२१ तारखेची आयपीएलची सेमी-फायनल मी बघितली, कौतुकाने त्याचे फोटो पिकासावर टाकले, अनेकांनी त्यांचे कवतिक सुद्धा केले पण काहींच्या पोटात सुद्धा दुखले असणारच ना ?( हा घ्या दुवा - http://picasaweb.google.com/ejmarathe/powQwE?feat=directlink ) एक साथ सगळ्या सरकारी यंत्रणा निनावी तक्रारींच्या आधारे या एकनाथाच्या मागे अगदी हात धूवून लागल्या आहेत ! तो मोदी राहीला बाजूलाच मलाच लटकवायचे उद्योग चालू आहेत.
आजच पोलिस कमिशनरच्या कार्यालयातुन पत्र आले आहे. सामन्याला कॅमेरा वा मोबाइल न्यायची बंदी असताना तुम्ही तो आता नेलाच कसा व फोटो काढलेच कसे , काढले तर काढले, वर ते पिकासावर टाकलेच कसे ? ७ दिवसात खुलासा द्यायचा आहे. तो खुलासा द्यायला बसलो एवढ्यात आयकर विभागाची नोटीस आली आहे, तुमच्या एवढया तुटपुंज्या पगारात पाच हजाराची दोन तिकिटे तुम्ही घेतलीतच कशी ? जर तुम्ही ती विकत घेतली असतील तर एवढे पैसे कोठून आणले ? मी तडकाफडकी मी ती तिकिटे विकत घेतली नव्हती तर मला फूकट मिळाली असा खुलासा केला. जरा श्वास मोकळा झाला असे वाटले तोच लाच-लुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी आले. सरकारी कर्मचारी असूनही एवढी भारी भेट तुम्ही घेतलीतच कशी ? करा खुलासा ! ती तिकिटे माझ्या साहेवांसाठी आली होती, त्यांच्याकडे आधीच १५००० ची चार तिकीटे असल्याने ती त्यांनी आम्हाला दिली हा खुलासा तर मला भलताच ताप देणारा ठरला आहे कारण आता सायबाची सुद्धा सीबीआय चौकशी चालू आहे. त्यांना ती तिकीटे देणारा कोण ? त्यांचे कोणते हीतसंबंध आहेत याचा सुद्धा तपास चालू झाला आहे म्हणे ! त्यात ती तिकिटे अंबानीच्या उद्योग समूहाने दिली होती असे कळेल तेव्हा तर ….. ! आता मी या हापिसात किती वर्षे आहे, कोणकोणत्या फायली मी हाताळल्या, कोण कोण मला भेटले याची डीटेल बातमी सरकारी यंत्रणांना हवी आहे. माझ्या सोबत काम करणारे सुद्धा या चौकशीच्या जाळ्यात ओढले गेले आहेत. माझ्यामुळे सायबावर बालंट येणार म्हणून त्याने सुद्धा माझ्या मागे खातेनिहाय चौकशीचा धडाका लावून दिला आहे ! पिकासावर हापिसच्या वेळात अल्बम लोड केल्याने हापिसच्या वेळात भलते उद्योग केले व कार्यालयीन यंत्रणेचा खाजगी वापर गेला हे आरोप तर सिद्ध होणारच आहेत ना ! त्यात मी कामाला मुंबई बंदरात असूनही माझ्याकडे एयरटेलचे खास रीलायन्स कर्मचार्यांना दिलेले सिम कार्ड कसे ? अनिल अंबानी समूहाच्या रीलायन्स कम्युनिकेशनचे समभाग माझ्याकडे कसे आले याचीही चौकशी चालू आहे ! थरूर आणि मोदी यांना twitter वर टीव टीव करायला मीच शिकवले असाही शक आहे !
काहींनी तर पुण्याच्या टीम प्रकरणी माझा काही संबंध आहे का याचाही शोध चालू केला आहे. मागच्या महीन्यात मी साहित्य संमेलनाला हजर राहण्यासाठी पुण्याला गेलो होतो पण तो नुसता बहाणा असावा, अंतस्थ हेतू वेगळाच असावा अशी सुद्धा चर्चा आहे. त्या दिवशी मी चितळ्यांच्या दोन किलो बाकरवड्या, १ किलो बालुशाही नेल्याचे तपास यंत्रणांना कळले आहे व त्याची पावती आता त्यांना हवी आहे ! चितळे जे बेसनाचे लाडू विकतात ते “मराठे होम फूडस” चे असतात असा संशय व्यक्त केला जात आहे. या व्यवहारातला मध्यस्थ कोण याचा पण तपास चालू आहे. चितळे यांचा संघ खरेदी प्रकरणात काही संबंध आहे का याचाही तपास चालू झाला आहे. चितळे नुसते नावाला आहेत, त्यांचा खरा बोलविता धनी मराठेच आहे अशी सुद्धा काहींची खात्री पटली आहे ! त्याही आधी काही महिने मी पुण्याच्या मित्रांना मस्तानी पाजली होती , त्या कार्यक्रमाला कोण कोण हजर होते याचाही तपास चालू झाला आहे. त्या वेळी मी कोणाकडे उतरलो होतो, कोणाकोणाला भेटलो होतो याची सुद्धा बित्तंबातमी तपास यंत्रणांनी काढली आहे.
हे कमी म्हणून की काय, आयसीसीची निकाल निश्चिती समिती सुद्धा माझ्या मागे लागली आहे. मोबाइल आत न्यायला मला कोणी मदत केली , बेकायदा मोबाइल मी आत घेउन गेलो तेव्हा मी कोणाकोणाला फोन केले, मला कोणाचे फोन आले होते, सचिन लवकर कसा बाद झाला, बाद झाल्यावर त्याने माझ्याकडे बघून बॅट का दाखविली, शिखर धवनने हातातला कॅच टाकला कसा ? सेट झालेला उथ्थपा बाद झाला त्या आधी मी स्टेडीयम बाहेर का गेलो होतो, सचिनचा मुलगा मला कसे ओळखतो, सचिनला शिव्या घालणारा मी , ब्लॉगवर त्याची तारीफ कशी करतो --- बाप रे बाप !
हा असा सरकारी चौकशीचा ससेमिरा लागला असतानाच घरच्या आघाडीवर सुद्धा काही शांतता नाहीच. हीच्या चौकशीचा जाच सरकारी यंत्रणांपेक्षा भयंकर आहे ! खरे तर मला दोन तिकिटे मिळाली आहेत, प्रसादला नेरूळला पाठवून दे असे मी फोन करून तिला सांगितले पण प्रसाद क्लासला गेल्याचे तिने सांगितले होते. मग मी मित्राला सोबत घेतले. दूसर्या षटकाच्या सुमारास माझे “दूर”दर्शन झाल्यावर तिचा आधी विश्वासच बसला नाही. अर्थात माझ्यावर कॅमेरा आहे हे माझ्या गावीही नव्हते, मागचा मुलगा “अंकल आप जायंट स्क्रीनपे दिखे थे” असे बोलला तेव्हा माझाही विश्वास बसला नव्हता. घरी गेल्या गेल्याच सौ.ने माझ्यावर बंपर आणि बीमरचा मारा सुरू केला ! स्लोवर वन आणि फास्टर वन मध्ये काही गुगली सुद्धा पेरले होते. त्याहुन कुंबळे आणि मलिंगाचे चेंडू खेळणे परवडले असते ! नक्की किती तिकिटे मिळाली होती ? नक्की कोणाला बरोबर नेले होतेत ? फोटोत मागे दिसते ती बाई कोण ? “तो” मुलगा कोणाचा ? भज्जीने मिसेस अंबानीला उचलून घेतले तेव्हा तुम्ही काय करत होतात ? स्टेडीयम रिकामे झाल्यावरसुद्धा तुम्ही आत काय करत होतात ? मी एवढे कॉल दिले त्यातला एकही का घेतला नाही ? रात्री एवढ्या उशीरा कसे घरी पोचलात ? याच्या आधी अशी तिकिटी किती वेळा मिळाली होती व तेव्हा सोबत कोणा-कोणाला नेले होते ?
झक मारली आणि मॅच बघितली असे झाले आहे ! बाय द वे – फायनलच्या चकटफू मिळालेल्या तिकटींचे काय बरे करायचे ?!!!!!
२ टिप्पण्या:
हाहाहा !
मस्त जमलाय लेख !
साहित्य संमेलनाला आला होतात तेंव्हा आपली भेट झाली होती.
याच कारणामुळे आजच सकाळी माझी सुद्धा २ तास चौकशी झाली. बरेच उलट सुलट प्रश्न खोदून खोदून विचारले मला.
कुठून बुद्धी झाली अन त्या दिवशी तुम्हाला भेटलो अस झालं मला.
टिप्पणी पोस्ट करा