मराठी ब्लॉग - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीतले अनुभव, स्वत:चे विचार, संस्कृत सुभाषिते, मुंबईच्या लोकलने रोज कराव्या लागणार्या प्रवासाचे अनुभव, इंग्रजीतले जे भावले त्याचा माय मराठीत अनुवाद आणि बरेच काही, जुन्या व गाजलेल्या हिंदी,मराठी गीतांच्या एम.पी.३ खजिन्याची किल्ली! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे.
शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३
अॅन्ड्रॉइड अॅप्स
मला स्वत:ला असा नाद लागला व बहुतेक पेड अॅप्सच्या apk मला मिळाल्या व त्या सुद्धा लॅटेस्ट ! अशा सर्व apk चे संकलन शेयर करीत आहे. अर्थात याचा उपयोग स्वत:च्या जोखमीवर करायचा आहे ! तुमच्या मोबाइलची सेटींग तुम्हाला थेट apk प्रस्थापित करू देणार नाहीत, त्या साठी हे करा,
Settings > Application settings > Check "Unknown Sources" (Allow Installation of non-market applications)
तुम्हाला एखादे अॅन्ड्रो अॅप हवे असल्यास मला कळवा, मी त्याची लिंक शोधून शेयर करायचा प्रयत्न नक्की करेन.
हा घ्या दुवा.
http://www.mediafire.com/?qhfe9bxqd5ywg
धन्यवाद !
रविवार, २२ जुलै, २०१२
पुन्हा एकदा “भज गोविंदम” !
काहि दिवसापुर्वी लोकल प्रवासात शफल करून गाणी ऐकत असताना गाणे वाजू लागले व काय ब्याद आहे असे म्हणत ते गाणे स्किप करायच्या ऐवजी फॉरवर्ड झाले व एक दणदणीत आवाजातली तान ऐकू आली. मी त्या आवाजाने थरारलोच ! हे काही तरी वेगळे आहे असे समजले व जसराजांच्या आवाजातले “भज गोविंदम” पहिल्यापासून ऐकायला घेतले.
हे ध्वनी-मुद्रण निश्चितपणे एका भव्य मैफिलीतले असणार. आधी संथ लयीत व हळूवार आवाजात “भज गोविंदम” ची सुरवात होते. सुरवातीचा श्लोक असाच म्हटलेला आहे. पंडीतजी व त्यांच्या साथीदारांनी ( चेल्यांनी ?) या दरम्यान आपला आवाज व वाद्ये लावून घेतली असावीत ! मग मात्र आवाजाची पट्टी वाढू लागते, साथीला एकेका वाद्यांची सुद्धा भर पडते. दमदार ताना, आरोह-अवरोह, पलटे, आवाजातले चढ-उतार यातून गायन रंगत जाते, खुमासदार होते, अगदी कान तृप्त होतात ! नादब्रह्म म्हणजे काय याचा साक्षात्कार होतो ! भज गोविंदम हे स्तोत्र आहे पण ते एका आगळ्याच ढंगात म्हटले आहे व शेवट तर चक्क भजनात केला आहे ! तब्बल 24 मिनिटे देहभान विसरून आपण ऐकत राहतो ! पंडीत जसराजांची गायकी ऐकताना आपण स्वरांच्या अभिषेकात डुंबतो, भक्तीरसात चिंब भिजतो, अगदी धन्य पावतो, भरून पावतो ! हे ऐकल्यावर अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते. या तंद्रीतुन आपण बराच काळ बाहेर येवूच शकत नाही. अजून काही ऐकूच नये असे वाटावे असे कान तृप्त झालेले असतात ! अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव आहे ! अर्थात हे सगळे वाचायचे नाही तर अनुभवायचे असे आहे. हा घ्या दुवा व दुवा द्या सुद्धा ! http://ge.tt/5WJHOrK/v/1
अगदी असाच अनुभव पंडीत जसराज यांनी गायलेले “भज नंदन” ऐकताना सुद्धा येतो. त्याचा दुवा खाली दिलेला आहे. हे ध्वनिमुद्रणसुद्धा त्याच मैफिलितले असावे. कालावधी 26 मिनिटांचे आहे. हे सगळे ज्यांनी लाइव कन्सर्ट मध्ये ऐकले असेल ते किती नशीबवान असतील नाही ? http://www.ge.tt/5WJHOrK/v/0?c
मंगळवार, १२ जुलै, २०११
भज गोविंदम, भज गोविंदम , भज गोविंदम मूढमते !
काल अनेक संस्कृत, मराठी स्तोत्रांची लिंक दिली होती. या सगळ्यात "भज गोविंदम" हे आद्य शंकराचार्यांचे नितांत सुंदर व अतिशय अर्थपूर्ण स्तोत्र राहूनच गेले. चूक दुरूस्त करतानाच या स्तोत्राचा मराठीत अनुवाद करायचे मनात आले. हे स्तोत्र मी अनेकदा ऐकतो पण त्याचा अर्थ मलाच माहित नव्हता. कानाला गोड लागत होते म्हणून ऐकत होतो एवढेच ! स्वत: अनुवाद करण्याएवढा माझा संस्कृतचा मूळात अभ्यासच नाही. मायाजालावर त्याचा मराठी अनुवाद कोठेही मिळाला नाही. इंग्रजी अनुवाद मात्र भरपूर सापडले. त्यातल्या त्यात सोप्या इंग्रजी अनुवादाचा मराठी अनुवाद करायला घेतला. श्लोक व त्याच्या खाली त्याचा अनुवाद द्यायचा असे ठरले. क्लिष्टपणा वाटू नये म्हणून शब्दश: अनुवाद करण्याचे टाळले अहे. काही चूक असल्यास जरूर निदर्शनास आणून द्यावी ही विनंती. देवनागरीत उपलब्ध असलेले तसेच युनिकोडपुरक स्तोत्र शोधण्यासाठी सुद्धा बरेच शोधावे लागले.
शंकराचार्य म्हणजे माझ्या वडीलांचा दूसरा प्राण आहे. आद्य शंकराचार्य कोण हेच लोकांना माहित नाही मग त्यांच्या कार्याची माहिती कोणाला असणार ? नेमक्या याच गोष्टीची वडीलांना मनस्वी चीड येते व संताप सुद्धा ! या स्तोत्राचा मी केलेला मराठी अनुवाद मी त्यांनाच अर्पण करीत आहे.
प्रस्तावना - आद्य शंकराचार्य आपल्या शिष्यांबरोबर वाराणसीला आले होते. एका ठीकाणी एक वयोवृद्ध ब्राह्मण त्याच्या शिष्यांकडून व्याकरणाचे नियम घोकून घेत होता. शंकाराचार्यांना त्याची दया आली व त्या ब्राह्मणाला त्यांनी उपदेश केला की या उतार वयात व्याकरण घोकवून घेण्यापेक्षा थेट देवाची भक्तीच का करीत नाहीस. "भज गोविंदम" हे नितांत सुंदर व अर्थपूर्ण पद्य त्यांनी याच प्रसंगी रचले.
भज गोविंदम,भज गोविंदम,भज गोविंदम मूढ़मते|
संप्रप्ते सन्निहिते काले,नहि नहि सक्षति डुकृग्नूकरणे||
भज गोविंदम मूढ़मते| (१)
अरे मूर्खा, देवाचे भजन कर, जेव्हा अंत जवळ येइल तेव्हा हे व्याकरण तुझ्या काहीही कामाला येणार नाही.
मूढ़ जहीहि धनागम तृष्णा,कुरु सदबुद्धि मनसि वितृष्णाम|
यल्लभसे निजकर्मोपात्तं,वित्तं तेन विनोदय चित्तम||
भज गोविंदम मूढ़मते| (२)
अरे मूर्खा, धनसंचयाच्या मागे लागू नकोस,
धनाचा हव्यास सोड, आज तुला जे काही मिळाले आहे ते तुझे पुर्व-संचितच आहे. जे आहे त्यात समाधान मान.
नारीस्तनभरनाभिदेशं,दृष्टवा मागा मोहावेशम|
एतन्मांसवसादिविकारं,मनसि विव्हिन्तय वारंवारम||
भज गोविंदम्,मूढ़मते| (३)
विषय-भोगात गुंतून पडू नकोस, शरीर म्हणजे नुसता हाडा-मासाचा चिखल आहे हे आधी नीट समजून घे.
नदिनीदलगत जलमति तरलं,तदवज जीवित मतिशय चपलम|
विद्दि व्याध्यभिमान गस्तं,लोकं शोकहतं च समस्तम||
भज गोविंदम्,मूढ़मते|(४)
जीवन क्षणभंगूर आहे, जसे कमलपत्रावरील पाण्याचा थेंब. हे जग चंचलता, विषमता, दैन्य, दु:ख, व्याधींनी भरलेले आहे.
यावद् वित्तोपार्जन सक्तः,तावन् निज परिवारो रक्तः|
पश्चाज् जीवति जर्जर देहे,वार्ता कोपि न पृच्छति गेहे||
भज गोविंदम्,मूढ़मते|(५)
जो वरी पैसा, तो वरी बैसा ! जेव्हा तू कंगाल होशील तेव्हा हे जग तुझ्याकडे ढूंकूनही बघणार नाही !
यावत्पवनो निव्सिति देहे,तावत् पृच्छति कुशलं गेहे|
गतवति वायौ देहापाये,भार्या भिभ्यति तस्मिन्काये||
भज गोविंदम्,मूढ़मते| (६)
कुडीत जोवर प्राण आहे तो पर्यंत सगळेच तुझे सोबती असतील. तुझा श्वास थांबला की तुझे आप्त तुझ्या कलेवरचा सुद्धा धसका घेतील.
बालस्तावत् क्रीडासक्तः,तरुणस्तावत्तरुणी रक्तः|
वृध्धस्तावच्चिन्तामग्नः परमे ब्रह्मणि कोपि लग्नः||
भज गोविंदम्,मूढ़मते| (७)
बालकाचा ओढा खेळाकडे असतो तर तरूणांचा ओढा तरूणीकडे असतो , म्हातारपणी मात्र सगळे ओढग्रस्त / चिंताग्रस्त असतात ! परम ज्ञानाची आस मात्र कोणालाच नसते.
का ते कान्ता कस्ते पुत्रः,संसारोयमतीव विचित्रः|
कस्य त्वं कः कुत आयातः,तत्वं चिन्तय तदिह भ्रातः||
भज गोविंदम्,मूढ़मते| (८)
अरे कोठली बायको आणि कोठला मुलगा ! नसत्या विवंचनेत तू अडकून पडला आहेस. पण तू कोण ? कोठून आलास ? या सत्याचा कधी शोध घेणार आहेस ?
सत्संगत्वे निसंगत्वं,निसंगत्वे निर्मोहत्वम्|
निर्मोहत्वे निश्चलतत्वं,निश्चलत्वे जीवन्मूक्तिः||
भज गोविंदम्,मूढ़मते| (९)
सज्जनांशी संगत धरशील तर आसक्ती पासून सूटशील, अनासक्त झाल्यावर भ्रम तूटेल, भ्रम तूटला की तुझा निर्धार पक्का होइल व मग तुला मुक्तीचा मार्ग दिसेल.
वयसे गते कः कामविकारः,शुष्क नीरे कः कासारः|
क्षीणे वित्ते कः परिवारः,ज्ञाते तत्वे कः संसारः||
भज गोविंदम्,मूढ़मते| (१०)
तारूण्याचा बहर ओसरल्यावर कसले भोग भोगणार तू ? तळ्यातले पाणीच वाफ होवून गेल्यावर त्या तळ्याला तळे तरी कोण म्हणेल ? पैसा नसेल तेव्हा कोण तुमची सोबत करेल ? सत्याचाच शोध लागल्यावर आणखी कशाची गरजच काय ?
मा कुरु धनजन यौवनगर्वं,हरति निमेषात्कालःसर्वम्|
मायामयमिदमखिलं बुद्द्ध्वा,ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा||
भज गोविंदम्,मूढ़मते| (११)
संपत्ति, नातलग, तारूण्य यांचा गर्व धरू नकोस, हे सगळे एक क्षणात होत्याचे नव्हते होईल. ही सर्व माया आहे. हे सर्व सोडून दे व ब्रह्म जाणून घे.
दिनयामिन्यो सायं प्रातः,शिशिरवसन्तौ पुनरायातः|
कालःक्रिडति गच्छत्यायुः,तदपि न मुंचत्याशावायुः||
भज गोविंदम्,मूढ़मते| (१२)
दिवस आणि रात्र, संध्याकाळ आणि पहाट, थंडी आणि वसंत येतात आणि जातात. काळ काही कोणासाठी थांबत नाही. सृष्टीचे चक्र अव्याहतपणे चालूच आहे. तरीही आपल्या वासना मात्र सूटत नाहीत.
का ते कान्ताधनगतचिन्ता,वातुल किं तव नास्ति नियंता|
त्रिजगति सज्जनसंगतिरेका भवति भवार्णवतरणेनौका||
भज गोविंदम्,मूढ़मते| (१३)
अरे कशाला कांता आणि कनकाची काळजी करतोस ? जग-नियंत्याचा विचार कधी करणार ? त्रिकालात फक्त ज्ञानी माणसांची संगतच तुझी जीवन-नौका भवसागर पार करायला मदत करील.
जटिलो मुंडी लुंचित केशः,काषायाम्बर बहुक्रुत वेषः|
पश्यन्नपि च न पश्यति मूढः,ह्युदरनिमित्तं बहुकृतवेषः||
भज गोविंदम्,मूढ़मते| (१४)
काय पण सोंग आणले आहेस ! मुंडन काय केले आहेस, भगवी वस्त्रे काय ल्यायली आहेस, पोटासाठी हे सोंग आणले असलेस तरी मूर्खा तू स्वत:च फसलेला आहेस ! डोळे असून आंधळा झाला आहेस.
अंग गलितं पलितं मुंडं,दशनविहीनं जातं तुंडम्|
वृध्धो याति गृहित्वा दंडं,तदपि न मुंचत्याशा पिंडम्||
भज गोविंदम्,मूढ़मते| (१५)
अरे तुझे शरीर जर्जर झाले आहे, केस पिकले, तोंडाचे बोळके झाले आहे, काठीचा आधार घेतल्याशिवाय तुला चालताही येत नाही ! तरीही तुझ्या वासना काही मरत नाहीत !
अग्रे वह्निःपृष्ठे भानुः,रात्रो चुबुकसमर्पित जानुः|
करतलभिक्षस्तरुतलवासः,तद्दपि न मुंचत्याशापाशः||
भज गोविंदम्,मूढ़मते| (१६)
पुढे वणवा पेटला आहे तर मागे तुझी पापे. रात्री गुढघ्यात डोके लपवितोस, हात पसरून भीक मागून जगतो आहेस, कसातरी दिवस काढतो आहेस पण तरीही हे वासनांचे बाड फेकून द्यावे असे तुला वाटत नाही.
कुरुते गंगासागर गमनं,व्रतपरिपाल न मथवा दानम्|
ज्ञानविहीनः सर्वमतेन,भजति न मुकिंत जन्मसतेन||
भज गोविंदम्,मूढ़मते| (१७)
गंगेच्या संगमावर लोक तीर्थयात्रेसाठी जातात, धार्मिक विधी करतात, दान-धर्मही करतात. पण ज्ञानच झाले नसेल तर असे कर्मकांड अगदी शंभर जन्म करून सुद्धा मुक्ती मिळणार नाहीच !
सुरमन्दिर तरुमूल निवासः,शय्या भूतलमजिनं वासः|
सर्वपरिग्रह भोग त्यागः,कस्य सुखं न करोति विरागः||
भज गोविंदम्,मूढ़मते| (१८)
देवळात किंवा झाडाखाली राहिलास, जमिनीवर झोपलास, वल्कले नेसलीस, सर्वसंग परीत्याग केलास काय की सर्व सुखांवर पाणी सोडलेल काय , जो पर्यंत वासना आहे तो पर्यंत आनंद कसा मिळणार ?
योगरतोवा भोगरतोवा,संगरतोवा संगविहीनः|
यस्य ब्रम्हणि रमते चित्तं,नन्दति नन्दति नन्दत्येव||
भज गोविंदम्,मूढ़मते| (१९)
ध्यानधारणा करा किंवा विषयात रममाण व्हा, समाजात मिसळण्यात किंवा एकांतात सुख माना. पण आनंद, परमानंद , चिदानंद मात्र ब्रह्म जाणण्यानेच मिळणार आहे.
भगवद् गीता किंचिदधीता,गंगाजललवकणिका पीता|
सकृदपि येन मुरारिसमर्चा,क्रियते तस्य यमेन न चर्चा||
भज गोविंदम्,मूढ़मते| (२०)
गीतेचा एक अध्याय जरी शिकलात, गंगेचा एक थेंब जरी प्राशन केलात किंवा एकदा जरी मुरारीची (कृष्ण) पूजा केलीत तरीही तुम्ही यमावर विजय मिळवाल !
पुनरपि जननं पुनरपि मरणं,पुनरपि जननी जठरे शयनम्|
ईह संसारे बहुदुस्तारे,कृपयापारे पाहि मुरारे||
भज गोविंदम्,मूढ़मते| (२१)
जन्म-मरणाच्या फेर्यातुन फक्त कृष्ण-मुरारीच्या( मुरा नावाच्या राक्षसाचा वध करणारा तो मुरारी ) कृपेनेच तुम्ही मुक्त व्हाल.
रथ्याचर्पट विरचितकन्थः,पुण्यापुण्य विवर्जितपन्थः|
योगी योग नियोजीतचित्तः,रमते बालोन्मत्तवदेव||
भज गोविंदम्,मूढ़मते| (२२)
ज्याने वस्त्र म्हणून चिंध्या नेसल्या आहेत, पाप-पुण्याच्या जो पलिकडे गेलेला आहे, असा हा योगेश्वर सर्वांच्या ठायी वास करून आहे.
कस्त्वं कोहं कुत आयातः,का मे जननी कोमे तातः|
ईति परिभावय सर्वमसारं,विश्वं त्यक्त्वा स्वप्न विचारम्||
भज गोविंदम्,मूढ़मते| (२३)
तू कोण आहेस ? मी कोण आहे ? मी कोठून आलो ? माझी आई कोण ? पिता कोण ? हे जाणण्याच्या मागे लाग. बाकी सर्व माया आहे, स्वप्नवत आहे,तथ्यहीन आहे.
त्वयि मयिचान्यत्रैको विष्णुः,व्यर्थंकुप्यसि मय्यसहिष्णुं|
भव समचित्तःसर्वत्र त्वं,वांछस्यचिराधदि विष्णुत्वम्||
भज गोविंदम्,मूढ़मते| (२४)
तुझ्यात, माझ्यात, सर्वत्र एकच विष्णू वास करून आहे. उतावीळपणे माझ्यावर रागावू नकोस. सगळीकडे स्वत:ला पहा आणि अज्ञानाचा त्याग कर जो विषमतेचे कारण आहे.
शत्रो मित्रे पुत्रे बन्धौ,मा कुरु यत्नं विग्रहसन्धौ|
सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं,सर्वत्रोत्सृज भेदाज्ञानम्||
भज गोविंदम्,मूढ़मते| (२५)
शत्रू, मित्र, मुलगा किंवा नातलग यांच्याशी भांडूही नकोस आणि सलगीही करू नकोस. तुला जर विष्णूस्वरूप व्हायचे असेल तर सगळीकडे समभाव ठेव.
कामं क्रोधं लोभंमोहं,त्यकत्वात्मानं पश्यति सोहम्|
आत्मज्ञानविहिना मूढाः,ते पच्यन्ते नरकनिगूढाः||
भज गोविंदम्,मूढ़मते| (२६)
काम, क्रोध, लोभ, मोह या सर्वांचा त्याग कर आणि मग स्वत:लाच विचार की मी कोण आहे. आत्मज्ञान झाले नाही तर नरक यातनाच भोगाव्या लागतात.
गेयं गीता नाम सहस्त्रं,ध्येयं श्रीपतिरुपजस्नम्|
नेयंसज्जनसंगे चित्तं,देयं दीनजनाय च वित्तम्||
भज गोविंदम्,मूढ़मते| (२७)
गीता गायन कर, विष्णू सहस्त्रनामाचे स्तवन कर, लक्ष्मीनारायणाचे ध्यान कर. सज्जनांची नेहमी संगत करावी, धन-दौलत गरजूंना वाटून टाकावी.
सुखतः क्रियते रामाभोगः,पश्चाद्धन्त शरीरे रोगः|
यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुंचति पापाचरणम्||
भज गोविंदम्,मूढ़मते| (२८)
लोक शरीराचे चोचले पुरवितात पण त्यानेच शरीर व्याधिग्रस्त होते.मरण समोर दिसत असूनही माणूस पापाचरण मात्र सोडत नाही !
अर्थमनर्थं भावय नित्यं,नास्ति ततः सुखलेशःसत्यम्|
पुत्रादपि धनभांजां भीतिः,सर्वत्रैषा विहिता रीतिः||
भज गोविंदम्,मूढ़मते| (२९)
"अर्थाने अनर्थ होतो" हे नेहमीच प्रत्ययाला येते, पैसा मिळून कोणीही सुखी झालेला नाही. धनिकाला तर आपल्या मुलाची सुद्धा भीती वाटते.
प्राणायामं प्रत्याहारं,नित्यानित्य विवेक विचारम्|
जाप्यसमेत समाधि विधानं,कुर्ववधानं महदवधानम्||
भज गोविंदम्,मूढ़मते| (३०)
प्राणायामाचा अभ्यास करा, विषयातुन लक्ष काढून घ्या, शाश्वत आणि अशाश्वत यातला फरक जाणा, मंत्र सामर्थ्याने मनावर काबू मिळवा – हे सर्व समजून-उमजून करा.
भवमुक्तःगुरु चरणाम्बुज निर्भर भक्तः,संसारादचिराद् भवमुक्तः|
सेन्दिय मानस नियमादेवं,द्रक्ष्यसि निजह्यदयस्थं देवम्||
भज गोविंदम्,मूढ़मते| (३१)
गुरूच्या चरणकमलांची सेवा करूनच तुम्ही जन्म-मरणाचा वेढा तोडू शकाल. इंद्रीयांवर काबू मिळवून व मनाला आवर घालून तुम्ही तुमच्यातच वास करून असलेल्या परमेश्वरात सामावून जाल.
** समाप्त **
मायाजालात या स्तोत्राची एम.पी.3 उपलब्ध आहे पण त्यात फक्त 1, 3, 4, 7, 14, व 21 हेच श्लोक घेतले आहेत. अर्थात जिने कोणी हे गायले आहे तिचा आवाज मंत्रमुग्ध करून टाकणारा असाच आहे. उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
सोमवार, ११ जुलै, २०११
नित्य पाठाची स्तोत्रे / श्लोक.
कधी काळी दिवेलागणीच्या वेळेला घरातील सर्वांनी एकत्र बसून स्तोत्रे / श्लोक म्हणायची प्रथा होती.
या निमित्ताने घरातले सर्व एकत्र तरी येत. काही चांगले संस्कार यातुन नक्कीच होत होते. मुलांचे पाठांतर, शब्दोच्चार सुधारायला याने निश्चितच मदत होत होती. आजच्या धकाधकीच्या काळात संध्याकाळच हरवून गेली आहे. इच्छा असली तरी संध्याकाळी घरातले सगळे एकत्र जमू शकतीलच असे नाही. बरे मुलांकडून ती म्हणवून पाठ तरी कोण करून घेणार ? आजच्या किती पालकांची स्त्रोत्रे पाठ असतील. आजी किंवा आजोबा सोबत असण्याचे भाग्य किती नातवंडांच्या नशीबी असेल ? जुनी शिक्षण पद्धती घोकंपट्टीवर आधारीत होती ती आता कालबाह्य झाली तेव्हा त्याला पूरक असे हे जुनाट संस्कार तरी का जोपासायचे ? असा ही एक ट्रेंड आहे.
पहाटे, सकाळी किंवा संध्याकाळी ही स्त्रोते सगळ्यांबरोबर म्हणण्यात, ऐकण्यात मात्र एक आगळेच समाधान लाभते हे नक्की. येत नसतील, पाठ नसतील, संस्कृत उच्चार नीट जमत नसतील पण तंत्रामुळे शक्य असेल तर ही स्तोत्रे ऐकायला काय हरकत आहे ? नेटवर धांडोळा घेवून आपल्या म्हणण्यातील, ऐकण्यातील बहुतेक स्त्रोत्रांच्या एम.पी.3 मी संग्रहित केल्या आहेत. आपल्या सर्वासाठी त्याची लिंक देत आहे. आपल्याला एखादे स्तोत्र हवे असल्यास कृपया मला कळवावे, किंवा आपल्याकडे एखाद्या स्तोत्राची एम.पी. 3 असल्यास शेयर करायला हरकत नाही.
मी संग्रहीत केलेली स्तोत्रे / श्लोक खालील प्रमाणॆ –
- आद्य शंकराचार्य रचित अन्नपूर्णाष्टकम
- अथर्वशिर्ष
- मारूति स्तोत्र (सुरेश वाडकर )
- आद्य शंकराचार्यांचे गणेश भुजंग प्रयाग स्तोत्र
- गोविंदाष्टकम
- कनकधारास्तोत्रम
- करूणाष्टके ( अनुराधा पौडवाल )
- मनाचे श्लोक (दोन भागात, अनुराधा पौडवाल )
- आद्य शंकाराचार्यांचे आत्मषटक किंवा निर्वाणाष्टकम
- राघवाष्टकम
- रामरक्षा स्तोत्र (पुरूषाच्या आवाजात )
- रामरक्षा स्तोत्र ( अनुराधा पौडवाल )
- शटपदीस्तोत्र
- शिवरूद्र
- शिव महिम्न स्तोत्र
- शिव तांडव स्तोत्र (हे चक्क रावणाने रचले आहे ! )
गुरुवार, ७ जुलै, २०११
मिले सुर मेरा तुम्हारा !
ब्लॉगच्या माधामातून तूमचे व माझे सुर जुळले आहेतच पण जुन्या गाण्यांची सुद्धा तुम्हाला माझ्या एवढीच आवड असेल असे मात्र वाटले नव्हते ! तरूण वाचकांच्या कानावर यातली गाणी पडली असतील की नाही हीच मला शंका होती. पण ती साफ खोटी ठरली. जुने ते सोनेच ! वाचकांसाठी मी काही आठवड्यापुर्वी जुन्या मराठी, हिंदी गाण्यांचा खजिना खुला केला होता. तुम्ही तो शब्दश: लूटलात ! धन-दौलत खोर्याने लूटली जाते, हे धन तुम्ही एमबी आणि जीबीत लूटले आहे ! अनेकांनी इमेल, मोबाईल करून तुमची आणि आमची गाण्यांची आवड कमालीची जुळते, अगदी मला हवे असलेले प्रत्येक गाणे मिळाले, माझ्या घरी अनेक जुन्या सीडी धूळ खात पडलेल्या होत्या, लेखातुन माहिती मिळाल्याने त्यातली गाणी एम.पी.3 स्वरूपात वेगळी काढता आली, एमपी3 टॅग एडीटर नक्की कसा वापरायचा हे समजले, 512 एमबीच्या मोबाइल कार्ड मध्ये मला आधीपेक्षा दुप्पट गाणी बसविता आली, Thanks to Bit Rate Changer …. अशा असंख्य प्रतिक्रीया मला पोहचल्या ! धन्यवाद ! अर्थात यात अनेक चांगली गाणी नसल्याची आठवण सुद्धा अनेकांनी करून दिली व दिल्या शब्दाला जागून मी फर्माइश केलेली सगळी गाणी नेटावर शोधून त्याची लिंक उपलब्ध करून देत आहे. या प्रक्रीयेत मलाच अनेक जुनी गाणी नव्याने भेटली. तुम्हाला अधिकची हवी असलेली गाणी उपलब्ध करून देताना अत्यानंद होत आहे.
आज कळीला एक फूल भेटले
अग नाच नाच नाच राधे उडवूया रंग
अमृताहुनी गोड
अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत
अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया
भन्नाट रान वारा
डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस
धुंद एकांत हा
धुंदी कळ्यांना
धुंदीत राहू
एकटी मी एकटी
गर्जा जयजयकार क्रांतिचा
घन राणी साजणा
हसले आधी कोणी
ही कशाने धुंदी आली
हाउस विथ बाम्बू डोर
झन झननन छेडील्या तारा
का हो धरीला मजवर राग
किती सांगू मी सांगू कोणाला
कोण होतीस तू – काय झालीस तू
लागे ना रे लागे ना रे
मधुरानी तुला सांगू का
माळते मी माळते
मम आत्मा गमला
मी जलवंती, मी फुलवंती
मुरलीधर श्याम
नाते जुळले मनाचे मनाशी
पप्पा सांगा कोणाचे
पतित पावन नाम ऐकोनी
प्रेमाला उपमा नाही
रम्य ही स्वर्गाहुनि लंका
ऋतुराज आज मनी आला
सावधान होई वेड्या
शपथ या बोटांची
शतकांच्या यज्ञातुन … अरूणोदय झाला
सुजन कसा मन चोरी
सुंबरान गावू चला
सुरसुखखनी तू विमला
तेच स्वप्न लोचनात
तुला ना कळले
तुझ्या प्रीतीचे दु:ख मला
वद जावू कुणाला शरण
म्यानातून उसळे तरवारीचे पाते - वेडात मराठे वीर दौडले सात
मी इथे गाण्याचे शीर्षक दिले आहे. हे शहाणपण मला आधी का सूचले नाही म्हणून अनेकांनी माझे कान उपटले आहेत. सध्या तरी माफ करा, जे झाले ते झाले. जरा वेळ मिळाला तर सर्व गाण्यांची शीर्षके एका लेखात नक्कीच संकलित करणार आहे. पण जरा धीर धरा !
तुमच्या मागण्या पुरविताना किती तास नेटवर धांडोळा घेत बसावे लागले याची काही मोजदादच नाही ! पण सर्वच्या सर्व मागण्या पुर्या करता आल्या याचे समाधान आहेच वर तुम्ही आभार तर मानालच ना ?!
अनेकांनी सर्वच गाणी एका झटक्यात उतरवून घ्यायला आवडेल असे सांगितले आहे. मला वाटते मीडीया फायर चे प्रिमीयम अकाउंट असेल तर तुम्हाला ते शक्य आहे, अर्थात तसे घ्या असे मी दुरान्वयेही सूचवित नाही. फाइल शेयरींग सेवा देणार्या अनेक साइटस पैकी मिडीया फायरच सर्वात चांगली आहे हे मात्र नक्की. सर्व गाण्यांची एकच फाइल केली ( झिप करून ) तर तुमच्याकडे जर एखादे गाणे असेल तरी ते परत उतरविले जाइल. अजून एक ताप म्हणजे, नेट जोडणीत काही समस्या आल्यास सगळ्या गाण्यांची एकच झिप फाइल पूर्ण उतरविली जाणार नाही व तुम्हाला "पहिले पाढे पंचावन्न" असे म्हणावे लागेल ! आय.डी.एम. चा नीट वापर केलात तर गाण्यांची लिंक ओपन झाल्यावर "Start Download Later" हा पर्याय स्वीकारून तुम्ही सर्व गाणी एका रांगेत डाउनलोडींग साठी लावू शकता.
सोयीसाठी संगीत या विषयावरील आधीच्या दोन्ही पोस्ट व ही पोस्ट "श्रवणनामा" या लेबलने संग्रहित करीत आहे.
मस्त पाऊस पडतो आहे , निदान मुंबईतल्या फोर्ट भागात तरी ! तेव्हा पावसा बरोबरच सुरांच्या अभिषेकात भिजून जायला तयार व्हा !
"आपली आवड" या फोल्डरमधील गाणी उतरवून घेण्यासाठी इथे टीचकी मारा !
शनिवार, २ जुलै, २०११
माझी संगीत साधना !
संगीताच्या नादामुळे नोकरीला लागल्यावर मी स्वत:च्या पैशाने सर्वात आधी काही विकत घेतले असेल तर तो स्टीरीओ प्लेयर ! त्याच्यावर वाजवायला कॅसेट विकत घ्यायच्या म्हटल्या तर आर्थिक ओढाताण व्हायची ! एक कॅसेट तेव्हा 40 रूपयाच्या आसपास मिळायची व तिच्यावर गाणी सुद्धा जेमेतेम बारा असायची. या बारात सुद्धा पाणी घातलेले असायचे. जेमेतेम चार गाणी आपण ऐकलेली असायची व बाकी सगळी भरताण ! एच.एम.व्ही. तुमच्या आवडीची गाणी भरून हवी असतील तर तब्बल 400 ते 500 रूपये घ्यायची ! सर्व जुन्या गाण्यांचे हक्क त्यांच्याकडे असल्याने त्यांची मनमानी सहन करायला लागायची. गुलशन कुमारच्या टी सिरीजने जरा स्वस्तातल्या कॅसेट बाजारात आणल्या पण त्यातली गाणी वाद्यवृंदातल्या कलाकारांनी गायलेली असायची ! कॅसेटच्या कवर वर मोठ्या अक्षरात लिहिलेले असायचे "लताके सदाबहार नगमे" आणि मागच्या बाजूला कोपच्यात कोठेतरी "संग बाय बाबला" असे बारक्या टायपात लिहिलेले असायचे ! सीएसटी ते चर्चगेट पायी गेलात तर अनेक कॅसेट विक्रेत्यांनी फूटपाथवर ठाण मांडलेले आहे. त्यांच्याकडे एच.एम.वी किंवा अशाच नामांकित कंपन्यांनी काढलेल्या कॅसेटच्या नकली कॅसेटस मिळायच्या पण कायद्याच्या कचाट्यात सापडू नये म्हणून त्यांना एको इफेक्ट दिलेला असायचा. सर्वच गाणी काही एको मध्ये ऐकायला बरी वाटत नाहीत. बरे या नकली कॅसेटस घेतल्या तर हेड खराब व्हायची भीती असायची व अनेकदा त्या अडकून सुद्धा पडायच्या.
यातुन मार्ग होता तो म्हणजे कोर्या (ब्लँक ) कॅसेटस विकत घ्यायच्या . ब्लँक कॅसेटस भारतात सुरवातीला बनत नव्हत्या. नंतर केव्हातरी मुरूगप्पा म्हणून साउथच्या कंपनीने बनविलेल्या दर्जदार व परवडणार्या कॅसेट दूकानात मिळू लागल्या. सोनी व टीडीके या परदेशी कॅसेटस तेव्हा खूप लोकप्रिय होत्या पण त्या स्वस्त मिळतात म्हणून रस्त्यावर घ्यायला जावे तर फसवणूक होण्याची शक्याताच जास्त असायची. असली विदेशी कॅसेटस मिळाव्यात म्हणून मी कस्टमने जप्त केलेला माल विकणारी दूकाने तेव्हा पालथी घालत असे. टीडीके व सोनी च्या असली कॅसेटची किंमत 60 ते 80 रूपये होती. कॅसेट विकणारी काही दूकाने आपल्या आवडीची गाणी तुम्हाला रेकॉड करून देत, त्यांच्याकडून आपल्या आवडीची गाणी त्यात भरून घ्यायची. तेव्हा 60 मिनिटाच्या कॅसेटस मध्ये हवी ती गाणी भरण्यासाठी 15 तर 90 मिनिटाच्या कॅसेटसाठी 20 रूपये पडायचे. अर्थात हे बेकायदेशीर होते ! पण "तेरी भी चूप मेरी भी चूप" या तत्वावर ही दूकाने बिनबोभाट चालत असत. दूकानदाराला गाण्याच्या मुखडा व चित्रपट द्यावा लागायचा. अनेकदा गाणे माहीती असायचे पण ते कोणत्या सिनेमातेले ते आठवत नसे किंवा माहीतच नसे ! अशा वेळी मग एखादा जाणकार पकडायला लागायचा व बाबापुता करून त्याच्याकडून सिनेमा कोणता ते जाणून घ्यायला लागायचे ! काही दूकानात मात्र गाण्याचा अल्बमच असायचा, त्यातली गाणी निवडून घ्यायला लागायची. 60 मिनिटात 12 ते 14 तर 90 मिनिटाच्या ध्वनीफितीत 18 ते 22 गाणी बसायची. 12 गाणी हवी असतील तर पसंतीच्या क्रमाने गाणी लावून , त्यातले एखादे नाही मिळाले तर दोन चार अधिकची देवून ठेवायला लागायची. दूकानदार उरलेल्या जागेत तुम्हाला सनई वादन किंवा गाजलेल्या गाण्याचा वाद्यावर वाजविलेला तुकडा टाकून द्यायचा. किमतीच्या दृष्टीने हे खूपच परवडायचे कारण तुम्हाला चॉइस मिळायचा, लादलेल्या गाण्यांपासून सूटका मिळायची ! मी तेव्हा 100 च्या आसपास कॅसेट रेकॉर्ड करून घेतलेल्या होत्या. माझे घर म्हणजे तेव्हा अनेक कानसेनांचा अड्डा बनले होते. मित्रात एकमेकांच्या कॅसेटची देवाण-घेवाण सुद्धा चालू असायची.
माझा मुलगा प्रसाद वर्षाचा झाल्यावर त्याला अचानक माझा हा खजिना गवसला ! आधी या कॅसेटचा तो बंगला उभारत असे तेव्हा त्याच्या पडझडीत त्यांची संरक्षक कवर पार मोडून गेली. पुढे मात्र त्यातली फीत काढून ती घरभर पसरविण्याचा खेळ त्याला जास्त आवडला व बघता बघता हा सगळा संग्रह नष्ट झाला. मधली काही वर्षे नोकरीची धावपळ, संसाराचा सुर - ताल बसविण्यात गेली. संगीत ऐकणे थोडे बॅकसीटला पडले. वडाळ्याला परत रहायला आल्यावर आवडीच्या गाण्यांची यादी व एक कोरी कॅसेट घेवून नेहमीचे ओळखीचे दूकान गाठले पण गाणी रेकॉर्ड करून हवी आहेत म्हटल्यावर त्याने सरळ कानावर हात ठेवले ! जरा वेळ मला निरखून त्याने आतल्या खोलीत बोलावले व सांगितले की आता असले धंदे कोणी करत नाही. कायदा खूप कडक झाला आहे, कॅसेट कंपन्या बोगस गिर्हाइके पाठवून असे करणार्यांना थेट जेलमध्ये धाडतात. वर हा गुन्हा अजामिनपात्र आहे ! मधल्या काळात कॅसेटची सद्दी संपली होती व सीडीचे युग सुरू झाले होते. सीडी व सीडी प्लेयर दोन्ही तेव्हा मला परवडणारे नव्हते.
एम.पी.3 या शब्दांनी मात्र चमत्कार केला व प्रत्येक कानसेनाला अगदी तृप्त केले ! कंपन्याच्या कचाट्यातून संगीत मुक्त झाले, कानसेन तृप्त झाले ! मायाजालाचा प्रसार सुद्धा याच काळात जोमाने झाला व त्या मार्फत जुनी गाणी एम.पी.3 नेटवरून लोकांना सहज उतरवून घेता येवू लागली. पोर्टेवल एम.पी.3 प्लेयर आल्यावर तर धमालच झाली. आपल्याला हवी असणारी गाणी , हवी तेव्हा, हवी तिथे ऐकण्याची मुभा मिळाली. आता तर मोबाइलमध्येच एम.पी.3 प्लेयर असतो. आधी लोकलमध्ये मोबाइलचा स्पीकर ऑन ठेवून गाणी ऐकणार्यांनी वात आणला होता पण आता त्याचे अप्रूप संपले व जो तो इयरफोन कानात खूपसून संगीत साधनेत व्यग्र असल्याने लोकलेमधली भांडणे अंमळ कमीच झाली आहेत. संगीत ऐकताना ब्रह्मानंदी टाळी लागल्याने एखादा नेहमीच्या स्टेशनावर उतरत नसेल एवढेच !
मागील पोस्ट मधून विविध प्रोग्रामचा वापर करून मोबाइल संगीत साधना कशी करावी याचे धडे मी दिलेले आहेतच. तेव्हा मी मिडीया फायर या फाइल शेयरींग वेब-साइट वर उपलब्ध असलेल्या अनेक जुन्या, गाजलेल्या मराठी गाण्यांच्या लिंक दिल्या होत्या. आता त्या परत देतानाच जुन्या हिंदी गाण्यांचा खजिना तुमच्यासाठी खुला करीत आहे ! हा ठेवा कोणालाही हवा- हवासा वाटेल असाच आहे. यात 2 जीबीत बसतील अशी एकूण 635 एकसे एक गाणी आहेत . खुल जा सिम सिम !
तुम्हाला हवे असलेले एखादे गाणे यात नसेल तर मला कळवा. त्याची लिंक नेटवर शोधण्यासाठी मी नेटाने प्रयत्न करेन !
ब्लॉगच्या वाचकसंख्येने याच सुमारास वीस हजाराचा पल्ला पार केला आहे ! सर्व वाचकांचे अभिनंदन. लोभ आहेच तो वाढावा ही नम्र विनंती !
जुन्या हिंदी गाण्यांच्या लिंक्स.
शास्त्रीय संगीतावर आधारीत हिंदी सिनेमातली गाणी
हिंदी सिनामातल्या गाजलेल्या कव्वाल्या.
मराठी गाण्यांच्या लिंक्स ( आधीच्या पोस्टमध्ये दिलेल्या आहेतच. सोयीसाठी परत देत आहे )
गीतरामायणातील निवडक गाणी (बाबुंजीच्या निवेदनासह )
महत्वाची सूचना :- या लेखातील माहीतीचा वापर ज्याने त्याने आपल्या जोखमीवर करायचा आहे. मायाजालात मिळालेल्या लिंक मी फक्त देत आहे. या बाबत कोणत्याही प्रकारे मला जबाबदार धरता येणार नाही. धन्यवाद !
मंगळवार, २८ जून, २०११
मोबाइल संगीतातील तंत्रसाधना !
मोबाइल संगीतातील तंत्रसाधना !
संगीताचा आस्वाद घेणे कधी काळी खिशात पैका खुळखुळत असेल तरच शक्य होते. आकाशवाणीने व मग दूरदर्शनने आम आदमीला कानसेन बनविले पण त्यालाही काही मर्यादा होत्याच. संगीताचा घरबसल्या व हवे तेव्हा आस्वाद घेण्याची जी साधने होती ती मध्यमवर्गीयाच्या आवाक्याबाहेरच होती. ग्रामोफोन, कॅसेट प्लेयर, वॉकमन व एम.पी. 3 प्लेयर , आय-पॉड या प्रवासात संगीत अभिजनांपासून जनांपर्यंत सर्वत्र झिरपायला लागले. नेट वर सुरवातीला एम.पी. 3 गाणी अगदी सहज उपलब्ध होती पण ती वाजविण्यासाठी लागणारी उपकरणे परवडण्याजोगी नव्हती. स्वामीत्व कायद्याचा बडगा उगारला गेल्याने , एम.पी. 3 माध्यमातुन संगीत उपलब्ध करून देणार्या अनेक साइटस भूमिगत झाल्या ! म्हणजे दात होते तेव्हा चणे खायला पैसे नव्हते व आता दात पडल्यावर चणे खायची ऐपत आहे अशी स्थिती संगीताचे वेडे असलेल्यांची झाली. जुनी गाणी मिळत नाहीत व रिमिक्सचा मारा मात्र चालूच आहे. एम.पी.3 या प्रकारातली जुनी मराठी गाणी अनेक साइटसवर उपलब्ध आहेत पण ती फक्त ऐकायला मिळतात, उतरवून घेता येत नाहीत ! काही वेब-साइटस गाणी ऐकायची असतील तर नोंदणी करायची सक्ती करतात, तर काही वेब-साइट्स गाण्याची काही सेकंदाची झलक ऐकवून दामाजी काढा असे बजावतात !
मला स्वत:ला जुनी मराठी व हिंदी गाणी खूप आवडतात व ही गाणी मोबाइलवर ऐकत पनवेल-मुंबई-पनवेल हा रोजचा प्रवास अगदी सुरेल होतो ! एम.पी.3 प्लेयर असलेला मोबाइल व गाणी साठविण्यासाठी 2 जीबीचे मेमरी कार्ड घेणे सोपे आहे पण त्यात गाणी, ती ही आपल्याला आवडणारी , भरण्यासाठी पचंड खटपट मला करावी लागली. शोधा म्हणजे नेटवर काहीही सापडेल ! अनेक तास नेटावर नेट लावून भ्रमंती केल्यावर जे काही हाती गवसले ते या लेखात संकलित करीत आहे.
- कुलटोड, ( www.cooltoad.com , नोंदणी आवश्यक ) इस्निप्स ( www.esnips.com नोंदणीची गरज नाही पण त्यांचा डाउनलोडर वापरावा लागतो. ) या साइटसवर अजूनही असंख्य मराठी जुनी गाणी आहेत. अजूनही कुलटोड वरून सर्च करून तुम्ही सहज हवे ते गाणे उतरवू शकता पण बाकी वेब-साइटस तुम्हाला फक्त गाणे ऐकायची सवलत देतात. उदा. www.in.com, www.raaga.com . www.aathavanitli-gani.com ही वेब-साइट संपूर्ण मराठीत आहे, गाण्यांचे बोल सुद्धा दिलेले आहेत, दी बेस्ट !
- आडमुठ्या वेब-साइट्ना वठणीवर आणणारा उपाय आहे तो म्हणजे इंटरनेट डाउनलोड मॅनेजर ( आय.डी.एम ) हे सॉफ़्टवेयर वापरणे. हा प्रोग्राम वापरल्यास गाणे ऐकत असतानाच ते तुम्हाला उतरवता येते ! आय.डी.एम. ची अजून एक कमाल म्हणजे त्यात असलेला "साईट ग्रॅबर" हा पर्याय ! हा पर्याय वापरून तुम्ही एखाद्या साइटसवर असलेली सर्वच्या सर्व एम.पी.3 गाणी (किंवा त्या वेब साइटसवरील हवे असलेले काहीही ! ) एका झटक्यात उतरवून घेवू शकता ! यात तुम्ही वेळ सुद्धा सेट करू शकता. म्हणजे आधी लिंक उतरवून घ्यायच्या व रात्री जेव्हा नेटचा स्पीड कमाल मिळतो ती वेळ सेट करून ठेवायची. ठरवलेल्या वेळी उतरवून घेण्याचे काम चालू होते. संगणकाचा मॉनिटर स्वीच ऑफ करून ठेवायचा. वीज व वेळ दोन्हीची बचत होते. काम आटोपल्यावर सांगितले असेल तर बापडा संगणक बंद सुद्धा करतो ! जबराट आहे हे सॉफ्टवेयर !
- यु-ट्यूब ( www.youtube.com ) वर सुद्धा अनेक मराठी गाणी आहेत. एरवी ती तुम्हाला फक्त ऐकता येतील पण आय.डी.एम असेल तर तुम्हाला ती flv मध्ये उतरविता येतील.
- मायाजालावर flv चे mp3 मध्ये परिवर्तन करणारा प्रोग्रॅम सुद्धा आहे !
- मायाजालावर मिळणारी गाणी 128 ते 320 या बीटरेटने ( Bit Rate in Kbps ) साठविलेली असतात. साधारण 3 मिनिटाचे एक गाणे 3 ते 4 एम.बी. एवढी जागा व्यापते. हेच गाणे जर 64 केबीपीएस बीट रेट मध्ये परावर्तित केले तर दीड ते दोन एम.बी. एवढीच जागा व्यापेल ! म्हणजेच नेहमीपेक्षा दुप्पट गाणी तुम्ही तेवढ्याच जागेत बसवू शकाल ! अर्थात दर्जाशी थोडी तडजोड करावी लागेल पण इयरफोन कानाला लावून गाणी ऐकत असाल तर तेवढे तुम्हाला जाणवणारही नाही !
- तुमच्या कडे गाण्यांच्या सीडी असतील तर त्यातली गाणी सुद्धा तुम्ही सहज एम.पी.3 मध्ये बदलू शकता. त्यासाठी Audio Grabber नावाचा प्रोग्राम उपलब्ध आहे.
- संगणकावर गाणी ऐकताना तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्यांची यादी बनवून (प्ले-लिस्ट) ऐकायची सोय असते पण अनेकदा तुमच्या मोबाइलमध्ये ही सोय नसते. काही मोबाइल गाण्याच्या एम.पी.3 टॅग प्रमाणे वर्गवारी करतात (ऑटो लिस्ट जनरेशन ) पण त्यासाठी मूळात गायकाचे नाव, अल्बमचे नाव, जातकुळी (Genre) इत्यादी माहिती फाइलीत साठविलेली हवी. समजा मला लावण्यांची एक यादी बनवायची आहे व माझ्या मोबाइलमध्ये स्वत:च्या आवडीप्रमाणे यादी बनवायचा पर्याय नसेल तर काय ? यावर सुद्धा उपाय आहे तो म्हणजे एम.पी.3 टॅग एडीटर ! याचा वापर करून तुम्ही गाण्याचे टॅग बदलू शकता केव्हा नसतील तर टाकू शकता. तुम्ही हवे असलेले टॅग टाकून घेतलेत जसे गायक, संगीतकार, गीतकार, चित्रपट, गाण्याचा प्रकार की मग तुमचा मोबाइल त्या प्रमाणे यादी बनवून देइल. अनेकदा मोबाइल वर गाण्यांची यादी बघताना फाइल गाण्याच्या नावाने सेव केली असली तरीही गाण्याचे नाव न दिसता "ट्रॅक 1" असे काही दिसते. त्यामुळे गाणे कोणते आहे तेच कळत नाही ! गाण्याच्या टॅग मध्ये टायटल या प्रकारात जी माहिती साठविलेली असते तीच तुमचा मोबाइल दाखवित असतो. टॅग एडीटर वापरून तुम्हाला या समस्येवर सुद्धा मात करता येते. गाण्याच्या नावाप्रमाणे फाइल असेल तर एका क्लिकसरशी तुम्ही ते नाव टायटलमध्ये अपडेट करू शकता ! टायटल असेल पण फाइल नाव मात्र वेगळेच काही, जसे फाइल 1, 2 असे असेल तर हाच प्रोग्राम वापरून तुम्हाला एका झटक्यात सर्व फाइल टायटल प्रमाणे रीनेम करता येतात.
यात नमूद केलेली सर्व सॉफ्टवेयर मायाजालावर अगदी मोफत उपलब्ध आहेत व याचा वापर करताना एकाच वेळी अनेक फाइल हाताळता येतात (बॅच मोड ) . या सगळ्यांच्या लिंक मी देत आहे सोबत "मीडीया फायर" या फाइल शेयरींग वेब-साइटवर असलेला जुन्या , सुमधुर मराठी गाण्यांच्या खजिन्याची किल्ली ( लिंक्स किंवा दुवे ) मी तुम्हाला देत आहे.
मराठी गाण्यांच्या लिंक्स
गीतरामायणातील निवडक गाणी (बाबुंजीच्या निवेदनासह )
लेखात उल्लेख असलेली सर्व सॉफ्टवेयर उतरविण्यासाठीची लिंक.
महत्वाची सूचना :- या लेखातील माहीतीचा वापर ज्याने त्याने आपल्या जोखमीवर करायचा आहे. मायाजालात मिळालेल्या लिंक मी फक्त देत आहे. या बाबत कोणत्याही प्रकारे मला जबाबदार धरता येणार नाही. धन्यवाद !