एकदा एखाद्याचे नाव कानफाट्या पडले की पडले ! माझ्यावर विसरभोळेपणाचा जो शिक्का बसला आहे त्या बाबतीत सुद्धा अगदी तसेच आहे ! मी विसरभोळा आहे हा आरोपच मला साफ नामंजूर आहे पण बायको माझ्या विधानाची संभावना “ आपण काही विसरतो हेच याला आठवत नाही !” अशा शेलक्या शब्दात करते ! खरे तर असल्या वावड्यांवर मी कधी विश्वास ठेवला नाही व ’मी तसा नाही’ असा खुलासासुद्धा कधी केला नाही पण याचाच पुढे फार त्रास होउ लागला ! “बायकोचे लग्नात काय नाव ठेवले हे सुद्धा हा विसरला (काय बरे ठेवले होते ?)” इतपत आरोप होउ लागल्यावर काही विचार करणे क्रमप्राप्तच होते. त्यात माझ्याकडून किरकोळ उसनवारी करणारे बिनदिक्क्कत तुझे पैसे/वस्तु केव्हाच परत दिली, पण तुझ्या लक्षात तर रहायला हवे ? असे सुनवू लागल्यावर मात्र मी पक्का निर्धार केला, इतप्पर झाले ते खूप झाले, आता काही म्हणजे काही विसरायचे नाही ! सुरवात करायची छत्रीपासून ! ४ जुन पासून सोबत छत्री बाळगायला सुरवात करायची ते भारत सरकार मानसून संपला असे पत्रक काढेपर्यंत ! अशी सवय झाली की विसरायचा प्रश्नच येत नाही ना ! पण दुर्दैवाने पावसाळा यंदा लांबला व पहिला पाउस पडायच्या आत माझी नवी कोरी छ्त्री हरवली ! छत्री हरवे म्हणून मग रेनसुट घेतला, पहिला थोडा स्वस्तातला घेतला म्हणून तो ही हरवला ! मग जरा भारीतला घेतला आणि मग पावसाला सुरवात झाल्याने त्याची बरीक सवय झाली ! पहिल्याच पावसात रेनसुटसह सीएसटीला पोचल्यावर लोकल मधून उतरताना सहज रॅकवर लक्ष गेले तर कोणीतरी छत्री विसरलेला दिसला ! थोडी चौकशी केल्यावर कोणी पुढे येइना म्हणून मी ती छत्री कामावर आणली व कोणी कधी विसरला तर त्याने ही वापरावी अशीही घोषणा केली ! या घटनेने माझा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला ! म्हणजे मी माझे काही न विसरता उलट दूसर्यांच्या हरवलेल्या वस्तूंची सुद्धा काळजी घेउ लागलो होतो ! मग मला ती सवयच लागली ! एरवीही मी लोकलमधून सगळ्यात शेवटी उतरतो, आता तसे करताना अगदी न विसरता कोणी काही विसरले असेल तर त्याला आठवण करून देउन त्यांचा दुवा घेउ लागलो. काही महाभाग मात्र मधल्याच स्थानकावर उतरले असल्याने असेल , त्यांच्या छत्र्या मलाच कामावर न्यायला लागायच्या ! एका महिन्यातच तब्बल १२ छत्र्या जमल्या ! नंतर पावसाने दडी मारल्याने लोक छत्री कमी नेत व विसरायचे प्रमाण सुद्धा घटले. पावसाने परत हजेरी लावल्यावर मी कामावर जमा केलेल्या छत्र्या कामावरच्या लोकांच्या कामाला आल्या ! दूसर्या अर्थाने सुद्धा कामाला आल्या, कारण अशा छत्र्या परत करायला सगळेच विसरले ! साले मला विसरभोळा म्हणायचे ! त्यातही काही जण त्या छत्र्या लोकलमध्ये विसरले ! धन्य आहे की नाही ? काही महाभाग तर ’त्या’ छत्र्या मोडक्या, फाटक्या, गळक्या होत्या अशी दूषणे देत, वर म्हणूनच त्या ते विसरले असावेत असे तारे तोडू लागले ! जाउ दे ! मी मात्र माझा रेनसूट न विसरता परत घरी न्यायला शिकलो !
पावसाचा लपंडाव असाच चालू होता, लोक छत्र्या विसरत होते, मी त्या न विसरता गोळा करून कामावर नेत होतो, कामावरचे मित्र घरी जाताना पाउस पडत असला की त्या न विसरता घरी नेउन आणायला मात्र विसरत होते ! एकदा मात्र कहरच झाला ! एकजण चक्क रेनसूटच रॅकवर विसरला होता ! मी सगळ्यांना विचारून बघितले पण तो घ्यायला कोणीच पुढे आला नाही तेव्हा नाइलाजाने मी तो माझ्या ताब्यात घेतला, चला आज जरा चेंज, छत्रीच्या ऐवजी रेनसूट ! मी लोकल मधून उतरत असतानाच एका तरूणाने मला ’अंकल, वो रेनसूट आपका नही है ना ?” असे विचारले. मी त्याला तो तुझा आहे का असे विचारले तर तो प्रामाणिक तरूण नाही असे म्हणाला, पण “कुछ दिन पहले मेरा खो गया है, अगर आपका नही है तो मै उसे रखलू क्या ?” असे आर्जव त्याने करताच मी तो रेनसूट लगेच त्याच्या हवाली केला !
घरी मी हा प्रकार साद्यंत कथन करतानाच मी आता काही विसरत नाही , उलट लोकांच्या हरवलेल्या वस्तूंची त्यांना आठवण करून देतो अशी सार्थ प्रौढी मिरवली ! या नंतर घरी एकदम सन्नाटाच पसरला ! बायकोने देवा समोर तुपाचा दिवा काय लावला, बराच काळ फोनाफोनी सुद्धा चालू होती ! मी आता काही विसरत नाही म्हटल्यावर यांना वाइट वाटणारच ना ! माझी थट्टा करायला हमखास मिळणारे एक कारण मी कायमचे नष्ट केले होते ना !
“थोबाड फोडीन परत बोललास तर, बाप आहे तुझा, याद राख !” असे काही मी उगीच चिडून बोललो नाही ! त्या दिवशी प्रसादने जरा अतिच केले. मला ट्रेकला जायचे होते म्हणून रेनसूट मधला टॉप मी शोधत होतो. तो मिळत नाही म्हटल्यावर तो प्रसादने घेतला असणे अगदी स्वाभाविकच होते. त्याला तसे विचारताच कुलदीपक म्हणाला की तुम्हीच तो “लोकल मध्ये दूसर्या कोणाला तरी देउन टाकलात “ म्हणजे स्वत: विसरला, आपली चूक कबूल करायची सोडून वर माझ्यावरच खापर फोडू लागल्यावर कोणता बाप चिडणार नाही ?
1 टिप्पणी:
हा हा हा !! हा हा हा !!.. का हसतोय तेच विसरलो मी ;-)
टिप्पणी पोस्ट करा