शनिवार, २ जुलै, २०११

माझी संगीत साधना !


 

संगीताच्या नादामुळे नोकरीला लागल्यावर मी स्वत:च्या पैशाने सर्वात आधी काही विकत घेतले असेल तर तो स्टीरीओ प्लेयर ! त्याच्यावर वाजवायला कॅसेट विकत घ्यायच्या म्हटल्या तर आर्थिक ओढाताण व्हायची ! एक कॅसेट तेव्हा 40 रूपयाच्या आसपास मिळायची व तिच्यावर गाणी सुद्धा जेमेतेम बारा असायची. या बारात सुद्धा पाणी घातलेले असायचे. जेमेतेम चार गाणी आपण ऐकलेली असायची व बाकी सगळी भरताण ! एच.एम.व्ही. तुमच्या आवडीची गाणी भरून हवी असतील तर तब्बल 400 ते 500 रूपये घ्यायची ! सर्व जुन्या गाण्यांचे हक्क त्यांच्याकडे असल्याने त्यांची मनमानी सहन करायला लागायची. गुलशन कुमारच्या टी सिरीजने जरा स्वस्तातल्या कॅसेट बाजारात आणल्या पण त्यातली गाणी वाद्यवृंदातल्या कलाकारांनी गायलेली असायची ! कॅसेटच्या कवर वर मोठ्या अक्षरात लिहिलेले असायचे "लताके सदाबहार नगमे" आणि मागच्या बाजूला कोपच्यात कोठेतरी "संग बाय बाबला" असे बारक्या टायपात लिहिलेले असायचे ! सीएसटी ते चर्चगेट पायी गेलात तर अनेक कॅसेट विक्रेत्यांनी फूटपाथवर ठाण मांडलेले आहे. त्यांच्याकडे एच.एम.वी किंवा अशाच नामांकित कंपन्यांनी काढलेल्या कॅसेटच्या नकली कॅसेटस मिळायच्या पण कायद्याच्या कचाट्यात सापडू नये म्हणून त्यांना एको इफेक्ट दिलेला असायचा. सर्वच गाणी काही एको मध्ये ऐकायला बरी वाटत नाहीत. बरे या नकली कॅसेटस घेतल्या तर हेड खराब व्हायची भीती असायची व अनेकदा त्या अडकून सुद्धा पडायच्या.


 

यातुन मार्ग होता तो म्हणजे कोर्या (ब्लँक ) कॅसेटस विकत घ्यायच्या . ब्लँक कॅसेटस भारतात सुरवातीला बनत नव्हत्या. नंतर केव्हातरी मुरूगप्पा म्हणून साउथच्या कंपनीने बनविलेल्या दर्जदार व परवडणार्या कॅसेट दूकानात मिळू लागल्या. सोनी व टीडीके या परदेशी कॅसेटस तेव्हा खूप लोकप्रिय होत्या पण त्या स्वस्त मिळतात म्हणून रस्त्यावर घ्यायला जावे तर फसवणूक होण्याची शक्याताच जास्त असायची. असली विदेशी कॅसेटस मिळाव्यात म्हणून मी कस्टमने जप्त केलेला माल विकणारी दूकाने तेव्हा पालथी घालत असे. टीडीके व सोनी च्या असली कॅसेटची किंमत 60 ते 80 रूपये होती. कॅसेट विकणारी काही दूकाने आपल्या आवडीची गाणी तुम्हाला रेकॉड करून देत, त्यांच्याकडून आपल्या आवडीची गाणी त्यात भरून घ्यायची. तेव्हा 60 मिनिटाच्या कॅसेटस मध्ये हवी ती गाणी भरण्यासाठी 15 तर 90 मिनिटाच्या कॅसेटसाठी 20 रूपये पडायचे. अर्थात हे बेकायदेशीर होते ! पण "तेरी भी चूप मेरी भी चूप" या तत्वावर ही दूकाने बिनबोभाट चालत असत. दूकानदाराला गाण्याच्या मुखडा व चित्रपट द्यावा लागायचा. अनेकदा गाणे माहीती असायचे पण ते कोणत्या सिनेमातेले ते आठवत नसे किंवा माहीतच नसे ! अशा वेळी मग एखादा जाणकार पकडायला लागायचा व बाबापुता करून त्याच्याकडून सिनेमा कोणता ते जाणून घ्यायला लागायचे ! काही दूकानात मात्र गाण्याचा अल्बमच असायचा, त्यातली गाणी निवडून घ्यायला लागायची. 60 मिनिटात 12 ते 14 तर 90 मिनिटाच्या ध्वनीफितीत 18 ते 22 गाणी बसायची. 12 गाणी हवी असतील तर पसंतीच्या क्रमाने गाणी लावून , त्यातले एखादे नाही मिळाले तर दोन चार अधिकची देवून ठेवायला लागायची. दूकानदार उरलेल्या जागेत तुम्हाला सनई वादन किंवा गाजलेल्या गाण्याचा वाद्यावर वाजविलेला तुकडा टाकून द्यायचा. किमतीच्या दृष्टीने हे खूपच परवडायचे कारण तुम्हाला चॉइस मिळायचा, लादलेल्या गाण्यांपासून सूटका मिळायची ! मी तेव्हा 100 च्या आसपास कॅसेट रेकॉर्ड करून घेतलेल्या होत्या. माझे घर म्हणजे तेव्हा अनेक कानसेनांचा अड्डा बनले होते. मित्रात एकमेकांच्या कॅसेटची देवाण-घेवाण सुद्धा चालू असायची.

माझा मुलगा प्रसाद वर्षाचा झाल्यावर त्याला अचानक माझा हा खजिना गवसला ! आधी या कॅसेटचा तो बंगला उभारत असे तेव्हा त्याच्या पडझडीत त्यांची संरक्षक कवर पार मोडून गेली. पुढे मात्र त्यातली फीत काढून ती घरभर पसरविण्याचा खेळ त्याला जास्त आवडला व बघता बघता हा सगळा संग्रह नष्ट झाला. मधली काही वर्षे नोकरीची धावपळ, संसाराचा सुर - ताल बसविण्यात गेली. संगीत ऐकणे थोडे बॅकसीटला पडले. वडाळ्याला परत रहायला आल्यावर आवडीच्या गाण्यांची यादी व एक कोरी कॅसेट घेवून नेहमीचे ओळखीचे दूकान गाठले पण गाणी रेकॉर्ड करून हवी आहेत म्हटल्यावर त्याने सरळ कानावर हात ठेवले ! जरा वेळ मला निरखून त्याने आतल्या खोलीत बोलावले व सांगितले की आता असले धंदे कोणी करत नाही. कायदा खूप कडक झाला आहे, कॅसेट कंपन्या बोगस गिर्हाइके पाठवून असे करणार्यांना थेट जेलमध्ये धाडतात. वर हा गुन्हा अजामिनपात्र आहे ! मधल्या काळात कॅसेटची सद्दी संपली होती व सीडीचे युग सुरू झाले होते. सीडी व सीडी प्लेयर दोन्ही तेव्हा मला परवडणारे नव्हते.

एम.पी.3 या शब्दांनी मात्र चमत्कार केला व प्रत्येक कानसेनाला अगदी तृप्त केले ! कंपन्याच्या कचाट्यातून संगीत मुक्त झाले, कानसेन तृप्त झाले ! मायाजालाचा प्रसार सुद्धा याच काळात जोमाने झाला व त्या मार्फत जुनी गाणी एम.पी.3 नेटवरून लोकांना सहज उतरवून घेता येवू लागली. पोर्टेवल एम.पी.3 प्लेयर आल्यावर तर धमालच झाली. आपल्याला हवी असणारी गाणी , हवी तेव्हा, हवी तिथे ऐकण्याची मुभा मिळाली. आता तर मोबाइलमध्येच एम.पी.3 प्लेयर असतो. आधी लोकलमध्ये मोबाइलचा स्पीकर ऑन ठेवून गाणी ऐकणार्यांनी वात आणला होता पण आता त्याचे अप्रूप संपले व जो तो इयरफोन कानात खूपसून संगीत साधनेत व्यग्र असल्याने लोकलेमधली भांडणे अंमळ कमीच झाली आहेत. संगीत ऐकताना ब्रह्मानंदी टाळी लागल्याने एखादा नेहमीच्या स्टेशनावर उतरत नसेल एवढेच !

मागील पोस्ट मधून विविध प्रोग्रामचा वापर करून मोबाइल संगीत साधना कशी करावी याचे धडे मी दिलेले आहेतच. तेव्हा मी मिडीया फायर या फाइल शेयरींग वेब-साइट वर उपलब्ध असलेल्या अनेक जुन्या, गाजलेल्या मराठी गाण्यांच्या लिंक दिल्या होत्या. आता त्या परत देतानाच जुन्या हिंदी गाण्यांचा खजिना तुमच्यासाठी खुला करीत आहे ! हा ठेवा कोणालाही हवा- हवासा वाटेल असाच आहे. यात 2 जीबीत बसतील अशी एकूण 635 एकसे एक गाणी आहेत . खुल जा सिम सिम !

तुम्हाला हवे असलेले एखादे गाणे यात नसेल तर मला कळवा. त्याची लिंक नेटवर शोधण्यासाठी मी नेटाने प्रयत्न करेन !

ब्लॉगच्या वाचकसंख्येने याच सुमारास वीस हजाराचा पल्ला पार केला आहे ! सर्व वाचकांचे अभिनंदन. लोभ आहेच तो वाढावा ही नम्र विनंती !


 

जुन्या हिंदी गाण्यांच्या लिंक्स.

चाहत

छेडछाड गीते

दर्दभरे गीत

देशभक्ती / स्फूर्ती गीते

मौसम

शास्त्रीय संगीतावर आधारीत हिंदी सिनेमातली गाणी

साजन

शायरी

जिंदगी

हिंदी सिनामातल्या गाजलेल्या कव्वाल्या.

अनुप जलोटा यांनी गायलेली भजने

संकीर्ण


 

मराठी गाण्यांच्या लिंक्स ( आधीच्या पोस्टमध्ये दिलेल्या आहेतच. सोयीसाठी परत देत आहे )

अभंगवाणी

गीतरामायणातील निवडक गाणी (बाबुंजीच्या निवेदनासह )

बेधुंदगीते.

भावगीते

देशभक्तीपर गीते.

नाट्यसंगीत

लोकगीते

निसर्गगीते

तमाशा/लावण्या

प्रेमगीत

विरहगीत

भावगीते

भक्तीगीते

संकीर्ण


 

महत्वाची सूचना :- या लेखातील माहीतीचा वापर ज्याने त्याने आपल्या जोखमीवर करायचा आहे. मायाजालात मिळालेल्या लिंक मी फक्त देत आहे. या बाबत कोणत्याही प्रकारे मला जबाबदार धरता येणार नाही. धन्यवाद !

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

एकदम सही आहे तुमचा ब्लॉग ...संगीतातून ब्रह्मानंदी टाळी लागते हे खरच आहे आणि तो ब्रह्म नेटच्या जाळ्यान घट्ट पकडूनही ठेवला आहे ..हवे तेंव्हा या तो तुमच्या सेवेला हजर....आता ब्रह्मालाही माणसाच्या बुद्धीचा हेवा वाटायला लागला असेल ....

अनामित म्हणाले...

Blog is great and thanks for the links : AA