नगरातील सदनातुन लखलखती लाख दिवे
क्षणभर की स्थिर झाले उल्कांचे दिव्य थवे
बघ वरती बघ धरती तेज:कण थरथरती
पुरूषार्थी मनुजाने निर्मियले गगन नवे
व्यर्थ तुझा यत्न नरा, जग ऐसे उजळाया
मिणमिणत्या शतपणत्या जातील पण त्या वाया
भवतीच्या तिमिरास्तव उपचार न हा वास्तव
अंतरिची ज्योत जरा उजळ जगा जगवाया
कोणाच्या ह्रदयातुन प्रेमाची ज्योत जळे
द्वेषाच्या वणव्यातुन मानवता होरपळे
हे येशु हे बुद्धा पाहुनिया या युद्धा
शांतीच्या वेदांचे वैफ़ल्य न काय कळे
देखाव्या दाही दिशा, दु:खाचा नाद उठे
जळती जरी दीप शते, तेजाचे नाव कोठे ?
अशुभा ही शुभ रजनी, जागृति ना अजुनी जनी
युद्धाच्या अंतातुन युद्धाचे बीज फ़ुटे
आक्रंदति आक्रोशती शोकाने भुवी भुवने
आनंदाने सौख्याची गाउ कशी नव कवने ?
प्रेमाविण विश्व झुरे शांतिचे नाव नुरे
तोवरी हे मंगलदिन जातिल जावोत सुने
कविवर्य वसंत बापटांची ही एक गाजलेली कविता. कालावधी माहीत नाही पण माझ्या वडीलांनी १९५४ साली ती कॉलेजच्या स्नेहसंमेलनात सादर केली होती ! कदाचित दुसर्या महायुद्धाच्या वेळची असावी. आज एवढी वर्षे उलटली तरी तिच्यातला अर्थ कोठेतरी आत अस्वस्थ करतो. त्यात जी शब्दरचना आहे ती सुद्धा अगदी सहज स्फ़ुरल्यासारखी आहे. अनुप्रासाचा अट्टाहास कोठेही नाही. ऐन दिवाळीत बापटांनी ही कविता जेव्हा सादर केली असेल तेव्हा किती गडबड उडाली असेल नाही ?