आपण सगळेच आपापल्या व्यवसायात अगदी आकंठ बुडालेले असतो. एवढे की कधी कधी प्रपंचाकडे सुद्धा आपल्याला पुरेसे लक्ष देता येत नाही. अशा स्थितीत समाजाकरता आपण काही तरी करावे ही रूखरूख अस्वस्थ करत असतेच ! समाजाचे आपण काही देणे निश्चित लागतो. ते फ़ेडायचे अनेक मार्ग आहेत. अनेक सामाजिक संस्था आपल्या कार्यकर्त्यामार्फ़त या कामात स्वत:ला झोकून देउन काम सुद्धा करत असतात. कधी तरी आपला या संस्थांशी संबंध येतो. त्यांच्या कामाचा आवाका बघून आपण नतमस्तक होतो. आपण या कामाला वेळ देउ शकत नाही याची खंत मग अधिकच बोचते !
सध्या खरी चणचण आहे ती झोकून देउन काम करणार्या कार्यकर्त्यांची. संघ परिवारातील अनेक संस्था या बाबतीत मात्र नशिबवान आहेत ! तळमळीच्या कार्यकर्त्यांची या संस्थाना कधी उणीव भासत नाही. या संस्थांनी अनेक दशके चांगले काम करून आपणा सर्वांचा विश्वास कमावला आहे. आपल्या कामाचा डंका पिटण्याची या संस्थांना सवय नाही व ते त्यांच्या तत्वात पण बसत नाही ! स्वत:हुन ते कधी तुमच्याकडे हात पसरणार नाहीत. पहिले आमचे काम बघा, आमच्या अमक्या प्रकल्पाला भेट द्या, मग तुमच तुम्हीच ठरवा काय ते ! असा त्यांचा खाक्या ! या संस्थाना पैसा कधी कमी पडत नाही तो या विश्वासापोटीच ! मागच्या वर्षी मी स्वत: उरणला वनवासी आश्रम संचालित एका आश्रम शाळेत गेलो होतो. निमित्त होते एका आदिवासी शाळेच्या नव्या वर्गाच्या उद्घाटनाचे ! जैन समाजाचे लोक बस भाड्याने करूनच तिकडे आले होते. प्रकल्प बघुन ते थक्कच झाले. काही नवीन प्रकल्प काही आहे का ? अशी विचारणा त्यांनी केली. संचालकांनी २० ते ३० लाख खर्च असलेल्या काही योजनांचा आढावा त्यांच्यापुढे मांडताच त्यांनी हा खर्च आम्ही करणार हे लगेच जाहिर करून टाकले ! त्यांनी बोलून दाखवले की तुमच्या बरोबर फ़ावडी-कुदळी घेउन काम करण्यात जास्त आनंद आहे पण ते आम्हाला व्यवसायामुळे शक्य नाही , पण चांगल्या कामाला पैसा कमी पडणार नाही याची आमच्याकडून हमी घ्या !
काही चांगले भावले की मी लगेच मित्रांपर्यंत तो विषय पोचवतो. काही अनिवासी मित्र मला अधूनमधून विचारत असतात, अमक्या तमक्याच्या स्मरणार्थ देणगी द्यायची आहे, कोठेही वाच्यता न करता , एखादी संस्था सूचव ! दान करण्यासाठी पैशाची श्रीमंती एक वेळ नसेल तरी चालेल , मनाची मात्र हवी ! मग अनेक फ़ालतु खर्च वाचवुन मदत करता येते. आपल्या वा आपल्या मुलांच्या वाढदिवसांचे आपण केवढे स्तोम वाजवतो, केवढा खर्च करतो ! हेच पैसे योग्य हाती पडले तर अनेकांच्या आयुष्यात सोनेरी पहाट उगवेल. हा विचार मी एकदा कामावर ऐकवला, झाली त्याला ५ वर्षे, माझी एक मैत्रीण तिच्या मुलीच्या वाढदिवसाला स्व. बाबा आमटे यांच्या “आनंदवन” या संस्थेला, देणगी देत आहे. मला सुद्धा हे माहित नव्हते ! कट्ट्यावरच्या एका मित्राने चॅट मार्फ़तच विचारले, अमक्या संस्थेला देणगी द्यायची आहे, पत्ता सांग ! मी लगेच “महार्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे” यांचा नंबर शोधून दिला. लगेच त्याने फ़ोनवरच संस्थेचा खाते नंबर घेउन इ-बँकिंगने पैसे जमा सुद्धा केले !
आपण केलेले दान , या हाताचे त्या हाताला सुद्धा कळता नये असे आपल्याकडे मानतात. त्या मागे काही कारणे असतीलही, पण आता त्याचा फ़ेरविचार करण्याची गरज आहे. चांगले काम लोकांपर्यंत पोचविण्यात गैर काय ? मी स्वत: मध्यमवर्गीय नोकरदार आहे. १९९३ साली साने गुरूजी स्मारकाचा एक कार्यकर्ता माझ्या घरी देणगीसाठी आला. माझ्या जडण घडणीत साने गुरूजींच्या लेखनाचा फ़ार मोठा वाटा आहे. ते ऋण अंशत: फेडण्याची ही संधी मी कशी बरे दवडली असती ? मदत केल्यावर मला काही तरी अजब , आगळे समाधान मिळाले. अनेक अनावश्यक खर्चाला फ़ाटा देउन मी दरवर्षी १०,००० रूपये दान करायचे हा संकल्पच सोडला. या निमित्ताने अनेक संस्थाची, त्यांच्या कामाची माहिती अनायसेच मिळत गेली. दहा वर्षात मी १,००,००० रूपयाहुन जास्तच , वेगवेगळ्या संस्थांना दान केले आहेत. मला कधीही काहीही कमी पडले नाही उलट कधी कधी तर “देता किती घेशील दो करांनी” असा अनुभव आला ! आज मलाच मी हे कसे करू शकलो याचे नवल वाटते. एकरकमी १ लाख तर मी स्वप्नातही देउ शकलो नसतो ! अर्थात याचे श्रेय माझ्या बायकोला सुद्धा आहेच, पण मुलांनी सुद्धा आम्हाला फ़टाके नको, वाढदिवस नको असे म्हणत माझ्या संकल्प सिद्धीस हातभार लावला ! गुजरात भूकंप, कारगिल निधी, आनंदवन, लांजा गावातील चाकरमान्यांची एक संस्था, विवेकानंद स्मारक , कन्याकुमारी, साने गुरूजी स्मारक, वनवासी कल्याण आश्रम, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, हिंगणे . ही त्यातल्या काही मान्यवर संस्थाची नावे !
याच सदराखाली मी तुम्हाला चांगले काम करणार्या सामाजिक संस्थांची माहिती देत जाईन, त्यांचे पत्ते देत जाईन. तुम्हाला योग्य वाटल्यास तुम्ही थेट अशा संस्थांना मदत करू शकता. अधिक माहिती घेउ शकता. यातल्या बहुतेक देणग्यांवर तुम्हाला करसवलत सुद्धा मिळेल. काही संस्थांचे प्रकल्प तर १०० % कर वजावट देणार्या योजनेतले आहेत. मदत चेक द्वारे, संबंधित संस्थेच्या नावाने चेक काढूनच करावी.
देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे !
अहो , म्हणजे त्या हातांचा देण्याचा गुण घ्यावा !! बघा मग तुमची अवस्था सुद्धा;
देणार्याचे हात हजारो,
दुबळी माझी झोळी !
किंवा -
तुम एक पैसा दोगे,
वो दस लाख देगा !
… अशी होईल ! काय, मग ? अनुभवणार ना देण्यातला आनंद ?
1 टिप्पणी:
मानले तुम्हाला अन ह्या अफाट उपक्रमाला... सर्व कुटुंबालाच सलाम !!
आपण बरेच काही करु शकतो हा विश्वास अजून ठाम झाला हे वाचल्यावर...
टिप्पणी पोस्ट करा