रविवार, ६ डिसेंबर, २००९

आंटीचे शेयर्स !

शेयर बाजाराचे मला ब‍‍र्यापेकी ज्ञान आहे हा अनेकांचा गैरसमज मी माझ्या परीने सुद्धा जोपासला आहे. न मागता सुद्धा मी लोकांना “शेयर की सोने” यावर कामावर लेक्चर झाडत असतो व खरेदी-विक्रीच्या टीप सुद्धा देत असतो. सुदैवाने त्या कोणी फारशा गांभीर्याने घेत नाहीत म्हणून गोदी कामगारांना मंदीची झळ तेवढी बसलेली नाही ! हल्ली बहुतेक समभागांचे सौदे डीमॅट स्वरूपात होतात व ज्यांच्याकडे ते फिजिकल (प्रमाणपत्र) स्वरूपात असतात असे लोक हमखास माझ्याकडे मार्गदर्शनाला येत असतात. कधी कधी हजार-दोन हजार बाजारात किंमत असलेल्या समभागासाठी ५०० रूपये वार्षिक फ़ी असलेले डीमॅट खाते उघडणे मूर्खपणाचेच असते व त्यातही ती व्यक्ती पुन्हा कधी समभाग घेणार सुद्धा नसते. अशावेळी ओळखीतला कोणीतरी मी पकडतो व १० % कमी भावात ते त्याला विकून मी तोड काढतो. मुंबई शेयर बाजारात फिजीकल शेयर्सचे व्यवहार होतात व त्यात सुद्धा बाजारभावापेक्षा १० % कमी भावाने व्यवहार होतो पण हल्ली हे सौदे रोडावले आहेत व असे समभाग विकणे खूपच खर्चिक , कटकटीचे हो‍उन बसले आहे.

असेच मी एकाला शेयरबाजारासंबंधी मार्गदर्शन देत असताना माझा सहकारी मित्र डिसोजाने ते ऐकले व त्याच्या आंटीचे शेयर विकून दे असे विनवले. मी होकार देताच दूसर्या दिवशी तो पेपरचे एक मोठे बाड घेउन आला. एक तास तो डोंगर पोखरल्यावर तिन शेयर हाती गवसले ! एल.आय.सी. हाउसिंग फायनान्स व हिंदूस्तान ऑइल एक्सप्लोरेशन चे प्रत्येकी १०० समभाग व कोलगेट चे १० समभाग. साधारण आठ महिन्यापुर्वी त्यांचे बाजारमूल्य होते ४०,००० रूपये. माझ्या वडाळ्याच्या ब्रोकरला फोन केला तेव्हा ते विकण्याबाबत तो काही फारसा उत्साही वाटला नाही. हल्ली असे सौदे फारसे होत नाहीत हे त्याने मला सांगितले. मी अगदीच गळ घातल्यावर समभाग हस्तांतरण अर्जावरच्या सह्या नोटरी वा तत्सम कोणाकडून तरी सत्यापित करून आण मग बघतो असे सांगितले. या वेळेपर्यंत ते समभाग कोणाच्या नावावर आहेत हे मी बघितलेच नव्हतो. एका पमाणपत्रावर आंटी व तिच्या मुलीचे नाव होते, दूसर्यावर आंटी व जावयाचे नाव होते व तिसर्यावर त्या तिघांची नावे बघून मी कपाळावर हातच मारला, त्यात जाव‍ई व मुलगी आता ऑस्ट्रेलियात सेटल झाले आहेत हे कळल्यावर मी त्यातुन सरळ अंग काढून घेतले. कारण या तिरपागड्यामुळे त्यांची सही सत्यापित कोण करणार हा प्रश्न होता व नावाचा क्रम वेगवेगळा असल्याने तिन वेगवेगळी खाती उघडावी लागणार होती.

नाराज हो‍उन डिसोजा सगळी प्रमाणपत्रे परत घेउन गेला. साधारण दोन महिने गेले. युपीए अधिक मजबुतीने परत सत्तेत आल्यामुळे बाजार सावरू लागला होता. ’ते’ शेयर सुद्धा जोरात चालले होते. एके दिवशी डिसोझा सांगू लागला की आंटीला पैशाची गरज आहे व एकजण ते सगळे शेयर तिला ३०,००० रोख देउन घ्यायला तयार झाला आहे. काय करू ? आंटीची एक मुलगी अपंग आहे व तिच्या उपचारासाठी पैसे हवेत असे समजले. तिचा जावई त्या दोघींना आपल्या बरोबर ऑस्ट्रेलियात न्यायला तयार आहे पण तिकडचे सरकार मुलगी अपंग असल्याने परवानगी देत नाही असेही समजले. मी सहज त्या शेयर्सचा बाजारभाव चेक केला व धक्काच बसला, कारण त्यांची किंमत चक्क ७०,००० रूपये झाली होती ! म्हणजे तिला मदत करण्याच्या नावाखाली “तो कोणीतरी” तिला फसवू पाहत होता ! यातुन कसा मार्ग काढायचा हेच सूचत नव्हते. कोणत्याही मार्गाने गेलो तरी वेळ लागणार होताच. मुख्य प्रश्न बाहेर स्थायिक झालेल्यांच्या सह्या सत्यापित कोण करून देणार हा होता. कारण सह्या जुळल्या नाहीत तर हस्तांतरण लटकलेच असते ! अचानक डिसोजकडून कळले की त्या तिघांचे संयुक्त खाते एकाच बँकेत आहे ! लगेच डोक्याला चालना मिळाली व एक ऍक्शन प्लान तयार झाला ! सगळे शेयर आंटीच्या एकाच नावावर हस्तांतरीत करून घ्यायचे , मग तिच्या एकटीच्या नावाने डीमॅट खाते उघडायचे, नावावर झालेले शेयर त्या खात्यात डीमॅट करून टाकायचे व मग बाजारात विकायचे ! हस्तांतरण अर्ज मी व्यवस्थित भरून दिले व सह्या कोठे करायच्या याच्या खुणा करून देउन पोस्टाने ऑस्ट्रेलियाला रवाना केले. त्यांना इमेल धाडून काय करणार आहे त्याची कल्पना दिली. अवघ्या पंधरा दिवसात त्यांची सही झालेले अर्ज पोस्टाने आले. आंटीला बँकेत पिटाळून त्या अर्जांवरच्या सह्या सत्यापित करून घेतल्या. मग बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शूल्क डकवायचे काम पार पाडले. मधल्या काळात त्या सर्व कंपन्यांचे समभाग नोंद ठेवणार्या एजंटाचे पत्ते काढले होतेच. दोन मुंबईतलेच होते व एक गुजरात, बडोदा येथील होता. गुजरातचा कुरीयरने रवाना केला व शिपायाला मुंबईच्या पत्त्यावर धाडले तेव्हा समजले की पॅन नंबरची प्रत जोडल्याशिवाय हस्तांतरण अर्ज स्वीकारले जात नाहीत. या नव्या नियमाची मला कल्पनाच नव्हती ! अर्थात त्यावर सुद्धा तोडगा निघालाच. जवळच असलेल्य युटीआय बँकेच्या कार्यालयात सगळे सोपस्कार पार पडल्यावर आंटीच्या नावाचे पॅन कार्ड सुद्धा मिळाले. मुंबईचे काम मार्गी लागले. गुजरातच्या एजंटला आधीच फोन करून पॅन कार्ड पाठवायची व्यवस्था करतो आहोत, जरा थांबा असे विनवले होतेच. पॅन कार्डची फोटोप्रत फ़ॅक्स करून पाठविल्यास सुद्धा अर्ज प्रोसेस करायची त्याने तयारी दाखविल्यावर काम अजून जलद झाले ! मधल्या काळात अजून एक चांगली घटना घडली. शेयरखानने त्यांच्या पोर्टलवरून ऑनलाइन शेयर खरेदी-विक्री करणार्यांना एक वर्ष मोफ़त डीमॅट खाते देउ केले होते ! लगेच आंटीच्या नावाने शेयरखान मध्ये ऑनलाइन खाते उघडले! पुढे आठवड्याच्या अंतराने काहीही अडथळा न येता सर्व समभाग आंटीच्या एकटीच्या नावे झाले व ते लगेच डीमॅट करण्यासाठी सादर केले ! बाजार सुद्धा चांगलाच वधारला होता. एल.आय.सी. ने २५० वरून ६०० ची पातळी गाठली होती. कोलगेट ४०० वरून ७०० झाला होता व हिंन्दुस्थान ऑईल एक्सप्लोरेशन रोज अपर सर्किटला भेदत ३५० वर स्थिरावला होता. म्हणजे अवघ्या चार पाच महीन्यात आंटीच्या ३०,००० रूपयाचे लाख रूपये झाले होते ! मी डिसोजाला सांगितले होते की ज्या दिवशी शेयर डीमॅट खात्यात येतील त्याच दिवशी विकायचे व तो सुद्धा तयार झाला होता. एल.आय.सी. जेव्हा खात्यात आला त्याच दिवशी १० % वाढला व ६८७ रूपयाला विकला सुद्धा गेला! पण थोड्याच वेळात तो तब्बल १५ रूपयानी घसरला व स्क्वेयर अप गेल्यास एका दिवसात १५०० रूपये मिळणार होते. पण डिसोजा त्याला तयार झाला नाही. केव्हा अगदी या झमेल्यातुन बाहेर पडतो असे त्याला झाले होते ! कोलगेट सुद्धा असाच डीमॅट हो‍उन खात्यात येताच ८०० रूपयाला विकला गेला . हिंन्दुस्थान ऑईल एक्सप्लोरेशन मात्र काही केल्या डीमॅट होत नव्हता. अनेक फोन करून सुद्धा दाद लागत नव्हती. दरम्यान हिंन्दुस्थान ऑईल एक्सप्लोरेशन ४०० रूपये या त्याच्या अत्युच्च पातळीला पोचला व हातात समभाग नसल्यामुळे आमची नुसती चडफड होत होती, त्यात आधी विकलेले एलाआयसी व कोलगेट अजून २०० व १०० रूपयाने वाढल्याने उगाच विकायची घाई केली असे डिसोजाला वाटत होते ! अनेक वेळा फोनाफोनी करून एकदाचा हिंन्दुस्थान ऑईल एक्सप्लोरेशन खात्यात आला त्याच दिवशी बाजार कोसळला व तो समभाग ३६० रूपयावर आला ! अर्थात आधी ठरल्याप्रमाणे मी तो विकायच्या तयारीत असतानाच डिसोजाने मला अडवले व अजून थांबूया असे सांगितले.

आधी विकलेल्या शेयरचे साधारण ७५,००० रूपये चेकने आंटीला मिळताच तिला धक्काच बसला ! आपल्याकडे असलेल्या कपट्यांना एवढे रूपये कसे मिळाले याचेच तिला आश्चर्य वाटत होते. डिसोजाला फोन करून तिने आभार मानण्यासाठी मला लाइनवर बोलावले, पण बराच वेळ तिला काही बोलताच आले नाही, शेवटी अतिशय कातर आवाजात “गॉड ब्लेस यू माय चाइल्ड” एवढेच ती बोलू शकली ! आता पर्यंत अनेकांची अनेक कामे केली पण एवढा मनसे आशीर्वाद मला कधीच मिळाला नव्हता ! मी सुद्धा मोहरून गेलो व उत्तर म्हणून बोलायला काही न सूचल्याने शेवटी नि:शब्दपणे फोन कट केला ! दूसर्याच दिवशी तिने स्वत: केक बनवून मला पाठवून दिला होता !

त्या दिवशी ३६० ला न विकलेला तो शेयर अजून १०० ने उतरला आहे व त्याचा भाव बघून डिसोजा, “ मराठे , तू सांगितल्याप्रमाणेच केले असते तर ? असे रोज विचारून मला उदास करतोच आहे. ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे ! घेतलेले शेयर पडतात, विकलेले शेयर अजून वाढतात व न विकलेले पडतात हा अनुभव मला तरी नवीन नाही ! तुमच्या नशीबात जे आहे तेच तुम्हाला मिळणार , अगदी एक पै सुद्धा कमी नाही की जास्त ! जिला शेयर म्हणजे काय ते माहीत नाही ती पाउण लाख मिळाल्याने भरून पावली व तिला अजून आपण मिळवून देउ शकलो असतो या विचाराने आम्ही मात्र कासावीस झालो आहोत ! कर्म की गति न्यारी बंधो ----- !

मंगळवार, १ डिसेंबर, २००९

इंडियन टाईम !

आधी कालमापनाचे तिनच प्रहर होते, मग तास, मिनिट, सेकंद व मायक्रो सेकंद इथपर्यंत अचूक वेळ आपण मोजू लागलो. पण नेमकी वेळ सांगता येणे व ती पाळणे यातली तफ़ावत मात्र वाढतच चालली आहे. उदंड जाहली घड्याळे अशी आज अवस्था आहे. प्रत्येकाच्या मनगटाला घड्याळ, मोबाईलमध्ये घड्याळ, ( त्यात तर अलार्म लावायची पण सोय) रेल्वे स्थानकावर घड्याळ, डेस्कटॉपवर घड्याळ…, पण वेळ दिली जाते , पाळली मात्र जात नाही. गेल्या अनेक वर्षात एखादा कार्यक्रम, सभा वेळेवर चालू झालेली मी पाहीलेली नाही. अगदी लग्न सुद्धा मुहुर्तावर लागत नाहीत ! दोन घड्याळे कधीही सारखी वेळ दाखवित नाहीत हे जरी मान्य केले तरी ५-१० मिनिटांचा उशीर शम्य आहे. त्या पेक्षा जास्त उशीर मला तरी खपत नाही. मी स्वत: वेळ पाळण्याबाबत काटेकोर आहे, दूसर्याने ती पाळावी अशी अपेक्षा बाळगणे रास्तच नाही का ? दिलेल्या वेळेच्या आधीच काही मिनिटे पोचायचा / हजर रहायचा माझा प्रयत्न असतो, पण तो हल्ली हास्यास्पद ठरू लागला आहे. मला काही कामधाम नसते म्हणून मी वेळेआधी पोचतो असे मित्र खुशाल सांगत सूटतात ! मला वेळ पाळायचे टेन्शन असते तर मला वेळ देणार्याला माझ्या वेळेआधीच येण्याच्या ’वाईट’ सवयीचे टेन्शन ! हल्ली मित्र मला वेळ देताना ती तासभर वाढवूनच सांगतात ! मुंबई सारख्या शहरात विविध अडथळ्यांमुळे उशीर होतो हे समजण्यासारखे आहे पण आता मोबाईल आहेत तर निदान तसे कळवायला तरी नको का ? पण नाही, ही साधी गोष्ट सुद्धा केली जात नाही !



मुलांचे शाळेतले संमेलन, पालक-सभा, सहली अशा कार्यक्रमात वेळ दिलेली असते. मी तिकडे १० मिनिटे आधी पोचतो, निदान शाळेत तरी वेळ पाळली जात असेल अशी भाबडी आशा मी आपला अजून बाळगून आहे ! पण हल्ली एका तासाचा विलंब गृहीतच धरलेला असतो. वेळेवर पोचणाराच हास्यास्पद ठरतो. सुरवात उशीराने होते म्हटल्यावर शेवटाला सुद्धा विलंब होणार हे ओघानेच आले. कार्यक्रम उशीरा सुरू होण्याची कारणे सांगायची तसदी सुद्धा कोणी घेत नाही आणि घेतलीच तर ती सगळी गोलमालच असतात. लोकसेवक एखाद्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून येणार असेल तर तो जेवढा उशीर ये‍ईल तेवढा तो मोठा असा एक समज आहे ! अशा कार्यक्रमाला मी तर हल्ली जातच नाही ! पण काही कार्यक्रम टाळता येत नाहीत तेव्हा त्यांना किती उशीर होणार याची अटकळ बांधत तिष्टत बसणेच आपल्या हाती असते !



संस्थाबाजी करणे हा तसा माझा पिंड नाही पण एकदा कसे ते ब्राह्मण सभा, नवीन पनवेलची स्थापना करायचे मनात आले. माझ्याच घरी समविचारी लोकांची सभा बोलावली. संध्याकाळी सहाची वेळ ठरली असताना लोक जेव्हा ७ च्या नंतर जमू लागले तेव्हाच खरे तर मी शहाणे व्ह्यायला हवे होते. एकदाची सभा पार पडली, उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाची तारीख ठरली व मग वेळ संध्याकाळची हवी असेही ठरले. पण मग पाच, सहा की सात या वर चर्चा फ़ारच रंगली ! शेवटी पत्रिकेत ६ म्हणायचे म्हणजे कार्यक्रम ७ वाजता सुरू होईल यावर एकमत झाले. इथे माझा सात्विक संताप उफाळून आला ! आपण ब्राह्मण सभा सुरू करतो आहोत तेव्हा आपला कार्यक्रम जी वेळ ठरवू त्या ठोक्यालाच सुरू झाला पाहिजे असा आग्रह धरला. अगदी कोणीही नसले तरी आपण ठरल्या वेळेलाचा दीप-प्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करायचाच असे मी सर्वाना बजावले. अर्थात प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या संध्याकाळी सहा या नियोजित वेळेला सभागृहात मी एकटाच होतो ! कार्यक्रम सुरू व्ह्यायला सात वाजले ! इथून आमच्या सभेने वेळेशी जो काडीमोड घेतला आहे तो अगदी आजतागायत ! अगदी दिवाळी पहाट सुद्धा सकाळी सुरू होते व काव्यसंध्या रात्री !



वेळ ना पाळणार्या लोकांची इतरांनी वेळ पाळली पाहिजे अशी अजब अपेक्षा असते. लोकल वेळेवर सूटली पाहिजे. पत्र वेळेत मिळाले पाहिजे, गुंतवणुकिवरचे व्याज निर्धारीत तारखेला खात्यात जमा झालेच पाहिजे, पगार १ तारखेला झालाच पाहिजे, शिंप्याने व धोब्याने कपडे वेळेत दिलेच पाहिजेत, रोजचा पेपर वेळेवर घरात पडलाच पाहिजे, कामवाल्या बाईने वेळ पाळलीच पाहिजे ! कार्यालयात जाताना उशीर झाल्याचे खापर मात्र लोकलवर फोडायचे पण परत यायची वेळ कटाक्षाने पाळायची ! लोकल उशीरा असल्याने उशीर झाला असे म्हणणारी माणसे सराईतपणे खोटे बोलत असतात. समजा लोकल दहा मिनिटे उशीराने धावत असतील आणि तुम्ही जर आपल्या ठरलेल्या वेळी स्थानकावर पोचला असाल तर आधीची लोकल तुम्हाला , जी उशीराने आलेली होती, ती तरी तुम्हाला मिळायला हवी होती ! मी २५ वर्षाहुन जास्त काळ लोकलकर आहे आणि उशीरा पोचण्याचे कारण अगदी ९९.९ % वेळेला लोकल नसते हे छातीठोकपणे सांगू शकतो ! वेळ न पाळण्याच्या सवयीचे खापर मात्र लोकलच्या माथी मारले जाते.



या देशात काय वेळेवर होते असे आता विचारायची वेळ आली आहे. प्रत्येक गोष्टीचे वेळा-पत्रक कोलमडले आहे. निवडणुका वेळी-अवेळी घेतल्या जातात, सरकारे आपली टर्म पुरी करीत नाहीत, कोणाची खुर्ची कधी जाईल हे सांगता येत नाही, परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीतच, ( एक मात्र बरे आहे की एकदा तारखेचा घोळ मिटला की पेपर मात्र ठरलेल्या वेळी होतात व वेळ संपताच हातातुन काढून घेतले जातात !) , त्यांचा निकाल सुद्धा वेळेत लावता येत नाही, मग प्रवेश प्रक्रीया सुद्धा वेळेत पुरी होत नाही, न्यायालये मुदतीत निकाल देत नाहीत, समन्स सुद्धा वेळेवर पोचत नाहीत ! सोसायटीच्या वार्षिक सभेची वेळ जवळ आली की सभासद बाहेर कलटी मारतात व सभा आटोपल्यावर एंट्री मारतात ( हे टायमिंग कसे बुवा जमते ?!) , फ़ाशी झालेला सुद्धा वेळेवर फ़ासावर चढत नाही, स्पीडपोस्ट ने पाठवलेले पत्र सुद्धा पाच दिवसाने पोचते ! जन्म झाल्याची बातमी बारशाला पोचते तर मेल्याची बातमी बाराव्याला ! तशी कोणतीच डिलीवरी हल्ली वेळेवर होत नाही म्हणा ! मागच्या आठवड्यात आमच्या कार्यालयाला जहाज मंत्रालयाकडून स्पीडपोस्टने तीन पत्रे आले, एकात एक माहिती तातडीने हवी होती, दूसर्यात ती माहीती अजून न मिळाल्याचे स्मरण करून दिले होते तर तिसर्यात चक्क दिलेल्या मुदतीत स्मरण करून देउन सुद्धा माहीती न दिल्यामुळे खुलासा मागितला होता, अर्थात तो खुलासा द्यायची सुद्धा मुदत टळून गेलेली होती ! हे सगळे मानव निर्मित झाले, आता निसर्ग सुद्धा वेळ पाळत नाही ! कोणाची वेळ कधी भरेल हे सांगता येत नाही ! नेमेचि येतो मग पावसाळा असे आता फ़क्त कवितेतच उरले आहे, आता तो वेळेवर येत नाहीच , वेळेवर जात पण नाही, सगळे ऋतूचक्रच बदलून गेले आहे. थंडीत उन्हाचा तडाखा, उन्हाळ्यात थंडी, थंडीत पावसाळा !



इंग्रजांचे / पाश्चात्यांचे नको ते अनेक गुण आपण घेतले पण वेळ पाळण्याचा गुण मात्र आपल्या अंगवळणी पडला नाही. आमच्या कार्यालयाला भेट देणारे विदेशी पाहुणे दिलेल्या वेळेच्या अगदी ठोक्याला अध्यक्षांच्या दालनात प्रवेश करतात. रस्ता माहीत नसेल तर त्यांचे कार्यालय सर्व माहीती आधीच घेउन ठेवते पण त्यांनी वेळ चुकविली असे माझ्या एकदाही पाहण्यात नाही ! माझ्या मित्राला कोणी किती वाजता भेटायचे असे विचारले तर त्याचे उत्तर असते पाच पर्यंत कधीही नाहीतर पाचच्या पुढे केव्हाही, वर, या अगदी निवांत अशी पुस्ती जोडली जाते ! अरे ही काय वेळ द्यायची पद्धत झाली का ?



वेळेवर या अशी हजारदा तंबी देउन सुद्धा एक मित्र(?) कार्यक्रमाला तब्बल एक तास उशीराने पोचला. त्याबद्दल दिलगिरी सोडाच, घड्याळ बघून तो बोलला की पोचलो की नाही अगदी वेळेवर ? अगदी इंडीयन टाईम, भारतीय प्रमाण-वेळ ! आता मात्र माझी तार सटकली ! उशीरा येता ते येता वर हीच भारतीय प्रमाणवेळ आहे असे वेशरमपणे म्हणता म्हणजे अगदी कहर झाला. स्वत:च्या गलथानपणाने वेळ पाळता येत नाही वर देशाला बदनाम करता ? या शब्दात मी त्याची हजेरी घेतली ! परीणाम मात्र अगदी उलटा झाला. वेळेचे भान पाळत नाही म्हणून कान-उघाडणी करणार्या मला स्थळ-काळ-वेळ याचे भान नाही व माझे जन्माला येण्याचे टायमिंग चूकलेले आहे यावर मात्र एकमत झाले !

साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक.

साने गुरूजी हे माझे स्वत:चे प्रेरणा स्थान आहे. लहानपणीच त्यांची पुस्तके वाचून त्यांच्या लेखनाचा व चरीत्राचा प्रभाव अगदी खोलवर ठसा उमटवून गेला आहे. काही दिवसापुर्वीच या स्मारकाला भेट दिली व संस्थेच्या माहीतीपत्रकातील माहिती आपल्या बरोबर शेयर करत आहे. या कार्याला आपला हातभार लागावा अशी कळकळीची विनंती.

वाटचाल

· पांडुरंग सदाशिव साने उर्फ़ साने गुरूजींच्या जन्मशताब्दी निमित्त १९९८ साली “साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट”ची स्थापना करण्यात आली.

· रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालुक्यातील पालगड येथील साने गुरूजींचे घर शासनाने ताब्यात घेउन ट्रस्टकडे हस्तांतरीत केले. त्या ठीकाणी “साने गुरूजी स्मृती भवन” उभारण्यात आले.

· पालगडपासून ५५ कि.मी. अंतरावरील वडघर, ता. माणगाव, जि. रायगड येथे ट्रस्टने ३६ एकर जमिन खरेदी करून “राष्ट्रीय स्मारक” उभारण्यात आले.

· पहिल्या टप्प्यामध्ये कॅम्पिंग सुविधा, डॉर्मेटरी, गेस्ट-हाउस इ. बांधकाम करण्यात आले.

· दुसर्या टप्प्यामध्ये “साने गुरूजी भवन” व “अनुवाद सुविधा केंद्र” उभारण्यात येत आहे.

· तिसर्या टप्प्यामध्ये “आंतरभारती भवन” व ऍम्फ़ी थिएटर” यांचा समावेश आहे.

· स्मारक उभारणीमध्ये विद्यार्थांचा प्रमुख सहभाग आहे. ७० हजार विद्यार्थ्यांनी ६० लाख रूपयांचा निधी जमवून दिला.

उपक्रम

· शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिरे, “प्रेरणाप्रबोधन शिविर”, एन.एस.एस. ची कॉलेज विद्यार्थ्यांची शिबिरे व विद्यार्थ्यांच्या सहली.

· याशिवाय येथे अनेक संघटनांची व संस्थाची शिबिरे, मेळावे होतात. संस्थेतर्फे प्रतिवर्षी हितचिंतक व कार्यकर्त्यांचा मित्र मेळावा घेण्यात येतो.

· “स्वाधार” च्या सहकार्याने पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले जाते.

· परिवर्तन मुंबई या संस्थेच्या सहकार्याने पंचक्रोशीतील गावकर्यांच्या क्रिडा स्पर्धा घेण्यात येतात.

· दरवर्षी मे महिन्यात “युवा श्रम संस्कार छावणी” शिबिर घेण्यात येते.

आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र

भारतीय भाषांमध्ये आदान-प्रदान घडविण्याचा “आंतरभारती” हा उप्रक्रम राबविणे हे राष्ट्रीय स्मारकाचे दुसरे उद्दीष्ट आहे. त्या साठी “अनुवाद सुविधा केंद्राची” स्थापन करण्यात आली आहे. या ठीकाणी अनुवादासाठी आवश्यक शब्दकोश व अन्य पुस्तके असलेले ग्रंथालय आहे. अनुवादकांच्या निवासाची व भोजनाची सोय आहे. या केंद्राच्या वतीने अनुवाद कार्यशाळा, विंदा करंदीकर यांच्या देणगीतुन बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार, वासंती गंगाधर गाडगीळ अनुवाद अभ्यासवृत्ती, जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या देणगीतुन पुस्तके अनुवादित करण्यात येत आहेत. अनुवादाला वाहिलेल्या “मायमावशी” षणमासिकाचे प्रकाशन हा आणखी एक उपक्रम आहे.

राष्ट्रीय स्मारकातर्फे दर दोन वर्षानी “आंतरभारती साहित्य संवाद” चे आयोजन करण्यात येते. जानेवारी २००९ मध्ये चवथे “साहित्य संवाद” संमेलन “गुरूदेव टागोर तौलनिक साहित्याध्यासन” मुंबई विद्यापीठ, यांच्या सहकार्याने पार पडले.

स्मारक परिसर व सुविधा

Ø स्मारकाची जागा मुंबई-गोवा महामार्ग व कोकण रेल्वेच्या गोरेगाव रोड व माणगाव स्टेशनच्या जवळ आहे.

Ø ३६ एकराचा हा निसर्गरम्य परिसर डोंगरउतार, कालवा, नदी, विहीर, जैविक उद्यान शंभराहून अधिक प्रकारची झाडे, विविध पक्षी यांनी सम्पन्न आहे.

Ø स्मारकामध्ये राहुटी निवास, डॉर्मेटरी, गेस्ट-हाउसेस, कॉमन व्हरांडा, स्वच्छतागृहे, भोजनगृहे, खेळाचे मैदान, खुले सभागृह, नेचर ट्रेल अशी परिपुर्ण व्यवस्था आहे.

आवाहन

विद्यार्थ्यांना संस्कारीत करणारा, तरूणाईला साद घालणारा, आंतरभारती उपक्रमातुन समाजाला जोडू पाहणारा हा प्रकल्प. साने गुरूजींपासून समाजसेवेची प्रेरणा घेतलेल्या तरूणांच्या पुढाकारातून गेल्या दहा वर्षात उभा राहिला. समाज आणि शासनानेही त्याला भरभरून प्रतिसाद दिला. असेही घडू शकते हा अनुभव दिलासा देणारा आहे.

स्मारकाच्या पुढच्या वाटचालीत आपली साथ हवी, आपण हक्काने इथे यावे, रहावे आणि आपलेच काम समजून आर्थिक सहकार्यही करावे.

देणगी धनादेश “साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट” या नावाने काढावा.

(देणग्यांना कलम ८० जी आयकर सवलत मिळेल)

राष्ट्रीय स्मारक – वडघर, पो. गोरेगाव, ता. माणगाव, जिल्हा – रायगड

दूरध्वनी क्रमांक – ०२१४०-२५०७९५, ०२१४०-२५०२०५

स्मृती भवन - पालगड, ता. दापोली, जि. रत्नागिरी

कार्यालय साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट (रजि. नं. ई/१७८८४, मुंबई)

म्युनिसिपल मराठी शाळा क्र.२, पहिला माळा, खोली क्र. ३२,

पोर्तुगीज चर्च जवळ, गोखले रोड(द), दादर(पश्चिम), मुंबई – ४०००२८

फ़ोन नंबर ०२२-२४३०७९१७

वेब साइट – aantarbharati.org

इमेल – antarbharati_ask@yahoo.co.in