बाबा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बाबा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १२ सप्टेंबर, २००९

गीतेकडे आता तरी पाठ करू नका ! ती पाठ करा !!

श्रीमदभवत्‌गीता ! आपला धर्मग्रंथ. पण त्याची प्रत सुद्धा आपल्या घरात नसते , तर तो वाचला असायची व पाठ करायची बातच सोडा ! गीता पाठ करण्यापेक्षा तिच्याकडे पाठ करणेच अनेकांना सोपे वाटते. गीता पाठ करून तसा व्यवहारात काहीच उपयोग नसतो. नोकरी शोधताना अतिरीक्त पात्रता म्हणून ”गीता पाठ आहे” ला काहीही किंमत नाही. माझे वडील गेली ४० वर्षे गीता प्रसाराचे काम अव्याहतपणे करीत आहेत. त्या साठी त्यांनी “स्पष्ट आचार, स्पष्ट विचार, स्पष्ट उच्चार, प्रचार” ही चतू:सूत्री समोर ठेउन सुगीता मंडळाची स्थापना केली. दर रविवारी सकाळी आमच्या घरी ३०-४० मुले गीता शिकण्यासाठी येत. आम्ही चार भावंडे त्यात असायचोच. गीता शिकण्यापेक्षा त्यानंतर मिळणारा लाडू हाच तेव्हा जास्त जिव्हाळ्याचा असायचा. दर वर्षी गीता जयंतीला काहीतरी कार्यक्रम असतो. गीता पाठांतर, वाचन अशा स्पर्धा सुद्धा होत असतात. मुख्य म्हणजे यासाठी बाबांनी कधी कोणा कडून फ़ूटकी पै सुद्धा घेतली नाही ! गीतेचा प्रचार व्हावा म्हणून दरवर्षी गीता प्रेस गोरखपुरच्या गिरगाव कार्यालयात जाउन ते गीतेवरील उत्तमोत्तम साहित्य घेउन येतात व त्याचे अगदी फ़ूकट वाटप करतात. बाबांनी गीतेवर अनेक प्रवचने, किर्तने दिलेली आहेत. आणीबाणीचा अंमल चालू असताना, बाबांची एका देवळात गीतेवर प्रवचने होती. बाबांच्या बोलण्याने सरकारचा रोष ओढवेल व तुरूंगात जावे लागेल या भयाने आईची तेव्हा झोप उडाली होती. किर्तनाला मला ते सोबत घेउन जात पण परत मी आपल्या पायाने क्वचितच आलो असेन ! बाबा घरी जेव्हा मला गीता शिकवायचा प्रयत्न करायचे तेव्हा हमखास मला जांभई यायची. गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता ! पण बाबा गीता कोळून प्यायलेले, कर्म करत राहण्यावर त्यांचा विश्वास, फ़लाची अपेक्षा कशाला ?

गीता शिका असे म्हटल्यावर पहिला प्रश्न येतो, त्याने मला काय मिळेल ? या प्रश्नाचे उत्तर बाबांकडे नसायचे. अगदी अलिकडे ते त्यावर “संडासला जाउन आल्यावर तुम्हाला काय मिळते ?” असा उलट प्रश्न विचारत पण अचानक गीता फ़ाऊंडेशनच्या गीता पाठांतर परीक्षा योजनेची त्यांना माहिती मिळाली. गीता संपूर्ण पाठ म्हणून दाखविणार्याला स्वत: श्रुंगेरीचे शंकराचार्य रोख २१,००० रूपये व प्रशस्तिपत्र देउन गौरव करतात ! ही बातमी त्यांनी बहुतेक मराठी वृत्तपत्रांना पाठवली व बहुतेकांनी ती खूप त्रोटक स्वरूपात छापली. एका कार्यक्रमात कोणा वक्त्याकडून मला ही योजना कळली व ती राबवणारे श्री. आपटे गुरूजी यांचा फ़ोन नंबर सुद्धा मिळाला. मी स्वत: त्यांच्याशी बोलून या योजनेची माहिती घेतली. त्यांनी मला पत्रक सुद्धा पाठवून दिले. ती योजना आपल्या समोर मांडत आहे.

शाळा/कॉलेजातील मुला-मुलींसाठीची योजना

१) गीतेतील कोणताही एक अध्याय स्वच्छ, शुद्ध व बिनचूक पाठ म्हणणार्या विद्यार्थ्यास जागच्या जागी २५० रूपये रोख बक्षिस दिले जाईल. ( त्यांच्याशी बोलताना त्यांनी खुलासा केला आहे की निव्वळ १२ वा, १५ वा अध्याय म्हणणार्याला बक्षिस मिळणार नाही, त्या जोडीने दूसरा कोणताही अध्याय म्हणावा लागेल, कारण हे दोन्ही अध्याय खूप लहान आहेत व अनेकांचे ते अनेक कारणांनी पाठ सुद्धा असतात.) एका अध्यायला २५० रूपयाचे रोख बक्षिस !

२) पाठांतराऐवजी एखाद्याने अध्यायाचे स्वच्छ, शुद्ध व बिनचूक वाचन केल्यास त्याला जागच्या जागी १०० रूपये रोख बक्षिस दिले जाईल. एका अध्यायला १०० रूपयाचे रोख बक्षिस !

३) कोणीही पुढाकार घेउन (शाळा / कॉलेज / संस्था / व्यक्ती ) किमान ४०-५० जणांचा गट तयार करून या स्पर्धेचे आयोजन करू शकतो.

४) जून ते नोव्हेंबर या काळात दोन वेळा ही स्पर्धा घेतली जाईल.

५) तुमच्या सोयीच्या ठीकाणी स्पर्धेचे आयोजन करता ये़ईल.

६) कोणतीही प्रवेश फ़ी नाही. गट तयार झाल्यावर फ़क्त संस्थेला फ़ोन करा, परीक्षक स्वत:च्या खर्चाने ठरवलेल्या स्थळी हजर राहतील.

मोठ्यांसाठी – गीता संपूर्ण पाठ असलेला कोणीही खालील पत्त्यावर संपर्क साधून अधिक माहिती घेउ शकतो. संपूर्ण गीता पाठ म्हणून दाखविणार्याला स्वत: शंकराचार्य २१,००० रूपयाचे रोख इनाम व प्रशस्तिपत्रक देउन गौरवतिल ! जरी पहीले सहा अध्याय पाठ म्हणता आले तरी ५००० रूपयाचे रोख इनाम मिळेल. शाळा - कॉलेजातला कोणीही संपूर्ण गीता पाठ असेल तर १८ गुणिले २५० असे ४,५०० बक्षिस घेउन शंकाराचार्यांकडून सुद्धा २१,००० चे इनाम घ्यायला पात्र असेल !

या स्पर्धेसाठी पू. जगत्‌गुरू शंकाराचार्य शारदापीठा शृंगेरी यांचे आशीर्वाद व प्रेरणा आहे. मुला-मुलीने आपले शिक्षण स्वावलंबनाने करावे ही दृष्टी सुद्धा याच्या पाठी आहेच. अधिक माहिती साठी येथे संपर्क साधावा;

श्री. आपटे गुरूजी

गीता फ़ाऊंडेशन,

चैतज्ञ, लोकमान्य सोसायटी, पंढरपूर रोड , मिरज – ४१६ ४१०.

फ़ोन नंबर – ०२३३ – २२३२०८२ , मोबाईल ०९८६००३२०८२.

geetafoundation@gmail.com

चला तर, गीता पाठ करायला लागा !

गुरुवार, ३ सप्टेंबर, २००९

शंकर दिग्विजयाचे अग्रलेखांच्या बादशहाकडून अनोखे कौतुक !


माझ्या वडिलांनी विद्यारण्यविरचित शंकर दिग्विजय या संस्कृत काव्य ग्रंथाचे मराठीत भावांतर केले आहे. त्याची माहिती मी तुम्हाला आधी दिलेली आहेच.

वेगळ्या विषयावरचे पुस्तक असल्याने वितरक त्याला हात सुद्धा लावणार नाहीत हा आमचा कयास खराच ठरला. तसे हा ग्रंथ थेट पद्धतीनेच वितरीत करायचा व तो सुद्धा कोणाला भीड न पडता हे आधीच ठरवले होते. कोणीही तो भीडेखातर न घेणेच चांगले. जाणकारांच्या घरीच त्याचे योग्य स्थान आहे. या ग्रंथाची प्रेस नोट मी महाराष्ट्रात प्रसिद्ध होणार्या तब्बल ११ दैनिकांना पाठवली होती. चार ओळींची ही प्रेस नोट फ़क्त प्रहार व लोकमत ने छापली ! पुस्तकावर यथायोग्य परिक्षण लिहावे म्हणून सर्व संबंधिताना त्याची प्रत भेट म्हणून पाठवलि होती पण त्याची पोच सुद्धा कोणी दिली नाही. आणि अचानक नवाकाळच्या संपादकांनी स्वत: वडीलांच्या घरी फ़ोन करून उद्याचा अग्रलेख वाचा, तुमच्या ग्रंथावरच लिहेलेला आहे, असे शुभ वर्तमान दिले ! एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तुमच्या ग्रंथाचे छापील ५०० रूपयाचे मुल्य मी तुम्हाला बक्षिस म्हणून देणार आहे असेही घोषित केले ! माझ्या मते एखाद्या ग्रंथावर अग्रलेख लिहायचा प्रसंग विरळाच व तो बहुमान माझ्या वडीलांना मिळाला !

३१ ऑगस्टच्या नवाकाळमध्ये, आद्य शंकराचार्यांच्या रंगीत छायाचित्रासह पहिल्या पानवर छापलेला अग्रलेख दिसताच आम्ही सगळॆ हरखूनच गेलो. विरारला अंक सकाळी ९ च्या पुढे मिळतो, मला स्वत:ला अंक सीएसटीला मिळेपर्यंत १० वाजले ! पण विरारचा फ़ोन मात्र सकाळी ६ वाजल्यापासूनच अखंड खणखणत होता ! माझी १२ वर्षाची पुतणी, तिच्या नावानेच (’सानिका प्रकाशन’) ग्रंथ प्रकाशित झाला आहे, फ़ोनजवळच बसून होती, अगदी पुढचे २ दिवस ! त्या दिवसात तब्बल १०० पेक्षा जास्त प्रतींची विक्री झाली ! घरी येउनच तीसएक प्रती दर्दी वाचक घेउन गेले ! अनेक पुस्तक विक्रेते, अगदी दादरचा आयडीयल बुक डेपो सुद्धा, प्रती पाठवुन द्या म्हणून आर्जवाने सांगत होते ! पुस्तक विक्रीतुन फ़ायदा कमवायचा हेतु नव्हताच, तेव्हा शंकाराचार्यांचे सगळेच साहित्य माय मराठीत आणण्याचा वडीलांचा संकल्प दृढ झाला आहे. आता छोटीशी जाहिरात मोहीम सुद्धा राबवायचा विचार चालु आहे.

नवाकाळशी तसा आमचा घरोब्याचा संबंध आहे. वडील तब्बल १६ वर्षे नवाकाळ-संध्याकाळ साठी राशी-भविष्य लिहित होते. त्यांच्या खुशखुषीत लेखन शैलीवर वाचक फ़िदा होते व ते वाचण्यासाठी लोकांच्या उड्या पडत. वडीलांचे बोट धरून मी सुद्धा अनेकवेळा नवाकाळमध्ये जात असे. भाउंनी कधीतरी पाठीवर धपाटा सुद्धा मारला असेल तर कधी गाल ओढले असतील ! अर्थात या जवळकीतुन मी आमच्या कॉलेजातील मराठी. वाङय मंडळाचा वृत्तांत छापायला दिला होता. नवाकाळने तो कौतुकाने छापला होता व कॉलेजमध्ये प्राचार्यांनी कौतुक केल्याने माझी जी घौडदौड चालु आहे ती अगदी आजतागायत ! नवाकाळकारांना लाख लाख धन्यवाद ! तुम्ही आम्हाला कायमचे ऋणी करून ठेवले आहे !

मित्रांनो तुमचा प्रतिसाद सुद्धा हुरूप वाढवणारच आहे, धन्यवाद ! कृपया आपल्या भागातील ग्रंथालयाचा नाव, पत्ता, फ़ोन नंबर कळवत रहावा ही मात्र कळकळीची विनंती !

कळावे लोभ आहेच, तो उत्तरोत्तर वृद्धींगत व्हावा ही बिनती !!

शनिवार, १८ जुलै, २००९

आद्य शंकराचार्यांवरील ग्रंथ – श्रीशंकर दिग्विजय – मराठी अनुवाद.

वैदिक धर्माचे पुनर्जीवन करणार्या आद्य शंकराचार्यांबद्दल दुर्दैवाने आज फ़ारच थोड्या लोकांना माहीती आहे. मराठीत त्यांच्यावर फ़ारशी पुस्तके / ग्रंथ पण उपलब्ध नाहीत. आठव्या शतकात हिंदू धर्मात बजबजपुरी माजून अनेक पंथाचा, त्यात काही अघोरी सुद्धा होते, उदय झाला होता. बौद्धांचे आक्रमण सुद्धा जबरदस्त होते. चार्वाकादी चंगळवादी विचारसरणी लोकांना जवळची वाटू लागली होती. सर्वत्र अनागोंदी माजली होती. आपल्याच पंथाच्या वाढीसाठी भरपूर रक्‍तपात सुद्धा होत होता.

अशा काळात शंकराचार्यांचा अवतार झाला. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीच संन्यास घेउन शंकराचार्य आसेतु-हिमाचल फ़िरले. विविध पंथाच्या आचार्यांना वाद-विवादात जिंकून त्यांनी त्यांना आपले शिष्य बनवले व वैदीक धर्माची मुहुर्तमेढ पुन्हा रोवली. देशाच्या चार भागात चार धर्मपीठांची स्थापना करून आचार्य परंपरा निर्माण केली, जी आजतागायत चालू आहे. समन्वयाची भूमिका स्वीकारून त्यांनी विविध पंथात चाललेला भीषण रक्‍तपात थांबवला.

अवतार कार्य संपल्यावर, वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी त्यांनी समाधि (कैलासारोहण) घेतली. शंकराचार्यांचा हा जीवन प्रवास अलौकिक असाच आहे. त्यांना मिळालेली जगत्‌गुरू ही पदवी सार्थच आहे.

नंतर १३ व्या शतकात शृंगेरी पीठाचे शंकराचार्य श्री. विद्यारण्य तीर्थ, जे विजयनगर साम्राज्याचे मंत्री सुद्धा होते, आद्य शंकाराचार्यांचा हा विजय श्लोकबद्ध केला. शंकर दिग्विजय या संस्कृत ग्रंथात एकूण १६ सर्ग असून त्यात शंकराचार्यांच्या जन्माआधीची स्थिती ते सर्वज्ञानपीठाधिरोहणा पर्यंतचा सगळा प्रवास अतिशय ओघवत्या, रसाळ भाषेत आला आहे.

माझे वडील आद्य शंकराचार्यांच्या जन्मगावी (केरळ मधील कालडी ) गेले असताना, या ग्रंथाचे हिंदी भाषांतर त्यांना मिळाले. ती प्रत साधारण ७० वर्षापुर्वीची होती ! बाबांनी एका दमात हा सगळा ग्रंथ वाचून काढला व याचे मराठी भाषांतर करण्याचा ध्यासच घेतला. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी अवघ्या एक-महीन्यात, दिवस-रात्र बसून त्यांनी हे कार्य तडीस नेले ! एकूण १६४३ संस्कृत श्लोकांचे त्यांनी ओघवत्या मराठीत भाषांतर केले आहे. ६०-७० वर्षापुर्वी खिळ्याच्या सहाय्याने छपाई होत असे. अनेक संस्कृत श्लोक छपाईतील दोषामुळे नीट लागत नव्ह्ते. संस्कृतचा वडीलांचा व्यासंग दांडगा असल्याने ते सर्व श्लोक त्यांनी निर्दोष करून घेतले आहेत व ही आवृत्ति निर्दोष अशीच आहे, तरीही जाणकाराने चूक दाखवून दिल्यास पुढील आवृत्तित त्याची दखल नक्की घेतली जाईल. अर्थात एवढ्यावरच काम संपणार नव्हते. याची डीटीपी करणे सुद्धा तेवढेच किचकट काम होते. आचार्य कृपेनेच , डोंबिवलीचे संस्कृत अभ्यासक व अनेक धार्मिक ग्रंथाचे लेखक श्री. मुकुंद जोग यांनी हे काम आपल्या शीरावर घेउन अगदी थोड्या वेळात पार पाडले. पुढे पुस्तकाच्या निर्दोष छपाईची जबाबदारीसुद्धा त्यांनीच पार पाडली !

आद्य शंकाराचार्यांवरील मराठीतील अशा प्रकारचा हा पहीलाच व दुर्मिळ ग्रंथराज सादर करताना आम्हा सर्वानाच एक अनोखा आनंद होत आहे. ग्रंथाच्या निर्मितीत आम्ही कोणतीही तडजोड केलेली नाही. मजबूत बांधणी, आकर्षक मुखपृष्ठ, उच्च दर्जाचा पेपर व छपाई, अनोख्या बुकमार्कसह हा ५८० पानांचा ग्रंथ सजला आहे. सोबत प्लास्टीकचे आवरण सुद्धा आहे. ग्रंथाला श्री. मुकुंद जोग यांचीच प्रस्तावना आहे. संस्कृतची आवड, अभ्यास असलेल्यांसाठी, शंकराचार्यांच्या भक्तांसाठी, वैदिक धर्माच्या अभ्यासकांना हा ग्रंथ म्हणजे एक मेजवानीच आहे. खरेतर स्वत:ला हिंदू समजणार्या प्रत्येकाच्या घरी हा ग्रंथ हवाच हवा !

ग्रंथाची दर्शनी किंमत जरी ५०० रूपये असली तरी थेट विक्री योजनेत आम्ही हा ग्रंथ अवघ्या ३०० रूपयात उपलब्ध करून देत आहोत, थेट घरपोच ! साधारणपणे वितरक ३० ते ४० % कमिशन मागतात, तेव्हा थेट वाचकालाच परवडणार्या दरात विकायची आमची योजना आहे, अर्थात ३०० रूपये ही किमत पोस्टेज धरूनच आहे ! पुस्तक विक्रेते वा इतर कोणीही ग्रंथ प्रसारक पाचशे रूपयापर्यंत ग्रंथ विकू शकतात. या ग्रंथाच्या निर्मितीवर साधारण १,२५,००० रूपये खर्च आला आहे. शंकराचार्यांवरील निस्सिम भक्‍तीपोटीच वडीलांनी वयाच्या पाउणशेवाव्या वर्षी हे साहस केले आहे. यातुन काही लाभ झाल्यास अशाच प्रकारच्या ग्रंथसेवेत तो घातला जाईल हे निश्चित.

हा ग्रंथ महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रंथालयात उपलब्ध व्हावा अशीही इच्छा आहे. आपल्या भागातल्या ग्रंथालयांचे पत्ते मला कळवल्यास त्यांच्याशी संपर्क साधणे सोपे जाईल व या मदतीबद्दल मी आपला सदैव ऋणी राहीन.

ज्यांना कोणाला हा ग्रंथ संग्रही हवाच असे वाटत असेल त्यांना खालीलपैकी कोणताही पर्याय निवडता येइल ;

१) मनी-ऑर्डर, ड्राफ़्ट, मुंबईत देय असलेला लोकल चेक - अनुजा एकनाथ मराठे या नावाने - आपल्या संपूर्ण पत्त्यासह खालील पत्यावर पाठवावा.

२) जर आपले आयसीआयसीआय बँकेत खाते असेल वा इंटरनेट बँकिंग

सुविधा असलेले खाते असल्यास आपण खालील खात्यात पैसे जमा करून आपले नाव व पत्ता मला इमेलने कळवू शकता.

आयसीआयसीआय बँक A/C :- 0032 01 013132 दादर, पूनमवाडी शाखा.

३) जर आपण हार्बर लाइनवर रहात असाल तर मला फ़ोन करून आपल्या सोयीची वेळ

कळवल्यास मी प्रत घेउन आपल्या घरी स्वत: पोचती करीन.

पैसे मिळाल्यावर साधारण पणे एका आठवड्यात ग्रंथ आपल्याला घरपोच केला जाईल.

ज्यांना या ग्रंथाचे वितरण करायचे असेल त्यांनी कृपया मोबाईल वा इमेल द्वारे संपर्क साधावा. माझा पत्ता व मोबाईल, इमेल आयडी तसेच घरचा दूरध्वनी क्रमांक खाली दिलेला आहे.

जसा जसा वेळ मिळत जाईल, मी यातला वेचक भाग वाचकांसाठी माझ्या ब्लॉग वर देत जाईन.

श्री. एकनाथ जनार्दन मराठे

A/३०१, हरी-प्रेम ,भूखंड क्र.१३५/१३६,प्रभाग ४, नवीन पनवेल (पुर्व) ४१०२०६

Mobile Number +919869710424

Residential Number +91 22 27483287

इमेल - ejmarathe@gmail.com

शनिवार, १३ डिसेंबर, २००८

निर्मळचे शंकराचार्य.

काही वर्षापुर्वी कोल्हापुरच्या शांकरपीठाचे शंकाराचार्य श्रीमत शंकर विद्याभारती हे वस‌ई परीसरात चार दिवस पाद्यपूजेसाठी आले होते. विरारचे सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. वामनराव सामंत (आप्पा सामंत) यांनी विश्व हिंदू परीषदेच्या वतीने त्यांचा दौरा आयोजित केला होता. या दौर्यात माझे वडील ज.गो. मराठे हे त्याच्या बरोबर चार दिवस होते. ज्या ज्या ठीकाणी त्यांचा सत्कार झाला त्या त्या ठीकाणी त्यांनी श्रीमत दासबोधाबद्दल माहीती दे‌उन, तो विषेशत: तरूणानी वाचावा असा प्रचार केला. त्यांच्या सोबत विश्व हिदू परीषदेचे एक प्रसिद्ध कार्यकर्ते होते. त्या प्रवासात त्यानी निर्मळ क्षेत्राच्या शंकराचार्यांबद्दल माहीती विचारली. तेव्हा, गाडीमध्येच त्यांनी त्या बद्दलची सविस्तर माहीती त्यांना ऐकवली. पुढे त्यांनी ती शब्दबद्ध करून त्यांना दाखवली व ही माहीती शंकराचार्यांच्या पीठाने प्रसिद्ध करावी यासाठी पीठाकडे पाठवली. या सबंधीची पुस्तके पीठाने प्रसिद्ध केल्यास तीला अधिकृतता ये‌इल असा त्या मागचा हेतू होता.
वस‌ईचे एक सुप्रसिद्ध इतिहास संशोधक श्री. रा.बा.जोशी त्यांना त्याची एक प्रत दिली. पुढे या संबधी काही हालचाल झाली नाही. मग शंकराचार्य यांनी ती माहीती खालील प्रमाणे दिली होती ती अशी,
शृंगेरी पीठाचे शंकराचार्य विद्यारण्य स्वामी, हे पीठावर असताना, त्यांच्या वृद्धापकाळात आपला उत्तराधिकारी म्हणून श्री गोसावी यांची नियुक्ती केली. त्या नंतर गुरूची आज्ञेने तीर्थ यात्रेसाठी निघाले. हिमालयातील यात्रा करून झाल्यावर ते , हिमालयातील ज्या गुहेत आद्य शंकराचार्यांनी प्रवेष केला होता, त्या गुहेजवळ आले आणि त्यांना त्या गुहेत प्रवेष करण्याची प्रेरणा झाली. त्यांनी आपल्या बरोबरच्या अंतेवासींना काही मुदत दे‌उन , तेवढ्या काळात मी आलो नाही तर आपण परत जा अशी आज्ञा दिली. दिलेल्या वेळेपर्यंत वाट पाहुन ते शिष्य परत शृंगेरीला गेले आणि त्यांनी हा वृतांत पीठस्थ विद्यारण्य स्वामीना सांगितला. विद्यारण्या स्वामीची प्रकृती खालावत चालली होती व अधिकृत घोषणा झालेले शंकराचार्य उपस्थित नाहीत असे पाहुन त्यांनी दुसर्या एका शिष्याची निवड केली व ते पुढे शंकाराचार्य झाले. पुढे गोसावी हिमालयातून निघाले व थोडयाच काळात शृगेरीजवळ आले. त्या वेळी त्यांना शृगेरी पीठावर शंकराचार्यांची निवड झाली आहे असे कळेले. तेव्हा शृगेरीला न जाता कोल्हापुरच्या जवळच असलेल्या () एका ठीकाणी आपली स्वतंत्र गादी स्थापन केली. आणि त्या पीठामधून धर्मप्रचाराची सुरवात केली. आणि त्याचीच एक उप-पीठ म्हणून कोल्हापुरचा शांकरमठाची स्थापना झाली. शंकराचार्य गोसावी फ़िरत फ़िरत वस‌ईच्या निर्मळ क्षेत्री आले व तिथेच त्यांनी समाधि घेतली. त्या टेकडीवर फ़ार मोठे जंगल वाढले. पुढे पेशव्यांनी वस‌ईची मोहीम यशस्वी केल्यानंतर ही जागा, साफ़सफ़ा‌ई करताना सापडली. पुढे ती जागा आद्य-शंकराचार्यांची समाधि म्हणून प्रसिद्धीला आली. पेशव्यांनी त्यानंतर त्या ठीकाणी आज असलेले मंदीर बांधून पूजा-अर्चेची व्यवस्था केली. आज हे निर्मळ क्षेत्र, आद्य शंकराचार्यांचे समाधिस्थळ म्हणून मानले जाते. आता विश्व हिंदू परीषदेने, प्रतिवर्षी होत असलेल्या यात्रेला विषेश रूप दिले आहे. ही समाधि आद्य शंकराचार्यांची नसूनही तसे सांगितले जाते, त्याचे कारण, शृगेरी पीठाचे नियुक्त शंकराचार्य ही हिमालयातील आद्य शंकराचार्यांच्या गुहेतुन आले असल्यामुळे तसा प्रवाद निर्माण झाला. अजून एक समज असा आहे की शंकराचार्यांना एक शाप होता की तुझी समाधि कंटकवनात हो‌ईल. योगायोगाने या परीसरात काटेरी झुडपे वाढलेली होती त्या मुळॆही या समजाला बळकटी मिळाली. या संबंधात अधिक संशोधनाची गरज आहे. आपली धर्मपीठे या सबंधात कमालीची उदासीनता दाखवतात हे ही आपल्या लक्षात येते.

मराठे चौथर्याचे रहस्य.

हिंदू समाजातील ब्राह्मणवर्गाची उपासना ही मुख्यत: वेदाधीष्ठीत अशी होती. किंबुहना ’वर्णानां ब्राह्मणो गुरू:’, म्हणजे सर्व वर्णात ब्राह्मण हा गुरूस्थानी होता. निरनिराळ्या कालखंडात समाजात अनेक स्थित्यंतरे झाली. परीणामत: ब्राह्मणवर्गाचाही अध:पात झाला. त्याच्या उपजीवनाचे साधन म्हणून असेलेल ज्ञानदान आणि आपतकालीना भीक्षा वृत्ती या सुद्धा धोक्यात आल्या. अशावेळी समाजातील सामान्य माणसाप्रमाणे त्याला आपला जीवन निर्वाह करावा लागला. अति दूर अंतरावर ग्रामीण जीवनापासून वेगळा राहुन जगणार ब्राह्मण राजाश्रयाअभावी ग्रामीण जीवनात येउ लागला. साहजिकच त्याला त्या समाजाशी जवळीक ठेवण्यासाठी त्यांच्या उपासना पद्धती अपरीहार्य पणे स्वीकाराव्या लागल्या. या संबंधात, समर्थानी, दासबोधात ही व्यथा व्यक्त केली आहे. ’ब्राह्मणास ग्रामीणीने बुडविले, अन्न मिळेन ऐसे झाले, आपुल्या प्रचीतीस आले किंवा नाही असे विचारून ते म्हणतात , ’आम्हीही तेचि ब्राह्मण, वडील गेले ग्रामीणी करून , आम्हा भोवते’

अशाच एका कालखंडात, ब्राह्मणांनी आप्ले नित्यकर्म करत असता, आपल्या उपासनेला, ग्रामीण देव-देवतांची, उपासना जोडून घेतली. अति प्राचीन काळी, कुलदेवता नावाची देवता होती की नाही हा संशोधनाचा विषय आहे. या संबंधात, एक ज्येष्ठ विचारवंत असे म्हणतात की ब्राह्मणांना गायत्रीशिवाय अन्य कोणत्याही देवतेची गरज नाही. गायत्रीचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळॆ आजही शोडश संस्कारापैकी उपनयन म्हणजे मुंज आणि विवाह हे दोनच संस्कार तग धरून राहीले आहेत. वास्तविक ते तसे अर्थहीन झाले आहेत. आज केल्या जाणार्या उपासनांना वैदीकांची शास्त्रनिष्ठ ज्ञानाची चौकट राहीलेली नाही. आजचा समाज स्वार्थासाठी कुणाचेही नामस्मरण करून मुह मे राम और बगल मे छुरी असा व्यवहार करताना दिसतो.

कुलस्वामीनी संबंधीच्या अज्ञानामुळे कुलाच्या उत्कर्षास बाधा येते असे आजकाल सर्वत्र मानले जाते. आजच्या काळातही, प्रत्येक हिंदू आपली कुलस्वामिनी आणि कुलदेव यांचे स्मरण ठेवतो वत्याची नित्यनैमित्तिक पूजा-अर्चा करीत असतो. अर्थात यातुन ब्राह्मणही सूटलेला नाही. आजही एखाद्या मंगल कार्याच्या आरंभी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून , विडा-सुपारी ठेवावी लागते. असे असले तरी, आजही, कितीतरी ब्राह्मण कुलाना आपल्या कुलदेवतेचे विस्मरण झाले आहे.

अशा स्थितीत मराठे कुलवृत्तांतात कोकणस्थांच्या अनेक कुलस्वामिनी दिलेल्या आहेत. त्यात प्रत्येक कुलाची कुलस्वामिनी वेगळीही दिलेली आहे. कपिकुलामध्ये एकूण एकोणपन्नास कुले ज्ञात आहेत. त्या पैकी आमच्या मराठेकुळाची कुलस्वामिनी कोण हे निश्चित माहीत नव्हते. ते ज्ञान व्हावे म्हणून मी कुलस्वामिनीचा बोध व्हावा म्हणून एका वि्शिष्ट पद्धतीने देवतेला उपासना करून या संबंधि मार्गदर्शन मिळावे अशी प्रार्थना केली. परीणामत: थोड्याच काळात स्वप्न व अन्य दृष्टांताने मला माझ्या कुलस्वामिनीचा बोध झाला. या प्रसंगात, एका विशिष्ट क्षणी कृपाछत्र ही कविता मला स्फ़ुरली. ती कृपाछत्र या कविता संग्रहात दिली आहे.

श्रावण महीन्यातील सकाळची आठ-साडे आठची वेळ. मेट्रो सिनेमाकडून मी धोबीतलावच्या रस्त्याने जात असता, रीमझीम पाउस पडत होता, एक दहा-बार वर्षाची मुलगी हातात लेडीज छत्री घेउन येत असताना समोर दिसली. तिला पहाताच, कृपाछत्र ही कविता स्फ़ुरली ती अशी,

कृपा-छत्र गे उघडी शिरी ते
मिटूनी असे का धरीसी करी ते ॥धृ॥
कमल-नेत्र तव बघण्या आई
धावत आलो करूनी घाई
परी मीटसी का कमलनेत्र ते
खाली करीसी अन अभय कराते ॥१॥
दूर बहू मी तुजला सोडून
गेलो आई नावही विसरून
अंगाराची वृष्टी वरती
त्रिविध तापी या त्रेधा उडाते ॥२॥
तूच ठेविले नाव मुलाला
तुलाच का गे विसरच पडला
पोटापाठी वणवण फ़िरता
कसे आठवू तव नामा ते ॥३॥
पाठी घालशिल ना गे माते
विसरून माझ्या अपराधाते
करूणा धन ती हसते म्हणते
’पहा वरी रे छत्र शिरी ते” ॥४॥


कुलस्वामिनीचा बोध झाल्यावर त्या स्थानास जाण्याच्या उद्देशाने ए्के दिवशी, मी राजापुरवरून आडीवर्याच्या दिशने प्रयाण केले. तिथे गेल्यावर मी, महाकाली देवस्थानात गेलो आणि देवीचे दर्शन घेतले. नवीनच असल्यामुळे मला काहीच माहीती नव्हती. जवळपास विशेष घरेही नाहीत. म्हणून चौकशी केल्यावर थोड्या दूर अंतरावर काही ब्राह्मणांची घरे आहेत असे कळले. सहज ज्यांच्याकडे मी गेलो, ते श्री. रानडे, महाकालीचे नैवैद्य अधिकारी होते. त्यांनी मला थोडी माहीती दिली आणि अभिषेक आणि महाप्रसाद अशी सेवा करता येइल असे सांगितले. दूसर्या दिवशी त्यांनी त्या दोन्हीही गोष्टी पुर्या करून मला देवीचा महाप्रसाद व तीचा फ़ोटो दिला. थोडीशी विश्रांती घेउन मी माझ्या घरी आलो आणि देवीच्या फ़ोटोची देवघरात स्थापना करून तीचे नित्यस्मरण करू लागलो. परीणामत: माझ्या मार्गातील अनेक अडचणी हळूहळू कमी होत गेल्या. अनुभव आल्यामुळे माझी देवीवरीला श्रद्धा वाढली. मी नवरात्रानिमित्त पतिवर्षी काही पैसे देवस्थानाकडे सेवेसाठी पाठवू लागलो. मध्यंतरीच्या काळात तिथे माझे काहीवेळा सह्कुटुंब जाणेही झाले. या सर्व घडामोडी तिथे एक गोष्ट मला सतत रहस्यमय वाटत राहीली. ती म्हणजे तिथे दाखवला जाणारा ’मराठ्यांचा चौथरा’. प्रत्यक्ष पाहीले तर हा चौथरा आज एखाद्या मोठ्या वाड्याच्या चौथर्यासारखा दिसतो, परंतु या गावात एकही मराठे आडणावाच्या व्यक्तीचे घर नाही. अशा स्थितीत, एक जिज्ञानासा म्हणून मी हा प्रश्न, अनेक मान्यवर व्यक्तींसमोर उपस्थित केला. परंतु याबाबतीत कोणीही बोलण्याचे धैर्यही दाखवत नाही. प्रसिद्ध गायिका, अनुराधा मराठे या, मराठ्यांच्या कुलवृत्तातील ३४ व्या घराण्याच्या आहेत, त्यांच्याशी पत्रव्यवहार केला पण उत्तर मिळाले नाही.

अधिक चौकशीत असे लक्षात आले की मराठे जवळच्या एका गावी रहायला गेले. त्यांच्याशी संपर्क साधल्यास यावर काही प्रकाश पडू शकेल. या एकाकी प्रयत्नात मला अपेक्षित यश आले नाही. देवस्थानांच्या इतिहासातील काही तज्ञ व्यक्तींची ’कोकणातील देवस्थाने’ अशा अर्थाचे पुस्तक लिहीले आहे. पण त्यात सुद्धा ही माहीती मिळत नाही. जिज्ञासूंनी लक्ष घालून माहीती उपलब्ध करावी.