शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०१४

उद्धवा अजब तुझे वागणे !

25 वर्षाची युती अखेर तुटली. ही युती 100 % सत्ता-प्राप्तीसाठी होती, तात्विक मुलामा कोणी कितीही देवो ! धाकल्या भावाचा उत्कर्ष सहन न झाल्याने मोठ्याने घर फोडले. या आधी मोठ्याच्या घराला घ्रर-घर लागलेलीच होती म्हणा, आधी राणे मग राज बाहेर पडलेच होते. राजने बाळासाहेबांचे नावही न घेता शिवसेनेच्या सत्ताकांशेला सुरूंग मागच्या निवडणुकित लावला होताच.

लोकसभेत नमो नामाने यश मिळाले ते उद्धवच्या डोक्यात शिरले. तेव्हा मी देवाची मुर्ती पाठीवरून नेणार्या गाढवाची गोष्ट सांगितली होती. अनेकांना असे वाटते की युतीने फायदा भाजपाचा झाला. हे साफ खोटे आहे. युती नसताना झालेल्या विधानसभेत सेनेची अवघी 1 जागा होती. ते भुजबळ सुद्धा आज सेनेत नाहीत व भाजपाच्या 16 जागा होत्या. युती झाल्यावर झालेल्या निवडणुकित भाजपा 60 जागा कमी लढवूनही 40 वर पोचला तर सेना थेट 49. तेव्हा कोण कोणामुळे मोठे झाले ? अर्थात मग भुजबळ व राणे यांनी सेनेला "जय महाराष्ट्र" केल्यावर सेनेला विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकले नाही, ते अगदी आजतागायत ! सेनेची ताकद सातत्याने कमी होवूनही विधानसभेच्या 177 जागा ती लढवत होती व भाजपा मात्र 117 जागा लढवूनही जवळपास निम्म्या जागा जिंकत होता. एकूण मतांची टक्केवारी भाजपाची कायमच 16 ते 20 % होती तर सेनेची कमी कमी होत थेट 14 % एवढीच उरली होती. सतेत असताना व नसताना देखील सेनेने कायमच दादागिरी दाखविली. ठाण्याची जागा त्यांनी भाजपाकडून हुसकावून घेतली. अगदी अलिकडे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकित सेनेने आपल्या मनाने मतदान केले. गुजरात , दिल्ली व मध्य-प्रदेशात काहीही ताकद नसताना सेना तिकडच्या विधानसभा निवडणुका सातत्याने लढवित होती व युती फक्त महाराष्ट्रात आहे असा साळसूद खुलासा करीत होती. सुपारी घेवूनच हे केले जात होते व नमो हे नक्कीच विसरले नसणार! या सर्व अपमानाचे सव्याज उट्टे आज भाजपा फेडत आहे. 

महायुतीतले घटक पक्ष वारा बघून भाजपाच्या मागे उभे आहेत व सेना एकटी पडली आहे. भाजपाने खेळी तर सुरेख खेळली आहे कारण युती मोडली की आघाडी बिघडणार हे लक्षात ठेवूनच व्यूहरचना रचली गेली आहे. पंचरंगी लढतीत मराठी मतांची विभागणी होणार पण मुंबई-ठाण्याची गुजराती मते एकगठ्ठा भाजपालाच मिळणार व जागाही ! हीच आघाडी निर्णायक ठरेल असे दिसते. भाजपाला बहुमत मिळाले नाही तरी 100 च्या आसपास जागा मिळाल्या तरी पवार साहेबही घड्याळ बघून भाजपात जातील. अर्थात भाजपा पहिला हात सेनेचा स्वीकारेल व सत्तेचे नवे समीकरण सेनेला मान्य करावे लागेल. धाकटा आता धाकटा नसेल !


४ टिप्पण्या:

नामधारी विनवी (प्र)सिद्धासी... म्हणाले...

हा काही पांडव आणि कौरवातला द्यूत नाही पण तरीही सांगतो तुमच्या खात्रीची एखादी जागा आणि अपेक्षित निकाल जाहीर करून काय होते ते पहा. कोणीही काहीही खात्री देभ शकणार नाही कारण सर्वोत्तम दाखलाच द्यायचा म्हंटलं तर जयललिता दोषी घोषित होण्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण पायउतार झाले. आता हा योगायोग तुमच्या मते कदाचित नसेलही पण आमच्या मते तो आहे.

sharayu म्हणाले...

स्वतंत्र विदर्भाचे भाजपने दिलेले आश्र्वासन युतीच्या मुळावर आले आहे. शिवसेनेला स्वतंत्र विदर्भ मान्य नाही. तेव्हा या प्रश्र्नावर जनतेचा कौल घेतला जावा ही भूमिका योग्य वाटते.

Vijay Shendge म्हणाले...

आपण खुपच योग्य मुद्दे मांडलेत. पण आपण असे काही लिहिले कि आपल्यावर लोक आणि वाचक भाजपा धार्जिणे असा शिक्का मारतील. पण त्याची फिकीर नाही. या संदर्भात मी लिहिलेले लेख जरूर पहावेत.

Unknown म्हणाले...

उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पक्षातील जेष्ट नेते मनोहर जोशी चा काय अपमान केला त्याच्याकडून काय अपेक्षा करणार बाळासाहेबांच्या पुत्र प्रेमामुळे शिव सेनेची वाट लागली