पळपुट्या दादा !
नेत्यांना नुसते नावाने ओळखले जाणे कमीपणाचे वाटत असावे. अंगात कर्तबगारी काही नसतेच तेव्हा निदान नावाला तरी काही उपाधी जोडणे त्यांना गरजेचे असते. कोणी साहेब, कोणी पंत, कोणी राव तर कोण दादा ! दादाचा मुळ अर्थ थोरला भाऊ पण त्याही पुढे जावून जबाबदारी घेणारा, सगळ्यांना सांभाळणारा, आधार वाटणारा. पण आजच्या काळात दादा हा शब्द गुंड या शब्दाला समानार्थी म्हणून वापरला जातो. राजकारण करणे म्हणजे गुंड असणे आता स्वाभाविक झाले आहे. त्यात सत्ता हाती असले तर काय बघायलाच नको !
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा दादा व्यक्तिमत्व आहे. त्यांचा दरारा सर्वदूर पसरलेला आहे. मंत्रलयाला आग लागली तेव्हा हे दादा तिकडेच होते. या दादाने सगळ्यात आधी मैदान गाठले ! त्यांना भेटायला आलेले त्यांचे दोन मित्र त्यांची वाट बघत तिकडेच थांबलेले आहेत याचे भान सुद्धा त्यांना राहिले नाही. दादा वाचले पण त्या दोघांचा मात्र कोळसा झाला ! त्या दोघांची दादांवरची निष्ठा तरी किती अढळ बघा, आपल्या शेवटच्या कॉलमध्ये सुद्धा त्यांना दादांच्या जीवाची काळजी होती ! पण दादा मात्र मैदान सोडून केव्हाच मैदानात आले आहेत हे त्यांना कळले असते तर ?
जहाज बुडते तेव्हा कप्नान सगळ्यात शेवटी जहाज सोडतो. तसे झाले नाही तर तो जहाजाबरोबरच जलसमाधि पत्करतो. पण इथे मात्र दादा असल्याचा दावा करणार्याने सगळ्यात आधी मंत्रालय सोडले ! आता तुम्हीच ठरवा याला दादा म्हणायचे का फद्या ते !