मराठी ब्लॉग - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीतले अनुभव, स्वत:चे विचार, संस्कृत सुभाषिते, मुंबईच्या लोकलने रोज कराव्या लागणार्या प्रवासाचे अनुभव, इंग्रजीतले जे भावले त्याचा माय मराठीत अनुवाद आणि बरेच काही, जुन्या व गाजलेल्या हिंदी,मराठी गीतांच्या एम.पी.३ खजिन्याची किल्ली! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे.
रविवार, ९ सप्टेंबर, २०१२
ना”पास” !
बुधवार, २३ मार्च, २०११
पनवेल कब आयेगा ?
मै खुद नया नया हूँ.
मालूम नही (म्हणजे खरे तर “बतानेका नही” असते ! )
भोत देर है, तू सो जा आराम से !
मै भी वहीच उरतनेवाला हूँ, फिकिर मत करो !
सब लोग जहा उतरेंगे वोइच पनवेल.
बस आता ही होगा.
खांदेश्वरके बाद पनवेल आयेगा.
जो साला उठतो तो हल्ली पनवेलला येतो, मुंबईची आयझेड करून झाली, आता पनवेलची वाट लावा !
पनवेल के पहले तिलक टर्मिनस आयेगा. वहा उतरो, वहा से दरभंगा एक्सप्रेस पकडो और पटना जाओ. लालू और निलेश तेरेको उधरही बुला रहे है !
पनवेल कधी येणार म्हणे, आपण काय यांच्या बापाचे नोकर आहोत काय ? एकेकाला असा फोडला पाहिजे की परत लोकलमध्ये यायची हिंमत नाही करणार.
का ? पनवेलमध्ये झोपडी बांधायची आहे का पानाची गादी टाकायची आहे ?
स्वत: खिडकीजवळ झोपायचे वर विचारायचे पनवेल केव्हा येणार. खिडकीतुन बाहेर बघ म्हणाव स्थानकांची नावे, का वाचतापण येत नाही ?
सगळ्यात कहर म्हणजे-
बेटे तुम जहा गाडी पकडा वो था वी.टी, अभीका सीएसटीएम, तुम्हे नींद लगा तब वडाळा गुजर रहा था, गाडी वाशीके पहले पाच मिनिट सिग्नलको रूकी थी. अभी गया बेलापूर, उसके बाद खारघर, वहा पे डेक पार्किग है, उसके बाद मानसरोवर बाद मे खांदेश्वर और फिर आयेगा पनवेल. और पंधरा मिनट है. तुम्हे जुना पनवेल जाने का है की नया पनवेल ? की बस डेपो जाना है ? अगर डेपो जाना है तो मै तुम्ही शॉर्टकट दीखाता हूँ, नवीन पनवेल जाना है तो बडा ब्रिज क्रॉस करना पडेगा, बाहर गाव जाने वाली गाडी पकडनी है तो ब्रिजके उपर खडा रहो, प्लॅटफॉर्म अनाउन्स होगा तो ही नीचे उतरना ---- !
गाडी पनवेलला लागली तरी त्याची शिकवणी चालूच ! हे बघून एका मराठी तरूणाची सटकते ! त्याची जळजळीत प्रतिक्रीया , “अशी वागणूक मिळत असेल तर हे परप्रांतिय इथेच डेरा टाकणार नाहीत तर काय करतील ? या भय्यांनो या , आमच्या उरावर बसा ! “
सोमवार, २९ नोव्हेंबर, २०१०
मोबाईलखोरांना कसे आवरायचे ?
अर्थात “सांगताही येत नाही, सहनही होत नाही” अशा संभ्रमात पडू नका. खाली दिलेले काही उपाय गांधीवादी आहेत व आपापल्या वकुबा प्रमाणे करून बघायला हरकत नाही, अर्थात विपरीत परीणाम झाल्यास मी जबाबदार नाही !
तुम्ही जर खिडकीजवळ बसला असाल व तुमच्या बाजुला कोणाचा मोबाईल कोकलत असेल तर “बघु कोणते मॉडेल आहे” असे म्हणत त्याचा मोबाइल हातात घ्या, लगेच तो खिडकीबाहेर ठेवा, माझ्या अंगाला जरी हात लावलास तरी मोबाईल खिडकीबाहेर पडेल हे त्याला नम्रपणे सांगा व कुर्ल्याला(च) उतरून गाडी सुरू होताना बाहेरून मोबाइल ताब्यात घेण्याची नम्र विनंती करा. तुमचा मोबाइल जर हजार बाराशेचा असेल व समोरच्याचा जर भारी असेल तर हा उपाय लय भारी सिद्ध होतो !
“आयला कसली भारी गाणी आहेत हो तुमच्याकडे “ अशी साखरपेरणी करीत त्या मोबाइलखोराला लोकलच्या टफावर चढवा. लगेच नीलदंत तंत्राचा वापर करून ती गाणी मला पण हवीत असा हट्ट धरा. अर्थात गाणी आपसूकच बंद करून तो ती गाणी मोठ्या उत्साहाने तुम्हाला सेंड करू लागतो ! याने एकतर प्रवास तरी शांततेत संपतो वा त्याची बॅटरी तरी संपते ! सुंठीवाचून गेला की नाही खोकला ?!
“अरे ही गाणी डुप्लिकेट आहेत, बहुदा कोणा ऑर्केस्ट्रामधल्या कलाकाराच्या आवाजातली आहेत, तुला कोणीतरी xx बनविले” असे म्हणा किंवा “आवाज एवढा दणदणीत वाटत नाही, स्पीकर बिघडला की काय ? सेकंडचा साला हाच प्रोब्लेम आहे” हे शेरे सुद्धा असरदार शाबित होतात. कधी अंबानीचा बाप काढून “याच्या बापाचं स्वप्न खरेच साकार झाले, कोणीही आजकाल मोबाईल घेतो, अडाणी माणसाला कसे समजणार इयरफोन काय प्रकार असतो ते ?” अशी खंत व्यक्त करावी. न चालणारे पाच, दहा, चार वा आठ आण्याचे नाणे काढून मोबाइलखोराच्या हातावर ठेवल्यास त्या बिचार्याची अवस्था “जोर का झटका धीरे से लगे” अशी होते, अर्थात मधल्या काळात तुमचे स्टेशन मात्र यायला हवे !
समजा जर कोणी जुनी गाणी वाजवित असेल तर “काय लेका सैगलची / बाबा आदमके जमानेकी / रडकी गाणी ऐकतोस, जरा उडती गाणी लाव की” असा टोमणा मारावा किंवा vice-versa ! तसे टोमणे बर्याच प्रकारे मारता येतात पण मोबाईलखोरांचा बुद्ध्यांक बुद्धयाच कमी असतो हे ध्यानी घ्यावे. “आयला तुझा मोबाइल वाजतोय होय, मला वाटले कोणी भिकारीच गाणी गात भीक मागत आहे !” हे किंवा “घेतलास ना सेकंड हॅन्ड / चायनामेड ? थोडी पदरमोड केली असतीस तर branded मिळाला असता, त्याच्या बरोबर इयरफोन फूकट मिळतो” असे हळहळायचे. जर त्याने रफीची गाणी लावली असतील तर किशोरकुमार वाजवायची फर्माईश करायची, हे गाणी आहे का ? ते गाणे आहे का ? तुला माझ्याकडची गाणी देवू का ? अशी विचारणा सतत करून त्याचा गोंधळ उडवून देण्यात सुद्धा मजा येते. कधी तुझ्याकडे अजून कोणती आहेत बघू असे म्हणत त्याच्या मोबाइलचा ताबा आपल्याकडे घ्यायचा. हिन्दी गाणी लावली असतील तर मराठी वाजव असा आवाज दिल्यास मोबाइखोराची मोलती बंद होते असा सॉलिड अनुभव आहे !
अर्थात तुमच्याकडे डबा दणदणवून टाकणारा स्पीकर फोन असल्यास खूपच गमती जमती करता येतात. त्याने जे गाणे लावले असेल त्याच्या नेमक्या उलट मूडचे गाणे त्याच्यापेक्षा मोठ्या आवाजात लावल्यास काही काळ गोंधळ उडतो व पब्लिकच “दोनो भी अपना अपना स्पीकर बंद करो” असा निवाडा देते. मी एकदा असा प्रयोग केल्यावर मात्र भलताच रीझल्ट मिळाला होता. झाले असे की एकजण नवीन गाणे वाजवित होता. त्याला गप्प करण्यासाठी मी माझ्या मोबाइलचा स्पीकर ऑन करून “चढता सूरज धीरे धीरे” ही एवरग्रीन कव्वाली चालू केली. आवाज अगदी टीपेला पोचल्यावर पब्लिकचा माझ्या भोवती गराडाच पडला. तो सुद्धा आपला मोबाइल थंड करून कानात प्राण आणून कव्वाली ऐकू लागला. त्या कव्वालीच्या प्रत्येक कडव्याला मैफलीत मिळते तशी दाद मिळू लागली ! गाणे संपल्यावर “वन्स मोर”चा जल्लोष झाला. मला झक मारीत ते गाणे पुन्हा वाजवावे लागले. माहौल एकदम बदलून गेला, डब्यात एकदम पिन ड्रॉप सायलेन्स ! जो तो त्या गाण्यात अगदी तल्लीन झाला. पनवेल येईपर्यंत त्या गाण्याची आवर्तने चालू होती. पनवेल स्थानकात उतरल्यावर पुढची 10 मिनीटे – अर्थात बॅटरीचे शेवटचे टोक उरे पर्यंत मी लोकांना ते गाणे ब्ल्युटूथने पाठवित होतो !
हे लिहीताना उगाच डोक्यात भुंगा शिरला, म्हणजे “लोकांना खरेच ते गाणे आवडले होते की …………….?”
रविवार, २५ एप्रिल, २०१०
लोकलकर आणि त्यांचे प्रकार व स्वभाव !
१.३० कोटी लोकांना आपल्यात सामावून घेणारी मुंबापुरी खरेच बाका नगरी आहे. त्यातले ५० लाख लोक लोकलकर आहेत. आता या लोकलकरांची स्वभावानुसार विगतवारी लावायची म्हटले तरी गरगरायला होते एवढे त्यांच्यात वैविध्य आहे. वर्गीकरणाची सुरवात लोक रेल्वे स्टेशन कसे गाठतात इकडून करूया ! पायी येणारे, दुचाकीने येणारे, टॅक्सी, रीक्षा, बसने येणारे. मग प्रत्यक्ष स्टेशनात प्रवेश करताना कोणी पादचारी पुलाचा / भुयारी मार्गाचा वापर करेल तर कोण जीवावर उदार होउन पटरी पार करेल. सगळेच काही तिकिटाची रांग लावत नाहीत, कोणाचा पास असतो, त्यात सुद्धा प्रथम वर्ग , द्वितीय वर्ग व त्यात सुद्धा मासिक व त्रैमासिक पास ! तिकट काढण्यासाठी कोणी रांग लावेल, कोणी कुपन पंच करील, कोणी स्मार्ट कार्ड तर कोणी “गो कार्ड” वापरेल , रांग टाळण्यासाठी “लेडीज कार्ड” सुद्धा वापरणारे काही कमी नसतात ! हे काही नसलेला कोणी असे असणार्यांना तिकिट काढून देण्याची गळ घालतील. विदाउट तिकिट प्रवास करणार्यांची संख्या सुद्धा काही कमी नसेल. आणि विदाउट तिकिट प्रवास करायचाच आहे तर प्रथम वर्गानेच का करू नये असे मानणारे सुद्धा महाभाग असतीलच !
साधे स्थानकात गाडी येते तेव्हाची गोष्टच बघा ना. कोणी गाडी थांबायच्या आतच आत शिरतिल, कोणी उतरणारे उतरले की मगच शिस्तीत चढतील, कोणाला पळती गाडी पकडण्यातच थ्रील वाटत असेल, काहींची ती मस्टर गाठण्यासाठीची मजबूरी असेल. थेट टफावर स्वारी करणारे सुद्धा असतात व त्यात सुद्धा वर पळापळी करत या डब्यावरून त्या डब्यात जाणारे शूरवीर असतात. आत शिरणारे रिकाम्या हाताने प्रवास करणारे असतील तर सॅक, हात-पिशवी, ब्रीफकेस धारक सुद्धा असतील. सोबतचे सामान कोणी रॅकवर ठेवेल, कोणी फेकेल, कोणी तशी दूसर्याला विनंती करेल तर कोणी मांडीवर सांभाळेल कोणी सीटच्या खाली सरकवेल. आत शिरल्यावर जागा असेल तर ती पटकावणारे असतील तर काही जण लटकणेच पसंत करत असतील ! लटकणार्यांचे हेतु सुद्धा अनेक असतील, कोणी हवा खाण्यासाठी, कोणी लाइन मारण्यासाठी, कोणी अगतिक ! काहींना तिसर्या व नवव्या सीटचे सुद्धा वावडे नसेल तर काही स्वाभिमानी उभे राहणेच पसंत करतील. विडीओ कोच चे आकर्षण असणारे तिकडे ताटकळतील. अर्थात उभे राहणार्यात सुद्धा दोन सीटच्या मध्ये उभे राहणारे, मोकळ्या मार्गिकेत उभे राहणारे व पॅसेजमध्ये उभे राहणारे असे उप-प्रकार असतातच. कोणाला उभे असताना आपला तोल सांभाळायची कला अवगत असते तर कोणाला हँडल धरल्याशिवाय नीट उभेच राहता येत नाही. एकदा लोकलमध्ये स्थिरस्थावर झाल्यावर कोणी झोपी जाइल, कोणी झोपेचे सोंग घेणारा असेल. झोपणार्यात सुद्धा कोणी घोरणारा असेल, कोणी दूसर्याचा खांद्याची उशी करणारा असेल, अशी मान टाकणार्याला सांभाळून घेणारा कोणी असेल तर अचानक त्याचा सपोर्ट काढून त्याची फजिती करणारा सुद्धा असेल. कोणी मोबाइल कानाला लावून बसेल , कोणी त्याचा स्पीकर ऑन करून इतरांना ताप देईल, कोणी मोबाइलवर गेम खेळत बसेल, कोणी गप्पांचा फड रंगवतील. गप्पातले विषय सुद्धा भन्नाट असतील. क्रिकेट, राजकारण, मालिका, महागाई, भ्रष्टाचार, परराष्ट्र संबंध, शाळा व कॉलेजांची मनमानी व एकूणच शिक्षणाचे व्यापारीकरण, नव्या लोकल वेळापत्रकाकडून अपेक्षा, लोकलमधील वाढती गर्दी, अपडाउन करणार्या प्रवाशांमुळे निर्माण झालेले प्रश्न, स्थानिक व उपरे वाद या व अशा अनेक ज्वलंत समस्यांवर प्रत्येकाचे हटके मत असेल. कोणी वाद घालतील, कोणी वाद लावून आपण नामानिराळे राहतील, कोणी वाद सोडवायचा प्रयत्न करेल तर कोणी त्यात तेल ओतायचा ! कोणी टाळ कुटत भजने म्हणतील, कोणी रमीत रमतील, रमीत सुद्धा कोणी नॉक आऊट तर कोणी डावावर पैसे लावून खेळणारे असतील. कोणी पेपर वाचत बसेल, पेपर नसलेला कोणी दूसर्याचा पेपर विचारून वा न विचारताच वाचू लागेल, कोण पोथीचे पारायण सुरू करेल, कोण मुलांची क्रमिक पुस्तके काढून अभ्यासाला लागेल तर कोणी कादंबरी वाचेल. बसून प्रवास करणारे आणि उभ्याने प्रवास करणारे या दोन गटात शाब्दिक चकमकी झडत असतातच. अर्थात बसणार्यांत सुद्धा अश्वव्रती ( दूसर्यांना बसायला देणारे ) व गेंडाव्रती ( कधीही कोणालाही बसायला न देणारे ) हे प्रकार आहेतच. कोणी पास विसरलेले असतील, कोणाला आपला पास संपल्याचे गाडी सुरू झाल्यावरच आठवले असेल तर कोणी पुढचे स्टेशन कोणते या विवंचनेत असेल. आपले स्थानक आले की गाडी फलाटाला टच होताच उतरणारे असतात तर काही गाडी नीट थांबल्यावरच उतरणारे असतात. अर्थात उतरायला न जमलेले सुद्धा असतातच. फलाटावर उतरल्यावर कोणी सरळ बाहेरची वाट धरेल , कोणी बूटाला पॉलिश करून घेईल, कोण पेपरच्या स्टॉलवर ताटकळेल तर कोणी रेल्वे कॅन्टीनच्या पांचट चहाचा घोट घशाखाली घालेल. कोणाची नजर टीसीला शोधत असेल. टीसीला गुंगारा देणारे असतात तसेच टीसीला संभ्रमात पाडणारे सुद्धा असतात, कोणी टीसीने पकडल्यावर बहाणा करणारे असतात, काही गुमान दंड भरून मोकळे होतात तर कोण पटवापटवीच्या मागे असतो.
रोजचा लोकल प्रवास जर रोज काही नवे शिकायचे आहे, अनुभवायचे आहे हे मनात ठेवून केला तर कधीच कंटाळवाणा होत नाही हे नक्की !
शनिवार, १३ मार्च, २०१०
स्रीदाक्षिण्याचे अन्वयार्थ !
संध्याकाळी घरी परतताना लोकलमध्ये, अगदी सीएसटीलासुद्धा, जागा मिळ(वि)णे अधिकाधिक मुष्किल होत चालले आहे. चवथ्या किंवा नवव्या सीटला बसणे मला साफ नामंजूर असल्याने मोबाइलचे इयरफोन कानात खूपसून मनपसंद गाणी ऐकणे हाच या दु:खावरचा उतारा असतो. कधी तरी एखादा चमत्कार झाल्यासारखीच सीट मिळते पण लगेच कोणी ज्येष्ठ नागरिक नजरेला पडतो व ’दूसर्या’ मनाला बळी पडून सीटवर उदक सोडावे लागते. हल्ली हा दोन मनातला संघर्ष भलताच तुंबळ होत चालला आहे. एक मन म्हणते “तूच का द्यायची नेहमी सीट ?” , दूसरे मन म्हणते , “तू नाही तर दूसरा कोण ?” पहिले मन दरडावते, “ तू डोळे उघडे तरी का ठेवतोस, डोळे मिटून गाणे ऐकलेस तर अनेक प्रोब्लेम सूटतील !”. लगेच दूसरे समजावते “झोपलेल्या उठवता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला ?” परवा असेच झाले. जागा मिळताच पहिल्या मनाने डोळे मिटायला भाग पाडले पण दूसर्या मनाने मशीद यायच्या आतच डोळे उघडले ! दाराकडेच एक जोडपे उभे होते. नवरा बायकोभोवती हाताचे कडे करून दाराकडच्या बाजूला रेलून उभा होता पण गर्दीपुढे त्याचा काहीच उपाय नव्हता. आणखी दोन स्टेशन त्यांचे असेल हाल चालले होते. पहिल्या मनाचा दबाव जबरदस्त होता. पुरूषांच्या डब्यात मूळात बायकांनी शिरावेच का ? ते ही अशा गर्दीच्या वेळी ? यांना पक्के माहीत आहे, कोणालातरी यांचा कळवळा येणार आणि यांना बसायला मिळणार ! एरवी लेडिज डब्यात दूसरी बाई यांना सीटच्या मध्ये सुद्धा उभे राहू देणार नाही ! काही नाही उठायची गरज ! कळू दे लोकलमधले गर्दी म्हणजे काय असते ते ! आधी हे मुंबईत येतातच कशाला ? -- पहिल्या मनाने असा ढोस दिल्यावर दूसरे का गप्प बसणार आहे ? त्याने लगेच , “स्त्रीदाक्षिण्य का काय म्हणतात ना ते दाखवायची हीच संधी आहे” असा मंत्र दिला व लगेच कानात “संस्कार” असे कुजबुजले ! झाले, मी परत चांगुलपणाचा बळी ठरलो व चांगली खिडकीकडूनची दूसरी सीट त्या बाईला देउ केली !
सीट मिळते आहे असे दिसल्यावर त्या बाईने आपल्या नवर्याला त्या जागेचा ताबा घ्यायचा आदेश दिला. खरेतर मुंबईकर “लोकल एटीकेटस” चांगले पाळतात. चवथ्या सीटला अवघडून बसलेला रिकामी झालेली मधली सीट बळकावणार नाही तसेच एकजण दूसर्याला सीट देतो म्हटल्यावर तिसरा ती बळकावयाचा प्रयत्न अजिबात करणार नाही ! पण कदाचित हे मुंबईत नवे असतील. नवरोबाने जागेचा ताबा घेतला तेव्हा सगळ्यांना “हटो हटो” असे फर्मावत ती बाई जागेकडे येउ लागली. मग कळले की ती गरोदर होती. दूसर्या मनाने लगेच स्वत:ची कॉलर टाइट करून घेतली ! सीटवर न बसता त्या बयेने नवर्याच्या पायात उभे राहणे पसंत केल्यावर मात्र डब्यातल्या अनेकांची सटकलीच ! बिचारा नवरा तिला परोपरीने सांगत होता की तुला बसायला जागा दिली आहे तू बस पण बाईने “पराये मर्द के बाजूमे न्नै बैठूंगी” असा पवित्रा घेतला ! बिचारा खिडकिला बसलेला तरूण स्त्रीदाक्षिण्याचा दूसरा बळी ठरला ! तो ही उभा राहिला. लोकलच्या आडव्या सीटवर नउ जण बसतात, निदान जेंटस ( की जनरल ?) डब्यात तरी ! पण या गरोदर असलेल्या बाईला ऐसपैस बसायला जमत नव्हते व तिची “मै खडीच रहती हूं” अशी रड ऐकून अजून एकाने आपल्या सीटवर पाणी सोडले ! मग मात्र बाई खिडकीवर डोके ठेवून झोपी गेली तर नवर्याने मोबाईलचा इयरफोन कानात खुपसला व ब्रह्मानंदी तंद्री लागल्याप्रमाणे डोळे मिटून घेतले. अलार्म लावल्याप्रमाणे नेरूळला दोघेही उठले व कोणाचेही एका शब्दाने सुद्धा आभार न मानता उतरते झाले ! आम्हा तिघांना आमच्या सीट मिळाल्या पण पहिले मन व डब्यातल्या लोकांनी आमच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला ! अगदी ’बाई बघितली आणि भुलले’ इथपासून ते “तुम्हीच असे वागून या परप्रांतियांना डोक्यावर चढवून ठेवले आहे, मराठी बाई असती तर उठला असतात का ?” इतपत ऐकावे लागले. एकाने तर “साली ती बाईच पक्की लबाड होती, मस्त नाटक करून तिने स्वत:बरोबरच नवर्याला सुद्धा जागा मिळवून दिली ! दारावर उभी होती तेव्हा तिला इतर पुरूषांचे धक्के बसत नव्हते का ? मग जागा दिल्यावर परक्या पुरूषाचा स्पर्श नको का वाटला ?” असे तर्कट लढविले. पहिल्या मनाला आता अगदी आसूरी आनंदाच्या उकळ्या फूटत होत्या !
अगदीच कानकोंडे झाल्यासारखे वाटू लागल्यावर दूसर्या मनाने एकच सल्ला दिला “या वेळी मात्र डोळे मिट , डोन्ट वरी, पनवेल आले की मी उठवीन तुला !”
रविवार, ६ सप्टेंबर, २००९
पन्नास रूपयाची उसनवारी !
मी –
सकाळी ८:२४ ची लोकल दहा मिनिटे आधीच लागलेली होती. स्वाइन फ़्लुचा धसका व त्यातच गणपतीसाठी गावाला गेलेले चाकरमानी यामुळे गर्दी नव्हतीच. मस्त खिडकिजवळची जागा मिळाली. नेहमीचे दिसणारे चेहरे सगळ्या कोपर्यात पांगलेले होते. तेवढ्यात एक तरूण धावत धावत, धापा टाकत नेमका माझ्यासमोर आला. पन्नास रूपये ताबडतोब द्या, प्लीज, खूप घाई आहे ! मी पण कोण, कोठला याचा काहीही विचार न करता त्याच्या हातावर पन्नासची नोट टेकवली. आला तसाच तो धूम गायब पण झाला ! आता कोपर्यातले लोक माझ्याजवळ आले, तुम उसे पहचानते हो क्या ? यावर मी नाही असे सांगताच , नाव, गाव काहिही न विचारता तुम्हा त्याला पन्नास रूपये दिलेतच कसे ? नेमके तुमच्यापुढेच त्याने कसे हात पसरले ? पैसे काढायची नवी ट्रीक दिसते ही, तुमचे पैसे बुडाले, परत मिळायची आशाच सोडा – असे डोस पाजले गेले. मला सुद्धा नवल वाटले. त्या माणसाला आधी केव्हातरी नक्की लोकलमध्ये पाहिलेले होते. त्याने मागितले मी दिले, परतीची बोली झालीच नव्हती. खरेच कोणी गरजू असेल तो, उद्या परत करेल, आणि नाही केले परत तरी पन्नास रूपयाने आपण काही रस्त्यावर नक्कीच येत नाही. अक्कल खाती अजून पन्नास रूपयाची भर !
दूसर्या दिवशी मी ती गोष्ट विसरून सुद्धा गेलो. मुंबईत पाउस पडल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते. गच्च भरून आलेल्या दोन गाड्या सोडल्यावर जी लोकल आली ती अर्थातच रिकामी होती , त्यात बसून कार्यालय गाठले. पुढचे चार दिवस बरोबरचा सहकारी रजेवर असल्याने, दोन लोकल आधीची म्हणजे ८:०१ ची गाडी पकडत होतो. पाचव्या दिवशी नेहमीची लोकल पकडल्यावर एकाने विचारले की “उसने आपका पैसा दिया क्या ?” तेव्हा मला त्या पन्नास रूपयाची आठवण झाली ! पण मीच रोजची गाडी पकडत नव्हतो तेव्हा त्याला दोष देण्यात काही अर्थ नव्हता. दूसर्या दिवशी महिन्याचा दूसरा शनिवार आल्याने कार्यालयाला सुट्टी होती. थेट सोमवारीच कामावर गेलो. त्या दिवशी व दूसर्या दिवशीही रोजच्या लोकलमध्ये काही तो दिसला नाही. थोडी चुटपुट नक्की लागुन राहिली. पैशाचा प्रश्न नव्हता पण एवढ्या लोकात नेमके मलाच त्याने कसे हेरले याचे नवल वाटत होते ! बुधवारी आधीची, ८:१३ ची लोकल थोडी उशीरा सूटली व मला अनायसेच मिळाली.
तो
अमरावतीला माझे गाव आहे. जमिनीच्या वादासंदर्भात मला अचानक गावाला जायचे होते. रेल्वेचे आरक्षण उपलब्ध नव्हते म्हणून तात्काळमध्ये तिकिट काढायला बुकिंग क्लार्कला सांगितले. त्याने तिकिट काढले व ९५२ रूपये द्या म्हणून सांगितले. माझ्या खिषात तर मोजून ऩउशे रूपये व थोडी चिल्लर होती. क्लार्कने तिकिट काढले सुद्धा होते ! तात्काळ तिकिट रद्द सुद्धा करता येते नाही, म्हणजे वांदाच झाला होता. करायचे काय ? कोणी मित्र इतक्या सकाळी इकडे यायची काहीच शक्यता नव्हती. शेवटी असलेले पैसे व तिकिट त्या क्लार्क कडेच ठेउन मी रोज पकडतो तो डबा गाठला. मागचा पुढचा विचार न करता एकदम कोपर्यात बसलेल्या, नेहमीच्या पहाण्यातल्या माणसाकडे पन्नास रूपये मागितले, त्याने सुद्धा ते कोणतीही खळखळ न करता दिले ! तिकिट खिडकीवर जाउन मी तिकिट ताब्यात घेतले. त्याच रात्रीच्या गाडीने अमरावती गाठले. दूसर्या दिवशी परत फ़िरलो व नेहमीची लोकल पकडली. पन्नास रूपये ज्याने दिले त्याला साभार परत करण्यासाठी सगळा डबा पालथा घातला पण तो काही दिसला नाही. त्याचा शोध घेण्यात शनिवार सुद्धा निघुन गेला. आता मात्र मला चांगलीच खंत वाटू लागली. ज्याने आपल्याला मदत केली त्याचा नक्की आता गैरसमज होणार, खरेतर आपणच त्याचा निदान नंबर तरी घ्यायला हवा होता. पैसे परत तर करायचे आहेत पण कसे ? सोमवारी एक गाडी लवकरची पकडली व मंगळवारी थोडे त्याच्याही आधीची लोकल पकडली. पण त्याची काही गाठ पडलीच नाही. बुधवारी पुलावरच थांबून त्याला शोधले पण व्यर्थ ! रोजच्या लोकलमध्ये , नेहमीच्या डब्यात एकाला विचारले, तो अमका हल्ली कोणती गाडी पकडतो, तेव्हा त्याने हल्ली या लोकलला असत नाही पण तो कामाला मुंबई बंदरात असल्याचे सांगितले ! चला निदान तो कोठे कामाला आहे हे तरी कळले होते. कामावर पोचल्यावर लगेच गुगल मध्ये “Mumbai Port” टायपुन , सर्च वर क्लिक केले. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटची लिंक मिळाली. साइट उघडल्यावर “Contact Us” वर क्लिक करताच पहीलाच नंबर होता, 2261 1234 ! मोठया उत्साहाने तो नंबर लावला …. !
मी
कामावर पोचताच फ़ोन खणखणला. नेहमी प्रमाणेच “Good Morning ! This is chairman’s Office, Mumbai port Trust, what can I do for you sir ?” असे म्हणताच पलिकडून बराच वेळ काही उत्तर आले नाही. मग मोठ्याने हॅलो असे म्हटल्यावर, माफ़ करा, पण तुमचा कोणी कर्मचारी पनवेलला राहतो का ? अशी विचारणा झाली. मग मात्र वैतागुन मी “अहो, हे चेयरमनचे कार्यालय आहे, आणि आमच्याकडे १८,००० माणसे तीन शिफ़्टमध्ये काम करतात, एवढ्या माहितीवर तुम्हाला काय सांगू ? तसा मी सुद्धा पनवेललाच राहतो, तुम्हाला तिकडचा जागेचा भाव हवा आहे का ?” असे तिरसटासारखे विचारल्यावर त्याने फ़ोन कटच केला. मी कामात गढून गेलो.
तो
फ़ोन करून निराशा पदरी पडल्यावर रोजचा पेपर बघत असताना, मुंबई पोर्टच्या स्टोअर्स विभागाची नोटीस बघितली. डॉकयार्डचा पत्ता माझ्या कार्यालया कडून जवळचा होता. लगेच तिकडे पोचलो. तिकडेच एकाला पनवेलचा कोणी आहे का ? असे विचारताच सकाळसारखीच “१८००० कामगार …”, टेप ऐकावी लागली पण एक प्रोग्रामर पनवेलचा आहे. पण त्यासाठी तुम्हाला गोदी विभागाच्या हद्दीत जावे लागेल व त्यासाठी परवाना हवा असेही समजले. पण त्याचा नंबर घ्या, गेटवरून त्याला फ़ोन लावा , तो तुमची आत यायची व्यवस्था करेल असेही सांगितले. चला काहितरी मार्ग सापडला तर ! भले तो ’तो’ नसेल पण कदाचित ’त्याला’ ओळखत सुद्धा असेल ! गेटवरून फ़ोन करताच, मोजून दूसर्या मिनिटाला तो खाली आला, तो, ’तो’ नव्हता ! पण त्याच्यासारखाच पनवेलला राहणारा व त्याच गाडीने सकाळी प्रवास करणारा एक त्याला माहित होता. मराठे त्याचे नाव, पण सध्या त्याची पोस्टींग हमालेज विभागात होती. ती इमारत मला तिकडूनच त्याने दाखविली. गोदीत असलेल्या धक्क्याच्या बाजूने चालत गेल्यास मी तिकडे दहा मिनिटात पोचलो असतो. तिकडे पाचव्या मजल्यावर त्या मराठेचे कार्यालय होते. पावसाने केव्हाच पाठ फ़िरवल्याने कडक उन्ह पडले होते. मुंबई गोदी नुसती आधी ऐकुनच माहित होती पण आता बघायला मिळत होती. बाप रे ! केव्हढ्या प्रचंड या बोटी, त्यावरच्या अजस्त्र क्रेन्स, मालाची अखंड चालू असलेली चढ-उतार ! अगदी हरखूनच गेलो सगळे बघून ! चला या निमित्ताने का होईना गोदी बघायला मिळाली. त्या कार्यालयात गेल्यावर कळले की इथे मराठे होते , ते पनवेलचेच आहेत पण साधारण वर्षभरापुर्वीच त्यांची चेयरमनच्या कार्यालयात बदली झाली आहे. ते कार्यालय बॅलार्ड पियरला आहे. मी तिकडे निघालो, पण गोदीचे काम जवळून बघायला मिळावे, शेवटचे, हो ना, पुन्हा कधी असा योग येणार आहे म्हणा, धक्क्यावरूनच निघालो !
( स्पेशल ड्युटीवर असणारा हवालदार मोरे, गोदीच्या धक्क्यावर कोणी गिर्हाईक हेरत होता. आज दूपारी यलोगेटला चिकन पार्टी होती. तिच्या बिलासाठी जमवाजमव करायचे काम त्याच्यावरच तर होते. धक्क्यावरून जाणार्या एकाला त्याने बरोबर हेरले ! सावजाला पोलीसी खाक्यात त्याने पास विचारला, त्याच्याकडे तो अर्थातच नव्हता. त्याचे काहिही ऐकून न घेता, त्याने त्याला यलोगेटला आणले ! तोवर पार्टी चालु झालीच होती. त्याला दम देउन बाजूच्या बाकड्यावर बसवले गेले. तासाभराने पार्टी संपल्यावर खाणाखुणा झाल्या, पोर्याने आणलेले बिल त्याच्याजवळ दिले गेले व बिल देउन जावा गुमान म्हणून सांगितले गेले ! )
तो
पोलीस ठाण्यातुन बाहेर पडल्यावर पहिली जाणीव भूकेची झाली ! पण खिषात परत करायचे पन्नास रूपये सोडले तर काहिच शिल्लक रहात नव्हते. तेव्हा तो विचार झटकून टाकून पायीच मराठेच्या नव्या कार्यालयात निघालो. उन्हातुन २० मिनिटे तंगडतोड केल्यावर पत्त्यात सांगितल्याप्रमाणे कोपर्यावर सेंन्ट्रल बँक, त्याच्या बाजूला, विजय-दीप ही ७ मजली इमारत व तिला लागुनच दगडी बांधणीची पोर्ट भवन ही इमारत दिसली. आत शिरण्यासाठी पास घेण्यासाठी रांगेत पाच माणसे उभी होती. मी चेयरमनच्या कार्यालयात असणार्या मराठेंना भेटायचे आहे असे सांगताच थेट त्या शिपायाने थेट फ़ोनच लावला …. .
मी
नेहमीप्रमाणेच कामाच्या रगाड्यातुन डबा खायला दोन वाजलेच. जेवण आटोपल्यावर जरा निवांतपणा मिळाला पण ’त्याचा’ विचार काही जात नव्हता ! खरेच तो कोणी लफ़ंगा असेल ? असेच माझ्यासारखे भोळसट हेरून तो दिवसाला आरामात पन्नास-शंभर रूपये कमवत असेल ? चांगुलपणा कोणाला दाखवायचाच नाही का ? कोणावर विश्वास ठेवायचाच नाही का ? इतक्यात फ़ोन वाजला. सुरक्षा रक्षकाने कोणी भेटायला येत आहे, सोडू का ? असे विचारले, मी सोडा असे सांगितले. दारातुन आत येचात त्याची माझी नजरभेट झाली व तोच ’तो’ अशी खात्री पटली ! कमाल आहे, आपल्यापर्यंत कसा पोचला हा ? का काही वेगळ्याच कामासाठी आला आहे व योगायोगाने आपली गाठ पडते आहे ? त्याच्या डोळ्यात मात्र जत्रेत हरवलेल्या मुलाला बराच वेळ ताटातूट झाल्यावर एकदाची आई दिसल्याचे भाव दिसत होते. धावतच तो माझ्याकडे आला. त्याचा अवतार अगदी बघण्यासारखा झाला होता, उन्हात पायपीट करून तो पार विस्कटला होता. धपकन तो खुर्चीवर बसला, काय बोलावे हेच त्याला समजत नव्हते ! त्याच्यासाठी मी पाणी मागवले, चहा समोर ठेवला. मग त्याच्या चेहर्यावर जरा तरतरी आली, हसू फ़ूटले. सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेली त्याची शोध-मोहिम ऐकताना मी हरखून गेलो ! अहो, कमाल करता, साधी पन्नास रूपयाची तर बात, त्याने मी काही रस्त्यावर येणार नव्हतो व तुम्ही काही घर घेणार नव्हतात, कधीतरी गाठ पडली असतीच ना ? या माझ्या प्रश्नावर मात्र तो गंभीर झाला. साहेव, पैशाचा प्रश्न नाही, तुम्ही अगदी एका शब्दानेही चौकशी न करता मला मदत केलीत, मी मात्र आठवडा झाला तरी तुमचे पैसे परत करू शकत नव्हतो. माझे मन मला खात होते. जगात देणारी माणसे किती उरली आहेत ? अशाने त्यांचासुद्धा माणसावरचा विश्वास उडेल, त्यासाठीच मला तुमचे पैसे परत करायचेच होते, आजच आणि ऍट एनी कॉस्ट ! ये बात पतेकी थी ! त्याने पाकिटातुन पन्नासची नोट काढून मला देताच ते आता रिकामे झाल्याचे माझ्या लक्षात आले. आता हा बाहेर खाणार तरी काय ? मी लगेच शिपायाला बोलवुन त्याच्या साठी एक राइस प्लेट मागविली. आमच्या पॅन्ट्रीरूम मध्ये त्याला जेवायला बसवले. जेवण झाल्यावर मला हात जोडून तो म्हणाला, अन्नदाता सुखी भव ! साहेब, याचे किती रूपये झाले ? पोटात भूकेने कावळे ओरडत होते ! आता माझ्याकडे द्यायला एक छदाम पण नाही, मी तुम्हाला ते उद्या परत करेन ! ते का मला माहित नव्हते ? पन्नास रूपये देण्यासाठी तो चार तास उन्हात भटकत होता, पोलिस ठाण्याची हवा खाउन, स्वत:च्या पोटात कावळे ओरडत असताना त्यांच्या चिकनपार्टीचे ७०० रूपयाचे बिल देउन बिचार्याने सूटका करून घेऊन एकदाचे मला गाठले होते. मी म्हटले याचे पैसे माझे कार्यालय भरणार आहे, तुम्ही काळजी करू नका. त्याला सुद्धा ते पटले, परत आभार मानून तो जायला निघताच मला काहितरी आठवले –
“सकाळी तुम्हीच फ़ोन केला होतात ना ? मग काही न सांगताच कट का केला फ़ोन ? अजब योगायोगाने तुम्ही चक्क मलाच फ़ोन लावला होतात ! हे सगळेच मग टळले असते ना ?” आता मात्र तो पार ओशाळला, “साहेव, काय सांगू – एवढ्या मोठ्या कार्यालयात असणारा सेकंड क्लासने कसा प्रवास करेल – हा विचार मनात आला व मी फ़ोन कट केला !
बुधवार, २७ मे, २००९
गीतेचा खप कसा वाढवावा ?
गीतेचा पुस्तक रूपाने तरी प्रचार व्हावा म्हणून अनेक संस्था झटत आहेत, त्यात गीता प्रेस, गोरखपुरचे योगदान प्रचंड आहे. कल्पकतेने, अनेक प्रकारे गीतेची पुस्तके त्यांनी बाजारात आणली आहेत, जसे गीता डायरी, खिषात राहील अशी गीता, मोठ्या टायपातली गीता, सर्व भारतीय भाषांमध्ये अर्था सहीत गीता. दर्जेदार छपाई असूनही त्यांच्या किमती सुद्धा विश्वास बसणार नाही एवढ्या कमी आहेत. सर्व प्रमुख शहरात त्यांची दूकाने आहेत, पण त्यात बहुदा कोणी फ़िरकत सुद्धा नाही. हरे राम पंथीयांनी मग यातुनच बोध घेतला व गल्लोगल्ली मोटारचा वापर करून गीता व त्यावर आधारीत पुस्तके विकायला सुरवात केली. किमती माफ़क ठेउन सुद्धा लोकांनी तिकडेही पाठच फ़िरवली , तशा अगरबत्ती, जपाची माळ असे आयटम खपल्याने विकणारे खपले नाहीत एवढेच ! लोक रस्त्यावर गीता घेत नाहीत मग आपण थेट ती लोकलमध्येच जाउन का विकु नये , असे वाटून आता त्या पंथाचे तरूण प्रचारक लोकलच्या डब्या डब्यातुन गीतेची पुस्तके विकताना दिसतात. बिचारे अगदी कळवळुन गीता घ्या असे लोकांना सांगत असतात पण लोक काही वळत नाहीत. अहो विकत घेउ नका, निदान चाळून तरी बघा, निदान हातात तरी घ्या असे सांगत ते जेव्हा गीता लोकांच्या हातात ठेवतात तेव्हा लोक झुरळ झटकल्याप्रमाणे ते पुस्तक झटकून टाकतात !
हे रोज रोज बघुन माझी एक अजब घुसमट होत होती. असाच डब्यात एक प्रचारक हताश हो़उन माझ्या जवळच बसला. मी विचारले की साधारण किती पुस्तके खपतात ? त्याचे उत्तर होते, दिवसभरात फ़ारतर दोन ते चार , एखादा दिवस तर एकही प्रत विकली जात नाही ! पनवेल यायला अजून १५ तरी मिनीटे होती, डबा सुद्धा भरलेला होता. माझ्यात काय संचारले कोणास ठाउक, त्याची पुस्तकानी भरलेली झोळी मी माझ्या गळ्यात अडकवली, डब्याच्या मधोमध उभे राहुन सर्वांना खणखणीत आवाजात प्रश्न विचारले .. किती जण स्वत:ला हिंदू समजतात ? त्यांनी हात वर करा .. बहुसंख्य हात आपसूकच वर गेले. मग आपला धर्मग्रंथ कोणता ? गीता असे अनेक जण पुटपुटले ! मग मी विचारले की डब्यात कोणी ख्रिश्चन, मुस्लीम , शीख असतील तर त्यांच्या घरात बायबल, कुराण, ग्रंथसाहेबा असतील व ते त्यांनी वाचलेही असतील असे विचारायला हवे का ? सुदैवाने असे इतर धर्माचे सुद्धा कोणी ना कोणी होते व त्यांनी एकमुखाने हे आमच्या घरी आहे व ते वाचले नाही तर आम्ही आमचा धर्म सांगू कोणत्या तोंडाने, असेही सुनावले ! मग थोडा पॉज घेउन मी किती हिंदूच्या घरी निदान एक तरी गीतेची प्रत आहे ? असे विचारतात लोकल मध्ये सन्नाटा पसरला. स्वत:ला हिंदू समजता व आपल्या धर्मग्रंथाची प्रत शोभेला सुद्धा आपल्या घरात नाही असे सांगताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही असे कडाडताच डब्यात खळबळ उडाली ! अहो गीता वाचु नका निदान घरात ठेवा तरी असे शेवटी कळकळीने आवाहन करताच, मला द्या, मला द्या असा एकच गलका उडाला. २० रूपयाला एक प्रमाणे झोळीतले शेवटचे पुस्तक संपले तेव्हा गाडी पनवेल स्थानकात शिरत होती. साधारण शंभर पुस्तके हातोहात खपली होती. अनेक लोकांना पुस्तक हवे असूनही मिळाले नव्हते.
पनवेल स्थानकात एका बाकड्यावर बसून मी रिकामी झोळी व सर्व पैसे त्या प्रचारकाच्या ताब्यात दिले तेव्हा त्याची अवस्था बघण्यासारखी होती. डोळ्यातुन अश्रू घळाघळा वहात असतानात माझा हात हातात घेउन त्याने “ किशनजी की लीला अगाध है” एवढेच उदगार काढले. लोकल परत सीएसटीच्या दिशेने रवाना होण्यापुर्वीच त्याने ती पकडली व मार्गस्थ झाला. गीता प्रचाराच्या प्रवित्र कार्यात आपली सुद्धा एक मुठ पडली या विचारातच मी घर गाठले.
बाय द वे, तुमच्या घरे आहे का हो गीता ?
शनिवार, १६ मे, २००९
गुगली, दूसरा व तिसरा सुद्धा !
अग आज सकाळी स्टेशनला स्कूटर पार्क करत होतो तेव्हा एक बाई, कडेवर वर्षाचा मुलगा, त्यात परत दिवस गेलेले व हातात या अवजड दोन बॅगा, अशा अवस्थेत अगदी खुरडत चालल्या सारखी स्टेशनच्या दिशेने चालली होती. मला अगदी राहवले नाही, म्हटले मी तुमच्या बॅगा घेतो, तुम्हाला पुल पार करून देतो, तुम्हाला कोणती गाडी पकडायची आहे ? ती बोलली नेत्रावती, ठीक आहे, ती ५ नंबरला येते मी तिकडेच उतरून थांबतो ….
तरूण होती का रे ? - ही.
हो, तिशीची असेल, साउथची असावी – मी.
सुंदर असेल ना ? – ही.
हो – मी !
तरीच …! ही. विथ जळजळीत कटाक्ष ! ( इति गुगली )
असा राग आला, मुसलमान असतो तर तीन काय तीनशे वेळा तलाख-तलाख-तलाख असे म्हणालो असतो. पण परोपकाराचे मीच भरवलेले खुळ मुलांच्या डोक्यातुन जावे यासाठी मला गोष्ट पुरी करणे भाग होते !
तर तिचे सामान घेउन मी भरभर तो पुल पार केला व सामान फ़लाटावर ठेउन ती कोठवर आली आहे ते पाहु लागलो. इतक्यात “चोर, चोर” असे माझ्या कानी पडले. मी आसपास बघितले तर संशयास्पद कोणी दिसेना. ओरडणारा तो काळाकुट्ट मद्रासी चक्क मलाच बघुन चोर असे ओरडत माझ्या समोर उभा ठाकला. लगेच आसपासच्या माणसांनी आमच्या भोवती कोंडाळॆ केले. कधी नव्हे ते पोलीस सुद्धा आले व त्या मद्राशालाच चोर समजले व क्या चोरी किया बे, चल निकाल, असे म्हणाले. या वर तो मद्रासी माझ्याकडे बोट दाखवुन “मै नै, यैच चौर है” असे म्हणाला. पोलीस पण गडबडला, हा तर जंटलमन वाटतो असे भाव त्याच्या चेहर्यावर दिसत होते. इतक्यात मुदली, सेक्टर ३ मधला, माझा कामावरचा मित्र, आला. त्याने काय झाले म्हणून विचारले. मला जरा मग धीर आला. मद्रासी सांगत होता की “ये मेरा लगेज चोरी करके भाग रहेला है, पकडो साले को !” मग मी पण आवाज चढवला, अबे मदरासी, तेरी तो …, ये लगेज पीछे से एक औरत बच्चा लेके आ रही उसका है, मै उसकी मदत कर रहा था, चोर, लफ़ंगे तो तुम दिखते हो !” इतक्यात ती बाई मला पुल उतरताना दिसली. मी तीचे लक्ष वेधुन, इकडे या असे खुणावले. त्यावर तो म्हणतो कसा, “ ये तो मेरीच वाइफ़ है !” आता पब्लीक चेकाळले, त्याच्यावर नुसत्या शिव्यांचा भडीमार झाला, गरोदर बायकोला सामाना सकट मागे सोडून आपण मोकाट फ़िरतो, माणूस आहे का हैवान. एकाने तर त्याच्या कानफ़टातच भडकावली ! म्हणे पर्यंत त्याची बायको तिथे पोचली. त्या बरोबर तो मद्रासी तीच्या अंगावर धाउनच गेला. दात-ओठ खाउन तो तीला बरेच काही त्यांच्या भाषेत बोलला, मग तीने त्याला काहीतरी समजावले, मग तो एकदमच शांत झाला. निर्लज्जा सारखे हसला सुद्धा वर मला सॉरी, थँक्स म्हणत त्याच्या बायको बरोबर पुढे गेला.
मुदली आणि मी मग लोकल पकडायला गेलो तेव्हा मुदली म्हणतो कसा “मराठे, तेरे मे ना ये अजीब सुलेमानी किडा है, दुनियाका कंधे पे कायको लेता है ? बेचारे हजबंड ने खामका मार खाया.”
अबे, मुदली, त्याला तर तुडवायला हवा होता ….” माझा सात्विक संताप नुसता उफ़ाळून आला होता.
…मेरे को थोडा थोडा तमील आता है, उनका जो झगडा हुआ वो थोडा बहुत समझा मुझे.
…अरे वो हैवान तो उसकी जान भी ले सकता है, मुझे अब उसका ही डर लग रहा है !
यावर मुदली जो काय हसत सूटला, अगदी वेड लागल्यासारखा ! शेवटी मी त्याच्या थुलथुलीत पोटावर एक सणसणीत पंच मारला. तेव्हा, अबे सुन, गुस्सा क्यो होता है, म्हणत पुढचे सांगू लागला.
नवरा तीला म्हणत होता “छीनाल औरत, अपने जोरू को पराये आदमी के सामने जलील करती है, तुम्हारी तो चमडी निकालता हूँ, मै तुम्हे क्या बताया था, उधरीच खडी रह, मै कुली लेके आता हूं, फ़ीर भी वो हरामीकी मदत क्यो ली तुमने ?”
यावर ती बाई बोलली, “मै तो थोडा छांव की तरफ़ जा रही थी, वो आया, और सामान लूं क्या पुछा, आदमी शकलसे तो शरीफ़ लग रहा था, तो लो बोली. उतना कुली का पैसा बचेगा, ओर वैसे यहा कुली मिलता कहा है ? बकरा खुद मिल रहा था तो क्यो नही बोलने का ? उगीच तो नवरा हसला व तुला धन्यवाद, माफ़ करा नाही बोलला काही ! ( हा होता “दूसरा” )
हे ५० सेकंदाचे भाषांतर मुदलीकडून पुर्ण समजायला सीएसटी यायला लागले, मला मुदलीच्या हसण्याला ब्रेक मारायला त्याच्या पोटावर किमान चारदा पंच मारायला लागले. अख्खा डबा फ़िदीफ़िदी हसत होता !
सगळे सांगितल्यावर मात्र जरा हलके वाटले. आता कानाला खडा, दुनियादारी गेली बाराच्या भावात, आणि बायकांना तर अजिबात मदत नाही करणार. जेन्टस डब्यात आल्या तर अजिबात उभा राहणार नाही. लगेच ही बोललीच, “सुंदर आणि तरूण बायकांची तर अजिबातच करू नका ! “ (अग किती छळशील !)
हीच्या शेर्यांकडे दुर्लक्ष करत मी मुलांना म्हणालो,सगळॆ संस्कार विसरा पार, ही दुनिया चांगल्या माणसांची नाहीच आहे मुळी. काही कोणाला याच्या पुढे मदत करायची नाही, याद राखा ! जरा वेळ शांततेत गेला, मग प्रसाद बोलला, “ पण बाबा ती परमहंसाची गोष्ट नाही का तु सांगत .. गंगा नदी, वाहणारा तो विंचु.., त्याला वाचवणारे परमहंस.., तो त्यांना चावतो , सारखा सारखा पाण्यात पडतो .., ते त्याला वाचवत राहतात…आपणही आपला धर्म सोडू नये …!” चूप कार्ट्या, एकदम चूप ! त्याला चूप केल्यावर प्रियांका सरसावली, “अरे बाबा, मग तर तु ही गोष्ट अगदी कोणा-कोणाला सांगितली सुद्धा नाही पाहीजेस, कारण तुझ्या त्या गोष्टीत नाही का, सेवाभावी साधु असतो.., त्याचा अबलख घोडा.., चोराला तो हवा असतो.., लंगडा बनून वाटेत पडतो.., साधु फ़सतो.., चोर पळत असताना साधु म्हणतो चोरला नाही, दिला म्हणून सांग... नाहीतर पुढे लोक लंगड्यांना मदत नाही करणार !
आता मात्र माझा राग कोठल्या कोठे पळतो, मस्त प्रसन्न , अगदी फ़्रेश वाटते ! मग ही म्हणते “तुमचा बाबा काय परोपकार करण्याचे थांबणार आहे का ? अगदी उद्याच कोणी तरूण, तीशीची, सुंदर बाई दिसली की तीची पर्स सुद्धा हातात घेईल , माझी मात्र कधी सूटकेस पण हातात नाही घेतली ! काय तर म्हणे स्वावलंबी व्हा, आपले ओझे आपणच ओढा !”
रात्री हळूच म्हणाली, “तीचे काही नाही चुकले, त्या बाईच्या जागी मी असते ना तरी अगदी हेच केले असते ! पुढच्या जन्मी तु ना माझ्या शेजारणीचा नवरा हो, म्हणजे माझी पण खूप कामे हलकी होतील ! ( आणि हा “तिसरा” !)
शनिवार, २८ फेब्रुवारी, २००९
खिडकी उघडली – लोकलची आणि मनाची सुद्धा !
थंडीच्या दिवसात पनवेलला लोकलमध्ये आगळेच दृष्य दिसते. सगळ्या खिडक्या आणि पंखे बंद असतात व कॉर्नर चक्क रिकामे ! मला अनायसेच खिडकी मिळते व मी ती मस्त उघडून बसतो ! त्या दिवशी सुद्धा खिडकी उघडणार एवढ्यात एक चार-एक वर्षाचा मुलगा आणि त्याच्या बरोबर त्याचा काका (ते मागाहुन समजले) आत शिरले. मुलगा खिडकीजवळ माझ्या समोरच बसला व काका माझ्या शेजारी. त्यांच्या चेहर्यावरून ते बिहारी आणि मुसलमान वाटत होते. आधीच भय्ये-बिहारी त्यात मुसलमान म्ह्टल्यावर माझ्या कपाळाला आठी पडलीच. त्यात तो मुलगा उतावीळपणे खिडकी उघडायला लागला म्ह्टल्यावर मी डोळे मोठे करून त्याच्याकडे बघितले. तेवढा इशारा त्याच्या काकाला पुरला व त्याने त्या मुलाला ’अंकल को ठंडी बज रही है, मत खोलो’ म्हणून त्याला दटावले. तो मुलगा हिरमुसला व गाल फ़ुगवून बसला. त्याचा तो बहुतेक पहीलाच ट्रेन प्रवास असावा, कदाचित मुंबईत सुद्धा तो पहील्यांदाच आला असावा. त्या बिहारी-मुसलमान मुलाची गोची झाली हे बघून मला मात्र अगदी आनंदाच्या उकळ्या फ़ूटल्या. साले, कोण कोठले येतात, महाराष्ट्राच्या उरावर बसतात, जाइल तिकडे उकीरडा करून टाकतात, यांच्याशी असेच वागले पाहीजे नाहीतर हा सुद्धा इथेच बस्तान ठोकेल !
थोड्याच वेळात गाडीने फ़लाट सोडला. काचेतुन दिसणारी पळती दृष्ये त्या मुलाची उत्सुकता चाळवत होती व सारखे त्याचे हात खिडकी उघडण्यासाठी शिवशिवत होते. त्याचा काका लगेच माझ्याकडे बोट दाखवून त्याला नजरेने दटावत होता. त्या मुलाच्या काळ्याभोर डोळ्यातली निरागसता, असहायता मला जाणवू लागली व माझ्या मनातच संघर्ष उडाला. चार वर्षाच्या मुलाला कसला आलाय प्रांतवाद, धर्मवाद, भाषावाद, का त्याच्या आनंदावर विरजण घालतो आहेस, का लहानपणीच त्याचे मन कुलुषित करतो आहेस, थंडीच्या ढालीआड आपला आसूरी आनंद लपवत आहेस ? हिमालयात तिनदा पदभ्रमण करणार्या व बारा महीने थंड पाण्याने आंघोळ करणार्याला कसली आलीय थंडीची भीती, उघड ती खिडकी ! बराच वेळ ’उघड’ शब्दाचा एको माझ्या मनाच्या पटलावर आदळत राहीला व शेवटी कोणत्यातरी अनामिक प्रेरणेने मी ती खिडकी खाडकन उघडली ! लगेच त्या मुलाच्या डोळ्यात पाहीले. आधी दिसला तो अविश्वास मग त्याचे विस्मयात रूपांतर झाले. लगेच त्याचे डोळे खिडकीच्या गजाला चिकटले. थोड्याच वेळात बाहेर काय दिसते आहे, त्याची रनिंग कॉमेंट्री सुरू झाली. काही क्षणातच तो पळती दृष्ये पाहण्यात हरखून गेला व मी ? मी त्याच्या डोळ्यात ! तो बाहेर काय बघत आहे ते मला त्याच्या डोळ्यात आधी दिसू लागले व मग काही काळ तर त्याची रनिंग कॉमेंट्री मला ऐकू येइनाशीच झाली ! आता तो माझ्याशी पण संवाद साधू लागला होता, अंकल वो देखा क्या ? वो देखो ! वो क्या है ? हजार प्रश्न व कुतुहल मिश्रीत उद्गार, मी त्यातल्या एकाचेही उत्तर दिले नाही, जसा काही मी सुद्धा प्रथमच लोकलमध्ये बसलो होतो व त्याच्या डोळ्यातले जग माझ्या मनात साठवत होतो ! आता गाडी वाशीच्या पुलावर आली. बाहेरचे दृष्य बघून आता त्याने तोंडाचाच आ वासला होता व डोळे तर एवढे मोठे केले होते की ते अख्खे दृष्य जणू त्याचा डोळ्यात मावणार होते. बाजुलाच वाहनांसाठी असलेला महाकाय पुल, त्यावरून अव्याहत चाललेली विविध प्रकारच्या वाहनांची यातायात, खाली खाडीचे पाणी, त्यात संथ डोलणार्या होड्या, रबर टायरची बोट करून त्यात बसून मासेमारी करणारे कोळी, पंख पसरून पाण्याला समांतर उडणारे समुद्रपक्षी…., अचानक एक मोठे विमान रोरावत त्या दृष्यात शिरले व एक अद्भूत, भव्य निसर्गचित्र पूर्ण झाले. विमान बघून तो मुलगा अगदी हरखून गेला, सीट सोडून तो खिडकीजवळ उभा राहीला, जागच्या जागी उड्या मारत, टाळ्या वाजवत त्याने ’अंकल विमान’ चा घोषा लावला. खिडकीला गज असूनही त्याने शक्य तेवढे डोके बाहेर काढून ते विमान नजरेच्या टप्प्याच्या पार बाहेर जाईपर्यंत उडवत ठेवले. एक अपूर्व समाधान त्याच्या नजरेत तरळत होते.
चलो मुन्ना, अब हमे उतरना है, या वाक्याने आता ’आम्ही’ भानावर आलो. त्याच्या बरोबर कोणी होता याचाच मला विसर पडला होता. त्याच्या काकाने त्याचा एक हात घट्ट आपल्या हातात धरला होता व त्याला घेउन गर्दी कापत तो दरवाजाकडे निघाला होता. जाता जाता तो मुलगा माझ्याकडे डोळॆ भरून बघत होता, त्याचा मोकळा हात बहुदा मला टाटा करण्यासाठी उत्सुक होता पण तसे काही त्याने केले नाही. गाडी मानखुर्दला काही क्षण थांबली. गाडी सूटण्याचा भोंगा वाजला. त्याला आपण तरी टाटा करायला हवे होते अशी टोचणी लागून राहीली. अचानक दूसर्या दिशेच्या खिडकीत तो प्रकटला , खिडकीत त्याने आपला चिमूकला पंजा घुसवला व ’अंकल शुक्रीया, खुदा हाफ़िज’ असे पंजा हलवत जोरात म्हणू लागला, गाडी वेग घेत असतानाच त्याच्या काकाने त्याला पाठी खेचून घेतले , नाहीतर ---- !
खिडकीच्या बाहेरची दृष्ये आता मला धुरकट दिसू लागली होती. खरेच , शुक्रगुजार तर मी त्याचाच होतो, त्याला मी लोकलचीच खिडकी उघडून दिली होती, त्याने मात्र माझ्या मनाची कवाडे मोकळी केली होती !
रविवार, २६ ऑक्टोबर, २००८
दानत !
शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २००८
अश्व-व्रत !
अश्व-व्रत !
तेव्हा आम्ही रहायला विरार, आगाशी येथे होतो। मी असेन चवथीत. सुट्टी पडली की बाबांबरोबर मुंबई बघायला जाणे हा कार्यक्रम असेच. विरारवरून लोकलने आधी बाबांचे कार्यालय, गोदी बघणे, मग बाबा हाफ डे घेउन आम्हाला डबल डेकर बस, टॅक्सी, घोडा-गाडी , हॉटेलात खाणे आणि जमले तर पिक्चर दाखवून अगदी खूश करून टाकत ! असेच एका सुट्टीत लोकल मध्ये बाबांच्या मांडीवर खिडकीजवळ बसलो होतो. लोकलमध्ये बाबांचा बराच मित्र परीवार होता. साधारण अंधेरी आले आणि सगळे मित्र उभे राहीले ! बाबांनी माझा ताबा एका उभ्या असलेल्या माणसाकडे दिला व ते ही उभे राहीले. उभे असलेली माणसे आता बसली होती, माझ्या चेहर्यावर आश्चर्य ! मग एक मित्र बोलला अरे पोराला पण सांगून ठेव तुझे अश्व-व्रत. केव्हातरी लोकलने प्रवास करावा लागणारच आहे त्याला पण ! मग तोच मला बोलला, लोकलमध्ये बसलेल्यांनी पूर्ण प्रवासाच्या अर्धा वेळच बसावे व मग उभे असणार्यांना बसायली द्यावे ! हेच तुझ्या बाबांचे अश्व-व्रत ! मला तेव्हा काहीच कळले नाही !
बाबांना कामावर जाणे-येणे खूपच त्रासाचे होउ लागले, परत शिफ्टची कटकट होतीच तेव्हा ती भाड्याची खोली मालकाला परत करून आम्ही कार्यालयीन वसाहतीत वडाळ्याला शिफ्ट झालो। प्रवास अवघ्या २० मिनीटावर आला आणि तेवढे उभे राहणे काही विशेष नव्हते. मी १९८६ मध्ये गोदीतच कामाला लागलो व जागा असो किंवा नसो दारावर उभा राहूनच प्रवास करायचो पुढे प्रथम वर्गाचा पास काढायला लागलो. बाबा निवृत्त झाल्यावर आम्ही सगळेच परत विरार- जेपी नगरला रहायला आलो. पहील्याच दिवशी लोकल मध्ये एक ग्रूप मिळाला. अंधेरी आल्यावर सगळे उभे राहीले, मी ही उभा राहीलो व हा काय प्रकार आहे असे विचारले. त्यातला जरा जास्त वयाचा म्हणाला की अरे हे अश्व-व्रत आहे, कोणी मराठे म्हणून होते त्याचा प्रचार करणारे ! मी थक्कच झालो, मला लहानपणीचा तो सदर्भ आता लागत होता.
नंतर साधारण दोन वर्षे हे व्रत पाळून मी पण वडाळ्याला कार्यालयाची जागा घेतली व प्रवासाची दगदग संपली। २००२ च्या आसपास, नवीन पनवेल स्वत:ची जागा घेतली व परत लोकलकर झालो.सुरवातीला एवढी गर्दी नसायची त्यामुळे सगळ्यांनाच बसायला मिळायचे. तसाही हार्बर वर प्रवाशांचा टर्न-अराउंड चांगला आहे. कुर्ला येथे तर गाडी जवळपास खाली होउन परत तेवढीच भरते ! पण आता हार्बरची गर्दी सुद्धा मेन व वेस्टर्न बरोबर स्पर्धा करू लागली आहे ! पनवेलला सुद्धा सकाळच्या वेळी चवथी सीट सुद्धा मिळत नाही. पनवेलला बसणारे बहुतेक थेट मुंबई व्ही.टी पर्यंत जाणारे असतात. अगदी खांदेश्वर, खारघर व आता मानससरोवरला चढणारे प्रवास बिचारे सगळा प्रवास उभ्यानेच करतात. यातुनच मग टोमणेबाजी होउ लागली. फेव्हीकॉल जोड है, xx ला फोडे आली, राजकरणी तरी खुर्ची सोडतील पण हे पनवेलकर ! मग त्यांनाही प्रत्युत्तरे जाउ लागली, आम्ही बसतो, तुमची का xx जळते , या, घ्या घर पनवेलला, अरे बोरीबंदर काय कुलाब्याला गाडी जायला लागेपर्यंत बसून राहू ! टोमणे मारता ना, नाही उठत, करा काय करता ते, कायदा आहे काय ?
दोन महीन्यापुर्वी माझी बदली झाली। नव्या जागी संध्याकाळी सातपर्यंत थांबावे लागू लागले. सकाळी निघताना पण जागा मिळाली नाही म्हणून लोकल सोडावी लागते ! संध्याकाळी परतताना लोकल मशीदवरून येतानाच पॅक ! कसेबसे उभे राहण्यापुरतीच जागा मिळू लागली. असाच एकदा पार exhaust होउन घरी निघालो, सीटच्या मधल्या जागेत कसाबसा उभा होतो, तोल सांभाळत, प्रत्येक स्थानकागणिक गर्दी वाढतच चालली होती. हा प्रवास कधी संपणारच नाही असे वाटू लागले, डोळ्यासमोर अंधारी येउन खाली कोसळणार असे वाटत असतानाच एकाने बसायला दिले. मला तो अगदी देवदूतच वाटला तेव्हा. साधारण बेलापूर गेल्यावर त्याला पण परत बसायला मिळाले. मी त्याचे अगदी मनापासून आभार मानले त्यावर तो एवढेच म्हणाला "ये तो मेरा व्रत है, हो सके तो आप भी शूरू करो !"
अश्व-व्रत --- घोडा - तुम्ही त्याला कधी बसलेला बघितलाय का ? केव्हाच नाही ! घोडा जन्माला आल्यापासून उभाच असतो, न थकता, न कंटाळता ! जेव्हा तो बसू लागतो तेव्हा समजायचे आता हा पुन्हा कधी उठणारच नाही ! खरच , सलग सव्वा-तास बसणे सुद्धा कष्टदायकच आहे, पायात माणसे आलेली असतात, त्यामुळे ते पण अगदी आखडून जातात. बसलेलेही दु:खी, उभे राहणारे सुद्धा दु:खी ! सव्वा तासाच्या प्रवासात ५० मिनीटे बसणेच योग्य आहे, मग सरळ उभे रहावे हेच उत्तम आणि त्यात खरे तर स्वार्थच जास्त आहे ! मग ठरले - परत अश्व-व्रताचा स्वीकार करायचा, प्रचार करायचा, अगदी मनसे !
महीना झाला हे व्रत अंगिकारून, अगदी मस्त वाटते, काहीही त्रास होत नाही, उलट हात-पाय अधिक जोमाने काम करतात ! टोमणे थांबले आता ! आता सगळे नांदा सौख्यभरे ! अगदी तुझ्या गळा, माझ्या गळा स्टायल, पहीले आप - पहीले आप ! कधी कधी तर मला उठायचीही गरज पडत नाही, किंवा बसणारे कोणी उरलेच नसल्यामुळे परत बसायला मिळते ! कधीतरी कोणीतरी विचारतो, "आपको तो बोरीबंदर जाना था, तो वडाला क्यो खडे हुए ? " ही संधी मग मी सोडत नाही, अजून अश्व-व्रत न पाळणार्यांना सुनवायची मला आयतीच संधी मिळते, ती मी बरा सोडेन ? आता निदान माझ्या डब्यात तरी अनेक जण या व्रताचे पालन करून सुखी झालेले आहेत ! बोला, तुम्ही घेणार हा वसा ? पण एक आहे, घेतला वसा टाकायचा नाही, उतायचे नाही आणि मातायचे नाही ! तुमचे भले होईल, अगदी निवृत होईपर्यंत ठणठणीत रहाल, घ्या gurantee !
रविवार, १२ ऑक्टोबर, २००८
रेल-खेल !
खेळल्यामुळे ताण कमी होण्यास मदत होत्ते। आज-काल लोकल मधली गर्दी वाढतच चालली आहे आणि लोकलकरांवरचा ताण सुद्धा ! हल्ली कोणत्याही शूल्लक कारणावरून लोकलमध्ये भांडणे होतात व शेवट मारामारीत होतो ! तेव्हा लोकलकरांवरचा ताण कमी व्हावा म्हणून खास त्यांच्याकरता काही खेळ सूचवत आहे, तुम्हीही सूचवा !
तिकीट-तिकीट - १) एका मिनीटात जास्तीत जास्त कूपन पंच करणे २) एका मिनीटात 'स्मार्ट कार्ड' वापरून जास्तीत जास्त तिकीटे काढणे ३) रांगेत उभे राहून आपला नंबर किती वेळात येईल त्याचा अंदाज सांगणे (यात कोणती खिडकी केव्हा बंद होणार याचेही भान हवे) ४) कोणत्याही दोन स्टेशनच्या दरम्यानचे भाडे किती आहे ते झटपट सांगणे।
सबसे तेज कौन / डेयर डेव्हील - १) यात पुलाच्या एका टोकापासून पळत जाउन ठरलेला डबा आधी गाडी कोण पकडतो ते बघायचे.( या स्पर्धा दादर, कुर्ला, वडाळा य ठीकाणी घेतल्या जातील.) २) थांबलेली गाडी पकडणे, (यात उतरणारे प्रवासी उतरायच्या आत चढणे हे विशेष प्राविण्य मानले जाईल) , पळती गाडी पकडणे, ३) गर्दीतुन आत शिरल्यावर कमीत कमी वेळात खिडकीपर्यंत धडक मारणे तसेच फलाटावर गाडी पूर्ण थांबायच्या आत उतरणे, विरार गाडी पकडून अंधेरी किंवा बोरीवलीला उतरून दाखवणे. ४) बाजूच्या झोपडपट्टीतुन मारलेले दगड, घाण, फुगे चुकवणे.५) टफावरून प्रवास करणे, या डब्यातुन त्या डब्यात जाणे , महीलांच्या डब्यातुन प्रवास करणे (न पकडता !), टफावरची पकडापकडी इ. ६) कितीही गर्दी असूदे कोणताही सपोर्ट न घेता उभे राहणे.
फलाट कोठे येईल - यात सर्व उपनगरी स्थानकांच्या अप तसेच डाउन मार्गावर प्रवास करताना फलाट कोणत्या बाजूला येईल ते सांगता आले पाहीजे।
खिडकी-खिडकी - यात संपूर्ण रीकामी गाडी स्थानकात आणली जाईल. प्रवाशांनी शीटी मारल्यावर गाडीत शिरून खिडकी पकडण्याची स्पर्धा लावली जाईल. खिडकीत पकडताना पण हवेच्या दिशेची व मोठी खिडकी पकडणार्या स्पर्धकास बोनस गुण मिळतील.
फेका-फेकी - यात लोकलच्या रॅकवर जास्तीत जास्त सामान, ते ही न पडता ठेउन दाखवावे लागेल। तसेच दाराकडून बॅग रॅकवर फेकून देणे अशीही एक स्पर्धा असेल. तसेच कोणते सामान कोणत्या प्रवाशाच्या डोक्यावर कोसळेल त्याचा अंदाज वर्तवणे असाही एक प्रकार असेल.
रेल्वे माझ्या बापाची - यात जास्तीत जास्त पसरून बसणे, सहप्रवाशाच्या खांद्यावर मान टाकून झोपणे, मोबाईलवर मोठया आवाजात गाणी ऐकून लोकांना पकवणे, तिसर्या शीटवरून पानाची पिंक थेट खिडकीबाहेर मारणे, पत्ते खेळणे, भजने म्हणणे, आरती फिरवणे, रेल्वेचा डबा बडवणे, सीटवर काहीबाही लिहून ठेवणे, चवथ्या सीटवर बसलेल्या प्रवाशाचे बसणे अशक्य करून सोडणे, सूटकेस मांडीवर ठेउन प्रवास करणे, पेपर पूर्ण पसरून वाचणे, दूसर्याच्या हातातला पेपर न विचारता काढून घेणे , समोरच्या प्रवाशाने धरलेल्या पेपरचे आपल्यासमोरील पान बिनचूक वाचणे, उभ्या असलेल्या प्रवाशांनी कितीही टोमणे मारले तर आपली खुर्ची न सोडणे, बाजूने जात असलेल्या डब्यातील प्रवाशांना, जास्त करून महीला प्रवाशांना चिडवणे असे प्रकार असतील।
चोर-पुलीस - यात तिकीट काढताना बुकींग क्लार्क तुम्हाला फसवायचा प्रयत्न करेल, जसे भलत्याच स्टेशनचे तिकीट देईल, वा परत करताना कमी पैसे परत करेल-- असे प्रयत्न तुम्ही हाणून पाडायचे। तसेच तिकीट न काढताही तिकीट तपासनीसांच्या गराड्यातुन सहीसलामत बाहेर पडणे, गाडीत तिकीट तपासणार्याला मामा बनवणे, अवैध मालाची (जसे फटाके, रॉकेल )वाहतूक निर्धोकपणे करणे , प्रसंगी तिकीट तपासनीसाला लपेटणे अशाही स्पर्धा होतील.
कोणाची विकेट पडणार - यात विविध स्टेशनावर उतरणार्या प्रवाशांचे चेहरे दाखविण्यात येतील। मग लोकलमध्ये शिरून बसलेला कोणता प्रवासी कोठे उतरणार आहे ते बिनचूक ओळखायचे. यात जरा वैविध्य म्हणजे बसलेल्या प्रवाशाच्या हालचालीवरून तो कधी उतरणार याचा अंदाज बांधणे, रिकामी झालेली सीट चपळाईने पकडणे हे प्रकार असतील.
अंदाज अपना अपना - १) यात स्पर्धकाच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात येइल व जेव्हा विचारले जाईल तेव्हा लोकल कोणत्या दोन स्थानकांच्या दरम्यान आहे हे ओळखून दाखवायचे किंवा मध्येच केव्हातरी पट्टी ३ सेकंदापुरती काढली जाईल , तेवढ्या वेळात बाहेर बघून कोणते स्थानक येणार ते सांगायचे। २) मशीद बंदर किंवा मरीनलाईनस वरून गेलेली अप लोकल डाउन होताना कोणती असेल (म्हणजे विरार, बोरीवली, कल्याण, अंबरनाथ इ. ) ते ओळखायचे.
मेमरी - यात कोणत्याही मार्गावरची स्थानके न चूकता कमीतकमी वेळात सांगणे, कोणत्याही ठीकाणावरून दूसर्या कोणत्याही ठीकाणी जाण्याचा सर्वात जवळचा रूट सांगणे, वेगवेगळ्या वर्गाची भाडी सांगणे, अंतरे सांगणे, लोकलचे टाइम टेबल (लेडीज स्पेशलच्या वेळा पकडून ) सांगणे, महीलांचे डबे कोणत्या वेळात राखीव असतात ते सांगणे, इ।
निबंध स्पर्धा किंवा परीसंवादाचे विषय - १) ६५ किलो वजनाच्या वरच्या माणसांना अधिभार लावावा का ? २) चवथी शीट व नववी शीट अधिकृत करावी का ? ३) सुरवातीचे स्थानक ते शेवटचे स्थानक असा बसून प्रवास करणार्यांनी दूसत्या कोणाला बसायला द्यावे का, द्यावे तर केव्हा द्यावे ? ४) चवथ्या शीट वरच्या माणसाला बढतीचा हक्क असावा का ? ५) टफावरून प्रवास करणार्यांना भाड्यात सवलत द्यावी का ? ६) पास विसरलो व पकडले गेल्यास, दूसर्या दिवशी पास दाखवल्यास दंडाची अर्धी रक्कम तरी परत मिळावी का ? ७) गाडीत झोपणार्या प्रवाशांकडून स्लीपर चार्जेस घ्यावेत का ८) सहप्रवाशांचे सामान स्वयंसेवकासारखे रॅक वर लावून ठेवणे व परत काढून ठेवणे हे काम करणार्याला पासात सवलत द्यावी का ? ९) तिमाही पासापेक्षा रेल्वेने लाईफ-ताईम वॅलीडीटी असणारा पास आणावा का ? त्याचे भाडे किती असावे ? १०) लोकल ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उशीरा पोचल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई मिळावी का ? अशी भरपाई रोख न देता ट्रॅव्हल पॉईंटसच्या स्वरूपात द्यावी का ? ११) रूमाल, पेन, पिशवी, पेपर असे ठेउन शीट बूक करणे (आपल्या उशीरा येणार्या दोस्तांसाठी) योग्य की अयोग्य ? १२) महीलांसाठी राखीव डब्यातुन पुरूषांना प्रवास करता येत नाही, तोच नियम महीलांना पण लागू करावा का की महीला प्रवाशांनीच निदान गर्दीच्या वेळात तरी जनरल डब्यातून प्रवास करणे टाळून पुरूष-दाक्षिण्य दाखवावे ? १३) उठ-सूट मोटरमनला मारहाण करणे योग्य आहे का ? १४) रेल्वेने प्रवास करताना शिरस्त्राण , चिलखत, प्राणवायूचे नळकांडे बाळगावे का ? १४) कोणता प्रवासी कोठे उतरणार त्याची माहीती त्याने सगळ्यांना दिसेल अशा ठीकाणी लावावी का ? १५) ठराविक वर्ष प्रवास केल्यानंतर मोटरमन किंवा गार्डच्या डब्यातुन प्रवासाचा मान / परवाना मिळावा का ? १६) रेल्वेत जे विक्रेते असतात, त्यांच्याकडून फसवणूक झाल्यास नुकसान भरपाई मिळावी का ?
मग, घेणार ना या स्पर्धात भाग ? तर मग लागा तयारीला !
शनिवार, १३ सप्टेंबर, २००८
लोकलमधले संघी !
लोकलमधले संघी !
संघ किंवा रा.स्व.संघ म्हटले की आपल्या समोर, अर्ध्या चड्डीतले, दक्ष - आरम करणारे, चपला रांगेत ठेवणारे, हवेत(?) लाठ्या-काठ्या फिरवणारे उभे राहतात ! पण लोकलमधले संघी म्हणजे कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच, तसा प्रसिद्धी परा:मुख हा गुण दोघात कॉमन आहेच म्हणा !
होते असे की---
कोणत्याही लोकल सेवेचा सुरवातीचा टप्पा ! गाडी उलटी भरून आलेलीच असते पण जी काही चवथी, नववी सीट रिकामी असते तिच्यासाठी पण रण होते आणि यात हरलेले की 'जळो जीणे चौथ्या सीटचे' असे मानणारे, गुमान दोन सीटच्या मधल्या जागेत , खिडकी जवळ उभे राहतात. तशी आशाळ्भूत नजर खिडकीजवळ बसलेल्यांच्या हालचाली टीपत असतेच ! पण अशी माणसे बहुदा 'फेव्हीकॉलका मजबूत जोड' बुडाला लावूनच आलेली असतात, हल्ली गाडी कुलाब्यापर्यंत जात नाही म्हणूनच ते नाईलाजाने छ.शि.ट ला उतरतात !
मग कोणीतरी आपली बॅग, झोळी, ब्रीफकेस, पिशवी असे काही बाही त्याच्याजवळ देतो आणी न सांगताच तो ते वरच्या रॅकवर लावून ठेवतो. हा सिलसिला रॅक भरूनही थांबत नाहीच. मग 'हा' जागा करून, एकावर एक राशी रचून, हे extra सामान सुद्धा accomodate करतो. त्यात सुद्धा कोण 'काच का सामान है, उसके उपर कुछ मत रखो' म्हणून दरडावतो, तर कोणी डब्यात सांबार आहे,उलटे ठेउ नकोस म्हणून अलर्ट करतो. कोणाला आपल्या सामानाला हातही लावलेला खपत नाही तर सीटखाली बसलेल्याला हा 'उभा' डोक्यावर काहीतरी पाडून आपला गेम करणार अशी शंका भेडसावत असते !
कोकणातल्या मातीचा जसे भांडणे हा गुण आहे तसा लोकलमधल्या 'त्या ' जागेचा 'सेवाभावी-परोपकार' असा गुण असावा कारण एवढ्या वर्षाच्या लोकलप्रवासात या जागेवर उभ्या असणार्या माणसाला 'नाही' म्हणताना मी तरी ऐकले नाही, पाहीले नाही ! तसेच त्याला तोंडदेखले का होईना , thank you, आभारी आहे, धन्यवाद असे म्हटलेलेही मी ऐकले नाही. जसा काही रेल्वेने त्याला त्या कामासाठीच नियुक्त केले आहे व त्या साठी त्याला पासात भारी सूट दिली आहे ! चांगले कोणी म्हणत नाहीच उलट त्याला शिव्या घालणारी, त्याला आदेश सोडणारी माणसेच बघितली आहेत. पण हा मात्र संयम सोडत नाही, घेतला वसा टाकत नाही ! ज्या नम्रतेने सामान चढवतो, त्याच नम्रतेने ते उतरवूनही देतो !
तर अशा या 'रेल्वेप्रवासी सेवा सदस्याला' माझा सलाम !
चेन पुलींग !
घाई-गडबडीत लोकल पकडायच्या नादात अनेक जण अनेक गोष्टी विसरतात. काही तिकीट काढायलाच विसरतात तर काहींचा पास घरीच राहतो आणि हे नेमके समोर तिकीट तपासनीस दिसल्यावरच लक्षात येते ! अजून एक गोष्ट लोक बर्यापैकी विसरतात ती म्हणजे पॅंण्टची चेन वरती ओढणे ! इतकी लोकांना काय आणि कशाची घाई होते कोणास ठाउक ! बरे एखादे चेन वरती ओढायला विसरला तर लोकांना त्याला ते सांगायचे कसे हा प्रश्न का बरे पडावा ? लोकलची चेन कारणाशिवाय ओढली तर दंड किंवा/आणि कारावास होईल हे ठीक आहे पण दूसर्याला तुझी चेन वर ओढ हे सांगायला सुद्धा लोक घाबरतात, न जाणो त्याला आवडेल, नाही आवडेल, त्याहून तो आणि त्याची चेन, तो काय ते बघेल. आपण बरे आणि आपली चेन बरी !
असाच प्रथमवर्गाचा पास असताना माझ्या समोर एकजण बसला होता. त्याने पॅन्टची चेन वर ओढली नाही हे माझ्या लक्षात आले. तो अगदीच जंटलमन वाटत होता, नीटनेटके कपडे, टायपण बांधला होता व टाईम्स वाचण्यात अगदी गढून गेला होता. त्याला ही गोष्ट सांगावी असे मला अगदी राहून राहून वाटत होते ,पण कसे सांगावे ? त्याला मी आधी डब्यात कधी बघितलेही नव्हते. अनेक वेळा त्याची माझी नजरानजर होत होती पण कोंडी काही फूटत नव्हती. शेवटी गाडी बोरीबंदर स्थानकात विसावली. डबा हळूहळू खाली झाला. तो अजूनही बसूनच होता. मी ही शेवटी माझी बॅग घेतली आणि त्याला तसाच सोडून दाराकडे निघालो ! त्यानेच आता पाठून आवाज दिला, 'excuse me, if you don't mind---, plese try to understand,--- , i don't wan't to hurt you----' अरे बाबा एकदा काय ते सांग बाबा, किती लांबण लावशील (मी मनात !)--- आपके पॅन्ट की चेन--- झिप--- खुली है ! अरे बापरे ! मी घाईने परत पाठी फिरलो, त्याच्या समोरच बसून चेन वर ओढली आणि मग त्याला म्हणालो "मै भी आपको कबसे यही बताना चाहता था, आपके भी--- ! आता चमकायची पाळी त्याची होती ! म्हणून तू माझ्याकडे बघत होतास होय--मला वाटले--- तूला पेपर वाचायला हवा होता की काय ! झाले, चेन पुलींग झाल्यावर आम्ही दोघेही मनसोक्त हसलो आणि मार्गस्थ झालो !
बुधवार, २७ ऑगस्ट, २००८
महाराष्ट्र साला चोरोंकाही है !
महाराष्ट्र साला चोरोंकाही है !
लोकलने ने कुर्ला स्टेशन सोडले , गर्दीने अगदी कळस गाठला. अचानक "मेरा पॉकेट मारा" असा ओरडा ऐकू आला. अर्थात कुर्ला स्थानक या साठी प्रसिद्धच आहे. 'मै बरबाद हो गया, सारा पैसा, दिल्ली जाने का राजधानी का टिकट सब चोरी हो गया--, महाराष्ट्र साला चोरोंकाही है'. हे शेवटचे वाक्य मात्र माझ्या कानात शिसासारखे घुसले. 'तो' आता दोन सीटच्या मध्ये नेमका माझ्या समोरच उभा राहीला. उंचा-पुरा, गोरापान, हाडापेराने मजबूत, वय मात्र ६० च्या वर असावे, पंजाबी असावा. त्याचा चेहरा मात्र सर्वस्व गमावलेल्या माणसासारखा झाला होता. त्याच्या सोबत अवाढव्य म्हणता येईल अशी लेदर बॅग सुद्धा होती. आता तर तो एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडू लागला. मी त्याला माझी जागा बसायला दिली. त्याच्याशी चार धीराचे शब्द बोललो. मी तुम्हाला पनवेलला गाडी पकडून देतो. माझ्या मोबाईलवरून तुमच्या मुलाशी संपर्क साधून बोलतो, तुम्ही काळजी करू नका. सर्व ठीक होईल. आता त्याला जरा हायसे वाटले. माझा हात आपल्या हातात घेउन तो 'बडी मेहरबानी आपकी' असे म्हणाला. त्याला आपला बोगी/सीट नंबर आठवत होता. त्याच्या मुलाचा मोबाईल नंबर मी माझ्या मोबाईलमध्ये सेव करून ठेवला.
राजधानी गाड्या तशा वेळेवरच असतात आणि आजही जर ती वेळेवर आली तर मात्र आमची प्रचंड धावपळ होणार होती. गाडी पनवेलला लागली आणि बाजूला राजधानी येत असल्याची घोषणा झाली. मी त्याची ती अवाढव्य बॅग फलाटावर उतरवली. कुलीला हाक मारून त्याला त्याने सांगितलेल्या बोगी समोर उभे रहायला सांगितले. त्या पंजाब्याला घेउन स्टेशनमास्तरच्या केबिन मध्ये गेलो. त्याला तिकीट पाकीटा बरोबर चोरी गेल्याचे सांगितले. पण वेळ कमी असल्यामुळे त्याने थेट बोगीत चढून तिकीट तपासनीसाकडून नाममात्र दंड भरून पावती घ्यायचा सल्ला दिला. आम्ही लगेच बोगी गाठली. तो हमाल समोर उभा होताच. याचे पाकीट मारले असल्यामुळे हमाली देण्यासाठी मीच पैसे काढले पण त्या पंजाब्याने मला अडवले. 'थोडा पैसा है मेरा पास' म्हणून त्याची हमाली दिली, वर मला १०० रूपये देउ लागला. मी मात्र ते नम्र पण नाकारले. 'आपका जिसने पाकीट मारा वो शायदही मराठी हो सकता है लेकीन आपको अभी जो मदत कर रहा है वो पुरा मराठी है इतना याद रखो' हे मात्र मी त्याला ऐकवलेच. त्याच्या चेहर्यावरचे भाव भरभर बदलत गेले. 'मै शरमिंदा हू, हो सके तो मुझे माफ कर दो' एवढेच तो गदगदलेल्या आवाजात म्हणू शकला. गाडी सूटली. मी त्याच्या मुलाला sms करून सर्व प्रकार कळवला. (तेव्हा मोबाईल हा प्रकार महागडाच होता !) दूसर्या दिवशी त्याच्या मुलाचा फोन आला, वडील सुखरूप घरी पोचले, आपका बहुत बहुत शुक्रीया !
मंगळवार, २२ जुलै, २००८
टी.सी. किंवा तिकीट तपासनीस !
टी.सी. किंवा तिकीट तपासनीस !
लोकलने प्रवास म्हटले की तिकीट तपासनीसाशी गाठ पडणारच. का कोण जाणे खिषात तिकीट असो नसो हा काळ्या कोटातला प्राणी समोर दिसला की मला धडकीच भरते ! मी जेव्हा जेव्हा कोणत्याही कारणाने विना-तिकीट प्रवास केला आहे तेव्हा तेव्हा मला टीसीने हमखास पकडलेच आहे ! एकदा तर एक पाय स्टेशनच्या आत, एक बाहेर अशा स्थितीत पकडले आहे. अर्थात तेव्हा दंडाची रक्कम मामुली असल्यामुळे काही विशेष वाटत नसे. आता दंड २५० ते ५०० झाला आहे पण स्मार्ट कार्ड , कूपन्स खिषात सदैव असल्यामुळे बचावलो आहे. तसा माझा पनवेल ते व्ही.टी. पास असल्यामुळे या रूटवर काहीच भीती नाही. टी.सी. समोर उभा असेल आणि त्याने आपल्याला पास, तिकीट विचारले नाही तरी वाईट वाटते ! उगीच तिकीट काढले असे वाटते किंव आपल्याला तो अगदीच 'हा' समजला याचेही वाईट वाटते. जर अडवले तर माझ्यासारख्या जेंटलमनलाच हे अडवतात म्हणून रागही येतो !
पहील्यापासूनच मी तिमाही पास काढतो आहे . का ? तर दर महीन्याला विसरण्यापेक्षा निदान तीन महीन्याने तरी विसरेन म्हणून ! आधी बराच काळ माझा पास संपल्याचे मला टी.सी. ने पकडल्यावरच कळायचे. पुढे मोबाईल मध्ये रिमाईंडर लावणे आणि सध्या ऑनलाईन पास काढायची सोय यामुळे सरकारी खजिन्यात माझ्याकडून होणारी भर थांबली आहे ! पास संपला असेल आणि माझ्या ते आठवणीतही नसेल तर मी अगदी आठवडा आठवडा प्रवास 'असाच' केला आहे. पण कधीतरी प्रवास चालू असतानाच ते ध्यानात यायचे आणि मग मात्र भीती वाटायची. फलाटावर उतरल्यावर टी.सी. ला टाळण्यासाठी मी ज्या ज्या गोष्टी करायचो त्याचा नेमका उलट परीणाम व्हायचा व मी त्यांच्या जाळ्यात बरोबर सापडायचो ! टी.सीं ना एक नजरेत आपला पास कधीपर्यंत वैध आहे आणि कोठून-कोठपर्यंत, कोणत्या रूटचा हे कसे समजते ? कमाल आहे नाही ! मी कॉटन ग्रीन वरून वडाळ्याला शीफ्ट झालो तेव्हा टीसी मला हमखास वडाळ्याच्या पुलावर हटकायचा व मी पास त्याच्या समोर धरल्यावर जाउ द्यायचा. असे एक आठवडा चालले होते आणि गंमत म्हणजे माझा पास एक आठवड आधीच संपला होता ! टीसीत पण माझ्यासारखे वेंधळे असतात तर !
टीसीच्या खमकेपणाचा अनुभव मला उत्तर भारताची सहल करताना आला. कोणीतरी छोटा टूर ऑपरेटर होता व आम्ही अगदी शेवटच्या क्षणी जॉईन झालो होतो. आयोजकाने आम्हाला रेल्वेची तिकीटे दिली व टीसी आल्यावर काय नाव सांगायचे ते ही सांगून ठेवले. त्या दिवशी टीसींचे विशेष पथक तपासणीकरता आले होते. आमचे तिकीट बघून त्याने प्रभु कोण एवढेच विचारले. प्रभु नावाचा होता प्रत्यक्षात करंजेकर, कोळी जातीचा ! टीसी ने त्याला नखशिखान्त न्याहाळले व ठामपणे मराठीत बोलला की तुम्ही प्रभु असूच शकत नाही ! त्याने उसना आव आणून मीच प्रभु आहे असे सांगितले. त्यावर त्याने चक्क आपल्या मुलाची शप्पथ घे आणि सांग असे सांगितले ! आता मात्र कोळी लटपटला. शपथेवर काही तो सांगू शकला नाही. गुमान दंड भरावा लागला ! जाताना तो टीसी म्हणाला खोटे वागताना पण काही अक्कल लावावी, हे (माझ्याकडे बोट दाखवून !) प्रभु म्हणून थोडेफार तरी खपले असते, थोडेतरी गोरे आहेत ! पण प्रभु या कारवारी आडनावाचा माणूस कोळ्यासारखा काळा असूच शकत नाही !
वडाळ्याला असताना माझा प्रथमवर्गाचा पास होता. प्रथमवर्गाचा प्रवास enjoy करता येतो तो फक्त हार्बरवरच ! कारण या मार्गावर प्रथम वर्गात फारशी गर्दी केव्हाच नसते ! चालत्या लोकलमध्ये टी.सी. फारसे शिरत नाहीत याचा गैरफायदा अनेक जण घेतात. रेल्वेचे कर्मचारी सुद्धा युनियनचे कार्ड दिसेल अशा बेताने खिषात ठेउन बिनदिक्कत प्रथमवर्गाने प्रवास करत असतात. असाच एक तरूण प्रथमवर्गात अगदी खिडकीजवळ बसला होता. पुढच्या सीटवर पाय पसरून व बाजूच्या सीटवर स्पोर्ट कीट ठेउन स्वारी आरामात बसली होती ! टीसी आल्यावर त्याने आधी दादच दिली नाही पण टीसी खमक्या असावा. तो त्याच्या समोर उभाच राहीला. मग त्याने सर्व शोधल्यासारखे केले व चेहरा पाडून 'मेरा फर्स्ट क्लास का quarterly पास है, घर भूल गया शायद' असे सांगू लागला. टीसी बोलला की मग दंड भर ! बराच वेळ हुज्जत घालून तो तरूण दंड भरण्याकरता माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगू लागला. नाटक अधिक चांगले वटावे म्हणून त्याने आपले सर्व खिसे उलटे करून दाखविले आणि इथेच गडबड झाली ! त्याच्या खिषातुन कार्ड तिकीट खाली पडले. ते टीसीने लगेच उचलून बघितले तर ते दूसर्या वर्गाचे नुकतेच काढलेले तिकीट होते. पास आहे तर तिकीट का काढलेस या प्रश्नावर त्या तरूणाकडे उत्तर नव्हते ! टीसी ने त्याला मानगुटीला धरूनच खाली उतरवले !
एकदा मी वडाळ्याला धावतपळत दूसर्या वर्गाचा डबा कसाबसा पकडला. शिवडीपर्यंत लटकत गेलो व मग प्रथमवर्गाच्या डब्यात आसनस्थ झालो. गाडी सूटतानाच एक जण जीवाच्या आकांताने धडपडत त्या डब्यात शिरला ! तो टी.सी होता ! इतर कोणालाही काहीही न विचारता तो थेट माझ्यासमोर पावती-पुस्तक घेउनच उभा राहीला. भरा फाइन ! मी म्हटले पण का ? तर म्हणे मी तुम्हाला दूसर्यावर्गातुन पहील्या वर्गात घुसताना बघितले आहे ! मी शांतपणे प्रथमवर्गाचा तिमाही पास त्याच्या अगदी डोळ्यासमोर धरला. त्यानेही तो डोळे फाडफाडून बघितला व मला परत केला ! अख्खा डबा त्याला हसू लागला. खजिल होउनच तो खाली उतरला ! गंमत म्हणजे चार तरूणांचे टोळके टीसी आत शिरल्यावर धास्तावले होते, ते अनायसेच वाचले !
आता पासाबरोबर रेल्वेने दिलेले फोटो असलेले ओळखपत्र बाळगावे लागते पण पासावर आधी नुसती सही व नाव असायचे. एकाच कुंटुंबातले , मित्र असलेले, कार्यालयातले अनेक जण एकाच पासावर प्रवास करून त्याचा गैरफायदा घ्यायचे. हेच थीम एका मालीकेत मस्त वापरले होते. चार मुले व त्यांचा बाप , सगळ्यांची आद्याक्षरे 'प' वरून, एकाच पासावर प्रवास करत असतात ! असेच एके दिवशी दूपारी घरात सगळ्यांच्या बायका असताना रेल्वे पोलीस येतो व तुमच्या कुटंबातला 'प्' या आद्याक्षराचा कोणीतरी रेल्वे अपघातात मेला आहे. आम्ही पासावरून या पत्त्यावर आलो. ओळख पटवून प्रेत घेउन जा असा निरोप देतो ! त्या बायांवर आभाळच कोसळते ! आपला नवरा जिवंत असावा, दूसरीचा मेला असावा की -- ? या विचाराने त्या आशा-निराशेच्या अजब खेळात सापडतात ! एवढयात सासरा , प्रदीप नावाचा घरी येतो, त्याची बायको सूटकेचा निश्वास टाकते व चारी सुनांना धीर देउ लागते ! असेच मग प्रशांत, पवन व पकाश घरी येतात व मग त्यांच्याही बायका सूटतात व प्रवीण या सर्वात धाकट्याच्या बायकोचे सांत्वन करू लागतात. थोडा उशीराने प्रवीण पण सुखरूप घरी येतो व घरातल्या सूतकी वातावरणाचे त्याला कारण समजते. त्याने आपल्याकडचा पास त्याच्या प्रमोद नावाच्या मित्राला दिलेला असतो !
शुक्रवार, ११ जुलै, २००८
लोकलमधले लोक !
लोकलमधले लोक !
रेल्वे स्थानकाच्या परीसरात किंवा लोकलमध्ये आपल्याला दिसतो कोणतीही ओळख नसलेला जमाव (मॉब) पण नीट निरीक्षण केल्यास त्यातल्या प्रत्येकाची वेगळी ओळख तुम्हाला दिसू लागते. ज्यांच्या डोक्यात लोकलचे वेळा-पत्रक नीट बसले आहे ते गाडी पकडताना कधीही धावपळ करणार नाहीत, नवखा माणूस मात्र गाडी स्थानकात उभी आहे एवढे बघूनच ती पकडण्यासाठी पळत सूटेल. तिकीट काढण्यासाठी सुद्धा गर्दी असतेच पण त्यातही अनुभवी लोकांना कोणती खिडकी कधी उघडणार , कोणती कधी बंद होणार, साधारण रांग बघून तिकीट मिळायला किती वेळ लागणार याचा अंदाज बांधता येतो. हल्ली तर कूपन आणि स्मार्ट कार्ड मुळे रांगेत उभ्या असणार्या माणसांची किवच करावीशी वाटते. ९ ते १२ डब्यांच्या गाडीत महीलांचा डबा कोणता, लगेजचा कोणता, फर्स्ट-क्लासचा कोठे येणार, घुडघुड्या डबा कोठे येणार याची रोजच्या माणसांना कल्पना असते. तसे यातही वर्षानुवर्ष रेल्वेने प्रवास करून सुद्धा गाडी आल्यावर तीच्या सोबत झुलणारेही असतातच म्हणा ! गाडी स्थानकात शिरताना 'उतरणार्या प्रवाशांना आधी उतरू द्या' ही घोषणा कोणीच गंभीरपणे घेत नाही. अनेकवेळा तर गाडी पूर्ण थांबायच्या आधीच भरते ! उतरणारी माणसे अंग चोरून बाजूला उभी राहतात, सगळे आत चढले की उतरतात ! हवेच्या दिशेच्या मोठ्या खिडक्या पहील्या भरतात, मग लहान खिडक्या, मग दूसर्या, मग तिसर्या, मग हवेच्या विरूद्ध दिशेच्या जागा, मग आठव्या मग चवथ्या व सर्वात शेवटी नवव्या सीट भरतात ! मग दोन सीटच्या मध्ये माणसे उभी राहू लागतात. ग्रूपने प्रवास करणार्यातला कोणी अपडाउन करत असतो किंवा आधी येउन, गाडी लागत असतानाच आत शिरून कोठे बॅग, कोठे रूमाल, कोठे पेपर तर कोठे पेन ठेउन आपल्या टोळीतल्या इतर सदस्यांसाठी जागा अडवून ठेवतो ! मग जसेजसे टोळके येत जाते, एकेक वस्तू उचलल्या जाउन त्या जागी माणसे स्थानापन्न होतात. गाडी सूटते व मग माणसे निरखण्याचा माझा अभ्यास चालू होतो.
कोणी आल्याआल्याच पेपर, कादंबरी, पोथी काढून वाचू लागतो, कोणी कागदावर जप लिहू लागतो, कोणी पेपर न आणलेला समोरच्याच्या पेपरची एखादी पुरवणी न विचारताच काढून घेउन वाचू लागतो, कोणी समोरच्याच्या उघड्या पेपरची उलट बाजू वाचू लागतो. कोणी भांडणे उरकून काढतो, मग अनेक रिकामटेकड्यांना हात साफ करायची संधी मिळते तर कोणाला दिलजमाई करायची संधी मिळते. बसलेल्या प्रवाशांच्या पायात उभ्या असलेल्या प्रवाशांची सम-दु:खी लोकांबरोबर पटकन मैत्री जमते व मग बसलेल्यांना टोमणे मारून हैराण केले जाते. ते ही कमी नसतात म्हणा, या रहायला पनवेलला किंवा करा अप-डाउन, आम्ही का तुम्हाला अडवले असे सुनावले जाते. हल्ली तर मोबाईल हा रेल्वे प्रवाशांचा मित्रच बनला आहे. मोबाईल वर गेम खेळणे, FM वर गाणी ऐकणे, आपल्या आवडीची गाणी ऐकणे किंवा तशी कोणती सोय नसेल तर विविध रिंग टोन्स ऐकत बसणे यात कसा वेळ जातो हेच कळत नाही. ( आता मात्र मोबाईलला स्पीकरची सोय झाल्यापासून मोबाईलखोरी हा नवाच उपद्रव जन्माला आला आहे ! तसे पत्ते कूटणार्या टोळक्यांनी व तारस्वरात भजने म्हणणार्यांनी प्रवाशांना बराच काळ दे माय धरणी ठाय करून सोडले होतेच !)खिडकीजवळ बसलेली माणसे झोपी जातात किंवा झोपेचे सोंग तरी घेतात, न जाणो कोणी ओळखीचा दिसला तर त्याला जागा द्यायला लागेल ना ! काहींना बसल्या जागी झोपायची कला अवगत असते तर काही शेजार्याचा खांदा हाच उशी समजतात. असे काही शेजारी मग अचानक खांदा काढून घेउन त्या झोपाळूची गंमत करतात तर काही सहन करतात. प्रत्येक स्टेशनागणिक गाडी दुधडी भरलेल्या नदीसारखी माणसांनी वाहू लागते, गर्दी असह्य होते मग माणसांचा खरा चेहरा समोर येउ लागतो. कधी पसरून बसून चवथ्या सीटवर बसलेल्याचे 'जळो जीणे लाजिरवाणे' करून टाकले जाते तर कधी तोच शिरजोर होउन खिडकीत बसलेल्याला पार जखडून टाकतो. त्यातही एखादा आडव्या सीटवर आठच माणसे बसल्याचे दाखवून, हक्काची नववी जागा पदरात पाडून घेतो. बहुतेक माणसांच्या हातात काहीतरी असतेच. कोणी ते आपल्याच मांडीवर घेउन बसतो, कोणी पायाशी ठेवतो , कोणी सीटखाली घालतो, कोणी ते रॅक वर ठेवतो, कोणी ते लांबूनच रॅक वर भिरकावतो, कोणी ते पास करत, खिडकीजवळ उभ्या असलेल्या माणसाकरवी रॅकवर ठेववतो. रोजच्या माणसांना बसलेल्यापैकी कोणाची विकेट कधी पडणार आहे हे माहीत असते त्याप्रमाणे त्यांनी पोझिशन घेतलेल्या असतात. खाणाखुणा करून ओळखीच्या माणसांना प्लेस केले जात असते. ज्याला आपले स्टेशन कधी येणार ते माहीत नसते तो आसपासच्या लोकांना 'अगला स्टेशन कौनसा' हे विचारत असतो, तसेच फलाट कोणत्या बाजूला येणार हा यक्ष प्रश्न असतोच !
हे कमी म्हणून की काय,नुसती भीक मागणारे , गाणी म्हणून भीक मागणारे ( त्यात पण फिल्मी गाणी म्हणणारे, भक्ती-गीते म्हणणारे, नुसतेच वाजविणारे, duet म्हणणारे , यात सुद्धा स्त्री-पुरूष किंवा दोन्ही पुरूष असे उप-प्रकार असतात ! कधी तर अख्खे कुटुंबच लोकांना रिझवण्यासाठी तत्पर असते. मग काय विचारता राव, बाप वाजवत / बडवत असतो, बायको गात असते, मोठी मुले सुर धरत असतात तर लहान मुले पब्लीक पुढे भीकेचा कटोरा फिरवत असतात ! धन्य तो सोहळा !) अंगातल्या शर्टाने फरशी पूसून भीक मागणारे, चित्र-विचित्र आवाज काढून नाना प्रकारच्या ( गीतेच्या पुस्तकापासून ते जडी-बुटी पर्यंत , या वस्तूंची यादी द्यायची म्हटली तरी काही scrap सहज भरतील !) वस्तू डेमो देउन विकणारे विक्रेते सीन अधिकच रंगतदार करत असतात. मध्येच केव्हातरी तृतीयपंथीय टाळी वाजवून हात पसरतात.
कशी असतात ही माणसे ? अर्धवट झोप झालेली, जीवाला वैतागलेली, प्रचंड काळजीत पडलेली, रॅक वर ठेवलेली बॅग आपल्याच कपाळावर पडणार या काळजीत असलेली ! कोणी माजोरडे, आपल्याच गुर्मीत असलेले, कोणी सर्वज्ञ, कोणी अडाणीपणाचे सोंग पांघरलेले, कोणी तिकीट नसल्यामुळे तिकीट तपासनीस चढत नाही ना या विवंचनेत असलेला, कोणी आपल्या सामानावर नजर ठेउन असलेला, कोणी एवढ्या गर्दीत आपल्याला उतरायला जमेल ना या काळजीत बुडालेला, कोणी आज पण आपल्याला उशीर होणार म्हणून धास्तावलेला, कोणी तोंडातल्या पानाची पिचकारी खिडकी बाहेर सोडून मोकळे होणारा, कोणी तंबाखूची गोळी दाढेखाली धरून निवांत बसलेला ! कोणी संधीसाधूपणे दोन सीटवर डोळे लावून बसलेला, चवथ्या सीटला बसलेला कोणी प्रत्येक गर्दीबरोबर रेटा वाढवून स्वत:साठी अधिक स्पेस करत असतो. क्रीकेट , चित्रपट, आणि राजकारण हे 'लोकल'करांचे अगदी आवडते विषय. त्यात आता TV वरील मालिकांची भर पडली आहे ! हे सगळे आपले लंगोटी यार असल्याप्रमाणे वा कधी काळी चवथ्या सीटवर बसणारे असल्याप्रमाणे त्यांचा एकेरी उल्लेख करीत , कधी उद्धार केला जातो तर कधी उदो-उदो ! कोण कसा चूकला, कोणी निवृत्त व्हायला पाहीजे, कोणती मॅच फिक्स झाली होती, कोणी कसा कोठे आणि किती पैसा कमावला याचा हिशोब सुद्धा अनेकांना पाठ असतो ! गंमत म्हणजे सरकारच्या कोणत्याच निर्णयाचे समर्थन कोणी केल्याचे मी निदान ट्रेन मध्ये तरी ऐकले नाही !हे सर्व enjoy करत माझा प्रवास कधी संपतो हेच मला कळत नाही. दिवसेगणिक माझ्या ज्ञानात मौलिक भरच पडत असते. रोज काही ना काही तरी घडत असतेच असते( अगदी happening !). अजून १८ वर्षानी मी निवृत्त होईन आणि या आनंदाला मुकेन ! काय बरे करावे ?
लोकल मधल्या झोपा !
लोकल मधल्या झोपा !
तशी ट्रेन मध्ये बसल्यावर मला झोप लागत नाही पण जेव्हा कधी झोपलो आहे तेव्हा तेव्हा खूपच धमाल झाली आहे.
वडाळ्याला असताना अंतर कमी असल्यामुळे मी बहुदा दरवाजातच उभा रहायचो. एकदा असाचा रात्रपाळी करून पहाटे घरी परतत होतो. आमची ईमारत रेल्वे लाईनला समांतरच होती. लोकलच्या खिडकीतून मी आमचे घरही बघितले, दूध केंद्रासमोरची रांगही बघितली आणि मग कसा कोणास ठाउक पण डोळा लागला. जाग आली तेव्हा कुर्ला कारशेडमध्ये होतो !
एकदा अशीच दूपारी खरेदीची धावपळ करून मशीद बंदर स्टेशनला आल्यावर indicator वर पनवेल लोकल लागलेली दिसली. तशी दोन मिनीटे होउन गेली होती पण असेल ट्रेन लेट म्हणून येत असलेली ट्रेन धावतपळत पकडली. खिडकी मिळाली, सामान रॅक वर टाकून बसलो आणि दमल्यामुळे पेंगू लागलो. कोणीतरी उठवले तेव्हा बांदर्याला पोचलो होतो. ती गाडी पनवेल नसून बांद्रा होती. स्टेशनच्या कर्मचार्याने झोप लागल्याने इंडीकेटर बदलला नव्हता आणि मला संकटात टाकले होते. माझा त्या रूटचा पासपण नव्हता तेव्हा पहीली भीती तिकीट तपासनीसाची होती. उलटी गाडी तब्बल २० मिनीटांनी आली. वडाळ्याला पोचलो आणि काही सेकंदाने पनवेल लोकल चूकली. परत ३० मिनीटांनी पुढची गाडी मिळाली. मशीदला गाडी पकडताना बायकोला फोन करून लवकर येत आहे म्हणून सांगितले पण या उलट-सूलट प्रवासात दोन तास गेल्यामूळे नेहमीपेक्षा उशीराच घरी पोचलो.
असेच एकदा मानखुर्दला कोणीतरी खिडकीच्या बाहेरून गदागदा हलवून , भेदरलेल्या चेहर्याने बाहेर ये असे खुणावत होता. डोळे नीट उघडल्यावर दिसले की मीच एकटा डब्यात शिल्लल राहीलो होतो, आणि फलाटावर तूफान गर्दी. मी आता काय करावे या विचारात असतानाच ट्रेन हलली व उतरलेली माणसे धडाधड परत डब्यात चढली ! काय प्रकार आहे असे शेजार्याला विचारले तेव्हा तो बोलला की ट्रेन मानखुर्दला आली अणि कोणीतरी धूर धूर असे ओरडला ! आग लागली असे समजून सगळे लोक खाली उतरले होते, सगळी ट्रेनच खाली झाली होती. मोटरमनने सगळे तपासले. त्याची खात्री पटल्यावर सरळ हॉर्न वाजवून त्याने लोकल चालू केली. खाली उतरलेले सगळे परत आत शिरले. झोप लागल्यामुळे मला या गोंधळाची काही कल्पनाच नव्हती. मागाहून काही जणांनी संकटात सुद्धा शांत राहण्याच्या माझ्या वृत्तीचे कौतुक केले !
पुलंचे पुस्तक वाचताना एकदा ब्रह्मानंदी टाळी लागूल्याने प्रवास फार लांबला होता. झाले असे की मी दादरला भाईदर लोकल पकडली. मग मीरा-रोडला गाडी बदलून मला विरार लोकल पकडायची होती. पुलंचे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक वाचण्यात रंगून गेलो. किती वेळ गेला कळलेच नाही. अचानक गाडीत लोकांचा लोंढा शिरल्यामुळे माझी तंद्री भंगली. मला वाटले विरारच आले. पण गाडी सुरू झाली व उलट दिशेने का जात आहे म्हणून मी हैराण झालो. नीट बघितल्यावर कळले तर मीरा-रोड सूटले होते व गाडी चर्चगेटॅच्या दिशेने चालली होती ! म्हणजे गाडी भाईदरला पोचली, निदान वीस मिनीटे उभी होती, परत उलट दिशेने निघून मीरा-रोड गेले तरी मला कळले नव्हते !