संध्याकाळी घरी परतताना लोकलमध्ये, अगदी सीएसटीलासुद्धा, जागा मिळ(वि)णे अधिकाधिक मुष्किल होत चालले आहे. चवथ्या किंवा नवव्या सीटला बसणे मला साफ नामंजूर असल्याने मोबाइलचे इयरफोन कानात खूपसून मनपसंद गाणी ऐकणे हाच या दु:खावरचा उतारा असतो. कधी तरी एखादा चमत्कार झाल्यासारखीच सीट मिळते पण लगेच कोणी ज्येष्ठ नागरिक नजरेला पडतो व ’दूसर्या’ मनाला बळी पडून सीटवर उदक सोडावे लागते. हल्ली हा दोन मनातला संघर्ष भलताच तुंबळ होत चालला आहे. एक मन म्हणते “तूच का द्यायची नेहमी सीट ?” , दूसरे मन म्हणते , “तू नाही तर दूसरा कोण ?” पहिले मन दरडावते, “ तू डोळे उघडे तरी का ठेवतोस, डोळे मिटून गाणे ऐकलेस तर अनेक प्रोब्लेम सूटतील !”. लगेच दूसरे समजावते “झोपलेल्या उठवता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला ?” परवा असेच झाले. जागा मिळताच पहिल्या मनाने डोळे मिटायला भाग पाडले पण दूसर्या मनाने मशीद यायच्या आतच डोळे उघडले ! दाराकडेच एक जोडपे उभे होते. नवरा बायकोभोवती हाताचे कडे करून दाराकडच्या बाजूला रेलून उभा होता पण गर्दीपुढे त्याचा काहीच उपाय नव्हता. आणखी दोन स्टेशन त्यांचे असेल हाल चालले होते. पहिल्या मनाचा दबाव जबरदस्त होता. पुरूषांच्या डब्यात मूळात बायकांनी शिरावेच का ? ते ही अशा गर्दीच्या वेळी ? यांना पक्के माहीत आहे, कोणालातरी यांचा कळवळा येणार आणि यांना बसायला मिळणार ! एरवी लेडिज डब्यात दूसरी बाई यांना सीटच्या मध्ये सुद्धा उभे राहू देणार नाही ! काही नाही उठायची गरज ! कळू दे लोकलमधले गर्दी म्हणजे काय असते ते ! आधी हे मुंबईत येतातच कशाला ? -- पहिल्या मनाने असा ढोस दिल्यावर दूसरे का गप्प बसणार आहे ? त्याने लगेच , “स्त्रीदाक्षिण्य का काय म्हणतात ना ते दाखवायची हीच संधी आहे” असा मंत्र दिला व लगेच कानात “संस्कार” असे कुजबुजले ! झाले, मी परत चांगुलपणाचा बळी ठरलो व चांगली खिडकीकडूनची दूसरी सीट त्या बाईला देउ केली !
सीट मिळते आहे असे दिसल्यावर त्या बाईने आपल्या नवर्याला त्या जागेचा ताबा घ्यायचा आदेश दिला. खरेतर मुंबईकर “लोकल एटीकेटस” चांगले पाळतात. चवथ्या सीटला अवघडून बसलेला रिकामी झालेली मधली सीट बळकावणार नाही तसेच एकजण दूसर्याला सीट देतो म्हटल्यावर तिसरा ती बळकावयाचा प्रयत्न अजिबात करणार नाही ! पण कदाचित हे मुंबईत नवे असतील. नवरोबाने जागेचा ताबा घेतला तेव्हा सगळ्यांना “हटो हटो” असे फर्मावत ती बाई जागेकडे येउ लागली. मग कळले की ती गरोदर होती. दूसर्या मनाने लगेच स्वत:ची कॉलर टाइट करून घेतली ! सीटवर न बसता त्या बयेने नवर्याच्या पायात उभे राहणे पसंत केल्यावर मात्र डब्यातल्या अनेकांची सटकलीच ! बिचारा नवरा तिला परोपरीने सांगत होता की तुला बसायला जागा दिली आहे तू बस पण बाईने “पराये मर्द के बाजूमे न्नै बैठूंगी” असा पवित्रा घेतला ! बिचारा खिडकिला बसलेला तरूण स्त्रीदाक्षिण्याचा दूसरा बळी ठरला ! तो ही उभा राहिला. लोकलच्या आडव्या सीटवर नउ जण बसतात, निदान जेंटस ( की जनरल ?) डब्यात तरी ! पण या गरोदर असलेल्या बाईला ऐसपैस बसायला जमत नव्हते व तिची “मै खडीच रहती हूं” अशी रड ऐकून अजून एकाने आपल्या सीटवर पाणी सोडले ! मग मात्र बाई खिडकीवर डोके ठेवून झोपी गेली तर नवर्याने मोबाईलचा इयरफोन कानात खुपसला व ब्रह्मानंदी तंद्री लागल्याप्रमाणे डोळे मिटून घेतले. अलार्म लावल्याप्रमाणे नेरूळला दोघेही उठले व कोणाचेही एका शब्दाने सुद्धा आभार न मानता उतरते झाले ! आम्हा तिघांना आमच्या सीट मिळाल्या पण पहिले मन व डब्यातल्या लोकांनी आमच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला ! अगदी ’बाई बघितली आणि भुलले’ इथपासून ते “तुम्हीच असे वागून या परप्रांतियांना डोक्यावर चढवून ठेवले आहे, मराठी बाई असती तर उठला असतात का ?” इतपत ऐकावे लागले. एकाने तर “साली ती बाईच पक्की लबाड होती, मस्त नाटक करून तिने स्वत:बरोबरच नवर्याला सुद्धा जागा मिळवून दिली ! दारावर उभी होती तेव्हा तिला इतर पुरूषांचे धक्के बसत नव्हते का ? मग जागा दिल्यावर परक्या पुरूषाचा स्पर्श नको का वाटला ?” असे तर्कट लढविले. पहिल्या मनाला आता अगदी आसूरी आनंदाच्या उकळ्या फूटत होत्या !
अगदीच कानकोंडे झाल्यासारखे वाटू लागल्यावर दूसर्या मनाने एकच सल्ला दिला “या वेळी मात्र डोळे मिट , डोन्ट वरी, पनवेल आले की मी उठवीन तुला !”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा