मुलगी झाली हो !
कॉलेजात असताना "मुलगी झाली हो" हे पथनाट्य पाहीले होते. खूपच प्रभावी मांडणी होती. पण मला तरी तो विषय फारसा गंभीर वाटत नव्हता. आम्ही सर्व भावंड लोकशाही वातावरणात वाढलो , मुलगा-मुलगी असा भेद कधी जाणवला नाही, पटत पण नाही. मुलाने मुलासारखे असावे, मुलीने मुलीसारखे, it's all !लग्न झाल्यावर ज्या काही फार कमी मुद्द्यांवर एकमत झाले ते म्हणजे १) दोन मुलं हवीत २) मुल मराठी माध्यमात शिकतील ३) लोकशाही व्यवस्था. मला एकतरी मुलगा हवाच होता, हीला एकतरी मुलगी हवीच होती ! मला मुलगा हवा होता त्याच्याशी मस्ती करायला, मनसोक्त क्रीकेट खेळायला, मोठा झाल्यावर त्याच्या बरोबर ट्रेक करायला ! हीला मुलगी हवी होती तिला नटवायला, थटवायला, छान छान ड्रेस घ्यायला, स्वयंपाक करताना लुडबुड करण्यासाठी, माझ्यावर वचक , नजर ठेवण्यासाठी !पहील्या वेळी अनेक जाणकार सांगत होते की मुलगीच होणार पण झाला मुलगा ! दूसर्या वेळी सर्व लक्षणे मुलाची होती आणि मला टेंशन आले कारण मुलीसाठी अजून एक चान्स घ्यायला बाईसाहेब तयार होत्या ! बर्याच प्रतीक्षेनंतर , दिलेल्या तारखेनंतर ४ दिवस वाट बघून, शेवटी सिझरिंग करून प्रियाका जन्माला आली ! मुलगी झाली हो ! मी प्रथम तीला काचेच्या पेटीत ठेवलेले बघितले तेव्हाही ती माझ्याकडे मुठी वळवून बघत असल्याचा मला भास झाला !पहीली मुलगी धनाची पेटी असे म्हणतात पण दूसरी लेक माझ्यासाठी घबाड योगच घेउन आली ! तिच्या जन्माच्याच वेळेला, चक्क हॉस्पिटलच्या लॉबीत महीना १०,००० रू. चे काम done झाले ते पुढची १० वर्ष चालू होते !तिची skin खूप छान होती, अजूनही आहे ! आईने भरपूर शहाळ्याचे पाणी प्यायलाचा तो म्हणे परीणाम होता. तिच्या अंगावर लव अजिबात नव्हती. पण रंग मात्र सावळा होता. नर्स गमतिने म्हणायच्या "आउस बी गोरी नी बापूस बी गोरा ही काळी पोरगी कोणाची ?"३ महीन्यात तीने चांगलेच बाळसे घरले. माझ्याकडे मात्र ती बिलकूल येत नसे. मी हात लावला, जवळ गेलो की जी टाहो फोडायची की बस रे बस ! हीला सगळी कामे टाकून धावत यायला लागायचे. भटकायला , मस्ती करायला तीला मी हवा असे पण मांडीवर बसणे, जेवण भरवणे, झोपणे या साठी मात्र आईच ! सकाळी सकाळी माझे तोंड बघावे लागले तर टाहो फोडायची ! तू का आधी समोर आलास असा त्रागा करायची ! एकदा मात्र प्रियांकाला सडकून ताप आला, रविवार होता, दवाखाना बंद म्हणून तिला घेउन थेट हॉस्पिटल मधे गेलो. डॉक्टर बोलले अँडमिट करावे लागेल. महीलांचा वार्ड फूल होता म्हणून लहान मुलांच्या विभागात ठेवले , रात्रपाळीची जबाबदारी माझ्यावर आली. तापात सतत चढ-उतार चालू होता, माझा जागता पहारा होता, जरा ताप वाढताच पाण्याने पूसून काढत होतो, तीच्याशी गप्पा मारत होतो, हसवत होतो, अगदी नाईलाजाने ती हे सगळे करून घेत होती ! जागवलेल्या तीन रात्री अगदीच वाया नाही गेल्या, एकदाचे तिने मला accept केले !मग काय , घरी पण ती माझ्याबरोबरच आली. मग सूरू झाली आमची फूलटू धमाल ! माझ्या बायकोने मला जेवढे जोखले आहे त्याहून जास्तच मुलगी मला ओळखून आहे ! तीच्यावर मला हात उचलताच येत नाही, तिच्यापुढे आवाज चढवता नाही कारण त्याआ आधीच ती भोकाड पसरते, अगदी मीच तीला परत उचलून घेईपर्यंत ! बायको हे सगळे मस्त enjoy करते , लेक तुझ्या डोक्यावर मिर्या वाटणार आहे मिर्या असे बजावत असते ! प्रसाद ,मुलगा तटस्थ असतो आणि लेक आणि बायको बहुमत सिद्ध करून माझी अनेक वेळा गोची करतात ! मी कोणते कपडे घालायचे, मीशी काढायची का ठेवायची हे सर्व लेक ठरवते. तिच्या शाळेत कधी जायचा प्रसंग आलाच तर आधीच ठणकावून सांगते, बावळटासारखा यायच नाही, शर्ट ईन करायचा, पट्टा लावायचा, भांग पाडायचा ! एकदा तर मला तुला "काडीचीही अक्क्ल नाही" हे सत्य सांगून मोकळी झाली. आधी मला वाटले हीच बोलली ! दोन्ही मायलेकींचा आवाज फोनवर कमालीचा सारखा येतो ! मी प्रियांका असे म्हटले की फोनवर नेमकी ही असते ! देवा वाचव रे बाबा ! मुलगा स्वभावाने खूपच शांत आहे तर मुलगी भयंकर आक्रमक ! प्रचंड उत्साही, बडबडी ! भरतनाट्यम शिकली आहे आणि t.v. वर नाचाचा कोणताही कार्यक्रम चालू असला की घरी पण समांतर नाच चालू असतो ! मँच t.v. वर बघणे बहुदा आता इतिहासजमाच होणार आहे. प्रसाद थोडासा आईसारखा दिसतो तर प्रियांका माझ्यासारखी. पण तीला नुसते म्हणून बघा, काय चवताळते ! मी माझ्या आईसारखीच दिसते हे ठासून सांगेल! माझ्यावर घारीसारखी नजर असते. बहुतेक बरोबर येतेच. स्कूटरचा स्पीड जरा ४० च्या वर गेला की तंबी मिळते. वाटेत मल कोण भेटले, मी कोणाकडे बघितले, माझ्याकडे कोण बघत होते--- अगदी साद्यंत अहवाल गेल्या गेल्या गृहमंतत्र्यांना सादर होतो. कधी कधी खुलासा पण द्यायची पाळी येते ! पेपी घेते पण रीपोर्ट लिक करत नाही. जे घडले ते सांगतेच ! तर अशी ही माझी लेक, तिला मी लाडोवा, जयसूर्या (डावरी बँटींग करते म्हणून), धडाकेबाज, दांडगोबा याच नावाने हाक मारतो. एकदा बायको बोलली की या लाडोबाचे लग्न तरी करून देणार ना ? तर मी ठरवलय, मुलाला घरजावई म्हणून पाठवायचा आणि लाडोबाला घरजावईच आणायचा ! तेव्हा मित्रांनो, 'मुलगी झाली हो' असा टाहो फोडायची काही गरज नाही ! तशी बायको आपल्यावर अधिकार गाजवत असतेच, त्यात लेकीची भर ! म्हणतात ना 'एकसे भले दोन' !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा