मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर असलेल्या पदपथावर कॅनन हा प्रसिद्ध पावभाजीचा स्टॉल आहे. त्याचे मालक मराठी आहेत. दूकानाची पाटी मराठीत हवी, नुसती मराठीतच नाही तर मराठी अक्षरे ठळक हवीत असा नियम आहे व त्याच्या अंमलबजावणीवरून बराच राडा झाला होता. कॅननची पाटी बघून मला धक्काच बसला ! जवळ जवळ ९० % जागेत इंग्रजी भाषेत Cannon असे लिहिले होते व मराठीला भिकारणीसारखे एका कोपच्यात उभे केले आहे. अर्थात कॅनन मध्ये पावभाजी खायला मी निदान ८० सालापासून जात आहे आणि आताच माझ्या हे कसे लक्षात आले याला माझ्याकडे काहीही उत्तर नाही. पण एकदा कळल्यावर गप्प बसणे हा सुद्धा माझा स्वभाव नाही. मी लगेच पत्राद्वारे सकाळ व महाराष्ट्र टाइम्स या मराठी वृत्तपत्रांना ही बाब कळविली. मटाने काही त्या पत्राची दखल घेतली नाही पण सकाळने मात्र ते आठवड्याभरानंतर छापले. माझे मूळ शीर्षक होते “महापालिकेच्या मराठी धोरणावर कॅननची तोफ”, ते सकाळने “कॅननला मराठीचे वावडे ?” असे केले. पत्रातली भाषा पण बरीच सौम्य केली होती. अर्थात लक्ष वेधण्याचे काम मात्र झाले !
आजच्या सकाळमध्ये कॅननचे मालक श्री. दांडेकर यांनी त्या पत्राला उत्तर दिले आहे. “कॅननला मराठीचे वावडे नाही” या आपल्या खुलाशात आपल्याला मराठीचा अभिमान असल्याचे नमूद करून ते पुढे म्हणतात की तो बोर्ड १९७४ पासून तसाच आहे. कॅनन या नावाचा मतितार्थ कळावा म्हणून तेव्हा तो तसा इंग्रजीत लिहीणे योग्यच होते. पण आता मात्र नवीन पाटी बनवून ते मराठीला इंग्रजीच्या डोक्यावर स्थान देणार आहेत. श्री. दांडेकर यांनी स्वत: याची दखल घेतली व खुलासा केला याबद्दल त्यांचे व या पत्राला योग्य प्रसिद्धी देणार्या दै. सकाळचे मनापासून आभार !
1 टिप्पणी:
Sahi ahe
टिप्पणी पोस्ट करा