दूसर्याला दिलेली वस्तू--
निदान कोकणस्थांत तरी उधार-उसनवारी केली जात नाही. संसारोपयोगी सर्वच वस्तू एक एक करून आपण घेत असतो आणि नसेल तर दूसर्यापुढे हात नक्कीच पसरत नाही. पण जे मिश्र वस्तीत रहात असतील त्यांचा मात्र वेगळा अनुभव असेल. कोणाकडे काय मागायचे याचा अक्षरश: काहीही घरबंध पाळला जात नाही. बरे वस्तू घेतल्या नंतर त्या वेळीच आणि आहेत तशा परत करा या किमान अपेक्षेवरही पार बोळा फिरवला जातो. अनेकदा आपली वस्तू परत मिळण्यासाठी सुद्धा शेजार्याच्या नाकदूर्या ओढाव्या लागतात ! काय आहेत तुमचे अनुभव ? कोणकोणत्या वस्तूंची उसनवारी होते ? असे कोणी काय मागितले तर तुम्ही काय करता ? दिलेली वस्तू आहे त्या स्थितीत आणि वेळेत परत मिळते का ? तुम्हाला कधी दूसर्याकडे काही मागायची वेळ आली होती/येते का ? काय करता अशावेळी ?
आमचे सगळे घराणे भीडस्त किंवा दूसर्याला उपयोगी पडावे या वृत्तीचे. आमची ही कीर्ती जिथे बिर्हाड करू तिथे अल्पावधीतच पसरायची. कोणी काय मागावे याला काही अंतच नव्हता. आई गमतीने म्हणायची नवरा-मुले मागितला नाही म्हणजे मिळवले ! आधी माम्ही कोणाला काय काय वस्तू उसनवारीवर दिल्या त्याची यादी देतो आणि ते मिळविताना झालेली दमछाक पुढच्या भागात..स्टूल, टेप (दोन्हीही), टी-पॉय, कँमेरा, मिकसर, कूकर, गँस शेगडी- सिलेंडॅर सकट, पाट, इस्त्री, टेबल-क्लॉथ, बूट, सँक, चाकू, सूटकेस, पुस्तके, करवत, हातोडी, चकल्या करायचा सोर्या, ईडली पात्र, मोदक पात्र, कढई, डबे, विविध खाण्या-पिण्याचे जिन्नस, बंटरी, ईमर्जन्सी बँटरी, सुई-दोरा, कुलुप, तोरण, सूतारकामाचे साहीत्य, पंखा----- बापरे ! अजून काय काय आठवू ?ठामपणे न दिलेल्या वस्तू-- एकदा एका बयेने आईकडे चक्क मंगळसूत्र घालयला मागितले होते, तर एकदा एकाला TV च हवा होता !
वडाळ्याला आम्ही नवेच होतो. समोरच्या एका मालवण्याकडे ७ दिवसाचा गणपती असायचा. त्याने गणपती असणार, घरी पाहुणे मंडळी येणार तेव्हा तुमचा कूकर द्या असे सांगितले. तसा कूकर तर रोज हवाच पण धार्मिक कार्य आहे तर का नाही म्हणा . दीला ! गणपती जाउन तीन दिवस झाले. परतीचे नाव नाही. आमची प्रचंड गैरसोय होत होती तेव्हा मी तो मागण्याकरीता त्याच्या घरी गेलो. तो काय, कोपर्यात पडलाय आणल्यापासून, बिघडलेला कूकर आम्हाला दीलात रे भटांनो ! छान ! मी उडालोच ! कोपर्यात कूकर न धूतलेल्या अवस्थेत पडला होता तो उचलला व सरळ घर गाठले. कूकर वापरायची काही माहीती नसल्यामुळे पहील्याच दिवशी त्याचा वाल् उडला होता. आम्हालाच खर्च करून तो बदलावा लागला ! एवढे सगळे घडूनही पुढच्या वर्षी कूकर आणि सोबत मिक्सर सुद्धा त्यांना हवा होता ! नाही दीला !
अनेक मित्रांनी माझ्याकडे कँमेरा उसना मागितला , मी दिला, त्यांनी तो मागेपर्यंत परत नाही केला, परत घेताना कधी त्याचा फ्लँश गुल करून दिला कधी लेन्सवर ओरखडे काढून दिले ! हे असे किमान चारदा घडले आहे ! पण एकदा अतिच झाले--साधारण ९० साली मी zenith हा रशियन SLR कँमेरा घेतला होता. हिमालयीन ट्रेक मध्ये ठाण्याचा एक डॉक्टर मित्र झाला. माझ्या घरी तो जेव्हा प्रथमच आला तेव्हा कँमेरा घेउनच गेला. नुसता कँमेरा नाही सोबत फोटोग्राफीवरचे एक नितांत सुंदर पुस्तक पण घेउन गेला. जो गेला तो गेलाच. परत द्यायचे पठ्ठ्या नावच काढेना ! मधल्या काळात माझ्या बहीणीचा साखरपुडा झाला, पुढे लग्न, पण मला फोटो बाहेरून काढायला लागले. अनेक फोन करून झाले, निरोप पोचवले पण पठ्ठ्या दाद देईना. शेवटी पोस्टकार्ड वर त्याचा पंचनामा केला तेव्हा त्याने पार जीर्ण झालेला कँमेरा परत केला, flash, timer cord आणि ते पुस्तक परतच नाही केले ! त्या पुस्तकासाठी मी फोर्ट मधेले सर्व फूटपाथ पायदळी तुडवले पण व्यर्थ !
चार्ली चँप्लीन चा मी जबरदस्त फँन आहे. प्लँनेट एम मधून त्याच्या लघुपटांचा एक संच ( १७ सीडी, १ पूर्ण लांबीचा चित्रपट, Gold Rush) विकत घेतला होता. अनेक मित्रांनी तो write करून घेण्याकरीता मागून घेतला. एका कडून दूसर्याकडे, कधी परस्पर, कधी माझ्याकडे परत केल्या केल्या--. हा सिलसिला एक वर्ष चालू होता. मग तो कोणाकडे आहे याचाही track मला राहीला नाही. अचानक घरी मुलांना त्याची आठवण झाली. सौ ने ठणकावून सांगितले की चार्ली घरी परत आलाच पाहीजे. अनेकांना विचारून बघितले, सगळ्यांनी कानावर हात ठेवले ! शेवटी बारकाईने चौकशी केल्यावर तो माझ्या एका महीला सहकार्याकडे असल्याचे पुरावे मिळाले. पण विचारणार कसे ? घरून दबाव वाढू लागला तेव्हा हिंमत करून विचारले एकदाचे ! आहे, मागचे सहा महीने मझ्याकडेच आहे ! मग परत क नाही केला ? तुम्ही कोठे मागितला ? ! उद्या आणा मग . आणला एकदाचा. परत त्याला spot demand आली. एकदा घरी बायकोला दाखवितो मग आणतो म्हणून सगळ्यांना थोपवून धरले. त्या दिवशी डबा आणला नव्हता म्हणून बँग नव्हती. तरी न्यायचाच असे ठरवले. पनवेलला घरी पोचलो आणि आठवले की तो संच ट्रेनमध्येच विसरलो आहे ! बायकोने कपाळावर हात मारून घेतला. स्वत: घरी येतोस हेच खूप आहे ---! दूसर्या दिवशी कामावर गेलो तर तो संच माझ्या टेबलावर ! हा काय चमत्कार ? मला कळेचना. मग कळले की त्या दिवशी तो संच मी घरी न्यायचाच विसरलो होतो !सूटलो बाबा एकदाचा. चार्ली स्वगृही आला एकदाचा !(टीप :- मला कोणाला नाही म्हणता येत नाही तेव्हा हा संच माझ्याकडे मागून खर्या मित्रांनी मला अडचणीत आणू नये ही विनंती )
उसनवारीवर शेजार्यांना दिलेल्या वस्तू काही राहून गेलेल्या वस्तू--पुरण यंत्र, मेदूवडा यंत्र, Extention Cord ! स्टँपलर !पनवेलला नवे असताना खाली राहणार्या शेजारणीचा गँस संपला. दूसरा गँस पण संपला आणि बाईला आठवले की आपण अजून पहील्याचा नंबरच दिला नाही आहे ! आम्ही शेजारधर्म म्हणून आमचा पण गँस तिला दिला. त्या आधी थोडेच दिवस आमचा पण एक सिलेंडर रिकामा झाला होताच. 'ही'पण नंबर द्यायला विसरली व 'ती' पण !परत काही दिवसांनी आमचाही गँस संपला व प्रचंड गोंधळ झाला !वडाळ्याला काही दिवस काढल्यावर शेजार्यांना समजले की बायको खाष्ट आहे तर नवरा आपला साधा-भोळा. त्याला काही नाही म्हणता येत नाही. तेव्हा शेजारी मी घरी असताना मागायला येउ लागले ! अर्थात मलाही नही म्हणता येत नसेच ! शेजार्याने वस्तू परत नाही दिल्या की आमचीच घरी भांडणे होउ लागली ! तेव्हा मी ठरवले की स्वयंपाक घरातल्या वस्तू द्यायच्या भानगडीत मी पडणार नाही. तरीही एकदा ही माहेरी गेली असताना आमचा शेजारी चकलीचा सोर्या घेउन गेला. मी परत मागायला विसरलो तो द्यायला ! बायको आल्यावर सोर्या जागेवर नाही हे तिच्या लक्षात आलेच पण मी कानावर हात ठेवले. मी कामावर असताना शेजारीण माझ्या बायकोला भेटली व सोर्या एवढच बोलल्यावर बायको सापडत नाही असे बोलताच ती तो आमच्या कडे आहे असे म्हणाली ! वर बायकोलाच तो कसा वापरायचा ते दाखवा असे सांगू लागली ! त्या नंतर घरी आल्यावर जे स्वागत झालंय -- कोणाही नवर्याच्या वाट्याला असे स्वागत न येवो ही देवाचरणी प्रार्थना !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा