शनिवार, १२ सप्टेंबर, २००९

गीतेकडे आता तरी पाठ करू नका ! ती पाठ करा !!

श्रीमदभवत्‌गीता ! आपला धर्मग्रंथ. पण त्याची प्रत सुद्धा आपल्या घरात नसते , तर तो वाचला असायची व पाठ करायची बातच सोडा ! गीता पाठ करण्यापेक्षा तिच्याकडे पाठ करणेच अनेकांना सोपे वाटते. गीता पाठ करून तसा व्यवहारात काहीच उपयोग नसतो. नोकरी शोधताना अतिरीक्त पात्रता म्हणून ”गीता पाठ आहे” ला काहीही किंमत नाही. माझे वडील गेली ४० वर्षे गीता प्रसाराचे काम अव्याहतपणे करीत आहेत. त्या साठी त्यांनी “स्पष्ट आचार, स्पष्ट विचार, स्पष्ट उच्चार, प्रचार” ही चतू:सूत्री समोर ठेउन सुगीता मंडळाची स्थापना केली. दर रविवारी सकाळी आमच्या घरी ३०-४० मुले गीता शिकण्यासाठी येत. आम्ही चार भावंडे त्यात असायचोच. गीता शिकण्यापेक्षा त्यानंतर मिळणारा लाडू हाच तेव्हा जास्त जिव्हाळ्याचा असायचा. दर वर्षी गीता जयंतीला काहीतरी कार्यक्रम असतो. गीता पाठांतर, वाचन अशा स्पर्धा सुद्धा होत असतात. मुख्य म्हणजे यासाठी बाबांनी कधी कोणा कडून फ़ूटकी पै सुद्धा घेतली नाही ! गीतेचा प्रचार व्हावा म्हणून दरवर्षी गीता प्रेस गोरखपुरच्या गिरगाव कार्यालयात जाउन ते गीतेवरील उत्तमोत्तम साहित्य घेउन येतात व त्याचे अगदी फ़ूकट वाटप करतात. बाबांनी गीतेवर अनेक प्रवचने, किर्तने दिलेली आहेत. आणीबाणीचा अंमल चालू असताना, बाबांची एका देवळात गीतेवर प्रवचने होती. बाबांच्या बोलण्याने सरकारचा रोष ओढवेल व तुरूंगात जावे लागेल या भयाने आईची तेव्हा झोप उडाली होती. किर्तनाला मला ते सोबत घेउन जात पण परत मी आपल्या पायाने क्वचितच आलो असेन ! बाबा घरी जेव्हा मला गीता शिकवायचा प्रयत्न करायचे तेव्हा हमखास मला जांभई यायची. गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता ! पण बाबा गीता कोळून प्यायलेले, कर्म करत राहण्यावर त्यांचा विश्वास, फ़लाची अपेक्षा कशाला ?

गीता शिका असे म्हटल्यावर पहिला प्रश्न येतो, त्याने मला काय मिळेल ? या प्रश्नाचे उत्तर बाबांकडे नसायचे. अगदी अलिकडे ते त्यावर “संडासला जाउन आल्यावर तुम्हाला काय मिळते ?” असा उलट प्रश्न विचारत पण अचानक गीता फ़ाऊंडेशनच्या गीता पाठांतर परीक्षा योजनेची त्यांना माहिती मिळाली. गीता संपूर्ण पाठ म्हणून दाखविणार्याला स्वत: श्रुंगेरीचे शंकराचार्य रोख २१,००० रूपये व प्रशस्तिपत्र देउन गौरव करतात ! ही बातमी त्यांनी बहुतेक मराठी वृत्तपत्रांना पाठवली व बहुतेकांनी ती खूप त्रोटक स्वरूपात छापली. एका कार्यक्रमात कोणा वक्त्याकडून मला ही योजना कळली व ती राबवणारे श्री. आपटे गुरूजी यांचा फ़ोन नंबर सुद्धा मिळाला. मी स्वत: त्यांच्याशी बोलून या योजनेची माहिती घेतली. त्यांनी मला पत्रक सुद्धा पाठवून दिले. ती योजना आपल्या समोर मांडत आहे.

शाळा/कॉलेजातील मुला-मुलींसाठीची योजना

१) गीतेतील कोणताही एक अध्याय स्वच्छ, शुद्ध व बिनचूक पाठ म्हणणार्या विद्यार्थ्यास जागच्या जागी २५० रूपये रोख बक्षिस दिले जाईल. ( त्यांच्याशी बोलताना त्यांनी खुलासा केला आहे की निव्वळ १२ वा, १५ वा अध्याय म्हणणार्याला बक्षिस मिळणार नाही, त्या जोडीने दूसरा कोणताही अध्याय म्हणावा लागेल, कारण हे दोन्ही अध्याय खूप लहान आहेत व अनेकांचे ते अनेक कारणांनी पाठ सुद्धा असतात.) एका अध्यायला २५० रूपयाचे रोख बक्षिस !

२) पाठांतराऐवजी एखाद्याने अध्यायाचे स्वच्छ, शुद्ध व बिनचूक वाचन केल्यास त्याला जागच्या जागी १०० रूपये रोख बक्षिस दिले जाईल. एका अध्यायला १०० रूपयाचे रोख बक्षिस !

३) कोणीही पुढाकार घेउन (शाळा / कॉलेज / संस्था / व्यक्ती ) किमान ४०-५० जणांचा गट तयार करून या स्पर्धेचे आयोजन करू शकतो.

४) जून ते नोव्हेंबर या काळात दोन वेळा ही स्पर्धा घेतली जाईल.

५) तुमच्या सोयीच्या ठीकाणी स्पर्धेचे आयोजन करता ये़ईल.

६) कोणतीही प्रवेश फ़ी नाही. गट तयार झाल्यावर फ़क्त संस्थेला फ़ोन करा, परीक्षक स्वत:च्या खर्चाने ठरवलेल्या स्थळी हजर राहतील.

मोठ्यांसाठी – गीता संपूर्ण पाठ असलेला कोणीही खालील पत्त्यावर संपर्क साधून अधिक माहिती घेउ शकतो. संपूर्ण गीता पाठ म्हणून दाखविणार्याला स्वत: शंकराचार्य २१,००० रूपयाचे रोख इनाम व प्रशस्तिपत्रक देउन गौरवतिल ! जरी पहीले सहा अध्याय पाठ म्हणता आले तरी ५००० रूपयाचे रोख इनाम मिळेल. शाळा - कॉलेजातला कोणीही संपूर्ण गीता पाठ असेल तर १८ गुणिले २५० असे ४,५०० बक्षिस घेउन शंकाराचार्यांकडून सुद्धा २१,००० चे इनाम घ्यायला पात्र असेल !

या स्पर्धेसाठी पू. जगत्‌गुरू शंकाराचार्य शारदापीठा शृंगेरी यांचे आशीर्वाद व प्रेरणा आहे. मुला-मुलीने आपले शिक्षण स्वावलंबनाने करावे ही दृष्टी सुद्धा याच्या पाठी आहेच. अधिक माहिती साठी येथे संपर्क साधावा;

श्री. आपटे गुरूजी

गीता फ़ाऊंडेशन,

चैतज्ञ, लोकमान्य सोसायटी, पंढरपूर रोड , मिरज – ४१६ ४१०.

फ़ोन नंबर – ०२३३ – २२३२०८२ , मोबाईल ०९८६००३२०८२.

geetafoundation@gmail.com

चला तर, गीता पाठ करायला लागा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: