मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

नौटंकी साला !

सेनेला मुंढे प्रेमाचे भरते आलेले पाहून एकच डायलॉग आठवतो - नौटंकी साला !

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची आपली महत्वाकांशा मुंढेनी कधीच लपवून ठेवली नव्हती. तेवढी त्यांची पात्रता होतीच व आज जर युती असती तर भाजपाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले असते हे सुद्धा नक्की ! मागच्या सलग 3 निवडणुका कमी जागा लढवूनही सेनेच्या जवळपास जागा त्यांच्याच दमदार नेतृत्वाखाली भाजपाला मिळाल्या होत्या. 

छगन भुजबळांनी सेनेचे दोन तुकडे केल्यावर विधानसभेत सेनेचे आमदार कमी झाले व विरोधी पक्षनेतेपद आपसुकच भाजपाकडे गेले व मुंढेंनी क्षणाचाही विलंब न लावता ते ग्रहण केले. या नंतर बाळासाहेबांनी मुंढेवर "ठाकरी" शैलीत टीका केली होती.

पुढच्या निवडणुकित युतीची सत्ता आली  व महत्वाचे असे गृहमंत्रीपद मुंढेनी आपल्याकडे ठेवले होते व त्यावरूनही ते सेनेच्या टीकेचे धनी झाले होते.

पवारांच्या नेतृत्वाखाली तेव्हा अखंड कॉंग्रेसला युतीने हरविले होते तेव्हा पवार बाहेर पडल्यावर मतांच्या विभाजनात युती सत्ता टिकवेल असे दिसत होते.लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका एकत्रच झाल्या व एक अजब ट्रेंड बघायला मिळाला. लोकसभेत युतीने आघाडी घेतली तर विधानसभेत दोन्ही कॉंग्रेस मत विभाजनानंतरही , मागाहून एकत्र येवून सत्ता काबीज करू शकल्या. 

युतीच्या अनपेक्षित पराभवाचे कारण  होते "युतीत ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री" हे सूत्र ! सेना व भाजपाने आपले आमदार जास्त आणायचा एक आत्मघातकी मार्ग निवडला तो म्हणजे मित्रपक्षाचेच उमेदवार छुप्या कारवाया करून पाडायचे ! याचा परिणाम सत्ता गमावण्यात झाला ! बाळासाहेबांनी या वेळेही मुंढे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांशा मुळावर आल्याचे म्ह्टले होते. पुढे विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही म्हणून राण्यांनी सेना सोडली व सोबत 6 आमदार सुद्धा नेले. सेनेला विरोधी पक्षनेतेपदावर परत एकदा पाणी सोडायला लागले ! 

त्या नंतर राजनीच सेना सोडली व मनसे स्थापली. राज्यभर प्रचार करून राजने मनसेची हवा निर्माण केली. त्यांची ताकद (उपद्रव मुल्य म्हणा हवे तर !) सगळ्यात आधी मुंढेंनी हेरले व मनसेशी युती हवी असे स्पष्ट बोलून दाखविले. झाले, परत सामनामधून गोपीनाथरावांवर आगपाखड झाली व तो विचार त्यांनी सोडावा लागला ! अर्थात पुढे मुंढेच द्रष्टे ठरले व सत्तेचा घास युतीला मनसेने गिळू दिला नाहीच ! या वेळी तर भाजपाला सेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या व साहजिकच विरोधी पक्षनेतेपद सुद्धा !

लोकसभा जिंकल्यावर  मोदीसरकारने मानाने मुंढेना दिल्लीत बोलवून घेतले व महत्वाचे खातेही दिले. अर्थात हा रांगडा गडी दिल्लीच्या दरबारी राजकारणात फिट बसणारा नव्हता तेव्हा विधानसभेच्या वेळी त्यांची महाराष्ट्रात पाठवण करायचे भाजपाने ठरविले होतेच. केंद्रात मंत्री म्हणून काम केलेले मुंढे आता महाराष्ट्रात येणार ते मुख्यमंत्री व्हाययाच हे समजण्याइतके सेना नेते दु्धखुळे नक्कीच नव्हते. सेनेच्या तंबूत थरकाप उडालेला होताच, युती तुटणार वा भाजपा जास्त जागा भांडून घेणार हे स्पष्ट दिसतच होते. 

दरम्यान नियती अजब डाव खेळली. मुंढेच अपघातात निवर्तले, मुख्यमंत्री पदाचा प्रबळ दावेदारच रणांगणातुन बाहेर पडला. पुढे या अपघाताची चौकशी करावी अशी मागणी सेनेने केली. ( रमेश किणी यांच्या मत्यूची चौकशीच काय वाच्यता सुद्धा तेव्हा सत्तेत असलेल्या सेनेला नको होती. न्यायालयाच्या ब भुजबळांच्या दणक्याने ती करावे लागली याची आठवण सुद्धा आज कोणाला होत नसेल !)  सेनेसाठी मात्र हे चांगलेच झाले व भाजपा महाराष्ट्रात नेतृत्व पोकळी झाल्याने भाजपा जागा-वाटपात तुटे पर्यंत ताणणार नाही हे  सेना गृहीत धरून चालली. अनेक अपमान पचवून युती टीकविणार्या भाजपाला मात्र मोदींच्या लाटेने युती अधिक जागा मिळणार नसतील तर युती तोडणेच योग्य वाटू लागले. सेनेला अखेरपर्यंत बोलण्यात गुंतवून, बाकी मित्रांना आपल्याकडे वळवून शेवटच्या क्षणी भाजपाने युती तोडली ! गोपीनाथरावांनी अगदी हेच केले असते ! पण ते आता हयात नाहीत म्ह्टल्यावर मात्र सेनेला त्यांचा पुळका आला आहे ! 

नौटंकी साला !

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

लढाई मध्ये आपला खरा शत्रू कोण ज्याला कळत नाही लढाई कदापि जिंकू शकत नाही …. आणि अशी स्थिती शिवसेनेची आणि मनसेची झाली आहे . … भाजप ला अफजल खानची फौज म्हणायची आणि त्याच फौजेत आपला सेनापती आहे (अनंत गीते ) हे विसरायचे …. हे काय विकास करणार …. हवालदिल झालेली सेना एवढेच म्हणेन …।