रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४

बाळासाहेबांच्या नावाने भावनिक साद घातली तर मराठी मतदार विरघळतो का ?


छगन भुजबळ हे सेनेतुन बाहेर पडलेले पहिलेच बडे नेते. बाळासाहेबांनी तेव्हा खरोखरच भुजबळांना संपविले होते. माझगाव या त्यांच्या बालेकिल्ल्यात बाळा नांदगावकर या कार्यकर्त्याला उमेदवारी देवून भुजबळांना चीतपट केले होते सेनेने (आज नांदगावकर सुद्धा मनसेवासी झालेले आहेत !), मग भुजबळ नाशिकात गेले व लोकसभेला उभे राहिले व तिकडे सुद्धा त्यांचा पाडाव झाला !). मग मात्र भुजबळांनी आपले बळ वाढविले व बाळासाहेबांशीही सुलुख केला !

गणेश नाइक - सेनेची सत्ता असतानाच नाइक मंत्री होते व त्यांचा मुलगा नवी मुंबई मनपाचा महापौर. अचानक साहेबांची मर्जी फिरली व नाईकांना सेनेतुन हद्दपार केले गेले. मग नाईक गेले आधी कॉंग्रे्समध्ये व नंतर पवारांचा हात धरून राष्ट्रवादीत. त्यांच्या घराण्याची सत्ता अजूनही नवी मुंबईत शाबूत आहे.

नारायण राणे - राणे यांनी बाळासाहेबांना खरे हादरविले ! आपल्या सोबत बाहेर पडलेल्या सर्वच आमदारांना त्यांनी पोटनिवडणुकित निवडून आणले ! राण्यांचा पराभव करायचे बाळासाहेबांनी कोकणी माणसाला भावनिक आव्हान तेव्हा केले होते पण कोकणी माणसाने त्याचा मान राखला नाही. कोकणताला सेनेचा गड राण्यांनी साफ उध्वस्त केला !

विखे-पाटील - साखर सम्राटांना उसाच्या चिपाडासारखे पिळण्याची बाळासाहेबांची इच्छा तर होती पण तसे काही झाले नाही. सेना सत्तेत असताना जे अपक्ष त्यांच्या सोबत होते त्यांनी साखर सम्राटांचे हित अबाधित कसे राहिल याची पुरेपुर काळजी घेतली. अर्थात सेनेची सत्ता जाताच यातले बहुतेक स्वगृही परतले व आपल्या एरीयात इज्जत राखून वावरले. पुढे राधाकृष्ण पाटलांनी मात्र गद्दारी केल्यावर लोकसभेच्या निवडणुकित पाडून बाळासाहेबांनी आपली हुकमत दाखविली होती.

राज ठाकरे - दुसर्यांच्या घराणेशाहीवर हल्लाबोल करणारे बाळासाहेब शेवटी आपल्याच घरातील कौटुंबिक कलहाला थोपवू शकले नाहीत. मुलगा किे पुतण्या यात शेवटी त्यांनी मुलाचीच निवड केली व पुढे तर राजला आपले नावही घ्यायची बंदी केली. डिवचलेल्या राजनी आपला हिसका त्यांना त्यांच्या हयातीतच दाखविला व मागच्या विधानसभेत सेनेच्या तोंडचा सत्तेचा घास हिरावून घेतला.

सेना अगदी नवी असताना कोणा बंडू शिंगरेने बंड करून प्रती-शिवसेना काढल्याचे आठविते व त्यान्र अमेरिकन वकिलातीवर हल्ला सुद्धा केलेला होता. पण त्यावेळी सेना दखल घेण्याएवढी मोठी नव्हती. काही वर्षापुर्वी हा बंडू शिगरे वारला. 

आपल्या सभांना गर्दी करणारे लोक मतदानाच्या दिवशी कोठे गायब होतात हे प्रश्न बाळासाहेबांना नेहमीच पडायचा, कालपासून  राज यांना सुद्धा तोच प्रश्न सतावतो आहे !

एखादा सिनेमा जसा चालेल की पडेल याचे भाकित वर्तविता येत नाही तसेच निवडणुकितील जय / पराजयाचे आहे व  नेत्यांच्या भावनिक आव्हानाचे आहे ! शेवटी लोक म्हणजे ओक हेच खरे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: