गुरुवार, १ एप्रिल, २०१०

आयकर खात्यातील अत्याधुनिक संगणक !

काही दिवसांपासून नोकरदार करदात्यांना आयकर खात्याच्या नोटीसा पोस्टाने मिळत आहेत. त्या आधी परताव्याच्या आहेत असेच सर्व समजून चालले होते पण मग कळले की तो दंड आहे ! नोकरदारांचा कर त्यांच्या मालकांनी आधीच भरलेला असतो व रीटर्न म्हणजे नुसता उपचार असतो. कर्मचार्याकडून कापून घेतलेला कर मालकाने मुदतीत भरायचा असतो व ही सर्वस्वी त्याची जबाबदारी असते. अशा स्थितीत सरसकट नोटीसा बजावणे चूकच ! अनेकांनी नसती बलामत नको म्हणून हा दंड भरून सुद्धा टाकला आहे !

आता आयकर खात्याने खुलासा केला आहे की संगणकातल्या बग मुळे या नोटीसा बजावल्या गेल्या, यात खात्याची काहीही चूक नाही ! हा खुलासा गोलमाल तर आहेच पण धूळफेक करणारा आहे ! संगणक त्याला दिलेल्या सूचनांप्रमाणे धडाधड नोटीसा काढत सुद्धा असेल, पण त्या पाकिटात भरून , पोस्टाचा स्टॅम्प लावून थेट पत्राच्या पेटीत टाकण्याएवढा अद्ययावत नक्कीच नसावा ! जेव्हा लाखाने अशा नोटीसा निघत होत्या तेव्हा त्यातल्या निदान काही जरी नजरेखालून घातल्या असत्या , पडताळल्या असत्या तरी पुढचा अनर्थ टळला असता. संगणकाने सांगकाम्या प्रमाणे नोटीसा काढल्या पण आयकर खात्यातल्या बैलांनी त्या कोणतीही पडताळणी न करता पोस्ट केल्या व प्रामाणिक नोकरदार करदात्यांची झोप उडविली !

लाखो चूकीच्या नोटीसा धाडल्या गेल्या आहेत. आता एका नोटीसीमागे पाकिट, कागद, पोस्टेज पकडून निदान १० रूपये तरी खर्च झाले असणारच, वर ज्यांनी गुमान हे पैसे भरले आहेत त्यांना परतावा द्यावा लागणारच आहे. हा सर्व अनाठायी खर्च कोटीची वेस नक्कीच ओलांडेल. करदात्याला झालेला मनस्ताप सोडून द्या, अनाठायी झालेल्या करोडोंच्या खर्चाची वसूली कोणाकरून करणार ?

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

Thanks for posting this. I also got same kind of notice. First thought came to my mind was how come so many wrong notices were sent without checking the same. Not a single employee of that section bothered to check it.

AA