काय तुमचा नोकर असाक ? काय समजतल काय तू मला ? बस झालो यो थेर , माका काय आता तुमच्या संगतीने यायचो नाय--- " ! सीता हैराण ! झाले तरी काय याला ? राम तिला सांगतो की गंभीर काही नाही, इकडची थोडी माती पदरात बांधून घे आणि जरा लवकर पाय उचल. कोकण पाठी पडते आणि लक्श्मण ताळ्यावर येतो. स्वत:च्या थोबाडीत मारून घेउन पुन्हा असे होणार नाही, माफ करा असे सांगून मोक़ळा होतो ! राम सीतेला ती माती टाकायची खूण करतो, लक्श्मणाचा पाय त्या मातीवर पडतो मात्र "माय झया रामा------". दुही हा कोकणच्या मातीलाच लागलेला शाप आहे हे सीतच्या लक्षात येते.

चोर आणि गीता.

देवळात गीतेवर रसाळ प्रवचन चालू असते. "मनुष्य केवळ निमित्तमात्र आहे. कर्ता-करविता ईश्वरच आहे. आपली प्रत्येक कृती त्याच्याच ईच्छेने होते तेव्हा कर्म चांगले वा वाईट असायचा प्रश्नच नाही --" हा विचार एका चोराच्या कानावर पडतो. त्याला खूप बरे वाटते. आपण चोरी करतो म्हणजे काही पाप करतो ही त्याची भीती नष्ट होते.ईश्वरी संकेतानुसारच आपल्याला चोरी करायची प्रेरणा मिळते. आता तो अधिकच निर्ढावतो. कर्मातली सफाई वाढ्ते. अट्ट्ल चोर अशी त्याची पंचक्रोशीत ख्याती पसरते. राजा त्याला पकडण्याकरता मोठे इनाम जाहीर करतो.जंगलात राजाच्या सैनिकांना गुंगारा देताना चोराल तहान लागते. ध्यान लावून बसलेला एक साधू त्याला दिसतो व त्याच्या समोर पाण्याने भरलेले कमंडलू असते. चोर परवानगी मागायच्या फंदात न पडता त्यातले पाणी पिउन टाकतो. साधूचे ध्यान भंग पावते व तो चोराल 'दगड होशील' म्हणून शाप देतो ! पण चोरावर त्या शापाचा काही एक परिणाम होत नाही ! पुढे चोराचा उपद्रव फारच वाढल्यावर राजा त्याचे संपूर्ण कुटूंब ताब्यात घेतो. २४ तासाच्या आत चोर शरण न आल्यास सर्वांना फासावर लटकवायचा आदेश जारी करतो. चोर मुदतीत शरण न आल्यामुळे आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होते ! आपल्या सर्व कुटूंबियांचे देह फासाला लटकत असलेले पाहून चोर शोक सागरात बूडून जातो. त्याच्या तोंडून उद्-गार बाहेर पडतात, "मी या सर्वनाशाला जबाबदार आहे" ! पुढच्याच क्षणी तो दगड होउन पडतो !

फसवलं म्हणून सांगू नकोस !

एका गावात एक वैद्य रहात होता. सेवाभावी वृत्तीचा होता. हातगुण पण चांगला होता. पंचक्रोशीत चांगला मान होता. वयपरत्वे रूग्णसेवेसाठी गावोगाव भटकणे त्यांना जमेना म्हणून एका धनिकाने चांगला अबलख घोडा त्यांना भेट दिला. आता वैद्यबुवा नव्या उमेदीने आपल्या सेवाकार्यात रमले. गावात एक भुरटा चोर होता. त्याची नजर त्या घोड्यावर पडली. हा तेज घोडा जर आपल्याला मिळाला तर आपल्या चौर्यकर्माला चांगली साथ मिळेल असे त्याला वाटले. एकदा पाय मोडल्याचे सोंग घेउन तो वैद्याच्या वाटेवर पडून राहीला. त्याच्या त्या सोंगाला फसून वैद्याने घोडा थांबविला व त्याला घोड्यावर घेतले. लगेचच त्या वैद्याला चोराने खाली फेकून दिले व टाच मारून तो पळून जाउ लागला. तशाही अवस्थेत वैद्याने त्याला एक मिनीट थांबायची विनंती केली. घोडा आता तुलाच घे, पण तो तु मला फसवुन घेतलास हे कोणाला सांगू नकोस, मी तुला तो भेट दिला असेच सांग ! खरे कारण कळल्यास लोक यापुढे खरोखरच विकलांग असलेल्यांना मदत करणार नाहीत !

कोणी कोणाला धरले आहे ?

व्यसनाधीन झालेला एकजण एका साधूच्या पायावर लोळण घेतो. "साधू महाराज, वाचवा ! दारूचे हे व्यसन मला पूर्ण संपवून टाकण्याच्या आत मला या गर्तेतुन बाहेर काढा, माझ्या कातड्याचे जोडे-----" साधू यावर काहीही न बोलता बाजूच्या जंगलात निघून जातो. तासभर वाट बघूनही जेव्हा साधू परत येत नाही तेव्हा तो व्यसनी माणूस त्याच्या मागावर निघतो. थोडे जंगलात शिरल्यावर त्याला एक विचित्र दृष्य दिसते. एका मोठ्या झाडाच्या बुंध्याला साधू विळखा घालून बसलेला असतो आणि "मला सोड, मला सोड" असे मोठ्याने ओरडत असतो. व्ससनी माणूस वैतागुन म्हणतो, हा काय वेडेपणा आहे ? तुम्हाला धरलाय तरी कोणी ? तुम्हीच झाडाच्या बुंध्याला वेढा घालुन बसला आहात ! तुम्हीच झाडाला सोडा ! साधू हसून उभा राह्तो व म्हणतो की तूच आता मला सांग की दारूने तुला धरले आहे की तू दारूला ? व्यसनी माणसाला आपली चूक उमगते , तो व्यसनमुक्त होतो !

प्रपंच आणि संन्यास !

संसारातील कटकटींना कंटाळून एक जण जंगलाचा रस्ता धरतो.थोडेफार चित्त थार्यावर येत आहे असे वाटत असतानाच त्याचे सगेसोयरे त्याचा माग काढतात. आपला माणूस जंगलात दिगंबर अवस्थेत भटकत आहे म्हणजे त्याला ईश्वरी साक्षात्कार झाल आहे असा ते 'अर्थ्' काढतात. त्या निबीड अरण्यात सुद्धा त्याचे दर्शन घ्यायला लोक येउ लागतात. आता दिगंबरावस्थेत राहणे त्याला शक्य होत नाही ! एका भक्ताकडून तो लंगोट मागून घेतो. पुढे एक xxला तर एक दांडीला , अशा दोन होतात. जंगलात एक झोपडी बनते. लंगोट उंदीर कुरडतात म्हणून एक भक्त मांजर देतो. त्या मांजराला दूध हवे म्हणून एक भक्त गाय देतो. गायीचे चारा-पाणी-शेण काढण्यासाठी एक भक्त एका बाईची सोय करतो. पुढे हा संन्यासी त्या बाईच्या प्रेमात पडून , लग्न करून परत संसारी होतो !

ठंडा ठंडा, कूल कूल !

गावाच्या वेशीवर एक जीर्ण मारूतीचे मंदिर असते. त्यात गावातल्या ओवाळून टाकलेल्या टारगटांचा अड्डा जमायचा. त्यातीलच एकाला मारूतीच्या भव्य मुर्तीची बेंबी दिसते. त्याच्या डोक्यात किडा शिरतो. मारूतीच्या बेंबीत बोट घालण्याचा ! घालतो बोट ! आत असतो एक विंचू. विंचवाच्या दंशामुळे त्याच्या सगळ्या अंगाची आग आग होते. पार डोक्यात जाते कळ ! बाजूचा एक जण विचारतो, "काय रे कसे वाटले ?". गार. एकदम मस्त थंडगार नुसतं !तो ही बोट घालतो, कळा त्याच पण सांगतो मात्र, वा ! खरंच काय गार वाटत म्हणून सांगू ! एक एक करत सगळे अनुभव घेउन बघतात. सगळ्यांचे अगदी एकमत होते, "लई गार, एकदम थंड ! ठंडा ठंडा, कूल कूल !"

जसा भाव तसा देव !

समर्थ रामदास स्वामींनी रामायण लिहायला घेतले होते. एकेक अध्याय लिहुन झाला की संध्याकाळी शिष्यांना तो वाचून दाखवत. असे म्हणतात की जिथे जिथे राम कथेचे वाचन्, निरूपण चालू असते, तिथ तिथे मारूति ती ऐकायला गुप्त रूपाने येतो. सीतेच्या शोधात मारूति अशोकवनात येतो तो प्रसंग वर्णन करताना सम्रर्थ तिकडची फूले पांढरी होती असे म्हणतात. त्या क्षणी मारूती प्रकट होउन म्हणतो की नाही ती फूले लाल होती. सम्रर्थ सांगतात माझेच बरोबर आहे. शेवटी साक्षात प्रभू रामाची साक्ष काढली जाते. राम सांगतो, फूले पांढरीच होती पण मारूतीचे डोळे संतापाने लाल झाल्यामुळे ती फूले त्याला लाल वाटली ! तेव्हा दोघांचेही बरोबर आहे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: