शनिवार, ३ ऑक्टोबर, २००९

मुंबई डाईंग !

१९९५ मध्ये युती सरकार सत्तेवर आले आणि काही महीन्यातच केंद्र सरकारने बॉम्बेचे मुंबई करण्याला मान्यता दिली, पण त्याच्याही खूप आधी, आमच्या बंदाराचे नाव मुंबई बंदर विश्वस्त असे बदलण्याचा ठराव झालेला होता. त्याचे संक्षिप्त रूप मात्र Mb.P.T. असे करावे लागले कारण मद्रास पोर्ट चे नाव तेव्हा चेन्नई असे झालेले नव्हते ! मी तेव्हा संगणक विभागात होतो. आमच्या कडे जहाजे जो माल आणतात त्याची नोंद संगणकात अपलोड करायाला लागायची. आयात माल असेल तर ज्या बंदरात माल उतरणार त्याचे नाव व निर्यात असेल तर जिकडून माल जहाजात चढणार त्या बंदराचे नाव त्यात असायचेच. जगातल्या सगळ्या बंदराना कोड देण्यात आले आहेत. पण आम्हाला जो डाटा मिळायचा त्यात बंदराचे नाव असायचे. मी त्याची मॅपिंग फ़ाइल बनविली होती व पहिली ६ अक्षरे जुळत असतील तर त्यावरून पोर्टचा कोड उचलला जायचा. मालावरील मार्किंगवर तसेच पत्त्यात बाँम्बे शब्द असायचाच. नाव बदलल्यावर ते आता सगळीकडे मुंबई असेच आले पाहिजे असा माझा आग्रह होता. बॉम्बेला आमच्याकडे B079 असा कोड होता. कोड तोच ठेउन तिकडे मी MUMBAI असे बदलून घेतले पण जहाजाच्या मालकाकडून आम्हाला जी माहीती मिळायची त्यात सर्व ठीकाणी BOMBAY असेच असायचे. आमचा अमराठी प्रोग्रामर अधिकृत आदेश आल्याशिवाय कोणताही बदल करायला तयार नव्हता. पण तो पर्यंत थांबायची माझी तयारी नव्हती.

डाटा एन्ट्री टाळण्यासाठी आम्ही SDF format मध्ये जहाजातल्या मालाची माहीती मागावायचो. मला एकदम स्ट्राइक झाले की Bombay आणि Mumbai दोघांच्या स्पेलिंगमध्ये सहाच अक्षरे आहेत. त्या मुळे मुळ फ़ाइल मध्येच ते मुंबई करून घेतले तर ? थोडी खटपट केल्यावर मला तसे करता आले. जिकडे जिकडे Bomaby असेल तिकडे Mumbai झाले ! सगळ्यांना आश्चर्य वाटले, अजून नाव बदलून आठवडा पण नाही झाला आणि सगळ्या परदेशी जहाज कंपन्यानी कशी बरे याची लगेच अंलबजावणे केली ? मी त्यांना मूळ फ़ाइलमध्ये मुंबई असेच आहे बघा हवे तर असे दाखवून गप्प केले.

बराच काळ गेल्यानंतर बॉम्वे डाइंग कंपनीचे एक पत्र अनेक खात्यात फ़िरत फ़िरत माझ्याकडे आले. त्यांना आम्ही जी पावती देतो तिच्यावर हल्ली “मुंबई डाईंग “ असा उल्लेख असतो. आम्ही आमचे नाव बदललेले नाही त्यामुळे कंपनीचे लेखा परीक्षक त्याला नेहमी हरकत घेतात, असे का होत आहे ? असा त्याचा मतितार्थ होता ! सरसकट बॉम्बेचे मुंबई करण्याच्या ध्यासापायी मी ही गोष्ट लक्षात घेतलीच नव्हती. मग बरीच डोकेफ़ोड केल्यावर फाइलच्या ज्या भागात बंदराचे नाव व मालावरचा मार्क असतो तेवढाच भाग तपासून, तिकडे मुंबई करून बाकी भाग आहे तसाच सोडू लागलो ! आधीचे सर्व रेकॉर्ड तपासून जिकडे कंपनीचे नावच बदलले गेले होते ते सुद्धा जैसे थे करून ठेवले. मग “computer mistake” असे ठोकळेबाज कारण देउन पुढे मात्र असे होणार नाही याची खात्री दिली व प्रकरण मिटवले !

३ टिप्पण्या:

अमोल केळकर म्हणाले...

आपले मनापासून अभिनंदन ! मी ही जाणीवपुर्वक ' मुंबई ' याच नावाचा उल्लेख करतो.

आपला

(मुंबईकर मित्र ) अमोल

अनामित म्हणाले...

DOS

अनामित म्हणाले...

मी आपल्या ब्लॉगचा कालपासून चाहता झालो आहे. नरेंद्र गोळे यांचा ब्लोग मध्ये मला निवड झालेल्या दहाही ब्लोग ची माहिती मिळाली. प्रथम आपल्या ब्लॉग ला उत्तेजनार्थ निवडले गेले त्या बद्दल अभिनंदन. मला एक विचारावेसे वाटते की या सर्व गोष्टींचा पुढे भविष्यात ज्या लोकांबद्दल तुम्ही लिहिले आहे त्यांच्या कडून त्रास होणार नाही का? उदा. ऑस्कर, भोसले किंवा खास करून भेट, फाइलला पाय कसे फूटतात ?, मुंबई डाईंग ! रेट ! यासारखे सदर बद्दल विचारतोय मी. बाकी तुमचे सगळे सदर रोज ४ या टप्प्यात वाचण्याचे प्रयत्न करतोय. धन्यवाद.