शनिवार, २० मार्च, २०१०

तुम्हाला कोठेतरी पाहिल्यासारखे वाटते …. !

नारदाप्रमाणे माझा सर्वत्र संचार सुरू असतो. मी कोणत्याही इझमच्या प्रभावाखाली नसल्याने कोणात्याही विचाराचे / माणसांचे / ठीकाणांचे मला वावडे नाही. पोर्ट ट्रस्टची नव्या ओळखी रोज करून देणारी नोकरी, सामाजिक कामाची आवड , पत्रलेखन, ब्लॉग व स्वत:चे मालकीचे घर होण्यापुर्वी पाठीवर बिर्हाड घेउन केलेली आगाशी, वडाळा, जेपी नगर (विरार), कॉटन ग्रीन, वडाळा व आता पनवेल अशी केलेली भटकंती – यामुळे मित्र परिवार भरपूर आहे. ओळखणारे त्याहुनही जास्त. अनेक वेळा कोणीतरी कोठेतरी भेटतो, अगदी जान-पहचान असल्याच्या थाटात गप्पा मारायला लागतो, बोलण्यातले संदर्भ शोधत ’हा कोण, कोठे भेटलो असू आपण’ याचा तपास चालू असतो. तो जर चेहरा वाचणारा असेल तर आपली ओळ्ख न सांगता तो मस्त घोळवत ठेवतो मला. भीडस्त स्वभावामुळे म्हणा वा तो आपल्याला एवढे चांगलो ओळखतो व आपल्याला तर त्याचे नावही आठवत नाही याची कबुली कशी द्यायची या विवंचनेत मी “माफ करा, मी आपल्याला ओळखले नाही” असे स्पष्ट सांगत नाही ! कधी उलटे सुद्धा होते, समोर दिसत असलेला चेहरा कोठेतरी पाहिल्यासारखा वाटत असतो, ( एखादी सुंदरी असेल तर जास्तच ! ) त्याच्या चेहर्यावर सुद्धा असेच भाव असतात पण “सुरवात कोणी करायची ?” हा प्रश्न आडवा येतो व कोंडी काही फूटत नाही !

मागच्या आठवड्यात गंमतच झाली. पटवर्धन रूग्णालय या आमच्या ड्रीम-प्रोजेक्टच्या स्वयंसेवकांची बैठक होती. रूग्णालयाचे सिविल वर्क जवळपास पुर्ण झाले होते. बांधून पुर्ण झालेल्या एका खोलीतच बैठक होती. कार्यक्रम सुरू व्हायला अजून थोडा वेळ होता. माझ्या बाजूला प्रसन्न व्यक्तीमत्वाचा , माझ्याच वयाचा एक इसम बसला होता. आमची नजरानजर होताच तो ओळखीचे हसला. मी सुद्धा हसलो पण लगेच डोक्यात किडा वळवळला, याला कोठेतरी पाहिले आहे, इतकेच नाही तर चांगल्या गप्पा सुद्धा मारल्या आहेत ! पण कोठे ? केव्हा ? कधी ? इतक्यात तोच बोलला “तुम्हाला आधी कोठेतरी बघितल्यासारखे वाटते, पण नीटसे आठवत नाही” बरे झाले ! मी सुद्धा लगेच कबुली देऊन टाकली ! पण मग कोठे बरे आपण भेटलो असू ? दोघांच्याही ओठावर हा प्रश्न एकदमच आला !

मी – तुम्ही गोदीत कामाला आहात का ? नाहीतर तुम्ही कदाचित आपल्या अकाउंटस विभागात असाल ?

तो – नाही .मी गोदीत कामालाच नाही !

मी – मग तुम्ही नक्की सीएचए ( Custom House Agent ) असणार.

तो – अहो नाही हो, मी पवईच्या आय.आय.टी. मध्ये प्राध्यापकी करतो. तुम्ही तिकडे कधी आला होतात का ?

मी – छे, काहीतरीच काय ! आय.आय.टी. सोडाच कोणत्या आयटीआयची सुद्धा मी कधी पायरी चढलेलो नाही ! कदाचित ट्रेनमध्ये ?

तो – नाही, मला गाडी येते घ्यायला. संघाच्या कोणत्या कार्यक्रमात ?

मी – मी संघात सक्रीय नाही, बरीच वर्षे झाली त्याला. गुंतवणुकदार मार्गदर्शन शिबिरात भेटलो होतो का ?

तो – नाही, पैसा आहे कोठे गुंतवायला ? माणसात मी जास्त गुंततो ! मागच्या महिन्यात वृत्तप्रत्र लेखकांचे संमेलन भरले होते तेव्हा तुम्ही आला होतात का ?

मी – आमंत्रण होते पण नाही जमले जायला, हां, दै.सकाळच्या एका कार्यक्रमात आपण बहुदा भेटलो असणार.

तो – माझा सकाळशी काहीही संबंध नाही , मी मटावादी आहे !

मी – हां, आता आठवले – रक्तदाना संबंधी आम्ही एक परीषद घेतली होती, त्यात आपण भेटलो असणार.

तो – नाही, अशा कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहील्याचे मला तरी आठवत नाही – मग कदाचित आम्ही आयोजित केलेल्या नेत्रदान जागृति कार्यक्रमात आपण भेटलो असणार.

मी – छे, तसा कार्यक्रम तर आम्हीच हल्ली आयोजित केला होता. मला वाटते माथेरान वाया धोदाणी या ट्रेकमध्ये आपण भेटलो असणार, का मागच्या यूथ हॉस्टेलच्या मनाली ट्रेक मध्ये ?

तो – नाही, मला ट्रेकिंग मध्ये अजिबात रस नाही ! तुमचा ब्लॉग आहे का ?

मी – हो, पण मग ---- ?

तो – अहो, स्टार प्रवाहच्या ब्लॉगर्स संमेलनात आपण भेटलो असणार ---

मी – नाही हो, माझा सुद्धा ब्लॉग आहे पण मी तिकडे नव्हतो गेलो , कदाचित पुण्यातल्या चितपावन संमेलनात किंवा बहुभाषिक ब्राह्मण संमेलनात तर नाही ना भेटलो होतो आपण ?

तो – मी जाती-पातीच्या भींती तोडून टाकल्या आहेत ….केसरीच्या एखाद्या ट्रीप मध्ये ?

मी – मी आणि केसरी बरोबर ? छे ! एकाच्या खर्चात आम्ही चौघे फीरून येऊ ! तुमची मुले फडके मध्ये असतील तर शाळेच्या एखाद्या कार्यक्रमात, पालकसभेत आपण भेटलो असण्याची शक्यता आहे.

तो – नाही, माझी मुले डीएवी मध्ये आहेत …

तो-मी – भेटलो आहोत, अगदी हल्लीच हे नक्की – पण कोठे ?

एवढ्यात कार्यक्रम सुरू झाला. आमचे दोघांचे त्यात अजिबात लक्ष लागत नव्हते. डोक्यात विचारचक्र चालूच होते. कोठे बरे आम्ही भेटलो होतो ?

कार्यक्रम संपला, चहापान झाले पण प्रश्नचिन्ह काही मिटत नव्हते ! शेवटी आम्ही आमची नव्याने ओळख करून घेतली व हसत हसत आपापल्या स्कूटरला किक मारल्या, दोघे दोन दिशांना वळलो आणि एकदम गर्रकन परत फिरलो –

तो – अहो आपण वनवासी कल्याण आश्रमाच्या एका कार्यक्रमात भेटलो होतो !

मी – बरोबर, उरण जवळील एका वनवासी शाळेच्या नवीन बांधलेल्या वर्गाचे उद्‍घाटन होते !

चला, खूण खूणेला पटली !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: