शनिवार, २६ सप्टेंबर, २००९

…. तो येक मुर्ख !

समर्थांनी ३०० वर्षापुर्वी दासबोध या अलौकिक ग्रंथाचे रचना केली. याच ग्रंथात त्यांनी मुर्खांची यच्चयावत लक्षणे एका वेगळ्या समासात दिली आहेत. ती वाचून हसूही येते आणि अंतर्मुखही व्हायला होते. यात समर्थानी “दूसर्यास म्हणे मुर्ख तो येक मुर्ख” असे सुद्धा नमुद केले आहे. अर्थात त्याचा प्रत्यय सुद्धा अनेकांना आला असेल. एखाद्याचे करायला जावे भले तो म्हणते आपलेच खरे !

तसे आपण मुर्ख आहोत हे दाखविण्याची एकही संधी आपण सोडत नाही ! आधुनिक युगात तर आपल्याला आपला मुर्खपण पाजळण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. आता समर्थ नाहीत तेव्हा ही आधुनिक मुर्ख लक्षणे संकलित करण्यासाठी त्यांचा हा सेवक सिद्ध झाला आहे.

श्रोतेहो , ऐका …

इनकमिंग कॉलवर उदंड बोले

स्वत: मात्र मिसकॉल देइ

तो येक मुर्ख !

चकटफ़ूला भुले,फ़्री मिळता धावे

विकतचे दुखणे पदरी घे़ई …

उदंड जमवी क्रेडीट कार्ड,

लिमिट न बघता करी खरेदी

५% भरून वेळ मारून ने़ई

मग कर्जाच्या सापळ्यात सापडे …

सेकंदा सेकंदाला चॅनल बदली

मालिकांवर उदंड चर्चा करी

रिमोट असता आपुल्याच होती

कार्यक्रमांच्या नावाने खडे फोडी …

प्रवासाचे नियोजन न करी

रेल्वे आरक्षण कधीही न करी

सहलीत सदा ओझी वाही,

फ़ुका खरेदीतच मन रमवी ..

असता स्मार्ट कार्ड वा कुपन

तिकिटासाठी लावी लाइन ..

बिल वेळेवर न भरी

अकारण भुर्दंड भरी ..

जे जे असे ऑनलाइन

त्यासाठी लावी लाइन …

लोकशाहीवर आग पाखडे

लोकप्रतिनिधींना भ्रष्ट म्हणणे

स्वत: मतदानास बाहेर न पडे ..

उदंड मिळवी संपत्ति

परी मृत्यूपत्र न बनवि ..

लोकशाहीचे फ़ायदे उपटी

ठोकशाहीचे गुणगान गाई ..

जिन्यामध्ये सोसायटीवर बोले

वार्षिक सभेमध्ये मात्र गप्प बैसे ..

दूसर्यास सांगे खुर्ची सोडावी

स्वत: सीएसटी पर्यंत बसून राही ..

स्वत: काही करू शकत नसे

स्वत: काही करण्यास न धजे

दूसरा करी तेही न बघवे

पाय ओढे सदा दूसर्याचे ..

विज्ञान शाळेत शिकला

तरीही भोंदूना भूलला

चमत्कार दिसता धावला ..

पर्यावरणाच्या नावाने गळा काढी

स्वत: मात्र प्लास्टिक थैली वाही ..

कामधाम सोडून देवदर्शनाला धावी

किती तिष्ठलो रांगेत त्याची कथा ऐकवी ..

स्वत: असूनी अखंड भ्रष्ट

जो दूसर्यास म्हणी भ्रष्ट …

ऋण काढून करी जो सण

कर्ज फ़ेडण्यासाठी घे़ई ऋण ..

दामदुप्पटच्या अमिशाला भुले

मग सिस्टीमला लावी बोले ..

मुलांना शिकवि कॉन्वेंटमधे

मायभाषेत बोलण्यास लाजे

मग मराठी मेली म्हणून बोंबले ..

करार न करता घर भाड्याने दे़ई

खोली परत घेण्या कोर्टात जाई..

भावनेच्या भरात मित्रास राहीला तारण

वसूलीची येता नोटीस ,बोल काय कारण ?

लाउड-स्पिकरवर गाणे वाजवी,

शेजार्यां-पाजार्याचे डोके उठवी ..

नेट वापरता सारासार विचार न करी

जे जे फ़ूकट मिळे ते ते उतरवुन घे़ई ..

बहु असता फ़ूकट सॉफ़्टवेयर

पायरेटेड आवृत्ति वर दे़ई भर ..

स्वत: विकत पेपर नाही कधी घेतला

दूसर्याचा ओढून घेतसे फ़ूकट वाचायला ..

स्वत:चे घर ठेवी आरशासारखे लख्ख

सोसायटीच्या आवारातच मारी पिंक ..

नाही दिली कधी दूसर्याला लिफ़्ट

आपणास न मिळता म्हणे तो शिष्ट …

करण्या वटपोर्णिमेची पूजा, नाही मिळे स’वड’

विकतची फ़ांदी आणून, भागवते मनाची निकड …ती येक मुर्ख !

मनातच ठेवी विचार, न केला कधी उच्चार

सदैव कुढतचि राहीला, शंकेला घातला आवर

न रमला ऑर्कुटवर, न केला ब्लॉगचा वापर …

जय जय रघुवीर समर्थ !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: