मंगळवार, १ डिसेंबर, २००९

इंडियन टाईम !

आधी कालमापनाचे तिनच प्रहर होते, मग तास, मिनिट, सेकंद व मायक्रो सेकंद इथपर्यंत अचूक वेळ आपण मोजू लागलो. पण नेमकी वेळ सांगता येणे व ती पाळणे यातली तफ़ावत मात्र वाढतच चालली आहे. उदंड जाहली घड्याळे अशी आज अवस्था आहे. प्रत्येकाच्या मनगटाला घड्याळ, मोबाईलमध्ये घड्याळ, ( त्यात तर अलार्म लावायची पण सोय) रेल्वे स्थानकावर घड्याळ, डेस्कटॉपवर घड्याळ…, पण वेळ दिली जाते , पाळली मात्र जात नाही. गेल्या अनेक वर्षात एखादा कार्यक्रम, सभा वेळेवर चालू झालेली मी पाहीलेली नाही. अगदी लग्न सुद्धा मुहुर्तावर लागत नाहीत ! दोन घड्याळे कधीही सारखी वेळ दाखवित नाहीत हे जरी मान्य केले तरी ५-१० मिनिटांचा उशीर शम्य आहे. त्या पेक्षा जास्त उशीर मला तरी खपत नाही. मी स्वत: वेळ पाळण्याबाबत काटेकोर आहे, दूसर्याने ती पाळावी अशी अपेक्षा बाळगणे रास्तच नाही का ? दिलेल्या वेळेच्या आधीच काही मिनिटे पोचायचा / हजर रहायचा माझा प्रयत्न असतो, पण तो हल्ली हास्यास्पद ठरू लागला आहे. मला काही कामधाम नसते म्हणून मी वेळेआधी पोचतो असे मित्र खुशाल सांगत सूटतात ! मला वेळ पाळायचे टेन्शन असते तर मला वेळ देणार्याला माझ्या वेळेआधीच येण्याच्या ’वाईट’ सवयीचे टेन्शन ! हल्ली मित्र मला वेळ देताना ती तासभर वाढवूनच सांगतात ! मुंबई सारख्या शहरात विविध अडथळ्यांमुळे उशीर होतो हे समजण्यासारखे आहे पण आता मोबाईल आहेत तर निदान तसे कळवायला तरी नको का ? पण नाही, ही साधी गोष्ट सुद्धा केली जात नाही !



मुलांचे शाळेतले संमेलन, पालक-सभा, सहली अशा कार्यक्रमात वेळ दिलेली असते. मी तिकडे १० मिनिटे आधी पोचतो, निदान शाळेत तरी वेळ पाळली जात असेल अशी भाबडी आशा मी आपला अजून बाळगून आहे ! पण हल्ली एका तासाचा विलंब गृहीतच धरलेला असतो. वेळेवर पोचणाराच हास्यास्पद ठरतो. सुरवात उशीराने होते म्हटल्यावर शेवटाला सुद्धा विलंब होणार हे ओघानेच आले. कार्यक्रम उशीरा सुरू होण्याची कारणे सांगायची तसदी सुद्धा कोणी घेत नाही आणि घेतलीच तर ती सगळी गोलमालच असतात. लोकसेवक एखाद्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून येणार असेल तर तो जेवढा उशीर ये‍ईल तेवढा तो मोठा असा एक समज आहे ! अशा कार्यक्रमाला मी तर हल्ली जातच नाही ! पण काही कार्यक्रम टाळता येत नाहीत तेव्हा त्यांना किती उशीर होणार याची अटकळ बांधत तिष्टत बसणेच आपल्या हाती असते !



संस्थाबाजी करणे हा तसा माझा पिंड नाही पण एकदा कसे ते ब्राह्मण सभा, नवीन पनवेलची स्थापना करायचे मनात आले. माझ्याच घरी समविचारी लोकांची सभा बोलावली. संध्याकाळी सहाची वेळ ठरली असताना लोक जेव्हा ७ च्या नंतर जमू लागले तेव्हाच खरे तर मी शहाणे व्ह्यायला हवे होते. एकदाची सभा पार पडली, उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाची तारीख ठरली व मग वेळ संध्याकाळची हवी असेही ठरले. पण मग पाच, सहा की सात या वर चर्चा फ़ारच रंगली ! शेवटी पत्रिकेत ६ म्हणायचे म्हणजे कार्यक्रम ७ वाजता सुरू होईल यावर एकमत झाले. इथे माझा सात्विक संताप उफाळून आला ! आपण ब्राह्मण सभा सुरू करतो आहोत तेव्हा आपला कार्यक्रम जी वेळ ठरवू त्या ठोक्यालाच सुरू झाला पाहिजे असा आग्रह धरला. अगदी कोणीही नसले तरी आपण ठरल्या वेळेलाचा दीप-प्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करायचाच असे मी सर्वाना बजावले. अर्थात प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या संध्याकाळी सहा या नियोजित वेळेला सभागृहात मी एकटाच होतो ! कार्यक्रम सुरू व्ह्यायला सात वाजले ! इथून आमच्या सभेने वेळेशी जो काडीमोड घेतला आहे तो अगदी आजतागायत ! अगदी दिवाळी पहाट सुद्धा सकाळी सुरू होते व काव्यसंध्या रात्री !



वेळ ना पाळणार्या लोकांची इतरांनी वेळ पाळली पाहिजे अशी अजब अपेक्षा असते. लोकल वेळेवर सूटली पाहिजे. पत्र वेळेत मिळाले पाहिजे, गुंतवणुकिवरचे व्याज निर्धारीत तारखेला खात्यात जमा झालेच पाहिजे, पगार १ तारखेला झालाच पाहिजे, शिंप्याने व धोब्याने कपडे वेळेत दिलेच पाहिजेत, रोजचा पेपर वेळेवर घरात पडलाच पाहिजे, कामवाल्या बाईने वेळ पाळलीच पाहिजे ! कार्यालयात जाताना उशीर झाल्याचे खापर मात्र लोकलवर फोडायचे पण परत यायची वेळ कटाक्षाने पाळायची ! लोकल उशीरा असल्याने उशीर झाला असे म्हणणारी माणसे सराईतपणे खोटे बोलत असतात. समजा लोकल दहा मिनिटे उशीराने धावत असतील आणि तुम्ही जर आपल्या ठरलेल्या वेळी स्थानकावर पोचला असाल तर आधीची लोकल तुम्हाला , जी उशीराने आलेली होती, ती तरी तुम्हाला मिळायला हवी होती ! मी २५ वर्षाहुन जास्त काळ लोकलकर आहे आणि उशीरा पोचण्याचे कारण अगदी ९९.९ % वेळेला लोकल नसते हे छातीठोकपणे सांगू शकतो ! वेळ न पाळण्याच्या सवयीचे खापर मात्र लोकलच्या माथी मारले जाते.



या देशात काय वेळेवर होते असे आता विचारायची वेळ आली आहे. प्रत्येक गोष्टीचे वेळा-पत्रक कोलमडले आहे. निवडणुका वेळी-अवेळी घेतल्या जातात, सरकारे आपली टर्म पुरी करीत नाहीत, कोणाची खुर्ची कधी जाईल हे सांगता येत नाही, परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीतच, ( एक मात्र बरे आहे की एकदा तारखेचा घोळ मिटला की पेपर मात्र ठरलेल्या वेळी होतात व वेळ संपताच हातातुन काढून घेतले जातात !) , त्यांचा निकाल सुद्धा वेळेत लावता येत नाही, मग प्रवेश प्रक्रीया सुद्धा वेळेत पुरी होत नाही, न्यायालये मुदतीत निकाल देत नाहीत, समन्स सुद्धा वेळेवर पोचत नाहीत ! सोसायटीच्या वार्षिक सभेची वेळ जवळ आली की सभासद बाहेर कलटी मारतात व सभा आटोपल्यावर एंट्री मारतात ( हे टायमिंग कसे बुवा जमते ?!) , फ़ाशी झालेला सुद्धा वेळेवर फ़ासावर चढत नाही, स्पीडपोस्ट ने पाठवलेले पत्र सुद्धा पाच दिवसाने पोचते ! जन्म झाल्याची बातमी बारशाला पोचते तर मेल्याची बातमी बाराव्याला ! तशी कोणतीच डिलीवरी हल्ली वेळेवर होत नाही म्हणा ! मागच्या आठवड्यात आमच्या कार्यालयाला जहाज मंत्रालयाकडून स्पीडपोस्टने तीन पत्रे आले, एकात एक माहिती तातडीने हवी होती, दूसर्यात ती माहीती अजून न मिळाल्याचे स्मरण करून दिले होते तर तिसर्यात चक्क दिलेल्या मुदतीत स्मरण करून देउन सुद्धा माहीती न दिल्यामुळे खुलासा मागितला होता, अर्थात तो खुलासा द्यायची सुद्धा मुदत टळून गेलेली होती ! हे सगळे मानव निर्मित झाले, आता निसर्ग सुद्धा वेळ पाळत नाही ! कोणाची वेळ कधी भरेल हे सांगता येत नाही ! नेमेचि येतो मग पावसाळा असे आता फ़क्त कवितेतच उरले आहे, आता तो वेळेवर येत नाहीच , वेळेवर जात पण नाही, सगळे ऋतूचक्रच बदलून गेले आहे. थंडीत उन्हाचा तडाखा, उन्हाळ्यात थंडी, थंडीत पावसाळा !



इंग्रजांचे / पाश्चात्यांचे नको ते अनेक गुण आपण घेतले पण वेळ पाळण्याचा गुण मात्र आपल्या अंगवळणी पडला नाही. आमच्या कार्यालयाला भेट देणारे विदेशी पाहुणे दिलेल्या वेळेच्या अगदी ठोक्याला अध्यक्षांच्या दालनात प्रवेश करतात. रस्ता माहीत नसेल तर त्यांचे कार्यालय सर्व माहीती आधीच घेउन ठेवते पण त्यांनी वेळ चुकविली असे माझ्या एकदाही पाहण्यात नाही ! माझ्या मित्राला कोणी किती वाजता भेटायचे असे विचारले तर त्याचे उत्तर असते पाच पर्यंत कधीही नाहीतर पाचच्या पुढे केव्हाही, वर, या अगदी निवांत अशी पुस्ती जोडली जाते ! अरे ही काय वेळ द्यायची पद्धत झाली का ?



वेळेवर या अशी हजारदा तंबी देउन सुद्धा एक मित्र(?) कार्यक्रमाला तब्बल एक तास उशीराने पोचला. त्याबद्दल दिलगिरी सोडाच, घड्याळ बघून तो बोलला की पोचलो की नाही अगदी वेळेवर ? अगदी इंडीयन टाईम, भारतीय प्रमाण-वेळ ! आता मात्र माझी तार सटकली ! उशीरा येता ते येता वर हीच भारतीय प्रमाणवेळ आहे असे वेशरमपणे म्हणता म्हणजे अगदी कहर झाला. स्वत:च्या गलथानपणाने वेळ पाळता येत नाही वर देशाला बदनाम करता ? या शब्दात मी त्याची हजेरी घेतली ! परीणाम मात्र अगदी उलटा झाला. वेळेचे भान पाळत नाही म्हणून कान-उघाडणी करणार्या मला स्थळ-काळ-वेळ याचे भान नाही व माझे जन्माला येण्याचे टायमिंग चूकलेले आहे यावर मात्र एकमत झाले !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: