रविवार, ८ ऑगस्ट, २०१०

बायकांना नक्की हवे तरी काय असते ?

तरूण , तडफदार सत्वशील राजाच्या राज्यावर परचक्र येते. शेजारी असलेला सम्राट दगा-फटका करून त्याला बंदी बनवतो. जेता सम्राट सत्वशीलाला ठारच मारणार असतो पण त्याच्या आदर्शवादाची छाप त्याच्यावर पडतेच ! तो त्याला एक वर्षाच्या आत, एका जटील प्रश्नाचे उत्तर शोधायला सांगतो व त्या बदल्यात त्याला अभय देवू करतो. अर्थात प्रश्नाचे उत्तर एका वर्षात न देता आल्यास मृत्यूदंड अटळ असतोच ! असतो तरी काय तो जटील प्रश्न ? बायकांना नक्की हवे तरी काय असते ?

भल्याभल्यांना या प्रश्नाचे उत्तर जन्मात सापडले नाही तिकडे तरूण सत्वशील राजा तरी काय करणार असतो ? पण दूसरा काही उपायच नसल्याने तो सम्राटाचा प्रस्ताव मान्य करतो. आपल्या राज्यात परतल्यावर तो भले भले विद्वान आणतो, सगळ्या स्तरातील लोकांना या समस्येचे आकलन करण्याचे आवाहन करतो, पण कोणालाच समाधानकारक उत्तर देता येत नाही. असेच त्याला कोणीतरी सुचवते की त्याच्याच राज्यात एक चेटकीण आहे व ती या प्रश्नाचे उत्तर चूटकीसरशी देइल – पण – पण मोबदला मात्र ती अवाच्या-सव्वा मागते, कधी कधी तिची मागणी अगदी विक्षिप्तपणाची सुद्धा असते ! आधी राजा या भानगडीत न पडण्याचे ठरवितो पण जेव्हा दिवसा मागुन दिवस जात वर्ष संपण्यास एकच दिवस बाकी राहतो तेव्हा मात्र त्याला नाइलाजाने उत्तरासाठी त्या चेटकीणीकडे जावेच लागते.

चेटकीणीकडे या समस्येचे उत्तर तयारच असते पण त्या पुर्वी राजाकडून तिला एक वचन हवे असते. राजाचा जिवलग मित्र धैर्यशीलाबरोबर तिला लग्न करायचे असते ! स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आपल्या मित्राचे आयुष्य बरबाद करण्याचा प्रस्ताव राजा धूडकावून लावतो पण स्वत: धैर्यशील मात्र “लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा जगो” या उक्तीप्रमाणे स्वत: चेटकीणीकडे जावून तिची अट मान्य असल्याचे सांगतो व उत्तर सांगायची विनंती करतो. चेटकीण सांगते , बायकांना हवे तरी काय असते ते - “तिला तिच्या पद्धतीने स्वत:चे जीवन जगायचे असते”. त्रिकालाबाधित सत्यच चेटकिणीने सांगितलेले असते व सर्वानाच ते मान्य होते, हो, अगदी त्या सम्राटाला सुद्धा व सत्वशील मुक्त होतो !

शब्दाला जागून सत्वशील राजा आपल्या मित्राचे, धैर्यशीलाचे लग्न चेटकीणीबरोबर अगदी थाटामाटात लावून देतो. लग्नाच्या पहिल्याच रात्री धैर्यशील धडधडत्या छातीने शयनगृहात शिरतो, चेटकीणीबरोबर लग्न, किती भयंकर प्रसंग ! पण शयनगृहात शिरताच त्याला आश्चर्याच धक्काच बसतो ! आत साक्षात अप्सरा भासावी अशी तरूणी पहुडलेली असते ! रंभा, मेनका, उर्वशी या तिघींचे एकत्रित सौंदर्य सुद्धा तिच्यापुढे फिकेच भासले असते ! हा प्रकार तरी काय आहे असा प्रश्न स्वाभाविकपणेच त्याला पडतो. यावर चेटकीणीचे उत्तर तयारच असते. “मी चेटकीण आहे हे माहित असूनही तू माझ्याशी लग्नाला तयार झालास म्हणून मी तुझ्यावर खुष आहे ! माझ्या मंत्रशक्तीने मी २४ तासात अर्धा वेळ अप्सरेच्या रूपात असेन व अर्धा वेळ चेटकीणीच्या. आता तू ठरव मी दिवसा वा रात्री तुला कोणत्या रूपात हवी ते ! अप्सरेच्या की चेटकेणीच्या ?” क्षणभर का होईना, धैर्यशील दुविधेत पडतो ! दिवसा , लोकात मिरविताना अप्सरा पण मग रात्रीच्या एकांतात मात्र चेटकीण ? का दिवसा सर्वांसमोर चेटकीणीसोबत रहायचे पण रात्री मात्र अप्सरेबरोबर स्वर्ग सुखाचे बेधुंद क्षण अनुभवायचे ?

धैर्यशीलाची उत्तर जाणून घेण्यापुर्वी …..

छोटासा ब्रेक –

तुम्ही जर पुरूष असाल तर काय निर्णय घ्याल ?

बायकांना सवाल , त्यांनी निवडलेल्या पुरूषाने कोणता निर्णय घेतलेला त्यांना आवडेल ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
काय ठरले ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
धैर्यशील खरेच हुषार होता. चेटकीणीने राजाला दिलेले उत्तर त्याच्या डोक्यात होतेच. त्याचे या प्रश्नाचे उत्तर तिच्यावरच सोडले. साहजिक आहे, स्त्रीला तिचे जीवन तिच्या मताने जगायची मोकळीक तर हवी असते ! प्रसन्न होवून चेटकीणीने आपण २४ तास अप्सरेच्या रूपात राहू असे जाहीर केले !

तात्पर्य काय तर ----
१) स्त्री कितीही सुंदर असेना का ? तिच्यात एक चेटकीण दडलेली असते !
२) तुम्ही जर तिला तिच्या मताने वागायची मुभा दिली नाहीत तर सगळा इस्कोट होणार.

तेव्हा एक तर “तिच्या मताने जगा” नाही तर “जगणे हराम” करून घ्या !

(मला आलेल्या इमेलचा अनुवाद )

२ टिप्पण्या:

साधक म्हणाले...

स्त्रीयांना नक्की काय हवं असतं यावर माझा पण शोध चालू आहे. कथा छान आहे. तिला तिच्या पद्धतीने स्वत:चे जीवन जगायच असत व यात भर म्हणजे आजकाल बायका ज्याला योग्य समजतात तसं समोरच्याने वागावं असं त्यांना वाटत असतं.

आपण त्यांना महत्त्व दिलं पाहिजे व ती आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची आहे हे तिला सतत जाणवून द्यावं ही बायकांची अपेक्षा असते.

असे काही प्राथमिक निष्कर्श मी काढले आहेत.

Sam म्हणाले...

पण प्रत्येक वेळेस अशी Full Time अप्सरा मिऴेलच ह्याची खात्री नाही. नशीब फारच वाईट असेल तर कुरूप अधिक बिनडोक असं एकत्रित रसायनही तुमच्या वाट्याला येऊ शकतं. प्रत्येक कुरूप स्त्री ही बुद्धिमान असतेच असं नाही...