स्वभाव !
रामकृष्ण परमहंस गंगेत आंघोळ करत असतात. गंगेच्या प्रवाहाता गटांगळ्या खाणारा एक विंचू त्यांना दिसतो. त्या विंचवाला स्वत:च्या ओंजळीत धरून ते त्याला काठावर सोडायला बघत असतात, तो विंचू त्यांना दंश करतो व त्यांच्या ओंजळीतून निसटून पुन्हा गटांगळ्या खायला लागतो. रामक़ृष्णांनी त्याला वाचवायला जावे व त्याने दंश करून परत पाण्यात पडावे असा प्रकार बराच काळ चालू असतो. दूसरा एक सज्जन हा प्रकार बघून परमहंसाना म्हणतो बूडू द्या त्या विंचवाला, आपला दंश करण्याचा गुण काही तो सोडणार नाही. यावर परमहंस म्हणतात की तो जर आपला दंश करण्याचा गुण सोडत नसेल तर मी माझा मदत करण्याचा गुण का सोडू !
देवाचा अपराधी !
कृष्ण आणि त्याचा सखा अर्जून जंगलात फेरफटका मारत होते. त्या निबीड अरण्यात एका झोपडीत, पणतीच्या अंधूक प्रकाशात एक वृद्ध स्त्री कृष्णनामाचा जप करीत होती. तिने आपल्या शेजारी तलवार पण ठेवली होती ! अर्जून आश्चर्य वाटून कृष्णाकडे सूचक अर्थाने बघतो. त्याला कृष्ण सांगतो की तूच आत जाउन तिला विचार पण तुझी ओळख तिला सांगू नकोस ! अर्जून झोपडीत जाउन त्या वृद्ध स्त्रीला नमस्कार करतो व तलवार बाळगण्याचे कारण विचारतो. ती वृद्ध साध्वी सांगते कि त्या तलावारीने ती द्रौपदी व अर्जूनाचा शिरच्छेद करणार आहे. थरथर कापत अर्जून कारण विचारतो. ती सांगते आपली अब्रू राखण्यासाठी द्रौपदीने जेव्हा कृष्णाचा धावा केला तेव्हा तो बिचारा जेवण अर्धवट सोडून तिच्या रक्षणासाठी धावला. महापराक्रमी असे तिचे ५ पती तेव्हा कोठे गेले होते ? देवाला असं जेवणावरून उठवणे चांगले का ? कसाबसा अर्जून 'अर्जूनाचा' अपराध विचारतो. त्यावर ती वृद्धा क्रोधाने लालेलाल होते, तलवार हातात घेउन ती फणकार्याने म्हणते,"एक वेळ मी द्रौपदीला माफ करेन पण अर्जूनाला अजिबात नाही ! त्या शेळपट अर्जूनाने कृष्णाला चक्क आपला सारथी बनवले. कृष्णाने त्याच्यावरचे सर्व घाव आधी आपल्यावर झेलले, आपली प्रतिज्ञा सुद्धा मोडली ! एका सामान्य माणसाने देवाला दावणीला तरी किती बांधावे !" या नंतर अर्जून अंतर्मुख होउन बाहेर पडतो.
लोक म्हणजे ओक !
गुरांच्या बाजारातून ते दोघे बाप-लेक गाढव खरेदी करून आपल्या गावाकडे जात असतात. बाप साधारण पन्नाशीच्या घरातला तर पोरगा तरणाबांड ! वाटेत जे पहीले गाव लागते त्याच्या चावडीवर चार चहाटळखोर बसलेले असतात. ओझी वहायलाच जर गाढव घेतले आहे तर किमान पोरानेतरी त्यावर बसायला काही हरकत नाही असे त्यांचे मत पडते. लगेच बापाच्या इशार्यावरून पोरगा गाढवावर बसतो. पुढच्या गावातल्या चावडीवर म्हातार्या बापाने तरी पायी का चालावे असे मत पडते. गाढव काय ओझी वहायलाच तर जन्माला आले आहे. झाले ! बाप व लेक दोघेही गाढवावर स्वार होउन पुढच्या गावाकडे मार्गस्थ झाले ! पुढच्या गावाची चावडी बोलते की गाढव असले म्हणून काय झाले, त्याच्यावर बाप-लेक दोघेही बसणे हे गाढवपणाचे आहे, पोरगा तरूण आहे त्याने बरोबर चालायला काय हरकत आहे ? पोरगा आता पायउतार होतो ! पुढच्या गावात बाप गाढवावर व लेक पायी हे लोकांना बघवत नाही, तेव्हा बापही पायउतार होतो. पुढचे गाव भूतदया वाल्यांचे असते. त्यांच्या मते आता आयुष्यभर त्या गाढवाकडून काबाडकष्ट करून घ्यायचेच आहेत तर निदान घरी नेताना तरी या दोघांनी त्याला उचलून न्यायला काय हरकत आहे ! भूतदयेच्या गोष्टी काय फक्त पुस्तकात ठेवायच्या काय ? बाप-लेकांवर याचा फारच परिणाम होतो. ते एका काठीला त्या गाढवाचे चार पाय बांधतात व कावड करून त्या गाढवाला वाहू लागतात. गावातली उनाड मुले धिंगाणा घालत त्यांच्या मागोमाग चालू लागतात. या गोंधळाने गाढव बावचळते, हात-पाय झाडू लागते. शेवटी एका पुलावरून जाताना काठी मोडून ते नदीत पडते !
ज्ञान आणि भान !
गुरूकडून सर्व विद्यात पारंगत होउन ते ४ शिष्य आपल्या घरी निघाले होते. वाट जंगलातली होती. आपण शिकलेल्या तंत्र आणि मंत्र विद्येचा उपयोग करायला ते अगदी उत्सूक होते ! एके ठीकाणी पावलाचे काही ठसे उमटले होते. ते बघून एक शिष्य सांगतो की ते ठसे वाघाचे आहेत. दूसरा त्या ठशांचा माग घेत सांगतो की तो वाघ जखमी होउन आसपासच कोठेतरी असला पाहीजे व लगेचच त्याला एका झाडीत मरून पडलेला वाघ सापडतो ! आता तिसरा शिष्य पुढे येतो व सांगतो की मी आता माझ्या मंत्र-सामर्थ्याने या वाघाला जिवंत करणार आहे. यावर चौथा शिष्य हे योग्य होणार नाही असे त्याला समजावतो पण बाकी तिघे त्याची अक्कल काढतात व तूच सगळ्यात ढ होतास, आमच्यावर जळू नकोस म्हणून त्याला गप्प करतात. बिचारा वेडा शिष्य अधिक वाद न घालता एका झाडावर चढून बसतो. मंत्र जागराने वाघ जिवंत तर होतो पण उपास सोडण्यासाठी त्या तिन्ही विद्वान शिष्यांना स्वाहा करतो !
कशाला उद्याची बात ?
एक शेटजी, अर्थातच पैसा हेच सर्वस्व मानणारा ! भल्याबुर्या मार्गाने पैसे कमाविण्यात आयुष्य जाते व शेवटी अंतकाळ जवळ येतो. मृत्यूची चाहूल त्याला अस्वस्थ करते. आपल्या मुनीमजींना तो सांगतो मी जो पैसा कमावलेला आहे तो माझ्या पुढच्या किती पुढ्यांना पुरणार ते जरा सांगा ! मुनीमजी सांगतात की शेटजी तुमच्या १२ पिढ्या या पैशावर सहज पोसतील पण तेराव्या पिढीला थोडी अडचण जाणवेल. शेटजी आता दु:खी होतो ! अरेरे, थोडी अजून मेहनत घेतली असती तर ? इतक्यात त्याला कोणीतरी सांगते की फलाण्या गावात कोणी एक ब्राह्मण राहतो, त्याला तू एक वेळचे जेवण दान म्हणून दिलेस तर तुझी तेरावी पिढी पण बसून खाईल ! शेटजी लेगेच त्या गावाला पोचतो. एका देवळातून दूपारी बाहेर पडताना तो त्या ब्राह्मणाला गाठतो व त्याला जेवण घेण्याचा आग्रह करतो. ब्राह्मण त्याला नम्र पणे नकार देतो व सांगतो माझे आताच जेवण झाले आहे आणि पोट भरल्यावर पुन्हा अन्न ग्रहण करणे पाप आहे. आता शेटजी सांगतो की मग हे जेवण आत्ता ठेउन घ्या व उद्या घ्या ! ब्राह्मण म्हणतो मी उद्याची काळजी केव्हाच करत नाही आणि शिळे अन्न खात नाही, माझी काळजी त्या उपरवाल्याला ! शेटजी विचारत पडतो. या ब्राह्मणाला उद्याच्या जेवणाची काळजी नाही व आपण आपली तेरावी पिढी बसून खाउ शकत नाही म्हणून दु:खी होत आहोत ? या विचाराने मरताना तरी तो समाधानाने मरतो !
जे होते ते चांगल्यासाठीच !
एका राजाचा एक विश्वासू प्रधान असतो. काहीही झाले तरी तो एकच वाक्य म्हणायचा, जे काही होते ते चांगल्यासाठीच होते ! एकदा ते जंगलात शिकारीसाठी गेलेले असताना राजाचे बोट कापले जाते व प्रधान त्याच्या सवयीप्रमाणे "जे होते ते चांगल्यासाठीच होते" असे म्हणतो. राजाला हा आपला अपमान वाटतो व तो प्रधानाची रवानगी थेट अंधारकोठडीत करतो. पुढे राजा शिकारीच्या नादात जंगलात वाट चूकतो व सैन्यापासून वेगळा पडतो. नरबळीची प्रथा पाळणार्या एका आदीम जमातीच्या तावडीत सापडतो. राजा बळी जाणारच असतो पण त्याचे तूटलेले बोट ऐनवेळी त्याला तारून नेते. (बळी देताना व्यंग असलेला मनुष्य चालत नाही.) राजा परततो व प्रधानाची शमा मागून त्याला मुक्त करतो व गमतीने विचारतो की माझ्या बाबतीत जे घडले ते योग्यच घडले पण तुला अकारण तुरूंगात खिचपत पडावे लागले हे कसे योग्य होते ? प्रधान हसत हसत म्हणतो, महाराज मी तुमचा सेवक, शिकारीत मी तुमच्या बरोबर असणारच होतो. मी ही वन्य जमातीच्या तावडीत सापडलो असतोच. तुम्ही सूटलात मी मात्र बळी गेलो असतोच ! तुरूंगात असल्यामूळेच वाचलो !
लोभ आणि शोभ !
दिलावर व मुजावर यांचा व्यवसाय असतो मालकाकडून वृक्ष विकत घेउन ते तोडायचा व त्याचे लाकूड विकायचा. असाच एकदा ते पिंपळाचे मोठे झाड विकत घेतात १०० रूपयांना. दूसर्या दिवशी झाड तोडायला घ्यायचे नक्की करून ते आपल्या घरी परततात. त्या रात्री ते पिंपळाचे झाड मनुष्य रूपात दिलावरच्या स्वप्नात येते व जीवनदान मागते. हे ही सांगते की त्याच्या मुळात थोडे खणल्यास एक सोन्याची पहार त्याला मिळेल ती दोघा मित्रांनी विकून नूकसान भरून काढावे. दिलावर त्याप्रमाणे खणून ती पहार काढतो. पण मग त्याची बुद्धी फिरते. आपल्य मित्राला अर्धे पैसे देण्यापेक्षा हे झाड तोडूनच टाकावे. काय करणार ते झाड आपले असा विचार करून तो मजूर गोळा करून झाडावर शेवटी कु-हाड चालवतोच. कु-हाडीचे घाव बसत असताना त्या झाडातून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागतात. पण दिलावरला तरीही सत्य सांगावे असे वाटत नाही. झाड संपूर्ण तोडूनच तो घरी परततो. पाहतो तो काय त्याच्या घराभोवती बघ्यांची गर्दी जमली होती. त्याचा तरूण मुलगा रक्ताच्या उलट्या होउन मेला होता. त्याची बायको सगळ्यांसमोरच त्याच्या पापाचा पाढा वाचते व मुलाच्या मृत्यूला याचा लोभच कसा नडला ते सगळ्यांना ओरडून सांगते.( कर्माचा अकाट्य सिद्धांत या आसाराम बापूच्या पुस्तकातील सत्यकथा )
देखावा !
एक सज्जन मेल्यावर चित्रगुप्ताच्या दरबारात येतो. त्याचे खाते बघून चित्रगुप्त निर्णय देतो की स्वर्ग की नरक घ्यायचा ते या माणसानेच ठरवावे ! दूत त्या माणसाला आधी नरकात आणतात. तिकडे त्याला आपले सगळे जुने मित्र, नातलग भेटतात. अगदी मजेत असतात ते. मेजवान्या झोडत असतात, उंची मद्य रीचवत असतात, गात असतात, नाचत असतात, अगदी publically hug सुद्धा करत असतात. याला तर अगदी राजेशाही वागणूक मिळ्ते ! त्याला कळॅतच नाही की हा नरकच आहे का ?आणि असेल तर मग स्वर्ग काय वेगळा असणार ? सोबतच्या देवदूताला तो सांगतो की मी नरकातच माझ्या मित्रांबरोबर राहणार ! दूत सांगतो की नियमाप्रमाणे तुला स्वर्ग बघावाच लागेल आणि मग काय ते ठरव. उपचार म्हणून हा माणूस स्वर्ग बघतो. तेच सगळे, अप्सरा, त्यांचा नाच, निवांतपणे सूरापान, देवाचा दरबार ई.ई ! त्याचे मन काही त्यात रमत नाही. तो सांगतो मला नरकातच टाका ! देवदूत त्याला नरकात ढकलून देतो. पण आता नरकातला चकचकाट त्याला कोठेच दिसत नाही. सगळीकडे नुसते घाणीचे साम्राज्य पसरलेले, दुर्गंध, कोंदटपणा, रोगट , खंगलेली , कचाकचा भांडणारी, अर्वाच्य शिव्या देणारी माणसेच त्याला दिसतात. सत्य काय व स्वप्न काय तेच त्याला कळत नाही ! आधी त्याला hug करणारी माणसेच आता आपल्या 'असली' रूपात त्याला दिसतात, कसे फसवले असे म्हणत !
न संपणारी गोष्ट !
आटपाट नगराचा एक राजा असतो. त्याला एक राजकन्यासुद्धा असते व ती ह्ट्टी सुद्धा असतेच असते. त्यातच तीला नव-नवीन गोष्टी ऐकायचे व्यसन जडते. राजा पंचक्रोशीतल्या सगळ्या कथाकारांना पाचारण करतो आपल्या कन्येचा हट्ट पुरवायला. देशोदेशीच्या गोष्टी ऐकून राजकन्या अजूनच चेकाळते. आता तीला हवी असते न संपणारी गोष्ट ! आता राजा दवंडीच पिटतो जो कोणी राजकन्येला न संपणारी गोष्ट सांगेल त्याला अर्धे राज्य वर राजकन्या फ्री ! पण जर गोष्ट संपली तर आजीवन कारावास ! अनेक जण प्रयत्न करतात, पण गोष्ट म्हटली की ती संपणारच ना ? एक दिवस, दोन दिवस, फार तर एखादा आठवडा ! (त्या काही मराठी मालिका आहेत, न संपणार्या !) शेवटी एक तरूण आव्हान स्वीकारतो पण एक अट घालून, राजकन्येने मधे मधे प्रश्न विचारून त्याची link तोडायची नाही व ती स्वत:च जेव्हा गोष्ट थांबव असे म्हणेल तेव्हा मी पैज जिंकलो असे मान्य करावे लागेल.
अट मान्य होते, न संपणारी गोष्ट चालू होते !एक आटपाट नगर असते. राजा कर्तव्यदक्ष असतो व प्रजा सुखी असते. एकदा दरबारात एक विदेशातला ज्योतिषि येतो व भयंकर भाकीत वर्तवतो, आजपासून बरोबर ५ वर्षानी राज्यात भयंकर दुष्काळ पडणार आहे. राजा ताबडतोब आपल्या मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावतो व काही उपाय सुचवण्यास सांगतो. चर्चा पुष्कळ दिवस चालते व ठरते की या संकटाचा सगळ्यांना मिळून सामना करायचा. युद्ध पातळीवर योजना राबवायच्या. ठरते की गावोगावी प्रचंड मोठी गोदामे बांधायची व पुढ्च्या पाच वर्षात अधिक उत्पादन व काटकसर करून ही गोदामे शिगोशिग भरून ठेवायची. दुष्काळ पडला की यातला धान्यसाठा वापरायचा. म्हणता म्हणता प्रचंड गोदामे उभी राहतात व धान्याने भरून पण जातात. त्या गोदामात उंदीर तसेच इतर प्राण्यांचा उपद्रव होउ नये म्हणून प्रभावी उपाययोजना केलेली असतेच पण नजरचूकीने म्हणा, हलगर्जीपणामुळे म्हणा एका गोदामाच्या छताला लहानशी फट राह्ते. त्या फटीतून एक चिमणी आत शिरते व धान्याचे प्रचंड भांडार पाहुन अगदी हरखून जाते !आपल्या इवल्याशा चोचीत ती एक दाणा धरते व मोठ्या आनंदाने बाहेर येते. हळूहळू ही बातमी सर्व चिमण्यांना कळ्ते. मग काय, दूसरी चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते, मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !
----असे बराच वेळ चालल्यावर राजकन्या वैतागते व म्हणते बरं बरं, एक लाख चिमण्या येउन जातात, पुढे सांगा ! तरूण म्हणतो, त्यानंतर एक लाख एकावी चिमणी येते, दाणा घेते व उडून जाते !--- शेवटी राजकन्या म्हणते, बरं, जगातल्या सगळया चिमण्या दाणे घेउन जातात, आता पुढे सांग. तरूण म्हणतो, त्यानंतर पुन्हा पहीली चिमणी येते, दाणा घेते उडून जाते !----. आता राजकन्या ओरडून म्हणते, बरं, आता त्या गोदामातले सगळे धान्य संपते, आता पुढे सांग ! तरूण सांगतो की त्या गोदामातले धान्य संपल्यावर चिमण्या असेच दूसरे ए गोदाम शोधून काढतात, त्यांच्या नशीबाने त्यात पण छताला लहानशी फट असतेच, अगदी चिमणी जाउ शकेल एवढीच ! त्यात एक चिमणी शिरते, इथेही प्रकंड धान्य साठा बघून ती ही हरखून जातेच ! एक दाणा घेउन बाहेर पडते व सगळ्यांना या नव्या गोदामाची माहीती मिळते. मग काय, इथेपण तीच गोष्ट परत चालू होते,मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !
----आता राजकन्येचा संयम संपतो, ती मोठ्याने ओरडून बस झालं, अगदी उबग आला आता, बंद कर तुझी ही गोष्ट असे सांगते. तरूणाला काय हेच तर हवे असते !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा