रविवार, २५ एप्रिल, २०१०

लोकलकर आणि त्यांचे प्रकार व स्वभाव !

१.३० कोटी लोकांना आपल्यात सामावून घेणारी मुंबापुरी खरेच बाका नगरी आहे. त्यातले ५० लाख लोक लोकलकर आहेत. आता या लोकलकरांची स्वभावानुसार विगतवारी लावायची म्हटले तरी गरगरायला होते एवढे त्यांच्यात वैविध्य आहे. वर्गीकरणाची सुरवात लोक रेल्वे स्टेशन कसे गाठतात इकडून करूया ! पायी येणारे, दुचाकीने येणारे, टॅक्सी, रीक्षा, बसने येणारे. मग प्रत्यक्ष स्टेशनात प्रवेश करताना कोणी पादचारी पुलाचा / भुयारी मार्गाचा वापर करेल तर कोण जीवावर उदार हो‍उन पटरी पार करेल. सगळेच काही तिकिटाची रांग लावत नाहीत, कोणाचा पास असतो, त्यात सुद्धा प्रथम वर्ग , द्वितीय वर्ग व त्यात सुद्धा मासिक व त्रैमासिक पास ! तिकट काढण्यासाठी कोणी रांग लावेल, कोणी कुपन पंच करील, कोणी स्मार्ट कार्ड तर कोणी “गो कार्ड” वापरेल , रांग टाळण्यासाठी “लेडीज कार्ड” सुद्धा वापरणारे काही कमी नसतात ! हे काही नसलेला कोणी असे असणार्यांना तिकिट काढून देण्याची गळ घालतील. विदाउट तिकिट प्रवास करणार्यांची संख्या सुद्धा काही कमी नसेल. आणि विदाउट तिकिट प्रवास करायचाच आहे तर प्रथम वर्गानेच का करू नये असे मानणारे सुद्धा महाभाग असतीलच !

साधे स्थानकात गाडी येते तेव्हाची गोष्टच बघा ना. कोणी गाडी थांबायच्या आतच आत शिरतिल, कोणी उतरणारे उतरले की मगच शिस्तीत चढतील, कोणाला पळती गाडी पकडण्यातच थ्रील वाटत असेल, काहींची ती मस्टर गाठण्यासाठीची मजबूरी असेल. थेट टफावर स्वारी करणारे सुद्धा असतात व त्यात सुद्धा वर पळापळी करत या डब्यावरून त्या डब्यात जाणारे शूरवीर असतात. आत शिरणारे रिकाम्या हाताने प्रवास करणारे असतील तर सॅक, हात-पिशवी, ब्रीफकेस धारक सुद्धा असतील. सोबतचे सामान कोणी रॅकवर ठेवेल, कोणी फेकेल, कोणी तशी दूसर्याला विनंती करेल तर कोणी मांडीवर सांभाळेल कोणी सीटच्या खाली सरकवेल. आत शिरल्यावर जागा असेल तर ती पटकावणारे असतील तर काही जण लटकणेच पसंत करत असतील ! लटकणार्यांचे हेतु सुद्धा अनेक असतील, कोणी हवा खाण्यासाठी, कोणी लाइन मारण्यासाठी, कोणी अगतिक ! काहींना तिसर्या व नवव्या सीटचे सुद्धा वावडे नसेल तर काही स्वाभिमानी उभे राहणेच पसंत करतील. विडीओ कोच चे आकर्षण असणारे तिकडे ताटकळतील. अर्थात उभे राहणार्यात सुद्धा दोन सीटच्या मध्ये उभे राहणारे, मोकळ्या मार्गिकेत उभे राहणारे व पॅसेजमध्ये उभे राहणारे असे उप-प्रकार असतातच. कोणाला उभे असताना आपला तोल सांभाळायची कला अवगत असते तर कोणाला हँडल धरल्याशिवाय नीट उभेच राहता येत नाही. एकदा लोकलमध्ये स्थिरस्थावर झाल्यावर कोणी झोपी जाइल, कोणी झोपेचे सोंग घेणारा असेल. झोपणार्यात सुद्धा कोणी घोरणारा असेल, कोणी दूसर्याचा खांद्याची उशी करणारा असेल, अशी मान टाकणार्याला सांभाळून घेणारा कोणी असेल तर अचानक त्याचा सपोर्ट काढून त्याची फजिती करणारा सुद्धा असेल. कोणी मोबाइल कानाला लावून बसेल , कोणी त्याचा स्पीकर ऑन करून इतरांना ताप दे‍ईल, कोणी मोबाइलवर गेम खेळत बसेल, कोणी गप्पांचा फड रंगवतील. गप्पातले विषय सुद्धा भन्नाट असतील. क्रिकेट, राजकारण, मालिका, महागाई, भ्रष्टाचार, परराष्ट्र संबंध, शाळा व कॉलेजांची मनमानी व एकूणच शिक्षणाचे व्यापारीकरण, नव्या लोकल वेळापत्रकाकडून अपेक्षा, लोकलमधील वाढती गर्दी, अपडाउन करणार्या प्रवाशांमुळे निर्माण झालेले प्रश्न, स्थानिक व उपरे वाद या व अशा अनेक ज्वलंत समस्यांवर प्रत्येकाचे हटके मत असेल. कोणी वाद घालतील, कोणी वाद लावून आपण नामानिराळे राहतील, कोणी वाद सोडवायचा प्रयत्न करेल तर कोणी त्यात तेल ओतायचा ! कोणी टाळ कुटत भजने म्हणतील, कोणी रमीत रमतील, रमीत सुद्धा कोणी नॉक आऊट तर कोणी डावावर पैसे लावून खेळणारे असतील. कोणी पेपर वाचत बसेल, पेपर नसलेला कोणी दूसर्याचा पेपर विचारून वा न विचारताच वाचू लागेल, कोण पोथीचे पारायण सुरू करेल, कोण मुलांची क्रमिक पुस्तके काढून अभ्यासाला लागेल तर कोणी कादंबरी वाचेल. बसून प्रवास करणारे आणि उभ्याने प्रवास करणारे या दोन गटात शाब्दिक चकमकी झडत असतातच. अर्थात बसणार्यांत सुद्धा अश्वव्रती ( दूसर्यांना बसायला देणारे ) व गेंडाव्रती ( कधीही कोणालाही बसायला न देणारे ) हे प्रकार आहेतच. कोणी पास विसरलेले असतील, कोणाला आपला पास संपल्याचे गाडी सुरू झाल्यावरच आठवले असेल तर कोणी पुढचे स्टेशन कोणते या विवंचनेत असेल. आपले स्थानक आले की गाडी फलाटाला टच होताच उतरणारे असतात तर काही गाडी नीट थांबल्यावरच उतरणारे असतात. अर्थात उतरायला न जमलेले सुद्धा असतातच. फलाटावर उतरल्यावर कोणी सरळ बाहेरची वाट धरेल , कोणी बूटाला पॉलिश करून घे‍ईल, कोण पेपरच्या स्टॉलवर ताटकळेल तर कोणी रेल्वे कॅन्टीनच्या पांचट चहाचा घोट घशाखाली घालेल. कोणाची नजर टीसीला शोधत असेल. टीसीला गुंगारा देणारे असतात तसेच टीसीला संभ्रमात पाडणारे सुद्धा असतात, कोणी टीसीने पकडल्यावर बहाणा करणारे असतात, काही गुमान दंड भरून मोकळे होतात तर कोण पटवापटवीच्या मागे असतो.

रोजचा लोकल प्रवास जर रोज काही नवे शिकायचे आहे, अनुभवायचे आहे हे मनात ठेवून केला तर कधीच कंटाळवाणा होत नाही हे नक्की !

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

Your last line is perfect. Actually, many times, after office hours when you r tired, this daily local journey becomes really boring. Secondly, there is no alternative to this and we cannot avvoid this journey. But if you decide to learn something new, experience something new, it becomes really interesting. You can make friends, share your knowledge, listen to them and then this journey becomes real enjoyment.

Thanks for posting this article.

AA