रविवार, २८ फेब्रुवारी, २०१०

सुमन आणि कोमल !

मे महिन्यात लहान मुलांना घेउन कर्नाळा किल्ल्यावर गेलो होतो. ८ ते १० वयोगटातल्या व डोंगर प्रथमच चढणार्या मुलांच्या उत्साहाला आवर घालताना आमचीच पार दमछाक होत होती. साधारण दुपारी दोन वाजता मोहिम फत्ते झाली. जेवणाची व्यवस्था पायथ्यालगतच असलेल्या युसुफ मेहेर अली सेंटर मध्ये होती. अर्थात त्या सेंटरच्या कामाची मुलांना ओळख व्हावी हा हेतू होताच. दोन-एक तास केंद्र पाहण्यात, विविध उपक्रम समजून घेण्यात कसे गेले ते कळलेच नाही. त्याला लागूनच एक रोपवाटीका (नर्सरी) आहे. आम्हा सर्वाचे पाय आपसूकच तिकडे वळले. आजुबाजूच्या रखरखाटात या नर्सरीत सर्वत्र पसरलेल्या हिरवळीमुळे अगदी आल्हाददायक वाटत होते. विविध रंगाची टवटवीत फुले पाहताना सगळा शीण पळून गेला. काही रोपे विक्रीला सुद्धा होती. ज्यांच्याकडे पैसे होते ती मुले आम्हाला विचारून रोपे विकत घेत होती. माझ्याच इमारतीत राहणार्या कोमलची मात्र पंचाईत झाली होती. तिच्याकडच्या दहा रूपयाचे तिने लेझ घेतले होते व आता तीला रातराणीचे रोप घ्यायचे होते. अर्थात तिच्याजवळचे पैसे संपले होते. माझ्याजवळ रोप विकत घेण्यासाठी तिने दहा रूपये मागितले व घरी गेल्यावर बाबांना सांगून लगेच परत देते सांगितले. मी दिलेल्या दहा रूपयात तिने रोप घेतले व उशीर होत असल्याने आम्ही बस गाठली. सगळी बसमध्ये शिरत असताना सुमन मात्र मागेच रेंगाळत होती. तिची नजर एका रातराणीच्या रोपावर खिळून राहीली होती. मी तिला ते रोप घ्यायचे आहे का ? असे विचारले तेव्हा ती तोंड एवढुसे करून “हो, पण मला आईने पैसेच नाही दिले” असे म्हणाली. शेवटी मी दहा रूपये देउन तिला ते रोप घेउन दिले, तिची कळी एकदम खुलली पण लगेच परत काळजीत पडली. आई मला ओरडली तर ? मी म्हटले नाही ओरडणार, लेझवर पैसे खर्च करण्यापेक्षा रोपावर केलेले कोणत्या आईला आवडणार नाही ? खांदा कॉलनीत सुमनचे आई-बाबा तिला घ्यायला आले होते. बसमधून उतरचाच सुमनने बाबांकडून दहा रूपये घेउन गोड आवाजात आभार मानून मला परत केले. कोमल आमच्याच इमारतीत राहते तळमजल्यावर. तेव्हा आम्ही सोबतच आत शिरलो. तिचे आई-बाबा बाहेरच उभे होते. माझ्याकडून उसन्या घेतलेल्या पैशाची आठवण कोमलला नव्हतीच पण तिच्या आई-बाबांना सुद्धा हे रोप कसे आणलेस ते विचारावेसे वाटले नाही. मी ही तो विषय तिथेच संपवला.

पावसाळा संपल्यावर कोमलने , नव्हे, तिच्या आजीने लावलेली, कष्ट घेउन वाढविलेली रातराणी चांगलीच बहरली होती. त्या फुलांचा मंद सुगंध सगळ्या इमारतीत दरवळायचा. अर्थात कोमल त्या वेलीच्या आसपास सुद्धा कोणाला फिरकू देत नसे, फुले द्यायची बात तर लांबचीच राहिली ! एका रविवारी संध्याकाळी मित्राकडे गप्पा मारत बसलो असतानाच हीचा फोन आला. ताबडतोब घरी या, एक गोड चिमुरडी तुम्हाला मुद्दाम भेटायला आली आहे ! मी कोण बरे असेल एवढे मुद्दाम भेटायला आलेले असे आश्चर्य करीत घर गाठले. घरी गेल्यावर सुखद धक्काच बसला. सुमन आली होती व सोबत तिने रातराणीची फुले आणली होती. त्यांचा मस्त सुगंध दरवळत होता. काका, तुम्ही घेउन दिलेल्या रातराणीची ही पहिली फुले ! मस्त झालाय वेल ! तुम्ही एकदा बघायला पण या ! मी गमतीने म्हटले “पण त्याचे पैसे तर तू मला लगेच दिलेस , आता वर ही फुले कशाला ?” त्यावर ती चिमुरडी म्हणाली “तुम्ही स्वत:हुन विचारलेत , नाहीतर ओळख नसताना दहा रूपये मागायची माझी हिंमतच झाली नसती !” सोबत आलेल्या सुमनच्या आईने “या रातराणीने तिच्यावर जणू जादूच केली आहे. अगदी आणल्या दिवसापासून डोळ्यात तेल घालुन तिची ती काळजी घेत आहे, एवढेच नव्हे तर गच्चीतल्या बाकी रोपांची काळजी सुद्धा तिच घेते हल्ली “ असे सांगितले. हे सांगत असताना तिच्या आवाजात , डोळ्यात लेकीचा अभिमान व कौतुक नुसते ओसंडून वाहत होते !

अगदी एकाच वयाच्या, एकाच संस्कारात वाढलेल्या दोन्ही मुली, पण एक नुसते घेणारी व दूसरी देणारी , एक कृतज्ञ व एक कृतघ्न , एक व्यवहर सुद्धा न मानणारी, एक व्यवहाराच्या पलिकडे जाउन नाते विणणारी, माणसे जोडणारी - असे कसे बरे झाले असेल ?

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१०

हँगर !

साधारण १९९० च्या आसपासची गोष्ट आहे ही. दोन्ही बहीणींची लग्ने झाल्यावर आईला घरकाम व बाहेरची कामे यासाठी मिळणारी बहीणींची मदत बंद झाली. स्वयंपाकघरात माझा उपयोग खाणे सोडून बाकी कशासाठी होण्याची शक्यताच नव्हती तेव्हा सेकंड शिफ्ट असते तेव्हा लोळत पडलेला असतोस, टवाळक्या करत उंडारत असतोस तेव्हा निदान दादरला जाउन भाजी तरी घेउन ये , असा आईचा घोषा चालू झाला. ही भुणभुण शेवटी एवढी वाढली की झक मारत हातात पिशवी घेउन मी दादर गाठू लागलो ! काही काळ मी कुसकी, नासकी भाजी आणणे, किंमत न करणे, एकाच प्रकारची भाजी भरमसाठ आणणे असे प्रयोग करून बघितले पण आई काही त्याला बधली नाही. वैतागुन ती एकदाही ’बंद कर तुझी मदत’ असे काही बोलली नाही. अर्थात या नव्या जबाबदारीवर मी ही सवयीने खुष झालो. भाजी मंडईत गेल्यावर हिरव्या भाजीबरोबरच इतरही हिरवळ नजरेत भरू लागली हे मुख्य कारण असले तरी भय्या वजनात कसे मारतो, वसईची भाजी म्हणून कावड आणणारा ती भाजी दादरच्याच मंडईतुन कशी घेतो, रस्त्यावर भाजी विकणारे मंडईतुनच भाजी घेउन फूटपाथवर विकून कसे कमावतात, फेरीवाले गि‍र्हाइके कशी पटवितात, बोनीचा टाइम आनि बत्तीचा टाइम अशी कासावीस करून कशी फसवणुक करतात हे सर्व शिकता आले. अर्थात किंमत करणे हे मात्र मला केव्हाच जमले नाही. आई सांगायची, फेरीवाला जी किंमत सांगेल त्याच्या अर्धी किंमत करायची पण ’तो’ माझा चेहरा बघून आधीच चौपट किंमत सांगायचा व माझे सगळे आडाखे चितपट व्हायचे ! मग घरी गेल्यावर आई उद्धार करायची तो अजून जिव्हारी लागणारा असायचा.

एकदा असेच भाजी घेउन परतीच्या वाटेवर असताना एक फेरीवाला हँगर विकत होता. बर्याच दिवसापासून हँगर घ्यायचे होतेच तेव्हा त्याला भाव विचारला. डझनचा भाव त्याने सांगितला १२० रूपये ! मी आईच्या शिकवणी प्रमाणे भीत-भीत ६० ला देणार का असे त्याला विचारले आणि त्याने कोणतेही आढेवेढे न घेता ’डन’ केले ! मी हैराण झालो, काहीतरी गडबड नक्की असणार म्हणून मी ते हँगर बस मध्ये बसल्यावर अगदी निरखून बघितले, पण तसे काहीही नव्हते. घरी गेल्यावर आईने कसे घेतले असे विचारल्यावर मी धोरणीपणे, ६० बोलला होता पण ३० ला दिले असे ठोकून दिले. यावर आईची प्रतिक्रीया अगदीच अनपेक्षित होती. चला, थोडीतर अक्कल आली म्हणायची ! आज प्रथमच तुला भाव करून चांगली वस्तू घेता आली ! संध्याकाळ व्हायच्या आत ही बातमी आधी बिल्डींगमध्ये व मग कॉलनीभर पसरली आणि माझ्या तमाम मित्रांना “बघा, तो मराठणीचा मुलगा कसा व्यवहारी आहे ते , नाहीतर तुम्ही !” अशी हेटाळणी सहन करावी लागली. संध्याकाळी खेळ संपल्यावर याचा सूड म्हणून मला टपल्या मारायचा कार्यक्रम झाला व माझ्या व्यवहारीपणावर अविश्वास दाखविला गेला. ज्याला टीमसाठी बॉल नीट बघून घेता येत नाही तो स्वस्त आणि मस्त हँगर कसा घेतो हा युक्तीवाद बिनतोड होता. शेवटी मी त्यांना हँगर खरेदीचे रहस्य सांगून टाकले. घरी परतल्यावर तासाभरातच मित्रांच्या आया घरी धडकल्या व आम्हाला सुद्धा बंड्याला सांगून असे हँगर आणून द्या, आमच्या मुलांना काही व्यवहार कळतच नाही, तुमचा मुलगा खरेच किती गुणाचा हो ! असे माझे गोडवे गाउ लागल्या. म्हणता म्हणता ३० रूपये डझनच्या हिशोबाने तब्बल ४० डझन हँगरच्या ऑर्डरी १०० % ऍडवान्स सकट येउन पडल्या. मित्रांनी माझा चांगलाच गेम वाजविला होता ! सेकंड शिफ़्टचे उरलेले दोन दिवस मी पालिकेची गाडी फीरत असल्याने फेरीवाले गुल झालेत अशी थाप मारून टोलवले. आता माझ्याकडे पुढच्या सर्व आठवड्याची फुरसत होती. दादरला ३० रूपये डझनने कोणी हँगर देणारा मिळेल अशी शक्यताच नव्हती, अजून वेळ काढला असता तर खोटारडेपणा चावडीवर मांडला जाणार होता . एक खोटे सात खोटे बोलून सुद्धा पिच्छा सोडत नव्हते. शेवटी पदरमोड करून यातुन मान सोडवायची व पुन्हा या भानगडीत पडायचे नाही असे मी ठरवले.

शुक्रवारी माझा बॅचवाला, मुकादम उर्फ मुक्याला मी “क्यो बे, xx उपर करके रास्तेपे नमाज पढके हुआ क्या ? असे विचारतो पण यावेळी मात्र , कँन्टीनमध्ये चहा घेताना, माझे ध्यान बघून मुकादमने “क्यो बे, असा xx के माफिक चेहरा का केला आहेस” असे विचारले ! सगळा प्रकार मी त्याच्या कानावर घातला व कसा १२०० रूपयांचा खड्डा कसा बसणार ते हताश पणे सांगितले. यावर मुकादम एकदम खळखळून हसू लागला ! “अबे भटजी, तुमने दुनिया छोड, बंबईभी कहा देखी है ? अशी माझी उत्तरपूजा बांधली. चहा सोबत बिस्किटे माझ्याच पैशाने झाल्यावर “माझे ऐकशील तर तुला फटका बसणार नाहीच उलट ३००-४०० रूपये सूटतील” या मियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे मला भागच पडले. ठरल्याप्रमाणे सगळे पैसे घेउन मी शनिवारी कामावर आलो. काम सूटल्यावर तो मला तडक महात्मा फुले मार्केट समोर असलेल्या बाजारात घेउन आला. प्लास्टीक मार्ट याच नावानेच तो भाग ओळखला जातो. फूटपाथवर प्लास्टीकचे विश्वच मांडलेले होते पण तिकडे मला ढूंकूनही बघायला न देता मुकादम मला एकेका गल्लीत फीरवत शेवटी फक्त हँगरच विकायला ठेवलेल्या एका दूकानात घेउन आला. हँगरमधली एवढी विविधता मी बाप जन्मात बघितली नव्हती ! अनेक प्रकारच्या हँगरमधून मी मोठ्या मुष्किलीने मला हवा असलेला प्रकार निवडला. मुकादमने दूकानदाराला त्याची किमत विचारली तेव्हा तो २२० रूपये बोलला ! माझे डोळेच फिरले,आगीतुन फूफाट्यात ! मी झटकन तिकडून कलटी मारायच्या विचारात असतानाच, मुकादम कानात कुजबुजला, “अबे ये १० डझन का भाव है” तेव्हा मला परत गरगरायला झाले ! ४० डझन घ्यायचे आहेत म्हटल्यावर दूकानदाराने मख्ख चेहर्याने “भाव नही होता, ये व्होलसेल मार्केट है” असे ठणकावले. खरेतर मी केव्हाच हातात रूपये काढून ठेवले होते पण मुकादम मला अजून चार दूकानात घेउन गेला. बरीच पायपीट झाल्यावर अजून फीरायला मी साफ नकार देताच त्याने मोठ्या नाराजीने एका दूकानात २०० रूपयाला १० डझन असा सौदा केला ! १२०० रूपयाचा फटका सोडाच माझ्या हातात नेट ४०० रूपये उरले होते ! अर्थात ज्यातुन चार पैसे मिळाले असा केलेला मी पहीला व शेवटचाच सौदा ! ते सुद्धा मुकादम बरोबर होता म्हणूनच !

कॉलनीत उशीरा, हातात दोन भल्यामोठ्या पिशव्या घेउन परतलो. घर गाठे पर्यंत निदान तिन-चार इमारतीमधून “ओ हँगरवाले” अशा हाका ऐकू आल्या पण मी त्या न ऐकल्यासारख्या केल्या. रातोरात सगळ्या हँगरची डीलिवरी पार पडली. रविवारी मित्रांच्या चेहर्यावर कसा कापला ? असे भाव होते. मला टोमणे मारणे चालू होते. माझ्या (अ)व्यवहारीपणाची रसभरीत वर्णने सांगितली जात होती. संध्याकाळी मी सगळ्यांना भेळ खाउ घातली व उद्या मेट्रो सिनेमाजवळ टीमसाठी बॅट व स्टंप सुद्धा घ्यायला जायचे असे सांगताच एकच गलका उडाला ! सगळ्यांनी एकाच सुरात “पैसे कधी / किती काढायचे ?” असे विचारताच मी “तुमच्याच बापाच्या खिषातुन मिळाले सुद्धा” असे उत्तर देताच सगळ्यांच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह उमटले. मी घरी जायला निघताना त्यांना “अजून कोणाला हँगर हवे असतील तर सांगा, डझनामागे पाच रूपये कमिशन देतो” असे सांगायला विसरलो नाही ! अर्थात मुंबईतली व्होलसेल मार्केट हा प्रकार मग मी अनेकवार हिंडून पायदळी तुडवला व अनेकांना स्वस्ताईची ती वाट दाखविली सुद्धा !

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१०

शापित गंधर्वाला मुक्ती मिळाली !

ज्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, नुसते खेळलेच नाहीत, खेळाच्या दोन्ही अवतारात सर्वाधिंक धावा कूटल्या आहेत, सर्वाधिक शतके ठोकली आहेत, सर्वाधिक सामना तसेच मालिका वीराचे सन्मान पटकावले आहेत, सर्वाधिक भागीदार्या रचल्या आहेत त्याला सर्वात्तम मात्र मानता येत नव्हते ! काही शापच असे असतात, पण प्रत्येक शापाला उ:शाप हा असतोच असतो ! तो महान आहे असे सगळेच म्हणत पण महानतम नव्हे असे नियतीच जणू अनेकांकडून वदवून घेत होती. तो काहीच बोलत नव्हता, उतत नव्हता, मातत नव्हता, घेतला वसा टाकत नव्हता ! धावांचा रतीब घालतच होता ! शाप नक्की कोणता आहे हे त्याला माहीत होते व उ:शाप सुद्धा त्याच्या लक्षात असणारच ! आपल्यात अजून चिक्कार क्रिकेट बाकी आहे हे त्याचे उद्‍गार सूचकच होते !

सचिन सर्वात्तम नव्हता, का ? तर – त्याने सहा चेंडूवर सहा षटकार मारले नव्हते युवराज वा सोबर्स सारखे, सर्वात जलद शतक आहे आफ़्रीदीच्या नावावर, तर अर्धशतक आहे जयसूर्याचे, डावातल्या सर्वाधिक धावा होत्या सईद अन्वरच्या नावावर, त्यात तो पाकिस्तानी व या धावा त्याने आपल्यात देशाच्या पाठीवर आसूड ओढल्यागत कोरल्या होत्या ! त्याला जावेद मियादाद सारखा शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून संघाला विजयी करता आलेले नव्हते, चवथ्या डावातली त्याची सरासरी जेमतेम २० ची आहे तर रिकीची ५५, लारासारखा ४०० धावांचा धबधबा त्याला घालता आला नव्हता, एखाद्या अंतिम सामन्यात ३०० धावांचा गांगुलीसारखा त्याला विजयी पाठलाग करता आला नव्हता, सेहवागसारखे दोनदा त्रिशतक त्याला झळकावता आले नव्हते ! पण वरची अनेक नावे आता इतिहासजमा झाली आहेत, जे खेळत आहेत ते त्याच्या आसपास सुद्धा नाहीत पण त्या सगळ्यांनी मिळून जे केले त्यातले काहीतरी सचिनने करायलाच हवे होते, हाच तो उ:शाप होता. यातल्या एकातरी गोष्टीवर त्याचे नाव कोरलेले त्याच्या चाहत्यांना या जन्मात बघायचेच होते.

मधला काही काळा खरेच कसोटी बघणारा होता. सततच्या दुखापती, चाहत्यांच्या प्रचंड वाढलेल्या अपेक्षा, विश्वचषकातली अकाली एक्झिट, संजय मांजरेकर, कपिल देव, सुनील गावस्कर यांची बोचरी टीका , मित्र मानलेल्या विनोद कांबळीचे उलटणे, फेरारी करमाफी प्रकरण, फ़िक्सिंगमध्ये रोखलेली संशयाची सुई. संघातले सहकारी सुद्धा त्याच्या विरूद्ध कटकारस्थाने करीतच होते – त्याचा नंबर खाली आणणे, तो १९७ वर असताना डाव सोडणे , गांगुलीसारखा चिडका-रडका कर्णधार त्याचा पाण-उतारा करायची एकही संधी सोडत नव्हता, अगदी अलिकडचा धोणीही तो संघाला योगदान देत नाही अशी ओरड करतच होता ! रसिक उतावीळ झाले होते जसा सचिन हा शेवटचा डावच खेळणार होता , आता नाही तर मग केव्हाच नाही अशीच जणू वेळ होती ! आपला सचिनच हे करू शकतो , दूसरा कोणीच नाही ! मग तो त्यात अपयशी ठरतोय म्हटल्यावर लोक बिथरले ! त्यात सलग दोन मालिकात तो अपयशी ठरल्यावर पब्लिकचे ताळतंत्रच सूटले ! माझ्यासारखे त्याचे निस्स्मिम चाहते सुद्धा त्याच्या विरोधात गरळ ओकू लागले ! त्याला हाकला अशी हाकाटी सुरू झाली ! मुंबईत वानखेडेवर त्याची रेवडी उडवली जाणे म्हणजे अगदी कहरच झाला होता ! नालायक गांगुली संघात हवा म्हणून बंगाल संसदेत दंगा करतो तर इकडे मात्र मराठी माणूससुद्धा सचिनला बोल लावत होता ! अगदी अलिकडचे म्हणजे मुंबई कोणाची या वादात त्याने केलेले विधान व बाळासाहेब ठाकर्यांची ओढवून घेतलेली जहरी ठाकरी टीका ! कोणीही याने बिथरला असता, बॅट जाळून मोकळा झाला असता ! कशासाठी त्याने खेळायला हवे होते ? काय त्याला अजून साध्य करायचे उरले होते ? अनेक पिढ्या बसून खातील एवढे धन गाठीशी असताना कशाला कोणाची उणी-दुणी कोणी ऐकली असती ? पण सुर्यावर थुंकणारे थुंकतच होते ! त्याच्या अलौकिक कर्तबगारीने अनेकांचे डोळे दिपले होते, घुबडाला म्हणे उजेडात दिसत नाही, तसेच अनेकांचे झाले होते ! त्यात मध्येच त्याने शतक केले की भारत हरतो अशी कोल्हेकुई सुरू झाली होती ! काय दु:ख झाले असेल त्याला , कल्पनाही करता येणार नाही ! तो म्हणे शतकासाठी खेळतो, जसे काही त्याने काढलेली धाव त्याच्याच खात्यात जमा होते, संघाची पाटी कोरीच राहते ! पण नियतीच हे सर्व घडवून आणत होती, अनेक भोग त्याला भोगायला लावून त्याला तावून सुलाखून घेत होती, कसाला उतरतो का ते बघत होती ! शेवटी सोने बावनकशी आहे यावर शिक्कामोर्तब झाले. त्याच्या वरचे एकेक आक्षेप त्याने धुवून काढायला सुरवात केली. सुरवात झाली दोन वर्षापुर्वी ऑस्ट्रेलियात ! कांगारूंची मस्ती त्याने परत एकदा उतरवली, ती सुद्धा त्यांच्याच देशात ! मग इंग्लंड विरूद्ध चवथ्या डावात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग युवराजच्या साथीने नाबाद शतकी खेळाने केला व तो संघाला विजयाप्रत कॅरी करून शकत नाही असे म्हणणार्यांची बोलती बंद करून टाकली ! मायदेशात कांगारूच्या ३५० धावांचा पाठलाग त्याने घणाघाती १७५ धावा करून आटोक्यात आणला होताच पण परत नियती चाल खेळली. अवसानघातकी फटका मारून तो बाद झाला व ’तेव्हा’ पाकबरोबर जसे कसोटी हरलो होते तसेच यावेळीही संघाचे तारू बुडाले व परत सचिन टीकेचा धनी झाला ! मग श्रीलंकेत अंतिम सामन्यात शतक काढून संघाला विजयी करून त्याने ते पाप धुवून काढले. मायदेशात बांगला देश व आफ्रीकेविरूद्ध झालेल्या दोन्ही कसोटीत त्याने शतके ठोकली. दक्षिण आफ्रीकेच्या पहील्या वन-डेत तो हकनाक धावबाद झाला पण त्याच सामन्यात निर्णायक क्षणी झोकून देउन त्याने चौकार अडवला ! नियती हसली ! उ:शापाचा क्षण जवळ आला होता ! शापित गंधर्वाला मुक्ती मिळण्यासाठी ठीकाण ठरले मध्य प्रदेशातले इंदौर !

नाणेफेक जिंकून पाटा खेळपट्टीवर धोणीने फलंदाजी स्वीकारली. दणक्यात सुरवात करणारा सेहवाग लवकरच बाद झाला ! आता संघाला तिनेशेपार नेण्याची जबाबदारी सचिनवरच होती ! जणू १८ वर्षापुर्वीचा सचिन मैदानावर ठाकला होता ! गोलंदाजांना सोलपटून काढणारा, त्यांची पिसे काढणारा, त्यांना वेडेपिसे करणारा, कर्दनकाळ ! काय त्याच्या खेळीची वर्णन करावे ! भगवान श्रीकृष्णाचे विश्वरूप दर्शन पाहताना अर्जुनाची जी अवस्था झाली असेल , अगदी तशीच अवस्था ही ऐतिहासिक खेळी बघणार्यांची झाली असणार ! उत्साह सामर्थ्य तुझे अपार, तू सर्व की सर्व तुझ्याच ठायी ! सचिनने पन्नास पार केले आणि कोठेतरी आत काहीतरी वेगळे घडणार याचे संकेत मिळू लागले ! ’तो अन्वरचा विक्रम मोडणार का ?’ या प्रश्नाचे पुढे हो हो मोडणार अगदी आजच मोडणार अशा निर्धारात रूपांतर झाले ! करोडो भारतीय देवाकडे एकच मागणे मागत होते, सचिनचे आज द्वीशतक झालेच पाहिजे ! जो सर्वाधिक वनडे खेळला आहे, ज्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत, सर्वाधिक शतके केली आहेत त्याच्याच नावावर एका डावातील सर्वाधिक व्यक्तीगत धावांचा विक्रम हवाच हवा ! नाही, तो त्याचा हक्कच आहे ! तेवढी शक्ती देवा त्याला दे ! सामुदायिक प्रार्थनेत प्रचंड शक्ती असते ! तिचाच प्रत्यय काल आला ! चमत्कार चमत्कार अजून काय वेगळा असतो ? सचिनने आधी सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढलाच पण तेवढ्यावरच न थांबता त्याने २०० धावांचा अशक्य वाटणारा टप्पा गाठला व आपल्या सोनेरी कारकिर्दीला हिर्याचा शिरपेच खोवला ! माझ्यासारख्या कारकुनी करणार्याने सचिनचे माप काढावे हेच किती विनोदी पण नियतीपुढे कोणाचे काय चालते ! आता मात्र मान्य केलेच पाहिजे की त्याने डॉनलाही झोकाळून टाकले आहे ! झाले बहु, होतील बहु पण या सम हाच ! सचिन तुझे आभार तरी काय मानायचे ? तुझा बहरणारा खेळ याची देही, याची डोळा बघता आला हेच आमचे परम भाग्य ! स्वत:बरोबरच तू मराठी माणसाची व भारताची मान उंचावली आहेस, निष्ठा म्हणजे काय याचा वस्तुपाठ घालून दिला आहेस ! कर्तबगारीचे शिखर एवढे उंचावून ठेवले आहेस की तिकडे बघताना सुद्धा एखाद्याचे डोळे पांढरे होतील !

आता एकच हवे सचिन, कसोटीतला लाराचा चारशे धावांचा विक्रम सुद्धा तुझ्याच , मराठी माणसाच्या व भारतीयाच्याच नावावर हवा म्हणजे हवाच ! अधिक मागणे नाही ’देवा’ ! जय हो !

( चला, मला सुद्धा सचिनच्या पराक्रमाने ब्लॉगवरची धूळ झाडायची प्रेरणा मिळाली ! हा लेख सचिनचे दोन निस्सिम भक्त - एक माझा सहकारी मित्र संजय पारकर व दूसरा कोब्रा मित्र रूपक लेले यांना अर्पण ! )