आटपाट नगर सधन म्हणावे असेच होते. प्रत्येकाची कसदार जमीन होती. सोने पिकत होते. अगदी शिणुमात दाखवितात तसे राव आणि रंक दोघेही सुखी होते. धान्याच्या कोठ्या कायम भरलेल्या असायच्या. पण याच समृद्धीने गावावर माकडांचे संकट ओढवले. माकडांच्या झुंडीच्या झुंडी धान्य फस्त करायला गावात धडकू लागल्या. आटपाट नगरातले लोक माकडांच्या त्रासामूळे अगदी हैराण झाले होते. गावात माणसे कमी व माकडे जास्त अशी स्थिती ओढवली होती. जिकडे बघावे तिकडे माकडेच माकडे. माकडांचे काय करायचे या पेचात नगरवासी पडले असतानाच त्या गावात एक मसिहा आपल्या नोकराबरोबर येतो. सोबत त्याने प्रचंड मोठे पिंजरे आणलेले असतात. गावकर्यांना तो जबरदस्त ऑफर देतो " माकडं आम्हाला, पैसे तुम्हाला !" एका माकडाला पकडून मसिहाच्या ताब्यात दिले की तो त्यांना रोख 25 रूपये देणार असतो.
माकडांच्या त्रासाने हैराण झालेले लोक आता माकडे पकडायच्या मागे लागतात . पकड माकड व कमव 25 रूपये ! बघता बघता गावातली बहुतेक माकडे पकडली जातात व मसिहाच्या पिंजर्यात बंद होतात. माकडांचा उपद्रव थांबतो वर रोख पैसेही मिळतात. गाववाले जरा उसंत घेत आहेत तो मसिहा नवे ऐलान करतो. एका माकडासाठी तो आता 50 रूपये मोजायला तयार होतो ! गावातली उरली-सुरली माकडे पकडून झाल्यावर गाववाले आता पंचक्रोशीतली गावे पालथी घालतात व मायंदळ पैका कमवितात. शेवटी अशी वेळ येते की त्या संपूर्ण टापूत औषधालाही मोकळे माकड दिसत नाही ! अनेक दिवस वाट बघून सुद्धा नव्याने माकडे मिळत नाहीत म्हटल्यावर मसिहा बोली एकदम 100 रूपयावर नेवून ठेवतो. गावकरी सुद्धा परत एकदा नव्याने कामाला लागतात. शेतीवाडीची कामे सोडून सारा गाव आपला माकडांच्या मागे लागतो. पण अनेक आठवडे तपास करून सुद्धा एकही माकड गवसत नाही ! 200 रूपयांची बोली लावून सुद्धा माकड मिळत नाही म्हटल्यावर मसिहा शेवटी वैतागून गाव सोडायचा निर्णय घेतो व दूसर्या प्रांतात माकडे मिळतात का याची पाहणी करण्यासाठी रवाना होतो. ताब्यात असलेल्या माकडांची निगराणी करायला तो आपल्या नोकराला गावातच ठेवतो.
मसिहाचा नोकर मालकाची पाठ फिरताच गाववाल्यांना सांगू लागतो की मालक पक्का लब्बाड आहे, माकडांच्या धंद्यात तो बख्खळ पैसा कमावितो व तुमच्या तोंडाला पाने पुसत आहे ! एका माकडामागे त्याला खरेतर 1000 रूपये मिळतात पण तुम्हाला मात्र तो शंभरच देत आहे. मला पण तो कमी पैशात राबवून घेतो , एवढेच नाही तर मला हाकलून देवून कमी पैशात कोणी दूसरा नोकर मिळतो का हे सुद्धा तो शोधतो आहे. माझा महिन्याचा पगार सुद्धा त्याने थकविला आहे. सगळ्या गावकर्यांची सहानूभूति नोकराला मिळते. जो तो मसिहाच्या नावाने बोटे मोडू लागल्यावर नोकर आपण आता मालकाला चांगलाच धडा शिकविणार असल्याचे जाहिर करतो. त्याच्या ताब्यात असलेली पिंजर्यात डांबलेली माकडे तो गावकर्यांना फक्त 100 रूपयात देवू करतो व गावकर्यांचे भले करूनच गाव सोडायचे ठरवतो. पुढे तो असेही सांगतो की मालकाने निरोप पाठविला आहे की काही दिवसातच तो परत येत आहे. ही माकडे तुम्ही 500 रूपयाखाली त्याला विकू नका असेही तो बजावून सांगतो. गावाला वेड लागते वेड ! असेल नसेल ते विकून जो तो माकडे घेण्यासाठी झुंबड करतो. बहुतेक सगळ्या जमिनी सावकारांच्या घशात जातात, दागिने , पाटल्या, बांगड्या विकून / गहाण ठेवल्यावर शेवटी बायकांच्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा रहात नाही. अवघ्या काही दिवसातच प्रत्येक गाववाल्याच्या घरात माकडेच माकडे दिसू लागतात. सर्व माकडे विकली गेल्यावर नोकर जड अंत:करणाने गाव सोडतो. सगळा गाव त्याच्या सेंड ऑफ ला लोटतो. त्याचे लाख लाख आभार मानत साश्रू नयनांनी सगळे त्याला निरोप देतात.
दोन वर्षे झाली, आटपाट नगरातले गावकरी अजूनही त्या मसिहाच्या प्रतीक्षेत आहेत. स्वत: अर्धपोटी राहून ताब्यात असलेल्या माकडांची निगरानी ठेवत आहेत. शेती-वाडी केव्हाच सावकारांच्या घशाखाली गेली आहे. आपल्याच शेतात मजूरीवर सगळा गाव राबतो आहे. काही जण आता आसपासच्या गावात माकडांचे खेळ दाखवून पोटाची खळगी भरीत आहेत.
३ टिप्पण्या:
Dear Friend,
Thanks for the story but Stock Market is basically based on "Greater Fool Theory" and it's not a secret so,as other profession requires it's basic to top knowledge to survive there... Stock Market is no exception.Only the major difference in this profession and other profession is that "You are punished very ruthlessly if you are on wrong side." and will have to pay from your pocket every-time ...for every mistake.And normally,new people cannot digest it...is the main problem.
On the contrary it requires almost every quality of "A man" to survive there.
Interesting story ...
ggff
टिप्पणी पोस्ट करा