रविवार, २१ मार्च, २०१०

युजर आय.डी. D1O115 !

संगणकाचा आमच्या गोदी विभागात बर्यापैकी वापर सुरू झाला होता पण त्यातल्या माहितीची सुरक्षा व गैरप्रकार टाळणे या बाबतीत मात्र सगळे पुर्णपणे अनभिज्ञ होते. त्याने काही फारसे बिघडले नाही कारण संपूर्ण सिस्टीमची माहिती माझ्यासकट दोघा-तिघांनाच होती. जेव्हा सर्वच काम ऑनलाइन झाले तेव्हा मात्र हा व्याप सांभाळणे आमच्या आटोक्याबाहेरचे झाले. तिन पाळ्यात चालणार्या संगणक कक्षाची धुरा सांभाळण्यासाठी निदान १० माणसे तरी हवी होती व त्यातल्या चौघांना सिस्टीमची आमच्याएवढीच माहिती असणे आवश्यक होते. आज काही गैरप्रकार झाला नाही पण पुढे होणारच नाही असेही नाही, तेव्हा संगणक सुरक्षा धोरण आखले गेले. सुपर युजरला सर्वाधिकार, त्याच्या खाली कोर ग्रूपला थोडे कमी अधिकार व एन्ड युजरला फक्त त्याच्या कामापुरत्या मोड्युलचा पर्याय, त्यातही एडीट, डिलिट असे पर्याय न देता. युजर आय.डी म्हणून अनेक पर्याय तपासल्यावर शेवटी प्रत्येक कर्मचार्याचा पीएफ नंबर घ्यायचे ठरले. एक डीफॉल्ट पासवर्ड युजर बनवताना ठेवायचा व पहिल्याच वेळी त्याला तो बदलायला लावायचा अशीही सोय केली गेली. पासवर्ड हवा तेव्हा बदलायची सोय सुद्धा मागाहून दिली गेली व “पासवर्ड विसरलो “ ला उपाय म्हणून आम्हाला फोन केल्यावर रीसेट करून देण्याची सुद्धा सोय होती. युजर लॉग हा प्रकार बर्याच उशीरा सुरू झाला पण तो सुद्धा खूप मर्यादित स्वरूपाचा होता. एखादी नोंद ज्याने शेवटची एडीट केली असेल त्याच्या युजर आय.डीची नोंद संगणक करायचा. नक्की काय बदल केला हे मात्र समजायला काही मार्ग नव्हता ! हे सर्व लोकांच्या पचनी पडायला खूप महिने जावे लागले व प्रचंड गोंधळाला आम्हाला तोंड द्यावे लागले होते. एवढे हो‍उनही संगणकापासून दूर जाताना लॉग ऑफ व्हायची सवय मला सुद्धा नव्हती. सुरवातीला सिस्टीम हँग होण्याचे प्रकार खूप होत पण आम्हाला फोन करायची तसदी न घेता स्विच ऑफ-ऑन तंत्राने लोक काम सुरू करीत. या मुळे संपूर्ण प्रणालीचा वेग मंदावत असे. यावर उपाय म्हणून एक युजर एका वेळी एकाच ठीकाणी काम करू शकेल अशी सोय आम्ही करून घेतली. यामुळे जोपर्यंत आम्ही लटकलेली प्रोसेस किल करीत नाही तो पर्यंत त्या युजरला दूसरीकडून काम करणे अशक्य झाले ! एकाने दूसर्याचा पासवर्ड वापरून काम करण्याला त्याने आपसूकच आळा बसला ! पासवर्ड सुद्धा आद्याक्षरे व १२३ असेच बहुतेकांचे असायचे व अजूनही असतील ! पासवर्ड तुम्हीच द्या असे सांगणारे सुद्धा महाभाग होते. मी व अजून तिघांना सिस्टीमचे पूर्ण अधिकार होते व बाकी सहा जण कोर ग्रूपमध्ये होते व तिन शिफ़्टमध्ये कामाला येत.देवाच्याच दयेने काही गैरप्रकार घडला नव्हता … निदान उघड तरी झाला नव्हता !

त्या दिवशी एक नोंद दुरूस्त करायला माझ्याकडे शिपायामार्फत आली. खरेतर ती आदल्या दिवशीच कोणीतरी दुरूस्त केली होती पण शेरा भलत्या ठीकाणी टाकला होता. मी ही चूक करणारा मुर्ख कोण हे बघितले तेव्हा ते काम मीच केल्याची नोंद मिळाली ! असे काही निदान काल तरी केल्याचे मला आठवत नव्हते पण मग … ? पुढे कामाच्या रगाड्यात मी ती बाब पार विसरून गेलो. दूसर्या दिवशी रविवार होता पण मला आमच्या रोटेशन प्रमाणे कामावर यायचे होते. कामावर येताच मला आमच्या प्रोग्रामरने ठेवलेली नोट मिळाली. त्यात म्हटल्याप्रमाणे “MOST URGENT” असे लिहिलेले पाकिट त्याला अगदी निघताना मिळाले होते. त्यात दिलेल्या १३ नोंदीचा युजर लॉग हवा होता. रविवारी कामावर मीच येणार आहे म्हटल्यावर त्याने ते काम माझ्यावरच सोपविले होते. छोटे मोठे प्रोग्राम लिहायचे म्हणजे मला उत्साहाचे भरते येते. १३ नोंदी एक-एक करून शोधण्यापेक्षा मी एक रीपोर्ट प्रोग्राम लिहिला. त्या नोंदीची एक बॅच फाइल बनवून घेतली. एक-दोन प्रयत्न केल्यावर रीपोर्ट बनला. युजर आय.डी, तारीख, जहाजाचे नाव हे सगळे बरोबर आले पण युजर आय.डी वरून नाव काही आले नव्हते. मी परत एकदा सगळे तपासले, चूक तर काहीच नव्हती. मग त्या नोंदींबरोबरच अजून काही नोंदी तपासल्या, नवीन टाकलेल्या नोंदीमध्ये नाव आले हव्या असलेल्या नोंदीचे नाव मात्र आले नाही ! आता मात्र मी चक्रावलो ! साला प्रकार काय आहे ! बघू तरी कोण आहे हा युजर ज्याचे नाव येत नाही ते ! युजर आय.डी. चेक करताच मला अजून एक धक्का बसला ! तो पी.एफ. नंबर माझाच होता, D10115 ! मी मग माझा युजर आय.डी टाकून तोच प्रोग्राम परत रन केला, उगीच वेळ वाया जाऊ नये म्हणून साधारण मागचा एक आठवडाच तपासला. या वेळी मात्र माझे नाव आले ! डोक्यात कोठेतरी धोक्याची घंटा वाजू लागली. नक्की काय बदल केले असतील हे कळण्यासाठी मी त्या सर्व जहाजांच्या कस्टम्सकडून आलेल्या मूळ फाइल चेक केल्या. जेव्हा माझा तपास पूर्ण झाला तेव्हा मात्र कोणीतरी मला चांगलेच अडकविले होते याची खात्री पटली. हव्या असलेल्या सर्वच नोंदीत वजन कमी केले गेले होते. गोदीत आयात केलेला माल ठराविक मुदतीतच सोडवून घ्यायचा असतो अन्यथा जबरी भूर्दंड आकारला जातो व हा मालाच्या वजनावर, प्रति टन आकारला जातो ! सर्व आयात पोलादाची होती व त्यात कमी वजन करून करोडो रूपयाचा भूर्दंड बुडविला गेला होता. हा प्रकार केव्हातरी कळणार होताच व तसेच झाले होते. चौकशी सुरू झाली होती व तिचाच भाग म्हणून ही माहिती मागविली गेली असणार ! माझेच नाव त्यात गोवले जाणार होते व मग पोलिस चौकशी, अटक, खटला, निलंबन, हकालपट्टी , बदनामी या गोष्टी अटळ होत्या !

मी असे काही केले नाही याची मला खात्री असली तरी ते पटविणे, सिद्ध करणे शक्य नव्हते. माझा पासवर्ड वापरून कोणीतरी हे केले असे म्हणणे चौकशीत कोणी ऐकून घेणार नव्हते. बरे मी काम करत असताना दूसरा कोणी तोच युजर आय.डी वापरून काम करणे सुद्धा अशक्य होते. एकदा एका युजर आय.डीची नोंद झाल्यावर तसाच दूसरा आयडी बनविणे सुद्धा शक्य नव्हते ! बरे मी नाही मग कोणी हे सुद्धा कळणे गरजेचे होते. याच्यापुढे त्या युजर आयडीचा वापर करता येणार नाही असे करणे शक्य होते पण आधी गफला झाला होता त्याचा खुलासा मी काय देणार होतो ? अजून एक गोष्ट सूचली, युजर कोणी बनविला याचा लॉग तपासणे --, पण दुर्दैवाने तशी काही सोय नव्हती ! अर्थात मीच संगणकापासून लांब असताना कोणी तसा बनविला असेल तर ? पण तसे कसे शक्य होते ? माझा आय.डी. होताच ना आधीपासून ! विचार करून करून डोक्याचा पार भुगा झाला. चक्रव्युहात पुरता अडकलो होतो व बाहेर जायची वाट काही सापडत नव्हती. काही वेळाने मी तिन महिन्यापुर्वीच्या नोंदीचा लॉग रीपोर्ट बनविला. त्या इतर सर्वाच्या नावाबरोबरच माझे नाव सुद्धा आलेले होते पण ४० नोंदीत माझा पी.एफ. नंबर होता पण नाव नव्हते ! प्रणालीत एकाच युजर आयडीच्या दोन नोंदी टाळण्यासाठी टाकलेला चेक काम करत नव्हता असा त्याच्या अर्थ घ्यायचा का ? मी लगेच तसे करून बघितले तेव्हा “User I.D. already exists!” असा मेसेज मिळाला. एका टर्मिनलवर लॉगिन केले व बाजूच्या टर्मिनलवर त्याच आयडीने लॉगिन करायचा प्रयत्न केला तेव्हा “User already active, contact core group” असा मेसेज मिळाला. म्हणजे सर्व चेक तर व्यवस्थित काम करीत होते. मग माझ्याच आय.डीच्या दोन नोंदी कशा ? आणि जिकडे काही गैरप्रकार झालेला आहे त्या सर्वच नोंदीत माझाच आयडी कसा ?

काहीच उपाय सूचेना तेव्हा मी प्रोग्रामरला ताबडतोब कामावर यायची विनंती केली. तासाभराने तो आला. आता मी बराच सावरलो होतो व कोणत्याही प्रसंगाला सामोरे जायची माझी मानसिक तयारी झालेली होती. आधी चहा मागविला व तो आल्यावर त्याचे घोट घेत मी सर्व प्रकार त्याला कथन केला. एकाच आयडीच्या दोन नोंदी कशा झाल्या असतील याचेच उत्तर मला त्याच्याकडून हवे होते. चहा संपल्यावर प्रोग्रामरने हे सर्व मला कालच कळले होते पण त्यात तुझा आयडी होता, तू असे काही करणार नाहीस असा ठाम विश्वास होता म्हणूनच आज तू काय करतोस हे मला बघायचे होते. तू जर या गैरव्यवहारात असतास तर त्या सर्व नोंदीतुन तुझा आयडी बदलला असतास व पुरता अडकला असतास. तू ज्या अर्थी मला सगळे सांगितलेस त्या अर्थी तू काही गैरप्रकार केला नाहीस याची निदान माझी तरी खात्री आहे, पण तसे इतरांना पटवून देणे अशक्य आहे ! उद्या कसेही करून मला अहवाल द्यावाच लागणार आहे, फारतर अजून दोन चार दिवस मी थांबू शकेन पण मग काय ? त्याचे सुद्धा बरोबरच होते. इतक्यात त्याचे डोळे चमकले, संगणकाला तो अगदी चिकटूनच बसला व काही कोड लिहू लागला. जरा वेळाने पडद्यावर जो आउटपुट मिळाला त्याने त्याला अगदी हर्षवायूच झाला. त्याने त्या दोन्ही युजर आयडीच्या ASCII किमती काढल्या होत्या व त्यातुन दोन सारख्या आयडींचे कोडे उकलले होते ! सारखे वाटत असलेले ते आय.डी. D10115 व D1O115 असे होते ! इंग्रजी मोठा ओ (O) व शून्य (0) यातला फरक पटकन लक्षात येत नाही. ( ही गोष्ट १९९० ची आहे, तेव्हा आम्ही VT220 या टर्मिनलवर काम करत होतो, इंग्रजी लहान एल (l) व इंग्रजी एक (1), यातला फरक सुद्धा चटकन लक्षात येत नसे, पुढे मात्र पोटफोड्या झीरो दाखविणारी टर्मिनल आली , DMP मध्ये तशी सेटींग सुद्धा असायची ). अर्थात ही उकल हो‍उन सुद्धा माझ्यावर संशयाची सुई रोखलेलीच होती. कशावरून मीच तसा आयडी बनविला नसेल ? परत मी शांतपणे विचार केला. एकदा पैशाची चटक लागलेला त्यातुन सूटत नाही. मी व प्रोग्रामरने विचार करून एक योजना बनविली. अर्थात त्याला यश आले नाही तर चार दिवसाने तो मूळ रीपोर्ट वर पाठविणार होता ! त्या दिवशी घरी निघायला आम्हाला रात्रीचे १० वाजले होते.

सोमवारी सकाळी आठच्या ठोक्याला आम्ही चारी सुपर-युजर कामावर आलो होतो. सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व युजर्स नव्याचे बनवायचे होते. ही सुधारणा तातडीने अमलात आणण्याचे आदेश शनिवारी उशीरा मिळाल्याने रविवारीच प्रोग्रामरने येऊन सर्व सुधारणा करून ठेवल्या होत्या. संगणक चालू करताच सुरक्षेच्या कारणास्तव परत युजर आयडी घेण्यासाठी आम्हाला फोन करण्याचा संदेश झळकत होता. आम्हा सुपरयुजरचे व कोर ग्रूपचे आयडी त्याने कालच करून ठेवले होते पण पासवर्ड आमचे आम्हालाच घ्यायचे होते. पहिले तिन दिवस आम्हाला अपेक्षित काही घडले नाही. आता मात्र मी काटेकोरपणे संगणकापासून थोडे जरी लांब जायचे असले तरी तो लॉक करून जात होतो. चवथ्या दिवशी दूपारनंतर मला एका बैठकीला जायचे होते. तिकडेच पाच वाजले. मला दिलेली मुदत संपली होती. मी अगदी कासावीस झालो होतो. जे तिन दिवस झाले नाही ते या ३ तासात झाले असेल का ? बैठक संपल्यावर मी थेट प्रोग्रामरला गाठले. मला बघताच त्याने थम्स-अपची खूण केली ! संगणकावर मला त्याने User Creation Log दाखविला. आमच्यातल्याच एकाने D1O115 असा युजर बनविला होता, त्यात तर तारीख व वेळ सुद्धा होती व त्या वेळी मी मिटींगमध्ये विभागप्रमुखांबरोबरच असल्याने माझी बाजू भक्कम झाली होती. तोच आयडी वापरून त्याने काही नोंदीचे वजन सुद्धा कमी केले होते !

पुढचे दोन तास आम्ही आमच्या विभाग- प्रमुखांकडे, मग मुख्य सतर्कता अधिकारी व रात्री ११ वाजता सर्व लवाजम्यासह यलोगेट पोलिस ठाणे गाठले होते व अफरातफरीची तक्रार गुदरली होती. अर्थात सर्वात आधी आम्ही नोंदणी विभागातील शिपायांना पुढील सूचना मिळेपर्यंत थांबायचे सक्त आदेश दिले होते. पोलिस ठाण्यात जायच्या आधी आम्ही नोंदणी विभाग पालथा घालून वजनात बदल केलेल्या ( अर्थात D1O115 हा आय.डी वापरून, किती सोपे झाले नाही आमचे काम ! ) सर्व नोंदीची मूळ कागदपत्रे ताब्यात घेतली होती, ती तब्बल १०३ होती ! त्याची छाननी केल्यावर परस्पर संगनमताने असे करणारी टोळी उघड झाली होती. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ’तो’ सहकारी, एक आयातदाराचा एजंट, एक निर्धारक व एक लेखापाल यांना त्यांच्या घरी धाडी घालून पोलिसांनी अटक केली होती ! बंदराला करोडो रूपयांचा गंडा घालणारी चांडाळ चौकडी गजाआड गेली होती !

शनिवार, २० मार्च, २०१०

तुम्हाला कोठेतरी पाहिल्यासारखे वाटते …. !

नारदाप्रमाणे माझा सर्वत्र संचार सुरू असतो. मी कोणत्याही इझमच्या प्रभावाखाली नसल्याने कोणात्याही विचाराचे / माणसांचे / ठीकाणांचे मला वावडे नाही. पोर्ट ट्रस्टची नव्या ओळखी रोज करून देणारी नोकरी, सामाजिक कामाची आवड , पत्रलेखन, ब्लॉग व स्वत:चे मालकीचे घर होण्यापुर्वी पाठीवर बिर्हाड घेउन केलेली आगाशी, वडाळा, जेपी नगर (विरार), कॉटन ग्रीन, वडाळा व आता पनवेल अशी केलेली भटकंती – यामुळे मित्र परिवार भरपूर आहे. ओळखणारे त्याहुनही जास्त. अनेक वेळा कोणीतरी कोठेतरी भेटतो, अगदी जान-पहचान असल्याच्या थाटात गप्पा मारायला लागतो, बोलण्यातले संदर्भ शोधत ’हा कोण, कोठे भेटलो असू आपण’ याचा तपास चालू असतो. तो जर चेहरा वाचणारा असेल तर आपली ओळ्ख न सांगता तो मस्त घोळवत ठेवतो मला. भीडस्त स्वभावामुळे म्हणा वा तो आपल्याला एवढे चांगलो ओळखतो व आपल्याला तर त्याचे नावही आठवत नाही याची कबुली कशी द्यायची या विवंचनेत मी “माफ करा, मी आपल्याला ओळखले नाही” असे स्पष्ट सांगत नाही ! कधी उलटे सुद्धा होते, समोर दिसत असलेला चेहरा कोठेतरी पाहिल्यासारखा वाटत असतो, ( एखादी सुंदरी असेल तर जास्तच ! ) त्याच्या चेहर्यावर सुद्धा असेच भाव असतात पण “सुरवात कोणी करायची ?” हा प्रश्न आडवा येतो व कोंडी काही फूटत नाही !

मागच्या आठवड्यात गंमतच झाली. पटवर्धन रूग्णालय या आमच्या ड्रीम-प्रोजेक्टच्या स्वयंसेवकांची बैठक होती. रूग्णालयाचे सिविल वर्क जवळपास पुर्ण झाले होते. बांधून पुर्ण झालेल्या एका खोलीतच बैठक होती. कार्यक्रम सुरू व्हायला अजून थोडा वेळ होता. माझ्या बाजूला प्रसन्न व्यक्तीमत्वाचा , माझ्याच वयाचा एक इसम बसला होता. आमची नजरानजर होताच तो ओळखीचे हसला. मी सुद्धा हसलो पण लगेच डोक्यात किडा वळवळला, याला कोठेतरी पाहिले आहे, इतकेच नाही तर चांगल्या गप्पा सुद्धा मारल्या आहेत ! पण कोठे ? केव्हा ? कधी ? इतक्यात तोच बोलला “तुम्हाला आधी कोठेतरी बघितल्यासारखे वाटते, पण नीटसे आठवत नाही” बरे झाले ! मी सुद्धा लगेच कबुली देऊन टाकली ! पण मग कोठे बरे आपण भेटलो असू ? दोघांच्याही ओठावर हा प्रश्न एकदमच आला !

मी – तुम्ही गोदीत कामाला आहात का ? नाहीतर तुम्ही कदाचित आपल्या अकाउंटस विभागात असाल ?

तो – नाही .मी गोदीत कामालाच नाही !

मी – मग तुम्ही नक्की सीएचए ( Custom House Agent ) असणार.

तो – अहो नाही हो, मी पवईच्या आय.आय.टी. मध्ये प्राध्यापकी करतो. तुम्ही तिकडे कधी आला होतात का ?

मी – छे, काहीतरीच काय ! आय.आय.टी. सोडाच कोणत्या आयटीआयची सुद्धा मी कधी पायरी चढलेलो नाही ! कदाचित ट्रेनमध्ये ?

तो – नाही, मला गाडी येते घ्यायला. संघाच्या कोणत्या कार्यक्रमात ?

मी – मी संघात सक्रीय नाही, बरीच वर्षे झाली त्याला. गुंतवणुकदार मार्गदर्शन शिबिरात भेटलो होतो का ?

तो – नाही, पैसा आहे कोठे गुंतवायला ? माणसात मी जास्त गुंततो ! मागच्या महिन्यात वृत्तप्रत्र लेखकांचे संमेलन भरले होते तेव्हा तुम्ही आला होतात का ?

मी – आमंत्रण होते पण नाही जमले जायला, हां, दै.सकाळच्या एका कार्यक्रमात आपण बहुदा भेटलो असणार.

तो – माझा सकाळशी काहीही संबंध नाही , मी मटावादी आहे !

मी – हां, आता आठवले – रक्तदाना संबंधी आम्ही एक परीषद घेतली होती, त्यात आपण भेटलो असणार.

तो – नाही, अशा कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहील्याचे मला तरी आठवत नाही – मग कदाचित आम्ही आयोजित केलेल्या नेत्रदान जागृति कार्यक्रमात आपण भेटलो असणार.

मी – छे, तसा कार्यक्रम तर आम्हीच हल्ली आयोजित केला होता. मला वाटते माथेरान वाया धोदाणी या ट्रेकमध्ये आपण भेटलो असणार, का मागच्या यूथ हॉस्टेलच्या मनाली ट्रेक मध्ये ?

तो – नाही, मला ट्रेकिंग मध्ये अजिबात रस नाही ! तुमचा ब्लॉग आहे का ?

मी – हो, पण मग ---- ?

तो – अहो, स्टार प्रवाहच्या ब्लॉगर्स संमेलनात आपण भेटलो असणार ---

मी – नाही हो, माझा सुद्धा ब्लॉग आहे पण मी तिकडे नव्हतो गेलो , कदाचित पुण्यातल्या चितपावन संमेलनात किंवा बहुभाषिक ब्राह्मण संमेलनात तर नाही ना भेटलो होतो आपण ?

तो – मी जाती-पातीच्या भींती तोडून टाकल्या आहेत ….केसरीच्या एखाद्या ट्रीप मध्ये ?

मी – मी आणि केसरी बरोबर ? छे ! एकाच्या खर्चात आम्ही चौघे फीरून येऊ ! तुमची मुले फडके मध्ये असतील तर शाळेच्या एखाद्या कार्यक्रमात, पालकसभेत आपण भेटलो असण्याची शक्यता आहे.

तो – नाही, माझी मुले डीएवी मध्ये आहेत …

तो-मी – भेटलो आहोत, अगदी हल्लीच हे नक्की – पण कोठे ?

एवढ्यात कार्यक्रम सुरू झाला. आमचे दोघांचे त्यात अजिबात लक्ष लागत नव्हते. डोक्यात विचारचक्र चालूच होते. कोठे बरे आम्ही भेटलो होतो ?

कार्यक्रम संपला, चहापान झाले पण प्रश्नचिन्ह काही मिटत नव्हते ! शेवटी आम्ही आमची नव्याने ओळख करून घेतली व हसत हसत आपापल्या स्कूटरला किक मारल्या, दोघे दोन दिशांना वळलो आणि एकदम गर्रकन परत फिरलो –

तो – अहो आपण वनवासी कल्याण आश्रमाच्या एका कार्यक्रमात भेटलो होतो !

मी – बरोबर, उरण जवळील एका वनवासी शाळेच्या नवीन बांधलेल्या वर्गाचे उद्‍घाटन होते !

चला, खूण खूणेला पटली !

गुरुवार, १८ मार्च, २०१०

जैसी करनी वैसी भरनी !

मी –

नागपूरला मित्राच्या लग्नाला हजेरी लावून मी हल्दीरामचे दूकान गाठले. हल्दीरामची संत्रा बर्फी आणल्याशिवाय घरी स्वागत होणार नव्हते व कामावर सुट्टी पास होणार नव्हती ! नुकत्याच आलेल्या संत्रा बर्फीवर पब्लिक तुटून पडले होते. ऑर्डर घेणार्यांची त्रेधा उडाली होती, मी चार-पाच प्रकारच्या मिठाईची ऑर्डर देत असतानाच हीचा फोन आला. थेट मुंबई न गाठता , नाशिकला उतरून एका नातलगाच्या बाराव्याला हजर रहायचा व लगे हाथ ,तिकडे जातच आहे म्हटल्यावर तिकडच्या हीच्या बहीणीसाठी व बाराव्याला येणार्या आईसाठी सुद्धा मिठाई घ्यायचा आदेश मिळाला. ओझी वहायचा मला अगदी मनस्वी तिटकारा आहे पण करतो काय ? तसेही हे ओझे मुंबईला परतताना अर्धे होणार होतेच. नाशिकचे कार्य आटोपल्यावर मेव्हण्याने कल्याणच्या एसटीत बसवून दिले. पण बस भिवंडी मार्गे आहे तेव्हा ती सोड दूसरी पकड हा त्याचा सल्ला काही मी मानला नाही. तब्बल पास तासाने , संध्याकाळी ७ वाजता, कल्याण आले तेव्हा बसमधली गर्दी, वाहतुकिची प्रचंड कोंडी यामुळे मी पार अर्धमेला झालो होतो. सोबतच्या सामानाचे ओझे सांभाळत मी बसमधून सगळ्यात शेवटी उतरलो. एसटीच्या सगळ्या डेपोत घाणेरडा डेपो कोणता असेल तर तो कल्याणचा ! भयंकर अस्वच्छ, काळोखाचे साम्राज्य, पावलो-पावली पडलेले खड्डे व अनागोंदी कारभाराची हद्द म्हणजे कल्याण डेपो ! मला पनवेलला जाणारी एसटी पकडायची होती. जिकडे तिकडे लोकांचे घोळके उभे होते. कोणतीही सूचना मिळत नसल्याने गाडी लागली रे लागली की लोकांची झुंड त्या दिशेने सामानासकट धावत सूटत होती. एकाच बसवर तिन वेगळेवेगळे फलक होते व खडूने सुद्धा भलतेच ठीकाण लिहीलेले होते. जो तो आपल्या सोयीने अर्थ लावून त्या बसमध्ये शिरत होता. मग एखादा माजोरडा वाहक पानाची पिचकारी मारत वेगळ्याच ठीकाणी गाडी जाणार असल्याचे सांगत होता ! मग प्रचंड रेटारेटीत आतले बाहेर पडत होते व बाहेरचे आत शिरत होते ! हिन्दीत प्रवासाला यातायात का म्हणतात त्याचा प्रत्यय येत होता. एकंदरीत परीस्थिती बघून मी घरी बायकोला फोन करून “कल्याणला पोचलो आहे, प्रचंड गोंधळ आहे, घरी कधी परतेन हे सांगता येणार नाही, काळजी करू नकोस व जेवून घे” असे सांगितले. अर्धा तास वाट बघून सुद्धा एसटी मिळाली नाही व गर्दी अजून वाढली तेव्हा मला सुद्धा नाइलाजाने त्या घोळक्यात सामील व्हावे लागले. एका हातात सामानाचे ओझे व एका हातात हल्दीरामची पिशवी सांभाळत मी उभ्या असलेल्या प्रत्येक बसची चौकशी करत होतो. एवढ्यात पनवेल – पनवेल असा पुकारा झाला. त्या दिशेने धावणार्या घोळक्यात मी सुद्धा सामील झालो.

मुन्ना

कल्याण स्टेशन म्हणजे माझ्यासारख्या मोबाइल चोरांची मक्का-मदीनाच ! गाडीत घुसायच्या नादात असलेल्याचा मोबाइल मारणे सगळ्यात सोपे. त्यात त्याच्या दोन्ही हातात सामान असेल तर सोने पे सुहागा ! अर्थात “त्याच्यावर” माझे बराच काळ लक्ष होते. नुकताच त्याने घरी फोन सुद्धा लावला होता म्हणजे लगेच काही तो मोबाइलसाठी खिषात हात घालणार नव्हता. पनवेल बसमध्ये शिरत असतानाच त्याच्या खिषातला मोबाइल मी उडविला. उडविलेला मोबाइल स्विच ऑफ करून मी एका टपरीवर आलो आतले सिमकार्ड काढून दूसरे टाकले तेव्हा कळले की त्या xx ने फोन सुद्धा लॉक करून ठेवला होता ! म्हणजे विकताना अजून तिनशे रूपयाची खोट बसणार होती. भोळसटच असावा तो ! आपल्या घरचा नंबर त्याने फोनवरच मागे लिहून ठेवला होता. कोणाला सापडला तर तो फोन करून कळवेल अशी भाबडी आशा त्याला वाटत असावी ! पण या नंबरावरूनच एक भन्नाट आयडीया माझ्या टकूर्यात क्लिक झाली ! साल्याने आपल्याला तिनशे रूपयाचा खोडा घातला ना ? अब देखो मेरे खोपडी का कमाल !

मी

दोन्ही हातातल्या सामानामुळे बसमध्ये शिरताना खूपच हाल झाले. अरूंद दारातुन सामान घेउन आत शिरताच येत नव्हते. प्रचंड धक्के पचवित बसमध्ये शिरलो तर बसमध्ये बसायला जागाच नव्हती. गर्दीच्या रेट्याबरोबर पार टोकाला बसलो तर एक तरूण शेजारच्या जागेवर सॅक टाकून ती मित्रासाठी बुक करून बसला होता. माझे टाळके सणकले ! माझे सामान रॅकवर ठेवून मी सरळ ती सॅक त्याच्या अंगावर भिरकावली व त्या जागेचा ताबा घेतला. खुन्नस, वादावादी , धमकावणी हे टप्पे पार पडल्यावर हाणामारी अपरीहार्य होती. एवढयात त्या त्याच्या मित्राने ’मला जागा मिळाली’ असे कोठूनतरी ओरडूनच सांगितले व दोघेही थंडावलो ! आता बसमध्ये बसलोच आहोत तर हिला कळवावे म्हणून खिषात हात घातला आणि हादरलोच ! कोणीतरी मोबाइल चोरला होता ! तरी एक आशा होती, कदाचित बसमध्येच पडला असेल तर ? भांडण विसरून शेजारच्या तरूणाने लगेच मोबाइल काढला व माझा नंबर विचारून त्याला फोन लावला. स्विच ऑफ असल्याचा मेसेज मिळताच तो चोरला आहे यावर शिक्कामोर्तब झाले. मोबाइल चोरल्याची घटना बसभर पसरली व जो तो कल्याणला मोबाइलचोरांनी कसा उच्छाद मांडला आहे व कोणाचा आधी कसा असाच मोबाइल मारला गेला होता त्याच्या सुरस कथा सांगू लागला. शेजारच्या तरूणाने अजून मिसकॉल द्यायचा नाद सोडला नव्हता. मध्येच मला त्याने घरी हे कळवायला सांगितले पण मी त्याची गरज नाही असे सांगितले. मोबाइल चोरीला गेल्याचे सत्य आता मला पचवायलाच लागणार होते.

माझी ही

हा एव्हाना बसमध्ये बसला असेल असा विचार मी करीत असतानाच फोन वाजला. पलिकडून कोणाचातरी अपरीचित आवाज कानी पडला. मी जे काही सांगतो आहे ते आधी शांतपणे ऐकून घ्या, घाबरायचे मात्र काहीही कारण नाही असे दोनदा सांगून तो जे सांगू लागला ते मात्र धडकी भरविणारेच होते.

मुन्ना

मला मराठी अगदी अस्खलित बोलता येते व धादांत खोटे सुद्धा ! मोबाइलवर लिहिलेला नंबर मी कनेक्ट केला. अर्थात पीसीओ वरून ! अपेक्षेप्रमाणेच बाईचा आवाज ऐकू आला. मी अतिशय शांतपणे माझा प्रत्येक शब्द उच्चारत होतो.

“कल्याण डेपोच्या बाहेर एका व्यक्तीला अपघात झालेला आहे. त्या व्यक्तीच्या मोबाइलवर मला हा नंबर मिळाला. मी त्या व्यक्तीला अर्धवट बेशुद्धावस्थेत एका खाजगी रूग्णालयात आणले आहे. डॉक्टरांनी तपासून काही धोका नसल्याचे सांगितले आहे. वेळेत उपचार सुरू झाले तर सकाळ पर्यंत डिसचार्ज सुद्धा मिळेल पण मी तिथपर्यंत थांबू शकणार नाही. प्लिज माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही अजिबात काळजी करू नका, घाबरू नका व उगाच धावपळ करू नका, कोणा शेजार्या - पाजार्याला अवेळी त्रास द्यायची सुद्धा गरज नाही. पण एक अडचण आहे. मला वीस हजार रूपये ताबडतोब भरावे लागणार आहेत. तसे माझ्याकडे वीस हजार आहेत पण ती ऑफीसची कॅश आहे व सकाळी मला जमा करावीच लागणार . तुम्ही एक करता का ? माझा एक मित्र पनवेललाच राहतो, तुमचा पत्ता द्या, त्याला तुमच्या घरी पाठवतो , विश्वास असेल वाटत तर द्या त्याला पैसे म्हणजे सकाळी कामावर येतानाच तो ते मला पोचते करेल. मला पैसे पोचल्याचा निरोप मिळाला की मी लगेच माझ्याकडची कॅश भरतो व तुम्हाला रूग्णालयाचा पत्ता देतो. नाहीतर मग नाइलाजाने मला त्यांना सरकारी रूग्णालयात हलवावे लागेल , मग पोलिस सोपस्कार झाल्याशिवाय उपचार मिळणार नाहीत व बहुमुल्य वेळ वाया जाईल.”

पलिकडे काही सेकंद भन्नाट शांतता होती पण मग , “माझ्याकडे घरी एवढी कॅश नाही पण तुमचा मित्र एचडीएफसीच्या एटीएम बाहेर आल्यास मी तिकडूनच पैसे काढून त्याला देते” असे उत्तर मिळाल्यावर मला जरा वाइटच वाटले , वीस हजार जरा कमीच झाले निदान पन्नास तरी मागायला हवे होते ! ठीक है , जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया ! माझा पनवेलचा दोस्त कुट्टीला मी मोबाइलवरून पैसे ताब्यात घेण्याचे कळविले व जास्त तोंड उघडायचे नाही असेही बजावले ! कुट्टीचे एक बरे होते, त्याला मराठी अजिबात समजत नव्हते व त्याचे हिन्दी सुद्धा जेमतेमच होते !

माझी ही

फोन ठेवल्यावर मला प्रचंड टेन्शन आले. सोसायटीची पूजा असल्याने मुले खालीच होती व मला सुद्धा थोड्या वेळाने खाली जेवायला उतरावे लागणार होते. पूजेच्या उत्साही वातावरणात नवर्याच्या अपघाताची बातमी सांगितली तर सगळ्यांचाच विरस होईल. कल्याणला आपला कोणी नातलग सुद्धा नाही. समोरून बोलणार्यावर अविश्वास दाखवावा असे सुद्धा काही नव्हते कारण एरवी प्रवास सुरू झाला की येणारा याचा एसेमेस आला नव्हता. अपघाताची वेळ व ठीकाण सुद्धा पटणारेच होते. खाजगी रूग्णालयात पैसे भरल्याशिवाय पेशंटला हात सुद्धा लावला जात नाहीच ! विचार करीत व लोकांना विचारत वेळ वाया घालविणे निदान तेव्हा तरी योग्य नव्हते. खाली खेळत असलेल्या मुलांना येते पाच मिनिटात असे सांगून एटीएम गाठले. बाहेर उभा असलेला एक तरूण मला बघून सरसावला. एटीएम मधून पैसे काढून ते मी त्याच्या हवाली केले. त्याच्याकडे मोबाइल नव्हता, त्याचा तो कल्याणचा मित्रच त्याला जरा वेळाने शेजार्याकडे फोन करणार होता. त्याला काही विचारले तर त्याचे आपले एकच उत्तर होते “तुम्हारा लॅन्ग्वेज नही आता, लेकिन फिकर मत करो”. सोसायटीत परतले पण कोठेच लक्ष लागत नव्हते. त्याच्या फोनची वाट बघत होते. का बरे अजून फोन नाही आला ? की आता तरी कोणाला सांगावे काय झाले ते ?

मुन्ना

कुट्टीकडून पैसे ताब्यात आल्याचे कळताच मी स्वत:वरच जाम खुष झालो ! माझा प्लान कल्पनेबाहेर यशस्वी झाला होता. खरे तर कुट्टी मला उद्या बारमध्ये भेटणारच होता पण मला तेवढा धीर नव्हता. कधी एकदा ते रूपये माझ्या ताब्यात घेतो असे झाले होते. तसेही तो लॉक्ड मोबाइल खोलण्यासाठी मला कुट्टीच मदत करणार होता. मी लगेच बाइकवरून पनवेलला निघालो. वाटेत प्रचंड ट्रॅफिक जाम होते पण बाइक असल्याने इकडून तिकडून कट मारत मी पनवेलला पोचलो. कुट्टीला तो मोबाइल दिला व नोटांचे पुडके पाकिटात घालून मी बाइक पिटाळली.

मी

साला आजचा दिवसच खराब होता. मोबाइल मारला गेला होताच पण ट्रॅफिक जाम काही पाठ सोडत नव्हते. एरवी कल्याण ते पनवेल पाउण तासाचा प्रवास पण आज त्याला तब्बल दोन तास लागले होते ! नवीन पनवेलला जाणार्या उड्डाण पुलाजवळ मी बसमधून उतरलो. सामान सांभाळत रीक्षात बसत असतानाच सेक्टर ४, नवीन पनवेल असे सांगितले. या वर रीक्षावाल्याने पंचवीस रूपये होतील असे सांगितले. साले एकतर मीटर लावत नाहीत . नाहीतर हे भाडे मिनिममचे पण नाही, तसे एरवी आम्ही १३ रूपये देतोच, रात्र आहे तर १५ घे असे सांगून सुद्धा त्याचा हेका कायमच होता. थांब मोबाइलवरून पोलिसांना बोलावतो व तुझा माज उतरवतो असे म्हणत मी मारे खिषात हात तर घातला पण ---- ! मी तणतणत ती रीक्षा सोडली व सामान घेउन पायीच जायचे ठरवले. तेवढयात पुलावरून भन्नाट वेगाने बाइकवरून येणारा एक तरूण वळणावर तोल जाउन रस्त्याच्या मधोमध असणार्या सिग्नलवरच धडकला. मी सामान तिकडेच बाजूला ठेवले व त्याला मदत करायला धावलो. त्याला चांगलाच मार बसला होता. रक्ताच्या थारोळ्यात तो तडफडत होता. त्याची शुद्ध हरपत होती. लगेच वैद्यकिय मदत मिळणे गरजेचे होते. मी मदतीला कोण येतो का हे बघत असतानाच तो रीक्षावाला माझे सामान रीक्षात घाकून आला व मदतीला लागला. त्या तरूणाला आम्ही जवळच असलेल्या खाजगी रूग्णालयात नेले. रीक्षात बसवताना त्याच्या खिषातुन बाहेर डोकावणारे पाकिट व मोबाइल मी खबरदारी म्हणून माझ्या ताब्यात घेतला. दूसर्या एका रीक्षावाल्याने त्याची बाइक रूग्णालयाबाहेर लावून ठेवली. थोड्याच वेळात डॉक्टरी उपचार चालू झाले. तो रीक्षावाला सुद्धा माझ्याबरोबर होताच. रक्त बरेच गेल्यामुळे त्याला रक्ताची गरज होती. सुदैवाने त्याचा रक्तगट ओ निघाला व माझ्या ओळखीने दोन बाटल्या रक्त पाठवायची सोय साई ब्लड बँकेने त्वरीत केली. मी मदत करतो आहे म्हटल्यावर पोलिस सुद्धा उपचार चालू करा उद्या येउन स्टेटमेंट घेतो असे सांगून मोकळे झाले. सगळॆ सुरळीत झाल्यावर त्याच्या मोबाइलवरून मी त्याने शेवटचा कॉल कोणाला केला आहे हे तपासले. सलग तिन कॉल त्याने एकाच नंबरला थोड्या थोड्या अंतराने केले होते म्हटल्यावर मी त्याच नंबरला उलट फोन करून झाल्या प्रकाराची माहिती दिली व रूग्णालयात बोलावले. अर्थात हे सगळे त्याला समजवायला मला बराच त्रास झाला ! त्याचे हिन्दी भयानक होते ! तो १० मिनिटातच हजर झाला तेव्हा मला तिकडे थांबायचे काहीच कारण नव्हते. आता तोच रीक्षावाला मला घरी सोडायला तयार होताच !

माझी ही

१० वाजत आले तरी काही फोन नव्हता तेव्हा मला काळ्जी वाटणे स्वाभाविकच होते. इकडे जो तो नवरा कधी येणार असे विचारून मला भंडावून सोडतच होता. बहुतेकांची जेवणे सुद्धा आटोपली होती व आवाराआवर सुरू झाली होती. मुले सुद्धा झोपायला निघून गेली. मला मात्र काय करावे हेच सूचत नव्हते. सोसायटीच्या अगदी दारात रीक्षा थांबली तेव्हा सगळ्यांचेच तिकडे लक्ष गेले ! नवरा त्यातुन उतरताच त्यांचे नाव घेत मुलांनी ’काका, काका’ असा एकच गोंधळ केला. मी बघतच राहिले. याला तर काहीही धाड भरलेली नाही ! एरवी रीक्षावाल्याशी उभा दावा मांडणारा आज त्याला शंभर रूपये देत होता व तो ते घेत नव्हता हे बघून चांगलीच करमणुक झाली माझी ! टेन्शन खल्लास ! पण त्या मुर्खासारखे देउन बसलेल्या वीस हजाराचे काय ? मी इकडे कोणत्या अवस्थेतुन गेले होते हे त्याच्या अर्थात गावीही नव्हते. त्या रीक्षावाल्याला त्याने सोबत जेवायला घेतले व तो कसा भला आहे, त्याने अपघातात सापडलेल्या तरूणाला कशी मदत केली याचे वर्णन करण्यातच तो रंगून गेला होता. याला घराची काही आठवण आहे की नाही ?

मी

सोसायटीतल्या मित्रांबरोबर गप्पात जरी रंगलो होतो तरी तिच्याकडे माझे लक्ष होतेच. अजून खाली उभी आहे म्हणजे आपण आल्याशिवाय ती घरी जाणार नाही हे नक्की ! चेहरा पण जरा चिंतातुर दिसतोय, काहितरी खास सांगायचे आहे असे दिसते तेव्हा तिच्या रागाचा भडका उडायच्या आत निघाले पाहिजे हे खरे पण तसे कृतीत उतरायला अंमळ उशीरच झाला खरा ! तिच्याकडून सगळी स्टोरी समजल्यावर मी हैराणच झालो ! साल्याने माझा मोबाइल तर मारला होताच वर घरच्या नंबरचा त्याने भलताच दुरूपयोग केला होता. अर्थात प्राप्त परीस्थितीत जे योग्य तेच तिने केले होते. तसेही एटीएम मधून जास्तीत जास्त वीस हजारच काढता येतात हे किती बरे नाही ! एवढ्यात मला त्या अपघातग्रस्त तरूणाच्या ताब्यात घेतलेल्या वस्तूंची आठवण झाली. त्याच्या पाकिटात वीस हजाराच्या कोर्या करकरीत नोटा होत्या पण कोणत्याही बँकेचे कार्ड मात्र सापडले नाही. मग त्याच्याकडून हे नोटांचे कोरे पुडके आले कसे ? ते पण नेमके वीस हजाराचे ? घरच्या नंबरवरून अपघाताची खोटी कहाणी सांगून पैसे मागणारा आलेला कॉल सुद्धा पीसीओ वरून केलेला होता. पण कल्याणला चोरी करणारा पनवेलला कशाला कडमडायला येईल ? पैसे घ्यायला ? त्याने स्वत: पैसे घेतले असणे वेळॆचा विचार करता शक्यच नव्हते. तेव्हा त्याचा कोणीतरी मित्र इथे असलाच पाहिजे होता. अरे होता की ! तोच, ज्याला आपण त्या मोबाइलवरून केलेले शेवटचे कॉल बघून बोलावले ! दहा मिनिटाच्या आत तो पोचला म्हणजे स्थानिकच असला पाहिजे. त्या कॉलच्या वेळा सुद्धा याची पुष्टीच करत होत्या. So everything is in control ! चोर तर निदान दोन आठवडे उठू शकणार नव्हता. त्याच्या गुन्ह्याची पुरेपुर सजा त्याला मिळालीच होती, अगदी काव्यगत न्याय झाल्याप्रमाणेच, त्याने जशी स्टोरी माझ्या बाबतीत रचली होती , अगदी तशीच त्याच्या बाबतीतच घडली होती ! हीने दिलेले वीस हजार रूपये (वर थोडे अधिकचेच ! ) मला मिळाले होते ! आता प्रश्न फक्त मोबाइल हॅण्डसेटचाच होता. अर्थात तो तरी कोठे जाणार होता ? आता मला झोपेची नितांत गरज होती, सकाळी बघू काय ते !

सकाळी दोन मित्रांना सोबत घेउन रूग्णालय गाठले. हिला लांबूनच कुट्टीला ओळखायला सांगितले. हीचा ग्रीन सिग्नल मिळाल्यावर कुट्टीला विजिटींग रूम मध्ये बोलावले. भाषेचा अडथळा येउ नये म्हणून त्याच्या दोन आधी सणसणीत कानफटात ओढल्या. तो भेलकांडत असतानाच त्याला सगळी ष्टोरी ऐकवली व बर्या बोलाने तुझ्या मित्राकडून मोबाइल परत मिळवून दे नाहीतर तुला सुद्धा पोलिसात देतो असे म्हणताच कुट्टीनेच खिषातुन माझा मोबाइल काढून दिला ! मुन्ना बर्यापैकी शुद्धीवर आलेला दिसत होता तेव्हा त्याला सुद्धा त्याचा खेळ संपल्याचे सुनावले व इकडून बरा झालास की जेलची हवा काही चुकणार नाही याची जाणीव करून दिली !

रविवार, १४ मार्च, २०१०

स्वप्न साकार होताना !

काही महिन्यापुर्वी याच सदरात मी आपल्याला रा.स्व.संघ संचालित प्रभाकर पटवर्धन स्मृती रूग्णालयाच्या प्रकल्पाविषयी माहिती दिली होती. या प्रकल्पाला देणग्या देण्याचे सुद्धा आवाहन केले होते. (http://ejmarathe.blogspot.com/2009/09/blog-post_3726.html) जगाच्या कानाकोपर्यातुन याला प्रचंड प्रतिसाद मिळाला व एका चांगल्या कार्यासाठी आर्थिक पाठबळ उभे राहिले. सर्व देणगीदारांना धन्यवाद ! आपल्या सर्वाच्या सहकार्याने प्रकल्पाचे ७५ % सिविल काम पुर्ण झाले आहे. आजच या ठीकाणी स्वयंसेवकांचे एकत्रीकरण होते. उपस्थित सर्वांना प्रकल्पाचे चारही मजले फिरवून कोठे काय होणार आहे याची माहिती दिली गेली.संपूर्ण प्रकल्प २ टप्प्यात पुर्णात्वास जाणार आहे. पहिला टप्पा १० कोटीचा आहे. यात बांधकाम खर्च ४ कोटीचा व साधनसामुग्री ६ कोटींची आहे. दूसर्या टप्प्यात अजून तिन मजले वाढविण्यात येणार आहेत.

पनवेलच नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातले हे सर्वात अत्याधुनिक रूग्णालय असणार आहे. हे रूग्णालय अशा प्रकारच्या भविष्यातील सेवा प्रकल्पांसाठी रोल मॉडेल ठरणार आहे. मुंबई-पुणे या अत्यंत गजबजलेल्या महामार्गावर, पनवेल एसटी डेपो पासून हाकेच्या अंतरावर हा प्रकल्प साकार होत आहे. खाजगी रूग्णालयात उपचार किती महागडे असतात हे आपल्या सर्वाना माहित आहेच तर सरकारी रूग्णालयातली अनास्थासुद्धा अनेकांनी अनुभवली असेल. गरजू रूग्णांना रास्त दरात व ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे त्यांच्यासाठी या रूग्णालयात मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. बाहेर कोणत्याही साधारण शस्त्रक्रियेचा खर्च २०,००० रूपये येतो, इथे तिच शस्त्रक्रिया अवघ्या ५,००० रूपयात होणार आहे. सिझरींगचा खर्च अनेक ठीकाणी ८० हजार ते एक लाख येतो, इकडे या साठी फक्त २३७५ रूपये आकारले जातील, दर्जात कोणतीही तडजोड न करता ! अनेक दात्यांनी कर नियोजनाच्या दृष्टीने आम्ही मार्च महिन्यात देणगी पाठवू असे कळविले होते. या निमित्ताने मी त्यांना लवकरात लवकर आपली मदत पाठवावी अशी नम्र विनंती करतो. परकिय चलनात देणगी स्वीकारण्याची परवानगी सुद्धा या प्रकल्पाला मिळाली आहे तेव्हा त्याचा जरूर लाभ घ्यावा ही विनंती. आपल्या सर्व मित्रांना या प्रकल्पाची निदान माहिती तरी द्यावी ही विनंती. प्रकल्पाविषयी कोणतीही माहिती हवी असल्यास आपण माझ्याशी सुद्धा संपर्क साधू शकता. ( मोबाइल 09987030637, इमेल – ejmarathe@gmail.com )

प्रकल्पाचे काम कसे झपाट्याने पुर्णत्वास जात आहे ते आपल्याला सोबत दिलेल्या फोटोवरून समजेल.

http://picasaweb.google.com/ejmarathe/ndGQnH?feat=directlink

देणगीदारांनी कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधावा,

डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृति रूग्णालय,

१९६/१, डॉ. आंबेडकर रोड, पनवेल,

रायगड – ४१० २०६

फ़ोन नंबर – ०२२-२७४६ २८८२, २७४८०१७९

चेक किंवा ड्राफ़्ट या नावाने काढावा – “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती”

सर्व देणग्यांना आयकराच्या ८०जी कलमाखाली मिळणारी वजावट लागू

त्यासाठीचा एफ़.सी.आर.ए. नंबर – ०८३९३०३२१.

इंटरनेट द्वारे थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी;

1. Bank of India, Panvel Branch

A/c Name : R.S.S.J.K.S.Prabhakar Patwardhan Smruti Rugnalaya

A/c No. : 121210110001931

MICR No. : 400013110

2. Bank of Maharashtra, Panvel Branch

A/c Name : R.S.S.J.K.S.Prabhakar Patwardhan Smruti Rugnalaya

A/c No. : 20121787182

MICR No. : 400014117

वि.सू . २५,००० वा त्याहुन जास्त देणग्या देउ इच्छीणार्यांनी कृपया आधी संपर्क साधावा. त्यांना १०० % करमुक्त देणगीचा लाभ मिळू शकेल. मोठ्या देणगीदारांच्या काही अटी असतील तर त्यावर सुद्धा नक्की विचार केला जाईल.

शनिवार, १३ मार्च, २०१०

स्रीदाक्षिण्याचे अन्वयार्थ !

संध्याकाळी घरी परतताना लोकलमध्ये, अगदी सीएसटीलासुद्धा, जागा मिळ(वि)णे अधिकाधिक मुष्किल होत चालले आहे. चवथ्या किंवा नवव्या सीटला बसणे मला साफ नामंजूर असल्याने मोबाइलचे इयरफोन कानात खूपसून मनपसंद गाणी ऐकणे हाच या दु:खावरचा उतारा असतो. कधी तरी एखादा चमत्कार झाल्यासारखीच सीट मिळते पण लगेच कोणी ज्येष्ठ नागरिक नजरेला पडतो व ’दूसर्या’ मनाला बळी पडून सीटवर उदक सोडावे लागते. हल्ली हा दोन मनातला संघर्ष भलताच तुंबळ होत चालला आहे. एक मन म्हणते “तूच का द्यायची नेहमी सीट ?” , दूसरे मन म्हणते , “तू नाही तर दूसरा कोण ?” पहिले मन दरडावते, “ तू डोळे उघडे तरी का ठेवतोस, डोळे मिटून गाणे ऐकलेस तर अनेक प्रोब्लेम सूटतील !”. लगेच दूसरे समजावते “झोपलेल्या उठवता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला ?” परवा असेच झाले. जागा मिळताच पहिल्या मनाने डोळे मिटायला भाग पाडले पण दूसर्या मनाने मशीद यायच्या आतच डोळे उघडले ! दाराकडेच एक जोडपे उभे होते. नवरा बायकोभोवती हाताचे कडे करून दाराकडच्या बाजूला रेलून उभा होता पण गर्दीपुढे त्याचा काहीच उपाय नव्हता. आणखी दोन स्टेशन त्यांचे असेल हाल चालले होते. पहिल्या मनाचा दबाव जबरदस्त होता. पुरूषांच्या डब्यात मूळात बायकांनी शिरावेच का ? ते ही अशा गर्दीच्या वेळी ? यांना पक्के माहीत आहे, कोणालातरी यांचा कळवळा येणार आणि यांना बसायला मिळणार ! एरवी लेडिज डब्यात दूसरी बाई यांना सीटच्या मध्ये सुद्धा उभे राहू देणार नाही ! काही नाही उठायची गरज ! कळू दे लोकलमधले गर्दी म्हणजे काय असते ते ! आधी हे मुंबईत येतातच कशाला ? -- पहिल्या मनाने असा ढोस दिल्यावर दूसरे का गप्प बसणार आहे ? त्याने लगेच , “स्त्रीदाक्षिण्य का काय म्हणतात ना ते दाखवायची हीच संधी आहे” असा मंत्र दिला व लगेच कानात “संस्कार” असे कुजबुजले ! झाले, मी परत चांगुलपणाचा बळी ठरलो व चांगली खिडकीकडूनची दूसरी सीट त्या बाईला देउ केली !

सीट मिळते आहे असे दिसल्यावर त्या बाईने आपल्या नवर्याला त्या जागेचा ताबा घ्यायचा आदेश दिला. खरेतर मुंबईकर “लोकल एटीकेटस” चांगले पाळतात. चवथ्या सीटला अवघडून बसलेला रिकामी झालेली मधली सीट बळकावणार नाही तसेच एकजण दूसर्याला सीट देतो म्हटल्यावर तिसरा ती बळकावयाचा प्रयत्न अजिबात करणार नाही ! पण कदाचित हे मुंबईत नवे असतील. नवरोबाने जागेचा ताबा घेतला तेव्हा सगळ्यांना “हटो हटो” असे फर्मावत ती बाई जागेकडे येउ लागली. मग कळले की ती गरोदर होती. दूसर्या मनाने लगेच स्वत:ची कॉलर टाइट करून घेतली ! सीटवर न बसता त्या बयेने नवर्याच्या पायात उभे राहणे पसंत केल्यावर मात्र डब्यातल्या अनेकांची सटकलीच ! बिचारा नवरा तिला परोपरीने सांगत होता की तुला बसायला जागा दिली आहे तू बस पण बाईने “पराये मर्द के बाजूमे न्नै बैठूंगी” असा पवित्रा घेतला ! बिचारा खिडकिला बसलेला तरूण स्त्रीदाक्षिण्याचा दूसरा बळी ठरला ! तो ही उभा राहिला. लोकलच्या आडव्या सीटवर नउ जण बसतात, निदान जेंटस ( की जनरल ?) डब्यात तरी ! पण या गरोदर असलेल्या बाईला ऐसपैस बसायला जमत नव्हते व तिची “मै खडीच रहती हूं” अशी रड ऐकून अजून एकाने आपल्या सीटवर पाणी सोडले ! मग मात्र बाई खिडकीवर डोके ठेवून झोपी गेली तर नवर्याने मोबाईलचा इयरफोन कानात खुपसला व ब्रह्मानंदी तंद्री लागल्याप्रमाणे डोळे मिटून घेतले. अलार्म लावल्याप्रमाणे नेरूळला दोघेही उठले व कोणाचेही एका शब्दाने सुद्धा आभार न मानता उतरते झाले ! आम्हा तिघांना आमच्या सीट मिळाल्या पण पहिले मन व डब्यातल्या लोकांनी आमच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला ! अगदी ’बाई बघितली आणि भुलले’ इथपासून ते “तुम्हीच असे वागून या परप्रांतियांना डोक्यावर चढवून ठेवले आहे, मराठी बाई असती तर उठला असतात का ?” इतपत ऐकावे लागले. एकाने तर “साली ती बाईच पक्की लबाड होती, मस्त नाटक करून तिने स्वत:बरोबरच नवर्याला सुद्धा जागा मिळवून दिली ! दारावर उभी होती तेव्हा तिला इतर पुरूषांचे धक्के बसत नव्हते का ? मग जागा दिल्यावर परक्या पुरूषाचा स्पर्श नको का वाटला ?” असे तर्कट लढविले. पहिल्या मनाला आता अगदी आसूरी आनंदाच्या उकळ्या फूटत होत्या !

अगदीच कानकोंडे झाल्यासारखे वाटू लागल्यावर दूसर्या मनाने एकच सल्ला दिला “या वेळी मात्र डोळे मिट , डोन्ट वरी, पनवेल आले की मी उठवीन तुला !”

गुरुवार, ११ मार्च, २०१०

निर्बल से लड़ाई बलवान की --- !

“बळी तो कान पिळी” याचा प्रत्यय लहानपणी अनेकदा घेतला होता. अगदी महाविद्यालयात गेल्यावर सुद्धा बाहुबल वापरूनच सर्व प्रश्न सूटतात/सुटतील असा ठाम विश्वास होता. आपल्या सुद्धा अंगात रेड्याची शक्ती असावी असे वाटायचे. जिम मध्ये गेलो तरच शरीर कमावता येते असेही वाटायचे, पण जिमची फी समजली की ’ये अपनी बस की बात नही’ असे वाटायचे ! अंगात शक्ती नसेल तर निदान एखादे शस्त्र तरी असावे असे वाटायचे. गेला बाजार एखादा खटकन उघडणारा रामपुरी चाकू तरी खिषात बाळगावा असे खूप वाटायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा तेव्हा जबरदस्त पगडा होता. शिवसैनिकांना नुसते भाषण करून पेटाविणार्या बाळासाहेबांचा फोटो बघितला व पुढे केव्हातरी प्रत्यक्ष बघितले तेव्हा “हा एवढा किरकोळ माणूस ?” हाच विचार प्रथम डोक्यात आला. पण मग मात्र जगाला हादरविणार्यांची यादी जेव्हा जेव्हा समोर आणली तेव्हा खरा आश्चर्याचा धक्का बसला, सगळॆच सिंगल फसली म्हणावे असेच होते / आहेत ! नेपोलियन बोनापार्ट पासून ते अगदी सध्याच्या पंतप्रधान मनमोहन सिंगांपर्यंत सगळॆच वामनमुर्ती ! आडमाप शरीर आणि ताडमाड उंची असलेले बाहुबली जगावर कधीच राज्य करू शकलेले नाहीत. खायला काळ आणि भुमीला भार ! त्यांच्या ताकदीचा वापर मात्र किडकिडीत देहयष्टीच्या डोकेबाज माणसांनीच करून घेतला व आपली उद्दीष्टे साध्य केली. पहिलवानाचा मेंदू गुढग्यात असतो असे केव्हातरी वाचले तेव्हा खूप मस्त वाटले होते. पुढे हे ही समजले की हातातल्या शस्त्रापेक्षा ते धरणार्या मनगटातला निर्धार जास्त महत्वाचा असतो. शरीर भक्कम असले पाहिजेच पण त्याहुन मन खंबीर हवे ! पुढे गिर्यारोहणाचा नाद लागल्यावर असे लक्षात आले की सडसडीत लोकच सहज डोंगर पार करतात, हाडापेराने मजबूत वाटणारे चढ चढताना फाफलतात ! शरीराला असलेली सुज म्हणजे सुदृढपणा नव्हे. व्यायाम करून शरीर कमावर येते पण मनाला खंबीर , सुजाण करण्यास त्याचा काहीही उपयोग नाही ! मनाची मशागत चांगले वाचल्याने, चांगले ऐकल्याने व चांगल्या माणसांच्या संगतीत राहल्याने होते. बाहुबल किती वाढू शकते याला नक्कीच काही मर्यादा असतील पण मनाची शक्ती अपार आहे. आजारपणाने जसे शरीर खंगते तसे एकदा खंबीर झालेले मन मात्र कधीत खचत नाही.

खूप वर्षापुर्वी फक्त एकदाच ऐकून कायमचे स्मरणात राहिलेले गाणे खाली देत आहे. वाचतानाच गाण्याचा अर्थ थेट तुमच्या अंत:करणात भिडेल.

निर्बल से लड़ाई बलवान की -२
यह कहानी है दीये की और तूफ़ान की -२

इक रात अंधियारी, थीं दिशाएं कारी-कारी
मंद-मंद पवन था चल रहा
अंधियारे को मिटाने, जग में ज्योत जगाने
एक छोटा-सा दीया था कहीं जल रहा
अपनी धुन में मगन, उसके तन में अगन
उसकी लौ में लगन भगवान की
यह कहानी है दीये की और तूफ़ान की

कहीं दूर था तूफ़ान...
कहीं दूर था तूफ़ान, दीये से था बलवान
सारे जग को मसलने मचल रहा
झाड़ हों या पहाड़, दे वो पल में उखाड़
सोच-सोच के ज़मीं पे था उछल रहा
एक नन्हा-सा दीया, उसने हमला किया -२
अब देखो लीला विधि के विधान की
यह कहानी है दीये की और तूफ़ान की

दुनिया ने साथ छोड़ा, ममता ने मुख मोड़ा
अब दीये पे यह दुख पड़ने लगा -२
पर हिम्मत न हार, मन में मरना विचार
अत्याचार की हवा से लड़ने लगा
सर उठाना या झुकाना, या भलाई में मर जाना
घड़ी आई उसके भी इम्तेहान की
यह कहानी है दीये की और तूफ़ान की

फिर ऐसी घड़ी आई - २, घनघोर घटा छाई
अब दीये का भी दिल लगा काँपने
बड़े ज़ोर से तूफ़ान, आया भरता उड़ान
उस छोटे से दीये का बल मापने
तब दीया दुखियारा, वह बिचारा बेसहारा
चला दाव पे लगाने, (बाज़ी प्राण की) - ४
चला दाव पे लगाने, बाज़ी प्राण की
यह कहानी है दीये की और तूफ़ान की

लड़ते-लड़ते वो थका, फिर भी बुझ न सका -२
उसकी ज्योत में था बल रे सच्चाई का
चाहे था वो कमज़ोर, पर टूटी नहीं डोर
उसने बीड़ा था उठाया रे भलाई का
हुआ नहीं वो निराश, चली जब तक साँस
उसे आस थी प्रभु के वरदान की
यह कहानी है दीये की और तूफ़ान की

सर पटक-पटक, पग झटक-झटक
न हटा पाया दीये को अपनी आन से
बार-बार वार कर, अंत में हार कर
तूफ़ान भागा रे मैदान से
अत्याचार से उभर, जली ज्योत अमर
रही अमर निशानी बलिदान की
यह कहानी है दीये की और तूफ़ान की
निर्बल से लड़ाई बलवान की
यह कहानी है दीये की और तूफ़ान की

चित्रपट तूफान और दिया

गायकमन्ना डे

संगीतवसंत देसाई

गीतकारभरत व्यास

पडद्यावर सदर करणारे कलाकारउल्हास, नंदा, राजेंद्र कुमार, सतीश व्यास, वत्सला, शांता कुमारी

प्रकाशन वर्ष१९५६

साभार :- http://smriti.com/hindi-songs

वि.सू. - या गाण्याची एमपी ३ हवी असल्यास ejmarathe@gmail.com वर मला कळवा !

बुधवार, १० मार्च, २०१०

मराठी मुलुख मैदान तोफेने कॅननला हादरविले !

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर असलेल्या पदपथावर कॅनन हा प्रसिद्ध पावभाजीचा स्टॉल आहे. त्याचे मालक मराठी आहेत. दूकानाची पाटी मराठीत हवी, नुसती मराठीतच नाही तर मराठी अक्षरे ठळक हवीत असा नियम आहे व त्याच्या अंमलबजावणीवरून बराच राडा झाला होता. कॅननची पाटी बघून मला धक्काच बसला ! जवळ जवळ ९० % जागेत इंग्रजी भाषेत Cannon असे लिहिले होते व मराठीला भिकारणीसारखे एका कोपच्यात उभे केले आहे. अर्थात कॅनन मध्ये पावभाजी खायला मी निदान ८० सालापासून जात आहे आणि आताच माझ्या हे कसे लक्षात आले याला माझ्याकडे काहीही उत्तर नाही. पण एकदा कळल्यावर गप्प बसणे हा सुद्धा माझा स्वभाव नाही. मी लगेच पत्राद्वारे सकाळ व महाराष्ट्र टाइम्स या मराठी वृत्तपत्रांना ही बाब कळविली. मटाने काही त्या पत्राची दखल घेतली नाही पण सकाळने मात्र ते आठवड्याभरानंतर छापले. माझे मूळ शीर्षक होते “महापालिकेच्या मराठी धोरणावर कॅननची तोफ”, ते सकाळने “कॅननला मराठीचे वावडे ?” असे केले. पत्रातली भाषा पण बरीच सौम्य केली होती. अर्थात लक्ष वेधण्याचे काम मात्र झाले !

आजच्या सकाळमध्ये कॅननचे मालक श्री. दांडेकर यांनी त्या पत्राला उत्तर दिले आहे. “कॅननला मराठीचे वावडे नाही” या आपल्या खुलाशात आपल्याला मराठीचा अभिमान असल्याचे नमूद करून ते पुढे म्हणतात की तो बोर्ड १९७४ पासून तसाच आहे. कॅनन या नावाचा मतितार्थ कळावा म्हणून तेव्हा तो तसा इंग्रजीत लिहीणे योग्यच होते. पण आता मात्र नवीन पाटी बनवून ते मराठीला इंग्रजीच्या डोक्यावर स्थान देणार आहेत. श्री. दांडेकर यांनी स्वत: याची दखल घेतली व खुलासा केला याबद्दल त्यांचे व या पत्राला योग्य प्रसिद्धी देणार्या दै. सकाळचे मनापासून आभार !

मंगळवार, ९ मार्च, २०१०

मी हल्ली काहीही विसरत नाही !

एकदा एखाद्याचे नाव कानफाट्या पडले की पडले ! माझ्यावर विसरभोळेपणाचा जो शिक्का बसला आहे त्या बाबतीत सुद्धा अगदी तसेच आहे ! मी विसरभोळा आहे हा आरोपच मला साफ नामंजूर आहे पण बायको माझ्या विधानाची संभावना “ आपण काही विसरतो हेच याला आठवत नाही !” अशा शेलक्या शब्दात करते ! खरे तर असल्या वावड्यांवर मी कधी विश्वास ठेवला नाही व ’मी तसा नाही’ असा खुलासासुद्धा कधी केला नाही पण याचाच पुढे फार त्रास हो‍उ लागला ! “बायकोचे लग्नात काय नाव ठेवले हे सुद्धा हा विसरला (काय बरे ठेवले होते ?)” इतपत आरोप हो‍उ लागल्यावर काही विचार करणे क्रमप्राप्तच होते. त्यात माझ्याकडून किरकोळ उसनवारी करणारे बिनदिक्क्कत तुझे पैसे/वस्तु केव्हाच परत दिली, पण तुझ्या लक्षात तर रहायला हवे ? असे सुनवू लागल्यावर मात्र मी पक्का निर्धार केला, इतप्पर झाले ते खूप झाले, आता काही म्हणजे काही विसरायचे नाही ! सुरवात करायची छत्रीपासून ! ४ जुन पासून सोबत छत्री बाळगायला सुरवात करायची ते भारत सरकार मानसून संपला असे पत्रक काढेपर्यंत ! अशी सवय झाली की विसरायचा प्रश्नच येत नाही ना ! पण दुर्दैवाने पावसाळा यंदा लांबला व पहिला पाउस पडायच्या आत माझी नवी कोरी छ्त्री हरवली ! छत्री हरवे म्हणून मग रेनसुट घेतला, पहिला थोडा स्वस्तातला घेतला म्हणून तो ही हरवला ! मग जरा भारीतला घेतला आणि मग पावसाला सुरवात झाल्याने त्याची बरीक सवय झाली ! पहिल्याच पावसात रेनसुटसह सीएसटीला पोचल्यावर लोकल मधून उतरताना सहज रॅकवर लक्ष गेले तर कोणीतरी छत्री विसरलेला दिसला ! थोडी चौकशी केल्यावर कोणी पुढे येइना म्हणून मी ती छत्री कामावर आणली व कोणी कधी विसरला तर त्याने ही वापरावी अशीही घोषणा केली ! या घटनेने माझा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला ! म्हणजे मी माझे काही न विसरता उलट दूसर्यांच्या हरवलेल्या वस्तूंची सुद्धा काळजी घेउ लागलो होतो ! मग मला ती सवयच लागली ! एरवीही मी लोकलमधून सगळ्यात शेवटी उतरतो, आता तसे करताना अगदी न विसरता कोणी काही विसरले असेल तर त्याला आठवण करून देउन त्यांचा दुवा घेउ लागलो. काही महाभाग मात्र मधल्याच स्थानकावर उतरले असल्याने असेल , त्यांच्या छत्र्या मलाच कामावर न्यायला लागायच्या ! एका महिन्यातच तब्बल १२ छत्र्या जमल्या ! नंतर पावसाने दडी मारल्याने लोक छत्री कमी नेत व विसरायचे प्रमाण सुद्धा घटले. पावसाने परत हजेरी लावल्यावर मी कामावर जमा केलेल्या छत्र्या कामावरच्या लोकांच्या कामाला आल्या ! दूसर्या अर्थाने सुद्धा कामाला आल्या, कारण अशा छत्र्या परत करायला सगळेच विसरले ! साले मला विसरभोळा म्हणायचे ! त्यातही काही जण त्या छत्र्या लोकलमध्ये विसरले ! धन्य आहे की नाही ? काही महाभाग तर ’त्या’ छत्र्या मोडक्या, फाटक्या, गळक्या होत्या अशी दूषणे देत, वर म्हणूनच त्या ते विसरले असावेत असे तारे तोडू लागले ! जाउ दे ! मी मात्र माझा रेनसूट न विसरता परत घरी न्यायला शिकलो !

पावसाचा लपंडाव असाच चालू होता, लोक छत्र्या विसरत होते, मी त्या न विसरता गोळा करून कामावर नेत होतो, कामावरचे मित्र घरी जाताना पाउस पडत असला की त्या न विसरता घरी नेउन आणायला मात्र विसरत होते ! एकदा मात्र कहरच झाला ! एकजण चक्क रेनसूटच रॅकवर विसरला होता ! मी सगळ्यांना विचारून बघितले पण तो घ्यायला कोणीच पुढे आला नाही तेव्हा नाइलाजाने मी तो माझ्या ताब्यात घेतला, चला आज जरा चेंज, छत्रीच्या ऐवजी रेनसूट ! मी लोकल मधून उतरत असतानाच एका तरूणाने मला ’अंकल, वो रेनसूट आपका नही है ना ?” असे विचारले. मी त्याला तो तुझा आहे का असे विचारले तर तो प्रामाणिक तरूण नाही असे म्हणाला, पण “कुछ दिन पहले मेरा खो गया है, अगर आपका नही है तो मै उसे रखलू क्या ?” असे आर्जव त्याने करताच मी तो रेनसूट लगेच त्याच्या हवाली केला !

घरी मी हा प्रकार साद्यंत कथन करतानाच मी आता काही विसरत नाही , उलट लोकांच्या हरवलेल्या वस्तूंची त्यांना आठवण करून देतो अशी सार्थ प्रौढी मिरवली ! या नंतर घरी एकदम सन्नाटाच पसरला ! बायकोने देवा समोर तुपाचा दिवा काय लावला, बराच काळ फोनाफोनी सुद्धा चालू होती ! मी आता काही विसरत नाही म्हटल्यावर यांना वाइट वाटणारच ना ! माझी थट्टा करायला हमखास मिळणारे एक कारण मी कायमचे नष्ट केले होते ना !

“थोबाड फोडीन परत बोललास तर, बाप आहे तुझा, याद राख !” असे काही मी उगीच चिडून बोललो नाही ! त्या दिवशी प्रसादने जरा अतिच केले. मला ट्रेकला जायचे होते म्हणून रेनसूट मधला टॉप मी शोधत होतो. तो मिळत नाही म्हटल्यावर तो प्रसादने घेतला असणे अगदी स्वाभाविकच होते. त्याला तसे विचारताच कुलदीपक म्हणाला की तुम्हीच तो “लोकल मध्ये दूसर्या कोणाला तरी देउन टाकलात “ म्हणजे स्वत: विसरला, आपली चूक कबूल करायची सोडून वर माझ्यावरच खापर फोडू लागल्यावर कोणता बाप चिडणार नाही ?